सुप्रजननाचा इतिहास

अशी कल्पना करा की एक नवे वैज्ञानिक तत्त्व एका येऊ घातलेल्या आपत्तीची सूचना देते आहे, आणि त्या आपत्तीपासून वाचायचा मार्ग सुचवते आहे. तत्त्वाला अनेक अग्रगण्य वैज्ञानिकांचा, राजकारण्यांचा आणि मान्यवरांचा (Celebrities) आधार मिळाला आहे. अनेक दाते संशोधनासाठी देणग्या देत आहेत, आणि विख्यात विद्यापीठे संशोधन करत आहेत. आपत्तीबद्दल माध्यमे अहवाल देत आहेत. नवे वैज्ञानिक तत्त्व शालेय अभ्यासक्रमांत समाविष्ट केले गेले आहे. मी पृथ्वीच्या तापमानवाढीबद्दल बोलत नाही आहे मी शतकाभरापूर्वी घडलेली एक घटना सांगतो आहे.
त्यावेळी त्या वैज्ञानिक तत्त्वाला पाठिंबा देणाऱ्यांत थिओडोर रुजव्हेल्ट, वुड्रो विल्सन, विन्स्टन चर्चिल हे राजकारणी होते. ऑलिव्हर वेंडेल होम्स आणि लूई ड्रडाईस हे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. अलेक्झंडर ग्रॅहॅम बेल (टेलेफोन !), मार्गरेट सँगर (स्त्रीहक्क), लूथर बरबँक (वनस्पतिशास्त्रज्ञ), लेलंड स्टॅन्फर्ड (स्टॅन्फर्ड विद्यापीठ), एच.जी.वेल्स, जॉर्ज बर्नाड शॉ ह्यांनी नव्या तत्त्वाला. त्यावर आधारित कार्यक्रमाला पाठिंबा दिला. संशोधनासाठी ‘कोल्ड स्प्रिंग्ज हार्बर संस्था’ उभारली गेली. हार्वर्ड. येल. प्रिन्स्टन, स्टॅन्फर्ड, जॉन्स हॉपकिन्स, ही विद्यापीठे संशोधनाला लागली. न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्निया राज्यांनी कायदे करून संशोधनाला पाठिंबा देऊ केला. नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन मेडिकल असोसिएशन, नॅशनल रीसर्च काऊन्सिल, यांनी पाठिंबा जाहीर केला. असे सांगितले गेले की येशू ख्रिस्त जर या काळात जिवंत असता तर त्यानेही पाठिंबा दिला असता!
पन्नास वर्षे संशोधन, कायदे आणि माध्यमे या तत्त्वातर्फे बोलत होती. विरोधकांना प्रतिगामी, आंधळे, अडाणी असे संबोधून चूप बसवले जात होते. पण मुळात विरोध करणाऱ्यांची संख्या आश्चर्यकारक कमी होती..
आत हे वैज्ञानिक तत्त्व ‘कृतक विज्ञानांत, psenudoscience मध्ये धरले जाते. त्यात ज्या येऊ घातलेल्या आपत्तीचे वर्णन केले, तशी आपत्ती येतच नव्हती. या तत्त्वानुसार म्हणून ज्या क्रिया केल्या जात होत्या, त्या नीती व कायद्याच्या दृष्टीने चुकीच्या होत्या आणि त्यामुळे अखेर लक्षावधी माणसांचा मृत्यू ओढवला. हे तत्त्व होते सुप्रजननाचे, यूजेनिक्सचे (eugenics). त्याचा इतिहास भीषण आहे. त्याचे एकेकाळचे समर्थक आज त्या प्रकाराबद्दल इतक्या ओशाळवाण्या परिस्थितीत आहेत की आजकाल त्या तत्त्वाची चर्चाही होत नाही. पण ती कहाणी सर्वांना माहीत हवी, म्हणजेच तिचे भीषण पुनरुज्जीवन होण्याचा धोका टळेल. सुप्रजनाच्या तत्त्वामागे धारणा अशी होती की माणसांच्या एकूण जीन-साठ्याचा ह्रास होत जाऊन मानववंशाचाच ह्रास होईल. माणसांमधल्या सर्वोत्तम व्यक्तीचे प्रजनन खालच्या गुणवत्तेच्या लोकांच्या प्रजननापेक्षा कमी वेगाने होत आहे. यामुळे परदेशी, अनिवासी, यहुदी, विकृत, अयोग्य आणि मतिमंद माणसांचे प्रमाण वाढत जात आहे. हा विचार प्रथम फ्रान्सिस गॉल्टन या प्रतिष्ठित वैज्ञानिकाने मांडला, पण पुढे गॉल्टनच्या हेतूंपासून त्या विचाराला बरेच दूर नेण्यात आले. त्याला आधार मिळाला अमेरिकेतून. अमेरिकन लोकांना त्यामागच्या विज्ञानाशी फारसे घेणेदेणे नव्हते पण त्यांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत येणाऱ्या खालच्या दऱ्यांच्या लोकांबाबतचे धोरण घाबरवत होते ‘‘धोकादायक मानवी टोळधाड’ आणि तिच्यातून येणारा “मतिमंदांचा लोंढा” आपल्या उत्तम वंशाला दूषित करेल, अशी भीती अमेरिकनांना वाटत होती. सुप्रजननवादी आणि मानवी-आयातीचे विरोधक एकत्र झाले आणि मतिमंदांची आयात थांबवायचा प्रयत्न करू लागले. यहुदी, बहुतेक परदेशी आणि काळे, हे गट मतिमंद असतात, यावर बहुतेकांचे एकमत होते. अशा लोकांना खच्ची करून किंवा विशेष संस्थांमध्ये ठेवून त्यांचे प्रजनन थांबवण्याची योजना आखली गेली.
मार्गरेट सँगर म्हणाली, “चांगल्या माणसांचा बळी देऊन फालतू, निरुपयोगी (good-for-nothing) लोकांना पोसणे हे अपार क्रौर्य आहे … मतिमंदांची वाढीव प्रजा मागे ठेवणे हा भावी पिढ्यांना शाप ठरेल.” ती “माणसांच्या कचऱ्याचे लोढणे” वाहण्याबद्दलही बोलली. आज उदारमतवादी समजले जाणारे एच.जी.वेल्स, रुझव्हेल्ट आणि शॉही याच सुरात बोलत असत. लॉथॉप स्टॉडार्डचे “गोऱ्यांच्या जागतिक सत्तेला ‘रंगा’च्या भरतीचे आव्हान” व तत्सम पुस्तके उघडपणे वंशवादी होती. पण मानववंशांच्या सुधारणेच्या महान ध्येयापुढे वंशवादही सुसह्य मानला जात होता. या धोरणाचा पाठपुरावा हा प्रागतिक आणि उदारमतवादी मानला जात होता. एकोणतीस अमेरिकन प्रांतांपैकी सर्वांत प्रागतिक मानल्या गेलेल्या कॅलिफोर्नियात सर्वांत जास्त खच्चीकरणे केली गेली.
या प्रकाराला कार्नेगी फाऊंडेशन व रॉक फेलर फाऊंडेशन पैसे पुरवत असत. जर्मनीत मनोरुग्णांना गॅस-चेंबर्समध्ये मारले जात असतानाही रॉकफेलर पैसे जर्मनीकडे वाहतच होते थेट दुसऱ्या महायुद्धाच्या काही महिने आधीही हे वाहत होते कारण तोपर्यंत सुप्रजननाची आघाडी अमेरिकेतून जर्मनीत सरकली होती.
१९२० पासून जर्मन ‘प्रगती’चा अमेरिकन सुप्रजननवादी हेवा करत असत. जर्मनीत सामान्य घरांमध्ये बोलावून मनोरुग्ण व मतिमंदांच्या मुलाखती घेतल्या जात आणि घरामागच्या गॅस-चेंबरमध्ये कार्बन मोनॉक्साईड वायूने त्यांना मारले जात असे. नंतर हे मृतदेह भट्ट्यांमध्ये जाळून टाकले जात. पुढे रेल्वे लाईनींची सुविधा असलेल्या छळछावण्यांमध्ये एक कोटी अवांछित (undesirable) लोकांना मारले गेले.
दुसऱ्या महायुद्धानंतर आपण सुप्रजननवादी आहोत किंवा होतो हे कोणीच कबूल करेना. या तत्त्वाच्या प्रेमात पडलेल्यांचे चरित्रकारही आपल्या नायकांचे या तत्त्वाचे प्रेम अनुल्लेखाने मारू लागले. सुप्रजनन शालेय अभ्यासक्रमातून हटवले गेले, पण काही जण असे मानतात की वेगळ्या आणि झाकपाक केलेल्या रूपात त्या कल्पना आजही प्रचलित आहेत. आज मागे वळून पाहताना तीन मुद्दे लक्षणीय वाटतात. एक म्हणजे विद्यापीठे, प्रयोगशाळा, विधिमंडळे यांच्या प्रयत्नांमागे कोणतेच विज्ञान नव्हते. खरे तर त्या काळी जीन म्हणजे काय, हेदेखील समजलेले नव्हते. “मतिमंद” (feeble minded) वगैरे नीटशा व्याख्या नसलेल्या संज्ञा वापरत (“ह्रास झालेले’, degenerate; अयोग्य, unfit) सारी चर्चा होत असे. दुसरे म्हणजे सुप्रजनन ही वैज्ञानिक कातडे पांघरलेली सामाजिक धारणा होती. वंशवाद आणि मानवसमूहांच्या एका क्षेत्राकडून दुसरीकडे होणाऱ्या विस्थापनांबाबतचा तो कार्यक्रम होता. ढगळ संकल्पनावादाने हे शक्य केले होते.
तिसरा आणि सर्वांत क्लेशकारक मुद्दा म्हणजे अमेरिकन व जर्मन प्रस्थापित वैज्ञानिकांनी या प्रकाराला कोणताही पद्धतशीर व सातत्याचा विरोध केला नाही. उलट आजचे जर्मन अभिलेखागारांचे संशोधन दाखवते की जर्मन वैज्ञानिक मुकाट्याने कार्यक्रमात सामील झाले. उटे डाईख्मन (Ute Deichman) नोंदतो की “(१९३०-४० च्या दशकात) वैज्ञानिक नात्झी वांशिक धोरणांबाबत सक्रिय होते. संशोधन वंशवादी धारणांना पूरक होते. कोणतेही बाह्य दबाव असल्याचा पुरावा सापडत नाही.’
[मायकेल क्रिक्टन (Michael Crichton) च्या स्टेट ऑफ फिअर (State of fear, हार्फर-कॉलिन्स व इंडिया टुडे, २००४) या कादंबरीचे पहिले परिशिष्ट आहे. व्हाय पोलिटिसाईज्ड सायन्स इज डेंजरस – राजकीयीकृत विज्ञान धोकादायक का असते. त्याच्या काही भागाचा हा संक्षेप. सं.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.