मानवी स्वभाव व डार्विनवाद (६)

[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे.
प्रभाकर नानावटींनी संपूर्ण पुस्तकाचे भाषांतरही केले आहे व ते प्रकाशनाच्या प्रयत्नात आहेत. सं.]
आदर्श जगाच्या भ्रमात!
डार्विनवादाचा समाजरचनेवर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास करणाऱ्या समाज-जीवशास्त्र या विद्याशाखेवर ‘या शास्त्राला सामायिक न्याय मान्य नाही; डार्विनवादी व समाज-जीवशास्त्रज्ञ उजव्या विचारांचे आहेत’ असा आरोप केला जात असतो. डार्विनवाद व उजवे विचार यातील संबंधाचा फार मोठा इतिहास आहे. उत्क्रांतीत विविधतेला वाव असून जे उत्कृष्ट आहे तेच टिकून राहते व जे निकष्ट आहे ते काळक्रमाने पडद्याआड जाते. उत्क्रांतीची घोडदौड जैवविविधतेवर अवलंबून असल्यामुळे स्विटोरियन कालखंडातील लोकांना जगात नैसर्गिकरीत्याच भेदाभेद आहेत; म्हणून जे चांगले व उत्कृष्ट आहेत त्यांनाच पुनरुत्पादनाची मुभा द्यावी, असे वाटू लागले. याच कालखंडात दोन प्रकारच्या सामाजिक कल्पनांना धोरण म्हणून राबवण्याचा प्रयत्न झाला. यातील एक कल्पना सामाजिक डार्विनवादाविषयीची होती. या कल्पनेप्रमाणे उत्क्रांती दुर्बलांना गाळते व फक्त सबलच पुनरुत्पादन करतील याची खात्री करून घेते. उत्क्रांती निकृष्ट दर्जाच्या सजीवांना हद्दपार करते. त्यामुळे नैसर्गिक प्रक्रियेत ढवळाढवळ करणे योग्य नाही. या पहिल्या कल्पनेनेच सुप्रजनन (युजेनिक्स) या दुसऱ्या कल्पनेला जन्म दिला मानवीवंशाचे आदर्श जग निर्माण करण्यासाठी मानवाची जातकुळी सर्वश्रेष्ठ हवी, या कल्पनेने काहींना पछाडले. यासाठी सबलांच्या पुनरुत्पादनावर विसंबून न राहता दुर्बलांना पुनरुत्पादनाचा (व जिवंत राहण्याचा) हक्क नाकारावा. असा, एक दुर्विचार मूळ धरू लागला. वैज्ञानिकतेपेक्षा राजकीय अहंकाराचा मतलबीपणा यात जास्त होता. अशा चुकीच्या धोरणांच्या पुरस्कारामुळे फार चुकीचा संदेश समाजात पसरला. सुप्रजननाची भलावण करणाऱ्यांना नैसर्गिकरीत्या कार्यरत असलेल्या जैवविविधतेची जाणीव होऊन महत्त्व लक्षात आले नाही. उत्क्रांति-मनोवैज्ञानिकांना अभिप्रेत असलेल्या जनुकीय गुणविशेषांचा चुकीचा अर्थ लावून जनुकसिद्धान्ताची बदनामी करण्यात आली. हा एक भयंकर परिणाम करणारा सिद्धान्त असा गैरसमज पसरला गेला. जनुकांच्या गुणविशेषांचा विपरीत अर्थ काढल्यामुळे छळछावण्या, नसबंदी, गरिबांसाठी सामाजिक सुरक्षेची तरतूद न करणे, इत्यादी प्रकारांना त्या काळी ऊत आला होता.
राजकीय मतांचा प्रभाव खरोखरच समाज-जीवशास्त्रावर पडू शकतो का ? उदाहरण म्हणून स्त्री-पुरुषांतील विषमता हा मुद्दा चर्चेस घेता येईल. स्त्रिया दुर्बल आहेत म्हणून त्यांना सबळ बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवे, दुर्बलांना स्वतःचे रक्षण करता यावे म्हणन आपण सत्तेत वाटा देऊ शकतो. संधी उपलब्ध करून देऊ शकतो. सवलती देऊ शकतो. सत्तेचा दरुपयोग होणार नाही याकडे लक्ष ठेऊ शकतो, इ.इ. या उपायातून पुरुषी वर्चस्वाची तीव्रता कमी करता येईल. दुर्बलांची शक्ती क्षीण करणाऱ्या सर्व गोष्टी टाळून त्यांना स्वतंत्रपणे स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करता येईल. स्त्रिया व त्यांच्या अपत्यांचा नातेसंबंध लक्षात घेता पुरुषांना आपले चारित्र्य शुद्ध ठेवण्यासाठी कठोर उपाय करावे लागतील. अनौरस संतती जन्माला घालून स्वतःची जबाबदारी टाळू पाहणाऱ्या पुरुषांवर वचक ठेवण्यासाठी कडक कायदा व कठोर शिक्षेची तरतूद करता येईल. विवाह-विच्छेदनातील पुरुषाची मनमानी रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करता येईल.
अशा प्रकारचे उपाय करताना काहींना आपण निसर्गाच्या विरोधात जात आहोत असे वाटण्याची शक्यता आहे. निसर्गानेच मानववंशाची दोन ठळक गटात विभागणी केली आहे. फार फार तर त्यांच्या प्रत्येक व्यवहारात सुसंवाद राहील इतपतच ढवळाढवळ करावी व नैसर्गिक संतुलन बिघडवू नये’ असे विधान आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ ते करू शकतात. परंतु या जगात नैसर्गिक संतुलन व सुसंवाद असे काही आहे का ? असू शकते का ? डार्विनच्या भौतिक जगात नैसर्गिक अशी कुठलीही अवस्था नाही. या जगात योजनापूर्वक असे काहीही घडत नाही. असा प्रकारही डार्विनच्या जगात नैसर्गिक संतुलन असू शकत नाही. कारण ज्याज्या काळात जेजे व जिथेजिथे घडत होते ते नैसर्गिकच होते व त्यातूनच सुसंवादही घडत होते. या डार्विनवादी जगात नैसर्गिक सुसंवाद नाही, नैसर्गिक उद्दिष्टही नाही. या जगात मूल्ये आणि वस्तुस्थिती यात फारकत असू शकते. आपापल्या समजुतीप्रमाणे आपल्याला काय प्राप्त करायचे आहे त्याचा निर्णय आपणच घेऊ शकतो. त्यामुळे डार्विनवादी जगात नैसर्गिक असे वेगळे काहीही नसून आपण सर्व निसर्गाचाच भाग आहोत व आपण जे काही करत असतो ते सर्व नैसर्गिकच आहे.
नैसर्गिक निवड ही तगून राहण्यासाठी जे काही लागते त्यांचीच निवड करते व त्याच्याव्यतिरिक्त इतर काहीही निवडू शकत नाही. आपल्याला जे महत्त्वाचे वाटते ते साध्य करण्यासाठी एखादी अशी व्यवस्थित यंत्रणा निसर्गाकडे नाही. जे काही घडत असते त्यात योगायोगाचा भाग जास्त असतो. अपघाताने ते घडत असते. कदाचित नैसर्गिक निवडीचा हा मार्ग विश्वासार्हही नसेल. वेळकाढू असेल. परंतु ही वस्तुस्थिती आहे याचे भान ठेवावे लागेल.
डार्विनच्या जीवशास्त्रीय नियमाप्रमाणे केवळ स्त्री-पुरुषांतच भेद असतो एवढेच नव्हे तर शरीरातील प्रत्येक अंग-प्रत्यंगातसुद्धा काही ना काही तरी फरक जाणवत असतोच. येथे प्रश्न सुसंवादाचा नसून अस्तित्वाचा असतो. अस्तित्वाची लढाई तडजोडीशिवाय जिंकता येत नाही. फार तर याच तडजोडीला आपण सुसंवाद म्हणू शकतो. त्यामुळे डार्विनच्या जगात प्रत्येक प्राणी, मनुष्यप्राण्यासहित, कसा असावा असे काही ठरलेले नाही त्यांच्यासाठी विशिष्ट असे कुठलेही स्थान-मान नाही. स्थळ-काळ नाही सजीवांची उत्क्रांती होत असताना त्यासाठी कुणीही कुठल्याही प्रकारची अंतर्गत वा सुप्त अशी आज्ञावली/सूचनावली तयार केली नव्हती मुळात आता त्या ज्या अवस्थेत आहेत त्या तिथपर्यंत पोचल्या कशा याचाही आराखडा नव्हता व त्या पूर्ण विकसित होऊन आताच्या अवस्थेत पोचतील याची काही खात्री पण सुरुवातीला नव्हती. उत्क्रांती म्हणजे एक न संपणारी स्पर्धा आहे. उत्क्रांतिवाद सुसंवादाची कदर करत नाही. मूल्यांचा विचार करत नाही. फक्त टिकण्यात, तगण्यात ‘यश’ मिळवणे हा एकमेव उद्देश त्यात असतो. नैसर्गिक निवड कमी लायक रचनांना बाजूला सारून जास्त लायक रचनांच्या मागेमागे धावते. योगायोगामुळे रचनेत छोटे मोठे बदल होत वैविध्यता येते. नैसर्गिक निवड योग्य संधीचा वापर करून घेत उत्कृष्टतेकडे मार्गक्रमण करू पाहते.
याचबरोबर आपण सर्व जण कमी लायकीच्या सजीवांऐवजी येथे आहोत असे मानणेही चुकीचे आहे. कारण आपल्याबरोबर इतर अनेक प्रकारचे जीव आपल्यापेक्षा अनेक पटीत आहेत. कदाचित आपण आपल्याला डायनॉसोरपेक्षा जास्त सक्षम जास्त हुशार समजत असू. परंतु या महाकाय प्राण्यांच्या पूर्वी लक्षावधी वर्षे झुरळे, उंदीर, मुंग्या, ढेकूण यांसारखे अनेक प्राणी, कीटक, पक्षी, जीवजंतु जगाच्या पाठीवर होते व अजूनही आहेत. उत्क्रांतीतील स्पर्धा प्राणिवंशाचे शहाणपण वाढवण्यात नसते. किंबहुना काहीही वाढवण्यात नसते. ते फक्त आपापली जनुके पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी लागणाऱ्या गुणविशेषांचे संवर्धन करत असते. काही कारणामुळे माणसाची बुद्धिमत्ता या कामी उपयोगी पडली, म्हणून मेंदूच्या आकारात वाढ होत गेली. इतर प्राण्यांना त्याची गरज भासली नाही.
एवढेच नव्हे तर उत्क्रांतीला कुठलीही दूरदृष्टी नसल्यामुळे प्राणिवंशातील प्रत्येक पिढीत मागच्या पिढीपेक्षा टिकून राहण्याची क्षमता वाढत जाते असेही काही नाही. टिकून राहण्यासाठीचे काही विशिष्ट संदर्भ असतात. काही वेळा नैसर्गिक निवड कमी लायकीच्या सजीवांचा निर्वंश करत असली तरी इतर अनेक प्रकारच्या चित्रविचित्र पशू, पक्षी, प्राणी यांना थोडासुद्धा धक्का लावत नाही. जोपर्यंत अस्तित्वाची लढाई हरत नाहीत किंवा दुसऱ्या प्राण्याचे भक्ष्य होत नाहीत तोपर्यंत न उडणारे पक्षीसुद्धा या जगाच्या पाठीवर टिकून असतात व त्यांचा वंश वृद्धिंगत होतो. फक्त महापूर, दुष्काळ, लघुग्रहांचा मारा अशा महाभयंकर संकटकाळात लायकी असूनसुद्धा सजीवांचा निर्वंश होऊ शकतो. कमी लायकीचे जीववंश पृथ्वीच्या पाठीवर अजून आहेत, याचा अर्थ उत्क्रांतीत प्रगती होत नाही असे नाही. लहान व अत्यंत साध्या रचनेच्या सजीवापासून अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीची रचना असलेल्या महाकाय सजीवांपर्यंत अनेकविध जीवसृष्टीमुळे उत्क्रांती कायम पुढे-पुढे जाणारी आहे, असे कदाचित वाटत असेल. परंतु ते एक निव्वळ भ्रम ठरेल. याचबरोबर मनुष्यप्राणी हा टोकाचे गुणविशेष असणारा, म्हणून काहीही न करता मानवी बुद्धीत किंवा इतर अनेक प्रकाच्या क्षमतेत वाढ होत जाईलच, याची पण खात्री देता येत नाही.
उत्क्रांति-मनोविज्ञानाचे या प्रकारचे दावे आपल्याला एक चांगले जग निर्माण करण्यात अडथळे आणत आहेत की काय असे वाटू लागते. कितीही सामाजिक फेरजुळणी केली तरी मानवी स्वभावातील किटकटपणामुळे आपल्याला यश मिळेल की नाही याची खात्री देता येत नाही. हा सिद्धान्त खरा ठरल्यास सामाजकि संघ-संस्थामध्ये आपण कितीही सुधारणा केल्या तरी, योजनांचे आडाखे बांधून कार्यवाही केली, तरी मानवी स्वभाव खो घालू शकतो, आडकाठी आणू शकतो. स्वभावतःच स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त महत्वाकांक्षी नसतील, करीअरपेक्षा कुटुंबातच रमणाऱ्या असतील, तर सामाजिक परिस्थितीत कितीही अनुकूल बदल केले तरी त्या व्यवस्थेच्या खालच्या पायरीवरच राहतील. स्त्रियांचा मूळ स्वभावच पुरुषी व्यक्तिमत्त्वाला भुलून त्यांच्या मागेमागे धावण्यातच धन्यता मानत असेल, तर त्यांना आत्मनिर्भर, स्वतंत्र व सबल करण्याचे सर्व मानवी प्रयत्न निष्फळ ठरतील. पुरुष स्वभावतःच सार्वजनिक जीवनात रुची घेणारा असल्यास त्याला घरकामाचा, पालनपोषणाचा वाटा उचलण्यास सक्ती करता येणार नाही. मानवी स्वभावातील अत्यंत टोकाच्या स्वभावविशेषांत बदल करणे निश्चितच शक्य होईल. परंतु ही शक्यता भोवतालच्या परिस्थितीचा दबाव व उत्क्रांतीत निश्चित झालेले गुणविशेष यांच्यावर सर्वस्वी अवलंबून असेल. कुठले गुणविशेष बदलता येतात हे त्या गुणविशेषांबद्दलचा अभ्यास किंवा परिस्थितीतून कितपत बदल घडवता येऊ शकतो याचा अभ्यास यावरून समजेल. त्याचप्रमाणे भावनेच्या आहारी जाण्याचे प्रमाण कसे असते यासाठी उतक्रांतीचे स्पष्टीकरण चालणार नाही व ते कसे कमी जास्त करता येईल, हेही उत्क्रांती सांगू शकणार नाही. कदाचित सर्जनशील व तंत्रज्ञानाची कल्पना असणारा मनुष्यप्राणी यातून मार्ग काढू शकेल. खोलवर रुतलेल्या मानवी स्वभावात बदल करणे ही अशक्यातली गोष्ट असली तरी काही त्रासदायक गुणविशेषांना स्त्री-पुरुष विषमता, मानवी दुःख, वेदना किंवा सामाजिक दबाव व मूल्यांच्या चुकीच्या कल्पनेमधून आलेल्या गुणाविशेषांना-नामशेष करायला हरकत नसावी. तसे जमत नसल्यास, आपल्याला, आवडो न आवडो, आहे तसेच त्यांना स्वीकारावे लागेल. नको असलेल्या गुणविशेषांना सामाजिक स्थित्यंतरातून बदलता येत असल्यास तसे प्रयत्न नक्कीच करायला हवे. परंतु जैविक किंवा जनुकीय बदलाची अपेक्षा धरल्यास आपण पुनः एकदा ‘सुसंगत’जगाच्या सैद्धांतिक चक्रात अडकून पडू शकतो. सामाजिक दबावातून तयार झालेले गुणविशेष व जनुकीय गुणविशेष यांचा शोध घेऊनच बदलाचे प्रयत्न करावे लागतील. डार्विनवादात स्वभावाची अशी वर्गवारी करता येत नसली तरी प्रत्येक गुणविशेषाची पूर्ण चिकित्सा करूनच प्रयत्न करावे लागतील. परंतु यासाठी आदर्श जगाच्या कल्पनेला तिलांजली द्यावे लागेल!
गैरसमजुतींच्या विळख्यात डार्विनवाद
समाजशास्त्रावरील चर्चा म्हणजे केवळ अमूर्त, बौद्धिक कसरत नसून आपण ज्या प्रकारे विचार करतो, आपली इतरांबद्दलची मते कशी तयार होतात व आपण कसे वागतो, त्यांविषयी परिणाम करणारी ती चर्चा असते. भौतिकवादालासुद्धा हा निकष लागू होतो. आपण कोणत्याही मूल्यांना कितीही मानत असलो तरी आपल्यात गैरसमजुती असतील तर आपण चुकीचेच निष्कर्ष काढणार. वस्तुस्थितीचा विपर्यास करणे ही एक अक्षम्य नैतिक चूक ठरेल. परंतु आपल्याला सर्वांत चांगल्या व्यावहारिक निष्कर्षाप्रत पोचायचे असल्यास केवळ वस्तुस्थितीची काळजी करत बसणे योग्य ठरणार नाही. वस्तुस्थितीपासून निष्कर्षपर्यंत पोचण्यासाठी गृहीतके, तर्क व कृती यांसंबंधी विचार करावा लागेल. यात थोडीशी जरी चूक झाल्यास व्यावहारिक निष्कर्ष व्यवस्थित असणार नाहीत. वस्तुस्थितीच्या चुकीच्या आकलनापासून जितका धोका आहे तितकाच, किंवा त्यापेक्षाही जास्त, धोका चुकीच्या तर्कसंगतीपासूनही आहे.
या जगाचा शोध व व्यापार परिणाम करणाऱ्या गोष्टी याबद्दल उत्क्रांति-मनोवैज्ञानिक व समाजशास्त्रज्ञ यांच्या विचारात ताळमेळ नाही, याची जाणीव सर्वांना आहे. उत्क्रांति-मनोवैज्ञानिक बरोबर असतील व आपण समाजशास्त्रज्ञांच्या विचारानुसार वर्तन करत असल्यास समाज चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता असेल. त्याचप्रमाणे आपण उत्क्रांति-मनोवैज्ञानिकांच्या विचारावर विश्वास ठेवल्यास त्यांच्या राजकीय व नैतिक आधारविधानांचा काय परिणाम होऊ शकेल ? उदाहरणार्थ पुरुषांचा स्त्रियावर हक्क असून पुरुषांनी व्यभिचार करायला हरकत नाही किंवा केवळ आपापल्या नातेवाईकांचेच हित पाहावे किंवा दुसऱ्या समाजाविरुद्ध युद्ध पुकारण्यात गैर नाही, असे वाटत असल्यास त्याचे भयंकर परिणाम समाजाला भोगावे लागतील. चुकीच्या वस्तुस्थितीवरील भरवश्यापेक्षा अशा प्रकारचे चुकीचे निष्कर्ष जास्त धोकादायक ठरतील. कुठल्याही प्रकारचा पुरावा सादर न करता केवळ धोका आहे म्हणून उत्क्रांति मनोविज्ञानावर समाजशास्त्रज्ञ हेत्वारोप करत असल्यास समस्येच्या मुळापर्यंत पोचण्यास अडचणी येऊ शकतील गृहितके चुकीची ठरल्यास चुकीचा निष्कर्ष निघण्याचा धोका पत्करावा लागेल. आपला स्वभाव, आपली विश्वाची कल्पना, मरणोत्तर जीवनाबद्दलचे आडाखे, आणि या प्रकारच्या गोष्टीत डोकावणारी नैतिता यांच्याविषयी चुका झाल्यास फार मोठा घोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुळातच डार्विनवादात वेगवेगळ्या रंगछटा आहेत. काही गडद आहेत तर काही सौम्य. गडद रंगछटा असलेल्यांच्या बाबतीत अनेक उलटसुलट मतप्रवाह आहेत. त्यांना जनसामान्यांच्या परिस्थितीचे आकलन नसते, परंपरांचे भान नसते, नैतिक वा राजकीय मूल्यांची चाड नसते’, इ.इ. आरोपांचा भडिमार केला जात असतो. यात काही तथ्य असू शकेल का ? १८५९च्या पूर्वीच्या मानवी स्वभावाबद्दलच्या सर्व कल्पना खरोखरच टाकाऊ, नगण्य वा चुकीच्या आहेत का ? असल्यास त्यांना पूर्णपणे नाकारावे का? मानवी स्वभावाच्या परंपरागत कल्पनांना डार्विदवाद नक्कीच धक्का देतो. मग हा एवढा मोठा धक्का आपल्यात व आपल्या विचारपद्धतीत मोठा बदल का करू शकला नाही ? एक मात्र खरे की आपला शोध अजून संपला नाही. आपण अजूनही आशावाद, आदर्शवादी जीवनशैली इत्यादींच्या सीमारेषांचा भौतिकवादाच्या संदर्भाच्या चौकटीतून पूर्णपणे शोध घेतला नाही.
डार्विनवाद एक वैज्ञानिक सिद्धान्त म्हणून जगातील क्रियाप्रक्रियांचे स्पष्टीकरण देत असतो. आपल्याला ज्ञात असलेल्या जगाच्या मुळाशी जाऊन त्याला व्यवस्थितपणे समजून घेण्याच्या प्रयत्नात असतो. मुळातच विज्ञानातील बदलते प्रवाह आपल्या दैनंदिन व्यवहारात व आपल्या परिस्थितीचा प्रश्नांवर सहजासहजी परिणाम करणारे नसतात. काहींत बदल होतील व काहींत होणारही नाही. या बदललेल्या व न बदललेल्या कल्पनांची वर्गवारी व विश्लषण करणे तत्त्वज्ञानाचे काम आहे, विज्ञानाचे नव्हे.
भौतिकतेचा शोध तपशिलात जाऊन घेतल्यास त्यातील अनेक बारकावे स्पष्ट होत जातील. एखाद्याची आत्मा, अध्यात्म, पारलौकिक सुख यांच्यावर नसल्यास तो आध्यात्मिक मूल्य मानणार नाही त्यामुळे त्याच्याकडे भौतिकतेचा दृष्टिकोण आहे, असेच मानावे लागेल. सत्ता, संपत्ती, मालमत्ता यांच्यापेक्षा सौंर्द, निसर्गप्रेम, अनुभव यांना तो मानत असल्यास तेसुद्धा भौतिकवादाचेच प्रकार आहेत. भौतिक जगात अमरत्व असलेल्या किंवा अमरत्वाची इच्छा असलेल्या आत्म्याला स्थान नाही. भौतिकतेच्या संरचनेतून पर्याय सुचत असल्यास या पर्यायांमुळे व्यक्तीच्या अमरत्त्वाचा मनोरा कोसळून पडेल. संपूर्ण जीवनाचा उद्देश या जन्मापलिकडच्या दुसऱ्या जगात जाणे, असा मानल्यास भौतिकतेचे सत्य त्याच्या पायाखालच्या विश्वरचनेला सुरुंग लावू शकेल.
पारंपरिक आशयानुसार विश्वरचनेला दैवी सुव्यवस्था कारणीभूत आहे. भौतिकवादातसुद्धा जगाची सुव्यवस्था काही प्रमाणात गृहीत धरली जाते. अन्यथा या जगात विज्ञानाचा मागमूसही उरला नसता पारंपरिक विचारप्रणालीत जगाच्या प्रारंभापासून ईश्वरच नैतिकतेने व्वस्थापन करत असतो. सर्व नैतिक घटनाक्रम या सुव्यवस्थेचे भाग आहेत. या सर्वांचा नियंत्रक व नियामक ईश्वर आहे. हा आशावादच जगाला सुव्यवस्थित ठेवत असावा. परंतु भौतिक जगात या आशावादाला स्थान नाही. उत्क्रांतीत निर्माण झालेली गुंतागुंत व जगाची व्यवस्था यावरून तरी काय बरोबर वा चूक हे कळणार नाही. मनुष्यप्राणी उत्क्रांत झाला नसता तर जगाच्या आराखड्यात नैतिक कल्पनांचा शिरकावही झाला नसता. मुळातच आपण काही अपघातांमुळे उत्क्रांत झालेलो आहोत. त्यात काही पूर्वनियोजन नव्हते; त्यासाठी काही विशेष प्रयत्न झाले नाहीत; ऊर्जास्रोतांचा (अप)व्ययही झालेला नाही. कदाचित आपण सर्व आपले ज्ञान व शक्ती पणाला लावून अत्युत्कृष्ट जगाच्या निर्मितीचे स्वप्न पाहत असलो तरी भौतिक जगात ते कदाचित शक्य होणार नाही. आत्मा नसल्यामुळे स्वर्गाची आशा नाही.
पारलौकिक जगाची ओढ असलेले आणि नसलेले लोक आपण कसे जगावे याबद्दल सर्वस्वी वेगवेगळ्या निर्णयाप्रत पोचतात. ईश्वरनिर्मित जगात प्रत्येकाने आपापले स्थान-मान ओळखून, इती-मिती ओळखून त्याप्रमाणे वर्तन करावे, अशी अपेक्षा पारलौकिकवाद्यांची असते. भौतिकवाद्यांना मात्र हे जग कसे आहे किंवा जगातील घटनाक्रम समजून घेऊनच निर्णय घेण्याची गरज नसते. काहींना मात्र निसर्गच ईश्वराची जागा घेऊन या जगाचे कल्याण करू शकतो व उत्क्रांतीतून कायम चांगलेच निघत राहणार असे वाटत असते. परंतु भौतिकतेत जग सुनियोजित नसते. हवे असल्यास व शक्य झाल्यास निसर्गात ढवळाढवळ करण्याची माणसाला पूर्ण मुभा आहे. जसजसे आपण डार्विनवादाच्या खोलात शिरतो तसतसे अगोदरच्या सनातनी विचारांना नाकारत जातो. पारंपरिकपणे स्वीकृत झालेले गुणविशेष एखाद्या सिद्धान्ताशी जुळवून घेताना एखादा दुसरा जहाल सिद्धान्त पुढे आल्यास व तो मान्य असल्यास हे अगोदरचे गुणविशेष नाकारले जातात. उदाहरणार्थ आत्म्याचा स्वीकार करणारा गुणविशेष जबाबदारी या क्षमतेच्या गुणविशेषासमोर टिकणार नाही. उत्क्रांति-मनोविज्ञानाबद्दल त्यानुसार आपण आपल्याला नको असलेल्या गुणविशेषांचे काहीही करू शकत नाही, असा एक चुकीचा समज पसरवण्यात आला आहे उत्क्रांति-मनोविज्ञानाला आपल्यातील गुणविशेषांवर भोवतालच्या परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो, हे मान्य आहे. काही औषधप्रक्रिया करून जनुकीय सुधारणा शक्य आहे. यातून गुणविशेषांत फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. फक्त या सुधारणा कराव्या की नाही याबद्दल निर्णय घेणे फार अवघड असते. तरीसुद्धा उत्क्रांतिवादावर चिखलफेक केली जात असते. या आरोपांचा शोध घेताना दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. उत्क्रांति-मनोविज्ञानाला सामोरे जाताना मानवी स्वभावावर समाज व संस्कृतीचा प्रभाव असतो. ह्या समाजशास्त्रीय मापदंडावर उत्क्रांत स्वभावांचे मोजमाप होते, परंतु उत्क्रांति मनोविज्ञानाला हे मान्य नाही. त्यामुळे उत्क्रांति-मनोविज्ञान सर्व चांगल्या (?) गोष्टी मानत नाही असा समज करून घेतला जातो. गूल्डसारखा वैज्ञानिकसुद्धा आपले गुणविशेष इच्छा, शिक्षण वा संस्कृती बदलू शकत नाहीत, या ठाम मताला चिकटून होता!
जे काही बदल घडू शकतात ते फक्त सामाजिक व सांस्कृतिक बदलातूनच, त्यांचा जनुकांशी संबंध नाही, ही पण एक घोडचूक आहे. समाजशास्त्राच्या पुरस्कर्त्यांचा नैसर्गिक प्रक्रियेत ढवळाढवळ करू नये असा आग्रह होता परंतु उत्क्रांति-मनोविज्ञानाला हे मान्य नाही. मुळात निसर्ग साधू, सौम्य आहे, हाच अत्यंत चुकीचा समज आहे. यावरून समाजशास्त्रज्ञ आपले चुकीचे दावे उत्क्रांतीवर ढकलत आहेत हे स्पष्ट होते.
ईश्वराच्या संकल्पनेबाबतसुद्धा अशाच प्रकारचा घोळ घातला जातो. ईश्वराशिवाय नीतिमत्ता शक्य नाही, ईश्वर नसल्यास नीती नाही हा परंपरागत दृष्टिकोण आहे. ईश्वर न मानणाऱ्या जगात काहीही घडू शकते, असा एक गैरसमज सर्वसामान्यपणे रुजलेला आहे. परंतु धार्मिक लोक थोडीशी वैचारिक कसरत करू लागल्यास अशा गोष्टींवर त्यांच्यासुद्धा विश्वास बसणार नाही. ईश्वर जगन्नियंता आहे, त्याच्याशिवाय जगातील एक काडीसुद्धा हलू शकत नाही, त्यालाच सर्व गोष्टी समजतात, तो सर्वांचे कल्याण करतो, नैतिक मापदंड ठरवतो. सर्वांची स्थाने निर्दिष्ट करतो, इत्यादी कल्पना गोंधळ माजवतात. मुळात मूलगामी मापदंड अनेक साधित मापदंडांना जन्म देत असतात, व त्यातूनच गोंधळाला सुरुवात होते. अशा प्रकारच्या तात्त्विक गोंधळातूनच नैतिक मापदंडासाठी ईश्वराची नितांत गरज आहे ही कल्पना रूढ होत गेली. व ईश्वर हा भ्रम अजूनही शिल्लक आहे.
या सर्व प्रकारच्या चुकींचे, गैरसमजांचे निदान करणे फार जिकिरीचे आहे, हे मात्र मान्य करायला हवे. यात अनेक अटी आहेत, शर्ती आहेत, मर्यादा आहेत, सीमारेषांचे बंधन आहे. विश्लेषण करताना ऊहापोह करावा लागतो. सिद्धान्ताच्या मुळाशी जावे लागते व त्यातूनच तात्त्विक प्रश्नांची उत्तरे शोधता येतात पुराव्यानिशी सिद्ध करण्याची जबाबदारी पेलावी लागते. अशाच प्रकारचे अनेक गैरसमज उत्क्रांतिवादाच्या बाबतीत आहेत. ते डार्विनवादाच्या चुकीच्या आकलनातून आलेले आहेत. त्यांतील अनेकांचा विज्ञानातील प्रगतीशी संबंध नाही. काही आपल्या स्वतःबद्दल, काही तात्त्विक तर काही वैज्ञानिक विसंगतीतून आलेले आहेत. या एकूण समस्यांपैकी डार्विनवादाच्या सिद्धान्ताच्या सत्यतेवर परिणाम करणाऱ्या समस्या ओळखून काढणे गरजेचे आहे. कारण मूळ स्वभावामागील सत्य यातूनच मानवी स्वभावातील बारकावे कळू लागतील. (समाप्त)
८, लिली अपार्टमेंटस्, वरदायिनी स.गृ.सं., पाषाण सूस रोड, पाषाण, पुणे ४११ ०२१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.