संपादकीय

जातिव्यवस्थेवरच्या लेखांना आजचा सुधारक ने प्रसिद्धी द्यावी, अशी इच्छा काही वाचक वेळोवेळी व्यक्त करतात. दुसऱ्या टोकाला त्या आग्यामोहोळात हात घालू नये, असे एक मत आहे ! एकूणच भारतीयांना जातींबाबत तटस्थपणे लिहिणे अवघड जाते. लेखांतील एखादे निरीक्षण, एखादा निष्कर्ष, एखादे मत, मान्य करावे की नाही याचा निर्णय बहुतांश वेळी लेखकाची जात पाहून घेतला जातो. हे जातींबद्दलच्या लेखांबद्दल नव्हे, तर साहित्यासकट सर्व प्रकाशित मजकुराबद्दल घडत असते. हे अर्थातच विवेकी नाही.
लॅन्सी फर्नाडिस आणि सत्यजित् भटकळ यांचे The Fractured Civilisa-tion : Caste in the Throes of Change (भारतीय जनवादी आघाडी, १९९९) हे पुस्तक जातिसंस्था, तिच्यातले बदल, तिचे परिणाम, यांच्याबद्दलचा एक महत्त्वाचा दृष्टिकोण मांडते. सोबतच ते पुढील चर्चा व कृतीबद्दलही खुल्या मनाने मार्ग सुचवते. त्याचा सुलभीकृत संक्षेप आजचा सुधारक देत आहे.
प्रतिक्रिया येतीलच त्या याव्याच. पण लेखकांना विनंती आहे की संक्षेपाने व साक्षेपाने लिहावे, वैयक्तिक बाबींचा उल्लेख टाळावा, पत्रांचे आणि चर्चात्मक लेखांचे संपादन-संक्षेपण हा अपमान मानू नये. विषय महत्त्वाचा आणि ‘नाजुक’ आहे. वास्तविक हे सारे लिहिण्याची गरज नाही. आपल्या मासिकाची प्रकृती लेखकांच्या परिचयाची आहेच.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.