विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत काढण्यासाठी तो पुढे सरसावला. परंतु हे काय, समोरील दृश्य पाहून राजा विक्रमादित्याच्या मनाचा थरकाप झाला. आज त्याला जवळपास सगळ्याच झाडांवर प्रेते लटकलेली दिसत होती. झाडांवर इतकी प्रेते कशी काय आली असा विचार करीत असतानाच त्याची दृष्टी त्याला हव्या असलेल्या प्रेतावर पडली. झाडावरील ते प्रेत खांद्यावर टाकून विक्रमादित्याने आपली पावले स्मशानाकडे वळवली आणि तो झपझप मार्गक्रमण करू लागला तोच प्रेतातील वेताळ त्यास म्हणाला, “राजन्, आताचे दृश्य पाहून तू चांगलाच अस्वस्थ झालेला दिसतोस. माझ्याप्रमाणेच ह्या प्रत्येकाचा अंतिम संस्कार करण्याचे तू जर ठरवलेस तर तुला पुढील तीन चार वर्षे तरी काम पुरणार बघ! आणि प्रत्येकाकडून तीच ती कहाणी परत परत ऐकावी लागणार. त्यापेक्षा मीच तुला त्यांची कहाणी सांगतो, लक्ष देऊन ऐक.”
“गोंडवनात त्या काळात राजा विलासराय राज्य करीत होता. गोंडवनावर निसर्ग कृपावंत होता. त्यामुळे इतर राज्यांपेक्षा येथील प्रजा बऱ्या स्थितीत होती. फार कष्ट न करता शेतकऱ्यांना पोटापुरते उत्पन्न होत होते. इतर उद्योगधंदेदेखील हळूहळू वाढू लागले होते. असे सगळे स्थिरस्थावर वाटत असतानाच त्याच्या राज्यावर निसर्गाची अवकृपा झाली. दोन वर्षे अवर्षण तर तिसऱ्या वर्षी अतिवृष्टी झाली. आणि साधारण ह्याच दरम्यान गोंडवनातील शेतकरी आत्महत्या करू लागले. सुरुवातीला महिन्यातून दोन-तीन शेतकरी आयुष्य संपवत होते पण बघता-बघता हे प्रमाण वाढून दररोज एक तरी बळीराजा आपलाच बळी देऊ लागला. आता ह्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष करणे राजाला अशक्य झाले. त्याने आपल्या अधिकाऱ्यांना ह्याविषयी चौकशी करण्याचे फर्मान सोडले. चौकशीतून बऱ्याच गोष्टी उघड झाल्या. पिढ्यान्पिढ्या शेती करत असल्याने हिस्से-वाटे होत होत प्रत्येक शेतकरी आता अल्पभूधारक झाला होता. लहान लहान शेते असल्याने तो कापूस व सोयाबीनसारखी मोजकी पिके काढत होता. त्यातही निसर्गाची अवकृपा, पिकांवरील किडीचे वाढते प्रमाण आणि जमिनीचा खालावत चाललेला कस ह्यामुळे तो बेजार झाला होता. व्यसनाधीनतेचे प्रमाण त्यामुळे वाढत चालले होते. आत्महत्या करणारे सर्व शेतकरी कर्जबाजारी होते आणि पतसंस्था आणि सावकार ह्यांनी त्यांच्यामागे वसुलीसाठी तगादा लावला होता.
“ह्या चौकशी अहवालावर राजाने त्याच्या मंत्र्यांशी विचारविनिमय केला आणि सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जबाजारीपणातून बाहेर काढण्याचे ठरविले. त्यांच्यावर असलेल्या कर्जावरील व्याज पूर्णपणे माफ करण्याचे घोषित केले. व्याजमाफीची घोषणा ऐकताच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील आणि आपली उपाययोजना यशस्वी होईल असा राजाला विश्वास होता. परंतु राजाचा हा विश्वास पूर्णपणे फोल ठरला. आत्महत्या थांबण्याऐवजी त्याचे प्रमाण उलट आणखीच वाढले. हे राजन्, तू हुशार आणि विचारी आहेस. तसेच राज्यशकट सुचारू रीतीने चालवण्याचा तुला भरपूर अनुभव आहे. तेव्हा राजा विलासरायची उपाययोजना अयशस्वी का झाली ह्याचे योग्य उत्तर तू मला दे. अन्यथा परिणाम तुला माहीत आहेच. तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायावर लोळू लागतील.’ वेताळाचा प्रश्न ऐकून विक्रमादित्य उत्तरला, “राजा विलासरायने केलेल्या चौकशीवरून हे स्पष्ट होते की शेतकऱ्यांजवळ आता शेतीचे तुटपुंजे तुकडेच उरले होते तसेच मोजक्याच पिकांवर शेतकरी अवलंबून राहत असल्याने पिकांचे वैविध्य कमी झाले होते. परिणामस्वरूप घरची शेती असूनदेखील जेवणाखाण्यासाठी त्यांना अन्नधान्ये, भाजीपाला पैसे देऊन विकत आणावा लागत असणार, शेतावरील कामकऱ्यांनादेखील कामाच्या मोबदल्यात अन्नधान्य न देता पैसे द्यावे लागत असणार. एकचएक पीक वारंवार घेतल्याने जमिनीचा पोत खालावत असणार आणि किडीचा प्रादुर्भाव जास्त होणार. ह्यावर मात करण्यासाठी खते व कीटकनाशके परत पैसे देऊन विकत घ्यावी लागत असणार. आणि इतके सगळे करूनही पीक चांगले आले तर भाव पडणार आणि कमी आले तर भाव चांगला पण मालच नाही अशी परिस्थिती होणार. परिणामी कर्जफेड अशक्य होणार. ह्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना राजाने सहकारी शेती, पीक विमा, आणि आंतरपीकपद्धतीचे ज्ञान देण्याची व्यवस्था करावयास हवी होती. छोट्या शेतांच्या प्रश्नावर सहकारी शेती हा उत्तम उपाय होता. निसर्गाच्या अवकृपेवर पीक विमा योजनेद्वारा मात करता आली असती. तसेच एकच एक पिकाचा सट्टा लावण्यासारख्या शेतकऱ्यांच्या सवयीमुळे त्यांचे होणारे नुकसान म्हणजे किडीचे वाढते प्रमाण व जमिनीचा खालावणारा कस आणि त्यामुळे खते व कीटकनाशकांचा वाढता खर्च ह्यावर आंतरपीक घेऊन लगाम लावता आला असता. आंतरपिके घेतल्याने शेतकऱ्यांचे स्वतःच्या जेवणाखाण्यावर लागणारे पैसे वाचले असते. तसेच पीक वैविध्यामुळे किडींचे प्रमाण कमी होऊन जमिनीचा कस वाढला असता. एकाच पिकाच्या दोन रोपांमधील अंतरात दुसरे पीक घेतल्याने जमिनीचे नियोजन जास्त योग्य प्रकारे होऊ शकले असते. ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान शेतकऱ्याला करून देण्याने तो आपली स्थिती बदलण्यास थोडाफार सक्षम झाला असता परंतु तरीही काही गोष्टी त्याच्या आवाक्याबाहेरच्या होत्या. त्यातील पहिली म्हणजे शेतमालाची विक्रीव्यवस्था आणि मालाला रास्त भाव मिळण्याची हमी. शेतकऱ्याने कितीही उत्पादन केले तरीही विक्रीची व्यवस्था करणे त्याच्या शक्तीपलीकडचे आहे आणि दलालांमार्फत विक्री केल्यास दलालच गबर होत जातात व शेतकरी पिळला जातो, हा सर्वानुभव आहे. त्यामुळे राजाने शेतमालाच्या विक्रीसाठी योग्य व्यवस्था करून द्यावयास हवी होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याचे समाजातील स्थान घसरले होते. राज्यात जसजसे इतर उद्योगधंदे वाढले तसतसे उद्योगात काम करणाऱ्यांचे उत्पन्नदेखील वाढले. ह्याउलट इतरांच्या तुलनेत शेतमालाला रास्त भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दिवसेंदिवस घसरत गेले. आणि उत्पन्नासोबतच त्यांचे समाजातील स्थानदेखील घसरत गेले. आपण जर शेतीच करत राहिलो तर समाजीतल इतर घटकांशी आपण आपल्या आयुष्यात कधीच बरोबरी करू शकणार नाही हे शेतकऱ्यांना पुरते कळून चुकले आणि ते पूर्णपणे नाउमेद व निराश झाले. ह्या निराशेच्या गर्तेतून त्यांना बाहेर पडण्याचा एकच मार्ग शिल्लक राहिला होता. तो म्हणजे कायमची सुटका. राजाने त्यांच्या ह्या निराशेवर उपाययोजना करणे सर्वांत महत्त्वाचे होते. ह्या ठिकाणी संस्कृत सुभाषित आठवतेः
आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृंखला ।
यया बद्धाः प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङ्गुवत् ।।
शेतकऱ्यांच्या जीवनात आशा फुलवण्यासाठी त्यांचे समाजातील गमावलेले स्थान पुनःप्राप्त करून देण्यासाठी राजाने प्रयत्न करावयास हवे होते. त्यासाठी समाजातील इतर घटकांचे प्रबोधन करणे आवश्यक होते. शेतकरी हा आपला अन्नदाता असून त्याच्या मालाला रास्तभाव आपण सर्वांनी मिळून द्यायलाच हवा हे त्यांच्या मनावर बिंबवण्याची आवश्यकता होती. विलासराय राजाने अशी समग्र उपाययोजना करण्याऐवजी व्याजमाफीचा सोपा उपाय निवडला आणि चार पैसे फेकले की पुन्हा स्थिती स्थिरस्थावर होईल अशा भाबड्या आशेवर तो विसंबला. हा उपाय म्हणजे सर्दी झाल्यावर नाक शिंकरण्यासारखा होता परंतु अशा उपायाने सर्दी नाहीशी कशी होणार?
विक्रमादित्याचा अशा रीतीने मौनभंग होताच वेताळ परत झाडावर जाऊन लोंबकळू लागला.
मोहनीभवन, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर.