इतिहासः कसा लिहावा व कसा लिहू नये !

[जयंत गडकरी हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि दामोदर धर्मानन्द कोसंबींच्या कल्चर अॅण्ड सिव्हिलायझेशन ऑफ एन्शंट इंडिया या ग्रंथाचे भाषांतरकार आहेत.]
आजचा सुधारक च्या ह्या अंकाने प्रा. दामोदर धर्मानंद कोसंबी ह्यांच्या जीवनपटावरील एक लेख, अॅडव्हेंचर्स इन्टू द अननोन ह्या निबंधातील निवडक उतारे आणि भगवद्गीतेवरील एक अत्यंत महत्त्वाचा लेख असे आपल्यापुढे सादर केले आहेत. प्रा. दा. ध. कोसंबी ह्यांची ग्रंथसंपदा आणि लेखसंपदा इतकी विविधविषयी आणि विस्तृत आहे, (त्याची माहिती पहिल्या लेखातून मिळते) की हे तीन लेख म्हणजे अफाट सागरातून ओंजळभर पाणी उचलण्यासारखे आहे.
गणित, विज्ञान, सांख्यिकी, नाणेशास्त्र, प्राचीन भारताचा (सामाजिक) इतिहास अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी अत्यंत वस्तुवादी, मूलभूत, सखोल संशोधन केले हे जगातील त्या त्या विषयांतील खास प्रावीण्य मिळवलेल्या शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. ह्या सर्व क्षेत्रांतील समान धागा, सूत्र किंवा प्रेरणा म्हणा हे सामाजिक सत्यशोधन हेच आहे. अर्थात् भारतातील (काही अपवाद सोडता) विद्वानांची सत्यशोधन आणि सामाजिक दृष्टिकोण ह्या दोन्ही कसोट्यांवर असलेली पात्रता पाहता त्यांना कोसंबी फारसे रुचले, पचले किंवा समजले नाहीत ह्यातही आश्चर्य नाही. सत्यशोधनापेक्षा इतिहासांतील चमचमते खडे शोधणे; मधाळ शब्दांचे रंगीबेरंगी फुगे उडवून किंवा ओजस्वी शब्दांचे फटाके फोडून वाचकांना भयचकित करण्यातच त्यांना जास्त रस. महाराष्ट्रात तर ज्यांनी दोन चोपड्याही लिखाण केले नाही अशा व्यक्ती गटबाजीच्या जोरावर निर्लज्जपणे ज्येष्ठ विचारवंत म्हणून मिरवताना आढळतात. काहींनी अर्वाचीन जातीय-जमातवादी किंवा वंशवादी विचारसरणीच्या पुष्ट्यर्थ अत्यंत विकृत आणि बाष्कळ प्राचीन इतिहासही लिहिला आहे. (उदा. हिंदुमहासभेचे पूर्वाश्रमीचे अध्यक्ष बॅ. वि. दा. सावरकर ह्यांनी प्राचीन हिंदुराष्ट्रवादाचा सिद्धान्त मांडताना शंकराचार्यांचे चार मठ, आणि चंद्रगुप्त मौर्य, दुसरा चंद्रगुप्त, विक्रमादित्य यशोवर्धन, पुलकेशी, श्री हर्ष अशा सम्राटांनी हिंदुराष्ट्राचा पाया घातला; त्यांनी धार्मिक, सांस्कृतिक वांशिक एकात्मकता सांधली, असा शोध लावला आहे. (हिंदुराष्ट्रदर्शन, पृ. ३९) एक तर शंकराचार्यांचे चार मठ हे अद्वैतवादी वेदान्तवादी तत्त्वज्ञानाचे मठ होते. शंकराचार्यांनी हिंदू आणि राष्ट्र हे दोन्ही शब्द कुठेही वापरलेले नाहीत. पण इतरही अनेक तत्त्वज्ञाने (दर्शने) तेव्हा अस्तित्वात असल्याचे हजारो पुरावे आहेत. त्याशिवाय भारतीय सम्राटांमध्ये सर्वांत जास्त व्याप्तीचे साम्राज्य अशोक ह्याचे होते. त्यांनी उल्लेखिलेल्या सम्राटांची राज्ये खूपच लहान, प्रादेशिक होती. पण सावरकर सम्राट अशोकाचे नाव घेत नाहीत कारण त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. (असे आहे बुद्धिवादी सावरकरांचे इतिहासलेखन!)
मी वर सत्यान्वेषी व समाजाभिमुख असे दोन शब्द वापरले आहेत. मला खरे तर समाजाभिमुख सत्यान्वेषी असा जोडशब्द वापरायचा आहे. पण समाजाभिमुख म्हणजे स्वतःच्या इतिहासाबद्दल, परंपरांबद्दल, खऱ्याखुऱ्या वा तथाकथित महानायकांबद्दल ; देव, धर्म, दैवते ह्याबद्दलच्या संकल्पनांबद्दल त्या त्या समाजांत असणारा अहंकार, अभिनिवेश किंवा त्यांतूनच इतर समाजसमूहांबद्दल घृणा, तिरस्कार, द्वेष पोसणे नव्हे. किंवा ‘आम्ही मागे पडलो कारण आमच्यांतील दळभद्री वृत्ती’ म्हणून अश्रू ढाळणे नव्हे. समाजाचा विकास का व कसा झाला? विकासक्रमात प्रत्यक्ष भौतिक अडथळे कोणते आले आणि का आले? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विकास म्हणजे काय ? कोणाचा विकास ? विकासाचे सामाजिक सांस्कृतिक निकष कोणते ? ह्याबद्दल ‘सत्य’ निर्भीडपणे मांडणे. निर्भीडपणा म्हणजे केवळ सांप्रत काळातील राजकीय मवाल्यांना न घाबरणे नव्हे, तर कोणत्याही प्रकारच्या खोटारड्या उदात्तीकरणाला, मग तो व्यक्ती, धर्म, परंपरा, भाषा, इतिहास कशाहीबद्दल असो अभ्यासपूर्ण मूलभूत मीमांसेचे नियम लावून, पृथक्करण करून धुडकावून लावणे होय. भगवद्गीतेची सामाजिक आणि आर्थिक अंगे हा लेख कोसंबींच्या अशा निर्भीडपणाचे एक उदाहरण आहे.
पुराणकथा आणि वास्तवता (मिथ अॅण्ड रिअॅलिटी) ह्या निबंधसंग्रहातील कोसंबी ह्यांचे एक वाक्य महत्त्वाचे आहे. कोसंबी म्हणतात : ह्या निबंधातील लेखांमध्ये एक समान लक्षण आहे. वाययीन/साहित्यिक उल्लेखांना प्रत्यक्ष पुराव्यांची जोड देऊन त्याचा अर्थ लावण्याकरिता हे निबंध लिहिले आहेत. ज्याची राष्ट्रभक्ती (!) ही सत्यशोधनापेक्षाही वरचढ असते, अशा टीकाकारांना प्रत्यक्ष संशोधनावर दिलेला भर अर्थातच आवडणार नाही. भारतीय तत्त्वज्ञानाच्या निर्दोष आणि शुभ्र लिलीच्या फुलाकडे दुर्लक्ष करून कुठल्या वास्तव परिस्थितीतील श्रद्धांच्या चिखलातून ते उगवले आहे, ह्याची चर्चाच कशाला हवी? असा त्यांचा प्रश्न असतो. पण खरे तर मुद्दा तोच आहे. सौंदर्याची आसक्ती असणारा कोणीही त्या सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतो, पण चिखलातून लिली का व कशी उगवते ह्याची शरीरक्रियावैज्ञानिक (फिझीऑलॉजिकल) कारणे शोधण्यास वैज्ञानिक दृष्टिकोण आणि संशोधन आवश्यक असते’ (मिथ अॅण्ड रिअॅलिटी पृ.१). मी तर पुढे जाऊन असे म्हणेन की भारतीय तत्त्वज्ञान किंवा इतिहास हा लिलीच्या फुलासारखा शुभ्र आहे की काळवंडलेला आहे हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. तत्त्वज्ञाने ही केवळ विचारवंतांच्या प्रज्ञेतून जन्म पावत नाहीत. त्या त्या वेळच्या सामाजिक संबंधांतून (म्हणजेच वर्गसंबंधांतून) ती जन्माला येतात. उत्पादनसाधनांनी तयार केलेली उत्पादने, उत्पादन करणारे, उत्पादनसाधनांवर मालकी हक्क असणारे, ह्यांमध्ये जे सामाजिक संबंध निर्माण होतात, त्यांतून जी ‘व्यवस्था’ निर्माण होते, तिचा प्रत्यय अनेक तहेने धर्म, नीतिव्यवस्था, कायदा, आदर्श ह्यांमधून दिसून येतो. ह्याचबरोबर उत्पादनसाधनांतील बदल व त्यामुळे सामाजिक संबंधांमध्ये जे परिवर्तन होऊ पाहते त्याचेही पडसाद ह्या सर्व क्षेत्रांत उमटतात.
तत्त्वज्ञान आणि सामाजिक परिस्थिती ह्यांतील परस्परसंबंधांवर प्रकाश टाकणारा फॅरिंग्टन ह्या पाश्चात्त्य विद्वानाचा उतारा देण्याचा मोह मला आवरत नाही. आपल्याकडे ‘अविद्ये’ च्या सिद्धान्ताला फार मान मिळाला. त्यातूनच श्रमाची कामे करणारे आणि त्यांचे ज्ञान ह्यांना अप्रतिष्ठा मिळाली आणि ब्रह्मविद्या, आत्मविद्या, स्वर्ग, नरक, ईश्वराला प्रसन्न करून घेण्याचे विविध मार्ग ह्यांना भयचकित आदराचे स्थान मिळाले. त्याच समांतर प्रक्रियेबद्दल फॅरिंग्टन लिहितो : “प्राचीन ग्रीक समाजांत दासप्रथा आल्यानंतर श्रमाची, कसबांची कामे त्यांच्यावर सोपवण्यात आली. स्वतःचे उच्चपद टिकवण्याकरिता आणि आपला अहंकार जपण्याकरिता श्रमाच्या कामाबद्दल घृणा निर्माण करण्यात आली. ह्या घृणेतूनच पुढे अनासक्त, आदर्शवादी, म्हणजेच वास्तववादी जगापासून मुक्त झाल्याचा आव आणणारी चिंतनवादी तत्त्वज्ञाने निर्माण झाली. प्लेटोने वास्तव जगाचे, निसर्गाचे ज्ञान म्हणजे खरे ज्ञान नव्हे, कल्पनाविश्वातील ज्ञान हेच खरे ज्ञान असे मांडले. डेमॉंक्रिटस ह्या तत्त्वज्ञाच्या विचाराप्रमाणे मनुष्य आणि जनावरे ह्यांतील मुख्य फरक हा हळूहळू, क्रमाक्रमाने का होईना माणसांच्या निसर्गावरील ताबा घेण्याच्या शक्तीमध्ये आहे. त्यालाच तो कसब, कारागिरी म्हणत असे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तेच ज्ञान होते, पण प्लेटोने त्या ज्ञानाला नीच दर्जा दिला (रिड्यूस्ट टू ए काइंड ऑफ लिंबो). आता हे ज्ञान गुलामांचे झाले. तत्त्वज्ञांचे सत्य राहिले नाही. लॉज (Laws) ह्या ग्रंथात प्लेटोने गुलामगिरीवर आधारलेल्या समाजपद्धतीची मांडणी केली आणि नंतर पृच्छा केली ‘आपण आपल्या नगारिकांची श्रमाच्या कामातून मुक्तता केली आहे. कसब कारागिरी, शेती गुलामांकडे सोपवली आहे. आपल्याला सन्मानाने व चांगल्या त-हेने जगता येईल येवढे उत्पन्न मिळेल अशी व्यवस्था केलेली आहे. आता आपण आपले जीवन कसे घडवावे ?’ खरे तर प्लेटोने असा प्रश्न विचारायला हवा होता ‘आपल्या सुखवस्तू जीवनाला सुसंगत अशी कोणती तत्त्वज्ञाने व विचारपद्धती आपण घडवाव्यात ?’ कारण हे नवे सुखवस्तू जीवन नव्या विचारपद्धतींना जन्म देत होते. वास्तव आणि शास्त्रीय विचारपद्धतींच्या विरोधात होते. निसर्गाच्या प्रक्रियांबद्दल प्रश्न विचारणे आणि त्याची उत्तरे शोधून काढणे हे त्यांना मान्य नव्हते. कारण माणसांच्या इच्छेप्रमाणे निसर्गाला वळण देऊ शकतील अशी सर्व साधने त्यांनी दास-गुलामांकडे सोपवली होती. (फिलॉसॉफी फॉर फ्यूचर-इंडियन फिलॉसॉफी – पान ८९. समाज आणि धर्म, पान १०९)
धर्मविचारांनीही शास्त्रीय विचारांना विरोध केला. येशूच्या नावाने ख्रिश्चन धर्मव्यवस्थेने कोपर्निकसला अमान्य केले. याज्ञवल्क्यांनी प्रश्न विचारून भंडावणाऱ्या गार्गीला तुझे मस्तक तुटून पडेल, अशी भीती घातली (गार्गी प्रातिप्राक्षी : माने मूर्धा व्ययत्वत्, अनतिप्रश्न्यां वै देवताम् अती पृच्छसी गार्गी… (छांदोग्य उपनिषद्, ३.६.१) मनूने तर वेदवाययाशिवाय इतर शाक्य (बौद्ध), जैन इत्यादि तत्त्वज्ञानांची प्रच्छन्नपणे निंदा केली आहे. चिकित्सकाचे अन्न पुवासारखे असते (पूयं चिकित्स्यान्नं (४.२२०)) अशी मखलाशी केली आहे. तत्त्वज्ञान किंवा धर्मविचार ह्यांना कार्यकारणभाव असतोच, फक्त त्या दृष्टिकोणांतून विश्लेषण करण्याचे धैर्य हवे.
वेदत्रयी, ब्राह्मणग्रंथ, ह्यांतील यज्ञसंस्थेचा सामाजिक कार्यकारणभाव कोणता होता? त्याला आह्वान म्हणूनच उपनिषदे, जैन, बौद्ध हे धर्मसंप्रदाय उभे राहिले. (ह्याची मीमांसा मी समाज आणि धर्म – ऋग्वेदकाळ ते पुराणग्रंथकाळ ह्या ग्रंथात केली आहे.) उमरावशाही (क्षत्रिय कुलगणराज्ये) मोडून काढण्याकरिता राजाने काय करावे, आपल्या राज्याची महसूलव्यवस्था कशी सांभाळावी ह्याचे दिग्दर्शन कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आहे. पूर्वीच्या कुठल्याही ग्रंथामध्ये न दिसणाऱ्या अराजकापासून (म्हणजेच संकरप्रक्रियेपासून) समाजाचे संरक्षण करण्याकरिता प्रभूने राजास निर्माण केले (७/३); नव्हे तर तो इंद्र, वायू, यम, सूर्य ह्या देवदेवतांच्या अंशापासूनच निर्माण केला गेला आहे (७/७/८), असे उल्लेख मनुस्मृतीमध्येच प्रथम का येतात? वैश्य, शूद्र, स्त्रिया ह्यांच्याबाबत मनू एखादा चिरडीला आलेल्या फॅसिस्टाप्रमाणे विषम आणि भयानक शिक्षा का सांगतो रूढ मार्गावरून ढळणे महत्पाप असल्याचा पुकारा करतो. बीभत्स नरकांचे भय निर्माण करतो. कारण वैश्यशूद्रांचे आर्थिक उत्थापन आणि बौद्ध जैन धर्मांच्या प्रसारामुळे जुन्या ब्राह्मणी धर्माची स्थिती दोलायमान झाली होती. हे धर्मग्रंथ ‘पवित्र’ न मानता, सामाजिक परिस्थितीचे ‘पुरावे’ म्हणून वाचणाऱ्यांच्या असे वास्तव सहज लक्षात यायला हरकत नाही.
पावित्र्याच्या पावित्र्यामागे मुळातील भूमिका ही आहे की भारतीय समाज हा प्रथम(?)पासूनच अत्यंत प्रगत, उन्नत होता. इतरांच्या मानाने जास्त पुढे होता. मग मागे का पडला, ह्याचे उत्तर एकतर शोधायचेच नाही किंवा मुस्लिमांचे आक्रमण, ब्रिटिशांचे आक्रमण अशी एकतर्फी कारणे पुढे करायची. हे सर्व जनतेला आवडते. त्यांचा अहंकार सुखावतो. मुस्लिमांचे आक्रमण यशस्वी का झाले ? त्याकाळी संबंध भारतभर लहानलहान राज्ये सरंजामदारी साखळ्या आणि जातीपाती-शिवाशीव ह्यामुळे निर्माण झालेली छिन्नभिन्नता हे कारण तर नव्हे ? छे! छे! असे काही नाही मुसलमान हे स्वभावतःच दुष्ट, कारस्थानी होते असे म्हटले की झाले.
तेही लोकांना आवडते. तेव्हा इतिहास असा लिहायचा की जो आपल्या लोकांना आवडेल. सत्यासत्यतेशी त्याचा काहीही संबंधच नाही. सामाजिक विश्लेषण तर वैचारिकदृष्ट्या अस्पय.
जे मंगल नाही, पवित्र नाही ते भारतीय नाही. हा पवित्रा केवळ प्रवचनकार कीर्तनकार इतिहासकारांचाच नाही; तर लो. टिळकांसारख्या विद्वान आणि राजकारणातल्या निर्भीड नरकेसरीनेही घेतला आहे. प्राचीन भारतीयांच्या ग्रंथसाखळीमध्ये अथर्ववेदही आहेत. ते यातुविद्या, मांत्रिकी, जादूटोणा, वशीकरण विद्या, मोहिनी विद्या सांगणारे आहेत. माणसाच्या बऱ्यावाईट वासना द्वेष, सूडबुद्धी, मोह, लोभ, लैंगिकतृष्णा वा राज्यतृष्णा अशांची तृप्ती करण्याकरिता त्यांमध्ये क्रियाकर्मे आणि उपाय सांगितले आहेत. अनेक इतर देशभक्त विद्वानांप्रमाणे टिळकांनीही ‘अथर्ववेद भारतीय आर्यांचे नाहीत’. अशी भूमिका भांडारकर मेमोरिअल व्हॉल्यूममध्ये मांडली आहे. एम. लेमॉरनॉट ह्या युरोपियन संशोधकाच्या चॅलडीयन मॅजिक ह्या ग्रंथाचा आधार घेऊन लोकमान्य लिहितात. “ह्या लेखावरून हे स्पष्ट होते की आर्य जेव्हा सत्प्रश्न आणि हितकारक शक्तींना आवाहन करीत, तेव्हा मंगोलियन हे विश्वांतील असत् आणि राक्षसी शक्तींना उत्तेजित करीत होते. ह्या लिखाणामुळे समांतरदृष्टी कोठे होत्या हे समजून येते. वैदिक धर्म हा त्रयीविद्येचा (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद) धर्म आहे. त्यामध्ये अथर्ववेदाला स्थान नाही. वेदत्रयीच्या बरोबरचे तर नाहीच नाही.”
मानवी समाजसमूह हे पाशवी, टोळीसंघ, शेतीव्यवसायी (प्रादेशिक) अशा विविध अवस्थांतून गेले आहेत. ज्या काळांत निसर्गप्रक्रियेचे, कार्यकारणभावांचे ज्ञान नव्हते, वैज्ञानिक ज्ञान अभावानेच होते, तेव्हा सर्व समाजात विश्व, निसर्ग, देव-देवता, धर्म ह्याबद्दलच्या आज अधम वाटणाऱ्या अशा ‘अंधक्षद्धां’चा उदय झाला. त्याबद्दल लाज वाटण्याचे कारण नाही. शरम वाटायचीच तर अजूनही ह्या श्रद्धा भविष्य, वास्तुशास्त्र, ग्रहशांती, मुहूर्त अशा अनेक स्वरूपांत आपल्यावर प्रभुत्व गाजवीत आहेत, ह्याबाबत वाटायला हवी. जयंतराव नारळीकर ह्याच्यासारख्या शास्त्रज्ञांनी ह्या श्रद्धांचे वैयर्थ्य मांडूनही, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि महादेवशास्त्री जोशी ह्यांच्यासारख्या व्युत्पन्न पंडितांनी त्यातील पोकळपणा उघड केल्यानंतरही किंवा संत तुकारामापासून संत गाडगेमहाराज अशा संतांनी अशा अंधश्रद्धांवर कोरडे ओढल्यावरही आजच्या सुशिक्षित वर्गात त्यांचे स्तोम वाढत आहे, ह्याबद्दल विचारवंतांमध्ये ना खेद ना खंत!
आपल्याकडे अजूनही श्रमाला, कसब-कारागिरीला प्रतिष्ठा नाही. उच्चतंत्रविद्याविभूषित व्यक्तींना आज भरपूर पगार मिळत असल्यामुळे ही परिस्थिती बदलत आहे. तरीही एकंदरीत श्रमकर्त्याला मानाचे स्थान नाहीच. पांढरपेशा ह्या शब्दाचा अर्थ तोच आहे. ह्या पांढरपेशा वर्गाला बुवाबाजीबद्दल प्रचंड आदर. मुळात ब्रह्मविद्या श्रेष्ठ. अविद्या (म्हणजे भौतिक जगाचे ज्ञान, श्रमाची कामे) कनिष्ठ. पण पोटापाण्याकरिता कारकुनी, व्यापार, उद्योग करण्यापासून तर सुटका नाही. चैन करण्याची हौस पाठ सोडत नाही. मग जमेल तेवढे ‘अध्यात्म’ करायचे. ह्या वृत्तीमुळे समाजामध्ये बुवाबाजीचे प्रचंड प्रस्थ माजलेले आहे. त्यातून पंचतारांकित बुवांचे तर जास्तच, कारण ते बुवा भोग आणि अध्यात्म हे दोन्ही साधण्याचा आदर्श दाखवतात. शरीराने भोग घेत मनाने काही काळ तरी मुक्त होण्याची ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ सांगतात. विषमता, अन्याय ह्यांनी ग्रासलेल्या व थोड्या तरी प्रमाणात त्याची झळ सर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या जगापासून मानसिकदृष्ट्या मुक्त करतो निदान तसा आभास तरी होतो; दोन क्षण का होईना मनःशांती मिळते. जागोजागी अशा दैवतांच्या. तथाकथित संतांच्या. ब्रह्मीभत स्वामींच्या ‘मठ्या’ उभ्या राहिल्या आहेत. वास्तवाकडे पाठ फिरवायला शिकवत आहेत. त्यांची विकृततेकडे झुकणारी किती उदाहरणे द्यावीत! एकच देतो. साईबाबा हे सुफी संत होते. ते संपूर्णपणे विरक्त होते. साधी कफनी आणि डोक्याला वस्त्र गुंडाळीत. स्वतःला मिळालेली भिक्षा इतर भुकेलेल्यांना वाटत. मृत्यूनंतर त्यांचे दफन केले गेले. पण आजच्या श्रीमंत मध्यमवर्गीय भक्तांनी त्यांना कृष्णावतार केले आहे. त्यांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट चढवला आहे. त्यांना भौतिक सुखाच्या इच्छेने नवस केले जात आहेत. “करी रासक्रीडा सवें कृष्णनाथा । नमस्कार माझा तया साईनाथा ।।” अशी त्यांच्या आरतीमधील एक ओळ आहे. पण ह्या सगळ्याबद्दल बोलायचे नाही. भक्तांच्या भावना दुखावतात. हे भावना दुखावण्याचे प्रस्थ इतके माजले आहे की कोणत्याही दैवताचे, व्यक्तीचे, संकल्पनाचे सामाजिक विश्लेषण केले तर हिंसेचा भडकाही उडू शकतो. भाबड्याभोळ्या भक्तीच्या जागी ढोंगीपणा हा नव्या भक्तिसंप्रदायाचा स्थायीभाव झाला आहे. पारंपरिक ब्राह्मणी वर्गच नव्हे तर नवशिक्षित सुखवस्तू मागास आणि दलितांतील नवा ब्राह्मणवर्गही त्या जथ्थ्यात उत्साहाने सामील झालेला दिसतो. एका बाजूने समारंभात फुले, आंबेडकर, आगरकरांच्या नावाचा जप करायचा आणि दुसऱ्या बाजूने असल्या ढोंगीपणाचाही अवलंब करायचा, ह्या कसरतीत तर आमचे नेते निष्णात आहेत. माझे तर चक्क मत आहे की आम्ही आज ह्या महामानवांचा पराभवच करत आहोत. त्यांचे विचार आत्मसात करण्याऐवजी त्यांचे पुतळे उभारत आहोत. ती दैवतीकरणाची नुसती सुरुवात आहे. त्याभोवती उद्या देवळे उभारली जाऊन त्यांची साईबाबासारखीच पवित्र संस्कृत भाषेत साग्रसंगीत पूजाअर्चा होऊन त्यांच्या कार्याचे संपूर्ण विडंबन होईल. आणि ज्या मागास, दलित आणि स्त्रीवर्गाच्या उत्थानाकरिता त्यांनी अथक प्रयत्न केले, तेसुद्धा ह्या नव्या अवतारवादाची कास धरण्यात गर्क होतील.
हे मी का लिहितो आहे ? कारण इतिहासाचे आकलन करण्याबाबत एकदा आंधळेपणा आला की वास्तवाकडे बघण्याची दृष्टीही अधू होते. नुसती अधूच नाही तर ती आत्मगौरव करण्यात, दुसऱ्या समाजाची हेटाळणी करण्यात समाधान मानते. इतर समाजसमूह मग ते जातीच्या, धर्माच्या, प्रदेशाच्या वा राष्ट्राच्या नावाने ओळखले जावोत, त्यांच्याबद्दल घृणा, तिरस्कार, द्वेष बाळगणे हा स्वभावच होतो. ह्याची उदाहरणे द्यायची गरज नाही. ही वृत्ती खऱ्याखुऱ्या मानववादी चळवळीला, समतेच्या सामाजिक अन्यायविरोधी चळवळीला अडथळा आणणारीच आहे. ह्याच प्रवृत्तीचा फायदा घेऊन विविध अस्मितांच्या नावाने डरकाळ्या फोडणारे नरभक्षक वाघ लोकनेते म्हणून मिरवत आहेत.
इतिहास आणि वर्तमान ह्यांचा अन्योन्य संबंध आहे. इतिहास लिहू इच्छिणाऱ्यांना कोसंबी सांगतात, ‘इतिहासकारांचे कार्य हे भूतकाळाच्या प्रेमात पडण्याने किंवा भूतकाळाला नकार देण्याने साध्य होणार नाही, तर वर्तमानकाळातील प्रश्नांचा योग्य उलगडा होण्याकरिता भूतकाळ समजून घेण्याचा प्रयत्न करणे हे त्यांचे कार्य आहे. योग्य इतिहास तेव्हाच लिहिला जातो, जेव्हा इतिहासकाराकडे वर्तमानांतील प्रश्नांचा खोलवर उलगडा करण्याची तयारी आणि कुवत असेल, तरच त्याला इतिहासावर प्रकाश टाकण्याचे कार्य करता येईल. इतिहासाकडून शिकणे ही एकतर्फी प्रक्रिया नाही. इतिहासाच्या प्रकाशात वर्तमानाचा उलगडा म्हणजेच वर्तमानकाळाच्या संदर्भात भूतकाळाचा अभ्यास आणि विश्लेषण. वर्तमान आणि भूतकाळ ह्यांचे परस्परसंबंध उलगडून ह्या दोहीबद्दल सखोल आणि वास्तव ज्ञान करून घेणे हेच इतिहासाचे कार्य आहे.
‘ (प्रकरण १, कल्चर अॅण्ड सिव्हिलायझेशन ऑफ एन्शण्ट इंडिया) एल-२/९ टिळक नगर नं.२, वृंदावन, चेम्बर, मुंबई ४०० ०८९.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.