स्त्रीजन्माची जैविक कहाणी

पुरुषी नजरेतून सुशिक्षित स्त्री
* अति-विद्येने स्त्रिया व्यभिचारी होतील.
* स्त्रियांस सोडचिठ्ठी द्यावयाची असेल तरच स्त्री-शिक्षणाचे अनुमोदन करावे.
* अनेक स्त्रिया करण्याची पुरुषांना आज मोकळीक आहे. आपल्या हातून कदाचित परदारागमन होते. स्त्रिया शिकल्या की त्या प्रश्न करतीलः “आम्हाला मोकळीक का नसावी?”
* स्त्रियांस शिकवून आपण भाकऱ्या भाजाव्या काय?
* स्त्रिया विद्वान झाल्यावर भ्रतार, आप्तपुरुष, वडील माणसे यांचा त्यांच्यावर वचक राहणार नाही.
* स्वयंवर, पुनर्विवाह, पुरुषासारखे अधिकार मागणे, यांकरिता स्त्री बंड करेल.
* बायका शिकू लागल्या तर त्यांचे नवरे मरतात.
* बायकांना शाळेत पाठवले तर पुरुषांच्या दर्शनाने भीडमर्यादा राहणार नाही.
* शाळेमध्ये कलावंतीण/हीन जातीच्या संसर्गाने पवित्रता व सदाचार नष्ट होतील. स्त्रियांना शिक्षण देऊ नये यासाठी अट्टाहास धरणारे वर उल्लेख केलेले मुद्दे ‘ज्ञान-प्रसारक’ या मराठी मासिकाच्या जानेवारी १८५२ च्या अंकात प्रसिद्ध झाले आहेत. यावरून स्त्रियांबद्दल, स्त्री-शिक्षणाबद्दल त्या काळी व्यक्त होत असलेली घृणा, तिरस्कार यांचा अंदाज येईल. गेल्या दीडशे वर्षांत पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेले आहे. टोकांच्या मतांची धार बोथटली आहे. परंतु पुरुषी मनाच्या कोपऱ्यात यातील अनेक आक्षेपांचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत याचा प्रत्यय प्रसारमाध्यमांद्वारे आपल्याला पदोपदी येत असतो. पारंपरिक पुरुषांना स्त्रीची सतत लाजरी, बुजरी, संकोची, वर मान करून न बोलणारी अशीच प्रतिमा आवडते. सुशिक्षित स्त्री मात्र त्या प्रतिमेला धक्का देत असते. पुरुषांच्या जगात स्त्रीचे नेमके काय स्थान आहे. याविषयी मोठ्या प्रमाणात अभ्यास होत असून वर्तनशास्त्राच्या संशोधकांनी याविषयीच्या अनेक मिथकांचा भंडाफोड केला आहे.
बाहुली, भातुकली विरुद्ध चेंडू, गाड्या
पुरुष व स्त्री यांच्यात सांस्कृतिक समानता आणण्यासाठी सत्तरच्या दशकात मुलांच्या हातात बाहुली व भातुकलीची खेळणी व मुलींच्या हातात गाड्या, चेंडूसारखी खेळणी देत गेली. चूल-मूल ही प्रतिमा बदलून पुरुषांसारखे सशक्त, सक्षम, सबल करण्याचा हा क्षीण प्रयत्न होता. खेळणी बदलल्यामुळे फरक पडू शकतो या गैरसमजुतीचा हास्यास्पद प्रकार होता. आज ते का शक्य नाही हे कळत आहे. मुलगा व मुलगी उपजत काही भिन्न गुणविशेष घेऊन जन्माला येतात. खेळण्यांची निवडसुद्धा त्यानुसारच होत असते.
मुलगा वा मुलगी स्त्री वा पुरुष यांची जडण-घडण उत्क्रांतीतून झालेली आहे, व त्यांच्या वर्तनात फरक आहे. याबद्दल आज तरी दुमत नाही. परंतु यातील कुठले गुणविशेष जैविक उत्क्रांतीतून तावून सुलाखून आलेले आहेत व कुठले गुण सामाजिक, सांस्कृतिक व कालमान परिस्थितीच्या दबावातून आलेले आहेत, हा संशोधनाचा विषय असून याचा अजूनही नीटसा अंदाज आलेला नाही.
जन्मजात गुणविशेष
हार्वर्ड विद्यापीठाचे कार्याध्यक्ष, लॅरी समर्स यांनी स्त्रियांमधील उपजत गुणामुळेच त्या अत्यंत जबाबदारीच्या वा निर्णयक्षमतेची गरज असलेल्या भौतिकी, गणितीय व अभियांत्रिकीच्या उच्च पदांपर्यंत पोचू शकत नाहीत, असे विधान केल्यानंतर हलकल्लोळ माजला. यावरून हा प्रश्न किती नाजूक व संवेदनशील आहे याची कल्पना येईल. चर्चेचा प्रस्ताव म्हणूनसुद्धा हे विधान स्वीकारार्ह नाही. मानवी स्वभावाचे स्पष्टीकरण म्हणून केलेले हे विधान अस्पष्ट व उघडउघड सुप्रजननास (युजेनिक्स) उत्तेजन देते आणि स्त्री-पुरुष विषमतेच्या दरीत भर घालते असा आरोप केला जात आहे. नव डार्विनवादी स्त्रीपुरुषांतील भेद दाखवणाऱ्या काही उपजत गुणविशेषांचा मागोवा घेत आहेत. मेंदूच्या स्कॅनिंगचा अभ्यास करून हे ठळक भेद कुठले आहेत याची त्यांना कल्पना येत आहे. त्यामुळे या संबंधीच्या आपल्या पूर्वग्रहदूषित मतांना धक्का बसत आहे.
स्त्री म्हणजे काही संप्रेरकयुक्त पुरुष, असा समज एकेकाळी होता. तो पूर्णपणे चुकीचा असून मेंदूतील स्थित्यंतरामुळे स्त्रीत्व घडले असा दावा आज केला जात आहे. आठव्या आठवड्यापर्यंतच्या भ्रूणावस्थेतील स्त्री-पुरुष मेंदूत फरक नसतो. इतर शारीरिक अवयवांप्रमाणे गर्भावधीचा व प्रसूतीनंतरचा काही काळ या अवधीत टेस्टोस्टेरोन या संप्रेरकाच्या स्रावामुळे स्त्री-पुरुष मेंदूत फरक पडत जातो. या संप्रेरकात भिजून चिंब झालेला मेंदू मोडतोड करण्यासारख्या पुरुषी वर्तनाला उत्तेजन देतो. वर्तनातील हा फरक फार लवकर जाणवू लागतो. जन्माला आल्यानंतरच्या एक दिवसाची मुलगी पाहणाऱ्यांच्या चेहऱ्याकडे जास्त वेळ निरखून पाहते. तर मुलगा त्यांच्या जवळील मोबाइलकडे निरखून पाहतो. गर्भावस्थेत टेस्टोस्टेरोनचा स्राव जास्त झालेली मुलगी मुलांची खेळणी हाताळण्यात रुची घेते, व मुलगा आईच्या चेहऱ्याकडे जास्त वेळ बघत नाही. संप्रेरकाचा स्राव कमी झालेल्या मुलात शब्दसंग्रह जास्त असतो. हा अभ्यास अजून प्राथमिक अवस्थेत असून संशोधन होत आहे. एक वर्षाच्या आतच मुलगा व मुलगी यांच्यातील खेळण्यांच्या निवडीतील भेद लक्षात येऊ लागतात. मुलांना बंदूक, चेंडू, गाड्या आवडतात. मुलींना बाहुल्या, भातुकलीतील खेळणी आवडू लागतात. या गुणविशेषांवर सांस्कृतिक साचेबंदपणाचा आरोप करता येत नाही.
मेंदूवरील संशोधन
स्त्री-पुरुषातील वर्तनातील भेद हे त्यांच्या मेंदूरचनेतील फरकांचे फल असावे. फरक नक्कीच आहे, परंतु त्यातून निष्कर्ष काढणे जिकिरीचे आहे. उदाहरणार्थ पुरुषाचा मेंदू तुलनेने नऊ टक्के मोठा आहे. पुरुषाची बुद्धिमत्ता जास्त आहे हे ठसवण्यासाठी याचा उपयोग यापूर्वी केला जात असे. परंतु मुळातच पुरुष हा स्त्रीपेक्षा जास्त आकारमानाचा असल्यामुळे मेंदूच्या आकारातील या फरकाचा बुद्धिमत्तेशी संबंध लावता येत नाही.
स्त्री मेंदूत करड्या द्रव्याचे (ग्रे मॅटर) प्रमाण तुलनेने जास्त आहे. स्त्री मेंदूतील काही भागात मज्जापेशींची वीण जास्त घट्ट आहे. यामुळे एकूण मज्जापेशींच्या संख्येत कुठलाही फरक पडला नाही. परंतु मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांना जोडणाऱ्या पांढऱ्या द्रव्यापासून तयार झालेल्या कॉर्पस कॅलोसमचा आकार स्त्रीच्या तुलनेने पुरुषांच्यात लहान असतो. म्हणूनच जटिल समस्येचे उत्तर शोधताना पुरुषाचा मेंदू एकाच अर्धगोलाची निवड करतो तर स्त्री दोन्ही अर्धगोलांचा वापर करते. मेंदूची रचना व नसजोडणीतील हे भेद बुद्ध्यंकाच्या चाचणीवर कुठलाही परिणाम करत नाहीत. फक्त या चाचणीचा प्रतिसाद स्त्रीपुरुषांच्या मेंदूत वेगवेगळ्या रीतीने मिळतो. गणितीय तर्क पुरुषातील टेम्पोरल लोब प्रक्रिया यांचा संबंध आहे हे लक्षात आले असून स्त्रियांच्या संदर्भात हा संबंध आढळता नाही. बद्धयंकासाठी पुरुष करड्या द्रव्यावर तर स्त्रिया पांढऱ्या द्रव्यावर विसंबून असतात.
मेंदूचे आकारमान व त्याची अंतर्गत/बाह्य रचना आणि स्त्रीपुरुषांतील वर्तनभेद किती गुंतागुंतीचे असू शकतील याची कल्पना येऊ शकेल. मेंदूची रचना व वर्तन यांचा अन्योन्य संबंध आहे. असे क्षणभर मान्य केले तरी या गोष्टी उपजत आहेत असे विधान आपण करू शकणार नाही. आतापर्यंतचे सर्व संशोधन प्रौढ व्यक्तींच्यावर झाले आहे. वर्तनातील फरकांना केव्हापासून सुरुवात होते याची अजून कल्पना नाही. मेंदूत प्रौढ वयातसुद्धा उत्परिवर्तन (म्युटेशन) होऊ शकते. माणसातील त्रिमितीय गुणविशेषासाठी कारणीभत असलेल्या मेंदजवळील हिप्पोकॅम्पस या भागातील मज्जापेशींचे पनरुत्पादन संप्रेरकामळे होत असते व त्या पेशी टिकन असतात. स्त्रियांचा मेंदू या दृष्टीने फार लवचीक असतो. गर्भारपण, ऋतुनिवृत्ती व यौवनावस्थेत पदार्पण या कालावधीत त्यांच्यात मोठ्या प्रमाणात फरक होत असतो.
मानसशास्त्रीय संशोधन
स्त्री-पुरुषांत मानसिक भेद आहेत की नाहीत याचा अनेक संशोधकांनी अभ्यास केला आहे. अभ्यासकांनी व्यक्तिमत्त्व, सामाजिक वर्तन, स्मरणशक्ती व काही क्षेत्रातील त्यांची क्षमता यांवर लक्ष केंद्रित करून निष्कर्ष काढले आहेत. पुरुष जास्त आक्रमक व गणितीय विश्लेषणात प्रभुत्व असलेले, तर स्त्रिया जास्त भावुक व वाक्सामर्थ्य असलेल्या आहेत, असा निष्कर्ष काढण्यात आला.
याप्रकारच्या अभ्यासांच्या काही समस्या आहेत. मुळातच संशोधकांचा केवळ सकारात्मक निष्कर्षांना प्रसिद्धी देण्याकडे कल असतो. त्यामुळे ज्यात फरक आढळत नाही त्यांना प्रसिद्धीच मिळत नाही. काही वेळा लिंगभेदातील किरकोळ फरकांनासुद्धा अमाप प्रसिद्धी मिळते व प्रसारमाध्यमे अशा गोष्टींचे उदात्तीकरण करून दिशाभूल करतात. म्हणूनच अपुरी व चुकीची माहिती असलेल्या मेन आर फ्रॉम मार्स व विमेन आर फ्रॉम व्हीनस सारख्या पुस्तकांच्या लाखो प्रती खपतात.
उदाहरणार्थ पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये क्षमता जास्त आहे, असा एक समज आहे. शब्दसामर्थ्य वा वाचनाचे रसग्रहण यांच्या अनेक चाचण्या घेतल्यानंतरसुद्धा मुले व मुलींमध्ये तसा फार फरक जाणवला नाही. प्रौढ स्त्रिया मात्र तुलनेने जास्त बोलघेवड्या असतात व त्यांच्याकडे विपुल शब्दभांडार असते. पण विशेष म्हणजे, हा फरकसुद्धा जाणवण्याइतका मोठा नव्हता.
सांख्यिकीय मापदंड
लिंगभेदाची तुलना करण्यासाठी ‘डी’ या सांख्यिकीय मापदंडाचा वापर संशोधक करत आहेत. दोन गटातील स्त्री व पुरुष सरासरी फरकाला कुठल्या घटकांचा हिस्सा कारणीभूत आहे हे दर्शविणारे ते एक मानक आहे. स्त्री व पुरुषामधील सरासरी उंचीतील फरक दर्शवणाऱ्या ‘डी’चे मूल्य २ आहे. कुठल्याही स्त्री-पुरुष गटाचा अभ्यास केल्यास पुरुषांची सरासरी उंची स्त्रियांपेक्षा जास्त आहे, याबद्दल दुमत नाही. वर्तणूक व मानसिक दृष्यघटनेच्या संदर्भात ‘डी’चे मूल्यांकन केले असून डी चे मूल्य ०.८ असल्यास जास्त, ०.६ असल्यास माफक, व ०.२ असल्यास कमी असे समजले जाते. ०.२ पेक्षा कमी मूल्य असल्यास किरकोळ भेद मानला जातो. या मूल्यांकनाचा वापर करून लिंगभेदासंबंधातील काही घटकांचे संख्याशास्त्रीय प्रमाणित विश्लेषण केले आहे. यासाठी गणितीय क्षमता, वाक्सामर्थ्य व आक्रमक वर्तन हे गुणविशेष निवडले होते. यातील काही महत्त्वाचे निष्कर्ष खालील कोष्टकात नमूद केले आहेत.

पुरुषांची सरशी डी किरकोळ भेद डी स्त्रियांची सरशी डी
त्रिमितीय संकल्पना +०.७३ शब्द संग्रह -०.०२ स्मित हास्य -०.४
आक्रमक वर्तन (शारीरिक इजा) +०.६० वाचन रसग्रहण -०.०३ स्पेलिंग -०.४५
गणितीय क्षणता (१५-२५ वयोगट) +०.३२ गणितीय क्षणता (११-१४ वयोगट) -०.०२ अप्रत्यक्ष आक्रमक वर्तन +०.३२
(+ पुरुषांसाठी, – स्त्रियांसाठी)
शारीरिक क्षमताः शारीरिक क्षमतेच्या बाबतीत मात्र पुरुष स्त्रियांपेक्षा वरचढ आहेत. (चेंडू जास्त वेगाने फेकणे +२.१४, चेंडू लांब अंतरापर्यंत फेकणे +१.९८). या क्षमता पुरुषाच्या शारीरिक उंचीवर अवलंबून असल्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. लैंगिक गुणविशेषांचा अभ्यास करताना हस्तमैथुनाची वारंवारता (+०.९६) व विवाहबाह्य संबंध (+०.८१ पुरुषांच्यात जास्त आढळतात. लैंगिक समाधानाबाबतीत मात्र स्त्रीपुरुषांत काही फरक नाही.
आक्रमकताः
आक्रमकतेच्या बाबतीत पुरषांची सरशी आहे (०.६) याबद्दल दुमत नाही. परंतु यावरून निष्कर्ष काढण्यात घाई करण्यात अर्थ नाही. एका अभ्यासानुसार पुरुषांच्या आक्रमकतेत दिखाऊपणा जास्त असतो. याउलट स्त्रीला कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत याची खात्री असल्यास तीसुद्धा जास्त आक्रमक बनते. हिंस्र बनते. हिंस्र असो वा नसो, स्त्रिया पुरुषाइतक्या रागीट असतात व आपला राग दीर्घकाळ जोपासतात. या रागाचे पुढे काय होते याचा अभ्यास करताना पुरुष शारीरिक इजा करून मोकळे होतात परंतु स्त्रियांचा कल शारीरिक इजा करण्यापेक्षा टोचन बोलणे, अफवा पसरवणे. निंदा करणे इत्यादी प्रकाराने मानसिक इजा करण्याकडे असतो, हे लक्षात आले. स्त्रियांचे मातृहृदय त्यांना शारीरिक इजा करण्यास अनुमती देत नसेल. गणितीय क्षमताः गणितीय क्षमतेच्या बाबतीत असलेला फरक मोठा आहे का ? यौवनावस्थेत पदार्पण करीपर्यंत मुले व मुलींच्या याबाबतीतील क्षमतेत फरक नाही. यामुळे स्त्रीपेक्षा पुरुष सर्व वयोमानात गणितीय कौशल्यात वरचढ असतात या समजुतीला धक्का बसत आहे. गणितीय संकल्पनांची जाण, संगणक (कॉम्प्युटेशन) इत्यादी कौशल्यांत स्त्री वा पुरुष असा भेद करता येत नाही. फक्त गणितांची उत्तरे शोधण्याच्या कौशल्यात प्रौढ पुरुषांची सरशी आहे.
स्त्रियांपेक्षा पुरुष त्रिमितीय वस्तूंची कल्पना करण्यात, मनातल्या मनात त्या वस्तू फिरवण्यात, सुटे भाग जोडण्यात जास्त सक्षम आहेत. (+०.७३) अभियांत्रिकीत, रचनाशास्त्रात या प्रकारच्या कौशल्याची गरज भासते. पुरुषातील ही क्षमता कदाचित गर्भावस्थेतील टेस्टोस्टेरोन संप्रेरकाच्या ज्यादा स्रावामुळे आली असण्याची शक्यता आहे. म्हणूनच याच्या अतिस्रावामुळे काही मुलींच्या त्रिमितीय संकल्पनेच्या क्षमतेत वाढ झालेली असते असे दिसते. परंतु अवकाशासंबंधीच्या कामात पुरुषांचा वरचष्मा असतो असा त्याचा अर्थ होत नाही. पुरुष या बाबतीत जास्त कुशल आहेत हा एक भ्रम आहे. पुरुष व स्त्रिया मार्गनिदर्शनाच्या बाबतीत समान आहेत. फक्त हे कार्य कशा प्रकारे केले जाते याबद्दल भेद आहेत. स्त्रिया मार्गातील खाणाखुणा लक्षात ठेऊन मुक्कामापर्यंत पोचतात. पुरुष मात्र त्रिमितीच्या आधारे दिशा व अंतर यांचा अंदाज घेत घेत मुक्कामाला पोचतात.
पुरुषांच्या गणितीय कौशल्याबाबतीत असाच भ्रम पोसला जात आहे. यासाठी गणित व विज्ञानाच्या प्राध्यापिकांची कमी संख्या यांकडे बोट दाखवले जात असते. सरासरी क्षमता लक्षात घेतल्यास स्त्री व पुरुष यांत फरक नाही. या क्षमतेच्या वितरण वक्राचा (डिस्ट्रिब्यूशन कर्व्ह) अभ्यास केल्यास वक्राच्या दोन्ही टोकांच्या भागात पुरुषांची संख्या जास्त आहे, हे लक्षात येईल. यावरून काही पुरुष तद्दन मूर्ख किंवा विलक्षण बुद्धिवंत असू शकतात, असे अनुमान काढता येईल.
डॉ. लॅरी समर्स यांनी केलेल्या विधानाचा परामर्श घेत असताना गेल्या पन्नास वर्षांत शैक्षणिक व इतर ज्ञानक्षेत्रात स्त्रियांनी केलेल्या अभूतपूर्व प्रगतीकडे दुर्लक्ष करता येत नाही. शिस्तीचे पालन करत व वाटेतील सर्व अडथळे पार करत वरच्या सोपानापर्यंत त्या पोचल्या आहेत. इतर कुठल्याही मनोऱ्यापेक्षा शैक्षणिक क्षेत्राच्या हस्तिदंताच्या मनोऱ्यापर्यंत पोचणे आज तरी दुरापास्त वाटत असेल. यासाठी वैज्ञानिक, गणितीय व अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्चपदासाठी स्त्रियांचा नगण्य सहभागात त्यांच्यातील उपजत किंवा उत्परिवर्तक गुणविशेषांचे योगदान कितपत आहे याचा पुनः एकदा अंदाज घ्यावा लागेल. उपजत असू शकेल; परंतु उत्परिवर्तक नाही असे म्हणता येणार नाही. त्रिमितीय क्षमतेची वाढ प्रशिक्षणातून कौशल्य प्राप्त झालेल्या स्त्रियांचे प्रमाण ४७ टक्क्यावरून ७७ टक्क्यापर्यंत गेल्याची उदाहरणे आहेत. त्या आता संक्रमणावस्थेतून जात आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील हस्तिदंताच्या मनोऱ्यापर्यंत त्या नक्कीच पोचतील. जीवशास्त्र आपल्या जडणघडणीला कारणीभूत आहे हे मान्य असले तरी जीवशास्त्र हाच आपल्या मुक्कामाचे स्थान आहे असे म्हणण्यात अर्थ नाही!
८, लिली अपार्टमेंट, वरदायिनी कोऑ.हौ.सो., सूस रोड, पाषाण, पुणे ४११ ०२१.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *