जीवन-मरणाचे प्रश्न आपण कसे सोडवतो?

कोणत्याही परिस्थितीत कोणते वागणे इष्ट, कोणते अनिष्ट, याबद्दलचे आपले दृष्टिकोन विवेकातून येतात असे आपण मानतो. मुळात मात्र ते भावनांपासून उपजतात. हे म्हणाला डेव्हिड ह्यूम. तो नीतिविचारांबद्दल लिहिताना “विचारा’ भोवती अवतरण चिह्न घालून तो भाग शंकास्पद असल्याचे ठसवत असे.
ह्यूमचे म्हणणे खरे की खोटे यावर तत्त्वज्ञ अडीचशे वर्षे वाद घालत आहेत, पण निर्णय होत नाही आहे. आता वेळ संपली आहे. मेंदूतले व्यवहार तपासणारी उपकरणे वापरत वैज्ञानिक त्या वादात उतरत आहेत. आज तरी असे दिसते आहे की ह्यूमला काहीतरी योग्य असे सुचले होते. विचारातून नैतिक निर्णय आकार धारण करतात, पण भावना या प्रक्रियेत निर्णायक ठरतात. आपल्या काही नीतिविषयक भूमिकांचा अर्थ या मांडणीनेच लाग शकतो.
‘ट्रॉली प्रश्ना’वर (trolly problem) विचार करणाऱ्या लोकांच्या मेंदूमधले व्यवहार कसे असतात, हे हार्वडचा जॉशुआ ग्रीन (Joshua Greene) हा मानसशास्त्री तपासत असतो. एक ट्रॉली, आगगाडीचा डबा म्हणा, रुळांवरून घरंगळतो आहे. पुढे रूळ दोन फाट्यांमध्ये विभागले जातात. एका फाट्यावर पाच माणसे उभी आहेत, तर दुसऱ्यावर एक व्यक्ती आहे. ट्रॉलीने कोणत्या फाट्याने जायचे, हे तुम्ही ठरवायचे आहे पाच माणसे मरू द्यायची, की एक माणूस मरू द्यायचा? बहुतेक लोक म्हणतात, “सोपे आहे. कमी माणसे मरतील ते करावे.” तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत हा योग्य असा ‘उपयोगितावादी’ निर्णय आहे.
पण समजा की पाच माणसांना वाचवण्यासाठी तुम्ही एका, शेजारी उभ्या असलेल्या, व्यक्तीला रुळांवर ढकलून देणे आवश्यक आहे. अजूनही एका बळीने पाचांचे जीव वाचत आहेत. पण आता तुम्ही त्या एका मृत्यूत जास्त थेटपणे गुंतलेले आहात. बहुतेक लोक त्या एका ढकलण्याला तयार होत नाहीत. का ? ग्रीनला आढळले की दुसरी परिस्थिती (तो तिला ‘नजीकची आणि व्यक्तिगत’ म्हणतो) मेंदूच्या भावनिक क्षेत्रांना पहिल्या परिस्थितीपेक्षा शेजाऱ्याला ढकलणे आपल्या सहजप्रवृत्तीच्या जास्त थेटपणे विरोधात जाते. त्याबद्दल आपल्याला intuitive aversion असते. जास्त खोल तपासांमधून दिसते की भावनिक नकाराचे विवेकी उपयोगितावादाशी द्वंद्व होते. दांडा ओढण्याच्या परिस्थितीत विवेक (नक्त चार माणसे वाचवणे) जिंकतो, तर ढकलण्याबद्दल भावना सबळ ठरतात. जेव्हा भावना हरतात, तेव्हा आधी जोरदार कुस्ती होताना दिसते. जे थोडे लोक ढकलायला तयार होतात, त्यांनाही दांडा ओढायचा निर्णय घ्यायला लागतो त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. अशाच प्रकारच्या एका प्रयोगात शत्रूपासून तुम्ही लपलेले आहात आणि लहान मूल रडू लागते, अशी परिस्थिती वर्णिली जाते. तुम्ही मुलाच्या तोंडावर उशी दाबूनच त्याला गप्प करू शकता, नाहीतर साऱ्याच निष्पापांचे मरण ओढवते. इथेही तुंबळ मानसिक संग्रामानंतरच भावनांना हरवून विवेकाचा विजय होताना दिसतो.
या मेंदूतील संग्रामांचे दूरदर्शनवर प्रक्षेपण करता येईल. केवल तर्क लढवणारे मेंदूचे भाग आणि बोधनाचे नियंत्रण करणारे भाग, यांच्यातील उलाढाली नैतिक समस्या सोडवताना कशा बदलतात. ते चित्रित करता येईल. उपयोगितावादी विचार करणाऱ्यांमध्ये या दोन भागांतले व्यवहार जोमदार होतात, तर भावनिक निर्णय घेणाऱ्यांमध्ये व्यवहार मंदावतात. ग्रीन याचे डार्विनीय उत्क्रांतीतून आलेले स्पष्टीकरण देतो. माणसाच्या उत्क्रांतीत इतरांना मारणे नेहेमी थेट’ असे ढकलून असे दांडे ओढून नसे. त्यामुळे शारीरिक हल्ल्यांसोबत निरपराधांना मारण्याबद्दलची घृणा उत्क्रांत झाली असावी. आज अप्रत्यक्षपणे मारण्याची शक्यता आहे, आणि तिच्यामागील हिशेबी उपयोगितावादाला असणारा भावनिक विरोध सौम्य आहे. तसली परिस्थिती फारशी अनुभवांतून रुजलेली नाही.
प्रिन्स्टनचा तत्त्वज्ञ पीटर सिंगर (Peter Singer) सुचवतो की आपण आपली नैतिक अंतःप्रज्ञा (moral intuitions) नव्याने तपासून घ्यायला हवी. दोन प्रश्न तपासायला हवेत. एक म्हणजे, या अंतःप्रज्ञा ज्या स्थितींसाठी उत्क्रांत झाल्या, ती तर्कपरंपरा आजही उपयुक्त आहे का, हा प्रश्न. दुसरे म्हणजे, स्वार्थी जीन तत्त्वाच्या प्रक्रियेतून उपजलेल्या नैतिक आवेगांचा (moral impulses) सादर स्वीकार करावा का ? हा प्रश्न. (या तत्त्वानुसार सहानुभूती, परोपरकार इत्यादी भाव मुख्यतः नातलगांवर केंद्रित होतात. जितके नाते जवळचे, तितकी सहानुभूती जास्त). याऐवजी सातासमुद्रापलिकडील क्लेशांत असलेल्यांना आपण स्वस्तात मदत करू शकतो, याचा विचार का करू नये ? आपल्या नव्वदीतल्या वडलांना महागड्या औषध योजनेने जगवण्याऐवजी त्याच खर्चात दहा भुकेल्या आफ्रिकन बालकांची पोटे का भरू नयेत?
सिंगरची मूलग्राही उपयोगितावादी नीती झगडणारच. जर मेंदूत तुंबळ युद्धे झाली नाहीत, तर विवे(reason) हा वासनांचा (passion) गुलामच राहणार. ह्यूम हेच म्हणतो.
[टाईम साप्ताहिकाच्या १२ फेब्रु. २००७ च्या अंकातील रॉबर्ट राईटच्या (Robert Wright) हाऊ वुई मेक लाईफ अँड-डेथ डिसिजन्स या लेखाचा हा अनुवाद. टाईमचा पूर्ण अंक द ब्रेन : अ यूजर्स गाईड या मथळ्याचा आहे. रॉबर्ट राईटच्या द मॉरल अॅनिमल या पुस्तकाचा परिचय तीन लेखांमधून (ऑक्टो.२००० ते डिसें.२०००, अंक ११.२, ११.८, ११.९) मागे करून दिला. त्यावर वाचकांचा प्रतिसाद नगण्य आल्याने चौथा आणि शेवटचा लेख लिहिला गेला नाही. पीटर सिंगरच्या नीतिविचारांची ओळख दि.य.देशपांड्यांच्या सर्व प्राणी समान आहेत (आसु. २००३) ह्या लेखातून करून दिली गेली. ) आज मेंदूवरील संशोधन मानसशास्त्राला एका वेगळ्याच पातळीची वस्तुनिष्ठता प्राप्त करून देत आहे. ४ जानेवारी २००७ च्या दि. य. देशपांड्यांच्या तत्त्वज्ञानासंबंधीच्या कार्यशाळेत नी. र. व-हाडपांडे यांनी नीतिविचार आज तत्त्वज्ञानाच्या क्षेत्राकडून मानसशास्त्राकडे जात असल्याचे सूचित केले. या सर्व पार्श्वभूमीवर तत्त्वज्ञानात रस असलेल्यांना राईटचा लेखच नव्हे, तर टाईमचा पूर्ण अंकच उपयुक्त ठरेल, असे वाटते.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.