संपादकीय ‘आजचा सुधारक

मनुष्याची एक पूर्णावस्था असते आणि ती घडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कृती म्हणजेच सुधारणा, ही आगरकरांच्या कामांमागील मुख्य संकल्पना. ही मुक्ती, मोक्ष, अशी पूर्णावस्था नसून पूर्णपणे ऐहिक आणि सामाजिक संदर्भापुरतीच आहे. या पूर्णावस्थेकडे जाणाऱ्या वाटेवर कोणत्या देशातले लोक कुठपर्यंत पोचले आहेत, ते आगरकर तपासतात. आज आपण जगाकडे मुख्यतः इंग्रजी भाषेच्या चष्म्यातून पाहतो. आगरकरांच्याही काळी हीच स्थिती होती, आणि त्यातही मुख्यतः इंग्लंड देशाकडेच जास्त लक्ष दिले जाई. आगरकर त्यांना जास्त प्रगत वाटलेल्या देशांच्या वाटचालीबाबत एक छोटीशी यादी देतात “अनेक देशांतील उद्योगी पुरुषांनी अहर्निश परिश्रम करून पदार्थधर्माचे केवढे ज्ञान संपादिले आहे, विपद्विनाशक व सुखकारक किती साधने शोधून काढिली आहेत, व राज्य, धर्म नीति वगैरे विषयांतील विचार किती प्रगल्भ झाले आहेत. . .” शेवटी पूर्णावस्थेचा विचार होणार मानव्यशाखांमध्येच, पण आगरकर त्याही आधी विज्ञान-तंत्रज्ञानाचा उल्लेख करतात एखाद्या आवश्यक पूर्वअटीसारखा, झीशलेपवळींळेप सारखा.
या तुलनेत त्यांच्या काळच्या भारतीय समाजासाठी “आतून अगदी शुष्क होत आलेल्या झाडाचे रूपक वापरतात. त्याला नवजीवन देण्यासाठी दोन दिशांनी कृती करण्याचे ते सुचवतात. “त्याची खूप खच्ची करून त्यास अर्वाचीन कल्पनांचे भरपूर पाणी द्यावयाचे!’ अशा खच्ची केलेल्या झाडाची त्यानंतरची फळे सहज हाती लागण्याजोग्या उंचीवर असतात, हे रूपकाचे एक सामर्थ्य.
आज आगरकरांचा खच्चीकरणावरचा भर सहज आठवतो, पण अर्वाचीन कल्पनांची शिंपण अभ्यासातूनच दिसते. विरोधी मतांचे खंडन नेहेमीच नाट्यपूर्ण, चटकदार भांडणांच्या रूपात दिसते. त्यामानाने नव्या कल्पनांचे मंडन फारच अळणी! पण याला एक वेगळेही अंग आहे. आगरकर मुख्यतः स्वतःला ‘लोकाग्रणी’ समजणाऱ्या मराठी साक्षरांसाठी लिहीत. पेशवाईत सत्ता भोगलेला आणि
इंग्रजी शिक्षणाच्या ‘वाघिणीच्या दुधाच्या पहिल्या धारांवर पोसलेला हा समाज. तो नुसताच लवचीकपणा गमावून “अस्थिभूत, तीळषळशव झालेला नव्हता. इंग्रजी शिक्षणाचे आर्थिक फायदे उपटत त्याबद्दल तुच्छता दाखवणारी, इतर समाजाकडे डोळेझाक करणारी अश्मीभूत, पीळश्रळशव अवस्था गाठलेला तो समाज होता. “ज्यांना या पिाश्चात्त्य शिक्षणार्यों टांकीपासून बराच संस्कार झाला आहे, ते समुदायापासून अगदी विभक्त झाल्यासारखे होऊन उभयतांत सांप्रतकाली एका प्रकारचे वैषम्य उत्पन्न झाले आहे”, हे नोंदून पुढे, “या वैषम्यास विशेष कारण कोण होत आहेत हे येथे सांगण्याची गरज नाही’, अशी कोपरखळी आगरकर मारतात. त्यांच्या
खच्चीकरणातला हा सर्वांत सौम्य घाव!
‘आहे ही सामाजिक स्थिती अत्युत्तम’, ही समजूत एखाद्या मनोरुग्णाने “मला कुठे काय झाले आहे !” असे म्हणण्यासारखी आहे. मानसोपचारात ‘नकार’, denial म्हणतात ती ही स्थिती. वर्णव्यवस्था, पुरुषसत्ता, अडाणी कर्मकांडे, “वरिष्ठांची प्रशंसा आणि कनिष्ठाशी गर्वोक्ति” असे वागण्यातली श्रेणीबद्धता, हे सारे आगरकरांच्या खच्ची करणाऱ्या कुन्हाडीचे लक्ष्य होते. आत्मतुष्टता नको, दोष मान्य करायलाच हवेत, अशा प्रकारानेच ‘नकार’ मोडला जाऊन उपचाराला, सुधारणेला सुरुवात होऊ शकेल. ही सारी मांडणी सुधारका च्या पहिल्या लेखापासून ठसवली जाते. यात आगरकर स्वतःच्याच समाजगटावर वार करत असल्याने ते ‘गद्दार’ ठरले, आणि नंतरची वैचारिक लढाई संस्मरणीय झाली.
आगरकरांनी सुरू केलेल्या खच्चीकरणाचे परिणाम नक्कीच झाले, पण समाजाचे अनेक भाग आजही त्या सुपरिणामांपासून वंचित आहेत. “अर्वाचीन कल्पनांचे भरपूर पाणी’ देण्याच्या अंगाबद्दल मात्र आगरकरांच्या काळापेक्षाही आज ही स्थिती अस्वस्थ करणारी आहे. सुधारक काढण्यापासूनच्या ११८ वर्षांत माहितीत, ज्ञानात स्फोटासारखी वाढ झाली आहे. त्यांच्या काळाच्या संदर्भात अद्ययावत्, सर्वस्पर्शी असलेले आगरकरांचे ज्ञान आज अत्यंत वेगळ्या रूपांत सामोरे येते. आगरकरांचे झाडांच्या भौगोलिक ‘प्रवासा’चे आणि त्यातून कुठे नवनवोन्मेष उपजणे तर कुठे जरठपणा येणे याबाबतचे रूपक आज शंकास्पदच मानायला हवे. जास्त तांत्रिक होण्याचा आरोप सहन करूनही आज चर्चेत असलेले माणसांच्या इतिहासाचे चित्र तपासायलाच हवे.
आजच्यासारख्या शरीररचनेची माणसे पाचेक लक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेत उपजली, आणि इसवीसनपूर्व १०,८०० पर्यंत जगाच्या बहुतेक भागांपर्यंत पोचली आणि ‘वसली’. या सर्व काळात माणसे विस्तारित कुटुंबांच्या टोळ्या बनवून वावरत. निसर्गातून वस्तू वेचन. थोडीफार शिकार करून अन्नवस्त्राच्या गरजा पूर्ण केल्या जात. टोळी हे कुटंबच असल्याने वस्तूंचे वाटप समप्रमाणात होत असे. थोडे धान्य, थोडा सुका मेवा वगळता अन्नाची बेगमी केली जात नसे. कर्तबगार प्रौढांचे निर्णय टोळीचे इतर सदस्य मानत. मोसमाप्रमाणे अन्नासाठी भटकावे लागे, पण सुबत्तेच्या काळापुरत्या टोळ्या स्थाईकही होत. आकाराने मोठ्या टोळ्यांची कधीकधी शकले पडत, पण एकमेकांपेक्षा वेगवेगळ्या क्षेत्रांत वावरायची मुभा असल्याने शत्रुत्व नसे. टोळ्यांमध्ये संघर्ष झालाच तर स्त्रियांवरून होई, कारण जगात जवळपास निरपवादपणे निकटच्या नातलगांत समागमावर बंदी आढळते. इ.स.पू. १०,८०० मध्ये शेवटचे हिमयुग
ओसरू लागेपर्यंत जगभरातील माणसे या अन्नसंकलक जीवनशैलीनेच जगत.
नंतर काही ठिकाणच्या काही माणसांना काही वनस्पतींना आणि पशुंना माणसाळवण्याचे तंत्र जमू लागले. हे प्रथम घडले पश्चिम आशियातील मृतसमुद्राच्या परिसरात. इ.स.पू. ८,५०० पर्यंत इथले लोक शेती व पशुपालन करू लागले होते. ही बैठ्या अन्नोत्पादनाची सुरुवात होती. काही काळाने ईशान्य चीन, मध्य अमेरिका इत्यादी इतर काही जागीही शेतीची तंत्रे वापरली जाऊ लागली. नंतर ही तंत्रे इजिप्त, सिंधु नदीचे खोरे, पश्चिम यूरोप वगैरे ठिकाणी पसरली. अन्नोत्पादनाची लोकसंख्या अन्नसंकलकांच्या वस्तीपेक्षा दाट असते. संघर्ष झाल्यास शिकार-सावड करणारे समूह नष्ट तरी होतात, सामावून तरी घेतले जातात, किंवा दुर्गम सांदीकोपऱ्यांत लोटले तरी जातात. अशा त-हेने समाजासमाजांमध्ये विषमता उत्पन्न होते.
अन्नोत्पादक कुटुंबे व समूह ठराविक जागी शेती करतात आणि ठराविक पशुपक्ष्यांचे कळप पाळतात. यामुळे ‘सबै भूमि गोपाल की’ न राहता टोळीविशिष्ट, कुटुंबविशिष्ट, व्यक्तिविशिष्ट मालकी हक्काची कल्पना उपजते, पिकांची, कळपांची बेगमी करता येते. या साठवणीमुळे रोजच्या रोज अन्न कमावण्याच्या श्रमांपासून काही माणसे काही काळ मोकळी होतात. हे ‘रिकामे’ लोक लोहारकाम, सुतारकाम, कुंभारकाम, यासारखी कौशल्ये कमावून थेट अन्नोत्पादनापेक्षा वेगळ्या त-हेने समाजोपयोगी कामे करू लागतात. मालकी हक्क, साठवण, देवाणघेवाण, या साऱ्यातून ‘कुलकर्यां’ची लेखनिक-हिशेबनिशी, देशमुख-पाटलांची न्याय व दंड देणारी संस्था, व्यापार, वगैरे नवे पेशे घडतात. हे संख्येने कमी असणारे ‘विशेषज्ञ’ अन्नासाठी श्रमत नाहीत, पण महत्त्वाने मात्र मोठे होत जातात. मालकीसोबतच चोरीची शक्यता आणि सुरक्षेची यंत्रणाही उपजते. हे नवनवे श्रमांचे प्रकार केवळ अन्नोत्पादकांनी गरजेपेक्षा जास्त अन्न घडवण्यानेच अस्तित्वात येतात. हा सारा पेशाचा डोलारा शेतकऱ्याच्या-गराख्याच्या पायावर उभा असतो. चित्र मात्र घडते ते या ‘श्रममुक्त’, ‘उच्च’ गटांसाठी शेतकरी-गुराखी श्रमत असण्याचे. म्हणजे समाजासमाजांमधील विषमतेसोबतच एकेका समाजातही विषमता उपजते. अन्नसंकलनापासून अन्नोत्पादनाकडे जातानाच्या या प्रक्रियेचे वर्णन एक अभ्यासक ‘समतावादाकडून चोरशाहीकडे’ (From Egalitarianism to Kleptocracy) असे करतो.
ही अन्नोत्पादक जीवनशैली मुख्यतः माणसे आणि पाळीव पशूच्या ऊर्जेवर, श्रमावर चालत असे. अन्न शिजवायला लाकडे जाळली जात. कुठेकुठे धान्य दळायला, होड्या चालवायला वाऱ्याची ऊर्जा वापरली जाई. लाकडे, लोणारी कोळसा आणि भाता
चालवणाऱ्याचे श्रम यांवरच धातुकला बेतलेली असे. पण इस. १७५० च्या सुमारास इंग्लंडात खनिज (दगडी) कोळसा वापरून वाफेचे एंजिन घडवले गेले. ही ऊर्जास्रोतातली, तंत्रज्ञानातली क्रांती ‘औद्योगिक क्रांती’ या नावाने ओळखली जाते. खनिज ऊर्जेच्या वापरासोबत वाढता धातुवापरही होऊ लागला. माणसांच्या वापरातल्या वस्तूंची यादी प्रकाराने आणि प्रमाणाने वाढू लागली. ‘सुखवस्तू’ आणि ‘वस्तुदरिद्री’ गटांमधला फरक प्रचंड झाला. विषमतेच्या दऱ्या खोल होऊ लागल्या. रुंदावू लागल्या. एकूण विषमतेने व्यापलेल्या समाजांतली कौटुंबिक समतेची बेटे नगण्य ठरू लागली.
तीव्र आणि टिकाऊ विषमता समाजात ताण उत्पन्न करते. कधीकधी तुटेपर्यंत ताणले जाऊन हिंसा भडकते. तशी हिंसा भडकू नये, सामाजिक-आर्थिक ताण आटोक्यात राहावे, यासाठी जगभर दानधर्म ही जोडसंस्था वापरली जाते. दानाने विषमता मंदावते. धर्म या ना त्या प्रकाराने प्रत्येक समाजघटकाला त्याच्या स्थानातच समाधानी राहायला शिकवतात. वर्णव्यवस्था, ‘नम्र तेच पथ्वीचे वारस ठरतील’ ही ख्रिस्ताची शिकवण, मुस्लिमांची समतेचा देखावा उभारणारी ‘मजलिस’ सारी विषमता कह्यात ठेवू पाहणारी यंत्रे! शेती-पशुपालनाच्या काळातली विषमता संघटित धर्मसंस्थेने आटोक्यात ठेवली जाऊ शकत असे. औद्योगिक क्रांतीनंतरच्या विषमतेची तीव्रता वाढली ती इतकी की धर्मसंस्थेला तिचे नियंत्रण, निष्प्रभीकरण झेपेना. उलट वंशपरंपरागत पेशे, पेशांचे संघ (Guilds व जातिसमूह) या धर्माने पुरस्कृत केलेल्या यंत्रणा विषमतेला सौम्य करण्यात अडथळे आणू लागल्या. संघटित धर्मसंस्थेत बरेच बदल होऊ लागले. त्या संस्थेऐवजी स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही मूल्ये मानण्याचा पुरस्कार होऊ लागला.
आगरकरांच्या काळी भारत या प्रक्रियेच्या कोणत्या टप्प्यावर होता? मुख्यतः शेती-पशुपालनावरच समाज बेतलेला असे. फुटकळ उद्योग सुरू होत होते, पण त्यांचे तंत्रज्ञान आणि त्यामागचे विज्ञान फारच थोड्या लोकांपर्यंत पोचले होते. असे म्हणता येईल की अन्नसंकलनापासून शेतीची जीवनशैली घडतानाची विषमतेची लाट भारताने धर्माच्या मदतीने ‘पचवली’ होती. आगरकरांसारख्यांना औद्योगिकीकरणाने एक नवी, मोठी विषमतेची लाट येईल, हे दिसत होते. इंग्रजी व यूरोपीय समाजांपैकी काही समाजांनी वसाहती घडवून आपापले देश सुखवस्तू होऊन दारिद्र्य इतर देशांमध्ये राहील अशी व्यवस्था अजाणतेपणेच घडवली होती. स्वतःच्या देशात स्वातंत्र्य-बंधुभाव, आणि भारत मात्र अडाणी लोकांचा देश, हे घडणे शक्य नव्हते, भारत फार मोठा होता आणि इंग्रज संख्येने कमी. थोड्याशा भारतीयांना सोबत घेऊनच राज्य करता येणार होते आणि जेमतेम सोबत घेण्याइतकेच शिक्षण देण्याचा प्रयत्न होता. पण शिक्षणाचे भूत बाटलीतून काढताना मध्येच बूच लावता येत नाही. काही लोक नेमून दिलेल्यापेक्षा जास्त शिकतात !
एखाद्या प्रदेशात शेती इतर भूप्रदेशांपेक्षा आधी किंवा नंतर का सुरू झाली, या प्रश्नावर पूर्वीपासून बराच खल झाला आहे आणि होत असतो. हा विषय मुळात मानव्यशास्त्रांचा आहे पण गेली काही वर्षे नैसर्गिक विज्ञानाच्या शाखा नव्या मांडण्या सुचवत आहेत. इतिहास, प्रागैतिहास यांना आज जीवशास्त्र, पुराजीवशास्त्र, पुरामानव-शास्त्र, पुरामानसशास्त्र, परिसरशास्त्र, अशा अनेक शास्त्रांचा
आधार घेता येत आहे. ____ आज या मांडणीत विचारप्रणाली, धर्म, वंश कशालाही साकडे न घालता स्पष्टीकरणे सापडत आहेत. यांचा पाया कोणीही सहज तपासू शकेल, इतपत उघड आहे. आज इतिहास विज्ञानाची मदत सहजगत्या घेत आहे. “समाजाच्या घटनेची, अभिवृद्धीची व लयाची कारणे” कोणती, याबद्दलच्या धारणा पूर्णपणे बदलत आहेत. यासंबंधीची काही पुस्तके शेवटी नोंदली आहेत. ती सगळी गेल्या दहाएक वर्षांतली, सामान्यांसाठी लिहिलेली आहेत. त्यांच्यामागचे संशोधन वीसपंचवीस वर्षांमधले इतके ‘अर्वाचीन’ आहे. भारतातील अनेक लोकांनी पुस्तके मिळवून, वाचून त्यांवर चर्चाही सुरू केल्या आहेत. प्रश्न आहे तो या कल्पनांचा प्रसार होऊन, त्यांच्यातला ग्राह्य भाग शिक्षणक्रमांमध्ये सामावला जाऊन त्या ‘लोकाग्रणीं’ पर्यंत पोचून त्यांच्या धारणांचा भाग बनण्याचा.
तंत्रज्ञान व त्याची उत्पादने सहज प्रसार पावतात, पण त्यांमागचे विज्ञान व शोधक वृत्ती सहज पसरत नाही. सुरुवातीला ‘जराशी’ वाटणारी विषमता झपाट्याने भीषण वाटण्याइतकी वाढते, हे इतिहासात वारंवार दिसते. खूप वेगाने धावूनच आपण आपले इतर देशा-समाजांच्या तुलनेतले स्थान टिकवू शकतो सुधारणे, ही पुढची पायरी. पण आज प्राथमिक-माध्यमिक शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांतील सुधारणा करू पाहणाऱ्या सर्वांनी शिक्षणाच्या क्षेत्रावर भर दिला. रॉय, विद्यासागर, जगन्नाथ शंकरशेट, फुले, टिळक, आगरकर, वि.रा. शिंदे, भाऊराव पाटील, राजर्षी शाहू महाराज आणि ही परंपरा
आंबेडकरांपर्यंत टिकली. आज मात्र वैद्यक-अभियांत्रिकी-व्यवस्थापनशास्त्राच्या दुभत्या गायी पोसून “समुदायापासून अगदी विभक्त” होण्याचीच चलती आहे.
आगरकर “समाजाचे कुशल राहून त्यास अधिकाधिक उन्नतावस्था येण्यास जेवढी बंधने अपरिहार्य आहेत तेवढी कायम ठेवून बाकी सर्व गोष्टींत व्यक्तिमात्रास (पुरुषास व स्त्रीस) जितक्या स्वातंत्र्याचा उपभोग घेता येईल तितका द्यावयाचा” हे आवर्जून आणि वारंवार सांगतात. आजचे अनेक लोकाग्रणी याचा वापर फक्त व्यापारी-आर्थिक क्षेत्रात करण्यावर आग्रह धरतात. “प्रत्येक व्यक्तीस विचार, उपभोग आणि काम ही समप्रमाणाने करावी लागून साऱ्यांच्या सुखानुभवाची इयत्ता सारखी” करण्यास मात्र समर्थक मिळत नाहीत. अन्नसंकलनाच्या काळातल्या समतेने मोहित होऊन पुन्हा निसर्गाशी एकरूप’ होण्याच्या स्वपकांनी सद्गदित होणारे त्या समतेमागच्या बंधुभावाकडे मात्र लक्ष वेधत नाहीत.
एकंदरच मतैक्याऐवजी मतभेदांवरच लक्ष केंद्रित केल्याने आज “संघशक्तीच्या भुईंत खंदक/रुंद पडुनि शें तुकडे झाले” असे चित्र उभे झाले आहे. स्वातंत्र्य जरातरी समाजाच्या पचनी पडले आहे (असे वाटते). समता राज्यघटना आणि कायद्याच्या मदतीने लढूनच मिळवता येते. आणि बंधुभाव . . . . दिसतच नाही. __या भूमिकेतून किंवा भूमिकांमधून आजचा सुधारक चालू ठेवण्याचा हेतू काय असावा, याबद्दल वाचकांची मते ऐकून घ्यायची इच्छा आहे.
संदर्भ :
१) गन्स, जर्स अँड स्टील, जेरेड डायमंड (व्हिंटेज १९९०) २) द डे बिफोर यस्टर्डे, कॉलिन टज् (पिम्लिको, १९९५) ३) आफ्टर द आईस, स्टीव्हन मिथेन (फिनिक्स २००३) ४) कोलॅप्स, जेरेड डायमंड (पेंग्विन २००५) ५) सो रॉल वुई रीप, कॉलिन टज् (पेंग्विन २००३)
मश्रुवाला मार्ग, शिवाजीनगर, नागपूर ४४० ०१०.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.