गावगाडा २००६ (भाग ३)

दुष्काळी भाग, निरीक्षणे व चिंतन

खेड्यात राहणारी, विशेषतः दुष्काळी भागातील माणसे सभोवतालच्या परिस्थितीमुळे रुक्ष झालेली असतात असे आपल्याला अनेक गोष्टींतून प्रत्ययास येते. म्हणजे जेवण करणे, हा एक आवश्यक नैसर्गिक उपचार असतो. बाकी काही नाही. ज्यांना त्या क्रियेला ‘उदरभरण’ म्हणणेसुद्धा रुचत नाही त्यांना हे ऐकून आश्चर्य वाटेल. बऱ्याच वेळा खेडूत बंधू ‘तुकडा खाणे’ किंवा ‘तुकडा मोडणे’ म्हणतात; म्हणजे “चला पाव्हणं तुकडा खायला”, किंवा “झाला का तुकडा खाऊन ?” वगैरे.
दुष्काळी परिस्थिती व नदीकाठच्या काळ्या रानाची परिस्थिती खूप वेगळी असते. काळ्या जमिनीतील शेतकऱ्याला शेतीची खूप कमी काळजी असते असे म्हणतात. एकदा पाऊस पडला की पेरायला जायचे व नंतर पुन्हा काढायलाच जायचे, मध्ये देवभक्ती वगैरे करायची. त्यामुळे काळी जमीनवाल्यांकडे सुबत्ता असते. खूप वेळ असतो. साहजिकच त्यांचा स्वभाव दिलदार, हौशी, वगैरे असतो. अगदी छोट्या गोष्टीवरूनही आपल्याला हे दिसते. पान खाणे हा आपल्या देशातला एक एकात्मता सिद्ध करणारा उपचार, व्यसन, जे काही असेल ते आहे. आता मराठवाडा विदर्भातले लोक हा सोहळा (त्यांच्या दृष्टीने हा सोहळा असतो) अगदी हैद्राबादी नबाबाच्या थाटात कसा रस घेऊन करतात बघा. त्यांच्याकडे बहुतेक वेळा पानाचा डबा (लहान-मोठा) असतो. ते व्यवस्थित पान काढतात. ते आपल्या गमछा अथवा नॅपकिनवर पुसतात. मग ते मांडीवर व्यवस्थित पसरतात. मग त्याच्यावर ओला चुना व्यवस्थित पसरतात. मग कात टाकून पुन्हा पसरतात. त्याला थोडे सुकू देतात. मग कतरी सुपारी तयार किंवा अडकित्याने बारीक काढून टाकतात. मग त्यात पुदिना, त्याला बहुतेक थंडक म्हणतात, गोड पाला (गुंजेचा पाला) इत्यादी वस्तु घालतात. फार हौशी असतील तर किमाम किंवा सुवासिक तंबाकू घालतात मग व्यवस्थित घडी करून खातात.

आता याच्या उलट दुष्काळी भागात पान खाण्याचा विधी असा असतो एकतर हे व्यसन स्वतःच्या पैशाने करायचे नसते. समोरच्याला म्हणायचे, “काय, हाय का पान खांड ?” मग दोघांनी समोरासमोर बसायचे. मांडी वगैरे शक्यतो घालायची नाही. उगीच रिलॅक्स नको व्हायला! मग सुपारी अडकित्याने फोडायची, त्याचे एक खांड समोरच्याला द्यायचे एक आपण तोंडात टाकायचे. एक खांड म्हणजे एका सुपारीचा अडकित्याने केलेला एक अष्टमांश भाग. ती सुपारी व्यवस्थित कातरायची वगैरे नाही. वेळ जातो. खांड एका दाढेकडे टाकून द्यायचे ते ओले होऊन फुटेपर्यंत. दोन पाने त्याला, दोन आपल्याला घ्यायची. त्यातला वाळलेला वगैरे भाग काढून टाकायचा. त्याची उभी घडी घालायची व चुन्याच्या डबीतला तळाला गेलेला चुना नखाने काढून त्याच्यावर माखायचा व सुरळी दुसऱ्या दाढेखाली सारायची. मग काताचा एक तुकडा तोडून तोंडात टाकायचा. नंतर तंबाकूची पिशवी काढायची व चिमूटभर त्याला द्यायची, चिमूटभर आपण तोंडात सोडायची. असा हा विधी असतो. जी चुन्याची डबी असते ती नेहमी तळाला कशी गेलेली असते ? कधीतरी भरलेली असायला पाहिजे. पण बहुतेक नसते. कदाचित भरलेली असल्यावर समोरचा जास्त घेईल असा विचार असेल. आता तंबाखू खाण्याचे खूप प्रकार आहेत, आणि तंबाखूचा आस्वादही निरनिराळ्या पद्धतीने घेतात. अमका माणूस अमुकच पद्धतीने तंबाखू का खातो हे सांगणे अवघड आहे. तंबाखूने कॅन्सर होण्याची शक्यता वाढते वगैरे कितीही प्रचार झाला तरी शिक्षण झालेल्या लोकांतसुद्धा याचे प्रमाण खूप आहे. माझ्या मताने तंबाखूचे व्यसन इतर कोणत्याही व्यसनापेक्षा स्वस्त आहे हे एक कारण एकदा तंबाखूचे व्यसन लागले की ते सुटत नाही याचे असावे.

खेड्यातल्या समाजात जर तुम्हाला मिसळायचे असेल, समरस व्हायचे असेल तर तंबाखूसारखे साधन नाही. ही वस्तु लहानापासून थोरापर्यंत म्हणजे लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत व रावापासून रंकापर्यंत सर्वांना आवडीची असते. ही वस्तू कोणीही कोणालाही केव्हाही मागू शकतो, किंवा देऊ शकतो. शाळेचे हेडमास्तर घंटी वाजवून चपराशाला बोलावून त्याला तंबाखू मागू शकतात, व तोही देतो. रस्त्यावरून विरुद्ध दिशेने जाणारी वाहने थांबवून चालक एकमेकांना ही वस्तू मागू शकतात. त्याचा घेणाऱ्याला व देणाऱ्याला राग नाही. दोघांनाही जाणीव असते, तंबाखूची तलफ म्हणजे काय चीज आहे. मी तर असे ऐकले आहे की मतदार लोकांना हा माणूस आपला वाटावा ह्या हेतूने काही नेते मुद्दाम स्टेजवर बसून तंबाखू खातात व स्टेजवर बसूनच त्याची विल्हेवाट लावतात.

माणसांचे स्वभाव व प्राण्यांच्या बऱ्याच गोष्टी सभोवतालच्या निसर्गावर अवलंबून असतात. मी तरी या भागात गोष्टीत, कवितांत ऐकलेला पांढरा शुभ्र गुबगुबीत ससा पाहिला नाही. इकडचे ससे करड्या रंगाचे असतात. हरणाचा रंग पण साधारण तसाच असतो. हा रंग येथे वाळलेल्या गवताचा असतो. इकडचा मुख्य ऋतु कोणता म्हटले तर कमी उन्हाळा, मध्यम उन्हाळा व जास्त उन्हाळा, असे सांगता येईल.

इथल्या परिस्थितीचा, विशेषतः पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा, येथे राहणाऱ्याच्या मनावर कळत नकळत खोल परिणाम झालेला असतो. या भागातली व्यक्ती पाण्याचा अपव्यय करूच शकणार नाही. अगदी साध्या साध्या गोष्टीत आपल्याला हे निरीक्षण करता येईल.

येथला वॉशबेसिनच्या आरशासमोर दाढी करणारा माणूस कधीही नळ पूर्ण वेळ उघडा ठेवणार नाही. त्याला जेव्हा वस्तरा स्वच्छ करायचा असतो तेवढ्यापुरताच तो नळ सोडेल व पुन्हा बंद करेल.
आमच्या घरात परदेशी पाहुणे बरेच येतात. म्हणून (वा नवीन घर बांधण्याच्या वेळेस माणसाची मानसिक अवस्था जराशी निराळी असते म्हणून म्हणा!) आमच्या घरात गेस्ट रूमचा संडास पाश्चात्त्य पद्धतीचा आहे. त्यामुळे त्यात टब, शावर, गरम-थंड पाणी वगैरे सर्व आहे. पण गेल्या १८-२० वर्षांत मी एकदाच टब वापरला असेल. अहो एका आंघोळीला चक्क ३००-४०० लीटर पाणी वापरायचे म्हणजे काय ? पापच, ते!

मागे एकदा एका दूरदर्शनवाहिनीने ज्ञानोबा माउलीच्या पालखी प्रस्थानाच्या दिवशीचे आळंदीहून थेट प्रक्षेपण प्रसारित केले होते. त्या दिवशी इंद्रायणीला खूप पूर आला होता. तेव्हा ह्या पुराची व माणसांच्या गर्दीची छायाचित्रे सारखी दिसत होती पण इकडच्या गावकरी बंधूना माणसांच्या गर्दीपेक्षा नदीला आलेले प्रचंड पाणीच जास्त भावत होते. किती पाणी वाहून चालले आहे! आजच वर्तमानपत्रात वाचले की आतापर्यंत यावर्षी कृष्णा-भीमा खोऱ्यातून ४२५ टी.एम.सी. (TMC, एक अब्ज घनफूट) पाणी अतिरिक्त म्हणून वाहून दुसऱ्या राज्यात गेले. आणखी १-१।। महिना तरी इकडचा पावसाळा आहे. आता सर्व धरणे जवळजवळ भरली असल्याने आता यानंतर पडणारे सर्वपाणी वाहूनच जाणार! हे सर्व पाणी अडविण्यासाठी २४,००० कोटी रुपये लागणार. म्हणजे जवळजवळ सहाव्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फक्त एका वर्षीचा जो वाढीव पगार होणार आहे तेवढे. याचा कधी विचार होणार ? आपला मोठा मध्यमवर्ग व शासन याचा कधी विचार करेल काय ?

कदाचित या दुष्काळी पार्श्वभूमीमुळेच साहजिकच इकडे पाऊस पडण्याचे फार कौतुक! येथे कमी पडणाऱ्या पावसाचे वर्णन किंवा मोजमाप करण्याचे अनेक शब्द प्रचलित आहेत. उदा. भुरभुर पाऊस, दगड ओले होतील एवढा पाऊस, वाळत घातलेले धोतर भिजेल एवढा पाऊस, पिकाची पाने नुसती ओली होतील एवढा, मुळवा उतरेल एवढा, कच्चा पेंड ओलता, पक्का पेंड ओलता, रानात पाणी थबथबले एवढा, रानातील पाणी नुकतेच पाणी बाहेर निघेल एवढा, वाटवणी, अगदी मोठा, वीस वर्षांपूर्वी पोळ्याला पडला, लक्ष्म्याला पडला होता एवढा, किंवा अति म्हणजे ढगफुटी, म्हणजे एकूण १२ प्रकारे पावसाचे वर्णन करता येते व त्या वर्णनाने लोकांना बरोबर समजते की किती पाऊस पडला. याहनही आणखी अनेक शब्दांनी पावसाचे वर्णन करता येईल. पण पाऊस पडण्याचे प्रमाण अर्थातच तेवढेच राहणार. या प्रत्येक प्रकाराचे मि.मि. किंवा इंचासोबतचे नाते अगदी सहज लावता येईल.

आमच्या जिल्ह्यात एक संशोधक आहेत. शेती व ग्रामीण व्यवस्था यासंबंधी ते बरेच काम करतात. स्वतः गेली कित्येक वर्षे खेड्यात राहून करतात. त्यांनी गेल्या दुष्काळात (२-५ वर्षांपूर्वी) शौचालय कमी पाण्यात कसे वापरता येईल या संबंधी एक लेख लिहिला होता व तो जिल्ह्याच्या वर्तमानपत्रात छापून आला होता, मला आश्चर्य वाटते की ज्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था व रोटरी, लायन्सच्या शाखा दरवर्षी अनेक बक्षीसे वाटत असतात, गावश्री, गावसुंदरी, समाज-सुधारक वगैरे. त्यांनी अजून एखाद्या व्यक्तीला पाण्याची बचत करण्याचा पुरस्कार कसा जाहीर केला नाही ?
दुष्काळी भागातील शेती व्यवसायातील शेतकऱ्यांची मानसिकता ही आपल्या व्यवसायाबद्दल फारसा आत्मविश्वास नसलेली असते.त्याचे कारण त्याला आलेले आजपावेतोचे अनुभव!

साहजिकच त्यामुळेच नवीन कोणत्याही प्रकारचे धाडस व नवीन तंत्राचे प्रयोग वगैरे, ज्याला भांडवल लागणार आहे, असे करायला तो तयार नसतो. त्यात नवीन महाग बियाणे आली, सिंचनाची नवीन तंत्रे, ड्रिप, स्प्रिंकलर वगैरे, किंवा नवीन हॉर्मोनसारखी औषधे वगैरे वापरणे आले. त्यामुळे सरासरी शेतकरी शेतीच्या बाबतीत फारसा महत्त्वाकांक्षी किंवा आशावादी नसतो. नवीन प्रयोग करणाऱ्याकडे कौतुकाने बघण्याऐवजी “बघू आता कसा करतो ते?” अशी दृष्टी असते. त्यामुळे त्या प्रयोगवीराचा प्रयोग अयशस्वी झाल्यावर बऱ्याच जणांना हायसे वाटते! “बघा आम्ही म्हटलेच होते’, अशी सामान्य प्रतिक्रिया असते. त्याच्या स्वतःच्या अनुभवाने व अनेक पिढ्यांच्या अनुभवाने किंवा जरा चांगला शब्द वापरायचा तर ‘संस्काराने’ त्याला शेतीत काहीही धोका पत्करायचा नसतो. आणि त्यातून मोठ्या व्याजाने नवीन भांडवल शेतीत घालायचे म्हणजे शुद्ध वेडेपणा! कमीतकमी खर्चात किंवा शक्य झाल्यास जवळजवळ न-खर्चात जेवढे उत्पन्न मिळेल तेवढे त्याला त्याच्या प्रपंचाला पाहिजे असते. आज शेतीत शंभर रुपये घालून उद्या दोनतीनशे मिळणार आहेत, याच्यावर त्याचा भरवसा नसतो.

अशा प्रकारच्या मानसिकतेला अनेक कारणे असतात. ज्यांची इच्छा शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्याची आहे, त्यांच्यापुढे हे मोठेच आह्वान आहे. यासाठी शासनावर पूर्णपणे अवलंबून राहता येणार नाही. हा एक खूप खोलवर सामाजिक व आर्थिक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, याची सर्व संबंधितांना जाणीव असली पाहिजे.

आता अशा प्रकारच्या प्रश्नावर शासन काहीच करत नाही असे नाही. प्रशासनाचे पण काही प्रश्न असतात. कोणतीही योजना राबवायची म्हटल्यावर काही लोक शासनाच्या चांगल्या योजनांचे आपल्या अप्रामाणिकपणाने वाटोळे करतात, हेही खरे आहे. पण योजना आखताना वा राबवताना हा शेतकरी माणूस, ज्याच्याविषयी आपण अगदी आस्थेने विचार करतो तोही या समाजाचाच एक भाग असल्याने त्याच्यात त्या समाजाचे गुणदोष असणारच, हेही लक्षात ठेवले पाहिजे.

त्यामुळे या योजनांतील भ्रष्टाचार वगैरेंकडे थोडा कानाडोळा केला पाहिजे. आता आपण नेहमी वर्तमानपत्रात रोजगार हमी योजनेत मोठा भ्रष्टाचार वगैरे वाचतो. पण त्यामुळे ती योजना राबवायचीच नाही असे करता कामा नये. मला असे वाटते की ही एकच योजना अशी आहे की ज्यामुळे ग्रामीण भागातील रोजगाराचा स्तर उंचावत आहे. विधानसभेतील अनेक भाषणे, अनेक वायदे, अनेक अग्रलेख यांनी जे शक्य झाले नसते, ते फक्त ही योजना चिकाटीने राबविण्यामुळे घडलेले आहे. आता याला दुसरीही बाजू आहे. पण सध्या तो आपला विषय नाही.

माझ्या मनात हल्ली कोणतीही सरकारी योजना जाहीर झाली की संबंधित लोक त्याचा कसा गैरफायदा घेऊ शकतील याचे चित्रच उभे राहायला सुरुवात होते. कदाचित या प्रवृत्तीच्या लोकांशी बराच संबंध आला असल्यामुळे असेल. पूर्वी सरकारने स्वातंत्र्य सैनिकांना मानधन देण्याचे ठरविले. मग स्वातंत्र्यसैनिकांची व्याख्या, ब्रिटिश, हैद्राबादचे, गोव्याचे वगैरे. मग त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे, शिफारशी वगैरे. या सगळ्यांत पळवाटा ‘एकमेकां साह्य करूं’ या न्यायाने असायच्या. येथे एका ठिकाणी मिलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने एका लांबच्या गावाच्या तुरुंगातून कैदेत असल्याचा दाखला मिळवून स्वतःला स्वातंत्र्य सैनिकाचे वेतन चालू करून घेतले होते. तीच गोष्ट बनावट रेशन कार्डाची वा ‘ब्लॅक’मध्ये मिळणाऱ्या केरोसीनची. सध्या राजमार्गावर चालणारे बहुतांश ट्रक केरोसीनवरच चालतात. इकडे सरकार भले प्रदूषणासाठी एशी-ख, पी-खख वगैरे प्रमाणे ठरवण्याचा आग्रह धरो! जर म्हटले की केरोसिनमुळे एंजिन लवकर बिघडेल, तर त्याचेसुद्धा गणित तयार असते. एका वर्षात केरोसिन वापरल्याने एवढे पैसे वाचतात व इंजिनच्या कामाला फक्त एवढे पैसे लागतात!

आता खेडेगावात गावोगाव ट्रॅक्टर, टेम्पो, चारचाकी छोटी वाहने, तीन चाकी माल वाहतूक करणारी वाहने, ऊस वाहणारे ट्रक अशी अनेक वाहने झाली आहेत. ही सगळी बँकांची कृपा! त्यामुळे बैलगाडीने तयार मालाची वाहतूक हा प्रकार आता फार कमी झाला आहे. आता बैलगाडीने शेतातल्या शेतातच वाहतूक चालते. पूर्वी लोक ५०-१०० कि.मी.सुद्धा, प्रसंगी एखादा मुक्काम करून, पण बैलगाडीनेच जायचे. चांगले खिलारी बैल, रंगवलेल्या सजवलेल्या बैलगाड्या हे चांगल्या शेतकऱ्याचे भूषण असायचे. लग्नसमारंभाच्या वर्णनात किती बैलगाड्याचे वन्हाड होते असा पण एक मुद्दा असायचा. असो.

अशा प्रकारे अनेक निरीक्षणे नोंदवता येतील. पण कोणत्याही विषयावरून सुरुवात केली तरी शेवटी गाडी दुष्काळ, दारिद्र्य व भ्रष्टाचार या विषयांवरच घसरते! त्यामुळे आम्ही काही मंडळींनी तरी लग्नसमारंभात किंवा इतर ठिकाणी सर्व एकत्र जमल्यावर ज्या गप्पा मारायच्या त्या शेती राजकारण व भ्रष्टाचार या विषयांना सोडून मारायचा प्रयत्न करायचा असा नियमच केला आहे. पण हे अगदी थोड्या वेळा जमते.

आपल्यासारखी माणसे जी कधी राज्यकर्ते होऊ शकणार नाहीत की ज्यांच्यामध्ये गेल्या पिढीतल्या लोकांच्यासारखे तत्त्वज्ञान नाही (की जे तत्त्वज्ञान त्यांना प्रामाणिकपणा, शुद्ध आचरण, साधी राहणी, एखाद्या आपल्याला पटणाऱ्या तत्त्वाला वाहून घेणे व शेवटपर्यंत त्या तत्त्वाशी एकनिष्ठ राहणे, इ. गोष्टी शिकवीत होते) असे लोक काय करणार, तर फार तर लिहिणार वाचणार आणि पुन्हा ‘व्यवहार आहे’ या सबबीखाली चालू आहे. तसेच चालू देणार! या सर्व गोष्टी बदलणे ‘अपने बस की बात नहीं है! यही सच!

सुंदरबन, सुर्डीकर बंगला, अध्यापक कॉलनी, कुडुवाडी रोड,बार्शी ४१३ ४११.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.