सुधारक काढण्याचा हेतु

पर्वत, नद्या, सरोवरें, झाडे, पाणी, राने, समुद्रकिनारे, हवा, खाणी, फुले व जनावरें ज्यांत स्पष्टपणे दाखविली आहेत असा एक, व ज्यांत पारधी व पारधीची हत्यारे, शेतकरी व शेतकीची अवजारे, बाजार व त्यांतील कोट्यवधि कृत्रिम जिन्नस, न्यायसभा व त्यांत येणारे शेंकडों लोक, राजसभा व त्यांत बसणारे-उठणारे सचिव, मंत्री वगैरे प्रमुख पुरुष, भव्य मंदिरे व उत्तम देवालये, बागा व शेतें, झोपड्या व गोठे, अनेक पदवीचे व अनेक धंदे करणारे पुरुष व स्त्रिया आणि त्यांची अर्भकें, ही ज्यांत व्यवस्थित रीतीनें काढिली आहेत असा एक, मिळून प्रत्येक खंडांतील ठळक देशाचे दोन दोन चित्रपट तयार करवून ते पुढे ठेवले, आणि त्यांकडे निःपक्षपातबुद्धीने काही वेळ पहात बसले, तर विचारी पुरुषांच्या मनावर काय परिणाम होतील बरें ? प्रथम सृष्ट पदार्थांच्या चित्रपटांचे अवलोकन केले तर त्यावरून असे दिसून येईल की, विस्तृतता, बहुविधता, मनोरमता, अद्भुतता, उपयुक्तता व विपुलता यांपैकी कोणत्याहि गुणांत या भरतखंडाचा त्रिकोणाकृति पट ग्रीस, इटली, ऐलँड, युनायटेड स्टेट्स, ऑस्ट्रेलिया यांपैकीं पाहिजे त्या रमणीय देशाच्या चित्रपटापाशी तुलना करण्याच्या हेतूनें मांडिला तर असे म्हणावे लागेल की, आमच्या वाट्यास सर्वोत्तम न म्हटला तरी उत्तमांपैकी एक देश आला आहे. सह्य, विंध्य व कैलास यांसारख्या प्रचंड पर्वतांनी ज्याची तटबंदी झाली आहे; सिंधु, भागीरथी, नर्मदा, तापी, कृष्णा इत्यादि नदांनी व नद्यांनी ज्यांतील क्षेत्रे सिंचण्याचे व उतारूंची व व्यापाराची गलबतें व आगबोटी वाहण्याचे काम पत्करलें आहे ; हिंदी महासागराने ज्याला रशना होऊन शेकडों बंदरे करून दिली आहेत; गुजराथ, माळवा, बंगाल, व-हाड, खानदेश इत्यादि सुपीक प्रांतांनी ज्यास हवें इतकें अन्नवस्त्र पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे; ज्याच्या उदरांत कोठे ना कोठे तरी हवा तो खनिज पदार्थ पाहिजे तितका सांपडण्यास पंचाईत पडत नाहीं; ज्याच्या रानांत पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या वनस्पति वाढत आहेत, व सर्व प्रकारचे पशुपक्षी संचार करीत आहेत; ज्यांत कोठे उष्ण कटिबंधातली, कोठें शीत कटिबंधातली व कोठे समशीतोष्ण कटिबंधातली हवा खेळत आहे; सारांश ज्यांतील कित्येक अत्यंत रमणीय प्रदेशांस ‘अमरभूमि’, ‘नंदनवन’, ‘इंद्रभुवन’, ‘जगदुद्यान’ अशा संज्ञा प्राप्त झाल्या आहेत, असा हा आमचा हिंदुस्थान देश आधिभौतिक संपत्तींत कोणत्याहि देशास हार जाईल, किंवा यांतील सृष्ट पदार्थांचा चित्रपट दुसऱ्या कोणत्याहि देशाच्या चित्रपटापेक्षा कमी मनोरम ठरेल असे वाटत नाही.
याप्रमाणे सृष्ट पदार्थांच्या चित्रपटांचे अवलोकन करून पूर्ण समाधान पावल्यावर दुसऱ्या पटांकडे वळल्याबरोबर चित्तवृत्तींत केवढा बदल होतो पहा! या दुसऱ्या ऐतिहासिक चित्रपटाच्या केवळ लांबीचाच विचार केला तर कदाचित् आमच्या पटाची लांबी सर्वांत अधिक भरण्याचा संभव आहे. वैदिक कालापासून आजतारखेपर्यंत आम्हांस जितकी शतकें मोजतां येणार आहेत, तितकी बहुशः दुसऱ्या कोणत्याहि देशास मोजतां येणार नाहीत. या विस्तीर्ण कालावधीत अनेक राष्ट्रांची उत्पत्ति, अभिवृद्धि व लय होऊन ती प्रस्तुत नामशेष मात्र राहिली आहेत; व कांहींचा हास झाला तरी त्यांनी संपादिलेल्या विद्यांची व कलांची रूपांतरें कोठकोठे अद्यापि दृष्टीस पडत असल्यामुळे ती त्यांच्या गतवैभवाची साक्ष देत आहेत. ज्याप्रमाणे कांहीं वनस्पति व कीटक परिणतावस्था प्राप्त झाली असतां, आपलें तेज नूतनोत्पन्न अंकुरांत ठेऊन आपण पंचत्वाप्रत पावतात, त्याप्रमाणे अमेरिकेतील व आशियांतील आणि विशेषतः युरोपांतील पुष्कळ राष्ट्रांची स्थिति झाली. ग्रीक विद्या आणि कला रोमन लोकांच्या हाती पडून ग्रीस देशाचा अंत झाला. रोमन लोकांची सुधारणा अर्वाचीन युरोपीय राष्ट्रांकडे येऊन रोमन लोक नष्ट झाले. आशिया व अमेरिका यांतील जुन्या राष्ट्रांचीहि काही अंशी अशीच स्थिति जाली, व त्यांच्या सुधारणेच्या काही खुणा अद्यापि कोठेकोठे दृष्टीस पडतात. चीन व हिंदुस्थान हे दोन देश मात्र खूप जुने असून काळाच्या जबड्यांतून वांचले आहेत, व कदाचित् आणखीहि अनेक शतकें वांचण्याचा संभव आहे. पण अशा प्रकारच्या केवळ वांचण्यांत विशेष परुषार्थ आहे की काय हा मोठा विचारणीय प्रश्न आहे. अशा प्रकारचे केवळ वाचणे म्हणजे बऱ्याच अंशी योगनिद्रेत प्राण धरून राहिलेल्या योग्याच्या जगण्यासारखे होय. हिंदुस्थानच्या अस्तित्वाशी तोलून पहातां, जुन्या ग्रीक व रोमन लोकांचे अस्तित्व कांहींच नाही असे म्हणता येईल. पण तेवढ्या स्वल्प काळांत त्यांनी केवढाले पराक्रम केले व केवढी अमर कीर्ति संपादिली ! भाषापरिज्ञानप्रवीणांनी अलीकडे असा सिद्धान्त केला आहे की, हिंदु लोक, ग्रीक लोक व रोमन लोक, व जर्मन शाखेपासून निघालेले अर्वाचीन युरोपांतील इंग्लिश, डच वगैरे लोक एकाच पूर्वजांपासून झालेले असावे. या सर्वांस ते आर्यकुलोद्भव राष्ट्रे म्हणतात. हे खरें असेल तर काय सिद्ध होते की, एकाच झाडाचे बी चार प्रकारच्या जमिनीत पडून त्यापासून चार प्रकारच्या वृक्षांचा उद्भव व्हावा, व प्रत्येकाला निराळ्या त-हेची वाढ लागून त्यांचा शेवटहि निराळ्या त-हेचा व्हावा, त्याप्रमाणे एकाच आर्यकुलापासून उत्पन्न झालेले आम्ही सर्व खरे, पण स्थानांतराप्रमाणे आम्हां सर्वांचा इतिहास निराळ्या प्रकारचा झाला! आर्य लोकांची युरोपांत जी शाखा गेली तीपासून ग्रीस देशांत एक उत्तम राष्ट्र उद्भवले. त्याचीच एक मुळी इताली देशांत जाऊन तीपासून जो नवीन अंकुर उत्पन्न झाला, त्याने मातृवृक्षास नाहीसें करून आपला विस्तार बराच दूरवर नेला. पुढे त्यालाहि वार्धक्यावस्था येऊन त्याचा हास होण्याच्या सुमारास त्यापासून बरीच नवीन रोपें अस्तित्वात आली. ती ही अर्वाचीन युरोपांतील राष्ट्र होत.
इकडे हिंदुस्थानांत आर्यलोकांची जी शाखा आली, तिचा निराळ्याच त-हेचा इतिहास झाला. तिकडे जुन्या वृक्षाने नव्या अंकुरांत आपले गुण ठेऊन आपण नाहीसें व्हावें, पुनः त्या नवीन अंकुराने तसेंच करावे व प्रत्येक नवीन राष्ट्रोद्भव पहिल्यापेक्षां बहुतेक गुणांत वरिष्ठ व्हावा, असा प्रकार झाला. इकडे अशा प्रकारची राष्ट्रोद्भवपरंपरा अस्तित्वात आली नाही. मूळ आर्यशाखा येथे येऊन तिच्यापासून जें झाड येथे लागले, तेंच आजमितीपर्यंत अस्तित्वात आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. ग्रीक, रोमन, सिथियन, तार्तर, मोगल, अफगाण वगैरे लोकांच्या ज्या वावटळी त्यावर आल्या, त्यांमुळे त्याला बराच त्रास झाला. कधी त्याच्या कांहीं फांद्या मोडून पडल्या; कधीं तें मुळापासून उपटून पडत आहे की काय असे वाटले; पण कर्मधर्मसंयोगाने युरोपांतील ग्रीक व रोमन शाखांवर आणि इकडील इराणी शाखेवर जो प्रसंग गुदरला, तो या भारतीय आर्यशाखेवर गुदरला नाही! यामुळे हे जरठ झाड कसे तरी अजून उभे आहे! पण त्यांत कांहीं त्राण उरलेले नाही! तें आंतून अगदी शुष्क होत आले आहे, व त्यांचे खोड व फांद्या डळमळू लागल्या आहेत. याला आतां असेंच उभे ठेवण्यास व यापासून नवीन शाखांचा उद्भव होऊन यास फिरून नवीनावस्था आणण्यास एकच उपाय आहे.तो कोणता म्हणाल तर त्याची खूप खच्ची करून त्यास अर्वाचीन कल्पनांचे भरपूर पाणी द्यावयाचें! असे केले तरच त्यांचे पूर्वस्वरूप पूर्ण नष्ट न होता, त्यापासून नूतनशाखावृत वृक्ष अस्तित्वात येईल; पण तसे न केले तर त्यावर प्रस्तुतकालीं चोहोंकडून जे तीव्र आघात होत आहेत, त्यांखालीं तें अगदी जेर होऊन अखेरीस जमिनीवर उलथून पडेल.
हिंदुस्थानचा पूर्व इतिहास व सांप्रत स्थिति सुधारकाच्या वाचकांच्या लक्षात थोडक्यात यावी, यासाठी वर ज्या रूपकांचे साहाय्य घेतले आहे, त्यांपासून लेखकाचा भाव त्यांच्या मनात उतरला असेल अशी त्याची आशा आहे. त्याचे स्पष्ट म्हणणे असें आहे की, हिंदू लोक रानटी अवस्थेतून निघाल्यावर कांहीं शतकेंपर्यंत राज्य, धर्म, नीति वगैरे कांहीं शास्त्रे, वेदान्त, न्याय, गणितादि कांहीं विद्या, व काव्य, गीत, नर्तन, वादनादि कांहीं कला यांत त्याचे पाऊल बरेच पुढे पडल्यावर त्यांच्या सुधारणेची वाढ खुंटली, व तेव्हांपासून इंग्रजी होईपर्यंत तें कसें तरी राष्ट्रत्व संभाळून राहिले! यामुळे त्यांचा इतिहासपट इतर देशांच्या इतिहासपटांहून फारच कमी मनोवेधक झाला आहे. आमची गृहपद्धति, आमची राज्यपद्धति, आमची शास्त्रे, आमच्या कला, आमचे वर्णसंबंध, आमच्या राहण्याच्या चाली, आमच्या वागण्याच्या रीति सारांश इंग्रजी होईपर्यंत आमचे सारे व्यक्तिजीवित्व व राष्ट्रजीवित्व, ठशांत घालून ओतलेल्या पोलादासारखें किंवा निबिड शृंखलाबद्ध बंदिवानासारखें, अथवा उदकाच्या नित्य आघाताने दगडाप्रमाणे कठिण झालेल्या लाकडासारखें किंवा हाडकासारखें शेकडों वर्षे होऊन राहिले, असे म्हणण्यास हरकत नाही.
ही आमची शिलावस्था आम्हांस पाश्चिमात्य शिक्षण मिळू लागल्यापासून बदलू लागली आहे. आजमितीस या शिक्षणाच्या टाकीचे आघात फारच थोड्यांवर घडत आहेत. पण दिवसेंदिवस ते अधिकाधिकांवर घडू लागतील असा अजमास दिसत आहे. ज्यांना या टांकीपासून बराच संस्कार झाला आहे, ते समुदायापासून अगदीं विभक्त झाल्यासारखे होऊन उभयतांत सांप्रतकालीं एका प्रकारचे वैषम्य उत्पन्न झाले आहे. या वैषम्यास विशेष कारण कोण होत आहेत हे येथे सांगण्याची गरज नाही. येथे एवढेच सांगितले पाहिजे की, मूळ प्रकृति म्हणजे भारतीय आर्यत्व न सांडतां, या पाश्चिमात्य नवीन शिक्षणाचा, व त्याबरोबर ज्या नवीन कल्पना येत आहेत त्यांचा आम्ही योग्य रीतीने अंगीकार करीत गेलों, तरच आमचा निभाव लागणार आहे. या कल्पना आमच्या राज्यकर्त्यांकडून येत
आहेत म्हणून त्या आम्ही स्वीकाराव्या असे आमचे म्हणणे नाही. त्यांचे अभिनंदन करून त्यांचा आपण अंगीकार केला पाहिजे, असें जे आम्ही म्हणतों तें अशासाठी की त्या शिक्षणांत व त्या कल्पनांत मनुष्यसुधारणेच्या अत्यवश्य तत्त्वांचा समावेश झाला आहे. म्हणून लोकांस लयास जावयाचे नसेल त्यांनी त्यांचे अवलंबन केलेच पाहिजे. त्याशिवाय गत्यंतर नाही. समाजाचे कुशल राहून त्यास अधिकाधिक उन्नतावस्था येण्यास जेवढी बंधनें अपरिहार्य आहेत तेवढी कायम ठेवून बाकी सर्व गोष्टींत व्यक्तिमात्रास (पुरुषास व स्त्रीस) जितक्या स्वातंत्र्याचा उपभोग घेता येईल तितका द्यावयाचा, हे अर्वाचीन पाश्चिमात्य सुधारणेचे मुख्य तत्त्व आहे, व हे ज्याच्या अंतःकरणांत बिंबले असेल त्यांना आमच्या समाजव्यवस्थेत अनेक दोषस्थले दिसणार आहेत, हे उघड आहे. ही दोषस्थलें वारंवार लोकांच्या नजरेस आणावी. ती दूर करण्याचे उपाय सुचवावे. आणि युरोपीय सधारणेत अनुकरण करण्यासारखं काय आहे. ते पुनः पुनः दाखवावे, यास्तव में सुधारक पत्र काढले आहे. कोणत्याहि वादग्रस्त प्रश्नाविषयीं जे लोकमत असेल ते पुढे आणणे हेच काय तें पत्रकाचे कर्तव्य असें जे मानीत असतील, ते तसें खुशाल मानोत. लोकमत अमुक टप्प्यापर्यंत येऊन पोंचलें आहे, सबब कोणत्याहि व्यक्तीने किंवा सरकारने यापुढे जाऊं नये असे म्हणणे म्हणजे झाली आहे तेवढी सुधारणा बस आहे, पुढे जाण्याची गरज नाही, असेंच म्हणण्यासारखे होय. व्यक्तीने किंवा सरकारने साधारणपणे लोकमतास धरून वर्तन करणे किंवा कायदे करणे हे सामान्य गोष्टींत ठीक आहे; पण काही प्रसंगी लोकांच्या गाढ अज्ञानामुळे किंवा दुराग्रहामुळे व्यक्तीस लोकांची पर्वा न करितां स्वतंत्रपणे वर्तावें लागतें व सरकारास लोकमताविरुद्ध कायदे करावे लागतात. बारकाईचा विचार केला तर असे दिसून येईल की, प्रजासत्ताक राज्यांत सुद्धा अनेकदां बहमताविरुद्ध अधिकृत लोकांचे म्हणजे सरकारचे वर्तन होत असते. तथापि सामान्यतः सरकारचे वर्तन लोकमतास धरून असेल तितकें बरें. पण जे लोक हा सिद्धान्त कबूल करितात ते लोकमत दिवसेंदिवस सुधारत चालले आहे असे समजतात. तेव्हां आतां असा प्रश्न उत्पन्न होतो की, लोकमताची सुधारणा व्हावी तरी कशी? जो तो अस्तित्वात असलेल्या लोकमतापुढे जाण्यास भिईल तर त्यांत बदल व्हावा कसा ? लोकाग्रणींनी हे काम पत्करलें नाहीं तर ते कोणी पतकरावयाचें ? जो तो या लोकमताच्या बागुलबोवाला भिऊन दडून बसेल तर कोणत्याहि समाजाला उन्नतावस्था येणार नाही इतकंच नाही, तर त्याची चालू स्थितीसुद्धा कायम न राहतां उलट त्यास उतरती कळा लागून अखेर त्याचा -हास होईल. म्हणून कोणी तरी अस्तित्वात असलेल्या लोकमतांतील दोषस्थले दाखविण्याचे, व समाजांतील बहुतेक लोकांस अप्रिय परंतु पथ्यकारक असे विचार त्यांच्यापुढे आणण्याचे, अनभिमत काम करण्यास तयार झालेच पाहिजे. असे करण्यास लागणारे धैर्य ज्या समाजांतील काही व्यक्तींच्या सुद्धा अंगी नसेल त्या समाजांनी वर डोके काढण्याची आशा कधींहि करूं नये.
हे विचार बरोबर असतील तर त्यांवरून हे दिसून येईल की, जे कोणी कोणत्याहि मिषाने किंवा रूपाने लोकांपुढे लोकाग्रणी म्हणून मिरवू लागले असतील त्यांनी लोकांची मर्जी संपादण्यासाठी, अथवा त्यांजकडून आपली पाठ थोपटून घेण्यासाठी, किंवा परोपकाराचे ढोंग करून स्वहित साधण्यासाठी त्यांच्या दोषांचे किंवा दुराग्रहांचे संवरण किंवा मंडन करणे अत्यंत लज्जास्पद होय. असे लोकाग्रणी त्यांस समार्ग न दाखवितां केव्हां एखाद्या खड्यांत नेऊन घालतील हे सांगवत नाही. प्रस्तुत स्थितीत अशा लोकाग्रणींचें वर्तन आमच्या देशास फारच विघातक होणार आहे. ज्यांना समाजाच्या घटनेची, अभिवृद्धीची व लयाची कारणे ठाऊक नाहीत; कदाचित् पितृतर्पणापुढे ज्यांचे ज्ञान गेलेले नाहीं; विषयोपभोगाशिवाय अन्य व्यवसाय ज्यांना अवगत नाहीं; वरिष्ठाची प्रशंसा आणि कनिष्ठाशीं गर्वोक्ति यांहून अन्य प्रकारचे भाषण ज्यांस फारसें माहीत नाहीं; अनेक देशांतील उद्योगी पुरुषांनी अहर्निश परिश्रम करून पदार्थधर्मांचे केवढे ज्ञान संपादिले आहे, विपद्विनाशक व सुखवर्धक किती साधनें शोधून काढिली आहेत, व राज्य, धर्म, नीति वगैरे विषयांतील विचार किती प्रगल्भ झाले आहेत हे ज्यांना ऐकूनसुद्धा ठाऊक नाही अशा गृहस्थांनी आम्ही हिंदु लोक नेहमी परतंत्रच असलों पाहिजे; कांहीं केलें तरी अधिक राज्याधिकार उपभोगण्याची पात्रता आमच्या अंगी यावयाची नाहीं; राष्ट्रीय स्वातंत्र्याचा विचार आम्ही कधी स्वपकांत सुद्धां आणूं नये; स्थानिक स्वराज्य, राष्ट्रीय परिषद, कायदे कौन्सिलांत लोकनियुक्त सभासद, स्वसंतोषानें शिपाईगिरी करण्याची इच्छा धरणे या व या त-हेच्या दुसऱ्या उठाठेवींत आम्हीं पडणे हे शुद्ध मूर्खपण होय, अशा प्रकारचे प्रतिपादन करणाऱ्या लोकांस लोकाग्रणी न म्हणतां लोकशत्रु म्हटले असतां वावगे होणार नाही. तसेंच जेवढी जुनी शास्त्रे तेवढी सारी ईश्वरप्रणीत, त्यांना हात लावणे हे घोर पातक, अशी ज्यांची समजूत ; जगत्कारणाच्या तोंडांतून, हातांतून, मांडींतून व पायांतून एकेक वर्ण निघाला अशी ज्यांची वर्णोत्पत्तिविषयी कल्पना; पंचामृताने व धूपादीपाने केलेली पूजा मात्र ईश्वरास मान्य, यांहून ईशपूजेचा विशेष प्रशस्त मार्ग नाही, असे ज्यांचे धर्मविचार ; आहे ही सामाजिक स्थिति अत्युत्तम, हीत फिरवाफिरव करण्यास कोठेही अवकाश नाहीं; सध्या येथे स्त्रियांचे पुरुषांशी, मुलांचे आईबापांशी, जे संबंध चालत आहेत तेच उत्तम आहेत व अनंत काल तेच चालले पाहिजेत; ज्ञान संपादणे हे पुरुषांचे कर्तव्य, शिशुसंगोपन हे स्त्रियांचे कर्तव्य ; पुरुष स्वामी, स्त्री दासी; स्वातंत्र्य पुरुषांकडे, पारतंत्र्य स्त्रियांकडे ; विवाहाशिवाय स्त्रीस गति नाहीं, व गृहाशिवाय तिला विश्व नाहीं; वैधव्य हे तिचे महाव्रत व ज्ञानसंपादन हा तिचा मोठा दुर्गुण; अशा प्रकारच्या ज्यांच्या धर्मविषयक व समाजविषयक कल्पना असे लोकाग्रणी काय कामाचे? अशांच्या उपदेशाने व उदाहरणाने आम्हांस चांगले वळण कसें लागणार व इतर सुधारलेल्या राष्ट्रांस होत असणाऱ्या सुखाचा लाभ आम्हांस कशाने होणार ? निदान सुधारकास तरी असले लोकाग्रणी व त्यांचे वर्तन मान्य नाही. ज्या तत्त्वाचे अवलंबन केल्यामुळे इतर राष्ट्र अधिकाधिक सुधारत चालली आहेत त्या तत्त्वाचा स्वीकार करण्यास आम्ही आनंदाने तयार झाले पाहिजे. ती तत्त्वे हा सुधारक महाराष्ट्र लोकांपुढे वारंवार आणील. असें करण्यांत त्यास, आज ज्याचा जारीने अंमल चालत आहे त्या लोकमताविरुद्ध बरेंच जावे लागणार असल्यामुळे, फार त्रास पडणार आहे. पण त्याची तो पर्वा करीत नाहीं; कारण ज्या लोकमताचा पुष्कळांस बाऊ वाटतो, त्याचा सूक्ष्म दृष्टीने विचार केला असतां असें दिसून येईल की, बऱ्याच बाबतींत त्याचा आदर करण्यापेक्षां अनादर करणे हाच श्लाघ्यतर मार्ग होय. कोट्यवधि अक्षरशत्रु व विचारशून्य मनुष्यांनी आपल्या अडाणी समजुतीप्रमाणे चांगले म्हटले किंवा वाईट म्हटले; अज्ञान व धर्मभोळ्या लोकांच्या अचरट धर्मकल्पनांची व वेडसर सामाजिक विचारांची प्रशंसा करून, त्यापासून निघेल तेवढी माया काढणाऱ्या स्वार्थपरायण उदरंभरू हजारों टवाळांनी शिव्यांचा वर्षाव केला किंवा छीः थूः करण्याचा प्रयत्न केला; शेकडों अविचारी व हेकड लोकांनी नाकं मुरडली किंवा तिरस्कार केला सारांश ज्यांना मनुष्याच्या पूर्णावस्थेचे रूप बिलकुल समजले नाही किंवा ती घडून येण्यास काय केले पाहिजे हे ठाऊक नाहीं अशांच्या पर्वतप्राय झुंडीच्या झुंडी तुटून पडल्या तरी जो खरा विचारी आहे, ज्याला लोककल्याणाची खरी कळकळ आहे, सत्य बोलणे व सत्यास धरून चालणे यांतच ज्याचे समाधान आहे अशाने वरच्यासारख्या क्षुद्र लोकांच्या अवकृपेला, रागाला किंवा उपहास्यतेला यक्तिंचित् न भितां आपल्या मनास योग्य वाटेल ते लिहावें व सांगावें हेच त्यास उचित होय. त्याच्या अशा वर्तनांतच जगाचे हित आणि त्याच्या जन्माची सार्थकता आहे.
नवा सुधारक चे पहिले संपादकीय दि.य.देशपांडे
‘नवा सुधारक’ या नव्या मासिकाचा हा पहिला अंक वाचकांच्या हाती देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सुधारकाचार्य गोपाळ गणेश आगरकर यांनी १८८८ साली ‘सुधारक’ नावाचे साप्ताहिक पत्र सुरू केले, आणि ते त्यांचा अकाली मृत्यू होईपर्यंत, म्हणजे १८९६ पर्यंत, अत्यंत समर्थपणे आणि प्रभावीपणे चालविले. त्यानंतर ९४ वर्षांनी आज सुरू होणाऱ्या ‘नव्या सुधारका’चा आगरकरांच्या ‘सुधारका’शी काय संबंध आहे ? आणि ‘नव्या सुधारका’चे प्रयोजन काय आहे हे प्रश्न सुचणे स्वाभाविक आहे. त्यांची उत्तरे देण्याचा प्रथम प्रयत्न करतो.
पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे, ‘नवा सुधारक’ हा जुन्या ‘सुधारका’चा नवा अवतार म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहात आहोत. परंतु हे म्हणत असताना एक कबुली देणे आवश्यक आहे. आगरकरांच्या ‘सुधारका’चे तेज, सामर्थ्य आणि कर्तृत्व ‘नव्या सुधारका’त शतांशानेही असणार नाही याची जाणीव आम्हाला आहे. आगरकर हे एक लोकोत्तर पुरुष होते, ते एक महान मानव होते. त्यांची प्रतिभा चतुरस्र होती. कोणताही विषय तिला वर्ण्य नव्हता, मग ते राजकारण असो, समाजकारण असो, साहित्य असो की व्याकरण. आणि त्यांची लेखणी एका अद्वितीय शैलीने त्या सर्व विषयांत लीलया संचार करीत असे, त्यांच्या तुलनेत आम्ही कः पदार्थ आहोत अशी आमची भावना आहे. त्यांनी शंभर वर्षांपूर्वी जे करण्याचा प्रयत्न केला, आणि जे त्यांनी मोठ्या प्रमाणात साध्यही केले, तेच कार्य आम्ही करीत आहोत, आणि त्याच्या सिद्ध्यर्थ यथाशक्ति प्रयत्न करण्याचा आमचा दृढसंकल्प आहे.
आगरकरांनी शंभर वर्षांपूर्वी जे कार्य करावयास आरंभ केला ते दुर्दैवाने अजून मोठ्या अंशाने अपुरेच राहिले आहे. त्यांनी महाराष्ट्रात विवेकवादी सर्वांगीण सुधारणावादाची मुहूर्तमेढ रोवली, पण त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांनी केलेले काम छिन्नभिन्न होऊन गेले. ते गेल्यानंतर लवकरच महाराष्ट्राची स्थिती जवळपास पूर्वीसारखी झाली. आणि आज शंभर वर्षांनंतर ती तशीच आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. अंधश्रद्धा, जादूटोणा, मंत्रतंत्र, बुवाबाजी इ. गोष्टी पूर्वीइतक्याच जोमाने सुरू आहेत. धर्माने आपल्या सामाजिक जीवनात घातलेला धुडगूस आजही तेवढ्याच, किंबहुना अधिक तीव्रपणे चालू आहे. शनिवार, सोमवार, चतुर्थी, एकादशी इ. उपासतापासांना ऊत आला आहे. जुन्या देवळांचे जीर्णोद्धार होताहेत आणि नवीन मंदिरे बनताहेत. कुंभमेळे, गंगास्नान, यज्ञयाग हे सर्व जातिभेद अजून पूर्वीइतकाच तळ ठोकून आहेत आणि राजकारणात निवडणुकांच्या निमित्ताने त्याला उघडे आवाहन केले जात आहे. दलित आणि स्त्रिया यांवरील अत्याचाराने परिसीमा गाठली आहे. जिकडे नजर फिरवावी तिकडे कालची स्थिती आजच्यापेक्षा बरी होती असे म्हणण्याची पाळी आली आहे.
या सर्व शोचनीय स्थितीवर उपाययोजना करणे अतिशय कठीण आहे. आभाळच फाटल्यावर त्याला ठिगळ तरी कोठे कोठे लावणार ? परंतु तरी या कामास प्रत्येकाने हातभार लावणे जरूरीचे आहे असे आम्हाला वाटतेच आणि म्हणून त्यात आपला वाटा उचलणे आम्ही आपले कर्तव्य समजतो.
हा प्रयत्न करण्याचा विचार आमच्या मनांत अनेक वर्षांपासून होता. त्यावेळी माझी पत्नी प्राध्यापक मनू गंगाधर नातू हिची त्याला प्रेरणा होती. अनेक कारणास्तव ते काम आम्ही पुढे ढकलत राहिलो. पण तेवढ्यात आमच्यावर एक दुर्धर आघात झाला. ३ एप्रिल १९८८ रोजी श्रीमती नातूंचा एका शस्त्रक्रियेनंतर अंत झाला. त्या धक्क्यातून सावरायला इतके दिवस लागले. आता अधिक विलंब लावल्यास कदाचित हे काम आपल्याच्याने कधी होणारच नाही अशी भीती निर्माण झाली आहे. म्हणून आता ते एकट्यानेच करायचे ठरविले आहे. त्यात अर्थात अनेक जिवलग मित्रांचे साह्य आहेच. पण त्यामागील स्फूर्तिप्रद प्रेरणास्रोत नाहीसा झालेला आहे ही खंत आहे.
श्रीमती नातू हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. अनेक शारीरिक व्याधींनी त्रस्त असूनही मनाने त्या अतिशय खंबीर, आनंदी आणि उत्साही होत्या. प्रखर बुद्धिमत्ता आणि अखंड व्यासंग यांच्या जोडीला समाजसुधारणेची तळमळ हा त्यांचा विशेष होता. दलित आणि स्त्रिया यांच्यावर शतकानुशतके होत आलेले अन्याय आणि अत्याचार यांनी त्या फार व्यथित होत. आगरकरांच्या सर्वांगीण सुधारणावादाने त्या भारल्या होत्या. विवेकवादी जीवनाच्या स्वपकाने त्या मंत्रमुग्ध झाल्या होत्या. आगरकरांचे विचार पुन्हा जनतेपुढे मांडायची त्यांची मनीषा होती. शारीरिक दौर्बल्यामुळे वैचारिक क्षेत्रातच काम करणे त्यांना शक्य होते, आणि ते त्या यथाशक्ति करीत. आगरकरांचे जवळपास नामशेष झालेले वायय पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी १९८३ ते ८६ सतत चार वर्षे खपून त्याचे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकरिता संपादन केले. मरणापूर्वी आपल्या सर्व संपत्तीचा न्यास करून त्याचा विनियोग अनौरस, अनाथ मुलींचे संगोपन, शिक्षण, विवाह, इत्यादींकरिता व्हावा अशी त्यांनी व्यवस्था केली. अशा या विवेकी, परोपकारी, तेजस्वी व्यक्तीचे स्मारक तिला अतिशय प्रिय अशा कार्याला वाहिलेले मासिक-पत्र चालवून करणे याहून चांगले अन्य कोणते असू शकेल?
या मासिकपत्रात विवेकवादी तत्त्वज्ञानाचे सर्व बाजूंनी विवेचन आणि चर्चा करण्यात येईल. विवेकी जीवन म्हणजे काय ? याचा सांगोपांग ऊहापोह त्यात क्रमाक्रमाने येईल. सत्य आणि असत्य, तसेच इष्ट आणि अनिष्ट यांचे निकष काय आहेत ? विशेषतः श्रद्धावादी आणि भावनावादी लोकांचे आक्षेप असे आहेत की श्रद्धा आणि भावना या दोहोंनाही मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून विवेकाला थोडा आवर घालायला हवा. हे आक्षेप कितपत समर्पक आहेत ? आणि अशाच अन्यही प्रश्नांची हवी तितकी चर्चा अजून मराठीत झालेली नाही अशी आमची समजूत आहे. ती चर्चा घडवून आणणे हा ‘नव्या सुधारका’चा एक प्रधान उद्देश आहे.त्याचा आरंभ म्हणून विवेकवादावरील एक लेखमाला आम्ही या अंकापासून सुरू करीत आहोत.
विवेकवादाखेरीज व्यक्तिस्वातंत्र्य, समता, न्याय इत्यादि मूल्यांचे विवेचन आणि समर्थन आम्हाला अभिप्रेत आहे. आपल्या जीवनात विविध प्रकारची विषमता फार मोठ्या प्रमाणात आढळते. उदा. वर्तमान कुटुंबसंस्था स्त्रियांच्या बाबतीत अतिशय अन्यायकारक असून तिच्यामुळे समाजातील दुःखांचा फार मोठा भाग निर्माण होतो. तसेच जातिभेद आणि विशेषतः अस्पृश्यता ह्याही रूढी अतिशय अन्यायकारक आहेत आणि त्यांचे खरे स्वरूप ग्रामीण भागात पाहायला मिळते. या सर्व विषयांची चर्चाही या मासिकात येईल. याचाच भाग म्हणून विवेकवादाचे एक जगप्रसिद्ध पुरस्कर्ते, थोर विचारवंत बरट्रॅड रसेल यांच्या चरीीळरसश । चीरश्री या ग्रंथाचा अनुवाद या अंकापासून क्रमशः देत आहोत. रसेल यांची मते आणि शिफारसी या वाचकांना विवाद्य वाटतील यात शंका नाही. परंतु विचाराला चालना देणे हा ‘नव्या सुधारका’चा प्रधान हेतू असल्यामुळे त्यातून वाद आणि चर्चा उद्भवली तर ते आम्हाला इष्टच आहे. वाचकांनी पत्रांच्या रूपाने किंवा लेखांच्या रूपानेही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर आम्ही त्यांचे स्वागत करू. त्याचप्रमाणे वर उल्लेखलेल्या विषयांपैकी कोणत्याही विषयावर स्वतंत्र लिखाण कोणी पाठविल्यास आम्ही त्याचाही साभार स्वीकार करू.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.