ज्ञान

पृथ्वीवर ज्ञानाशिवाय अशी दुसरी कोणतीही वस्तु नाही, की जिचा कंटाळा न येतां, किंवा जिच्यापासून शरीरास किंवा मनास कोणतीही व्याधि न जडतां, जिच्या योगानें वृत्ति आमरण आनंदमय राहू शकेल. जे पुरुष ज्ञानसंपादनांत निमग्न झालेले असतात, त्यांसच या अमोलिक सुखाचा निरंतर लाभ होतो.
विश्वाच्या विशाल स्वरूपाच्या विचारांत जो गढून गेला व ज्याला ही पृथ्वी एखाद्या क्षुल्लक वारुळाप्रमाणे दिसू लागली, त्याला तीवरील कांहीं मुंग्यांस दुसऱ्यांपेक्षां दाणे अधिक सांपडले, किंवा काहींस मुळीच न सांपडल्यामुळे रिकामें फिरावे लागले, म्हणून खेद होणार आहे काय ? इराणची बादशाही पादाक्रांत करून डरायसाच्या सिंहासनावर पाय ठेवतांना वीरशिरोमणी अलेग्झान्डरास जो आनंद झाला असेल, त्यापेक्षां अखिलपरमाण्वंतर्गत गुरुत्वाकर्षणधर्म शोधून काढतांना न्यूटनास कमी आनंद झाला असेल, असे आम्हांस वाटत नाही!
[ज्ञान या गोपाळ गणेश आगरकरांच्या निबंधातून. हा निबंध आगरकर वायय खंड ३, संपादक म.गं.नातू व दि.य.देशपांडे, यात भेटेल.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.