गोष्ट माणसाची, सांस्कृतिक उत्क्रांतीची

जीवन म्हणजे ‘एकमेकां साह्य करूं अवघे धरू सुपंथ’ असा सहयोगाचा प्रवास आहे ? का जीवन म्हणजे एक संघर्ष आहे ? एकमेकांचे गळे कापत ही यात्रा सुरू आहे ? जीवसृष्टीच्या इतिहासाच्या, उत्क्रांतीच्या अभ्यासकांपुढे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जीवनात नक्कीच सहकारही आहे. संघर्षही आहे. नेहमी संघर्षाबद्दल खूप बोलले जाते; पण जीवशास्त्राचे ज्ञान जसजसे सखोल होत चालले आहे, तसे उघड होत आहे, की मोठ्या प्रमाणात जीवन हा एक सहकारी उपक्रम आहे. उत्क्रांतीच्या वाटेवर जीवन सतत विस्तारत जाते, नवी नवी संसाधने वापरू लागते, वैचित्र्याने नटत राहते. याबरोबरच जीवनाची जडण-घडण, परस्परसंबंध अधिकाधिक गुंतागुंतीचे बनत जातात. याला तोंड द्यायला जीवजंतूंना अधिकाधिक जटिल माहिती हाताळायला लागते. हे करायला ते शिकतात संघर्षाच्या आह्वानांमुळे ; पण सहयोगाच्या आधारावर. उत्क्रांतीतील प्रत्येक महत्त्वाच्या परिवर्तनामागे सहकार, सहयोग आढळून येतो. साडेतीन-चार अब्ज वर्षांपूर्वी जीवनाची सुरुवात झाली काही विवक्षित रेणूंपासून. हे रेणू ‘आपुल्यासारिखें करिती तत्काळ’ या पंथातले होते. स्वतःच्या प्रती बनवण्यात तरबेज होते; पण अशा प्रती बनवण्याचा वेग वाढवायला त्यांना दुसऱ्या प्रेरक रेणूंची मदत हवी असते. एकमेकांना साह्य करणारे असे हे रेणू एकत्र आले की त्यांचा एक सहकारी कंपू बनतो. अशी सहकारी सुचक्रे जेव्हा आदि-पेशीत समाविष्ट झाली, तेव्हा झाली जीवनाची सुरुवात.
आरंभी हे सहकारी चक्रातले रेणू एकाच पद्धतीचे होते. ‘आरएनए’ वर्गातले होते. हे रेणू पुनरुत्पादनासाठी जरूर असलेली माहिती पुरवत होते आणि पुनरुत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी आवश्यक असलेली प्रेरणाही देत होते. पण एकाच वर्गातील रेणूंना ही दोन्ही कामे सफाईने जमणे अवघड होते. तेव्हा उत्क्रांतीच्या पुढच्या पावलात या दोन भूमिकांची श्रमविभागणी होऊन एक नवीनच सहकारचक्र निर्माण झाले. माहिती सांभाळण्याची, सूचकाची भूमिका ‘आरएनए’च्या दादांनी, ‘डीएनएं’नी स्वीकारली, तर रासायनिक प्रक्रियांचा वेग वाढवायचे, प्रेरकाचे काम प्रथिने (प्रोटीन्स) बजावायला लागले. काही विषाणू सोडले तर गेली अब्जावधी वर्षे सगळ्या जीवसृष्टीचा गाडा ‘डीएनए’ व प्रथिने ह्यांच्या सहकाराच्या चाकांवर पळतो आहे.
पुनरुत्पादन हे तर जीवनाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. आरंभीच्या जीवांची पुनरुत्पत्ती पेशींच्या साध्या विभाजनाने होत होती, पण ही पिल्ले हुबेहूब पितरांसारखी असायची. त्यांच्यात परिस्थितीला अनुरूप बदल व्हायला पुरेसा वाव नव्हता. तेव्हा आनुवंशिक गुण सतत मिसळत राहून परिस्थित्यनुसार बदलत जायला सक्षम अशी एक नवी सहकारी यंत्रणा निर्माण झाली लैंगिक पुनरुत्पादनाची. ही अस्तित्वात आल्यावर जीवसृष्टीचा गाडा आणखीच भरधाव पळायला लागला… नर-मादीच्या सहयोगाच्या चाकांवर. सुरवातीच्या दीड-दोन अब्ज वर्षांच्या काळात सगळे जीवजंतू आकाराने अतिसूक्ष्म, एकपेशीच्या रूपात होते, तरीही ते एकमेकांना मटकवायला पाहायचेच. गंमत म्हणजे, या हिंसेतूनही एक नवी सहकाराची वाट सापडली. भक्ष्य-भक्षकाच्या शरीराचा एक भाग बनून त्यातून नवेच, खास कर्तबगार, आकाराने थोडे मोठे, प्रगत जीव अवतरले. यांतले खाणारे होते ‘आर्चिया’ कुलातले जिवाणू. त्यांनी गिळले ‘पर्पल’ बॅक्टेरिया. आर्चिया प्राणवायू वापरू शकत नव्हते. त्यामुळे त्यांचे आयुष्य मंद गतीने चालायचे. याउलट पर्पल बॅक्टेरियांनी प्राणवायू वापरून जीवन गतिमान बनवले होते. पोटात पर्पल बॅक्टेरिया वागवणारे ‘आर्चिया’ भक्षक पण प्राणवायू वापरू लागले, आणि या युतीतून निर्माण झालेले जीव पटाईत शिकारी बनले. आजची सारी प्राणिसृष्टी या युतीतूनच प्रसवली आहे. याच सुरवातीच्या काळात सूर्यप्रकाशाचा वापर करू शकणारे जिवाणू उपजले होते. या आदि-वनस्पतींचे नाव होते सायनोबॅक्टेरिया. हे सायनोबॅक्टेरिया गिळले दुसऱ्या आर्चियांनी आणि या युतीतून प्रसवली आजची सारी वनस्पतिसृष्टी. अशा रीतीने पेशींनी पेशींना गिळून, एका अनोख्या सहकारातून प्रगत जीवसृष्टीची उत्क्रांती झाली.
आता सहकाराचा पुढचा टप्पा आला पेशी-पेशींच्यातल्या श्रमविभागणीचा आणि वेगवेगळ्या भूमिका बजावणाऱ्या पेशींच्या सहकार्याचा. यातून उद्भवले बहुपेशी प्राणी, वनस्पती, आळिंबे. हे आकाराने एकपेशीजीवांच्या हजारो-लाखो-कोट्यवधी पट वाढले आणि या राक्षसांनी सारे जग पादाक्रांत केले. याचा अर्थ एकपेशीजीव नामशेष झाले असा नाही. ते तर तगून राहिलेच. एवढेच नव्हे तर त्यांनी बहुपेशी जीवांबरोबर नवे नवे संबंध जोडले. हे संबंध कधी आहेत शत्रुत्वाचे, कधी मित्रत्वाचेही. अशा मित्रत्वाच्या, ‘सहवीर्यं करवावहै’ युतीचा आधार घेऊन जीवसृष्टीने भूमीवर पाय रोवले. पृथ्वीच्या इतिहासात सुरवातीपासून जमीन उपलब्ध होती, पण तिच्यावर माती नव्हती. या मातीशिवाय वनस्पती फोफावणे शक्य नव्हते. चारशे चाळीस कोटी वर्षांपूर्वी हे मातीचे जाड थर निर्माण केले दगडफूलांनी. दगडफूले ही सहकार्याचा एक खास आविष्कार आहेत. ही बनतात अळिंबांच्या शेवाळी अथवा सायनोबॅक्टेरियांबरोबरच्या युतीतून. अळिंबांच्या टणक आवरणामुळे जेथे शेवाळी जगू शकत नाहीत, अशा कोरड्या परिसरात दगडफुले फोफावू शकतात. त्यांच्या साध्या रचनेमुळे त्यांच्यात हरितद्रव्याचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे ती तापलेल्या किंवा गोठलेल्या, कोरड्या खडकांवरही टिकू शकतात. दगडफुलांच्या प्रभावाने जसजशी माती निर्माण झाली, तसतशी वनस्पतींची भरभराट झाली; पण आरंभी पृथ्वी केवळ काळी-मातकट-हिरवट होती. तिच्यावर रंगांची उधळण सुरू झाली… पंधरा कोटी वर्षांपूर्वी कीटक आणि वनस्पतींच्या सहकारातून. परागीकरणासाठी कीटकांना आकर्षित करण्यासाठी रंगीबेरंगी फुले अवतरली आणि रंगीली दृष्टी आलेले प्राणी एकमेकांना आकर्षित करण्यासाठी रंगून गेले.
परागीकरणात खास महत्त्वाची भूमिका घेणाऱ्या मधमाश्यांनी सहकाराची पुढची पातळी गाठली आणि प्रगत प्राणिसमाज उभारले. प्राणिजगतात केवळ दोन टक्के जाती समाजप्रिय आहेत; पण या मुंग्या-वाळवी-हत्ती-माणसांनी आज भूतलावर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
मनुष्यजातीच्या उत्क्रांतीची अशी ही सहकाराने व्यापलेली पार्श्वभूमी आहे. माणसाचे स्वतःचे खास वैशिष्ट्य आहे त्याच्या ज्ञानसंपदेत. माणूस हा एकच प्राणी इथे आणि आताच्या पलीकडे जाऊन जग समजावून घेऊ शकतो, त्याबद्दल ज्ञाननिर्मिती करू शकतो आणि ही ज्ञानसंपदा सारखी वाढवत राहू शकतो. या ज्ञानवृद्धीचा वेग आधुनिक विज्ञानाबरोबर प्रचंड वाढला आहे. तो वाढण्याचे खास कारण म्हणजे विज्ञानाची सर्वसंग्राहक वृत्ती. विज्ञान सर्वांना ज्ञानसंपादनात सहभागी करून घेते, कोणाचीही मक्तेदारी मानत नाही, याचा अर्थ असा नाही, की ज्ञानावर, विज्ञानावर मक्तेदारी प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होत नाहीत. ते निश्चितच होतात आणि त्याचे दुष्परिणाम एके काळी एकलव्याला भोगायला लागले, तसे आज भारतासारख्या विकसनशील देशांच्या नागरिकांना भोगायला लागतात.
पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून भारतासह सर्व देशांच्या नागरिकांपुढे एक नवीन संधी आली आहे. ती आहे अतिशय गतिमान सहकारी ज्ञाननिर्मितीची. आधुनिक माहिती दूरसंचार तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे ज्ञान सर्वांपर्यंत पोचवणे दिवसेंदिवस सोपे होते आहे आणि त्याबरोबरच ‘विकी सॉफ्टवेअर’सारख्या नव्या सुविधांनी सर्वांनी ज्ञाननिर्मितीत भाग घेण्याची शक्यता वाढते आहे. आज इंटरनेटचा उपयोग करणारी कोणतीही व्यक्ती विकी सॉफ्टवेअर वापरून कोणत्याही ‘विकी’ स्थळावरील माहितीत भर घालू शकते, ती बदलू शकते. या सुविधेच्या आधारावर बनवलेला विकीपीडिया ज्ञानकोश पाच वर्षांतच इंटरनेटवरील सर्वांत महत्त्वाचे संदर्भस्थळ बनला आहे. जगभरच्या पन्नास हजार लोकांनी, शंभरावर भाषांत-मराठीसह-सहभागाने लिहिलेले जवळजवळ ४० लाख लेख, असे या मुक्त ज्ञानकोशाचे स्वरूप आहे. भाषा, लिपी, छपाई, संगणक आणि आता इंटरनेटच्या बळावर ‘सहभागी ज्ञाननिर्मिती’ ही मनुष्यजातीच्या सांस्कृतिक उत्क्रांतीची चढती भाजणी आहे. या नव्या सहकारी प्रक्रियेत आपल्या सगळ्यांनाच सहभागी होता येईल. मराठीभाषकांना ज्ञानसंपन्न करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.
[पुणे सकाळ (१६ जाने.२००७) वरून.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.