कोसंबी विचार-सार

काही लोकांसाठी प्रश्न सोडवत राहाणे श्वासोच्छ्रास करण्याइतके आवश्यक असते. याची कारणे मानसशास्त्राच्या क्षेत्रात येतात. पण वैज्ञानिक प्रश्नच का सोडवावे ? देवशास्त्र, साहित्य, कला, या क्षेत्रांमध्ये अभिव्यक्तीचे मार्ग का शोधू नयेत? अनेक कार्यरत वैज्ञानिक या प्रश्नांवर जाणीवपूर्वक विचार करत नाहीत. ज्या देशांमध्ये केवळ धर्मशास्त्र, देवशास्त्र, यांवरच विचारवंतांनी लक्ष केंद्रित केले, ते देश अडाणी आणि मागासलेले राहिले. हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा असूनही भारतासारखे ते गुलामगिरीत अडकले. या ह्रासातून सुटायला आधुनिक उत्पादनतंत्रेच मदत करू शकत, आणि त्यासाठी विचारवंतांनी विज्ञानावरच लक्ष केंद्रित करणे आवश्यक होते. एक जास्त मूलभूत संबंधही आहे. विज्ञान गरज ओळखते. स्वातंत्र्य गरज ओळखते. एखादी घटना का घडते ते जाणण्याने आपण त्या घटनेचे गुलाम न राहता तिच्यापासून काही लाभ कमावू शकतो. विज्ञानात विज्ञानाचा इतिहासही येतो. जे मूलभूत महत्त्वाचे असते ते माणसांच्या ज्ञानसाठ्याचा भाग बनून तंत्रज्ञानात परिवर्तित होते.
कोणताही वैज्ञानिक न्यूटनच्या प्रचंड योगदानाबद्दल साशंक नसतो. कोणताही वैज्ञानिक मुळातून न्यूटनचे लेखन वाचतही नाही. आजचा एखादा चांगला पदवीपूर्व विद्यार्थीही न्यूटनपेक्षा जास्त भौतिकी आणि गणित जाणतो; पण ते ज्ञान न्यूटनशिवाय कमावता आले नसते. ह्या ज्ञान साचत जाण्याचा परिणाम असा की विज्ञानापासून तंत्रज्ञान आणि यांत्रिक उत्पादनप्रक्रिया घडतात. पूर्वी प्रचंड श्रमशक्ती खाणाऱ्या क्रिया सोप्या होतात. यामुळे विज्ञानात सामाजिक क्षेत्रात बदल, सुधारणा करण्याची अतुलनीय क्षमता येते. कला, साहित्य, यांत वैयक्तिक पातळीवर मोहकता असते. आर्किमिडीज, न्यूटन, गाऊस ही एक साखळी आहे, प्रत्येक कडी मागील, पुढील कड्यांना जोडलेली. पूर्वीच्यांच्या शोधांशिवाय नंतरच्यांचे शोध शक्य नाहीत. (पण) शेक्स्पिअरच्या आधी इस्किलस किंवा कालिदास घडून गेले असण्याची गरज नाही. तिघांचीही स्वतंत्र स्थाने आहेत. यामुळेच नाट्याच्या क्षेत्रात ग्रीकांपासून आजपर्यंत कमी प्रगती दिसते, तर विज्ञान आणि गणितात जास्त. ईजिप्त, ग्रीस, चिनी मूर्तीमध्ये तंत्र, वस्तू, कलात्मक आकार, यांच्यात दिसणारी क्षमता त्यांना उत्कृष्ट दर्जा देते. पण ही गुणवत्ता पुढे साचत जात नाही. जर कलाकृतीशी कलाकाराचे नाव जोडलेले असेल, तर आणि तितपतच तो कलाकार भविष्यातही टिकून राहतो. वैज्ञानिकाने मात्र थोडेसे का होईना, काही सर्जक योगदान दिले, तर ते टिकून राहते भलेही त्याचे नाव अज्ञात असो किंवा चुकीच्या खात्यावर नोंदले जावो. म्हणून कलाकारापेक्षा वैज्ञानिकाने, “मी पूर्णपणे मरणार नाही. माझा बराच भाग लिबिटिना [ Libitina, बहुधा ‘विस्मरण’ या अर्थी ] पासून मुक्त राहील” असे म्हणणे जास्त खरे ठरते. देवशास्त्रातले सर्वांत तीव्र वाद तरवारींनी सोडवले गेलेले आहेत. विज्ञानात ‘प्रयोग’ ही जास्त प्रागतिक कसोटी वापरली जाते. ती जास्त सुसंस्कृतही आहे अर्थात एखादा कृतक-वैज्ञानिक थर्मोन्यूक्लियर किंवा जीवाणुधारित शस्त्रास्त्रांचे प्रयोग करू शकतोही.
फ्रॉईडने आपल्याला स्वतःकडे इमानदारीने पाहायला शिकवले. ‘आऊटलाइन ऑफ हिस्टरी’ लिहिताना एच.जी.वेल्सने पेशेवर बखरकार-इतिहासकारांना किती जास्त शिकायचे आहे, हे दाखवून दिले पण स्पेंग्लरने ते तसे शिकणार नाहीत, हे Untergangdes Abendlandes मध्ये दाखवून दिले. पाश्चर आणि क्लॉड बर्नार्ड यांच्या चरित्रांनी प्रयोगशाळांमधून रोगमुक्ती कशी मिळवता येईल हे दाखवून दिले. शरीरक्रियाशास्त्राच्या अभ्यासातून जहाल विषेही जीव वाचवण्यासाठी वापरली जाऊ लागली. हे आजच्या युगाचे खरे ऋषी आणि बोधिसत्त्व आहेत. त्यांच्या वैज्ञानिक कृतींनी माणसाचे स्थान उंचावले आहे. तुलनेसाठी पुराणकथांमधील ऋषिमुनींचे कथित आंतरिक परिपूर्णत्व पाहा, अनाकलनीय भाषेत मांडलेले, आणि टीकाकारांनी काल्पनिक स्पष्टीकरणांमधून विशद केलेले. अनाकलनीय संस्कृत शब्दांऐवजी आणखीनच लांब आणि निरर्थक इंग्रजी शब्द वापरून ‘करीयरे’ घडवता येतीलही पण एखादा आल्बर्ट श्वाइत्झर नाही घडणार.
स्वतःला सांख्यिकी शिकवायला मी एखादा व्यवहारी प्रश्न सुरुवातीपासून सोडवायचे ठरवले विद्यार्थ्यांचे परीक्षांमधले गुण. उत्तर असे आले की सोप्यातल्या सोप्या (कॉलेजातले पहिले वर्ष) परीक्षांचे भारतीय निकषही शिकवण्याच्या निकषांपेक्षा वेगळे होते. पंचवीस वर्षांमध्ये जर नव्वद टक्के विद्यार्थी अपेक्षित गुणांच्या ब्याऐंशी टक्क्यांवर कधी जात नसतील, आणि त्यांना शिकवणारे प्राध्यापक जर त्याहून कमी गुण मिळवून आले असतील, तर हाच निष्कर्ष निघतो. ज्या देशात शिक्षकी ही सफेद कॉलर पेशांची कचरापेटी मानली जाते, आणि जिथे शिक्षणाचे माध्यम एक परकी भाषा आहे, तिथे परीक्षा आणि शिक्षणात सुधारणा शक्यच नाही. यापेक्षा फलदायी प्रश्न होता ‘पंच-माड’ नाण्यांचा. वरकरणी ओबडधोबड वाटणारे ‘श्रेफ-माड’ चांदीचे तुकडेही आजच्या टांकसाळींमध्ये ‘पाडलेल्या’ नाण्याइतकेच बारकाईने वजन केलेले निघाले. आता जास्त काळ चलनात असलेली नाणी जास्त झिजणार तो समाजाने नाण्यांवर मारलेला ‘छाप’ असतो. आणि स्वैर-संतत (homogeneous random) क्रियांचा अभ्यास झालेला आहे. तर सात हजार चांदीच्या तुकड्यांचे एकेक करून वजन केले गेले आणि आधुनिक नाण्यांच्या झिजेशी त्यांचा संबंध लावता आला. नाणेशास्त्र हे अभिलेखशास्त्राचे (epigraphy) आणि पुरातत्त्वशास्त्राचे अंग न राहता वैज्ञानिक झाले. तक्षशिला येथील साठ्यातली नाणी कालक्रमानुसार काही प्रमुख वर्गांमध्ये विभागता आली सगळ्यांत हलकी, ती सर्वांत प्राचीन. नाणी तपासण्याची पद्धत मौर्यकालपूर्वीपासून वापरात आहे, हे कळले.
मग प्रश्न उभा झाला, की नाणी कोणी पाडली. तक्षशिला साठा शिकंदराच्या मृत्यूनंतर काही काळाने घडलेला आहे पण नाण्यांवर पंच-मार्कस कोणी ‘ठोकले’ ? पुराणे, बौद्ध व जैन सूत्रे, सारी बरेचदा एकाच राजासाठी वेगवेगळी नावे वापरतात. मग जुने लेखन तपासण्यासाठी मला संस्कृत शिकावे लागले तसे थोडे रंध्रांमधून आधी शोषून घेतले होते. पण प्राचीन वाक्प्रचार समजून घेणे हे नवशिक्याचे काम नव्हते. मग सांख्यिकी शिकताना वापरलेली पद्धत अवलंबली, की प्रत्यक्ष व्यवहारी प्रश्न सोडवायला घ्यावा. भर्तृहरीची सुभाषिते अभ्यासायला घेतली. त्याचे टीकाकार (समीक्षक या अर्थी) भर्तृहरीचे जे तत्त्वज्ञान सांगतात, ते त्याच्या काव्यातील वैफल्य आणि पलायनाच्या भावांपेक्षा वेगळे होते. पण हे एका लेखातून मांडल्यावर सर्व संस्कृतज्ञांच्या अंगावर शहारे आले. अशा त-हेने मी ‘छप्पर फाडून’ भारतशास्त्रात (Indology) शिरलो. माझ्या लेखात एक दोष होता. भर्तृहरी आणि त्याची संहिता या दोन्हींचे अस्तित्व जरा धूसर होते. म्हणजे संहितेची समीक्षा करणे आवश्यक होते. मुळात संहितेत तीनेकशे श्लोकच आहेत. त्यामुळे हे काम काही महिन्यांत संपायला हवे होते. चारेकशे हस्तलिखिते तपासताना आढळले की बऱ्याच श्लोकांच्या अनेक जरा जरा भिन्न आवृत्त्या (versions) होत्या, आणि समान श्लोकही काही वेगवेगळ्या पद्धतींनी वाचता येत होते. अडीच वर्षे ही झटापट केल्यावर जाणवले की हे काम अंगावर घ्यायलाच नको होते. पण अर्ध्यात सोडले तर श्रम वाया जाऊन नव्याने काम करणाऱ्यांसही काही मदत होणार नव्हती. पाच वर्षांनी भर्तृहरी संपादित झाला, आणि लेखक व त्याचे तत्त्वज्ञान न आवडणाऱ्यांनीही संहिता-समीक्षेच्या अंगाने कामाचे महत्त्व मान्य केले. यासाठी संपादनाच्या वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागल्या, कारण संस्कृतातील सर्वांत जुना श्लोकसंग्रह इ.स.११०० च्या सुमारास पाल वंशाच्या काळातील होता. तिबेटमधील भूर्जपत्रांवरील लेखनाची वाईट छायाचित्रे आणि एका अत्यंत भ्रष्ट नेपाळी प्रतीची छायाचित्रे, ही प्रमुख साधने होती. यातून माझे संस्कृत साहित्याच्या वर्गवारी स्वरूपाबद्दलचे मत सौम्य झाले नाही. पण संस्कृतप्रेमींनी अडगळीत टाकलेल्या पन्नासेक कवींना प्रकाशात मात्र आणता आले.
यातून संस्कृतावर काहीशी पकड तर आली, पण प्राचीन भारतीय इतिहासाच्या आकलनात फरक पडला नाही. त्यासाठीची साधने उपलब्धच नव्हती. माझे देशबांधव शंकास्पद साधनांना उत्साही कल्पनाशक्तीची आणि (एल. रनूच्या शब्दांत) ‘अचल तर्कशास्त्रा’ची जोड देऊन काम भागवीत होते. चंद्रगुप्त द्वितीय याच्या काळात राष्ट्रभावना आणि हिंदुधर्माचे पुनरुज्जीवन झाल्याचे सांगतात, पण त्या चंद्रगुप्ताबद्दल खात्रीलायक माहिती नाही. भारतीय राष्ट्रवाद हा आजच्या बूर्वा (नागर मध्यमवर्गी) युगातला प्रकार आहे. गुप्तकालाच्या बऱ्याच नंतर वेगवेगळ्या व्यापारी क्षेत्रामुळे प्रादेशिक भाषा विकसित झाल्या. याच्या आधी भारतीय राष्ट्रवादाची कल्पनाच करता येत नाही. आजचे भिन्नभाषक समूहांमधले तंटे हे प्रांतवार बाजींच्या विकासातून घडले आहेत. हिंदुधर्माची जाणीवच मुहंमदी आक्रमणांनंतर झाली. या साऱ्यावरून दोन पर्यायच स्पष्ट होतात. एक म्हणजे भारताला इतिहासच नाही असे मानणे, दुसरे म्हणजे इतिहास म्हणजे काय याची जास्त चांगली व्याख्या करणे. कार्ल मार्क्स पहिल्या पर्यायाचा पुरस्कर्ता होता, तर मी त्याच्याच लिखाणाच्या अभ्यासातून दुसरा पर्याय स्वीकारतो. उत्पादनाची तंत्रे व उत्पादक गटांमधील परस्परसंबंध यांच्या विकासाचा कालक्रमानुसार अभ्यास, म्हणजे इतिहास. जसे, ग्रीकांमधल्या गुलामाधारित व्यवस्थेऐवजी भारतात जातिव्यवस्था आली, याचे एकच कारण हे की भारतात वस्तूंचे उत्पादन कमी पातळीवर होते. इतर देश जसे घटनांनी भरलेले इतिहास सांगतात, तसे न करताच भारताचा इतिहास लिहिला जायला हवा.
पण यासाठी साधने कोणती उपलब्ध होती? नांगर हे अवजार एखाद्या राजघराण्यापेक्षा महत्त्वाचे, हे कबूल. पण त्याचा वापर केव्हा व्हायला लागला ? त्यामुळे जे अतिरिक्त (गरजेपेक्षा जास्त, surplus) उत्पादन झाले ते कोणत्या वर्गाने घेतले ? पुरातत्त्वशास्त्राने काही उत्तरे दिली, पण शेतकऱ्यांशी बोलून मला जास्त माहिती मिळाली. पुरातत्त्वांच्या उत्खननासोबत भाषाभ्यास आणि सामाजिक मानववंशशास्त्रातली क्षेत्रीय संशोधनेही जोडली जाणे आवश्यक होते. आपले खेडूत, कनिष्ठ जातींचे भटक्ये, अल्पसंख्य जमाती. हे सारे शहरी संस्कृतज्ञ पुराणलेखक ब्राह्मणांपेक्षा अनघड अवस्थेत जगतात. त्यांची दैवते जेव्हा ब्राह्मणी संस्कृतीकरणाने पौराणिक दैवतांशी जोडलेली नसतात, तेव्हा ती इतिहासपूर्व काळापासून चालत आलेली असतात. रोमन (देवदैवते घडल्यानंतरही) दगडी कु-हाडींचा बळी देण्यासाठीचा वापरही असाच (इतिहासपूर्व) होता. एखाद्या ग्रामदैवताचा मागोवा प्राचीन स्थलांतरांबाबत अमूल्य माहिती देतो. जुने वाटरस्ते, पशुपालक जमाती आणि अन्न गोळा करणारे समाज यांच्या संमीलनातून शेतीप्रधान वसाहती घडणे, साऱ्याबद्दल काही पुरावे सापडतात. आणि अशा निरीक्षणाची तपासणी तंत्रे भारताच्या प्रत्येक प्रांतागणिक नव्याने घडवावी लागतात. या अभ्यासाचे निष्कर्ष अॅन इंट्रोडक्शन टु द स्टडी ऑफ इंडियन हिस्टरी मध्ये प्रकाशित झाले. प्रतिसाद संमिश्र होता. मार्क्सचा उल्लेख अनेकांना घाबरवून गेला, तर रीतसर मार्क्सिस्टांना उपऱ्याचे काम शंकास्पद वाटले.
क्षेत्रातल्या कामातून नवे आणि मजेदार पुरावे अजूनही मिळत आहेत. मला सापडलेली सूक्ष्माश्म (microlith) हत्यारे विस्तृत क्षेत्रांतली आहेत, आणि काहींना छिद्रेही पाडलेली आहेत. तज्ज्ञ खिन्नपणे सांगतात की हे एकमेवाद्वितीय आहे. यावर्षी एक अनपेक्षित महाश्म संस्कृती (megalithic culture) सापडली. वर्षाला पन्नास हजार माणसे ज्या कार्ल्याच्या लेण्यांमधून फिरतात, तिथे कोणालाच न दिसलेला एक ब्राह्मी लिपीतला शिलालेख सापडणेही माझ्या नशिबात होते. नाणेघाटातून तारांवर धावणारी रेल्वे चमत्कृतिपूर्ण दिसेलही, पण माळशेत मिाळशेज घाटातून वाट काढल्यास मुंबई-अहमदनगर रस्ता काही लक्ष रुपये कमी खर्चात महाराष्ट्राला एक महत्त्वाचा राजमार्ग देऊ शकेल, हेही मला सुचवता आले.
[सामाजिक इतिहास समजायौँ दृष्टीने एखाद्या कुंठित (stagnant) वर्गात कोण वर तरंगत येतो हे महत्त्वाचे नाही, तर थोर संशोधक आणि त्यांचे सामाजिक परिसर यांच्यातले मूलभूत संबंध महत्त्वाचे आहेत. स्थितिप्रिय लोकांच्या दृष्टीने इतिहास व विशेषतः वैज्ञानिक इतिहास हा थोर लोकांच्या कार्यातून घडतो, मार्क्सवादी लोक छातीठोकपणे सांगतात की एखाद्या काळाची पायाभूत पण अव्यक्त सामाजिक गरज पूर्ण करणारे, तेच ‘थोर लोक’, जसे, बी. हेसेनने न्यूटनच्या कार्याचे मूल्यमापन वर्ग, काळ, स्थळ यांच्या तांत्रिक व अर्थशास्त्रीय गरजांच्या अंगाने केले. सर जॉर्ज क्लार्क या सतराव्या शतकाच्या युरोपीय इतिहासाच्या तज्ज्ञाने हेसेनचा प्रतिवाद केला, इतकी हेसेनची मांडणी त्यांना महत्त्वाची वाटली. क्लार्कना तो काळ जास्त माहीत होता, हे निर्विवाद. पण प्रतिवाद युक्तिवादाच्या पलिकडे गेला. क्लार्क सांगतात की सतराव्या शतकातील विज्ञान सहा एकमेकांमध्ये मिसळणाऱ्या प्रेरणांनी घडले. या बाह्य प्रेरणा होत्या. त्या वैज्ञानिक संशोधनाचे निष्कर्ष काही प्रमाणात झिरपून तंत्रज्ञानात परिवर्तित झाले. बाह्य प्रेरणांमध्ये आर्थिक जीवन, युद्धे, वैद्यक, कला आणि धर्म यांनंतर क्लार्क ‘निरिच्छ ज्ञानलालसे’चा उल्लेख करतात. माझ्या समजुतीप्रमाणे सर्व सहाही प्रेरणा मध्यपूर्व, ईजिप्त, चीन, बहुधा सिंधु-खोरे, अशा प्राचीन संस्कृतींमध्येही कार्यरत होत्या पण आज ज्याला आपण विज्ञान म्हणतो, ते घडले नाही. ते घडले गॅलिलिओच्या काळात. कोणता एक घटक गैरहजर होता ? युरोपातला आदि-बूर्जा समाज तर नव्हे ? सामाजिक संरचनेतच विज्ञानही कार्यरत असते, आणि त्या संरचनांपासून विज्ञान स्वतंत्र असू शकत नाही, हे मासिस्ट मानतात.
असाच विचार साहित्याबद्दलही करायला हवा. अतिसुलभीकरणाचा आरोप पत्करूनही एक प्रश्न विचारू शकतो शेक्स्पीयरच्या नाटकांमध्ये राजेरजवाडे भरपूर असूनही त्या नाटकांमध्ये एलिझबेदन काळातल्या आदिबूाजीचा उदय दिसतो का ? हॅम्लेट किंवा तिसरा रिचर्ड ही शेक्सपीरियन पात्रे बिओवुल्फ आणि शांसाँ द रोलांच्या नायकांशी ताडून पाहा. शेक्स्पीअरची लठ्ठ पात्रे, शायलॉक आणि फॉल्स्टाफ सामंती साहित्यात अकल्पनीय आहेत. त्या नाटकांमधल्या पात्रांची मानसिकता ‘आधुनिक’ आहे, म्हणूनच तेव्हाच्या आणि नंतरच्या नागर मध्यमवर्गीयांना ती नाटके आवडत आलेली आहेत. ट्रॉयलस आणि क्रेसीडा ही पात्रे होमेरिक नाहीत, तशीच ती सामंतीही नाहीत. न्यूटनचे लॅटिन गद्य आणि प्राचीन शैलीतल्या भौमितिक सिद्धतांमुळे ‘प्रिन्सिपिया’ वाचायला अनाकलनीय वाटते, पण म्हणून तो ग्रंथ रोमन किंवा ग्रीक विज्ञानात धरता येत नाही.
आधुनिक विज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे नगण्य यश, आणि प्रचंड अपयश, यांच्या विश्लेषणातून तत्त्वे शोधायला एखादे पुस्तकच लिहावे लागेल. पुढील विवेचनात भारतापुढील मोठ्या समस्यांसाठी विज्ञानाचे उपयोजनच फक्त विचारात घेतले आहे. भारतात यामुळे थोर शास्त्रज्ञांचा तुटवडा का जाणवतो, याकडे लक्ष दिलेले नाही.
तज्ज्ञ सांगतात की भारताची लोकसंख्या प्रमाणाबाहेर आहे. संततिनियमन आणि लोकसंख्यानियंत्रण केले जाईपर्यंत भारत गरीबच राहील. पण लोकसंख्येचे प्रमाण अन्नाच्या पुरवठ्याशीच ताडून ठरवायला हवे. अन्नाचा पुरवठा उत्पादन, वाहतूक, वितरण, यांनुसार ठरतो. एकूण अन्नाचे उत्पादन किती? आपल्याकडे दोन सांख्यिकीतज्ज्ञांच्या गटांमधले देवशास्त्रीय वाद आहेत, पण मुळात उत्पादन किती आहे, त्यातले किती उंदीर-घुशींपासून आणि अडत्या-दलालांपासून वाचून उपभोक्त्यांपर्यंत पोचते, या प्रश्नांवर भरवशाची आकडेवारी मात्र नाही. जर दुकानदार परिणामकारक नियंत्रणाभावी किंमती वाढवतात, तर राष्ट्रीय उत्पादनातल्या वाढीचा अर्थ काय ? तुटवडा धान्याचा आहे, की ग्राहकांच्या क्रयशक्तीचा ? सामान्य माणसांना कुटुंबनियोजन शिकवण्याआधी अंधश्रद्धांचे निर्मूलन करण्याबाबतही बरेच लिहिले जाते. मुलांच्या हव्यासाच्या अंधश्रद्धेला भक्कम आर्थिक पाया आहे. विकलांग वृद्धापकाळ गाठणाऱ्यांना केवळ मुलांचाच आधार असतो. शारीरिकदृष्ट्या सक्षम लोकांनाही उपजीविकेच्या सभ्य पातळीवर नेण्याचे धड प्रयत्नही होत नसताना लोकसंख्येच्या आकड्यांचे ‘नियोजन’ करण्यातला फोलपणा जन्मजात तज्ज्ञ सोडून सर्वांना कळतो. विनापत्यांनाही वृद्धापकाळच्या अन्नाची हमी द्या, काळजी घेतली जाण्याची हमी द्या, आणि कुटुंबनियोजन आपोआप लोकप्रिय होईल की नाही ते पाहा.
वैज्ञानिक प्रयत्नांचा सदुपयोग कसा करता आला असता याचे एक उदाहरण पाहा. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत उसाच्या चिपाडाच्या उपयोगांवर संशोधन करण्यासाठी बराच पैसा खर्च होईल. आज चिपाडाचा जळण म्हणून आणि राखेचा खत म्हणून वापर होतो. कागद किंवा इतर वस्तू तयार करता येतात, हे चांगले माहीत आहे. पण यावर आणखी संशोधन करावे का ? चिपाडाचे इतर उपयोग केल्याने साखरउद्योगाला वेगळे इंधन शोधावे लागून साखर आणखीच महाग होईल. वेगळे उपयोग करायला परकीय चलन वापरून यंत्रे आणावी लागतील, आणि महागाचे ‘तज्ज्ञ’ही लागतील. पण जर चिपाड बंदिस्त भांड्यांमध्ये आंबवले (षशीशपी केले) तर वायुरूप इंधन मिळेल. उरलेला चिखल (Sludge) हा उत्तम खतासारखा वापरता येईल. याने जमीनही सुधारेल आणि रासायनिक खतेही वाचतील. पण ही योजना (माझी नव्हे, एका हंगेरियन शास्त्रज्ञाची) मागे लोटली गेली आहे.
दुसरे उदाहरण धरणांच्या उंचीचे. धरणांची किंमत कमी ठेवूनही धरणे पाचेक टक्के वर्षे सोडता भरली जाऊन हवी असतात. पर्जन्यमान आणि त्यातला वाहून जाणारा भाग माहीत असला, तर हा सांख्यिकीचा प्रश्न आहे. योजना आयोगाने ही तत्त्वे मान्य केली (माझी, पण मी सुचवल्यासारखी नव्हेत). पण सोबतच एक सूचना अभियंते आणि योजना आयोग या दोघांनीही टाळली. ती सूचना नकाशांवरून अनेक छोट्या धरणांच्या जागा शोधून तशी धरणे स्थानिक वस्तु-सामान आणि स्थानिक श्रम वापरून बांधण्यासंबंधी होती. असे केल्याने पावसाचे पाणी साचून आज एकच पीक घेणाऱ्या क्षेत्रांत दुबार, तिबार पिके घेता येतील. इथे खरा अडथळा तंत्रज्ञानाबाबत अज्ञानाचा नसून जमिनीची खाजगी मालकी, आणि अशा मालकांमधला सहकार्याचा अभाव, हा आहे.
या देशाला सर्व उपलब्ध ऊर्जास्रोत हवे आहेत, पण ते उभारायला पैसे नाहीत. अणु-ऊर्जेसारखी महाग आणि आधुनिक भासणारी यंत्रणा उभारायला पैसे नाहीत. विकसित देशांकडे सूर्यप्रकाश कमी असल्याने ते सौरऊर्जेकडे दुर्लक्ष करतात. मात्र त्यावर आपण संशोधन करणे फायद्याचे ठरेल. आपला प्रश्न केवळ ऊर्जा-उत्पादनाचा नाही. चांगल्या शेतीसाठी नव्याने वनीकरण व्हायला हवे. सर्पणाची आणि लोणारी कोळशाची गरज कमी केल्याशिवाय हे शक्य नाही. खनिज कोळशाचे उत्पादन उद्योगांनाही पुरत नाही, आणि खनिज तेल आयात करावे लागते. चांगल्या सौरचुली हा पर्याय होऊ शकतो. अशा चुली अस्तित्वात आहेत, आणि परदेशांत वापरल्या गेल्या आहेत. पण भारतीय सौरचूल अत्यंत अकार्यक्षम आहे. (जरी भारतात अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भौतिकशास्त्रज्ञ असले, तरी). जाहिरातबाजी आणि खोटारडी वापराची उदाहरणे यांमुळे उत्पादकाने मात्र फायदा कमावला.
अणु-उत्सर्गाच्या परिणामांवरचा भारतीय संशोधन अहवाल भुसभुशीत आहे. जपानने किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम भोगले आहेत, दुर्दैवी तीव्रतेने. तिथलीच माहिती दुर्लक्षित करून भारतीय अहवालकर्त्यांनी आपल्या नैतिक आणि वैज्ञानिक क्षमतांचा तोकडेपणा उघड केला आहे. मृत्यू हा मोठा दुष्परिणाम नाही अनेक भारतीयांसाठी ती सुटका ठरेल. धोका आहे जेनेटिक विकृतींनी मानवजातीलाच इजा होण्याचा. (संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या) ड्रोसोफिला मेलानोगॅस्टर या केंबरावर (Fruitfly, bananafly) किरणोत्सर्गाचे परिणाम तपासले गेले आहेत. उंदरांवरचे परिणाम अमेरिकेत तपासले गेले आहेत. माणसांमध्ये गर्भारपण व प्रौढत्वापर्यंतच्या विकास होण्यात वेळ जास्त लागतो, आणि माणूस केंबरे आणि उंदरांपेक्षा जास्त व्यामिश्र शरीरचनेचा प्राणी आहे. यामुळे जेनेटिक मोडतोडीची शक्यताही जास्त असते. एखादेवेळी काय बदल झाले आहेत ते समजायला वीसेक पिढ्याही जाव्या लागतील. तोपर्यंत बदल लक्षावधी माणसांत पसरलेले असतील, आणि रोग म्हणून नव्हे, तर दुरुस्त न करता येणाऱ्या आनुवंशिक गुणांच्या रूपात बदल स्थिरावतील. मानवजात स्वतःच्या भविष्याशी असा सट्टा खेळू शकत नाही, मग ते भविष्य कम्युनिस्टांच्या हाती असो वा नसो. अणुयुद्धे आणि अणुचाचण्या थांबायलाच हव्यात. आज ही मते सुरक्षितपणे मांडता येतात, कारण ती ‘फॅशनेबल’ झाली आहेत.
[१९८५ साली मुंबई विद्यापीठाच्या इतिहास-विभागाने डी.डी.कोसंबी ऑन हिस्टरी अँड सोसायटी : प्रॉब्लेम्स ऑफ इंटरप्रिटेशन हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यात ‘प्रस्तावनेऐवजी’ म्हणून कोसंबींनी करंट ट्रेंड्स इन इंडियन फिलॉसफी (संपादक : के. एस. मूर्ती व के.आर.राव, मुंबई, १९७२) या पुस्तकासाठी लिहिलेल्या अॅड्व्हेंचर्स इन्टु द अन्नोन या लेखातली काही उतारे प्रकाशित केले. मथळा दिला इन प्लेस ऑफ अॅन इंट्रोडक्शन : कोसंबी ऑन हिज फिलॉसफी.
कोसंबींचे सर्व गुणधर्म (गुणदोष!?) दाखवणारे हे उतारे आहेत. त्यांचे हे मराठी भाषांतर.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.