जपून टाक पाऊल

माणसांना आपली अपत्ये शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक वगैरे दृष्टीने आदर्शवत् व्हावीत, निरोगी राहावीत असे वाटते. सर्वच सजीवांची पिल्ले सभोवतालच्या परिस्थितीशी जुळते गुण असले तर जास्त जगतात व जनतात. माणसे यात हेतुपुरस्सर, जाणीवपूर्वक काही करण्याचे प्रयत्नही करतात, हे माणसांचे वैशिष्ट्य. मुळात हे केवळ सजीव रचनांनी परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे एक अंग आहे पूर्णपणे नैसर्गिक आणि अपेक्षित. यामुळेच काही वर्षांपूर्वी पुण्याच्या डॉ. हे.वि. सरदेसायांचे घरोघर ज्ञानेश्वर जन्मती (किंवा तसल्या) नावाचे पुस्तक खूप लोकप्रिय झाले. त्याच काळात डॉ. स्पॉकचे बेबी ॲण्ड चाइल्ड केअर हे पुस्तक खपाबाबत बायबलशी स्पर्धा करत होते.

आज जेनेटिक्स आणि रेण्वीय जीवशास्त्र यांच्या विकासामुळे काही नव्या शक्यताही उद्भवत आहेत. अशा शक्यतांबाबत सांगलीच्या डॉ. प्रदीप पाटलांचा एक लेख या अंकात प्रकाशित करत आहे डिझायनर मुले हा मथळा मात्र माझा. पाटील यांच्या लेखातल्या शक्यता मात्र जशाच्या तशा मानण्याजोग्या नाहीत, तर त्यांना पुस्त्यांची आणि ‘सांभाळा’ अशा सूचनांची गरज आहे.

एक म्हणजे जीन्सप्रमाणे ठरणारे गुण आणि त्यांवर परिस्थितीचे होणारे परिणाम, यांच्यातले संबंध स्पष्टपणे लक्षात घ्यायला हवेत. याची चाहूल पाटलांच्या लेखात लागते, पण हा मुद्दा जास्त तपशिलात ठसायला हवा. जीन्स व्यक्तीत कोणते गुण असतील त्याच्या शक्यता ठरवून देतात. प्रत्यक्ष गुण घडणे मात्र जीन्सइतकेच परिस्थिती, संगोपन, संस्कार, अशा घटकांवरही अवलंबून असते. परिस्थितीला अनुकूल करून घ्यायची क्षमताही जीन्स ठरवतात, पण सोबतच जीन्स व्यक्त होणे न होणे, हे परिस्थिती ठरवते. कापडात जसे ताणे आणि बाणे असतात, तसा जीनदत्त स्वभाव आणि परिस्थितीने होणारी त्या स्वभावाची अभिव्यक्ती यांमधला संबंध असतो. अगदी उथळ उदाहरण घ्यायचे तर एखाद्या व्यक्तीचे जीन्स ती सुदृढ होईल अशी शक्यता उत्पन्न करतात, पण पालन पोषणातूनच प्रत्यक्ष सुदृढता उभी राहते. मॅट रिडली हा विज्ञान लोकप्रिय रूपात मांडणारा लेखक आपल्या एका पुस्तकाच्या नावातून हे स्पष्ट करतो नेचर व्हाया नर्चर, संस्कारातून व्यक्त होणारा स्वभाव. पाटलांच्या लेखात सेरोटॉनिन (serotonin) या मेंदूतील जैवरसायनाचा ओझरता उल्लेख आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशात वावरणे या जैवरसायनाच्या उत्पादनाला मदत करते. साधारणपणे जबाबदारीची पदे सांभाळणाऱ्या लोकांमध्ये साहाय्यक भूमिका निभावणाऱ्या लोकांपेक्षा सेरोटॉनिनचा स्राव जास्त दिसतो. सेरोटॉनिन घडणे जीन्समुळे शक्य होते, पण प्रत्यक्ष स्राव मात्र जबाबदारी, सूर्यप्रकाश वगैरे परिस्थितिजन्य घटकांमुळे घडत असतो.

थोडक्यात म्हणजे, पाटलांच्या किश्शांमधील प्रीजेनेटिक निदानातून घडवलेल्या व्यक्तींच्या क्षमतांच्या शक्यता सुधारतीलही, पण क्षमता व्यक्त होतीलच याची खात्री नाही!

सुप्रजननशास्त्र, यूजेनिक्स (eugenics), या शास्त्राचा इतिहासही पाटील सांगतात तितका सरळसोट नाही. मायकेल क्रिक्टनच्या (ज्यूरॅसिक पार्क फेम) स्टेट ऑफ फियर (डीरींशष ऋचारी, हार्पर कॉलिन्स-इंडिया टुडे, २००४) या पुस्तकाचे एक परिशिष्ट विज्ञानात राजकारण घुसल्याने घडलेली विकृती, असे सुप्रजननाच्या तत्त्वाचे वर्णन करते. या परिशिष्टाचा संक्षेपही सुप्रजननाचा इतिहास या नावाने याच अंकात प्रकाशित करत आहोत. अर्थातच, शतकाभरापूर्वीचे सुप्रजनन ठामपणे वंशवादी व ‘सामाजिक डार्विनवाद’ या डार्विनच्या तत्त्वाच्या विकृत रूपातून घडलेले होते. पाटील सांगतात ते आजचे सुप्रजननशास्त्र तसे नाही पण पाटील सांगतात तितक्या निःसंदेहपणे ते ‘विधायक’ही नाही पहिल्याच किश्शात पाटील उत्तम, सर्वोत्तम मुलाच्या गुणांची यादी देतात, “गोरे, घाऱ्या डोळ्यांचे, कोणत्याही रोगाचा मागमूसही त्याच्या गुणसूत्रांत नसलेले, बलवान. . . वगैरे, वगैरे”. आता ही किंवा अशी कोणतीही यादी कधी सर्वमान्य होईल का, याचा विचार करू.

थेट जीनदत्त रोग (टे-साक्स, हंटिंग्टन इ.) आढळले तर जीनसंचांतून त्यांना बाद करावे, याबद्दल वाद असायचे कारण नाही. पण काही जीनदत्त विकार काही विशिष्ट परिस्थितीमुळे घडलेले असतात. जसे, लाल रक्तपेशींची कार्यक्षमता कमी करणारा सिकलसेल अॅनिमिया (Sickle-cell-anemia, चंद्रकोरीसारख्या आकाराच्या रक्तपेशी घडवणारा ‘दात्र-पेशिका पंडुरोग’) हा विकार असलेल्या लोकांना मलेरिया होण्याची शक्यता कमी असते. म्हणजे गुणसूत्रांमध्ये कोणत्याही रोगाचा मागमूसही नसणे, हे दिवास्वप्न असायची शक्यता आहे. उघडपणे जीनदत्त रोग टाळण्यापर्यंत व्यवहार्य असलेले धोरण झपाट्याने अवास्तव होऊ शकते.

‘बलवान’ या शब्दाबाबतही असेच सांगता येईल. मॅरॅथॉनसारखी लांबची शर्यत यशस्वीपणे पळायला लागणारे ‘बल’ हे शंभर मीटर ‘डॅश’ला आवश्यक असलेल्या क्षमतांपेक्षा वेगळे असते. कॅरम, बिलियर्ड्सना लागणारे नेमके हालचालींचे नियंत्रण आणि भारोत्तोलनाच्या क्षमता, हे वेगवेगळे असते. बहुसंख्य मानवी व्यवहारांना किती ‘बल’ लागते, असे जर विचारले तर त्याच्या उत्तरादाखल एक वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो “पाय किती लांब हवेत?’ उत्तर आहे, “जमिनीपर्यंत पोचतील इतके लांब!” इथेही ‘बलवान’, खेळाडू वृत्ती वगैरे शब्दांच्या ना व्याख्या सहजपणे करता येत, ना एक क्षमता दुसऱ्या क्षमतेला मारक ठरणार नाही याची खात्री देता येत.

‘गोरे, घाऱ्या डोळ्यांचे’ हे तर उघडच पूर्वग्रह आहेत; सहजपणे वंशवादात परिवर्तित होऊ शकणारे! कोणतीही व्यक्ती इतर व्यक्तींना सुंदर का वाटते किंवा का वाटत नाही, याला वस्तुनिष्ठ निकष लागू पडत नाहीत. पुढे जो ‘हव्या तशा, हव्या तेवढ्या गोलाई’चा उल्लेख आहे, तो तपासला तर हे उघड होते. कोणाला गोलाई हवी आहे यावर ती कशी व कुठे हवी ते ठरते पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ निकषांप्रमाणे. आणि या व्यक्तिनिष्ठ आवडीनिवडीही मुळात व्यक्तिनिरपेक्ष परिस्थितीतून येतात, असे मानायला भरपूर जागा आहे. सर्वच माणसे, सर्वच सजीव, आपापल्या परिस्थितीशी जुळत जात असतात. बर्फाळ टुंड्रात राहणारा एस्किमो आणि विषुववृत्ताजवळ राहणारा आफ्रिकन; उंच पर्वतांवर राहणारा नेपाळी आणि मैदानांत राहणारा वहाडी-मराठवाड्यातला; हे सगळे आपापल्या परिस्थितीशी जुळत जात असतात. सौंदर्य ही अखेर निरोगीपणाची, प्रजननक्षमतेची जाहिरात असते. जर निरोगीपणाची व्याख्याही परिस्थिती ठरवत असेल, तर सौंदर्याच्या व्याख्याही बदलतात. उंच, शिडशिडीत व्यक्ती बर्फाळ प्रदेशात जगताना जास्त अन्न खाऊनच शरीराचे तापमान टिकवू शकते, तर गुटगुटीत बसकेपण अन्नाची गरज कमी करते. बहुधा एस्किमोंना ‘सुबक ठेंगणी’ हे स्त्रीचे वर्णन मोहवेल, तर आफ्रिकनाला ‘जशी चवळीचि शेंग कवळी’ आकर्षक वाटेल. आज यात माध्यमे विकार उत्पन्न करत आहेत. दूरदर्शन मालिकांवरच्या नटनट्या छापाच्या गणपतींसारख्या एकसुरी ‘सौंदर्य’ असलेल्या असतात, आणि याने प्रेक्षकांची अभिरुचीही बदलते. पण असले विकार स्वप्नरंजनांमध्ये जास्त दिसतात, आणि वास्तव निवडींमध्ये कमी.

एकूणच ‘सर्वोत्तम’ माणूस, स्त्री किंवा पुरुष, ही संकल्पनाच अखेर निरर्थक आहे. पण समजा की एखाद्या मोठ्या मानवसमूहात सर्वोत्तम माणूस ही कल्पना सर्वमान्य झाली, आणि त्या समाजातली बहुसंख्य अपत्ये त्या निकषांप्रमाणे घडवली जाऊ लागली. आता प्रश्न वेगळेच असतील. सारीच माणसे दोन आदर्श ‘प्रतिमानां’वर बेतलेली असतील, एक स्त्री, एक पुरुष. आता ‘निवड’ ही कल्पनाच निरर्थक ठरेल, कारण सर्व पुरुष, सर्व स्त्रिया एकसारख्याच असतील. राजूला निवडावे का, हा प्रियाला पडलेला प्रश्न फार तर एखाददोन पिढ्यांमध्ये असंबद्ध ठरेल. फार कशाला, आपल्या निवडीचे स्त्री-पुरुष ओळखता यायला त्यांच्यात फरकही जीनपातळीवर घडवून ठेवावे लागतील!

आतापर्यंत आपण सगळा विचार व्यक्तींच्या पातळीपुरताच केला. आता संपूर्ण मानवजात, किंवा स्वतःला सर्वोत्तम साच्यात ढाळून घेणारा मानवसमूह, या पातळीवर काय होऊ शकते ते पाहू. सर्व माणसे एका नमुन्याची असणे हे नव्या रोगरायांना, आपत्तींना तोंड देण्याच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक असते. एखाद्या शेतात उच्च दर्जाची, पण क्लोनिंगसारख्या (cloning) तंत्रांनी एकसुरी केलेली बियाणे काही ठिकाणी पेरली जातात. याला ‘मोनोकल्चर’, एकसुरी पीकपद्धती म्हणतात. अशी पिके रोगांबाबत फार हळवी असतात. एका रोपावर आलेला रोग, एका रोपावर पडलेली कीड, झपाट्याने शेतभर पसरते; कारण सर्वच रोपे नेमकी, हुबेहूब एकसारख्या जीनसंचाची असतात. बरे, ही सर्व रोपे जमिनीतली तीच ती द्रव्ये शोषून घेतात. थोड्याच काळात जमिनीतली ती द्रव्ये संपून जाऊन जमीन कसहीन होते. मिश्र पिके घेणे, एकामागून एक तेच ते पीक न घेणे, ही सगळी शेतीतंत्रे मोनोकल्चरचे दुष्परिणाम टाळण्याकरता घडली आहेत. आणि इथे तर एखादा मानवसमूह किंवा सारी मानवजातच मृगजळामागे, ‘सर्वोत्तमते’मागे लागून जीनसंचातल्या वैविध्याच्या क्षमता गमावून बसत आहे.

कोणत्याही समूहातली व्यक्तीव्यक्तींमधली गुणांची विविधता, ही त्या समूहाची एक खास क्षमता असते. तीच जर काही कारणाने, काही नीट विचार न करता केल्या गेलेल्या प्रयोगांमुळे नाहीशी झाली, तर तो समूह दुबळा होतो. चित्ता हे जनावर भारतातून नष्ट झाले. आफ्रिकेतही ते नामशेष झाले आहे. या ह्रासामागे जीनसंचाचा एकसुरीपणा, हे प्रमुख कारण आहे. तर अशा धोक्याच्या मार्गावर माणसाने जावे का ?

‘बुद्धि’ या संकल्पनेबाबतही आपण सतर्क राहायला हवे. मास्टर दीनानाथांची सांगीतिक बुद्धिमत्ता, सचिन तेंडुलकरची क्रिकेटमधली बुद्धिमत्ता, या ‘बुद्ध्यंक (खट) या संकल्पनेत सहज न बसणाऱ्या क्षमतांचा विचार करू. अशा क्षमतांना वाव द्यायला हवा की नको ? मेंदू व वर्तन यांच्याबाबत निर्दोष’ असा शब्द वापरताना नेमके काय अपेक्षित आहे? दहा लक्ष एस.एन.पी.पैकी कोणता संच कोणत्या परिस्थितीसाठी “निर्दोष’ ठरेल? वैज्ञानिक नसलेले लोक विज्ञानाच्या पद्धतींवर संक्षेपणवादाचा, reductionism चा आरोप करतात, तो नेमक्या अशा अतिसुलभीकरणामुळेच.

आता एका वैज्ञानिक कथेवरील चित्रपटाची कथा सांगतो नाव आहे, गॅटाका (Gattaca). एका दांपत्याला एक मूल होते. पीजीडीसारख्या तंत्रांमुळे असे कळते की हे मूल तिशीच्या आत हृदयविकाराने दगावण्याची शक्यता बरीच जास्त, नव्वदेक टक्के इतकी आहे. पण हे दोष काढून टाकायची तंत्रे मात्र घडलेली नसतात. त्या दांपत्याला पुढचे मूल होईपर्यंत अशी तंत्रे घडलेली असतात, आणि हे दुसरे मूल काहीसे सुधारून घेतले जाते. मोठा मुलगा त्याच्या अल्पायुषी असण्याच्या शक्यतेमुळे फारतर सफाई कामगार होईल, पण दुसरा सुधारणांमुळे पोलीस तपासनीस होऊ शकेल, असे डॉक्टर लोक ठरवतात. जीनसंच तपासणे आणि सुधारून घेणे, ही तंत्रे वापरताना आपोआपच याप्रकारचा नियतवाद (determinism) वापरावा लागतो. एका प्रकारची जन्मजात पण ‘गुणाधिष्ठित’ जातिव्यवस्थाच उभी राहते! जीन्स आणि गुण यांच्यातला संबंध नेहेमीच संभाव्यतांच्या रूपात व्यक्त करावा लागतो, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.

पण मोठ्या (झाडूवाल्या!) मुलाला ‘गॅटाका’ या अवकाशप्रवासाच्या योजनेत सामील होण्याची तीव्र इच्छा असते. तो योजनेत सामील होण्यासाठी अनेक खटपटी-लटपटी करतो, ज्यांचा गाभा म्हणजे दर जेनेटिक तपासणीत एका वेगळ्याच व्यक्तीच्या रक्त, थुकी, लघवी वगैरेंचे नमुने द्यायचे! एक उच्च क्षमतेचा माणूस अपघाताने पांगळा होतो, आणि पैशांसाठी झाडूवाल्याला नमुने पुरवत राहतो.
अखेर शेवटचा, अवकाशयानात चढायचा दिवस येतो. पोलीस भाऊ झाडूवाल्या भावाला गाठतो, आणि विचारतो, की हे कसे जमवून आणले. बालपणच्या एका घटनेची आठवण झाडूवाला करून देतो. दोघे भाऊ समुद्रात पोहायला जातात जो आधी परत फिरेल, तो हरला असे समजायचे. बहुतेक वेळा पोलीस भाऊ जिंकतो, आणि मोठ्या भावाची टिंगल करतो. एकदा मात्र मोठा भाऊ मागे वळतच नाही. अखेर धाकटा भाऊ घाबरून गटांगळ्या खाऊ लागतो आणि मोठा त्याला मदत करत, धीर देत दोघांनाही परत घेऊन येतो. ही आठवण करून देत मोठा भाऊ म्हणतो, “मी त्या दिवशी मरायला तयार होतो, पण हरायचं नाही असं ठरवलं होतं. तितकी इच्छा असली की जमतं, सगळं.”

मला कल्पना आहे, की ही कहाणी ‘भावनाप्रधान’ मानली जाईल. तर्कशुद्ध युक्तिवाद केला जाईल, की जिद्द हीदेखील शेवटी सेरोटॉनिन, अॅड्रिनलीन व तसल्या जैवरसायनांमधूनच उपजते. हा युक्तिवाद मला मान्यही आहे पण, दहा लक्ष एसएनपी स्थळांच्या अब्जावधी रचनांमध्ये कमकुवत हृदय, पण तीव्र महत्त्वाकांक्षा, हे मिश्रण घडणे अशक्य नाही. जसे जीनसंचाचा नकाशा काढण्याचे,कोणते जीन्स रोगट आहेत हे ठरवण्याचे शास्त्र घडते आहे, तशीच इतरही शास्त्रे घडत आहेत. अनेक घटक, काहींच्या क्रिया एकमेकांशी सुसंवादी, तर काही विसंवादी, या कोलाहलासारख्या क्लिष्टपणातून काही अनपेक्षित गुण उपजणे, या साऱ्यांची शास्त्रेही विकसित होत आहेत. केऑस (Chaos, कोलाहल), व्यामिश्रता (complexity), स्वसंघटन आणि नव्या गुणांचा उद्भव (Self-organization and emergence of new characteristics), ही सारी शास्त्रे नुकतीच विकसित होऊ लागली आहेत. पण जास्त वैविध्य असलेल्या लोकसंख्या आघातांना जास्त सक्षमपणे तोंड देतात, तर एकसुरी लोकसंख्या आघातांनी कोलमडू शकतात, हा निष्कर्ष मात्र स्पष्ट आहे. त्यामुळे ‘सु’प्रजनन, सर्वोत्तम रचना घडवणे, अशा भूमिकांमधून मनुष्यजातीतले वैविध्य कमी करणे आत्मघातकी ठरू शकेल. असाच एक महत्त्वाचा मुद्दा घटकांच्या परस्परांशी असलेल्या संबंधांबद्दल आहे, connec-tivity बद्दल ; पण वो किस्सा और कभी! स्पष्टपणे रोगकारक जीन्स काढता येत असतील तर ते काढावेच, हे आजही बहुमान्य आहे. गंभीरपणे रोगग्रस्त भ्रूणाच्या स्थितीत गर्भपात करायची कायदेशीर परवानगी आजही, अगदी भारतातही आहे. पण माणूस कसा असावा याचे ‘आदर्श’ ठरवणे, आणि तशा आदर्शाकडे जाण्याचा प्रयत्न करणे मात्र शास्त्राचा विपर्यास करण्यासारखे ठरेल.

एक मानवसमूह दुसऱ्यापेक्षा ‘श्रेष्ठ’ असतो का? काही समूहांमध्ये परिस्थितीचा लाभ घेण्याचे गुण जास्त असतात का? हे आणि असले मुद्दे फार सहजपणे शास्त्राकडून, विज्ञानाकडून राजकारणाकडे हस्तांतरित होतात. मग हेत्वारोप, एकमेकांच्या म्हणण्याचे विकृतीकरण, हलक्याफुलक्या शेऱ्यांमध्ये ‘गहन’ अर्थ शोधणे, असे प्रकार सुरू होतात.

हे टाळण्याची जबाबदारी इतरांपेक्षा शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, विचारवंत, यांच्यावर जास्त आहे. त्यामुळे नव्या निरोगीपणाच्या शक्यता मांडतानाच आपले म्हणणे ‘बिघडवले’ जाणार नाही याबद्दल जागरूक राहण्याची गरज आहे.

बरे, येवढे करूनही ‘सर्वोत्तम’ मुले घडवण्याचे प्रयत्न होतीलच शरीराची ‘गोलाई’ वाढवायला सिलिकोन उपचार, कातडीवरच्या वयोमानाने येणाऱ्या सुरकुत्या मिटवायला ‘प्लास्टिक’ शल्यक्रिया, असली ‘फॅडे’ अटळपणे माणसांना मोहवतातच. फक्त त्याला ‘सु’प्रजनन म्हणण्याआधी, ‘सौंदर्यवर्धन’ म्हणण्याआधी जास्त खोलात संभाव्य परिणाम तपासूनच पुढे जावे, हे बरे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.