दामोदर धर्मानंद कोसंबीः संक्षिप्त जीवनपट

‘भारतातील सर्वांत स्फूर्तिदायी इतिहासकार’ असे ज्याचे वर्णन जॉन की (John Keay) हे प्रख्यात इतिहासतज्ज्ञ करतात, आणि भारतीय इतिहास विद्येला एक नवा पॅराडाईम त्यांनी मिळवून दिला’ असे प्रा. रोमिला थापरसारख्या इतिहाससंशोधक मानतात. त्या दामोदर धर्मानंद कोसंबींचे हे जन्मशताब्दी वर्ष. इतिहाससंशोधक म्हणन कोसंबी विशेष प्रसिद्ध असले तरी गणित आणि संख्याशास्त्र ह्या विषयातील त्यांचा अधिकारही मोठा होता. त्यांच्या नावावर प्रसिद्ध झालेल्या सुमारे दीडशे लेखांतील साठेक लेख गणित व संख्याशास्त्र ह्या विषयांवरचे आहेत. ह्या सगळ्याच्या जोडीला समाज व विज्ञान ह्या विषयांवरील त्यांचे चिंतनही महत्त्वाचे मानले जाते.
पोर्तुगीज गोव्यात ३१ जुलै १९०७ रोजी कोसंबींचा जन्म झाला. वडील धर्मानंद कोसंबी संस्कृत व पालीचे गाढे अभ्यासक होते. बौद्धधर्माविषयी विलक्षण श्रद्धा निर्माण झाल्याने नेपाळ, श्रीलंका, ब्रह्मदेश अशी भटकंती करत त्यांनी पाली भाषेत असलेले मूळ धर्मग्रंथ अभ्यासून बौद्धधर्माची विधिवत दीक्षा घेतली होती. बौद्धग्रंथ ‘विसुद्दीमग्ग’ (विशुद्धीमार्ग) ची चिकित्सक आवृत्ती तयार करण्याच्या कामी मदत करायला त्यांना हार्वर्ड विद्यापीठाने आमंत्रित केले होते. त्या कालखंडातच त्यांची मार्क्स व समाजवादी तत्त्वज्ञानाशी ओळख झाली आणि त्यांच्या धार्मिक अभ्यासाला आधुनिक विचारांची व्यापक बैठक मिळाली.
वडिलांच्या आयुष्याचा, विचारसरणीचा फार मोठा प्रभाव दामोदर कोसंबींच्या आचारविचारांवर झाला. धर्मानंद एक ‘सश्रद्ध नास्तिक’ होते असे वर्णन त्यांचे चरित्रकार करतात. बौद्धधर्मातील शिकवणीनुसार अपरिगृहवृत्तीने ते जीवन जगले पण धार्मिक कर्मकांडात गुंतले नाहीत. बुद्धिवादी विचारसरणीला समाजवादी विचारांची जोड मिळाल्याने विवेकी आधुनिकतेची चौकट त्यांच्या तत्त्वज्ञानाला लाभली. वडिलांचा हा वैचारिक प्रवास दामोदर कोसंबींच्या घडणीत फार महत्त्वाचा होता. लहानपणी तल्लख बुद्धीचे विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध असलेले दामोदर प्रकृतीने थोडे अशक्तच होते. लाडावलेले, हट्टी, फटकळ पण दिलदार ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये उत्तरायुष्यातही टिकून होती.
१९१८ साली धर्मानंद दुसऱ्यांदा अमेरिकेला गेले तेव्हा १९ वर्षांची मोठी मुलगी माणिक व ११ वर्षांचा दामोदर ह्यांना घेऊन गेले. शालेय व त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी दामोदरांनी दहा वर्षे अमेरिकेत काढली. पौगंडावस्थेतील संवेदनक्षम काळातील ही दहा वर्षे त्यांच्या जडणघडणीत फार महत्त्वाची ठरली. स्वतःची ज्ञानलालसा पूर्ण करण्यासाठी तपश्चर्या केलेले धर्मानंद मुलाच्या ज्ञानसंपादनेबाबत आग्रही होते ह्यात नवल नाही. हार्वर्ड विद्यापीठासारख्या अग्रणी शिक्षणसंस्थेत शिकण्याची संधी मिळालेल्या दामोदरांनीही त्याचा चांगला फायदा करून घेतला. विज्ञान व तंत्रज्ञानावर विशेष भर असलेल्या ह्या परिसरातील उत्तम ग्रंथालयात उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध होती. वाचनाची आवड, वाचनाचा अफाट वेग आणि एकपाठी म्हणावी अशी स्मरणशक्ती यांची देणगी लाभलेल्या दामोदरांनी चतुरस्र वाचन केले. त्यांच्या प्रखर वैज्ञानिक भौतिकवादी दृष्टिकोणाची मुळे ह्या वाचनात होती. ह्या अवांतर वाचनामध्ये इतर भाषांतील साहित्याच्या वाचनाचाही अंतर्भाव होता ज्यामुळे दामोदर बहुभाषिक बनले ज्याचा उपयोग त्यांना आपल्या संशोधनकार्यात मोठ्या प्रमाणावर झाला.
सारसीरपला
ह्याच काळात प्रख्यात गणितज्ज्ञ व सायबरनेटिक्स शास्त्राचे जनक नोर्बर्ट वीनर ह्यांच्याशी दामोदरांची मैत्री झाली. त्या दोघांच्या मैत्रीबद्दल एका अमेरिकन मित्राचे निरीक्षण फार अर्थपूर्ण आहे : “… त्या दोघांमध्ये विलक्षण साम्य होते. बुद्धिमत्ता व क्षमता, विभिन्न विषयांतील रस, नाना भाषा शिकण्याची हातोटी, तसेच युद्ध व सामाजिक अन्यायाविरुद्ध परखडपणे टीका करण्याची वृत्ती, त्याचबरोबर आपल्या गणिती क्षेत्राच्या पूर्णपणे बाहेरील वैज्ञानिक व सांस्कृतिक घडामोडींवर अधिकारवाणीने भाष्य करण्याची त्यांनी कमावलेली कुवत त्या दोघांना एका खास गटात बसविणारी होती.”
एखाद-दुसऱ्या क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आढळतात पण वैज्ञानिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये अधिकार कमावणाऱ्या दामोदर कोसंबीसारख्या ज्ञानी व्यक्ती विरळाच. त्या अथ चरप होते.
१९२४ मध्ये शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळासाठी ते भारतात परत आले. भारतात घालवलेली ही वर्षभराची सुट्टी अनेक अर्थाने उपयोगी ठरली. कुटुंबापासून दूर अमेरिकेत राहिल्यामुळे झालेली भावनिक उपासमार शमली. वडिलांमुळे गांधीजी, आचार्य कृपलानी यांच्यासारख्या मान्यवरांना जवळून भेटता आले. भारतातील परिस्थितीची व येथील प्रश्नांची जाणीव झाली आणि अमेरिकेतील अनुभवांबरोबर ते ताडून बघता आले. १९२६ च्या जानेवारीत उच्च शिक्षणासाठी दामोदर पुन्हा हार्वर्डला परत गेले. तीन वर्षे त्यांनी सर्वार्थाने ज्ञान ‘उपभोगले’. त्यांची ज्ञानलालसा अमर्याद होती आणि ज्ञानाची सर्व दारे मुक्त असलेल्या अमेरिकेसारख्या देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला होता. त्यांच्या एका अमेरिकन मित्राने त्यांच्या खोलीचे केलेले वर्णन त्यांच्या विभिन्न ज्ञानक्षेत्रांतील संचाराची ग्वाही देईल
ह्या खोलीला शोभा आणेल असे एकच चित्र टांगलेले होते ते म्हणजे गांधीजींचे. खोलीच्या बाकी सर्व भिंती पुस्तकांनी भरलेल्या होत्या. त्या पुस्तकांच्या विषयांचे वैविध्य कोणालाही थक्क करणारे होते. विज्ञानातील विविध विषयांवरची पुस्तके होतीच, पण त्यातील बहुतेक जर्मन भाषेतील होती. (दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या काळात जर्मनी हे विज्ञानाचे सर्वांत महत्त्वाचे केंद्र होते.) याशिवाय भाषाशास्त्रावरचे मोठमोठे ग्रंथ होते. लॅटिन, ग्रीक, जर्मन, फ्रेंच व इतर भाषांतील बायबलच्या आवृत्त्या होत्या (निरनिराळ्या भाषांचा अभ्यास करताना तुलना करण्यासाठी ते बायबलचा वापर करीत.) शिवाय फ्रेंच, इटालियन, जर्मन भाषांतील साहित्याच्या पेपरबॅक्सची तेथे रेलचेल होती. अभ्यासाव्यतिरिक्त चवीने जेवणे, सिनेमे पाहणे, अभिजात संगीताचे कार्यक्रम ऐकणे आणि सुटीच्या दिवशी केंब्रिजमधून वाहणाऱ्या चार्ल्स नदीच्या काठाने मित्रांबरोबर दूरवर फिरायला जाणे हे त्यांच्या आवडीचे मनोरंजन होते. तीन वर्षांच्या अभ्यासानंतर १९२९ मध्ये हार्वर्डची ए.बी. (आर्टस् बॅचलर) ही पदवी घवघवीत यशासह त्यांनी मिळवली. ‘सुमाकम लॉड’ (आपल्याकडील डिस्टिंक्शन) हा प्रावीण्यदर्शक किताब व ‘फाय-बीटा-कॅपा’चे सदस्यत्व त्यांनी प्राप्त केले.
पण १९२९ सालीच अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत कोसळण्यास सुरुवात झाली होती. सुमाकम लॉड मिळूनही कोसंबींना पुढील शिक्षणासाठी फेलोशिप मिळाली नाही शिवाय एकाच विषयावर लक्ष केंद्रित न करता नाना विषयांत रस घेण्याची त्यांची वृत्तीही त्यांच्या निवडीच्या आड आली. पण अमेरिकेतील दहा वर्षांच्या अनुभवाने त्यांचे व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यपूर्ण बनले. उर्मटपणाकडे झुकणारा निर्भीड स्पष्टवक्तेपणा, व्यक्तिस्वातंत्र्य व श्रमप्रतिष्ठेला महत्त्व देण्याची वृत्ती, मानमरातबांच्या उतरंडीची पर्वा न करता सर्व थरांतील व्यक्तींशी बरोबरीने वागण्याची सवय, वस्तुनिष्ठतेबद्दल आदर हे त्यांचे स्वभावविशेष शेवटपर्यंत टिकून होते. १९२९ च्या सुमारास अमेरिकेतील उदारमतवाद लोपला होता आणि जीवघेण्या स्पर्धेत अल्पसंख्य गटांना दुय्यम दर्जाची वागणूक सहन करावी लागली होती. एक आशियाई व्यक्ती म्हणून कोसंबींनाही हे भोगावे लागले असणार. ह्या अनुभवामुळे कोसंबींच्या विचारांना डावे समाजाभिमुख वळण मिळाले असावे. उपेक्षितांबद्दल वाटणारी सहानुभूती व प्रस्थापितांच्या शोषक धोरणांविरुद्ध सात्त्विक संताप हा त्यांचा स्थायी भाव बनला. म्हणूनच त्यांच्या लिखाणात एक व्यापक मानवतावादी दृष्टिकोण प्रकर्षाने आढळतो.
१९२९ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी प्रथम बनारस हिंदू विद्यापीठात गणिताच्या अध्यापनास सुरुवात केली. पण त्या विद्यापीठातील पुराणमतवादी वातावरणात कोसंबींसारख्या पुरोगामी विचारसरणीच्या आणि काटेरी स्वभावाच्या व्यक्तीला फार काळ टिकणे शक्य नव्हते. वर्षानंतर लगेचच ते अलिगढ मुस्लिम विद्यापीठात दाखल झाले. आधुनिक गणिताचे एक संस्थापक म्हणून पुढे प्रसिद्ध झालेले आंद्रे वाईल हे तेव्हा तिथे काम करत होते. गणित-विभागाकरता चांगले सहकारी शोधण्याच्या प्रयत्नात ते होते आणि त्यांनी कोसंबी आणि प्रसिद्ध गणितज्ज्ञ प्रा. हार्डी ह्यांचे शिष्य डॉ. विजयराघवन् यांना अलिगढला येण्याचे आमंत्रण दिले.
अलिगढ विद्यापीठातील दोन वर्षांत डिफरेंशियल जॉमेट्री, पाथ स्पेसेस ह्या विषयांवरचे कोसंबींचे आठ संशोधन-लेख देशी व विदेशी संशोधनपत्रिकांत प्रसिद्ध झाले. पण सचोटीने शिकवूनही त्यांना विद्यार्थ्यांमध्ये गणितात मूलभूत संशोधन करण्याइतका रस उत्पन्न करता आला नाही. शिक्षणपद्धती आणि विद्यार्थी दोन्हीही निव्वळ परीक्षार्थी असल्यामुळे सर्व पक्षी असमाधान होते. त्यामुळे १९३२ मध्ये जेव्हा आंद्रे वाईल व विजयराघवन् अलिगढ सोडून गेले तेव्हा कोसंबींनाही तिथे राहण्यात रस उरला नाही. १९३३ साली ते पुण्याला फर्गसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापक म्हणून आले.
१९३३ ते ४५ असे एक पूर्ण तप कोसंबींनी फर्गसनमध्ये काढले. हा काळ त्यांच्या ज्ञानसाधनेचा होता. पुढे नानाविध क्षेत्रांत त्यांनी आधुनिक भारतातील एक आघाडीचा, समग्र दृष्टिकोण असलेला क्रांतिकारक विचारवंत म्हणून जी कीर्ती संपादन केली तिच्या पायाभरणीचे काम ह्या वास्तव्यातच झाले. कोसंबींची शिकविण्याची पद्धत म्हटली तर आदर्श होती. विषयाच्या मूलतत्त्वापासून ते सुरुवात करीत. विषयाचा एकंदर आवाका, इतर उपशाखांशी असलेले त्या विषयाचे लागेबांधे, विज्ञानाच्या इतर क्षेत्रांत त्याचा होणारा वापर याची जाणीव ते विद्यार्थ्यांना करून देत. ‘एखादे प्रमेय, एखादा सिद्धान्त समजून घेणे हे खरे महत्त्वाचे. ते समजावण्याचे काम माझे. पण एकदा सद्धान्त समजल्यावर त्याचा वापर करून प्रश्न सोडवणे तुम्हाला आले पाहिजे’ असे ते म्हणत.
आपल्याकडच्या परीक्षार्थी शिक्षणपद्धतीत अशाप्रकारच्या निर्मितिक्षम शिकवण्याला फारसा वाव नव्हता आणि समजूतदारपणासाठी कोसंबी प्रसिद्ध नव्हतेच. तडजोड करणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. शेवटी फर्गसन सोडण्याची पाळी त्यांच्यावर आली. पण ह्या कालखंडात गणिती संशोधनात त्यांनी मोठी कामगिरी केली. मान्यवर देशी आणि परदेशी संशोधनपत्रिकांत त्यांचे चौदा शोधनिबंध प्रसिद्ध झाले. गणितातील त्यांचा रस शेवटपर्यंत टिकून होता. त्यांचे शेवटचे हस्तलिखितही गणितातील नंबर थिअरीवरचे होते. परंतु १९३९ पासून त्यांचे संशोधनक्षेत्र रुंदावत गेले. गणिताबरोबरच इतर विषयांवरचे त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध होऊ लागले. प्राचीन संस्कृत ग्रंथांच्या चिकित्सक आवृत्ती, प्राचीन नाण्यांच्या अभ्यासासाठी संख्याशास्त्राचे उपयोजन, प्राचीन भारतीय इतिहास तसेच उत्खननशास्त्र अशा विविध क्षेत्रांत त्यांनी पुढे केलेल्या पथदर्शक कार्याची सुरुवात फर्गसनमध्येच झाली. ह्याचबरोबर मार्क्सवादी ऐतिहासिक भौतिकवादी दृष्टिकोणातून प्राचीन व अर्वाचीन घटनांची चिकित्सा, विज्ञान व समाज यांतील परस्परसंबंधांचा वेध असे सामाजिक प्रबोधन करणारे लिखाणही त्यांनी याच सुमारास सुरू केले.
फर्गसनमधील अखेरच्या वर्षांत कोसंबींचा डॉ. होमी भाभांशी परिचय घडून आला होता. भाभांनी त्यांना गणिताचे प्राध्यापक म्हणून टाटा मूलभूत संशोधन संस्थेत येण्याचे निमंत्रण दिले. १ जून १९४५ मध्ये कोसंबी तिथे रूजू झाले. सुरुवातीचा पाचेक वर्षांचा काळ कोसंबींना सुखाचा व भरभराटीचा गेला. ह्या नवीन नेमणुकीमुळे त्यांची मान्यता वाढली. १९४७ मध्ये दिल्लीत भरलेल्या भारतीय विज्ञान परिषदेमध्ये गणिताचे विभागीय अध्यक्षपद त्यांनी भूषविले. १९४८-४९ मध्ये युनेस्को फेलो म्हणून इंग्लंड-अमेरिकेचा दौरा केला. शिकॅगो विद्यापीठात जॉमेट्रीचे पाहुणे प्राध्यापक म्हणून टेन्सॉर अॅनालिसिस वर ३६ भाषणांचा कोर्स दिला. ह्या सर्व कामांबरोबरच इतर ज्ञानक्षेत्रांतील त्यांचे कामही चालूच होते. नाणकशास्त्रांतील त्यांच्या कामाकरता परदेशी बनावटीचा एक उत्कृष्ट तराजू संस्थेने खास त्यांच्याकरता मागवून घेतला.
भाभांच्या प्रयत्नाने टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा (टा.मू.सं.सं.) व्याप वाढत गेला. १९४७ साली स्थापन झालेल्या अणुशक्ति-आयोगाचे अध्यक्षपद भाभांकडे आले. संस्था-उभारणीच्या कामात गुंतल्याने त्यांचे संशोधनकार्य पूर्णपणे बंद पडले. कोसंबींना हे योग्य वाटले नाही.
भाभांशी दुरावा निर्माण होण्याचे अजून एक कारण म्हणजे भाभा पूर्णपणे अणुशक्तीला वाहिले गेले होते आणि कोसंबी अणुशक्तीचे टीकाकार होते. जागतिक शांतता परिषद ह्या साम्यवाद्यांच्या प्रभावाखालील संघटनेत त्यांचा सहभाग होता. अणुऊर्जेऐवजी सौरऊर्जेचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला.
भाभा व कोसंबी ह्यांचे मार्ग असे भिन्न होऊ लागले. संस्थेमध्ये कर्तृत्ववान संशोधकांची संख्या वाढत होती. रामनाथन्, चंद्रशेखरन् यांच्यासारखे धडाडीचे गणितज्ज्ञ संस्थेच्या गणितविभागास जगन्मान्यता प्राप्त करून देत होते. कोसंबींचे कार्य व्यक्तिगत स्वरूपाचे होते. विद्यार्थ्यांचा भरीव गट ते तयार करू शकले नाहीत त्यामुळे हळूहळू बाजूस पडत गेले.
संस्थेपासून अलिप्त झाल्यामुळे मिळालेला वेळ व शक्ती कोसंबींनी इतर कार्यक्षेत्रांत ओतली. १९४८ साली कोसंबींनी भर्तृहरीच्या शतकत्रयीची चिकित्सक आवृत्ती प्रसिद्ध केली होती. त्या त्यांच्या कामामुळे प्रभावित होऊन हार्वर्ड विद्यापीठातील संस्कृतचे संशोधक प्रा. इंगाल्स यांनी कोसंबींना हार्वर्ड-पौर्वात्य-मालेसाठी विद्याकर संकलित ‘सुभाषित-रत्नकोश’ ह्या संस्कृत-ग्रंथाची चिकित्सक आवृत्ती तयार करण्याचे काम दिले. १९५७ साली कोसंबींनी मार्क्सवादी इहवादी दृष्टिकोणातून लिहिलेल्या प्रस्तावनेसकट तो ग्रंथ प्रसिद्ध झाला.
भारतीय इतिहासविषयक संशोधनाचे त्यांचे कार्य अनेक वर्षे चालूच होते. प्रत्यक्ष क्षेत्रीय निरीक्षणाचे मानववंशशास्त्रीय व भाषाविषयक अभ्यासाच्या मदतीने केलेले विश्लेषण त्यांना त्या विषयात अधिकाधिक खोल नेत गेले. १५ वर्षांच्या त्या अभ्यासाची फलश्रुती १९५६ साली ‘भारतीय इतिहासाभ्यासाची ओळख’ इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन हिस्टरी हा ग्रंथ प्रकाशित होण्यात झाली. भारतीय इतिहासाच्या अभ्यासाला ह्या ग्रंथामुळे एक वेगळे वळण लाभले. तपशिलाच्या आणि विश्लेषणाच्या त्रुटी मान्य करूनही कोसंबींनी ह्या ग्रंथाच्या माध्यमातून जो आधुनिक दृष्टिकोण दिला आणि ज्या समग्र संयुक्त अभ्यासपद्धतीचा पुरस्कार केला त्यामुळे इतिहासकारांचे इतिहासकार होण्याचा मान त्यांना लाभला.
कोसंबींच्या म्हणण्यानुसार भारतीय समाजाची वाढ हिंसेपेक्षा एकापाठोपाठ होत गेलेल्या धार्मिक परिवर्तनांनी अधिक झाली. निरनिराळे टोळीगट एकत्र आणून सर्वसाधारण समाजात सामावून घेण्याची प्रक्रिया धर्मबदलांच्या आधारे झाली. यात परस्पर देवाणघेवाणही झाली. काठावरचे समाजगट त्यांच्या देवता आणि यातुविधीसह मुख्य प्रवाहात सामील झाले. एकत्रीकरणाच्या ह्या प्रक्रियेचे थर अवशेषरूपाने देशाच्या अंतर्भागात अजूनही टिकून आहेत. आर्यांच्या आधीपासून येथे अस्तित्वात असलेल्या मूळ आदिमजमातींकडे प्रथम लक्ष वेधण्याचे काम कोसंबींनी केले. आता भारताचा इतिहास आदिम जमातींपासून सुरू होतो.
१९५० पासून कोसंबी जागतिक शांतता परिषदेच्या कामात गुंतत गेले. जगभरातील डाव्या आणि समाजवादी विचारसरणीच्या वैज्ञानिकांचा आणि विचारवंतांचा परिषदेच्या कार्यात प्रमुख सहभाग होता. कोणत्याच चळवळीत फारसे न ओढले गेलेले कोसंबी ह्या कार्यात मात्र हिरिरीने उतरले कारण अण्वस्त्रविरोध व जागतिक शांतता ह्या गोष्टी मानवजातीच्या भवितव्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्यामागे ठामपणे उभे राहणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे अशी त्यांची भावना होती. शांतता परिषदेच्या कार्यकारी समितीचे आणि भारतीय शिष्टमंडळाचे एक सदस्य म्हणून युरोप, सोविएत युनियन, चीन व जपान येथे ते अनेक वेळा जाऊन आले. १९५५ साली हेलसिंकी येथे भरलेल्या जागतिक शांतता अधिवेशनामध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोसंबींनी केले. हे अधिवेशन परिषदेच्या कार्याचा सर्वोच्च बिंदू होता. त्यानंतर ह्या चळवळीला ग्रहण लागले. साम्यवादी पक्षातील वेगवेगळ्या गटांनी आपापल्या धोरणांचा पाठपुरावा करण्यासाठी परिषदेचा वापर करायला सुरुवात केली. कोसंबींनी १९६३ मध्ये परिषदेचा राजीनामा दिला.
शांतता-परिषदेच्या कामामुळे सोविएत युनियन आणि चीन ह्या दोन्ही देशांतील नवरचनेचे प्रयोग कोसंबींना अभ्यासता आले. चीनमधील राष्ट्र-उभारणीच्या प्रयोगांनी ते विशेष भारावून गेले होते. तिथे सहकारी तत्त्वावर चालणारी कम्यून्स भारताकरता मार्गदर्शक ठरतील असा त्यांचा विश्वास होता. महाराष्ट्रात त्या काळी सुरू झालेली सहकारी चळवळ त्यांना त्याच तत्त्वाला समांतर जाणारी घटना वाटत होती. चीनमधील पाणीवापराचे धोरणही त्यांना अनुकरणीय वाटत होते, ज्यात लहान शेतकऱ्याला उपयुक्त अशा सिंचनयोजनांवर भर होता.
विज्ञान आणि समाज ह्यांतील नातेसंबंधांबद्दल कोसंबींनी मांडलेले विचार आजही मौलिक वाटतात. “लोकविज्ञान’ ह्या संकल्पनेची मुळे त्यांच्या विचारात दिसतात. आधुनिक विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था आपल्यासारख्या मागास देशाच्या विकासाला मदत करेल असे भाभा आणि कोसंबी दोघांचेही मत होते पण भाभांच्या दृष्टिसमोर पाश्चात्त्य राष्ट्रांचे अनुकरण होते तर कोसंबींच्या डोळ्यांसमोर देशाचे राजकीय, आर्थिक व सामाजिक संदर्भ होते. पुढारलेल्या राष्ट्रांच्या तुलनेत येथील वरिष्ठ वर्गाला न्यूनगंड वाटू नये म्हणून अनेक भव्य दिखाऊ प्रकल्प उभारले गेले अशी टीका कोसंबींनी केली, त्याऐवजी येथील ताबडतोबीच्या गरजांवर उपायकारक आणि दीर्घकालीन धोरणांनाही अनुकूल असे सुयोग्य तंत्रज्ञान वापरले जावे असे आग्रही प्रतिपादन केले. त्यांचे ऊर्जाविषयक विचार तपासल्यास ही गोष्ट स्पष्ट होते.
कोसंबींनी जगभराच्या अणुशक्ती-कार्यक्रमाला विरोध केला कारण बहुतेक कार्यक्रम अण्वस्त्रनिर्मितीकरताच राबवले जात होते. एक ऊर्जास्रोत म्हणून अणुशक्तीला त्यांचा सरसकट विरोध नव्हता पण त्यातील धोके न ओळखता त्यामागे आंधळेपणाने धावणे त्यांना मान्य नव्हते. त्यांनी सौरशक्तीच्या वापराची भलामण केली, कारण आपल्या देशात मिळणारा तो एक मुबलक आणि फुकट ऊर्जास्रोत आहे. अणुशक्ती संशोधनावर जेवढा पैसा, बुद्धी आणि शक्ती खर्च केली त्याच्या एक शतांश हिस्सा जरी या दिशेने वापरला गेला असता तरी आज देशाचे वेगळे चित्र दिसले असते.
१९६२ मध्ये कोसंबी टा.मू.सं.सं.तून बाहेर पडले ते उद्वेगानेच. सलोख्याचे प्रयत्न ते करणे शक्यच नव्हते. ‘आमच्या बाबाचा (दामोदरचा) स्वाभिमान त्याच्या स्वतःपेक्षाहि मोठा आहे’ असे त्यांचे वडील धर्मानंदच त्यांच्याबद्दल म्हणाले होते. अनेक क्षेत्रांत त्यांचे संशोधनाचे काम स्वतंत्ररीत्याच सुरू होते पण संस्थेचा आधार सतत होता तो आता सुटला. स्वतःच्या तब्येतीबद्दलही ते साशंक होते. त्यात आता आर्थिक परिस्थिती लक्षात घेण्याची वेळ आली. ह्या सगळ्याचे सावट त्यांच्या मनावर आले.
१९६२ मध्येच दोन नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. हार्वर्डला ‘टागोर मेमोरियल’ भाषणमालेचे औपचारिक निमंत्रण त्यांना मिळाले आणि दुसरे निमंत्रण होते क्यूबामधून. नुकतीच क्रांती झालेल्या ह्या छोट्या देशाने शिक्षण – ज्ञानाचा प्रसार सर्वसामान्यांपर्यंत व्हावा ह्या उद्देशाने सोप्या भाषेतील विश्वकोशाचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यातील भारतीय संस्कृतीवरचे प्रकरण कोसंबींनी लिहावे अशी त्यांना विनंती करण्यात आली होती. दुर्दैवाने हे दोन्ही प्रकल्प नंतर बारगळले पण त्यासाठी केलेल्या कामाचा परिपाक म्हणून भारतीय इतिहासावरचे आणखी एक महत्त्वपूर्ण पुस्तक कोसंबींच्या हातून पूर्ण झाले. ‘कल्चर अॅण्ड सिव्हिलायझेशन ऑफ एन्शंट इंडिया’ – प्राचीन भारतीय संस्कृती हा तो गाजलेला ग्रंथ, ज्याच्या अनेक आवृत्त्या व भाषांतरे प्रसिद्ध झाली. एकप्रकारे हे पुस्तक त्यांच्या ‘भारतीय इतिहासाच्या अभ्यासाची तोंडओळख’ ह्या ग्रंथाचीच सोपी व काहीशी सुधारित आवृत्ती होती. सर्वसाधारण सुजाण वाचकाकरता पहिला ग्रंथ क्लिष्ट होता पण हा दुसरा सुबोध होता. १९८४ पर्यंत ह्या ग्रंथाच्या आठ आवृत्त्या भारतातच प्रसिद्ध झाल्या, इतका विलक्षण प्रतिसाद त्याला मिळाला. त्याच्या जपानी, फ्रेंच व जर्मन आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्या. इतिहासज्ञ म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कोसंबी मान्यता पावले.
ह्याच सुमारास म्हणजे जून १९६४ मध्ये त्यांच्या अनेक चाहत्यांच्या प्रयत्नाने वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे (C.S.I.R.) ‘सन्माननीय वैज्ञानिक’ म्हणून महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी ह्या संस्थेत त्यांची नेमणूक झाली आणि त्यांच्या आयुष्यातील दोन वर्षांचा अस्थिरतेचा काळ संपुष्टात आला.
इतिहाससंशोधनाच्या कामाबरोबरच त्यांचे गणितातील संशोधनही चालूच होते. गणितातील आपल्या कामाकडे प्रस्थापित जाणूनबुजून दुर्लक्ष करतात हे त्यांचे जुने दुःख होते. सांख्यिकी आणि नंबर थिअरी यांचा एकत्रित वापर करून त्यांनी जे काम केले होते ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी लंडनच्या रुटलेज अँड केगन पॉल ह्या त्यांच्या प्रकाशकांकडे पाठवले. त्यांच्यामते ते त्यांच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचे काम होते. दुर्दैवाने हस्तलिखित पाठवल्यानंतर आठवड्याभरातच कोसंबींचे निधन झाले. पुढे प्रकाशकांकडून ते गहाळ झाले आणि त्याची दुसरी प्रतही कोणास आढळली नाही. गणित हे त्यांचे पहिले प्रेम होते आणि त्यात महत्त्वपूर्ण काम करून नाव कमावण्याची जिद्द अखेरपर्यंत त्यांच्याबरोबर होती.
१९६६ साल उजाडले तेव्हा अनेक योजना कार्यान्वित करण्यात कोसंबी गर्क होते. वर उल्लेखिलेले गणितावरचे हस्तलिखित, ‘लिव्हिंग प्रीहिस्टरी इन इंडिया’ हा लेख, भासाच्या ‘अविमारक’ ह्या काव्याची चिकित्सक आवृत्ती, नंदीचे वशिंड’ ही बालवाचकांसाठी लिहिलेली कथा, जॉन अर्विन ह्यांच्या सहकार्याने कृष्णावरील एक पुस्तक, अशा अनेक योजना त्यांच्या हातात होत्या.
१९६६ च्या जानेवारीत भाभांचा विमान-अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्याआधीच पंतप्रधान शास्त्री ताश्कंद येथे निधन पावले होते व इंदिरा गांधी देशाच्या नवीन पंतप्रधान झाल्या होत्या. नेहरू व भाभांबरोबर विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्राथमिक जडणघडणीचे युग संपले होते. पुढच्या टप्प्यांत ह्या युगातील चुका सुधारून पुढचे पाऊल टाकणे आवश्यक होते. कोसंबींची मते, अनुभव, सल्ला मोलाचे ठरणार होते. मे महिन्याच्या अखेरीस दिल्लीत तिसऱ्या जगातील विज्ञान-तंत्रज्ञान प्रश्नांवर भरलेल्या परिषदेत कोसंबींनी मौलिक विचार मांडले, पण त्यांचे हे भाषण अखेरचेच ठरले.
२८ जून रोजी पुण्याला एका तज्ज्ञ डॉक्टरकडून त्यांनी आपली पूर्ण तपासणी करून घेतली. त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचा निर्वाळाही डॉक्टरांनी त्यांना दिला. त्या रात्री नेहेमीप्रमाणेच कोसंबी आपल्या अभ्यासिकेत उशीरापर्यंत लेखन वाचन करीत बसले होते. २९ जूनच्या पहाटे ते झोपले ते पुन्हा उठलेच नाहीत. हृदयक्रिया बंद पडून झोपेतच त्यांचे निधन झाले. चार दशकांच्या अथक अखंड संशोधनतपस्येची समाप्ती झाली.
[दामोदर धर्मानंद कोसंबी ह्या चिंतामणी देशमुख यांनी लिहिलेल्या चरित्रग्रंथावरून विद्यागौरी खरे ह्यांनी हा संक्षेप केला आहे. एक विचित्र योगायोग दिसतो, तो कोसंबी आणि देशमुख यांच्या निधनांतील साम्याचा! सं.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.