मानवी स्वभाव व डार्विनवाद (५)

[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे.
प्रभाकर नानावटींनी संपूर्ण पुस्तकाचे भाषांतरही केले आहे व ते प्रकाशनाच्या प्रयत्नात आहेत. सं.]
नीतिमत्तेची चिकित्सा
डार्विनवादावर नेहमीच नीतिमत्तेला दुय्यम स्थान देत असल्याचा आरोप केला जातो. परंतु असे आरोप करताना वस्तुस्थिती काय आहे याचाही अंदाज घ्यायला हवा. लोक नीतिमत्तेची घसरण होत आहे असे म्हणत असताना काही विशिष्ट प्रकारच्या नीतीच्या मापदंडाचा व नीतिधोरणांचा आग्रह धरत असतात. एखाद्याने रूढ वा रुळलेल्या राजकीय, सामाजिक वा धार्मिक मार्गाऐवजी दुसरी वाट चोखाळली असल्यास त्याने सर्व नीतिमत्ता झुगारून टाकली, अशी ओरड केली जाते. तशीच परिस्थिती डार्विनवादासंबंधीपण आहे. डार्विनवाद एका वेगळ्या चौकटीतून मानवी स्वभावांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे ‘डार्विनवाद नीतिमत्तेला तिलांजली देत आहे’ या आरोपात तथ्य नाही मुळातच आदर्श नीतिमूल्ये कोणती, त्यांसाठी काय करायला हवे इत्यादी गोष्टी आधिभौतिकीशी (मेटाफिजिक्स) संबंधित आहेत. हे शास्त्र सार्वजनिक नैतिक सत्य म्हणजे नेमके काय याचा शोध घेत असते. त्यामुळे वस्तुनिष्ठ नैतिकता, नैतिक सत्य केव्हा, कसे, कधी आले या प्रश्नांची उत्तरे डार्विनवादात शोधणे तात्त्विकदृष्ट्या बरोबर ठरणार नाही. फक्त प्रश्नाचे स्वरूप बदलून ही चर्चा पुढे नेता येईल. उदाहरणार्थ, नैतिक सत्य असे काही तरी असू शकते का ? काही गोष्टी इष्ट किंवा अनिष्ट असू शकतात का काही व्यवहार नैतिकदृष्ट्या स्वीकारार्ह असू शकतात का ? वगैरे, नीतिमूल्यावरील प्रश्न किंवा नैतिक प्रगतीची शक्यता यांना पूर्णपणे अव्हेरण्यापेक्षा असे म्हणावे लागेल की अशा प्रकारचे प्रश्न-मर्यादित स्वरूपात डार्विनवादाशी संबंधित असू शकतात.
पारंपरिक विचार करणाऱ्यांचे नैतिकतेचे काही मापदंड ठरलेले असतात. नैतिकतेतील उणिवा आणि/अथवा सुधारणा सुचवताना कळत न कळत ते त्या मापदंडाशी तुलना करत असतात. धर्मसंकल्पनेत तर आपण सर्व पापी आहोत याबद्दल तिळमात्र शंका नाही. परंतु त्यासाठी धर्मप्रचारक व समाजशास्त्रज्ञ जनुकांऐवजी समाजाला दोषी ठरवतात. समाजच मुळात स्वार्थी असून समाजच प्रत्येक व्यक्तीला स्वार्थी बनण्यास उद्युक्त करतो, असा त्यांचा दावा आहे. असे मत मांडणारे माणसांत नैतिक सुधारणेला भरपूर वाव आहे
अशी खात्री बाळगून आहेत. परंतु आपली नैतिक व्यवस्था व नैतिक अंतःप्रेरणा, हे भौतिक नियम व नैसर्गिक निवडीतूनच आलेले असतील तर एवढा आटापिटा करण्याची काय गरज आहे ? नैतिक सत्य जाणून घेणारी जाणीव ही काही आकाशातून उतरून आपल्या शरीरात संचार करत नाही वा त्याचे बीजारोपण बाहेरून आपल्यात झाले नाही. कदाचित ही नैतिक जाणीव पारस्परिक व आप्तस्वकीय परहितता कार्यरत व्हावी यासाठी स्वार्थी जनुकांनी केलेली एक सोय असू शकेल. हे खरे असल्यास नैतिकतेच्या दबावाखाली आपण का म्हणून राहावे ? इतर आपल्याला काय म्हणतील अशी भीती का बाळगावी?
ईश्वराची वा नरकात जाण्याची भीती यामुळे लोक नीतीचा आधार घेतात. ईश्वरावरील श्रद्धा हे एक नीतिमूल्य आहे, असे अनेक आस्तिक तत्त्वज्ञांना वाटत आले आहे. सामान्यपणे ईश्वरावर श्रद्धा असणाऱ्यांना नीतिमत्तेच्या संबंधातील सर्व गोष्टी खऱ्या वाटू लागतात. इतिहासकालापासून धर्मशास्त्रात ही चर्चा अशीच चालू असून ती संपण्याची चिह्ने अजून तरी दिसत नाहीत. परंतु त्यात वस्तुनिष्ठता नाही. वस्तुनिष्ठ नैतिक सत्य असे काही तरी अस्तित्वात असून त्यासाठी ईश्वराची गरज भासते, असे वाटत असल्यास गोंधळात आणखी भर पडेल. ईश्वराविना वस्तुनिष्ठ नैतिक मापदंड असू शकणार नाहीत, हे खरे असेल का ?
उत्क्रांतीतून उदयास आलेल्या जनुकयंत्र संकल्पनेत वस्तुनिष्ठ नीतिमत्तेचे मापदंड असे काही असूच शकत नाही. आपल्यातील नीतिमत्तेचा आवेग (पुळका !) कशामुळे उद्भवतो याचे स्पष्टीकरण जनुके व समाज यांच्या अस्तित्वाचा संदर्भ घेऊनच आपण करू शकतो यावरून तरी नीती असा सार्वकालिक वस्तुनिष्ठ प्रकार असू शकत नाही, असे ठामपणे सांगता येईल. फक्त जनुकांनी आखलेल्या रणनीतीतून नीतिमत्तेचे मापदंड ठरले आहेत, ते बाहेरून लादलेले नाहीत, एवढे मात्र निश्चित. नीतीच्या बाबतीत विचारता येणारी एकच बाब असू शकते; ती म्हणजे आपल्याला नीतिमत्तेची कल्पना कशी सुचली व तिचा प्रतियोजनासाठी कसा काय उपयोग होत गेला ? मग मात्र बरोबर काय व चूक काय, असले प्रश्न विचारता येत नाहीत. उत्क्रांतीच्या विवेचनातच नैतिक प्रेरणा व तिचे मापदंड यांची माहिती मिळत असल्यास त्या बरोबर की चूक हा प्रश्नच विचारता येणार नाही. काही अभ्यासकांच्या मते नीतिमूल्ये व त्यांचे मापदंड या सामाजिक संरचना आहेत. त्यांना कुणावरही बळजबरीने न लादता त्यांचा आदर करायला हवा. मग मात्र नीतिमूल्ये व नैतिक मापदंड सापेक्ष ठरू लागतात. वस्तुनिष्ठ मापदंड असे काही असूच शकत नाही.
___आपली ईश्वराशी जवळीक आहे असे मानणाऱ्यांना नैतिक सत्य आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी धर्मग्रंथ, धर्मगुरूंसारखे मध्यस्थ, दीर्घ तपस्या, दीर्घ तपस्येनंतर होत असलेले साक्षात्कार किंवा जाणीव असे अनेक मार्ग असून नैतिक सत्याचे प्रकार त्यांतून कळू शकतील, असे वाटते. परंतु या माध्यमांतून मिळालेली माहिती विसंगतीने भरलेली असून ईश्वरापासून प्राप्त झालेले हे ज्ञान विश्वासार्ह वाटत नाही. याशिवाय त्याची सत्यासत्यता तपासण्यासाठी आपल्याकडे कुठलेही निकष नाहीत. कदाचित ईश्वराचे म्हणून आपल्याला सांगितले जात असलेल्या सत्यात सरमिसळ होण्याची शक्यताच जास्त आहे. ईश्वराबरोबर सैतानही आपले घोडे त्यात दामटण्याची शक्यता आहे. ह्यामुळे सश्रद्धांचा चिकित्सेसाठी काहीही उपयोग नाही. सश्रद्धांना कुठले बरोबर, कुठले चूक, कुठले ईश्वराचे, कुठले सैतानाचे याचे अचूक ज्ञान नसते.
डार्विनवादातून उद्भवलेल्या भौतिकतेत आपल्या नैतिक संवेदना ही केवळ अस्तित्वाच्या लढाईतील परिणामकारक हत्यारे आहेत. आपल्या नैतिकतेच्या जाणिवा परहितासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे त्यांमधून वस्तुनिष्ठ सत्य शोधणे शक्य नाही या जाणिवा व संवेदना वस्तुनिष्ठ सत्याच्या जवळपाससुद्धा नेणाऱ्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर भरवसा ठेवणे योग्य ठरणारे नाही.
उत्क्रांतिप्रक्रियेतून उदयास आलेल्या रचना एका विशिष्ट कारणासाठी, विशिष्ट परिस्थितीशी जुळलेल्या असतात. या रचना नैतिक सत्य शोधण्यासाठी कदाचित उपयोगी ठरतील फक्त या रचनांमधून घेतलेला नैतिकतेचा शोध कितपत विश्वासार्ह आहे याची मोजपट्टी आपल्याकडे नाही. परंतु आपल्याजवळ असलेली बुद्धिमत्ता हेही यासंबंधातील एक प्रमुख व उपयुक्त हत्यार ठरू शकेल. बुद्धिमत्ता हा प्रकार समजून घेण्यास तितकासा सोपा नाही. यात पूर्वग्रहदूषित दृष्टीमुळे काही अडचणी येण्याची शक्यता आहे.. उत्क्रांतीच्या काळात तयार झालेल्या रचना आदर्शवत आहेत असे छातीठोकपणे सांगता येत नाही. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत स्वभावविशेषांना काही उद्देश नसतो. या अपूर्णतेचाच शोध उत्क्रांति-मनोवैज्ञानिक घेत असून त्यातूनच उत्क्रांतीच्या इतिहासाची पाने उलगडता येतील असा त्यांचा विश्वास आहे. रचनेतील त्रुटींमुळे अनेक उणिवा जाणवतात. काही वेळा अंतःप्रेरणेतून या उणिवांचा शोध व त्याचे परिणाम यांचा अंदाज येऊ शकतो. परंतु संशोधनात आपल्याला केवळ अंतःप्रेरणेवर भरवसा ठेवून चालणार नाही. एखादे उत्तर बरोबर की चूक हे ठरवण्यासाठी अंतःप्रेरणेव्यतिरिक्त तर्क, सुसंगती, संख्याशास्त्रीय नियम, व्यावहारिकता इत्यादी अनेक संकल्पनांचा वापर करावा लागतो. यातून वस्तुनिष्ठ उत्तरे मिळण्याची शक्यता वाढते. अंतःप्रेरणा अगदीच कुचकामी आहे असेही म्हणता येत नाही अंतःप्रेरणेला विश्वासार्हता नसल्यामुळे फार बिघडणार नाही. कारण आपल्याला विश्वासार्हता नसणे म्हणजे नेमके काय याचाही शोध घ्यावयाचा आहे. परहितवाद, अंतिम जबाबदारी, मुक्त इच्छा इत्यादींची चर्चा करताना आपला भर अंतःप्रेरणेवरच जास्त होता. यातील अंतर्विरोधाची दखल घेतच आपण काही निष्कर्षाप्रत पोचलो आहोत. अंतःप्रेरणेतील विरोधाभासातूनच काही तरी कोठे तरी चुकत आहे हे लक्षात येऊ लागले. त्यामुळे नीतिमत्तेच्या चिकित्सेस अंतःप्रेरणेतूनच सुरुवात करणे इष्ट ठरेल. कदाचित नैतिकतेच्या चिकित्सेत अनेक विरोधाभास व अंतर्विरोध असू शकतील. त्यावरून आपल्या अंतःप्रेरणा चुकीच्या आहेत हे जाणवेल मग विज्ञान व गणिताच्या आधारे पुढील तपासणी करता येईल. एके काळी वैद्यकीय निदानात केवळ अंतःप्रेरणेलाच महत्त्व दिले जात असे.
परंतु आज ईईजी, एम.आर.आय, एक्स रे, माहितीचे संगणकीकरण व विश्लेषण यांसारख्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रोगनिदान जास्त वस्तुनिष्ठ व वैज्ञानिक होत आहे अशाच प्रकारे इतर अनेक रोगांतील संशोधनासाठी वैज्ञानिक चिकित्सा, तार्किकता, सुसंगती इत्यादींची दखल घेतली जात आहे. हेच मापदंड नैतिक सत्याच्या संदर्भात लावल्यास आपण एक पाऊल पुढे ठेवू शकतो.
८, लिली अपार्टमेंटस्, वरदायिनी सह.गृहसंस्था, पाषाण सूस रोड, पाषाण, पुणे २१.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.