विषमता की विविधता?

ऑलिव्हर जेम्स हा ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ माणसांच्या मूलभूत भावनिक गरजांवर विचार करत होता. शरीरांसाठी अन्न, वस्त्र, निवारा या जशा मूलभूत गरजा, तशा मनांसाठी कोणत्या ? जेम्सची यादी चार एकमेकांशी निगडित भावनांची आहे. पहिली गरज आहे स्वतःला सुखवस्तू मानता येण्याची. आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व वस्तू आपल्याला उपलब्ध आहेत, असे वाटणे गरजेचे असते. इथे प्रत्यक्षात गरजेच्या वस्तू आहेत की नाहीत हे महत्त्वाचे नाही, तर त्या आहेत अशी भावना महत्त्वाची आहे. दुसरी गरज आहे, ती स्वतःला आजूबाजूच्या समूहाचे आपण एक अंग आहोत असे वाटण्याची. आपण जगण्याची क्रिया सक्षमपणे, स्वायत्तपणे आणि सच्चेपणाने पुरी करतो आहोत असे वाटणे, ही तिसरी गरज. आणि चौथी गरज आहे आपले आपल्या नियतीवर, भविष्यावर, काही प्रमाणात तरी नियंत्रण आहे असे वाटण्याची. सगळ्याच बाबतीत भावना महत्त्वाची आहे, वास्तविक परिस्थिती नव्हे.
जेम्सची ही यादी सर्वांना पटेलच असे नाही. वेगळ्या मांडण्या, वेगळ्या गरजा सुचतीलही. पण जेम्स मानतो की ज्या लोकांमध्ये या चार भावना रुजलेल्या नसतात ती माणसे भावनिकदृष्ट्या गरजू, ‘कुपोषित’ असतात. पहिलाच मुद्दा पाहू. आपल्या गरजेच्या वस्तूंची यादी मनात घडवून त्या सर्व वस्तू आपल्यापाशी आहेत की नाहीत हे ठरवणे सोपे नाही. एकीकडे एक ‘केवल’, रलीश्रींश यादी घडवता येते. दुसरीकडे आसपासच्या लोकांकडे कायकाय आहे, ते पाहून यादी ठरवता येते. बहुतेक वेळा मधली काहीतरी यादी घडते, व ती मनाला सुखवस्तूपणाचा अर्थ पुरवते. सुमारे इ.स.पूर्व आठनऊ हजार साली खाजगी मालमत्तेची संकल्पना माणसे वापरू लागली. सोबतच इतरांशी तुलनाही आलीच. या काळानंतरच्या दफन केलेल्या प्रेतांसोबत मृत व्यक्तीच्या मालकीच्या वस्तू सापडतात, आणि अशा वस्तूंबाबत व्यक्तीव्यक्तींमध्ये फरक दिसतो. या आधी दफने आहेत, पण वस्तू नाहीत. बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये वस्तूंच्या आधाराने अभिजन (elite) आणि इतर असे विभाजन दिसते. ‘इतरां’पाशी वस्तू नसत. तुलनात्मक सुखवस्तूपणा मानण्याचा भाव अभिजनांमध्ये मात्र स्पष्ट दिसतो. तो त्या वर्गापुरताच असणार. इतर लोक या वस्तूंसाठीच्या स्पर्धेत उतरत नसत.
जेम्सच्या मते इ.स. १९७० नंतर हे बदलू लागले आहे. त्याने ब्रिटनमध्ये एक सर्वेक्षण केले. कळीचा प्रश्न होता, “तुमच्या गरजा पूर्ण करण्याइतपत वस्तू घेणे तुमच्या उत्पन्नात शक्य होते का?’ हा प्रश्न अनेकांना विचारून उत्तरांचा अभ्यास केला गेला. दोन-तृतीयांश लोकांना आपण गरजेच्या वस्तू कमावू शकत नाही असे वाटत होते. ब्रिटनमधले सरासरी वार्षिक उत्पन्न सुमारे २२,००० पाऊंड आहे. (पण कुटंबाचे की व्यक्तीचे हे स्पष्ट नाही). ज्यांचे उत्पन्न ३५,००० पाऊंडापेक्षा जास्त आहे, अशामध्येही अर्ध्या लोकांना आपण सुखवस्तू नाही असे वाटत होते. अगदी ५०,००० पाऊंडांवरचे उत्पन्न (टीव्ही-डीव्हीडी प्लेअर, मोबाईल फोन, मोटरकार तर अध्याहृतच!) अशा लोकांपैकीही चाळीस टक्के लोकांमध्ये स्वतःला सुखवस्तू मानण्याची गरज पूर्ण होताना दिसली नाही. जेम्सला वाटते की पछाडल्यासारखी, obsessively इतरांशी तुलना करत राहण्यातून हे असमाधान उद्भवते. तो या तुलना करत राहण्याच्या वृत्तीला ‘सुबत्तेचा विषाणु’, ॲफ्लूएंझा व्हायरस, affluenza virus, असे नाव देतो. या विषाणूची लागण झालेला रोगी आधी इतरांशी तुलना करून आपण सुखवस्तू नाही असे स्वतःला पटवून देतो. मग ही त्रुटी पूर्ण करायला उत्पन्न वाढवण्याची धडपड सुरू होते. आणखी काहीतरी कृती करून आपले दैन्य हटवायचा प्रयत्न होतो. याचा परिणाम म्हणजे संपर्कात येणाऱ्या सर्व माणसांचे मोजमाप आपल्या ‘करियर’ला पूरक की मारक, यावर ठरवले जाऊ लागते सर्व व्यक्तींना ‘वस्तू’ मानण्याचा प्रकार. याने इतरांबद्दलचा आदर तर कमी होतोच, पण इतर लोकही रोग्याला वस्तू मानू लागतात. मदत देणे, मदत घेणे, हे समूहाला बांधणारे व्यवहार बंद पडतात. म्हणजे सुखवस्तू असणे हा भाव गमावल्याने समूहाचा भाग असण्याचा भावही नष्ट होतो.
यातून कंटाळा, रिकामपण, एकटेपण उद्भवते, आणि हे रितेपण भरून काढण्यास व्यसने जडू लागतात, कधी खाण्यापिण्याची, कधी कामव्यवहाराची, तर कधी ‘वर्कोहोलिक’ कामाची. याने गरजाही वाढतात व तुटलेपणही. आपण आणिकच अक्षम वाटू लागतो, प्रवाहपतित वाटू लागतो, आणि यातून तिसरी भावनिक गरजही तीव्र होते. आपला आपले भविष्य घडवण्यास सक्षम असण्याचा चौथा भावही नष्ट होतो, आणि रोगाची पातळी तीव्रतम होते. . सर्वांचेच मोल वस्तुरूपात, पैशाच्या रूपात केले जात असल्याने स्वतःकडे आणि इतरांकडे आदराने पाहता येत नाही. वस्तूंचे मोल वस्तू स्वतः ठरवत नाही ते काम बाजारपेठेचे असते. या विकारी मूल्यव्यवस्थेचे मूळ जेम्सच्या मते अर्थव्यवस्थेच्या एका दुष्ट अंगात आहे. या अंगाला जेम्स स्वार्थी भांडवलवाद, Selfish Capitalism म्हणतो.
जेम्सच्या मते हा सुबत्तेचा विषाणू आज जगभरातील इंग्रजी भाषक माध्यमवर्गात सार्वत्रिक झाला आहे. टाईम नियतकालिकातील श्रीमंतांच्या नाराजीबाबतच्या ‘लेट अस नाऊ प्रेज रिझेंटफुल मेन’, ‘आता आकसखोर, नाराजांची स्तुती करू या’ या लेखात (४ डिसें. ०६) अमेरिकेतल्या लागणीचे वर्णन केले आहे. सात अंकी पगारदारांना नऊ अंकी उत्पन्न असलेल्यांबद्दलच्या आकसाचे त्यात वर्णन आहे. भारतातही इंग्रजी-भाषक मध्यमवर्ग मोठा आहे. पण रोग भाषेने किंवा वर्गाने सीमित असलेला दिसत नाही.
काही महिन्यांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील (कुपोषण, बालमृत्यू, नक्षलवाद) आदिवासी तरुणांना त्यांच्या आस्थेच्या विषयांबद्दल बोलायला लावणाऱ्या एका सभेत हजर राहायची संधी मिळाली. आस्थाविषय दोन होते क्रीडा-नृत्य-संगीतस्पर्धांचे आयोजन आणि मुरमाच्या पुटकुळ्या (pimples). उघडपणे दोन्ही मुद्द्यांमध्ये ग्रामपंचायतीत व धाब्यांवर गर्दी करून पाहिलेल्या दूरदर्शन कार्यक्रमांचा सहभाग होता.
हे अटळ आहे. एकदा का भांडवली अर्थव्यवस्था मान्य केली, आणि तीवरच्या सामाजिक नियंत्रणाला अनिष्ट मानणे सुरू झाले, की हे सर्व आलेच. विषमता आली, तुलना आली, सुबत्तेचा विषाणूही आला, आणि तो समाजाच्या सर्व थरांमध्ये पोचलाही. गेल्या (मार्च २००७) अंकात सुभाष आठले यांचे एक पत्र आहे. ते म्हणतात की ‘‘गरिबी हा शत्रू आहे, विषमता हा शत्रू नाही.” विषमतेशिवाय गरिबी असेल का ? नेहेमीच ‘शत्रुपक्षा’त विषमता गरिबीला साथ देणार. त्या दोन बाबी एकमेकांच्या अविभाजनीय सहप्रवाशांच्या रूपातच असणार. असे घडून नको असेल तर विषमतेवर अंकुश हवाच. तसा अंकुश, तसे नियंत्रण जर नसेल, तर साधा भांडवलवाद सहजच स्वार्थी भांडवलवादात परिवर्तित होईल. भारतात आज काही प्रमाणात भ्रष्टाचाराच्या माध्यमातून हे होत आहे.
आठले सांगतात, “मूलतः विषमता वाढत जाणे हाच निसर्गाचा नियम आहे, तेच उत्क्रांतीचे सूत्र आहे.” निसर्गात वाढत जाते ती विविधता. तिला विषमता मानणे हा मूल्यविचार झाला, जो निसर्गात मुळीच नाही. आणि अर्थातच वाढती विषमता हे उत्क्रांतीचे सूत्र असू शकत नाही. एकाच जीवजातीतल्या व्यक्तींमध्ये विविधता दिसते. भोवतालच्या परिस्थितीच्या कसोटीवर काही व्यक्ती जगण्यात आणि मागे प्रजा ठेवण्यात सक्षम असतात, तर काही व्यक्ती अक्षम असतात. हा सक्षम-अक्षम फरक नेहेमीच परिस्थितिसापेक्ष असतो. त्याचे वर्णन आपण परिस्थितीशी अनुरूप असणे किंवा नसणे, असे करतो. हे खरे तर गुणांचे वर्णन असते, व्यक्तीना महत्त्व ‘गुणांचे वाहक’, येवढेच असते. जर परिस्थिती फारशी बदलत नसेल तर जगण्यासाठी, जास्त प्रजा मागे ठेवण्यासाठी उपयुक्त गुण असलेल्या व्यक्तींच्या प्रजेचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण पिढी-दर-पिढी वाढत जाईल. त्यांचे परिस्थित्यनुरूप गुण एकूण जीवजातीच्या गुणसंचाचा भाग बनतील. ‘उत्क्रांती’चा अर्थ केवळ येवढाच आहे. त्यात विषमतेचा भाव नाही, वैविध्य आहे.
जेव्हा माणसांची उत्क्रांती थांबते आहे असे सांगितले जाते, तेव्हा त्यात मूल्यविचार असतो. परिस्थितीशी अनुरूप असलेल्या व्यक्ती ‘सबळ’, तसे नसतील त्या ‘दुर्बळ’ ; आणि आजची समाजवादी विचारसरणी दुर्बळांना तगवत सबळांच्या तोंडचा घास हिरावून घेते आहे, असा भाव उत्क्रांती थांबवण्याच्या मांडणीत असतो ठामपणे मूल्याधारित आणि निसर्गव्यवहारात न दिसणारा. उत्क्रांती लोकसंख्येतील गुणसंचांमध्ये दिसते, व्यक्तींमध्ये नाही. एक कारण असे की ‘व्यक्ती’ कशाला म्हणावे, ते ‘एकक’, पिळीं मानावे की नाही, हे ठरवणे सोपे नसते. उदाहरण पाहू, वाळवी, उधई, termites या जीवजातीचे. एका वारुळात एकच राणी-कीटक पिल्ले देत असतो. त्या पिल्लांपासून संगोपनाच्या फरकामुळे तीनचार प्रकारचे वाळवी-कीटक बनतात; भविष्यातील राजेराण्या, कामकरी आणि लढवय्ये. निसर्गनिरीक्षकांना वाटायचे की कामकरी आणि लढवय्ये यांना तर पिल्लेच होत नाहीत. मग ते कीटक घडण्याचा गुण पुढच्या पिढ्यांमध्ये जातो कसा ? पुढे जाणवले की वाळवीचे कीटक यांना व्यक्ती मानणेच गैर आहे. संपूर्ण वारूळ ही एक व्यक्ती असते. राणी हे तिचे जननेंद्रिय, आणि कामकरी-लढवय्ये हे हातापायांसारखे अवयव. आपण माणसांमध्ये लिंग आणि योनीच प्रजनन करतात; हातपाय, मेंदू, हृदय, वगैरे मात्र भाकड, वांझोटे असतात, असे म्हणत नाही; त्याचप्रमाणे कामकरी लढवय्ये वांझोटे मानणेही चुकीचे आहे. सर्व ‘सामाजिक’ जीवांबाबत अशा चुका संभवतात. व्यक्ती कोणाला मानावे, हेच गोंधळवणारे असते. मग व्यक्तींमध्ये सबळ दुर्बळ ठरवणे कसे शक्य होईल ? ती चर्चा गुणपातळीवर, जीनपातळीवरच करावी लागणार!
उत्क्रांती थांबण्याची कल्पना मांडणारे थोडक्यात असे म्हणत असतात की “जगी जे दीन अतिपतित/ जगी जे हीन पददलित” तयांना जाऊन उठवू नये. मरू द्यावे. याला ‘सामाजिक डार्विनवाद’, डेलळरश्र रीळपळी, असे नाव आहे. हर्बर्ट स्पेन्सरने डार्विनच्या उत्क्रांतीच्या मांडणीचा चुकीचा अर्थ लावल्याने तो ‘वाद’ उपजला. आणि त्याच्या आवृत्त्या या ना त्या रूपात आजवर प्रसृत होत असतात. पण जर सुटा माणूस ही व्यक्ती नसून मानवी समाज, हेच एकक असेल तर ?
एक पाहावे, जर मागे जास्त प्रजा ठेवणे हे सबळ असण्याचे लक्षण असेल, तर स्त्रीला रजोनिवृत्ती, (menopause) येणे, हे गैर आहे. खरे की काय ? इतर कोणत्याही जीवापेक्षा मानवामध्ये मादीला (स्त्रीला) गर्भारपणात व आई-बाळांना नंतरची अनेक वर्षे मदत लागते. माणूस सोडून कोणत्याही कपीत बाप आई-बाळांना मदत करत नाही. ना संरक्षण पुरवत, ना संगोपनात मदत करत. माणसांमध्ये मात्र बाप अशी मदत करतो. आज मानवेतर कपी, गोरिला, चिंपांझी, बबून, ओरांग उटान या साऱ्यांच्या बेरजेपेक्षा कैकपट (बहुधा कैक लक्षपट) माणसे पृथ्वीवर आहेत. या ‘जनन-यशा’चा reproductive success चा संबंध ठामपणे माणसांमध्ये बापाने आई-बाळांना मदत करण्याशी लावला गेला आहे. पण हेही पुरत नाही. आया म्हातारपणीही जनत आहेत, पण मुलांचे रक्षण संगोपन मात्र त्यांना झेपेनासे झाले; हे माणसांमध्ये झालेले नाही. कारण मानवी माद्या रजोनिवृत्त होतात. आज्या नातवंडांची काळजी घेऊ शकतात, कारण त्या ‘फळणे’ थांबते. हे माणसांमध्ये घडते, इतर कोणत्याही कपीत घडत नाही. आता आजी-आई-बाळ-बाप ही ‘व्यक्ती’ स्वतःच्या प्रजननाच्या, मागे प्रजा ठेवण्याच्या बाबतीतल्या यशापयशात गुंतलेली दिसते.
याच अंकात माधव गाडगिळांचा सकाळ (१६ जाने. ‘०७) मधून पुनःप्रकाशित लेख आहे. ‘गोष्ट माणसाची, सांस्कृतिक उत्क्रांतीची’ नावाचा. त्यातले एक वाक्य इथे पुन्हा नोंदतो, “प्राणिजगतात केवळ दोन टक्के जाती समाजप्रिय आहेत; पण या मुंग्या – वाळवी-हत्ती-माणसांनी आज भूतलावर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले आहे !”.एकूण लेख ठसवतो की स्पर्धा-संघर्षा इतकेच निसर्गव्यवहारात सहकार्या लाही महत्त्व आहे ‘दुबळ्यांना मदत करायलाही महत्त्व आहे. विविधता जोपासली जायला हवी, विषमता नाही.
का जोपासायची विविधता ? परिस्थिती अचल नसते. ती बदलत जाते. आज परिस्थितीशी जुळते असणारे गुण उद्या तसे असतीलच याची खात्री नाही. त्यावेळी जगवणारे गुण आज दुर्बळ वाटणाऱ्यांमध्येही असू शकतील. एक पाहावे नैसर्गिक तृणधान्यांच्या सर्व बिया एकाच वेळी अंकुरत नाहीत. एखादे वर्ष कमी पावसाचे असले तरी नैसर्गिक तृणधान्ये जीवजात म्हणून मरत नाहीत. काही बिया तरी एखादा मौसम न अंकुरता पुढच्या मौसमात अंकुरतात. माणसांनी मात्र शेतीच्या सोईसाठी एकाच वेळी अंकुरणाऱ्या बिया निवडल्या. उत्पादनाच्या दृष्टीने हे योग्यच होते. पण सोबतच कधीमधी दुपार-तिबार पेरणी करावी लागणार, यासाठी ज्यादा बियाणे धरून ठेवणे गरजेचे झाले. सर्व बियाणांचा जोम काही पिढ्यांत आटतो, यासाठी अधूनमधून ‘रानटी’ बियांशी संकर करणेही गरजेचे झाले आणि त्यासाठी विविध रानटी बियाणांची ‘ग्रंथालये’ उभारणेही आलेच. एकूणच जैवविविधतेविषयी माधव गाडगीळ व नीलेश हेडा यांचा ‘जैवविविधता दस्तावेज एक तुतारी’ हा समाजप्रबोधन पत्रिका (ऑक्टो.डिसें.२००६) मधील लेखही जिज्ञासूंनी वाचावा.
थोडक्यात म्हणजे निसर्गात विविधता आहे, विषमता नाही. विविधता जोपासणे अत्यावश्यक आहे. विषमता मात्र तुलनांना आणि त्यापासून सुरू होणाऱ्या अनेकानेक व्यक्तिगत व सामाजिक ताणतणावांना जन्म देते. यामुळे विषमता आटोक्यात ठेवणे अत्यावश्यक आहे. यात गरिबी कमी करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच श्रीमंतीवर मर्यादा घालणेही. नाहीतर ऑलिव्हर जेम्सने ‘ओळखलेला’ ॲफ्लूएंझा व्हायरस पुढ्यात आहेच. जेम्सच्या आगामी पुस्तकातील काही उतारे द टेलेग्राफ, लंडन, या नियतकालिकाने प्रकाशित केले. त्यावर आधारित ‘अॅफ्लूएंझा अॅलर्ट’ हा लेख टाईम्स ऑफ इंडिया ने (१४ जाने. २००७) प्रकाशित केला. पण चटपटीत नाव देणे सोडता विषमता, तुलना, मत्सर, यांचा घातकपणा जेम्सच्या आधीही माहीत होताच. सामाजिक डार्विनवाद उपजला तो डार्विनच्या तटस्थ, मूल्यनिरपेक्ष, निरीक्षणांवरच बेतलेल्या उत्क्रांतीच्या वर्णनावर मूल्यविचारांचे कलम केल्यामुळे. त्याला काही काळ विचारवंतांचा आधारही लाभला, कारण तो साम्राज्यवादाच्या बहराचा काळ होता. त्या ‘वादा’ला विज्ञानाचे आधार हवे होते, भलेही ते विकृत मांडणीतून उभारलेले असोत.
जागतिकीकरण खरे तर जागतिकीभवन हा तसा ‘वाद’ नाही. पण ती प्रक्रिया विषमतेला तीव्र करतेच. तुलनेने गरीब समाज त्या प्रक्रियेचे आपल्यावर होणारे दुष्परिणाम टाळायला धडपडणारच. हे ‘जागतिकीभवनाला विरोध’ अशा रूपात व्यक्त होणारच. हा विरोध पुरेसा सबळ झाला तर जागतिकीभवनातला विषमता वाढवणारा भाग नियंत्रित ठेवायचे मार्ग सुचतील. हे घडावे, असे माझे, माझ्या मते विवेकी मत आहे.
अतिश्रीमंतीबद्दल एक प्रश्न विचारतो. गेल्या वर्षी आयायएम (IIM) या व्यवस्थापन-विद्यालयातून पदवी घेणाऱ्यांपैकी काहींचे भारतातले ‘पहिले’ उत्पन्न महिना दोन लक्ष, वर्षाला चोवीस लक्ष, इतके होते सरासरीच्या शेसव्वाशेपट. आता इतर शेसव्वासे माणसांइतके समाजाला उपयुक्त काम हे ताजे, अननुभवी तरुण करतील, हा विश्वास कशातून येतो? हा निर्व्याज, साधा भांडवलवाद आहे, की भटकळ-फर्नाडिस यांनी नोंदलेला बांडगुळी भांडवलवाद, की जेम्सचा स्वार्थी भांडवलवाद?
नंदा खरे

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.