द्राक्षबागायत, निमित्त, लागवड व विक्रीव्यवस्था

मी साधारण १९७३-७४ सालात द्राक्षबाग लावण्याचे ठरविले कारण माझे काही मित्र (ज्यांच्या व माझ्या परिस्थितीत बरेच साम्य होते) ते बऱ्याच अंशी यशस्वी द्राक्षबागायतदार होते. मला खरे म्हणजे ‘द्राक्षउद्योजक’ हा शब्द अधिक समर्पक वाटतो. कारण सध्याच्या द्राक्षांचे उत्पादन, विक्री इत्यादींचे स्वरूप पाहता द्राक्ष पिकवणारा शेतकरी उद्योजकच असला पाहिजे असे वाटते.
सध्या महाराष्ट्र आपल्या देशात जी खाण्याची द्राक्षे (ढरलश्रश सीरशिी, ही दारूच्या द्राक्षांपेक्षा, winegrapes पेक्षा वेगळी असतात.) पिकविली जातात त्यात अग्रेसर आहे, सर्वच दृष्टीने, एकरी उत्पादन, गुणवत्ता एकूण क्षेत्र वगैरे या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या व गुणवत्ता हीपण आपल्या देशात अव्वल असली पाहिजे!
ज्या शिक्षित लोकांचे शेती, शेतकरी, शेती व्यवसाय वगैरेविषयी काही किल्मिष असलेले मत असेल त्यांनी एकदा तरी वेळात वेळ काढून द्राक्षबागायतदार लोकांचा दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भरणारा मेळावा ‘अटेन्ड’ करावा. कोणाही शेतकऱ्याला आनंदच होईल असे त्या मेळाव्याचे स्वरूप असते. इतर व्यावसायिकांच्या मेळाव्यासारखेच याही मेळाव्यात तांत्रिक सत्रे असतात, स्लाईड शोज असतात, चांगले शास्त्रज्ञ चर्चेत भाग घेतात, पुढाऱ्यांची उपस्थिती असते, जाहिरातदार असतात, स्मरणिकांचे प्रकाशन असते, व दरवर्षी नवीन समिती निवडली जाते.
इतर बऱ्याच परिसंवादामध्ये आपण पाहतो की उद्घाटन, जेवण वगैरे सत्रांना खूप गर्दी असते पण तांत्रिक सत्रांची दालने रिकामीच असतात. तसा प्रकार येथे नसतो. तांत्रिक सत्रांना खूप गर्दी असते. जागा धराव्या लागतात. काही काही वेळी तर ४-५ हजार लोक मंडपामध्ये वह्यापेन्सिली घेऊन चार-चार तास बसतात, ऐकतात, लिहून घेतात, टिपणे काढतात. यात गमतीची गोष्ट ही की सर्व वयाचे लोक असतात व शाळा वगैरे सुटल्यावर ते कदाचित प्रथमच एवढा वेळ ‘वर्गा’त बसलेले असतात, तोही ४-५ तासांचा! माझ्या मताने आपल्या देशात शेतीवरील सर्व विषयांत ‘द्राक्षे’ या विषयावर सर्वांत जास्त प्रमाणात लिखित व इतर ई माहिती सामान्य माणसासाठी उपलब्ध आहे. ज्याला अभ्यास करून द्राक्षबाग लावायची आहे त्याच्यासाठी भरपर साहित्य उपलब्ध आहे. मराठीत, इंग्लिशमध्ये पुस्तके, पुस्तिका, व्हीसीडीज, ग्रंथ इत्यादी !
अभ्यास करून शेती करणे फारसे ऐकिवात नसले तरी एकदा बाग लावली की सुजाण बागायतदाराच्या लक्षात येते की आपल्याला बरीच कमी माहिती आहे आणि ज्ञान तर अगदी नाहीच, तेव्हा मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. अशा मानसिकतेपोटीच परिसंवादांना गर्दी होते व शेतकऱ्यांचे एक चांगले संघटन पाहायला मिळते.
आम्ही प्रथम दीड एकर बाग लावली. थॉम्सन सीडलेस प्रकाराची. अंतर होते १२’ ६’. माझे प्रथमपासून मत आहे की आपल्या शेतीत नवीन काही प्रयोग करायचा असला तर तो आपल्या सर्वांत उत्तम जमिनीत घ्यावा. त्यामुळे त्यातील निम्मा धोका कमी होतो व आपण नवीन असल्यामुळे ज्या चुका होत असतात त्यावर थोडे पांघरूण पडते. सर्वच आह्वाने एकदम घेऊ नयेत, नाहीतर चूक झाल्यावर ती नेमकी कशामुळे झाली हे कळण्यास फार वेळ जातो. लोकांनी खडक सुरुंगाने फोडून बागा लावल्या व त्यात ते यशस्वी झाले, चांगले उत्पादन घेतले, म्हणून तुम्हीसुद्धा प्रथम बाग लावताना खडकाळ जमीन शोधण्याची जरूरी नाही. त्यातल्या त्यात बरी जमीन पाहून बाग लावावी. त्याप्रमाणे आम्ही आमच्या एका चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत बाग लावली. फक्त एकच सुधारणा म्हणजे त्यात एक ५’ ५’ चा चाचणी खड्डा ५’-६’ खोल घेतला व चुनखडी वगैरे नाही याची खात्री करून घेतली. त्यावेळेस १२’ ६’ हेच अंतर प्रचलित होते. व त्यावर्षी माल घेण्याचे लक्ष्य नव्हतेच. त्यामुळे फार धावाधाव नव्हती. त्यावेळी पिकाची खताची गरज वगैरे माहिती नव्हतीच व माती, पाणीही तपासलेले नव्हते. त्यामुळे ढोबळमानाने भरपूर गावखत वापरायचे ठरविले व रोगराई येऊ नये अशी काळजी घेतली.
दुसऱ्या वर्षी माल लागला व विक्रीची काळजी सुरू झाली. कोणताही शेतमाल चांगल्या किंमतीला विकणे ही एक मोठी समस्या आहे. ‘चांगल्या किंमतीला’ हा जरा जास्त आशावादी शब्द झाला! शेतकरी म्हणतात ‘योग्य किंवा रास्त भाव’. मग तेथूनच आकड्यांची जादू सुरू होते. रास्त भाव कोणी ठरवायचा कसा ठरवायचा ? त्याची परिमाणे काय? मग हे सगळे लोककल्याणकारी सरकारवर येते, म्हणजेच त्यांचे मोठे अधिकारी व मंत्री! पण त्यांचेच या बाबतीतले विचार स्पष्ट झालेले नसतात. शेतकरी जे करतात त्याला व्यवसाय म्हणून वागवावे, की इतर लोकसंख्येचे ते एक दोहन करण्याचे क्षेत्र आहे ? शेतकरी व त्यांचे नेते भाबडेपणे समजतात की हा एक व्यवसाय आहे व इतर व्यवसायाप्रमाणेच यातल्या उत्पादनाची खर्चावर आधारित किंमत काढावी, त्यावर एवढा नफा धरावा, व ती रास्त किंमत शेतकऱ्याला मिळावी! पण तसे होत नाही. शेतमालाची किंमत ठरवताना सरकारला इतर अनेक गोष्टींचा विचार करावासा वाटतो. म्हणजे गरीब जनतेला धान्य काय भावाने मिळेल व त्यामुळे महागाई किती वाढेल वगैरे. हे इतर उत्पादनाला लागू नाही. म्हणजे प्लास्टिक बादली गरिबाला केवढ्याला मिळावी किंवा कापडाचा दर त्यांच्यासाठी काय असावा असे काही नाही. ज्यांना त्यांच्या उत्पन्नात जे परवडेल ते त्यांनी घ्यावे नाहीतर घेऊ नये! मुक्त अर्थव्यवस्था! हे कल्याणकारी सरकार कायदे करणे त्यांचे काम असल्याने अनेक कायदे जे शेतकऱ्यांशी संबंधित आहेत ते करते. किसानवेतन कायदा, एवढा रोजगार कमीत कमी दिलाच पाहिजे, स्त्री-पुरुषाला समान कामाला समान वेतन, कामाच्या ठिकाणी अमुक अमुक सोयी पाहिजे वगैरे. पण रास्त भाव काढताना याचा खर्च धरायचा नाही!
आपल्या सरकारने या १० वर्षांत जे जागतिकीकरण-उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आहे त्यामुळे अनेक प्रकारच्या विचारांचे मंथन चालू आहे. व जो तो आपल्या सोईचे जे धोरण असावे ते सरकारने राबवावे, असे म्हणतो. या संदर्भात एक गोष्ट आठवते ती येथे मांडतो. माझे एक ज्येष्ठ मित्र प्लास्टिक व्यवसायात गेली ३० वर्षे काम करतात, स्वतःचा उद्योग उत्तम चालवितात व त्यांची उत्तम भागीदारी कंपनी आहे. ते अर्थातच लघु-उद्योजक आहेत व ते काही मोठ्या कंपन्यांना माल पुरवितात. जेथे माल पुरवितात तेथे त्यांचे नाव आहे. सध्या वार्षिक दरपत्रके ‘रिव्हर्स ऑक्शन’ संगणकावर द्यायची, अशी पद्धत काही मोठ्या कंपन्यांनी चालू केली आहे. त्यामध्ये आपल्या स्पर्धकाने काय दर मागितला, ते तुम्हाला समजत नाही. तुम्हाला जो कमीत कमी दर द्यायचा असेल तो तुम्ही द्यावा तुमच्या खर्चाप्रमाणे. पहिली फेरी, दुसरी फेरी वगैरे. यामुळे त्या मोठ्या कंपनीचा खूप फायदा होतो. पण जे छोटे उद्योजक, की ज्यांना त्या कंपनीचे काम मिळणे व त्यात दोन पैसे सुटणे आवश्यक असते, त्यांची फार पंचाईत होते. अशाच एका प्रसंगी निविदा ‘फायनल’ झाल्यावरच्या चर्चेत हे उद्योजक त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना म्हणाले, “साहेब या दरात तर काही मिळत नाही” तेव्हा साहेब म्हणाले, “कशाला पाहिजेत तुम्हाला जास्त दर ? तुम्ही तुमचे खर्च कमी करू शकता. एसी ऑफिस, एसी गाडी, ऑफिसच्या दारात प्यून, याची काय आवश्यकता आहे ?” तेव्हा हे उद्योजक साहेबांना म्हणाले, “साहेब या पद्धतीमध्ये तुमच्या या युक्तिवादाने एक वेळ अशी येईल की मला अशा बैठकीला केवळ चड्डी-बनियनवर यावे लागेल. त्याच्यानंतरच्या निविदेला मी काय करू हे सांगा!’ यातला गंमतीचा भाग सोडला तरी अशा प्रकारची परिस्थिती येऊ शकते.
या उद्योजकाची तक्रार असते की त्याला जर पुरेसा नफा मिळत नाही तर तो धंद्याची वाढ कशी करणार, नवीन तंत्रे कशी शिकणार व धंदा जागतिकीकरणाच्या रेट्यात अद्ययावत् कसा ठेवणार व अशा अद्ययावत् नसलेल्या धंद्यावर वैश्विक स्पर्धेला तोंड कसे देणार ? असो. हे मोठे प्रश्न आहेत व त्याची उत्तरे आपल्यासारख्या सामान्यांना इतक्यात मिळणार नाहीत असे वाटते. शेतीमालाच्या बाजारव्यवस्थेत शेतकऱ्यांपासून ते सामान्य ग्राहकांपर्यंत शेतमालाच्या विक्रीच्या साखळीमध्ये बरेच लोक असतात व ते शेतकरी नसल्याने त्यांना त्यांच्या श्रमाचा, बुद्धीचा वापराचा योग्य तो मोबदला मिळालाच पाहिजे. त्यामागे प्रत्येक पातळीवर भाव वाढत जाऊन तो जवळ जवळ दुप्पट होतो, याचे प्रत्यंतर कोणालाही घेता येईल. शेतकऱ्याला जो ठोक भावात दर मिळतो त्याच्या दुप्पट दराने तो किरकोळ ग्राहकाला द्यावा लागतो. असो.
पुन्हा शेतीमालात नाशवंत मालाची विक्री जास्त अवघड कारण थोडा वेळ गेला तर माल खराब होण्याची टांगती तलवार शेतकऱ्याच्या डोक्यावर ! द्राक्षाच्या विक्री-व्यवस्थेचा वेळ हा महत्त्वाचा भाग आहे. फुले, पाने, भाजीपाला यांची तोडणीनंतर लवकरात लवकर बाजाराकडे योग्य त्या तापमानात वाहतूक होणे अत्यंत आवश्यक असते. त्यातली ‘योग्य त्या तापमानात’ ही गोष्ट आपल्या देशात लहान अथवा मध्यम शेतकऱ्याच्या आवाक्यातली गोष्ट नाही. सध्या ९०% खेड्यांपासून जवळच्या बाजाराला माल आणण्यास बैलगाडीऐवजी ३ किंवा ४ चाकी वाहन वेळेवर योग्य त्या भाड्यात उपलब्ध झाले तरी नशीब, अशी अवस्था आहे. मग शीतवाहने वगैरे गोष्टी स्वप्नातच आहेत.
आता सामान्य द्राक्षबागायतदार त्याचा माल तयार झाल्यावर त्याची विक्रीव्यवस्था करण्याचा प्रयत्न कसा करतो? त्याच्यापुढे दोन पर्याय असतात (१) माल जागेवरच विकायचा, (२) तो निरनिराळ्या बाजारांना पाठवायचा. त्याची पसंती अर्थातच जागेवर विक्री या पर्यायालाच असते. याचे प्रमुख कारण म्हणजे तोडणीनंतरचा, पॅकेजिंग वगैरेचा खर्च, त्या मालाच्या विक्रीच्या किंमतीच्या साधारण २०%-३०% येवढा असतो. त्यावेळेस वर्षभर अनेक खर्च करून दमलेल्या बागायतदाराजवळ तेवढी रक्कम असणे अवघड असते. त्यासाठी कर्ज काढण्याचे सायास करण्यास तो मानसिकदृष्ट्या असमर्थ असतो. त्यामुळे त्याची पहिली पसंती माल जागेवर विकण्याला असते. यामुळे त्याचे अनेक तोटे होऊ शकतात. पहिल्यांदा तर त्याचा बाजाराशी सततचा संपर्क तुटतो व त्याच्याकडे आलेल्या बागवानाच्या म्हणण्याप्रमाणे त्याला चालावे लागते. नेहमीप्रमाणे व्यापारी व शेतकरी असा व्यवहार सुरू होतो. त्यात जर तो बागवान मध्येच बाग सोडून गेला तर बागायतदाराला काही करता येत नाही. त्याची बाजारामध्ये माल पाठविण्याची यंत्रणा कोलमडलेली असते, व त्याला त्या बागवानाला शरण जाण्यावाचून गत्यंतरच नसते. बरे हा बागवान कुठला ? त्याचा पत्ताही पक्का माहीत नसतो. तो सांगत असतो आम्ही परभणीवाले, नांदेडवाले वगैरे. सगळे सारखेच दिसतात. आलमभाई, उस्मानभाई, छोटी दाढी, लुंगी वगैरे.
यापेक्षा जागेवर माल विकण्याचा चांगला प्रकार घडतो एखाद्या निर्यातदाराने माल घेतला तर. ही कंपनी चांगली मोठी असते. ते सर्व पॅकिंगचे सामान आणून देतात. माल जागेवरून घेऊन जातात. त्यांनाही गरज असते. त्यांचे लक्ष्य त्यांना पूर्ण करायचे असते. पण त्यासाठी तुमचा माल निर्यात दाचाच हवा, जे खूप कठीण असते. आम्ही शक्यतो माल बाजारात पाठवायचा प्रयत्न करत असू. एक-दोन वर्षे, आम्ही चारही मोठ्या पेठांना माल पाठविला, मुंबई, दिल्ली, कलकत्ता व मद्रास ! पण यासाठी बरीच यातायात करावी लागली. सुदैवाने पैसे कुठेही बुडले नाहीत. प्रत्येक मार्केटसाठी निराळ्या दऱ्यांचा माल काढावा लागतो. त्यासाठी गि-हाईकाची आवड, वाहतुकीचा प्रकार, माल किती दिवसांनी पोहोचणार याचा अंदाज आणि आपल्या मालाची बागेतली परिस्थिती अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो व त्यानुसार निर्णय घ्यावा लागतो. योग्य त्या अडत्याची निवड ही आपल्या समजुतीने करावी लागते. पण बहुतेक वेळा असे लक्षात येते की, यात काही अर्थ नाही. देवावर भरोसा हेच खरे! जाताजाता यासंबंधी एका प्रयोगाची हकीकत सांगतो.
पूर्वी सगळे लोक क्रॉफर्ड मार्केट, मुंबईला माल पाठवायचे. तेथे सर्व जातिधर्माचे शेकडो अडत्ये. प्रत्येकाचा गि-हाईक आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न. कधी याचेकडे माल जास्त तर कधी त्याच्याकडे. मग भाव कमी का आला? हा ‘आपला’ नाही म्हणून का? परधर्माचा आहे म्हणून तर नव्हे ? असे अनेक प्रकारचे विचार! मग एकाच दऱ्यांचा माल एका धर्माच्या अडत्याकडे निम्मा व दुसऱ्या धर्माच्या अडत्याकडे निम्मा! तरीही पट्टी दोघांची सारखीच. काही दिवस समाधान. पण नंतर कळले की एकाच बागायतदाराचा किंवा एकाच परिसरातील माल समजा २४ रु. पेटी विकला व दुसऱ्याने २२ रु. पेटी विकला तर अडत्यांच्या दुपारच्या सभेत ज्याने कमी भावाने विकला त्याच भावाने सर्वांनी पट्ट्या करायच्या व भावाच्या फरकाचे पैसे होतात ते संबंधित अडत्यांनी वाटून घ्यायचे! आम्ही बऱ्याच वेळा पेठेमध्ये ५-६ तास बसून काहीतरी समजावे म्हणून प्रयत्न करीत असायचो. पण ही मंडळी फारच वस्ताद. ते काही कळू द्यायचे नाहीत. म्हणजे ही स्पर्धा व्यापारी व शेतकरी अशा दोन तुलना न करता येणाऱ्या गटांमधली असायची. व्यापारी म्हणजे धूर्त. अनेक वर्षांचा अनुभव. बहुतेक सर्व गोष्टी त्यांच्या हातात. पैसे देणे त्यांच्या हातात. घेणारे गि-हाईक त्यांच्या संबंधातले. याउलट शेतकरी म्हणजे या व्यवसायाचा अनुभव नसणारे, नवखे, सर्व गोष्टीबाबत अडत्यावर अवलंबून, व्यवस्थेची माहिती नसणारे, वगैरे. त्यामुळे या लढाईचा शेवट नेहमीप्रमाणे व्हायचा व निष्कर्ष ‘हे असेच चालणार !’ मग जे जुने अनुभवी बागायतदार आहेत त्यांनी समजूत काढायची. “आपल्याला वाटते तेवढे पैसे त्यांना मिळत नाहीत. त्यांना पण खर्च असतात. त्यांचे पैसे बुडविणारे पण दर सिझनला असतात.” वगैरे. आम्ही सुरुवातीला अडत्यांचे मिंधे व्हायला नको म्हणून त्यांचेकडे जेवणे नाही, त्याला आपले कोणतेही काम सांगायचे नाही, अथवा उचल पण मागायची नाही. असे करत असू. पण त्याचा आमच्या व्यवसायावर फारसा परिणाम झाल्याचे दिसले नाही.
आम्ही एकदा साधारण ७८-७९ सालच्या सुमाराला आणखी एक जुगार खेळलो. म्हणजे द्राक्षे मुंबईला थंड करून, शि-लेश्र करून दिल्लीच्या शीतगृहात, उश्रवीरसश मध्ये ठेवायची व ३ महिन्यांनी विकायची. यात प्रयोग यशस्वी झाला पण या व्यवहारात फायदा काही फारसा झाला नाही. खूप यातायात करावी लागली. त्यावेळेस सध्यासारखी थंड करण्याची व्यवस्था जागोजागी नव्हती. त्यामुळे आम्ही मुंबईच्या भायखळा येथील शीतगृहात ती द्राक्षे थंड करायचो व तेथून शीतवाहनाने, Refrigerated van मधून दिल्लीला पाठवायचो. तेथे पेठ खूप मोठी आहे व त्यातच फळांसाठीची शीतगृहे आहेत. ४-५ हजार दुकाने आहेत. आशियातील सर्वांत मोठी बाजारसमिती, आझादपूर. खाली दुकानाचा गाळा व वर शेठचे A.C. Office वगैरे, अशा पद्धतीची रचना! ती व्यवस्था पहिल्यावरच माझा शेतकरी जीव दडपून गेला. कारण आपल्या येथे मुंबईला कॉफर्ड मार्केटमध्ये अडत्याला बाजारात एक कोपरा असतो. तेथे फक्त एक लाकडाची मोठी पेटी असते. तेच टेबल. तीच बिछायत. आल्यावर बसायला देण्याची खुर्ची. तीच ढळषषळप ठा इत्यादी. येथे आडत्याचे अ. उ. जषषळलश व क्रीशीीं ठेा पाहिल्यावर याचा नफा किती असणार, व आता आपले कसे होणार, असा विचार आल्यावाचून राहिला नाही. सुदैवाने व्यवहार आतबट्ट्याचा झाला नाही. अर्थात यात आमची वणवण, गेलेला वेळ, उशीरा रिकामे झालेले भांडवल वगैरेचा हिशोब धरलेला नाही. कारण शेती-व्यवसायात अशा प्रकारचे हिशोब धरण्याची पद्धत नाही. हे एक महत्त्वाचे कारण शेतीच्या अर्थव्यवस्थेच्या दुरवस्थेचे आहे.
सध्या जे मोठाल्या कंपन्यांचे चिल्लर, retail विक्रीचे पेव फुटले आहे त्याचा फार गाजावाजा चालला आहे. त्यांच्यात बहुराष्ट्रीय कंपन्याही आहेत, रिलायन्स वगैरे. तर ते नेहमीप्रमाणे या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांचाही फायदा होणार आहे असे म्हणतात कारण सध्या जी मालविक्रीची साखळी आहे उत्पादक (शेतकरी) दलाल चवलीदलाल हॉकर (विक्रेता) ग्राहक यातल्या मधल्या तीन पातळ्या गाळल्या जाणार आहेत व उत्पादक रीटेल कंपनी ग्राहक, असे होणार आहे. पण म्हणून मधल्या तीन पायऱ्यांचा फायदा उत्पादक शेतकऱ्याला मिळेल असे वाटत नाही. तो बाजाराच्या नियमाप्रमाणे जो जास्त ताकदवान त्या रीटेल कंपनीलाच मिळणार. पुन्हा तोच प्रकार. असंघटित व कमजोर शेतकरीवर्ग व सुसंघटित, ताकदवान कंपनी, यांच्यातील लढाई! लढाई कसली? एक व्यवहार!
मला तर असे वाटते की, या व्यवस्थेमुळे बरेच छोटे धंदे करणारे वगैरे गट नामशेष होतीलच पण शेवटी ग्राहकालासुद्धा स्वस्त काही मिळणार नाही व शेतकऱ्याला तर जास्त मिळणार नाहीच नाही. बहुराष्ट्रीय कंपन्या अजून मोठ्या होतील व या गावातील पीडित झालेल्या बऱ्याच लोकांना त्या नोकऱ्या देऊ शकतील आणि मग मोठ्या वृत्तपत्रात मधल्या पेजवर कंपनीची उलाढाल किती वाढली वगैरे लेख येतील व नोकरदार बंध ते चवीने वाचन कंपनीच्या दरदष्टीचे मनोमन कौत ! माझ्या वाचनात या पद्धतीमध्ये कंपनीने शेतकऱ्याकडून माल काय भावाने घ्यावा व तो ग्राहकाला किती किंमतीत विकावा या संबंधी सरकारने काही नियम अथवा वायदा केल्याचे आले नाही. नेहमीप्रमाणे हेही असेच चालायचेच!
आतापर्यंत आपण द्राक्षपिकाच्या व त्याअनुषंगाने एकूणच शेतीमालाच्या विक्रीव्यवस्थेसंबंधी काही चर्चा केली. आता त्याच्या उत्पादनाविषयी. या बाबतीत मात्र चित्र बरेचसे आशादायक दिसते. आपले बागायतदार उत्पादन चांगल्या प्रकारे काढतात. त्यांचे प्रति एकर उत्पादन जागतिक सरासरीपेक्षा चांगले आहे, व गुणवत्ताही जागतिक स्तरावर मान्य होण्यासारखी आहे. पण याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे बागायतदार बंधू आपली संघटना करून जागतिक स्तरावर जे जे बदल तंत्रांमध्ये अथवा इतर शासकीय संशोधनात होतात, ते लौकरात लौकर आत्मसात करतात व आपणही त्यात मदत करतात. नवीन शोधनिबंधाची त्यांना माहिती असते व प्रत्यक्ष उत्पादनात त्याचा उपयोग कसा करावा याचे तंत्रज्ञान पण अवगत असते. शेतकरी नसलेल्या लोकांना वाचून ज्या गोष्टी अवघड वाटू शकतात त्या ही मंडळी सहजगत्या यशस्वी करून दाखवतात. काही वर्षांपूर्वी द्राक्षबागायतदार संघाच्या वार्षिक मेळाव्यात एखाद्या सत्राचा विषय असायचा “द्राक्षाची गुणवत्ता”. त्यात एखाद्या अभ्यासू बागायतदाराचे भाषण असायचे, “द्राक्षाच्या गुणवत्तेची त्रिसूत्री : डिपिंग, गर्डलिंग, थिनिंग’. यातल्या प्रत्येक मुद्द्याचे जर आपण लिखित स्वरूपातल्या तंत्राचे वाचन केले तर तो अत्यंत क्लिष्ट प्रकार वाटतो, पण प्रत्यक्षात द्राक्ष बागायतदार ते अत्यंत कुशलतेने पार पाडतात. अशिक्षित मजुरांकडून कामे करवून घेतात. त्यासाठी आवश्यक असलेल्या द्राक्षवेलीच्या क्रियाविज्ञानासारख्या शास्त्रीय गोष्टींची त्याला चांगली माहिती असते. ज्या द्राक्षसंबंधी बाबीवर एकदोन लोकांनी पीएच.डी. केलेली असते, त्या गोष्टी उपयोगात आणण्यापुरत्या या मंडळीनी आत्मसात केलेल्या असतात. उदा. द्राक्षवेली जमिनीतील खते किंवा पोषणद्रव्ये कशी उचलतात व किती प्रमाणात उचलतात ? त्यासाठी अनुकूलता कशी निर्माण करता येईल हा एका पीएच.डी.चा विषय नक्कीच असेल. पण हे तंत्रज्ञान या बागायतदाराने आत्मसात केलेले असते. किंवा बागेत रोग कसा निर्माण होतो, उत्पन्न होतो, बुरशीचे निराकरण कसे करावे, किती बुरशीनाशक कसे फवारावे, इत्यादी. अर्थात अशा प्रकारच्या ज्ञानासाठी काही व्यक्तींचे विशेष प्रयत्न असतात व ते आपल्याला झालेल्या ज्ञानाचा इतरांनाही उपयोग करून देतात.
माझ्यापुरत्या तरी द्राक्षबागायतीसंबंधी कोणत्याही चर्चा. सरांच्या, श्री. अ. दाभोलकरांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आमच्या भागातले सामान्य द्राक्षबागायतदार त्याना ‘माऊली’ म्हणायचे. सोलापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्यात आज जे मोठे द्राक्षबागायत क्षेत्र आहे त्याचे बरेचसे श्रेय दाभोलकर सरांना आहे. पूर्वी सामान्य शेतकऱ्याची द्राक्षबागेसंबंधी जी एक भीती होती, ती सरांमुळे खूप कमी झाली. त्यांच्या या मिशनचे मुख्य सूत्र होते विज्ञानातले ‘गूढ’ उकलणे! शास्त्रातल्या शोधांचे जे अवडंबर माजविले जाते किंवा त्याचा उपयोग अवाच्या सवा फायदा मिळविण्यात होतो, तो त्यांना मान्य नव्हता. म्हणून त्याच्यावर कायदे कानून यांनी जे साध्य होणार नाही, ज्याच्यासाठी तो शोध लावलेला आहे किंवा जे त्याचा वापर करणार आहेत; ते जर ज्ञानी असले, तर बाकीच्या गोष्टींची जरूर लागणार नाही. त्यामुळे द्राक्षातल्या विज्ञानाची शेतकऱ्याला माहिती करून द्यावी असे त्यांचे मिशन होते आणि ते त्यात बऱ्याच अंशी यशस्वी झाले. मी सरांच्या रूपाने पहिला सुशिक्षित माणूस पाहिला की ज्याला आपल्या शेतकरी बंधूचा आवाका, बुद्ध्यंक, ग्रहणशक्ती यांच्याबद्दल खात्री होती.
अत्यंत उच्च दर्जाची बुद्धिमत्ता, साधी राहणी, क्लिष्ट विषय साध्या माणसाला त्याच्या मर्यादा समजावून घेऊन, समजावून सांगण्याची हातोटी, आपण काही तरी विशेष करतो आहोत किंवा केले आहे असा अजिबात अभिनिवेश नाही, आपण जे काम करतो आहोत ते पूर्णपणे आनंदाने करण्याची वृत्ती, अशा अनेक सद्गुणांचा त्यांच्या बाबतीत उल्लेख करता येईल. आणि असे वाटते की, असे ५-५ दाभोलकर सर जर प्रत्येक राज्याला मिळाले तर देशातील शेतीचे व पर्यायाने देशाचे सर्व प्रश्न फार लवकर सुटतील. सर मूळचे गणिताचे प्राध्यापक. त्यामुळे त्यांनी द्राक्षबाग एकदम गणितातच बसविली. प्रयोग परिवार या अभ्यासमंडळाच्या माध्यमातून त्यांनी द्राक्षबागेची अनेक गणिते यशस्वीरीत्या ठरविली. सध्या जी काही प्रमेये असतील, त्यांचा पाया पण त्यांनी त्यावेळी केलेल्या प्रयोगांतच आहे. आपल्या हवामानाला योग्य अशी एकरी वेलांची संख्या, ओळींमधले व वेलांमधले अंतर, प्रत्येक वेलावरच्या फुटींची संख्या, प्रत्येक काडीवरील पानांची संख्या, पानांचा (शक्यतो) आकार, पानेऱ्याचे व्यवस्थापन वगैरे अनेक त्यापूर्वी दुर्लक्षित बाबींवर त्यांनी चांगले मार्गदर्शन केले. सोबतच खतांच्या मात्रा, औषधांचा योग्यवेळी उपयोग, हार्मोनच्या उपयोगाबाबत मार्गदर्शन, अशा अनेक महत्त्वाच्या बाबींबाबतही मौलिक मार्गदर्शन केले. नुसता उपाय नाही, तर त्याच्यामागची शास्त्रीय कारणमीमांसा सामान्य शेतकऱ्याला समजेल अशा भाषेत पटवून दिली. अमुक एक गोष्ट आपण का करतो आहोत हे शेतकऱ्याला समजल्यामुळे त्यांच्या काम करण्यात निराळाच उत्साह असे.
आपल्याकडे जास्तकरून खाण्यासाठीची, ढरलश्रश सीरशिी पिकवतो. त्यामुळे त्यांनी गुणवत्ता फार सांभाळावी लागते. पूर्वी आपण कोणतेही फळ गोड म्हणजे चांगले, अधिक गोड म्हणजे अधिक चांगले असे समजत असू, आता त्याच्या गोडीसोबतच अनेक परिमाणे आहेत. चांगल्या द्राक्षांचे दिसणे, मण्यांचा घटाचा आकार, त्याच्यावरची चमक, स्वाद, रंग, त्यात औषधे किती शिल्लक आहेत, ती किती दिवस टिकतात इत्यादी सर्व कसोट्यांवर उतरून आपल्याकडे जागतिक दर्जाची द्राक्षे निर्माण केली जातात. त्यासाठीच्या ज्या कृषिसांस्कृतिक सवयी लागतात त्याची सर्व तंत्रे आपल्या शेतकऱ्यांनी आत्मसात केली आहेत. तसेच अत्याधुनिक वाढ करणारी-थोपवणारी औषधे (हॉर्मोन्स), वगैरेचा उपयोग योग्य वेळी करण्याचे तंत्रदेखील जाणून आत्मसात केले आहे. शेतकरी म्हणून उत्पादनाच्या आघाडीवर आपली प्रगती समाधानकारक आहे. जाता जाता एक गोष्ट आपल्या शेतकऱ्यांची यशस्विता म्हणून पाहता येईल, ती अशी मी सुमारे २५-३० वर्षांपूर्वी अमेरिकेला गेलो होतो. द्राक्षव्यवसायाची मक्का म्हणजे कॅलिफोर्नियातील द्राक्षबागा. अर्थातच अमेरिकेच्या सफरीमध्ये द्राक्षबाग पाहणे याला खूप वरचा अग्रक्रम होता. माझा भाऊ एका विद्यापीठामध्ये जैवतंत्रज्ञानाचा संचालक होता, त्यामुळे त्याची खूप ओळख होती. त्याच्या ओळखीने आम्ही एके दिवशी एक द्राक्षबाग पाहायला गेलो. बागेचा मॅनेजर माझ्या भावाचा माजी विद्यार्थी होता. तो कीटकतज्ज्ञ होता. बागेचे क्षेत्र १२५०० एकर होते. त्याने आमच्यासाठी पूर्ण दिवस खर्च केला. बागेच्या ऑफीसच्या परिसराचा देखावा आपल्याकडील एखाद्या धरणासारखा होता. विविध प्रकारची यंत्रे गॅरेजमध्ये, हँगरमध्ये दोन फवारणीची विमाने, कार्यालयात संगणकांनी युक्त प्रयोगशाळा, इत्यादी.
त्यावेळेस आमच्याकडे बाग होती साडेतीन एकर. मला दिवसभर हुरहूर वाटत होती की, आपल्यासारख्या अत्यंत सामान्य माणसाने एवढ्या मोठ्या बागायतदाराचा एवढा वेळ घेतला आहे. पण शेवटी रात्री चर्चा करताना मला वाटले की, आपणही यांना ज्याचे अप्रूप वाटेल असे करतो आहोत. त्याने मला विचारले की, तुम्ही द्राक्षांमध्ये घडांचा व मण्याचा आकार व वजन साधारणपणे एकसारखे कसे ठेवता? आणि मला संधी मिळाली. मी त्याला आपण घडाला हार्मोन किती केला ? कोणत्या वयात का देतो. नंतर गर्डलिंग केव्हा कोठे व किती करतो, किती वेळा करतो व हातानेच कसे करतो, वगैरे गोष्टी समजावून सांगितल्या. त्याला आपण इतक्या वेळा घड हाताळतो याचा अचंबा वाटला. कारण त्यांच्याकडे फक्त पेट्या भरतानाच घडाला हात लावण्याचा प्रसंग येतो. अशा तन्व्हेने आपल्याकडे शेतकरी स्वप्रयत्नाने त्याच्या व्यवसायात उन्नती करण्याचा खूप प्रयत्न शेवटी आपल्याला असे म्हणता येईल की आपण शेतकरी उत्पादनाची आघाडी अगदी यशस्वीरीत्या सांभाळू शकतो. आणि या संदर्भातील कोणतीही आह्वाने स्वीकारू शकतो, पण त्याचे कमकुवत क्षेत्र म्हणजे विक्रीची व्यवस्था व योग्यवेळी पतपुरवठा.
या बाबतीत बराचसा ऊहापोह पूर्वी झालेला आहे व आणिही करता येईल. गेल्या आठवड्यात आलेल्या बातमीमुळे आणि चार गोष्टींचा उल्लेख करावासा वाटतो. सध्या तुरी बाजारात येण्याचे दिवस आहेत. तुरीला या वर्षी चांगला भाव येत होता. पण सरकारने वायदेबाजारातून तुरीच्या वायद्यांना बंदी घातल्याने एका दिवसात रु.२००/- ने भाव कोसळले व सर्वांना हायसे वाटले ! नाहीतर तूरडाळीचे भाव खूप वाढले असते!
आता आपण खूप वेळा शेतकऱ्यांची मानसिकता हा शब्दप्रयोग ऐकतो व त्यावरची चर्चा पाहतो. पण आता असे वाटायला लागले आहे की सरकार व इतर समाजाची शेतकरी व शेती ह्याबद्दलची मानसिकता बदलल्याशिवाय शेतीधंद्याला बरे दिवस येणार नाहीत. म्हणजे कोणतेही अरिष्ट येणार असे वाटले की उपाययोजना म्हणजे शेतीमालाच्या भावावर नियंत्रण ! जर शेतकऱ्याला सर्व गोष्टी खुल्या बाजारात तक्रार न करता घ्याव्या लागतात, तर इतरांनी शेतीमाल तसा खरेदी का करू नये ? एखाद्या वर्षी तूर महाग खरेदी का करायची नाही. गेल्या २० वर्षांत काही कीटकनाशकांच्या किमती ३००-३५०% वाढल्या आहेत. त्याच्यावर का काही नियंत्रण नाही? म्हणजे आपण जे म्हणतो की स्वातंत्र्य मिळाले म्हणजे गेल्या ५० वर्षांत या समाजाला फारसा काही फरक पडला नाही; गोरे गेले व स्थानीय राज्यकर्ते आले, पण त्यांच्या विचारसरणीत काही फरक नाही. हा मोठा शेतकरी समाज ज्याने त्याने पिळायचा व आपले व्यवसाय करायचे!
शेतकऱ्याला वायदेबाजार, वगैरेचे काही ज्ञान नाही पण त्याला एवढे समजते की सरकारने काहीतरी नियंत्रण आणल्यामुळे तुरीचे भाव २००-३०० रु. नी कमी झाले ! व हे सरकार शेतकऱ्यांना ज्या निविष्टा (inputs) लागतात त्यांचे भाव वाढल्यावर काही नियंत्रणे आणू शकत नाही!
सुंदरबन, सुर्डीकर बंगला, अध्यापक कॉलनी, बार्शी ४१३ ४११.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.