खैरलांजीः मला जे आढळले

खैरलांजी येथे २९ सप्टेंबर रोजी झालेले भीषण हत्याकांड व त्यानंतर उसळलेल्या हिंसक आंदोलनाबाबत जनतेसमोर खरी माहिती आली नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. पोलिसांनी वेळीच प्रतिबंधक कारवाई केली असती तर कदाचित ती मानवतेला काळिमा फासणारी घटना टळली असती. स्वार्थी राजकारण करणाऱ्यांनी जनतेसमोर वस्तुस्थिती मांडली असती तर हिंसक आंदोलने झाली नसती. हिंसक आंदोलनांत भरकटलेल्या युवकांचे होणारे नुकसान बघून राहवले नाही म्हणून मी स्वतः वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी खैरलांजीला भेट दिली, माहिती घेतली, विचारपूस केली. सामाजिक हिताच्या दृष्टीने जनतेसमोर सत्य मांडणे माझे कर्तव्य समजतो.
खैरलांजी हत्याकांड घडण्याचे प्रमुख कारण जातीय, सामाजिक व आर्थिक व्यवस्था व कायद्याची मुळीच भीती नसणे हे आहे. गेल्या काही वर्षांत भोतमांगे कुटुंबीयांनी आपल्या अथक परिश्रमाने शेतीचे उत्पन्न वाढविले होते. इतर गावकऱ्यांनी बरेच अडथळे आणण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना धुसाळा येथील पोलीस पाटील सिद्धार्थ गजभिये यांनी नेहमी मदत केली म्हणून भोतमांगे समर्थपणे मुकाबला करू शकले. त्यांनी आर्थिक प्रगती केली, इतकेच नव्हे तर आंबेडकरांनी दाखविलेल्या मार्गाने जाऊन चांगले शिक्षण घेतले. एक मुलगा पदवीधर होता. प्रियांका अत्यंत हुशार होती. वर्गात सर्वप्रथम होती, एन.सी.सी.मध्ये होती व सैन्यदल किंवा पोलिसांत जाण्याची तयारी करत होती. सुंदर व स्वाभिमानी होती. त्यांची आर्थिक व शैक्षणिक प्रगती व स्वाभिमानाने वागणे इतरांना सारखे सलत होते. गजभिये हे सधन शेतकरी आहेत. त्यांच्या शेतावर तथाकथित सवर्ण महिलांना मजुरीने काम करावे लागत होते. शेतीचा जुना वाद तर होताच. ज्या घटनेचा अंत भीषण हत्याकांडात झाला तो घटनाक्रम खालीलप्रमाणे आहे.
३ सप्टेंबर रोजी गजभिये खैरलांजी येथे आले असताना सुकरू बिजेवार याने त्याच्या बायकोचे मजुरीचे पैसे मागितले. गजभिये यांनी इतर गावकऱ्यांसमक्ष त्याला अपमानित केले व मारहाण केली. त्यानंतर गजभिये त्यांचे घरी जाण्यास निघाले असता वाटेवर त्यांना बिजेवार व इतर पंधरा गावकऱ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. भोतमांगे कुटुंबीय त्यांच्या मदतीला गेले व त्यांनी गजभिये यांचा जीव वाचविला. गजभिये यांना कामठी येथे खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले व कामठी पोलिसांना माहिती देण्यात आली. वास्तविक कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आंधळगाव पोलीस स्टेशनला पाठविणे आवश्यक होते, पण तसे न करता त्यांनी १२ सप्टेंबरला कागदपत्रे भंडारा येथे पाठविली. १६ सप्टेंबरला आंधळगाव पोलिस स्टेशनला भारतीय दंड विधानाच्या अनेक कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. २१ सप्टेंबरला अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करता येईल का, या अभिप्रायासाठी कागदपत्रे शासकीय अभियोक्ता यांच्याकडे पाठविण्यात आली. २५ सप्टेंबरला त्यांनी नागरी हक्क संरक्षण कायदा लागतो असे मत दिले. २९ सप्टेंबरला उपनिरीक्षक भरणे यांनी सदर कलम लावले. त्याच वेळी १२ आरोपींना अटक करून मोहाडी न्यायालयात पाठविले. त्यांची लगेच जामिनावर सुटका झाली. त्यांची पोलीस कस्टडी घेण्याची किंवा जामीन न होण्याची काळजी घेतली गेली नाही. आरोपी गंभीर गुन्हा करतील याची कल्पना असतानादेखील त्यांना अटक करून प्रतिबंधक कारवाई केली गेली नाही. जामिनावर सुटल्यावर आरोपी दिलीप ढेंगे यास आरोपी भास्कर कडव याने मोबाईलवरून कळविले की, पोलीस पाटील गजभियेचा भाऊ राजेंद्र व इतरजण वाटेवर कांद्री येथे थांबले आहेत व गोंधळ करीत आहे.
त्यापूर्वीच आमदार मधुकर कुकडे यांनी माहिती दिली की, राजेंद्र गजभिये चार-पाच गुंड साथीदारांसह क्रांद्री येथे उपद्रव करीत आहे म्हणून हेड कॉन्स्टेबल मेश्राम व स्टाफला तिथे पाठविण्यात आले. मेश्राम यांनी काही कारवाई न करता त्याला जाऊ दिले व ते परत आले. त्याच दरम्यान हत्याकांडातील आरोपी ट्रॅक्टरने खैरलांजी येथे गेले व त्यांनी संध्याकाळी सात वाजल्यापासून अत्यंत क्रूरतेने, मानवतेला काळिमा फासणाऱ्या पद्धतीने अमानुष हत्याकांड घडविले. भोतमांगे यांच्या घरावर हल्ला झाला, त्या वेळी सुरेखा भोतमांगे हिने मोबाईलवरून गजभिये यांना माहिती दिली. त्यांनी पोलिस स्टेशनला माहिती दिली व त्यावरूनच मेश्राम व स्टाफला जीपने खैरलांजी येथे पाठविले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मिळालेल्या माहितीबाबत स्टेशन डायरीत कोणतीही नोंद घेण्यात आलेली नाही. उलट भरणे यांनी ३ सप्टेंबरच्या घटनेतील आरोपी गंभीर गुन्हा करण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधक कारवाई करण्याची स्टेशन डायरीला नोंद केली आहे.
३० सप्टेंबरच्या सकाळी पाचच्या सुमारास भैय्यालाल भोतमांगे गावात परत आला. त्याला घराचे दार तोडलेले आढळले, पण घरात कुणीच आढळले नाही. नातेवाईकांकडे शोध घेऊन तो पोलिस स्टेशनला गेला, पण दाद घेण्यात आली नाही. सकाळी १०.४५ च्या सुमारास वडेगाव कॅनालमध्ये एका मुलीचे प्रेत असल्याची माहिती मिळाली असता भैय्यालाल सोबत तिथे गेले. प्रेत प्रियांका भोतमांगे हिचे होते. प्रेत मरणोत्तर तपासणीसाठी मोहाडी येथे नेण्यात आले. एसीआय बडवाईक यांनी प्रेताचा पंचनामा केला. अंगावर अनेक जखमा दिसत होत्या. प्रेत विवस्त्र होते तरी बलात्कार झाला किंवा नाही याबाबत डॉक्टरकडे विचारणा करण्यात आली नाही. महिला डॉक्टर बांते या प्रेत पाहताच तेथून निघून गेल्या. डॉ. शेंडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या सूचनेनुसार महिला डॉक्टरसाठी न थांबताच शवविच्छेदन केले. Vaginal Swabs घेतले नाहीत. बलात्कार झाला किंवा नाही हे पाहिलेच नाही. रात्री गुन्हा अनेक कलमांखाली व अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर घटनेबाबत सुरेश सागर, प्राचार्य, अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र, नागपूर (यांच्याकडे पोलीस अधीक्षक, भंडारा हा अतिरिक्त कार्यभार आहे) यांना संध्याकाळी नागपूर येथे ही माहिती मिळाली. त्यांनी त्वरित भोतमांगे कुटुंबातील इतर तीन व्यक्तींचा शोध घेणे, आरोपींना अटक करणे व गावात बंदोबस्त यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ पाठविले. तसेच पोलीस निरीक्षक राजन पाली व त्यांचा चमूदेखील तपासात मदत करण्यासाठी पाठविला. गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुसतकर करीत होते. त्याच रात्री २८ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना १ ऑक्टोबरच्या सकाळी अटक करण्यात आली. १ ऑक्टोबरला इतर तीन्ही प्रेते (सुरेखा, सुधीर व रोशन) मिळाली. त्यांची मरणोत्तर तपासणी डॉ. शेंडे यांनी केली. त्या वेळी महिला डॉक्टर बांते हजर होत्या. त्यांनी सुरेखाची तपासणी केली होती, पण सहभाग दाखविला नाही. मरणोत्तर तपासणी अहवालावर त्यांची स्वाक्षरी नाही.
गुन्ह्याचा तपास ९ ऑक्टोबरपासून राजूरकर, उपविभागीय अधिकारी पवनी यांच्याकडे देण्यात आला. तपास सुरेश सागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला असताना एकंदरीत ४४ आरोपींना, ज्यात दोन महिलांचा समावेश आहे, अटक करण्यात आली. अजूनही कुणालाच जामीन मिळालेला नाही. घटनास्थळावरील पुरावे, प्रेत कालव्यात टाकले त्या ठिकाणचे रक्ताचे नमुने, गुन्ह्यात वापरलेल्या आठ सायकल चेन, पाच काठ्या, ट्रॅक्टर, बैलगाडी, मोबाईल फोन, आरोपी व मयतांचे कपडे जप्त करण्यात आले आहेत. चार साक्षीदारांचे न्यायालयाने जवाब नोंदविले आहेत. झेश्रसीरहिशीं घेण्याची प्रक्रियाही सरू करण्यात आली होती. पण हिंसक आंदोलने झाल्याने व तपास सीआयडीला देण्याची मागणी पुढे आल्याने ७ नोव्हेंबरपासून तपास सीआयडीकडे देण्यात आला. त्यांनी सरपंच व उपसरपंच तसेच पोलीस उपनिरीक्षक भरणे यांना अटक केली. आंदोलने सुरूच राहिल्याने व सीबीआय चौकशीच्या मागणीप्रमाणे तपास १ डिसेंबरपासून त्यांच्याकडे देण्यात आला आहे व ते चांगल्याप्रकारे तपास करीत आहेत. त्यावरून ९० दिवसांत खटला न्यायालयात पाठवतील अशी खात्री वाटते. भरणे व मेश्राम यांना अटक करण्यात आली आहे. हेड कान्स्टेबल शहारे यास स्टेशन डायरीत नोंदी न घेण्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. तसेच डॉ. शिंदे, डॉ. बांते, डॉ. रामटेके यांनादेखील निलंबित करण्यात आले असून कारवाई सुरू आहे. वास्तविक पाहता गुन्ह्याचा तपास सीआयडी किंवा सीबीआयकडे देण्याची आवश्यकता नव्हती.सागर यांना योग्य सहकार्य देऊन पोलीसच चांगल्या प्रकारे तपास करू शकले असते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, दलितांच्या मुक्तीसाठी सवर्ण समाजात जन्मलेले तेजस्वी तरुण जेव्हा रक्त सांडायला तयार होतील, तेव्हाच माणुसकीचा भारत निर्माण होईल, दलित अन्यायातून मुक्त होतील व सवर्ण जातीय वर्चस्वाच्या जाणिवेतून मुक्त होतील.
खैरलांजी हत्याकांडानंतर घडलेल्या घटनांनी बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांची सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. दलितांचा इतरांनी वापर केला काय ? भंडारा येथे बऱ्याच दलित पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुका झालेल्या असतानादेखील खैरलांजी प्रकरण का घडले ? पोलिसांतील वरिष्ठ पातळीवरील भ्रष्टाचार व राजकारण कितपत जवाबदार आहे ? खैरलांजी प्रकरणामुळे समता, बंधुता व न्याय समाजात निर्माण होण्यासाठी काय करावे याची चर्चा व्हावी.
[फर्नाडिस व भटकळ ह्यांच्या तात्त्विक मांडणीसोबत प्रत्यक्षात भारतात जातिव्यवस्थेचे परिणाम किती खोलवर जातात, हे दाखवणारा श्री सुराडकर यांचा लेख (लोकसत्ता २१ डिसेंबर ०६) देत आहोत. सं. ]

निवृत्त पोलिस महानिरीक्षक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.