प्रा. दि. य. देशपाण्डे यांचे मराठीतील तत्त्वचिंतन

[प्रस्तुत निबंध महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या दापोली अधिवेशनात (ऑक्टो.२००६) वाचण्यात आला आहे.]
प्रा. दि. य. देशपांडे तत्त्वज्ञानाचे अध्यापक होते आणि आजन्म तत्त्वज्ञानाचेच निष्ठावंत अभ्यासक होते. त्यांची व्यक्तिगत अल्पशी ओळख अशीः
सुमारे साठ वर्षांपूर्वी, १९४० साली नागपूर विद्यापीठातून ते एम्.ए. झाले. पुढील दोन वर्षे १९४१ ते ४३ अमळनेर येथील Indian Institute of Philosophy येथे त्यांनी रिसर्च फेलो म्हणून काम केले. नंतर १९४४ पासून १९७५ पर्यंत एकतीस वर्षे तर्कशास्त्र व तत्त्वज्ञानाचे अध्यापन केले. यांतले पहिले वर्ष सांगलीला विलिंग्डन महाविद्यालयात. नंतर मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील सरकारी महाविद्यालयांत जबलपूर, नागपूर, अमरावती इ. ठिकाणी. अमळनेरला पूर्वसहकारी असलेल्या चन्द्रोदय भट्टाचार्य यांच्या मदतीने १९४९ पासून Indian Philosophical Association ची त्यांनी स्थापना केली. असोसिएशनच्या Journal of Indian Philosophical Association चे १९५३ पासून पुढील वीस वर्षे १९७२ पर्यंत ते प्रमुख संपादक होते. जर्नलचा शेवटचा अंक १९७४ मध्ये निघून ते बंद पडले. या संशोधन-पत्रिकेचा भारतभर चांगला नावलौकिक झाला होता. आपल्या पिढीतील विद्वानांप्रमाणे “दि.यं’नी सुरुवातीचे प्रायः सर्व लिखाण इंग्लिशमधून केले. या काळात तत्त्वज्ञानाच्या देशी विदेशी पत्रिकांतील शोधनिबंधाव्यतिरिक्त त्यांनी तीन छोटेखानी पुस्तके लिहिली ती अशी: (1) Truth about God (2) Ethics for Every Man (3) Women, Family and Socialism. नंतरच्या कालखंडात म्हणजे १९७२ च्या पुढे मात्र त्यांनी मराठीतूनच लिहिण्याचा प्रघात ठेवला, तो अखेरपर्यंत. या लिखाणात मुख्य मुख्य सर्वच पाश्चात्त्य तत्त्वज्ञांच्या गाजलेल्या ग्रंथांचे पूर्ण किंवा आवश्यकतेप्रमाणे निवडक उताऱ्यांचे भाषांतर जसे आहे तसेच तत्त्वज्ञानातील प्रमुख प्रश्नांची चोख ओळख करून देणारे स्वतंत्र लेखनही अंतर्भूत आहे. याच साहित्याचा अल्पपरिचय करून देणे प्रस्तुत निबंधाचे प्रयोजन आहे. त्या कामाला आरंभ करण्यापूर्वी “दि.यं’ची तत्त्वज्ञानाची जी काही धारणा आहे ती स्पष्ट केली पाहिजे.
सत्यशोधन हे तत्त्वज्ञानाचे अंगीकृत कार्य आहे. पण सत्य काय आहे ? ‘सत्य’ विधान आहे. विधानाचा विशेष पण सत्यासंबंधी पहिली गोष्ट अशी की ते आहे परावलंबी! कोणाच्याही ठाम विश्वासाने ते ठरत नाही. मग तो कोणी, एखादा श्रद्धेय ग्रंथ असो की आदरणीय आप्त असो. ‘खुद्द देवाचा शब्द (Word of God)’ असे म्हटल्यानेही एखादे विधान सत्य ठरत नाही. सत्याचे प्रामाण्य स्वतः नाही, परतः आहे. जशी वस्तुस्थिती, तसे विधान असेल तर त्यात तथ्य आहे आणि तथ्यता हीच सत्याची कसोटी आहे. आप्तवचन, शब्द किंवा श्रद्धा हे सत्यज्ञानाचे साधन नाही. अर्थात ते तत्त्वज्ञानाचेही नाही. प्रत्यक्ष ऐंद्रिय ज्ञान आणि तन्निष्ठ तर्क किंवा अनुमान ही दोनच काय ती ज्ञानाची, विज्ञानाप्रमाणेच तत्त्वज्ञानाचीही साधने आहेत.
देकार्त (१५९६ ते १६५०) पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा जनक होता. त्याला हे जनकत्व कसे लाभले?
मध्ययुगीन ख्रिस्ती जगतात सत्य बायबलमध्ये बंदिस्त होते आणि बायबलच्या किल्ल्या धर्मगुरूंच्या कडोसरीला बांधलेल्या होत्या. मार्टिन ल्यूथरने (१४८३-१५४६) धर्मगुरूंची मध्यस्थी झिडकारली खरी पण त्याच्यासाठी सत्य अजूनही बायबलमध्येच दडून राहिले होते. देकार्तने सत्याचा बंदिवास संपवला. सत्य जनसामान्यांना कळू शकते. कोणालाही त्याचे ज्ञान होऊ शकते. मात्र ते ज्ञान स्पष्ट आणि विविक्त (उश्रशरी रपव ऊळीींळपली) असले पाहिजे असे त्याचे म्हणणे. सामान्यजनांना मिळवून दिलेला हा सत्यज्ञानाचा अधिकार हे देकार्तचे महान कार्य आहे.
देकार्तने देव नाकारला नाही, आत्मा नाकारला नाही. आणि जे तत्त्वज्ञान उभारले तेही ज्ञानाच्या लौकिक साधनांवरच. ‘सर्वंकष संशय’ आणि ‘सत्यज्ञानाच्या स्पष्टता अन् विविक्तता या लौकिक कसोट्या’ हे देकार्तचे तत्त्वज्ञानात विविध योगदान (Contribution) मानले गेले आहे. त्याची महानता त्याने केलेल्या तत्त्वज्ञानाच्या पुनर्रचनेत आहे. “दि.यं.’नी मराठीतील तत्त्वज्ञानाचे आपले लेखन देकार्तच्या Meditations (चिंतने) च्या अनुवादाने सुरू केले. अनुवादाच्या विवेचक प्रस्तावनेत देकार्तचा हा मोठेपणा आवर्जून उलगडून दाखवला (१९७४).
सामान्य जिज्ञासू मनुष्याला प्रश्न पडतो, (जसा मूरला पडला होता) की ऐन्द्रिय प्रत्यक्ष व अनुमान ही दोन्ही प्रमाणे साक्ष देत नसतानाही तत्त्वज्ञ ‘भासमान आणि वास्तव’ (Appearance and Reality) असा जो भेद करतात, तो का ? दृश्य जगामागे दडलेले दुसरे विश्व आहे आणि तेच खरे आहे, दिसते ते खरे नाही असा जो एक सार्वत्रिक समज आहे तो का?
तत्त्वज्ञांची ही बुचकळ्यात टाकणारी भाषा आणि ‘जे अनोखे भान’ त्यांना होते ते होते तरी कसे ?
या कूटप्रश्नाला तितकेच बहारदार उत्तर दिले आहे एका तोलामोलाच्या प्रतिभाशाली तत्त्वज्ञाने. त्याचे नाव आहे जॉर्ज बार्ली (George Berkeley).
जॉर्ज बार्ली (१६८५-१७५३) हा कल्पनावाद (Idealism) या तत्त्वज्ञानशाखेचा जनक. तत्त्वज्ञानी जनांचे लक्ष भाषेच्या विविध उपयोगांकडे सर्वप्रथम वेधणारा. भाषेच्या असदुपयोगांमुळे नको ते प्रश्न तत्त्वज्ञानात कसे उद्भवतात व कसे महत्त्व पावतात हे दाखवणारा. तो म्हणतो आम्ही तत्त्वज्ञानीच आधी धूळ उडवतो अन् मग मार्ग दिसत नाही म्हणून कुरकुरतो! भाषेच्या असदुपयोगामुळेच तत्त्वज्ञानातल्या अनेक प्रश्नांना जन्म मिळाला आहे. ते सारे प्रश्न नकली आहेत. भाषेची भिन्न स्वरूपे आहेत, तिचे विविध उपयोग आहेत, त्यांच्यात तत्त्वज्ञांकडून गफलत होत जाते. म्हणून भाषेचे स्वरूप समजावून घेतले तर तत्त्वचिंतकाला बिकट वाटणारे अनेक प्रश्न लोप पावतील. स्वतः बार्लीचा भाषेच्या जादुगिरीने मांडला गेलेला कल्पनावाद (Idealism) दीडशे वर्षे म्हणजे नेमके सांगायचे तर १९०३ पर्यंत तत्त्वज्ञांचे डोके उठवीत होता. मूरने १९०३ मध्ये Refutation of Idealism ह्या युगप्रवर्तक निबंधाने या अपसिद्धान्ताला कायमची मूठमाती दिली. दि.यं.नी अनुवादलेल्या दुसऱ्या पुस्तकात बार्लीचा हा सिद्धान्त आला आहे. Treatise on the Principles of Human Knowledge ह्या बार्लीकृत पुस्तकाचे दि.यं. नी चोख मराठी भाषांतर (ऑगस्ट १९८२) मानवी ज्ञानाच्या सिद्धान्ताविषयी प्रबंध या नावाने प्रसिद्ध केले आहे. आपल्या सुदीर्घ विवेचक प्रस्तावनेत भाषेच्या भूलभुलैयातूनच तत्त्वज्ञानाचे नाठाळ समजले जाणारे प्रश्न उद्भवतात हे बाक्र्लीचे द्रष्टेपणाचे उद्गार दि.यं.नी अधोरेखित केले आहेत. पुढे विसाव्या शतकात भाषिक तत्त्वज्ञांनी काढलेले निष्कर्ष बाक्ीने दीडशे वर्षे आधी कसे सूचित केले होते या गोष्टीकडे त्यांनी आपले लक्ष वेधले आहे.
विसावे शतक जी.ई. मूर (१८७३-१९५८), बर्नांड रसेल (१८७२ ते १९७०) आणि व्हिट्गेन्ष्टाइन (१८९९-१९५१) या तिघांचे आहे. या त्रिकूटाचा अध्वर्दू मूर. ह्याचे लिखाण तसे थोडे पण फार मार्मिक आहे. मूरच्या तीन अतिशय गाजलेल्या लेखांचा अनुवाद दि.यं.नी केला आहे. त्यांतला पहिला Refutation of Idealism (१९०३) कल्पनावादाचे खंडन या नावाचा, दुसरा अ Defence of Common Sense (१९२५) ‘धादान्त मताचे समर्थन’ या शीर्षकाचा आणि तिसरा Proof of an External World (१९५९) बाह्य जगाची सिद्धी ह्या मथळ्याचा आहे. या तिहींच्या अनुवादासोबत एक विमर्शक प्रस्तावना जोडून मूरचे तत्त्वज्ञान हे पुस्तक डिसेंबर १९८६ मध्ये दि.य.देशपांडे गौरव-निधी-प्रकाशन म्हणून प्रकाशित झाले आहे. तत्त्वज्ञानाचे कार्य विश्लेषण (analysis) हे आहे. हे विसाव्या शतकात प्रतिष्ठा पावलेले मत सर्वप्रथम मूरने प्रभावीपणे मांडले. कल्पनावादी तत्त्वज्ञानाविरुद्धच्या बंडात पुढाकार मूरने घेतला. अन् आपण त्याच्या मागोमाग गेलो असे रसेल म्हणतो. व्हिट्गेन्ष्टाइनही त्याच मार्गाने पुढे गेला हे लक्षात घेतले पाहिजे.
Idealism (कल्पनावाद) मूळचा बार्लीचा. तो हेगेलने Absolute Idealism (निरपेक्ष कल्पनावाद) ह्या नावाने विश्वविख्यात केला. तत्त्वज्ञानाचे क्षेत्र ‘अवघे विश्व’ किंवा ‘सकल’ (the whole) हे असते. तत्त्वज्ञानाचे ध्येय अंतिम सत्याची प्राप्ती हे असते. त्याच्या मानाने इतर ज्ञानशाखा खालच्या, त्या अलिकडच्या सत्याच्या अन्वेषी, अविद्या म्हणा की अपराविद्या म्हणा, या अनन्तिम आहेत. दृश्य जगत् इंद्रियांचा विषय असते पण अतीत विश्वाविषयीचे सत्य हे प्रज्ञाच (reason) आकळू शकते. तर्क स्वतःहून पुढे सरकत नाही. सरकू शकत नाही. त्याला पूर्व विधाने (premises) लागतात. ती प्रज्ञा पुरविते. तेथून आरंभ करून केवळ तर्कबलाने भव्य, उदात्त, अतिव्यापक वितर्क (speculation) करणारे अध्यात्म (metaphysics) बॅडली, बोअॅक्वेट हे हेगेलीय तत्त्वज्ञ मांडीत असत. या अतिभौतिकीत (metaphysics) आणखी एक गुण असा की, तत्त्वज्ञानाचे कार्य अंतिम सताचे दर्शन घडविणे हे आहे, असे तर ती मानतेच पण ते अंतिम सत् मानवाच्या आकांक्षांना अनुकूल आहे, मानवी आकांक्षांची त्यात परिपूर्ती आहे हेही दाखविण्याची धडपड करते. त्या भरात केले जाणारे युक्तिवाद बहुतेक अवैध, अयुक्तिक असत. [एक उदाहरण पाहा : आपले विश्व ही सुसंगत व्यवस्था (a coherent system) आहे हे Law of Contradiction या व्याघाताच्या नियमांवरून निष्पन्न होते असे त्यांचे म्हणणे! कारण सत् (म्हणजे वास्तवता) आत्मविसंगत असू शकत नाही. एवढ्या पूर्वविधानांवरून विधाने व्याघाती (Contradictory) नसतील पण ती अन्योन्य-निरपेक्ष, एकमेकांपासून स्वतंत्र अशी असू शकतात. हे लक्षात न घेता वास्तविक विधाने सुसंबद्ध, परस्परसंबद्ध असतीलच असे म्हणता येत नाही. ‘हिमालय २९ हजार फूट उंच आहे’ ह्याच्याशी ‘सूर्य गोल आहे’ हे कसे काय संबद्ध आहे ?
कल्पनावादी अद्वैती (Absolutist) मत खोडून, एकतत्त्ववादाविरुद्ध मूर-रसेल या केम्ब्रिज-तत्त्वज्ञांनी बहुतत्त्ववादी (pluralist) मत स्वीकारले. मूरने धादान्तवादाचे (Common Sense चे) तत्त्वज्ञान मांडले. तर रसेलने तार्किकीय परमाणुवादाचा (Logical Atomism चा) पुरस्कार केला. मूर म्हणतो, ‘जगाकडे पाहून मला कधी तत्त्वज्ञानाचे प्रश्न पडले नाहीत… मी तत्त्वज्ञानाकडे वळलो याचे कारण या तत्त्वज्ञांची वक्तव्ये.’ मूरची मनोरचना वाच्यार्थवादी Literal minded होती. भाषा गद्य आणि रूक्ष होती. तत्त्वज्ञाने अलंकारिक भाषा वापरू नये. स्वच्छ, निःसंदिग्ध, एकार्थक भाषेत बोलावे, लिहावे असे मूरचे मत होते. हे मत दि.यं.नी मनापासून आत्मसात केले आहे. त्यांच्या सर्वच लिखाणावरून हे दिसते.
दि.य.मूरप्रमाणे धादान्तवादाचे (Common Sense) समर्थक आहेत. रसेल-विटगेन्टाइन मानतात तसे तत्त्वज्ञानाचे कार्य analysis (विश्लेषण) आहे असे तेही मानतात. Philosophy is Logical Grammar of Language, तत्त्वज्ञान मुख्यतः भाषेचे तार्किक व्याकरण आहे हे त्यांना पटते. त्यांनी मूरप्रमाणेच रसेलचेही Philosophy of Logical Atomism हे पुस्तक तार्किकीय परमाणुवादाचे तत्त्वज्ञान या नावाने मराठीत आणले (१९८८). त्याला नेहमीसारखी अल्पाक्षरी. आस्वादक प्रस्तावना लिहिली.
या निखळ भाषांतराच्या कार्याप्रमाणेच देकार्त, स्पिनोझा, लायब्नित्झ ह्या प्रज्ञावादी (Ralionalist) परंपरेतील थोर तत्त्वज्ञांचे निवडक लेखन अनुवादून, त्याला विवेचक-विमर्शक प्रस्तावना जोडून अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान प्रज्ञावाद हा ग्रंथ दि.यं.नी १९९६ मध्ये प्रसिद्ध केला. तत्त्वज्ञानातील दुसरी परंपरा ‘अनुभववाद’ या नावाने विख्यात आहे. त्या परंपरेतील लॉक, बार्ली, ह्यूम यांचे निवडक लिखाण आपल्या प्रस्तावनेसह १९९९ मध्ये, अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान-अनुभववाद या नावाने मराठीत आणले. याच तत्त्वज्ञान ग्रंथमालेत कांट (१७२४-१८०४) वरील, अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान कांट हा तिसरा ग्रंथ त्यांनी जानेवारी २००० मध्ये प्रसिद्ध केला.
दि.यं.चे सर्वांत शेवटचे पुस्तक ते शेवटच्या आजारात अंथरुणाला खिळलेले असताना त्यांनी हातावेगळे केले. ते म्हणजे अल्फ्रेड Crotter Introduction to Logic and to the Methodology of Deductive Sciences an अनुवाद. त्यांनी आपल्या भाषांतराला तर्कशास्त्राचा परिचय निगामी रीत असे नाव दिले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत दि.य. म्हणतात
सांकेतिक तर्कशास्त्राचा जन्म गोटलोब फ्रेगेच्या बेग्रिफश्रीफ्ट या ग्रंथाच्या लेखनाने झाला. या अर्थी हा ग्रंथ युगांतरकारी आहे. पुढे १९१०-१३ मध्ये आलेल्या Principia Mathematica या त्रिखंडात्मक ग्रंथात या नव-तर्कशास्त्राच्या सिद्धान्तांचे पूर्ण विवेचन आले आहे. परंतु आपल्याकडे हा विषय अजून तितकासा रुजला नाही. कारण एखाद्या विषयावर उलटसुलट चर्चा करून त्याचा विस्तार, व अधिक लेखन होण्यासाठी मूळ वायय उपलब्ध असावे लागते, ते नाही. टास्र्कीचा Introduction….. हा ग्रंथ या विषयावरील अभिजात ग्रंथ समजला जातो.
त्याच्या अभ्यासाने तर्कशास्त्राच्या अभ्यासाला चालना मिळेल ह्या उमेदीने हे अनुवादाचे काम त्यांनी केले आहे.
ह्या पुस्तकाचा एक विशेष हा की, आजवर होऊन गेलेल्या उल्लेखनीय तार्किकांच्या कार्याची संक्षिप्त माहितीही त्यात जागोजाग तळटिपांत आली आहे. त्यांमधून या विषयाच्या विकासाचा एक लघु इतिहास वाचकाला उपलब्ध झाला आहे. विषयाच्या मूळारंभापासून तो त्याच्या शाखोपशाखांच्या विस्तारापर्यंत वाचकाला घेऊन जाण्याचे सामर्थ्य या पुस्तकात आहे असा दि.यं.चा दावा आहे.
पुस्तक मार्च २००५ मध्ये लिहून झाले, व ते ऑगस्ट २००५ मध्ये प्रकाशित झालेले पाहून त्यांना समाधान झाले आणि थोड्याच दिवसांत ३१ डिसेंबर (२००५) ला वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांचा अंत झाला.
देकार्तपासून सुरू होऊन कांटपर्यन्तचे टप्पे घेत विसाव्या शतकातील मूर-रसेलपाशी येऊन थांबलेली ही सभाष्य भाषांतरमाला मराठीत आलेले तत्त्वज्ञानपर अव्वल दर्जाचे साहित्य आहे यात शंका नाही. या उपक्रमाचे वर्णन कालिदासाचा श्रेष्ठ भाष्यकार मल्लिनाथ सुरी याच्या शब्दांत करायचे तर असे म्हणता येईल की, त्यात निराधार असे एक वाक्यदेखील आढळणार नाही आणि यायला नको होता असा एक शब्दसुद्धा दिसणार नाही. नामूलं लिख्यते किंचित्, नानपेक्षितमुच्यते ! हा बाणा हे या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे.
` दि.यं.नी मराठीतून तत्त्वज्ञानपर स्वतंत्र जे लिखाण केले त्यातील पहिले म्हणजे, युक्तिवादाची उपकरणे. (Tools of Argument) हे १९७६ साली प्रसिद्ध झाले. मुंबई मराठी साहित्यसंघात १९७२ साली कै. वामन मल्हार जोशी व्याख्यानमालेत त्यांनी दिलेल्या चार व्याख्यानांचा हा संग्रह. तत्त्वज्ञानावर गंभीर लिखाण करताना लेखकाला काही गोष्टी अवगत असाव्या लागतात. उदाहरणार्थ, शब्द वाक्य व्याख्या या संकल्पना, त्यांचे विविध उपयोग, प्रकार, युक्तवादाचे स्वरूप भेद अशी भाषिक सामग्री लेखकांइतकीच वाचकालाही माहीत असणे उपकारक ठरते. विधानांचे analytic-synthetic (विश्लेषक-संश्लेषक) हे भेद किंवा empirical – a priori (आनुभविक अनुभवपूर्व) सत्ये ही भाषा परिचित असली तर फार लाभ होतो. आपल्या प्रतिपाद्याचे समर्थन नीट करता येते किंवा प्रतिपक्षाच्या मांडणीतील दुर्बलस्थाने चटकन समजतात. ही गरज लक्षात घेऊन प्रस्तुत व्याख्याने दिली गेली. त्यांचा संग्रह म्हणजे युक्तिवादाची उपकरणे हे छोटेखानी, पाऊणशे पानी पुस्तक, तर्कशास्त्राची परिभाषाच काय Deductive (निगामी) आणि Inductive (उद्गामी) हे तर्काचे दोन मुख्य प्रकारसुद्धा सामान्य सुशिक्षिताला परिचित नसतात त्यांना आणि तत्त्वज्ञानाच्या मराठी अभ्यासकांना उपयोगी व्हावे असे हे लिखाण आहे. या पुस्तकात या सर्व साधनसामग्रीला म्हणूनच ‘युक्तिवादाची उपकरणे’ किंवा आयुधे असे नामकरण त्यांनी केले आहे. शेवटच्या प्रकरणात ‘नीतीची भाषा’ तिचे वेगळेपण कथन केले आहे.
दि.यं.चे बरेचसे स्वतंत्र, तरी काही बाबतीत नमुना दुसऱ्याचा, या धर्तीने लिहिलेले नीतिशास्त्राचे प्रश्न हे एक उल्लेखनीय पुस्तक आहे. प्रसिद्ध अमेरिकन तत्त्वचिंतक William Frankena याच्या Ethics या पुस्तकात पारंपरिक नीतिशास्त्र व अतिनीतिशास्त्र (Traditional Ethics and Metaethics) यांचा चांगला समन्वय साधला आहे. तीच विषयाची विभागणी आणि तोच विवेचनाचा क्रम हे तंत्र राखून हे पुस्तक लिहिले आहे. त्यात कांटकृत नीतिमीमांसा, बेंटमपासून (Bentham) ते सिज्विकपर्यंतचा उपयोगितावादाचा इतिहास, नैतिक उत्तरदायित्वाचा प्रश्न इ. विवेचन स्वतंत्र आहे. फँकेनाने केलेली नैतिकमूल्य व ननैतिकमूल्य (moral value and non-moral value) ही चर्चा मराठीत प्रथमच दि.यं.नी आणली आहे. न्यायाचे विवरण, नियमांची नीति आणि शीलांगांची (traits of character) नीती यांतील भेद तसेच सुजीवनाची चर्चा ही अभिनव मांडणी, फ्रँकेनाची आहे. नीतिशास्त्राचे प्रश्न हे पुस्तक महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाने १९८६ साली प्रसिद्ध केले आहे.
यानंतरचे दि.यं.चे महत्त्वाचे स्वतंत्र लेखन म्हणजे तत्त्वज्ञानाच्या मूलभूत समस्या (Fundamental Problems of Philosophy) हा ग्रंथ. या पुस्तकाबद्दल प्रस्तावनेत स्वतः दि.य. म्हणतात, ‘याची रचना सामान्यपणे बोलायचे तर तत्त्वज्ञानाचे पहिले पुस्तक म्हणून केली आहे. ते लिहिताना वाचकाच्या जवळ तत्त्वज्ञानाची कसलीही पूर्वतयारी गृहीत धरलेली नाही. विवेचनही शक्य तितके सुबोध करण्याचा प्रयत्न केला आहे.’ हा सुमारे अडीचशे पानांचा ग्रंथ १९९० मध्ये महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळासाठी काँन्टिनेन्टल प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केला आहे. ह्या पुस्तकाच्या नुसत्या अनुक्रमणिकेकडे जरी दृष्टी टाकली तरी त्याच्या आवाक्याची कल्पना येते. त्यात तत्त्वज्ञानाचे जुने नवे सगळे महत्त्वाचे प्रश्न चर्चेला घेतले आहेत. भाषा आणि जग हा तत्त्वज्ञानातला अद्यतन विषय सर्वांत आधी मांडून नंतर तर्कशास्त्र, ज्ञानमीमांसा, अवकाश-काळ, सामान्ये (universals) सत्य, ईश्वर, अतिभौतिकी, मूल्ये इत्यादींची अद्ययावत् चर्चा या पुस्तकात केली आहे. पारिभाषिक शब्दसंग्रह सर्वत्र असतो तसा येथेही आहे.
सरतेशेवटी, सामाजिक परिवर्तनाचा वैचारिक आधार काय असावा हे सांगण्याच्या हेतूने दि.यं.नी केलेल्या एका उपक्रमाची ओळख करून द्यायला पाहिजे. महाष्ट्रातील सामाजिक सुधारणांचे अग्रणी गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक या नावाचे एक अत्यंत तेजस्वी, स्वतंत्र साप्ताहिक सुमारे आठ वर्षे चालविले होते (१८८८-९५). आगरकरांनी पुरस्कारलेली विवेकवादी विचारसरणी आज त्यांच्यानंतर शंभर वर्षांनीही तितकीच समाजहिताची साधक आहे अशी दि.यं.ची खात्री होती. त्यामुळे त्यांनी १९९० साली वयाच्या ७३ व्या वर्षी आजचा-सुधारक ही मासिकपत्रिका सुरू केली. इहवाद, मानवी समानता, व्यक्तिस्वातंत्र्य आणि न्याय या चतुःसूत्रीवर आधारलेला विवेकवादच सर्व सामाजिक सुधारणांचा पाया होऊ शकतो, हे या मासिकाचे प्रतिपाद्य आहे. त्यातून प्रसिद्ध झालेल्या बावीस निवडक लेखांचा संग्रह विवेकवाद याच नावाने नोव्हेंबर १९९९ मध्ये मुंबईच्या ग्रंथालीतर्फे प्रकाशित झाला आहे.
विवेकवादी दृष्टिकोणातून त्यांनी चर्चिलेले काही विषय आहेत ‘भक्ती हे मूल्य आहे काय ?’ ‘मी आस्तिक का नाही ?’ ‘नियती, देव, विधिलिखित, नशीब, प्रारब्ध इत्यादी’ हे आणि असे. हे लेखन सामान्य वाचकांसाठी असले तरी त्यात विचाराची खोली आणि युक्तिवादाची कर्कशता यांत कोठे तडजोड नाही. सर्वांसाठी, तत्त्वज्ञान सर्वकाळ तेच-एकच असते का हा प्रश्न कधीकधी विचारला जातो. मानवी स्वभाव आणि बुद्धीची जिज्ञासा पाहता काही प्रश्न सार्वकालिक आणि सार्वदेशिक म्हणता येतील. मात्र तुम्ही कोणता दृष्टिकोण घेता किंवा कोणत्या दृष्टिकोणातून पाहता ह्यावर तुमची उत्तरे अवलंबून असतात. डेव्हिड ह्यूम (१७११-७६) हा प्रसिद्ध ब्रिटिश तत्त्वज्ञ आपल्या Inquiry Concerning Human Understanding या ग्रंथाच्या शेवटच्या परिच्छेदात म्हणतो. “देवताशास्त्र किंवा साम्प्रदायिक अध्यात्मशास्त्राचे एखादे पुस्तक आपल्या हाती जर आले तर स्वतःला विचारा की यांत संख्यांविषयी किंवा परिमाणासंबंधी काही अमूर्त विवेचन आहे काय ? नाही ! त्यात भौतिक विश्वात विद्यमान असलेल्या वस्तूंविषयी प्रयोगपूर्वक प्राप्त केलेले काही तर्कसंगत प्रतिपादन आहे काय ? नाही ! फेका तर मग ते पुस्तक अग्निकुंडात. कारण त्यात वितंडवाद आणि निराधार (धूसर), भासमान कल्पनाविहार ह्यांखेरीज दुसरे काही असणे शक्य नाही.”
तार्किकीय भाववाद (Logical Positivism) या नावाने विख्यात असलेल्या एका विचारसरणीला ह्यूमचे वरील मत शिरोधार्थ आहे. प्रा. दि.य.देशपांडे हेदेखील ह्यूमच्या वरील मताचे समर्थक होते. तत्त्वज्ञान हा सत्यशोध घेण्याचा खटाटोप आहे. विज्ञान आपल्या प्रायोगिक पद्धतींनी वास्तविक-भौतिक जगाचा शोध घेत असते. तर्काची त्याला त्या संशोधनाला जोड द्यावी लागते. परिणामी उपलब्ध ज्ञान संश्लेषक (synthetic) विधानांद्वारे मांडले जाते. अशी सत्य विधाने अनुभवनिष्ठ (empirical) असतात, अनुभवपूर्व (a priori) नसतात. उघडच तत्त्वज्ञान या ज्ञानशाखेजवळ भौतिक सृष्टीबद्दल म्हणा की वास्तविक विश्वाबद्दल म्हणा, सांगण्यासारखे काही नसते. त्याच्या अभ्यासपद्धतीला ते मुळी अप्राप्यच आहे, तत्त्वज्ञानाचे कार्य विश्लेषक आहे. हे विश्लेषण
तार्किक, भाविक वैचारिक आहे. दि.यं. च्या मते Linguistic Analysis भाषिक विश्लेषण सत्यशोधनाच्याकामी तत्त्वज्ञानाला उपयोगी पडणारे अंग आहे एवढेच नसून तेच त्याचे मुख्य स्वरूप आहे. मोक्षविद्या हे भारतीय तत्त्वज्ञानाचे स्वरूप त्यांना न भावणारे आहे. ‘नैतिक मूल्यांवरील भारतीय चिंतन’ ह्या परामर्श (खंड ४, अंक ४, फेब्रु. १९८३ पुणे) मधील लेखात त्यांनी मोक्ष या साध्याची एक प्रकारची ‘स्वार्थीपणा’ या शब्दात वासलात लावली आहे. आपला धर्म व्यवहार हा मतलबी नफाखोरीचा, वणिग्व्यवहार आहे. ‘देवा, तू मला ते (इष्ट) दे, मी तुला हे देतो’ अशी नफ्याची किंवा लाभाची दृष्टी ठेवून जोपासलेली ही वृत्ती आहे. “धर्म म्हणजे पावित्र्याचा, मांगल्याचा शोध आणि अध्यात्म म्हणजे निरहंकारता, निर्विकारता, स्थितप्रज्ञता, आत्मौपम्यवृत्ती, प्रज्ञा-शील समाधि याची पारमिता” (१) या प्रा. अंतरकरांच्या प्रतिपादनाबद्दल दि.य. म्हणतात, ‘या अर्थाने धर्म आणि अध्यात्म मानणारे (महाभाग) धर्म मानणाऱ्या लोकांमध्ये किती आहेत, याचा शोध घेतला तर अंतरकरांची निराशा होईल.’ (२)
“ईश्वराचे अस्तित्व आणि त्याचे दयालुत्व इ. गुण, तसेच अध्यात्मात सांगितले जाणारे, आत्म्याचे अमरत्व, कर्मसिद्धान्त, पुनर्जन्म, मोक्ष इ. सर्व गोष्टी विधानात्मक भाषेत मांडल्या आहेत आणि म्हणून त्या सर्व सत्याच्या, सत्य विधानाच्या कसोटीस (भौतिक अर्थाने परीक्षणीय) उतरल्या पाहिजेत. धर्म आणि अध्यात्माची भाषा नेहमीच्या व्यावहारिक, वैज्ञानिक भाषेहून वेगळी आहे हे काही तत्त्वज्ञांचे (व्हिटगेन्टाइन, आपल्याकडील प्रा. मे.पुं. रेगे, श्री.ह. दीक्षित, शि.स. अंतरकर) मत त्यांना मान्य नाही. परंतु जेथे जेथे सत्याचा दावा आहे तेथे तेथे सत्याची एकच कसोटी लावली पाहिजे असा दि.यं.चा दावा आहे. हे खरे की, नीती हे ज्ञानेतर क्षेत्र आहे म्हणून नीतीची भाषा वेगळी आहे हे दि.यं.ना कबूल आहे.
गीता हा नीतिशास्त्रविषयक ग्रंथ आहे या मताचा विरोध दि.य. तरुणपणापासून अविरत करत आले आहेत. कर्तव्य कसे करावे हा जसा नीतीचा एक प्रश्न आहे तसाच कर्तव्य कसे ठरवावे हाही आहे. यांतील दुसरा जास्त महत्त्वाचा आहे. हा कै. वामन मल्हार जोशी यांच्याप्रमाणेच त्यांचाही दावा आहे. आणि गीतेत त्याचे उत्तर नाही हा ह्या दोघांचाही आक्षेप आहे. शिवाय ‘निष्काम कर्म’ आणि ‘मोक्ष’ ह्या कल्पना त्यांना जशा विवाद्य तशाच अनाकलनीय वाटतात. ‘जन्ममृत्यूपासून सुटका’ या अर्थीच ‘मोक्ष’ हा शब्द प्रामुख्याने वापरला जातो. दुसरे अर्थ नसतील असे नाही. पण ह्या अर्थाचा त्याग करणारे मत कोठेही नाही. पुनर्जन्म मुळीच नसण्यापेक्षा तो असेल तर जास्त आनंददायी आहे, तो मला हवा आहे, असे प्रा. श्री. ह. दीक्षित म्हणतात. परंतु मोक्ष म्हणजे ‘वासनाराहित्य’ हा अर्थ गीतेला अभिप्रेत आहे असे दीक्षितांना वाटते. ‘निष्कामबुद्धीने कर्तव्य करणे म्हणजे कर्तव्य-प्रेरणेने कर्मे करणे हा अर्थ असेल तर गीतेत हा एकुलता एक मौलिक विचार आहे’ (३) असे दि.य. बिनदिक्कत म्हणतात.
दि.यं.ची नैतिक उपपत्तीः
भारतीय तत्त्वज्ञानासंबंधी, गीतेसंबंधी एकूणच अध्यात्मप्रवण तत्त्वज्ञानाच्या स्वरूपासंबंधी दि.यं.ची मते आणि विचारसरणी नकारात्मक असल्यामुळे असेल किंवा त्यांच्या प्रसिद्धिपरायखतेमुळे असेल त्यांच्या कामाला प्रसिद्धी-निदान महाराष्ट्रात, म्हणावी तशी मिळाली नसावी. वर उल्लेखिलेले आजचा सुधारक हे मासिक १९९० मध्ये त्यांनी सुरू केल्यानंतर मगच सुबुद्ध महाराष्ट्रीयांचे लक्ष त्यांच्याकडे गेलेले दिसते. तत्त्वज्ञानाच्या प्रांतात मात्र डॉ. सुरेन्द्र बारलिंगे, प्रा. श्री.ह.दीक्षित, मे.पुं.रेगे, डॉ. बोकील आदी मान्यवरांकडून त्यांना मनमोकळी मान्यता लाभत गेली आहे. या मान्यतेचे प्रतीक म्हणून परामर्श ने प्रा.दि.य. देशपांडे यांचे तत्त्वचिंतन या उपशीर्षकाचे त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त १९९३ मध्ये दोन विशेषांक काढले. त्यात त्यांनी आपल्या नीतिशास्त्रीय भूमिकेबद्दल खुलासा केला आहे. त्यांच्या नैतिक उपपत्तीचा स्वल्प निर्देश तिच्या अभिनवतेमुळे येथे करणे योग्य होईल.
दि.यं.नी आपल्या उपपत्तीत कांट आणि मिल्, यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. आजचा सुधारक मधील लेखात ‘नीती’ची मांडणी करताना ते म्हणतात की, कांटने दिलेल्या कर्तव्यकर्माच्या कसोटीतून आपल्याला कर्तव्यतेची अवश्यअट (उपाधी) कळते. ती अट म्हणजे, आपण स्वीकारलेल्या आचारनियमाचे सुसंगत सामान्यीकरण होऊ शकले पाहिजे ही. आपल्या वर्तणुकीच्या नियमात आपण कोणालाच केवळ साधन म्हणून वापरलेले नसावे, हे ठीक आहे. पण तेवढे तत्त्व सांभाळले म्हणून एखादा कर्मनियम कर्तव्य ठरत नाही. कर्माला कर्तव्यता कशाने येते हे ठरविताना हेतूचा विचार अप्रस्तुत आहे. (कर्त्याची नैतिकता ठरविताना तो प्रस्तुत असला तरी). कर्माचे परिणाम शुभंकरणाच्या (Beneficence) तत्त्वानुसार असतील तर ते कर्म कर्तव्य ठरू शकते. प्रत्यक्षात सदीहा पूर्वक* कर्तव्य केल्यामुळे (Good-Will) काला नैतिक योग्यता लाभते. मिल्ने कर्त्याची ‘अर्हता’ आणि कर्माची ‘योग्यता’ असे दोन शब्द वापरले आहेत. तो म्हणतो, ‘कर्माच्या कर्तव्यतेचा हेतूशी काहीही संबंध नाही. परंतु तो कर्त्याच्या अर्हतेशी (म्हणजे नैतिक मूल्याशी) पुष्कळच आहे.
(४) शुभंकरणाची कसोटीः
प्रत्यक्ष कर्तव्य पार पाडताना हेतू नैतिक असणे गरजेचे आहे. ती नैतिकता सदीहेने* (Good-Will) ठरते. अर्थात् कर्तव्यार्थ कर्तव्य या विचाराने ठरते. परंतु एखादे कर्म किंवा कर्मनियम कर्तव्य होण्यासाठी शुभंकरणाची कसोटी लागते. शुभंकरणाच्या तत्त्वात दोन गोष्टी येतात. एक, शिवाचे (Good) अशिवाहून (evil) आधिक्य, (Balance of good over evil) त्याने साधले जाते आणि दुसरे म्हणजे शिवाचे वाटप अन्यायकारक असू नये ही. हा Distribution चा (वितरणाचा) विचार परिणामाच्या अपेक्षेने ठरतो. म्हणून हे तत्त्व साध्यवादी किंवा फलवादी (Telcological) आहे. पण एकदा निवड झाली की त्यानुसार वागताना त्याला सदीहेची जोड (Good-Will) असावी द्यावी लागते. ही भूमिका (Deontological) तव्यवादी आहे.
याप्रमाणे एकीकडे साध्यवादाला अनुसरून कर्माची निवड आणि दुसरीकडे तव्यवादानुसार (Deontology) प्रत्यक्ष कृती करणे अशी मिश्र-तव्यवादी उपपत्ती दि.य. मांडतात.
दि.यं.ची भाषा वैज्ञानिकांची असते तशी चोख, नेमकी आणि मिताक्षरा असते. शैली गद्य आणि कोरडी (Prosaic and Dry) वाटू शकते. पारिभाषिक शब्दांचे प्राचुर्य आणि कर्कश वाक्यरचना कित्येकदा इंग्रजी वळणाची होत जाते. त्यामुळे असे लिखाण कधी कधी काय, अनेकदा एका वाचनाने कळत नाही पण त्यातल्या मौलिकतेमुळे आणि प्रखरतेमुळे पुन्हा वाचण्याचे श्रम घ्यायला वाचक तयार असतो हे मात्र खरे!
एका अर्थाने बंडखोर पण दुसऱ्या अर्थी प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचा वारसा आजन्म चालवणाऱ्या ज्ञानर्षी प्रा.दि.य.देशपाण्डे यांच्या स्मृतीला प्रणाम.
चिटणवीस मार्ग, १६, शान्तिविहार, सिव्हिल लाइन्स, नागपूर ४४० ००१. (* सत् + ईहा = सदीहा)
(३) परामर्श चा पूर्वोक्त अंक पृ. १७१ (४) परामर्श चा पूर्वोक्त अंक पृ. १४३

अभिप्राय 1

  • अभिप्राय देण्याएवढा मी कोणीच नाही कारण मलाच त्याबद्दल तेवढी काही माहिती नाही. पण माझी मर्यादित समज जेवढी मला परवानगी देते त्यावरून सगळी मांडणी एकदम अप्रतिम, विस्तृत आणि सखोल.
    खरंतर धन्यवाद.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.