मानवी स्वभाव व डार्विनवाद (४)

[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे. प्रभाकर नानावटींनी संपूर्ण पुस्तकाचे भाषांतरही केले आहे व ते प्रकाशनाच्या प्रयत्नात आहेत. सं.]
मुक्त इच्छा (ईहा) व अंतिम जबाबदारी
स्टीव्हन रोज या वैज्ञानिकाच्या मते जनुकयंत्रसिद्धान्तातील गर्भितार्थ माणसावरील जबाबदारी व त्याच्यातील गुणदोष यांच्याकडे बोट दाखवतो. आनुवंशिकतेतून गुणदोष आलेले असल्यास त्यांसाठी व्यक्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नये, कारण कृतीची जबाबदारी त्याच्यावर ढकलता येत नाही. उत्क्रांति-मनोविज्ञान पुरुषाची वृत्ती बहुपत्नीकत्वाकडे झुकणारी आहे असे सूचित करत असल्यास व हा कयास बरोबर असल्यास स्त्रीने त्याच्या बाहेरख्यालीपणाविरुद्ध आक्षेप घेता कामा नये. रोज याने अंतिम जबाबदारी कुणाची, या मूलभूत प्रश्नावर बोट ठेवले आहे. जनुकयंत्रांसंबंधी विधान करताना त्याला जनुकीय नियतवाद व हार्डवायर्ड मेंदू अभिप्रेत होता. एखाद्या क्षणी एखाद्या विशिष्ट भावनेचा उद्रेक होण्याची शक्यता असली तरी त्यामुळे मानसिक संतुलन बिघडते किंवा व्यक्तीला बेजबाबदारपणे वागण्यास प्रवृत्त करते, असे विधान उत्क्रांति-मनोवैज्ञानिक करणार नाहीत. या भावनांचा मूलस्रोत काय आहे, त्याची लांबी, रुंदी, खोली कितपत आहे, याबद्दल भाष्य ते करतील. परंतु त्या विकृत आहेत असे त्यांनाही वाटणार नाही. मुळात प्रश्न भावनोद्रेक होतो की नाही किंवा त्याची तीव्रता कमी की जास्त हा नसून ही कृती सामाजिक परिस्थितीतून उद्भवते की ही कृती आनुवंशिक असून संस्कारांना व संस्कृतींना न जुमानता उफाळून येते, हा आहे.
उत्क्रांति-मनोविज्ञान जनुक आक्रमक असतात, किंवा तीव्र इच्छा प्रगट करतात, असे सांगत नाही. मानवी भावनांना जनुकीय संदर्भ आहे एवढेच त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते पुरुषांमध्ये स्त्रीलंपटपणा असतो, पण त्याचे तो काय करतो हे इतर अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. या भावना किती तीव्र आहेत, त्यावेळची सामाजिक स्थिती काय आहे, अशा गोष्टींना समाजमान्यता मिळू शकेल का, लपूनछपून करावे की उघडउघड करावे, चोरी पकडली तर जाणार नाही ना, बायकोपोरे काय म्हणतील, कितपत धोका पत्करावा, संबंधामध्ये प्रामाणिकपणा आहे का, ईश्वर किंवा शेजारचे हालचालींवर पाळत ठेवत असतील का, गावात जाहीर वाच्यता होऊन अब्रूचे धिंडवडे निघण्याची शक्यता आहे का, असे अनेक तर्कवितर्क लढवून पाऊल ठेवावे लागते. त्यामुळे दोषी व्यक्तीला दोषारोपापासून मुक्त करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. एवढ्या संधी व पर्याय असूनसुद्धा त्याची वर्तणूक अन्यायकारक असेल तर तो शिक्षेस पात्र ठरेल. उत्क्रान्ति-मनोविज्ञान बेजबाबदार वर्तनाचे समर्थन करू शकत नाही. वैज्ञानिक सामान्यपणे ढोबळ विधाने करत असतात. व्यक्तिपातळीवर त्याचा विचार किंवा त्याची शहानिशा वेगळ्या रीतीने करावी लागेल.
जनुकीय वृत्ती माणसाला जबाबदारीतून मुक्त करत नाही किंवा मानसिक असंतुलन आहे म्हणून पळवाटही काढू देत नाही. जनुकीय नियतवाद लिंगपिपासूवृत्तीला उत्तेजन देत नाही. त्यामुळे स्त्रीलंपट व्यक्तीला दोषमुक्तही करत नाही. काही जण या गोष्टी हार्डवायर्ड असतील तर स्त्रीलंपटपणाला पर्याय नाही असे वाद करू शकतील. मुळात जनुकीय वृत्ती कायमची दगडावरील रेघ नव्हे. परंतु काहींना यात दोष दिसत नाही, हेही तितकेच खरे. माणसाचा मेंदू कोऱ्या पाटीसारखा आहे असे म्हणणारे आपण संस्कार व संस्कृतीच्या दबावाखाली काही कृती करतो, व स्त्रीलंपटपणा त्याचाच एक प्रकार असण्याची शक्यता आहे म्हणून स्त्रीलंपट पुरुषाला दोष देण्यात अर्थ नाही, असे म्हणू शकतील. या तर्कविचारात काही चुका आहेत. आपण फार तर प्राप्त परिस्थितीत थोडाफार बदल करू शकतो. वाईट संगतीपासून दूर राहण्यास भाग पाडू शकतो. अश्लील साहित्य किंवा तत्सम गोष्टींपासून दूर ठेवू शकतो. धार्मिक उपायाने मनावर ताबा आणू शकतो (?) परंतु आपल्याला घडवत असलेली बाह्य परिस्थिती आमूलाग्र बदलता येणार नाही. त्यामुळे डॉकिन्ससारखे वैज्ञानिक जनुके की बाह्य परिस्थिती या वादात न पडता आपण जनुके व भोवतालची परिस्थिती या रसायनाचे फलित आहोत, असे म्हणतात. कोऱ्या पाटीचे समर्थक जनुकांना दोष देत असतील तर तेही तितकेच दोषी आहेत. मुळात ज्या गोष्टीवर आपले नियंत्रण नाही त्या गोष्टीची चर्चा करणे गरजेचे नाही.
मानवी स्वभावाचा विचार करताना डार्विनच्या विवेचनाप्रमाणे मुक्त इच्छा व अंतिम जबाबदारी यांना तसा अर्थ नाही. फारफार तर काही प्रमाणात जबाबदारी पेलता येते असे म्हणता येईल. परंतु अंतिम जबाबदारी व त्यासाठीची मुक्त इच्छा यांना वाव नाही. मुक्त इच्छा व अंतिम जबाबदारी या परस्परविरोधी संकल्पना आहेत की काय असे वाटू लागते. अशा प्रसंगी आपण विज्ञानाच्या कसोटीवरून उत्तर शोधत असतो. बर्म्युडा त्रिकोणात जहाजे गडप का होतात, परग्रहावर सजीवसृष्टी आहे की नाही, प्रकाशवेगापेक्षा जास्त वेग असू शकेल का, सामान्य तापमानात अणूतील फ्युजन-प्रक्रिया शक्य आहे का, इत्यादी अनेक प्रश्नांना विज्ञानातून सहजपणे उत्तर शोधू शकतो. त्यासाठी वैज्ञानिक प्रयोग करावे लागतात. अनुभवांचा आधार घ्यावा लागतो. मुळात हे जग कसे आहे, जगातल्या गोष्टींचे मूळ काय आहे इत्यादींचा शोध घ्यावा लागतो. जगात या गोष्टी आहेत की नाहीत, त्या तशा घडतात की नाही हे निश्चितपणे विज्ञानाच्या साहाय्याने सांगता येते. ज्याप्रकारे एखाद्या गोष्टीचे वर्णन केले जाते त्या वर्णनानुसार गोष्टी आहेत की नाहीत, त्याप्रमाणे घटना घडत आहेत की नाहीत, त्यात बदल आहे का, कितपत बदल आहे, बदलत्या परिस्थितीत मूळ घटकाचे काय होते, इत्यादी अनेक गोष्टींचा विचार करून आपण निष्कर्षांप्रत पोचतो. अशाच प्रकारचे निकष मुक्त इच्छेच्या संदर्भात लावता येतील का हा प्रश्न आपल्यासमोर आहे. मुक्त इच्छेच्या अस्तित्वाचा ठावठिकाणा सापडल्यास डार्विनवाद कितपत बरोबर आहे हेही कळू शकेल. कारण डार्विनवादाचा मुख्य भर हे जग कसे आहे ते समजून घेण्यावर आहे.
जग हे पूर्णपणे नियतिशरण असल्यास मुक्त इच्छेला वाव नाही व कुणावरही कशाची जबाबदारी नाही. नियतिशरण जगात घडत असलेल्या सर्व घटना पूर्वनियोजित असतात. मुक्त इच्छा म्हणजे आपण करत असलेल्या कृतीला आपणच पूर्णपणे जबाबदार असून आपण केलेल्या निवडीसाठी प्रशंसा, दोष, गुणगान, हेटाळणी यांचे धनी आपल्यालाच व्हावयाचे आहे, असे ठामपणे सांगण्याची क्षमता. नियतिशरण जगात घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीला यापूर्वी घडलेल्या गोष्टीशी जोडले जाते. उदाहरणार्थ बहुपत्नीकत्वाकडे झुकलेल्या पुरुषाला संधी उपलब्ध व निवडीला वाव असूनसुद्धा तो स्वतःला जबाबदार समजतो. त्याला नीतीची चाड असल्यास बाहेरख्यालीपणा चुकीचा वाटेल. चुकीची निवड केल्यास चारचौघात त्याची छी-थू होईल. परंतु जगाला नियतीने जखडलेले असल्यास या गोष्टी कशा शक्य होतील? त्याच्या मनातील संघर्ष व त्याने केलेली निवड त्याचे पुढचे आयुष्य बदलू शकणार नाहीत. कारण त्याचे पुढचे आयुष्य काय आहे हे आधीच नियतीने ठरवलेले आहे. त्यामुळे जे काही घडत आहे वा घडणार आहे, त्यासाठी त्याला शिक्षा देता येणार नाही. एवढेच नव्हे तर त्याला दोषही देता येणार नाही. नियतिवाद खरा असल्यास मनातील संघर्ष, आपण करत असलेली निवड, निवडीचे स्वातंत्र्य हे सर्व भ्रम आहेत.
याच बरोबर आपण आपल्या कृत्यांची अंतिम जबाबदारी स्वीकारू शकतो का, या प्रश्नाला ‘नाही’ म्हणूनच उत्तर द्यावे लागेल. यात जनुकीय भाग किती व बाह्य परिस्थितीचा भाग किती या वादात न शिरता आपण माणूस म्हणून उत्क्रांत होत असताना काही नैसर्गिक परिणामामुळे आपण जे आहोत, जसे आहोत, तशाचाच स्वीकार करायला हवा. जे यापूर्वी घडले आहे त्यासाठी आपल्याला दोषी ठरवता कामा नये. त्यामुळे मुक्त इच्छा जनुकीय की परिस्थितिजन्य असा वाद आता न राहता त्याचे मूळ आपल्याला भौतिकवादात शोधता येईल का हे तपासून पाहावे लागेल. एका आधारविधानानुसार सर्व भौतिक गोष्टी नियत असतात. नियतव्यवस्थेत जे काही घडत असते ते त्यापूर्वी घडलेल्या गोष्टींवर अवलंबून असते. जग भौतिकतेतून आलेले असल्यास ते असेच असायला हवे का, या प्रश्नाला अर्थ नाही. मुळातच हा विषय तत्त्वज्ञान व विज्ञान यांच्यातील वादग्रस्त विषय आहे. या वादात जास्त न शिरता भौतिकवाद व नियतिवाद हे दोन्ही वादातीत नाहीत, एवढेच आपण म्हणू शकतो. काही जणांना भौतिक जगात अनियततेला वाव आहे असे वाटते. पारंपरिकरीत्या आपण अंशतः भौतिक व अंशतः अभौतिक आहोत. आपले शरीर पूर्णपणे भौतिक असून मन मात्र कुठल्याही बंधनापासून मुक्त आहे. अभौतिक अशा स्वरूपातील या मनालाच मुक्त इच्छेचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. भौतिकता व नियतवाद आणि अभौतिकता व अनियतवाद यांत परस्पर संबंध असतो की नाही याबद्दल अजूनही शंका आहेत.
आपण मुक्त इच्छा कुठल्याही जगात असू शकत नाही असे विधान करत असल्यास मुक्त इच्छेच्या मूळ कल्पनेलाच सुरुंग लावल्यासारखे होईल. मुक्त इच्छेच्या संकल्पनेच्या मुळाशी जाऊन बारकाईने तपशील तपासल्यास मुक्त इच्छा भौतिकतेशी वा अभौतिकतेशी का अनुरूप नाही हे लक्षात येईल. यासाठी पुनः एकदा बहुपत्नीकत्वाकडे कल असलेल्या पुरुषाचेच उदाहरण घेऊ. त्याने विचार करून आलेल्या संधीचा फायदा घेतला नाही; त्या नेमक्या क्षणी त्याला हृदयविकाराचा झटका आला; त्या वेळी त्याला कुणीतरी जखडून ठेवले होते इ.इ. प्रकार घडले नाहीत. चालून आलेली ती संधी होती. त्याच्याही भावना उत्तेजित झाल्या होत्या. लैंगिकरीत्या तो सक्षम होता. परंतु सर्व काही नियतीप्रमाणेच घडत असल्यासही त्याची निवड ही खरी निवड असे म्हणता येणार नाही. आणि जबाबदारी पण त्याच्यावर नसते. कारण या सर्व गोष्टी अशाच घडणार हे पूर्वीच ठरले होते.तो अस्तित्वात यायच्या अगोदरच त्याचे नेमके काय होणार हे सर्व तपशिलासकट ठरीव होते. यावरून तरी नियतवाद मुक्त इच्छेला अव्हेरतो हे सिद्ध होऊ शकेल.
जर जग अभौतिक असेल तर यात काही बदल होऊ शकला असता का ? अनादि काळापासून या गोष्टी ठरल्या नसल्या तरी विनाकारण घडलेल्या गोष्टींसाठी कुणालाही वेठीस धरता येत नाही. जरी एखादी क्षुल्लक घटना निर्णायक वाटत असली तरी त्याच घटनेवर जबाबदारीचा शिक्का मारता येत नाही. वरील उदाहरणात पुरुषाने आपल्या भावना नियंत्रणात ठेवायला हव्या होत्या; त्याचा त्या क्षणीचा निर्णयच पुढील घटनाक्रमाची नांदी ठरतो; परंतु स्वतःची मनःस्थिती तशी का आहे याचा शोध त्याने कधीच घेतला नव्हता. ते स्वातंत्र्य त्याच्याकडे नसेल का? मुक्त इच्छेसाठी मनःस्थिती निवडण्याचे स्वातंत्र्य असावे लागते.
मनःस्थितीच्या निवडीचे स्वातंत्र्य व त्या अनुषंगाने स्वीकारण्यास भाग पाडणारी जबाबदारी काही विशिष्ट प्रसंगांत मिळू शकेल. तुमचे आरोग्य व मनःस्थिती बिघडवण्यासाठी आदल्या दिवशीचे अतिमद्यपान कारणीभूत असल्यास त्याची जबाबदारी तुमच्यावर असेल. योगासनामुळे मानसिक स्थिरता मिळू शकते, कामातील बदलामुळे मानसिक संतुलन व्यवस्थित राहू शकते, असे काही ठोकताळे मानसिक स्थितीसंबंधी मांडता येतील. मादक पदार्थांचे सेवन न करणे, योगासने करणे, किंवा कामात बदल करणे यामुळे मानसिक स्थिती स्थिरावू शकते. तरीसुद्धा या गोष्टी सुचण्याची वा न सुचण्याची मनःस्थिती कशामुळे झाली असेल, तर ती या अगोदरच्या मनःस्थितीतून आली असेल; असे विधान करत असल्यास प्रत्येक टप्प्याटप्प्यावर होत असलेले मनःस्थितीतील बदल शोधण्यासाठी फार फार पूर्वीच्या काळापर्यंत जावे लागेल. याचाच अर्थ असा की पहिली निवड करताना जी मनःस्थिती होती ती तुमची निवड नव्हतीच. म्हणून तुमच्या मनःस्थितीच्या निवडीला तुम्हाला जबाबदार धरता येत नाही. मग त्यासाठी तुमचे अस्तित्व व तुमचा स्वभाव यांना जबाबदार धरावे लागेल. आपण एखाद्या गोष्टीची निवड करताना त्यामागे आपल्या आशा-आकांक्षा असतात. परंतु आपल्या मनःस्थितीचीच निवड करण्याचे अनिर्बंध स्वातंत्र्य हवे असल्यास ते अवघड ठरेल.
या सर्व चर्चेत मुक्त इच्छेची कल्पना व त्यातून स्वीकारावी लागणारी अंतिम जबाबदारी. या बाबी मुळात अर्थाने आपल्याला मुक्त इच्छेचे वरदान कधीच मिळणार नाही. अनेक चित्रविचित्र संकल्पनांना वाव देणाऱ्या या जगात मुक्त इच्छा असण्याची शक्यता फार कमी आहे. यासाठी जगाला दोष देऊन चालणार नाही. आपणच फार भलत्या-सलत्या गोष्टींचा आग्रह धरत आहोत. परस्परविरोधी गोष्टींची मागणी करणे हेच मुळात चुकीचे आहे. कुठल्याही प्रकारचे जग असले तरी आपण असमाधानीच राहणार. याचा डार्विनवाद, भौतिकवाद किंवा नियतवाद यांच्याशी संबंध नाही.
देत त्या परहितवाद व जनुकयंत्र
मुक्त इच्छेला धोका याचाच अर्थ माणसाच्या नीतिमूल्यांना धोका. नीतिमूल्यांसाठी निवड हा निकष असते. निवडीलाच वाव नसल्यास नीतिमत्ता अशक्यातली गोष्ट ठरेल. पारंपरिक विचाराप्रमाणे भौतिकता आपल्याला खाली खेचत असते व अध्यात्म आपल्याला त्याच्या विरुद्ध जाण्यास सुचवत असते. ईश्वरप्राप्तीसाठी आणि/अथवा साधुत्वासाठी प्रयत्न करण्यास अध्यात्म साद देते परंतु अध्यात्माच्या पातळीला घेऊन जाणारे देवदूत नसल्यास आपण केवळ मातीमोल म्हणून जगू व इतर किडेमुंग्यांसारखे काहीही उद्देश नसलेल्या नैसर्गिक निवडीनुसार आकार घेत राहू !
आपण खरोखरच नैसर्गिक-निवडीचे अपत्य असल्यास ज्यात बळी तो कानपिळी हे तत्त्व लागू पडते नीतिमत्तेला मूळ आधार असा मानलेला परहितवाद संभवनीय नाही. नैतिक वर्तनात स्वहितापेक्षा परहिताला प्राधान्य दिले जाते. माणसामधील स्वार्थी वृत्तीला पण काही मर्यादा आहेत. म्हणूनच तो परोपकारी आहे असे वाटू लागते. माणसाच्या आयुष्यात असा एखादा दैवी क्षण येतो व तो आदर्श नसला तरी त्याच्या नीतिविकासाला तिथून सुरुवात होते. परंतु आपण जीवघेण्या नैसर्गिक निवडीच्या स्पर्धेतून उत्क्रांत झालेलो असल्यास आपण नेहमीच स्वतःचाच विचार करत राहणार, हे मात्र नक्की. आपले अस्तित्व टिकवणे व वंशसातत्य ह्यासाठी उत्क्रांतीने दबाव आणल्यामुळे आपण त्यासाठीच प्रयत्न करत राहणार. स्वतःच्या हितासाठी उपयोगी पडणारे परहित, याचा अपवाद वगळता दुसऱ्यांचे काहीही होवो त्याच्याशी आपले कर्तव्य नाही, अशीच वृत्ती आपल्यात असणार. याचबरोबर इतरही आपल्याकडे त्याच दृष्टीने बघत राहणार, हे विसरता कामा नये. मुळात परहितवाद अत्यंत ठिसूळ, कामचलाऊ व स्वार्थप्रेरित आहे. अशा परहिताला परहित म्हणावे की नाही, हाही एक मुद्दा आहे. ‘परहित’ हा शब्दच मुळात निवड करू शकणाऱ्या व/वा भावनाप्रधान अशा उच्च प्राणिवंशाच्या संदर्भात करता येईल. परहित ही दुसऱ्यांबद्दलच्या आपलकीच्या भावनेतन निर्माण झालेली आणि स्वतःचे हित बाजूला सारून दुसऱ्यांसाठी केलेली कृती. जीवशास्त्राच्या मते परहित म्हणजे एखाद्या सजीवाने स्वतःसाठी राखून ठेवलेल्या संसाधनांचा, भावना असो वा नसो, दुसऱ्या सजीवांसाठी वापर करणे.
जगभर आपण सगळीकडे स्वार्थाचाच अनुभव घेत असतो. फारच कमी लोक निःस्वार्थी आहेत हे लक्षात येऊ लागते. परंतु ही निःस्वार्थ कृतीसुद्धा कुठल्या तरी जाणिवेच्या पातळीवर स्वार्थप्रेरित नसेल, हे कशावरून ? कदाचित निःस्वार्थवृत्तीच्या दिखाऊपणातून आपापल्या श्रद्धेतील ईश्वराला आपण खूष करत असू. धार्मिक लोक कायम केवळ धर्मच निःस्वार्थीपणाला प्रेरणा देतो, असे विधान करून भौतिकवाद्यांना डिवचत असतात. परंतु मुळातच धर्म, धर्माचरण या गोष्टी ‘परलोका’तील ‘सुखा’साठीच असल्यामुळे त्या पूर्णपणे स्वार्थी हेतूनेच केलेल्या असतात. त्यामुळे या जगात खरा निःस्वार्थ नसेलच. परंतु काहीवेळा अशा निःस्वार्थी कृतीचा अनुभवही येत असतो. मग मात्र डार्विनवादातील भौतिकता खोटी आहे की काय असे वाटू लागते. दैवी क्षणामुळे/कृपेमुळे असे काही तरी करता येत असावे असे वाटते. परंतु आपली उत्पत्ती डार्विनवादातील निवडीप्रमाणे झालेली असल्यास आपण मुळातच स्वार्थी आहोत व निःस्वार्थीपणा हा एक भ्रम आहे.
स्वार्थीपणा/निःस्वार्थीपणा यांचा शोध घेण्यासाठी आपल्यापाशी निश्चित असे कुठलेही निकष नाहीत, हीच खरी अडचण आहे. आपल्या वृत्ती व भावना नैसर्गिक निवडीनुसार घडत असल्यास आपण निःस्वार्थी असू शकत नाही. नैसर्गिक निवड निःस्वार्थाला थारा देत नाही. खरोखरच अशी स्थिती आहे का ? या प्रश्नाचे उत्तर विज्ञानाकडून अपेक्षित आहे. परंतु विज्ञानाच्या काही मर्यादा आहेत व त्या मर्यादेत राहूनच या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल. सजीवांचा हा गुणविशेष डार्विनवाद्यांना बुचकळ्यात पाडणारा आहे. सजीवांचे अशा प्रकारचे वर्तन आत्मघातकी ठरेल. स्वतःच्या अस्तित्वासाठी किंवा आपल्या अपत्यांसाठी राखून ठेवलेला साठा इतरांसाठी उधळून टाकणारी परहितकृती स्वतःच्या पायावर दगड पाडून घेण्यासारखी आहे. ज्यांच्यासाठी हे उधळले जाते तेच काही काळानंतर उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही. परहिताचा हा गुणविशेष उत्क्रांतीच्या वाटेवरून जाताना केव्हाच नामशेष व्हायला हवा होता. अजूनपर्यंत तो का टिकून आहे याचेच अनेकांना आश्चर्य वाटते. माणसातील निःस्वार्थीवृत्ती हा त्याचा स्वार्थ लपवणारा मुखवटा आहे असे म्हटले तरी बुद्धिमत्तेच्या उतरंडीवरील काही प्राण्यांमधील अशा प्रकारची कृती अचंब्यात टाकणारी आहे.
डार्विनवादानुसार तगण्यासाठीच्या स्पर्धेतून सजीवांत नैसर्गिक निवड होत असते. त्यासाठीच्या गुणविशेषांवर त्या सजीवाचे अस्तित्व, पुनरुत्पादन व आनुवंशिकता अवलंबून असतात. जनुकीय सिद्धान्त या गोष्टी कशा प्रकारे घडत गेल्या याची कल्पना देते. सजीवाऐवजी जनुकांना महत्त्व दिल्यामुळे एखादा सजीव असा का ? या प्रश्नाला उत्तर मिळू शकते. जनुकीय सिद्धान्त हत्तीला सोंड का असते, मुंग्या संघटितपणे का राहतात, उंटाची मान उंच का, मनुष्यप्राणी अपत्यांना वाढवण्यासाठी एवढा दीर्घकाळ का घेतो, इत्यादी प्रश्न विचारत नाही. त्याऐवजी जनुके सजीवांची रचना कशी करतात, त्यांच्या प्रती कशा तयार होतात, तंतोतंत प्रती वसल्यास काय होईल, इत्यादी प्रश्न उपस्थित करतात. विशिष्ट परिस्थितीत तगण्यासाठी कुठल्या प्रकारचा स्वभावविशेष ह्या प्राण्यात असावा, त्याचे वर्तन नेमके कसे असावे, हे जनुके ठरवत असतात. माणसासारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या सजीवांना उपयुक्त ठरणाऱ्या भावना, बुद्धिमत्ता, उपजत शहाणपण, कार्यक्षमता इत्यादींचा आढावा घेत-घेत जनुके उत्क्रांत होत असतात. एकमात्र खरे की जनुकांचा हा सर्व आटापिटा आपल्या प्रती काढणे, प्रती काढणारे इंजिन म्हणून सजीवांचा वापर करणे, आणि या प्रती पुढच्या अनेक पिढ्यांना टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणे यासाठीच असतो. त्यासाठी वाटेल ती किंमत देण्याची, प्रसंगी स्वार्थी व निर्दयी होण्याची तयारी पण त्यांच्यात असते. परहितासाठी केलेल्या कृतीतसुद्धा छुपेपणाने जनुकांचा प्रसार करत राहणे हाच हेतू असतो. स्वार्थातून मिळणाऱ्या फलश्रुतीपेक्षा निःस्वार्थीपणाचा देखावा जास्त उपयुक्त ठरत असल्यास तसे करण्यात गैर काही नाही. परहित, परोपकार, निर्हेतुक कृती, निःस्वार्थीपणा यांच्याही काही मर्यादा आहेतच. वैश्विक प्रेम, विश्वबंधुत्व, या संकल्पना कानांना बऱ्या वाटत असल्या तरी उत्क्रांतीच्या संदर्भात त्यांची किंमत शून्य आहे. नैसर्गिक निवडीत त्यांना स्थान नाही. तरीसुद्धा उत्क्रांतीच्या मार्गक्रमणात या संकल्पना अजूनही टिकून आहेत. परहितातसुद्धा आप्तस्वकीयांचे परहित व पारस्परिक परहित असे दोन ठळक प्रकार आहेत.
जनुकांच्या प्रती पुढच्या अनेक पिढ्यापर्यंत टिकून राहण्यासाठी जनुकांच्या प्रती काढणाऱ्या इंजिन्समध्ये जीवघेणी स्पर्धा ठेवण्यापेक्षा त्यांच्यात सहकार असणे हा जास्त सोपा उपाय ठरू शकेल. जनुकांचे प्रेषण मूलतः सजीवांच्या पुनरुत्पादनातूनच शक्य आहे. त्यामुळे आप्तस्वकीयांना उद्युक्त केल्यास जनुकांच्या संख्येत वाढ होईल व त्या जास्तीत जास्त पिढ्या टिकून राहतील. एकमेकांचा गळा कापून एकट्या दुकट्यांच्या प्रती काढण्यापेक्षा आप्तस्वकीयांचे परहित, हा उपाय नक्कीच वरचढ ठरू शकेल. माणसाच्या नातेसंबंधांत ही सहकार्यभावना जास्त प्रकर्षाने जाणवत असते. परंतु रक्ताचे नाते नसतानासुद्धा कुठल्यातरी परक्याची काळजी जनुके का करतात हे एक न सुटणारे कोडे आहे. उत्क्रांत गुणविशेष मुळातच अगदी लहानसहान गोष्टीतूनच विकसित होत आलेले आहेत. कदाचित ‘परहिता’चे जनुक तगण्यासाठी किंवा आणखी प्रती काढण्यासाठी मदत करत असावेत. एखाद्या ‘हाऊसफुल्ल’ चित्रपटगृहातून बाहेर पडताना रांगेने, शिस्तीने बाहेर आल्यास काहीही इजा न होता बाहेर पडता येईल. परंतु रांग नसल्यास धक्काबुक्की होऊन एकमेकांना तुडवत बाहेर यावे लागेल. रांग, शिस्त अशा सामाजिक जाणिवा या तगून राहण्यासाठी पूरक ठरतात. परंतु वैयक्तिक महत्त्वाकांक्षा संथ गतीने चाललेल्या रांगेतसद्धा आपलाच नंबर पहिला असावा यासाठी धडपड करण्यास भाग पाडते. सामाजिक जाणिवेतून या महत्त्वाकांक्षेला आळा घालता येतो. जेव्हा जनुके परहिताचे प्रयत्न करतात तेव्हा पुनः स्वार्थाच्या मार्गावर येण्याची धडपड चालूच असते.
असे का घडत असावे यासाठी डार्विनवादी संख्याशास्त्रीय पुरावा देत आहेत. जनुके नेहमी वेगवेगळ्या भावनांचा प्रतिसाद आजमावून पाहात असतात. त्यांचे हे प्रयोग कायमचेच चालू असतात. त्यामुळे उत्क्रांतीत केवळ परहित, परोपकार, सहकार किंवा केवळ लांडीलबाडी, फसवणूक इ. नसून गुंतागुंतीचे अनेक प्रतिसाद गर्दी करत असतात. त्यांतील ज्या गोष्टी उत्क्रांतीला पूरक ठरू शकतात त्या टिकून राहतात व ज्या निरुपयोगी ठरतात त्या दूर फेकल्या जातात. टिकून राहिलेल्या प्रतिसादात पारस्परिक परहितही असू शकेल. शंभरेक दगड फेकल्यानंतर निदान एक तरी दगड लागेल हा संख्याशास्त्रीय नियम येथे पाळला जात असावा.
रिचर्ड डॉकिन्स यांच्या स्वार्थी जनुके’ (सेल्फिश जीन्स) विधानाचा विपरीत अर्थ जनमानसात ठसला आहे. उत्क्रांत फक्त स्वार्थी जनुकांचेच उत्पादन करते असाच अर्थ रूढ झाला आहे. जनुकांमधील हा स्वार्थच सजीवांमधील परहिताच्या गुणविशेषाला वाव देतो आहे याचे जनसामान्यांना विस्मरण झाले आहे. स्वार्थी जनुके याचा शब्दशः अर्थ स्वार्थासाठी जनुके असा घेतल्यामुळे हा गोंधळ उडाला असावा. मुळात स्वार्थ हा नेहमीच नंतर घडणाऱ्या घटनांसाठी असतो. भविष्याचा विचार त्यात असतो. स्वार्थी लोक आत्मकेंद्रित असतात. मात्र जनुकांना भविष्याशी देणे घेणे नाही. जे जनुक तावून सुलाखून तगलेले आहेत, ते पुढच्या पिढीसाठी प्रती तयार करण्यात मग्न असतात. पण ही कृती नियोजनपूर्वक केलेली कृती आहे, असे म्हणण्यास कोणताही आधार नाही. परिस्थितीत बदल झाल्यास जनुके प्रती काढण्यात यशस्वी किंवा अयशस्वी होतील. पण यशस्वी व्हावे म्हणून ते काहीही करणार नाहीत. त्यांच्या प्रती निघतच राहतील. प्रतींतील बारीक सारीक फरकांमुळे पुनरुत्पादित झालेली जनुके बदलत्या परिस्थितीशी सामना करू लागतील. त्यांच्या रंग, रूप वा आकारात बदल झालेला असेल व ती टिकून राहतील ज्यांच्यात बदलण्याची क्षमता नसेल ती जनुके नष्ट होतील. त्या सजीवांचा वंशनाशही होईल. त्यामुळे जनुकांना जे हवे व प्राण्याला जे हवे यांत मोठी तफावत असण्याचीपण शक्यता आहे. सजीवाला जे हवे आहे. त्याचा जनुकांवर परिणाम होत असावा.
जनुकांचे हितसंबंध व जनुकांचे वाहक असलेल्या प्राण्याचे हितसंबंध सारखे असल्यास जनुकांच्या प्रतीत वाढ होते. जनुकीय वाढीमुळे प्राण्यांचे हितसंबंध जपले जातात. माणसाचे दोन पायावर चालणे, मोठ्या मेंदूसाठी मोठे डोके असणे, यामुळे जनुकांचे हितसंबंध नक्कीच जपले जातील, परंतु प्राणी म्हणून बाळंतपणातील कष्ट, वेदना व धोका प्राण्यांना आवडणारे नाहीत. जनुकांच्या वाहकाच्या विरुद्ध जनुकांचे हितसंबंध आहेत की काय, असे अशा वेळी वाटू लागते. यावरून जनुकयंत्र म्हणून मानवी स्वभावाचा विचार करताना स्वार्थ व निःस्वार्थीपणा यांची सरमिसळ होत आहे हे लक्षात येऊ लागते. रिचर्ड डॉकिन्स ‘आपण सर्व जनुकयंत्रे आहोत’ असे विधान करतात तेव्हा यांत्रिकरीत्या आपण केवळ जनुकयंत्रे नाही, हेही त्यांना अभिप्रेत असते. आपण भौतिक व सांस्कृतिक वातावरणाच्या प्रभावाखाली वाढलेले, जाणिवा, संवेदना व बुद्धी असलेले, अमूर्त विचार करू शकणारे, भाव-भावनाना योग्य प्रतिसाद देणारे सजीव आहोत. जनुकयंत्रामुळे या सर्व गोष्टी घडल्या आहेत. या गोष्टी व्यवस्थितपणे समजून घेतल्यास आपण आपला स्वभाव समजून घेऊ शकतो.
८, लिली अपार्टमेंटस्, वरदायिनी सह. गृहसंस्था, पाषाण सूस रोड, पाषाण, पुणे २१.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.