[मार्च २००७ मध्ये नागपूर येथे वैदर्भीय लेखिकांचे सहावे संमेलन झाले. विदर्भ साहितय संघाच्या विद्यमाने ही संमेलने होतात. अध्यक्ष/अमरावतीच्या प्राचार्य विजया डबीर ह्या होत्या. त्यांचे उद्घाटनपर भाषण, स्वल्पसंपादित सं.]
येथे मंचावर उपस्थित असलेले नागपूर विद्यापीठाचे आणि विदर्भ साहित्यसंघाचे सर्व मान्यवर, साहित्यप्रेमी लेखक आणि वाचक मित्रमैत्रिणींनो,
ह्याप्रसंगी ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेत्या पाच थोर लेखकांची नावे मला आठवताहेत. कलेची बूज राखून जीवनसंमुखतेला महत्त्व देणाऱ्या कुसुमावती देशपांड्यांचे योगदान आठवते आहे. आशा बगे यांना नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्याबद्दल मला त्यांचे अभिनंदन करायचे आहे.
हल्ली वाचनसंस्कृती लयाला जात आहे असे आपण सतत म्हणत असतो; पण त्याचवेळी लेखन भरपूर वाढते आहे असेही चित्र आपल्याला दिसते. या दोन गोष्टींतली संगती मला नीटशी लागत नाही. हौसेखातर केले जाणारे लेखन हे पुस्तकांच्या संख्यात्मक वाढीमागचे एक कारण असू शकते. मुद्रण सुलभ झाले आहे. मध्यमवर्गाकडे पैसाही वाढला आहे. गाठीशी पैसा आहे तर हौसमौज करावी. प्रवास करावे यांच्या जोडीला प्रतिष्ठेसाठी दोन पुस्तकेही आपल्या नावे असावीत असे काही जनांना वाटू लागले आहे. लेखक-लेखिका स्वखर्चाने आपली पुस्तके छापून घेतात. या पुस्तकांमुळे साहित्यात संख्यात्मक वाढ होत असली तरी कसदार साहित्यात भर पडत नाही. असे लेखन आपण बाजूला ठेवू आणि साहित्याकडे वृत्तिगांभीर्याने पाहणाऱ्या, नव्यानेच लिहू लागलेल्या लेखक-लेखिकांच्या आणि समीक्षकांच्या संदर्भात काही प्रश्नांची चर्चा करू.
या चर्चेत जीवनदर्शन हे साहित्याचे उद्दिष्ट असते हे माझे गृहीततत्त्व आहे आणि ते बहुतेक लेखक, वाचक, समीक्षक यांना मान्य असते असे मला वाटते. आज आपण कलावाद विरुद्ध जीवनवाद असे लढे उथळपणे लढवत नाही. सकलात्म मानुषतेचे तत्त्व मांडणारे जीवनवादी मुक्तिबोध, साहित्य ही एक कला आहे हे मान्य करतात आणि मढेकरांसारखे कलावादीदेखील साहित्याची जीवनसंबद्धता नाकारत नाहीत. लयबद्ध घाटात साहित्याचे सौंदर्य असते असा सिद्धान्त मांडणाऱ्या मर्टेकरांच्या कवितेत यांत्रिक युगातील संज्ञाहीन, मूल्यहीन, बकाल जीवनाची खंतमिश्रित जाणीव केंद्रस्थानी राहिलेली आहे.
बींच्या चाफा या कवितेतील प्रेयसी आपल्या प्रियकर चाफ्याला ‘हे विश्वाचे आंगण आम्हां दिले आहे आंदण’ असे म्हणते. लेखक, कलावंतही असेच म्हणू शकतात आणि आपल्या अनुभवाच्या कोणत्याही विषयाला साहित्यरूप देऊ शकतात. जीवन समाजात घडत त्यामुळे कोणत्याही साहित्यकृतीत कमीअधिक प्रमाणात समाज असतोच.
मराठीत साठनंतर जे दलित, ग्रामीण आदी साहित्यप्रवाह आले त्यांच्या संदर्भात आशयचर्चेला प्राधान्य मिळालेले अनेकदा दिसते; परंतु प्रभावी अभिव्यक्तीशिवाय, साहित्यमूल्यांशिवाय आशयप्रत्ययकारी होऊ शकत नाही याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. संत कवींमध्ये तुकाराम श्रेष्ठ वाटतो, एकोणिसाव्या शतकातील जरठकुमारी विवाहाच्या विषयांवरील अनेक नाटकांपैकी ‘सं. शारदा’ टिकून राहते. दलित जाणीव अनेक कवी व्यक्त करतात; पण ढसाळांसारख्या काही मोजक्या कवींची कविता जास्त महत्त्वाची वाटते या साऱ्याचे कारण एकच. आशयाला साहित्यमूल्यांची इथे जोड मिळालेली असते. ‘वेडेवाकुडे गाईन परी तुझा म्हणवीन’ म्हणणाऱ्या तुकारामाने एकही अभंग वेड्यावाकड्या त-हेने रचलेला नाही.
भारतीय साहित्यशास्त्रात या संबंधाची चर्चा आढळत नाही कारण ते शास्त्र साहित्यसृष्टीला ‘अनन्यपरतंत्रा’ मानते. पाश्चात्त्य साहित्यमीमांसेत मात्र साहित्याची समाजशास्त्रीय अभ्यासपद्धती तिच्या विविध प्रकारांसह विकसित झालेली आहे. तेन या फ्रेंच समीक्षकाने आपल्या वंश (aog) परिस्थिती (Milieu) आणि काळ (मोमेंट) या त्रिमितिसिद्धान्ताच्या द्वारे साहित्य हे देशकालपरिस्थितीचे अपत्य असते असे म्हटले आहे. साहित्यकृती म्हणजे विशिष्ट काळातल्या समाजावर धरलेला आरसा असे तो ठामपणे म्हणतो.
मार्क्सवादाचा आपला स्वतःचा साहित्यविचारही आहे. त्यात थोडा लवचीकपणा आणणारे नवमार्क्सवादीही पुढे निर्माण झाले; परंतु सर्व मार्क्सवाद्यांच्या विचारांत आर्थिक पाया कायम राहिलेला आहे. मार्क्सवादानुसार वर्गीय व्यवस्थेत लेखकाची जी वर्गसंज्ञा असते तीत त्याचे हितसंबंध दडलेले असतात. आणि त्यानुसार त्याची साहित्यनिर्मिती होते. वर्गविहीन समाजरचनेच्या निर्मितीसाठी साहित्याचा सहभागही मार्क्सवादाला अपेक्षित आहे. त्यामानाने समाजशास्त्रीय (सोशिओ अँथ्रॉपॉलॉजिकल) अभ्यासपद्धती जास्त व्यापक वाटते. ह्या पद्धतीत साहित्य आणि संस्कृती यांचा संबंध उलगडण्याचा प्रयत्न असतो. संस्कृती ही समाजाच्या अंगोपांगात भरून असते. संस्कृतीची भौतिक आणि मानसिक अशी दोन अंगे केल्यास मानसिक विभागात धर्म, श्रद्धा, श्रेयाच्या कल्पना, प्रतीके, प्रतिमा, पुराणकथा, परंपरा यासारख्या अनेक गोष्टी येतात. त्यांचे मिळून एक सांस्कृतिक संचित तयारही होते. ते आशयासाठी आणि त्याहूनही अधिक आविष्कारासाठी लेखकाला उपयोगी पडते असे ही सामाजिक-सांस्कृतिक साहित्यसमीक्षा सांगते.
लेखकांनाही अशा व्यासंगाची गरज असते. पाहिले आणि झटपट लिहिले ही वृत्ती कसदार साहित्याच्या दृष्टीने घातक आहे. सामाजिक प्रश्नांवर लिहिणाऱ्यांना प्रथम सामाजिक वास्तव संवेदनशीलतेने समजून घ्यावे लागते. तटस्थपणे त्याचे अनेक पदर उलगडावे लागतात. त्यांचा अन्वयार्थ लावावा लागतो. त्यासाठी जीवनविषयक दृष्टिकोनाची गरज असते. हा दृष्टिकोण अनुभवातून त्याचप्रमाणे व्यासंगातून प्राप्त होत असतो. वास्तवाचे आकलन झाल्यानंतर लेखकाला ते कल्पनेच्या पातळीवरून मूर्त करावे लागते. कथनपर साहित्यात पात्र, प्रसंग निर्माण करावे लागतात. ‘कथा-कादंबरीतील पात्रांना सत्ताशास्त्रदृष्ट्या स्थान नसते. ती प्रत्यक्षातील माणसे नसतात. ती ‘पेपर कॅरेक्टर्स’ असतात हे आपण जाणतोच; आणि तरीही ती आपल्याला अत्यंत खरी वाटतात; किंबहुना, लेखकाने निर्माण केलेले कल्पनाजन्य जगच आपल्याला खरेखुरे वाटू लागते. आपला सभोवताल विसरून काही काळ आपण त्या जगाचे रहिवासी होऊन जातो. ही किमया केवळ अवलोकन आणि प्रतिभा यांच्या जोरावर साधता येत नाही. दैवी स्वरूपाची प्रतिभा आणि स्फूर्ती या खरे म्हणजे साहित्यविश्वातल्या मिथ्स् आहेत. प्रत्यक्षात लेखकाला साधनेची, परिश्रमांची अत्यंत गरज असते. अनुभवांच्या जोडीने वाययप्रकारांची मीमांसा करणाऱ्या ग्रंथांचे वाचन त्याला उपयुक्त ठरू शकते. महान साहित्यकृतींचा अभ्यास हा तर फारच मोलाचा असतो. उत्साहाने लिहिणारी माझ्या आजूबाजूंची बरीचशी तरुण मंडळी या दृष्टीने अगदी रितीरिकामी आहेत असे मला दिसते तेव्हा खरोखर काळजी वाटते.
चांगली साहित्यकृती वाचताना आपल्याला आणखी एक अनुभव येतो. कोणताही लेखक जीवनाचे समग्र वास्तव सांगू शकत नाही. तो जीवनाचा एखादा विशिष्ट तुकडा उचलतो. अॅरिस्टॉटलने म्हटले आहे की इतिहासकार जे घडले ते सांगतो तर कवी जे अपरिहार्य आणि संभवनीय आहे ते सांगतो, म्हणून काव्य हे अधिक तत्त्वज्ञानात्मक असते. म्हणजेच साहित्यातून क्राँक्रीट युनिव्हर्सल्स् प्रत्ययाला येतात. विशिष्ट सामाजिक वास्तवाचे चित्रण करणाऱ्या लेखकाला असे विशिष्टातून वैश्विकतेकडे जाता आले तर त्याच्या साहित्याची वाहनक्षमता, स्थळ आणि काळ बदलले तरी संपत नाही.
याच ठिकाणी नव्याने उदयाला आलेल्या स्त्रीवादी साहित्याचा विचार करायला हवा. कारण या साहित्याची मुळे जगभरच्या पुरुषप्रधान व्यवस्थेबाबतच्या असंतोषात दडली आहेत. म्हणजे समाजजीवनात आहेत.
स्त्रीला सर्वप्रकारचे स्वातंत्र्य नाकारणाऱ्या समाजाने लेखन वाचनाचीही मुभा पूर्वी ठेवलेली नव्हती. तरीही स्त्रियांनी मौखिक साहित्याचे एक भांडारच तयार करून ठेवले. त्यात आपल्या कौटुंबिक विश्वातली सुखदुःखे त्यांनी प्रगट केली. हे लोकसाहित्य कष्टकरी वर्गातल्या स्त्रियांचेच मुख्यतः आहे हे विशेष. संतांनी आध्यात्मिक लोकशाही आणली तेव्हा मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई यांसारख्या स्त्रियांनी भक्तिपर रचना केली. त्यात त्यांचं स्त्रीविशिष्ट दुःखही कुठेकुठे व्यक्त झाले आहे. एकोणिसाव्या शतकात उदारमतवादी समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे स्त्रीशिक्षणाला आरंभ झाला. यथावकाश काशीबाई कानिटकर, कृष्णाबाई मोटे, गीता साने यांसारख्या लेखिकांचे वायय प्रसिद्ध होऊ लागले. त्यात त्यांनी जमिनीवरचे स्त्रीजीवनाचे वास्तव मांडलेले दिसून येते. फडक्यांसारखे ललितवाययाचे जादूगार रोमँटिक वातावरणात सुंदर बाहुलीच्या रूपात वावरणाऱ्या स्त्रीच्या चित्रणात मग्न होते. त्याच काळात विभावरी शिरूरकरांनी मात्र रूढ व्यवस्थेविरुद्ध बड करून स्त्रियांच्या खऱ्याखुऱ्या प्रश्नांना वाचा फोडली होती. बंडखोरीच्या अशा तुरळक चित्रणांना आता स्त्रीवादी चळवळीने विचारांचे भक्कम अधिष्ठान दिले आहे. स्त्रीवाद ही एक आधुनिक विचारधारा आहे. त्याचा अर्थ स्त्रीनिर्मित साहित्य वा स्त्रीसाठी साहित्य असा नाही. स्त्रीवादी साहित्य म्हणजे पुरुषकेंद्री विचारव्यूहापासून मुक्त अशा स्त्रीदृष्टीतून कोणीही-स्त्री वा पुरुषाने निर्माण केलेले साहित्य. स्त्रीवादी दृष्टीतून आजवरचे जग हे पुरुषकेंद्री राहिले आहे. या जगाची व्यवस्था पुरुषहितासाठी सिद्ध झाली आहे. पुरुषाच्या व्यवस्थेत स्त्री पुरुषासाठी, त्याच्या उपयोगाची वस्तू असे तिचे दुय्यम स्थान असते. या व्यवस्थेत स्त्रीची व पुरुषांची जडणघडण होते. नर-नारी ही लिंगव्यवस्था नैसर्गिक आहे; पण जेंडर म्हणजे पुरुषकेंद्री व्यवस्थेतील लिंगव्यवस्था मुद्दाम घडवली आहे. स्त्री या व्यवस्थेचा बळी असते. बळीला आपल्या बळीपणाची जाणीव न होऊ देता कौशल्याने ही व्यवस्था घडवली गेली आहे. स्त्रीला प्रथम असुरक्षित करून नंतर संरक्षण देणारी ही एक अत्यंत चतुर व्यवस्था आहे. या विचारधारेची मांडणी प्रथम सीमान-द-बोव्हाने १९४९ मध्ये केली. ‘स्त्री जन्माला येत नाही. ती घडवली जाते’ हे तिचे प्रसिद्ध वाक्य. बोव्हानंतर अनेक लेखिकांनी स्त्रीवादाची विस्तृत मांडणी केली. स्त्रीवादात अनेक प्रवाह आहेत जहाल स्त्रीवाद, समाजवादी स्त्रीवाद, मार्क्सवादी स्त्रीवाद, पर्यावरणवादी स्त्रीवाद, भाषावैज्ञानिक स्त्रीवाद वगैर. स्त्रीवाद म्हणजे पुरुषविरोध नाही. तो केवळ स्त्रियांचे हित पाहणारा असाही नाही. उलट स्त्री-पुरुष दोघांनाही पुरुषवर्चस्ववादी जगाने निर्माण केलेल्या चुकीच्या वृत्तीतून मुक्त करणारा आहे.
‘भारतीय स्त्रीजीवन’ हे गीता साने यांचे पुस्तकही उत्कृष्ट आहे. हे सर्व लेखन स्त्रीवादी साहित्य निर्माण करू इच्छिणाऱ्या नव्या पिढीच्या वाचनात आले पाहिजे. स्त्रीवादी भूमिकेतून गौरी देशपांडे, सानिया, प्रिया तेंडुलकर, मेघना पेठे, कविता महाजन, प्रतिमा इंगोले, आशा बगे यांनी चांगल्या साहित्यकृती वाचकांना दिल्या आहेत. ऐंशीनंतरच्या कवयित्रींचे दीडशे काव्यसंग्रह वाचून त्याबद्दलचा आपला आनंद रा. ग. जाधव यांनी आपल्या एका पुस्तकात व्यक्त केला आहे. स्त्रियांच्या कवितांमधून गवसलेल्या सात-आठ आशयसूत्रांच्या संदर्भात मौलिक विवेचन करताना त्यांनी आजच्या कवयित्रींची बलस्थाने दाखविली आहेत. आणि मर्यादाही दाखवल्या आहेत. कविता लिहू इच्छिणाऱ्यांना हे विश्लेषण मार्गदर्शक ठरणारे आहे.
स्त्रीवादाने स्त्रीवादी समीक्षेचीही संकल्पना मांडलेली आहे. साहित्यकृतीचे स्त्रीवादी भूमिकेतून प्रथम वाचन नंतर आकलन आणि समीक्षा ही पद्धत त्यात स्वीकारलेली आहे. म्हणजे या समीक्षेची बैठक सामाजिक आहे. इथे एक प्रश्न आपल्याला पडतो. लेखकाने अगर लेखिकेने स्त्रीवादी भूमिका घेतली आहे एवढ्यावरून त्याची कृती ही आपोआप साहित्यकृती ठरते काय?
कवितेची समीक्षा करावयाची असल्यास तिचे नादमूल्य, शब्दबंध, त्यंची व्यंजकता, कवीने योजिलेल्या प्रतिमा, प्रतीके, रूपके यांची समर्पकता कवीचे निसर्गाशी असलेले नाते, औचित्याचे मूल्य, साहित्यकृतीतील घटकांची संघटना इत्यादी अंगांचा विचार व्हायला नको काय ? स्त्रीवादी समीक्षा साहित्याच्या मूल्यमापनाचे निकष पुरवत नाही असे वाटते. स्त्रीवादी भूमिकेतून साहित्यातील आशय आणि अभिव्यक्ती यांची तपासणी तिला महत्त्वाची वाटते. या ठिकाणी स्त्रियांच्या लेखनासंबंधी दोन महत्त्वाच्या लेखकांची मते उद्धृत करावीशी वाटतात. त्यांपैकी एक आहेत श्री. ना. पेंडसे. त्यांना स्त्रियांच्या लेखनात स्त्रीची म्हणून काही शैली जाणवत नाही. खेरीज त्यांची तक्रार अशी की आपल्या स्त्रियांच्या कपाळी अभागी आयुष्य खूप असते. तो वस्तुतः लेखिकांचा खजिना आहे; पण त्याकडे लक्ष न देता मंगळसूत्र तोडून नवऱ्याला सोडून जाणारी बंडखोर आधुनिक स्त्री तेवढी त्यांना दिसते. वास्तवात अशा स्त्रिया थोड्या आहेत. अश्रू ढाळणाऱ्याच जास्त आहेत. खेडेगावतल्या परित्यक्ता, अशिक्षित स्त्रीला फार सोसावे लागते. आर्थिक परावलंबन, समाजाची वाईट नजर इत्यादींनी या स्त्रिया त्रस्त असतात. आजच्या लेखिका परित्यक्तेचं चित्रण करतील तर झटपट त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देतील किंवा दुसऱ्या पुरुषाशी गाठ घालून देतील. त्यामुळे कसदार कादंबरी कशी होईल असा प्रश्न पेंडसे विचारतात. एका महत्त्वाच्या, ‘रथचक्र’ सारखी कादंबरी लिहिणाऱ्या लेखकाचा हा अभिप्राय आहे. लेखिकांनी न चिडता, अंतर्मुख होऊन त्यावर विचार करावा. आपली वास्तवावरची पकड ढिली आहे काय ? माणसाच्या दिवास्वप्नातून स्वप्नरंजनात्मक वायय निर्माण होते असे फ्रॉइडने म्हटलेले आहे. आपले लेखन असे स्वप्नरंजनात्मक आहे काय हे ज्याचे त्याने आपल्यापुरते तपासून पाहावे. जी. ए. कुलकर्णीचा आक्षेप असा की ‘स्त्रिया उदंड लिहितात. पण त्यांच्या लेखनाला आयुष्याचा उग्र वासच नाही.’ जी. ए. च्या पत्रसंग्रहातील एका पत्रात हा अभिप्राय वप्यक्त झालेला आहे. त्यात तथ्यांश आहे असे वाटते. स्त्रियांच्या लेखनात जीवनाचे नानाविध रंग खरोखरच प्रगट होत नाहीत. बऱ्याचशा लेखिका कौटुंबिक परिसरातील स्त्रीपरुषविषमता, कुटुंबांतर्गत ताणतणाव, वैवाहिक नात्यातले विसंवाद याभोवतीच फिरताना दिसतात. त्यांचे अनुभवविश्व सीमित वाटते. राजकारणातली गुंतागुंत व त्यावर आधारलेली राजकीय कादंबरी स्त्रियांनी लिहिल्याचे मला माहीत नाही. दिलखुलास विनोद त्यांच्या लेखनात फारसा आढळत नाही. स्त्रीचे संचारक्षेत्र मर्यादित असल्यामुळे तिच्या अनुभवांना मर्यादा येत असावी असे वाटते. आजही बाँशी लेखिका शहरातल्या मध्यमवर्गीय सुशिक्षित स्त्रिया आहेत. परिघावरच्या किंवा त्याबाहेरच्या, प्रचंड सोसणाऱ्या स्त्रिया अजून लेखनाकडे फारशा वळलेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे. कवयित्रींची कविताही पुढेमागे आवर्तात सापडण्याचे भय वाटते. कारण कवयित्री प्राधान्याने बावकविता या काव्यप्रकारातून आत्माविष्कार साधत असतात. वर्डस्वर्थची ‘उत्कट भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार’ ही सुप्रसिद्ध व्याख्या बहुतेक कवींच्या दृष्टीने महत्त्वाची असते. स्त्रीवादी भूमिकेतून आपला स्वतःचा भावाविष्कार साधणाऱ्या मध्यमवर्गीय शहरी कवयित्रींच्या कवितेमध्ये त्यामुळे तोचतोचपणा येऊ शकतो. ती एकसुरी होऊ शकते. पुरुषप्रधान व्यवस्थेत आपल्याला स्वातंत्र्य नाही ही प्रमुख जाणीव आज कवयित्री त-हेत-हेच्या प्रतमिांमधून व्यक्त करते आहे. त्यातून तिच्या मनातली व्यथा, चीड, संताप यांसारखे भाव तीव्रपणे व्यक्त होत आहेत. हे खरे आहे; परंतु काही काळाने अशा प्रकारची कविता साचेबंद वाटू शकेल. म्हणून ‘मी’चे सीमित अनुभवविश्व ओलांडून कवयित्रींनी नाट्यकविता, चिंतनगर्भ दीर्घ कविता, कथाकाव्य, यासारख्या इतर काव्यप्रकारांकडे वळून स्त्रीवादी दृष्टीतून आपल्या पलीकडचे जग व त्याची स्थितिगती व्यक्त केली पाहिजे. त्यासाठी देशात आणि जगात काय उलथापालथी चालल्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. आज जागृत झालेली स्त्री आपल्या मुक्तीसाठी झगडते आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, निर्णयस्वातंत्र्य तिला हवे आहे ; अलीकडेच नेमाडे, रंगनाथ पठारे, उत्तम कांबळे आणि अरुंधती राय यांची जागतिकीकरणाचे भयावह परिणाम विशद करणारी पुस्तके मी वाचली. अरुंधती राय यांनी तर न्यूयॉर्क येथे केलेल्या भाषणात तिथल्या नागरिकांसमोर विकसनशील देशांना हलाखीत लोटू पाहणाऱ्या अमेरिकन सरकारचा आर्थिक दहशतवाद उघडा करून दाखवला आहे. जागतिकीकरणाचा सामना आपण कसा करावा याविषयीचे आपापले विचारही या लेखकांनी मांडले आहेत. स्त्रीवादी जागृत लेखिकांनी हे विचार समजून घेतले पाहिजेत. त्यांची चिकित्सा केली पाहिजे. यापुढील काळात जागतिकीकरणाच्या बिकट प्रश्नाबाबत आपली भूमिका त्यांना तयार करावी लागेल आणि सर्जनशील पातळीवरून ती व्यक्त करावी लागेल. तेव्हाच त्यांच्या लेखनाला वजनदारपणा येऊन शकेल. स्त्रीवादाने स्त्रीदृष्टीतून जगात परिवर्तन घडवून आणण्याची समाजव्यव्सथा बदलण्याची मनीषा बाळगलेली आहे हे लेखिकांनी लक्षात घ्यायला हवे.
अर्थात कोणी कशावर लिहायचे ते सांगण्याचा इतरांना अधिकार पोहचत नाही हे मला माहीत आहे. लेखकाचे स्वातंत्र्य आपण मान्य केलेच पाहिजे. अंतर्मुख वृत्तीच्या लेखकांना सभोवतालच्या कोलाहलापेक्षा मानवीमनाच्या खोल गुहेत डोकावणे आवडते. मानवी नात्यांच्या शोधात काहींना रस असतो. जीवनाचा अर्थ, जीवनाचे सत्य इथेच सापडते असे त्यांना वाटते. जी. ए. कुलकर्णी हे असे लेखक होते. डोस्टोव्हस्की असा होता. त्याच्या ‘क्राइम अँड पनिशमेंट’ या कादंबरीचा सारा भर नायकाच्या मनोदर्शनावर आहे. या कादंबरीतल्या नायकाने-तरुण रोइकोलनिकोव्हने कादंबरीच्या आरंभालाच खून केलेला आहे. कादंबरीची पुढची पाच-सहाशे पाने डोस्टोव्हस्कीने नायकाच्या मनातले नाट्य शोधण्यात खर्च केली आहेत. शेवटी इथला तरुण नायकग त्याच्यावर उदात्त प्रेम करणाऱ्या धार्मिक वृत्तीच्या निरागस मुलीजवळ गुन्हा कबूल करतो. तिच्यात त्याला ख्रिस्तच जाणवतो आणि त्याचे पुनरुत्थान (रिझरेक्शन) होते. प्रेयसीसह तो अखेरीस शिक्षा भोगायला सैबेरियाला जातो. डोस्टोव्हस्कीचा सारा भर पात्रांच्या मानसिक प्रवासावर आहे. ख्रिस्तामध्ये त्याच्या पात्रांना मनःशांती लाभते. असे लेखक आपल्या प्रतिभाबळाने मानवी मनाची रहस्ये शोधून काढतात. फ्रॉइडसारख्या मनोविश्लेषणशास्त्रज्ञाला त्यातून महत्त्वाचे मनोगंड गवसतात. फ्रॉईडने जी सबोध आणि अबोध मनांची संकल्पना मांडली आहे त्यात अबोध मनातल्या प्रेरणा कधीकधी रूप पालटून श्रेष्ठ साहित्यात प्रगट होतात असे म्हटले आहे तर युंगने सामूहिक नेणीव काही लेखकांच्या लेखनातून आदिबंधांमधून व्यक्त होते असे मत मांडले आहे. त्यातूनच आदिबंधात्मक समीक्षाप्रकार आलेला आहे. जी. ए. कुलकर्णीसारख्या लेखकांना मानवी जीवनातल्या मूलभूत प्रश्नांचे महत्त्व वाटते. सामाजिक प्रश्न मांडले आणि सोडवले तरी त्यामुळे मूलभूत प्रश्न सुटत नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. माणसांच्या इथल्या जगण्याचा अर्थ काय ? चांगल्या माणसांच्या वाट्याला दुःखभोग का येतात ? मानवी जीवनाची सूत्रे कोणाच्या हातात असतात ? अशा स्वरूपाच्या अंतिम प्रश्नांमध्ये त्यांना आस्था आहे. त्यातून त्यांनी आपले एक जबरदस्त कथाविश्व निर्माण केले आहे. त्यावर प्रेम करणारे अनेक वाचकही आहेत.
थोडक्यात, लेखनविषय कोणताही असू शकतो. त्यात सामाजिक प्रश्न येऊ शकतात किंवा अंतिम प्रश्नांचा शोध असू शकतो. साहित्य आत्मनिष्ठ असो वा वस्तुनिष्ठ, साहित्यात अनुभव मूर्त होणे आवश्यक असते. भावकविता असो वा कथनपर वाययप्रकार असो, त्या त्या साहित्य प्रकारांच्या घटकांची एकात्म संघटना साहित्यकृतीत सिद्ध झाली पाहिजे. अनुभव जिवंत व्हायला हवा. नुसत्या वर्णनातून वा विधानांतून तो जिवंत होत नाही. या दृष्टीने वाययप्रकारांची संकल्पना आणि वेगवेगळ्या वाययप्रकारांची वैशिष्ट्ये स्पष्ट करणारे ग्रंथ लेखकांच्या वाचनात असले पाहिजेत. मात्र काळानुसार वाययातला आशय बदलतो, अभिव्यक्ती-बाबतही नवनवे प्रयोग होत असतात याची जाणीवही त्यांनी ठेवली पाहिजे. आपल्या समजुतीत अभ्यासकांनी ताठरपणा येऊ देऊ नये. प्रतिभेला अशा सर्व परिश्रमांची जोड लागते.
ललितकलांमध्ये साहित्यकलेचा समावेश करून सर्व कलांमधल्या सौंदर्याचे एकच एक तत्त्व स्वीकारावे की अर्थाला प्राधान्य असलेल्या, जीवनात खोलवर रुजलेल्या साहित्याचा वेगळा विचार करावा. ह्याबाबत गेली पन्नास वर्षे मर्डेकरांच्या सौंदर्यमीमांसेच्या अनुषंगाने विचारांची घुसळण चाललेली आहे.
गो. वि. करंदीकरांनी ‘साहित्यमूल्यांची समीक्षा’ या ग्रंथात म्हटले आहे की त्रिकालाबाधित असे काही सौंदर्यतत्त्व नसतेच. साहित्याला घाट असतोच आणि तो आशयानुरूप असावा लागतो; परंतु घाट हा साधनरूप असू साहित्याची महत्ता जीवनाच्या मौलिक आणि सखोल दर्शनात आहे. कारण साहित्य ही जीवनवेधी कला आहे.
मी माझा अनुभव तपासला आहे. रवींद्रनाथांची ‘गोरा’, शरच्चंद्रांची ‘शेषप्रश्न’, भैरप्पांची ‘पर्व’, डोस्टोव्हस्कीची ‘क्राइम अँड पनिशमेंट’, गौरी देशपांडेची ‘एकेक पान गळावया’, ह. मो. मराठे यांची ‘बालकांड’, शेळक्यांची ‘धग’, आनंद यादव यांची ‘झोंबी’, कामूची ‘प्लेग’, मोहन राकेश यांचे ‘आषाढ का एक दिन’ या आणि यासारख्या आणखी कितीतही साहित्यकृती वाचताना जो अनुभव मला आला तो जीवनदर्शनाचा होता. या साहित्यकृतींनी जीवनाची एक नवी जाण, नवी दृष्टी आपल्याला दिली असे वाटले होते. वाचन संपल्यावर आपण मनाने समृद्ध झालो आहोत असे मी अनुभवले होते. यातच सारे आले. साहित्य जीवनाची नवी जाण देते असे म्हणण्यात साहित्याची ज्ञानात्मकता आहे तर साहित्य जीवनदृष्टी देते असे म्हणण्यात साहित्यचाची नैतिकता आहे. साहित्य ही एक कला आहे; म्हणजे त्यात सौंदर्याची प्रतीती आहेच. नवी परिभाषा वापरली तरी शेवटी आपण सत्यं, शिवं, सुंदरम् याच चिरंतन मूल्यांकनाकडे पोचतो. साहित्य ही कला अशी सर्वसमावेशक आहे.
[डॉ. विजया डबीर भूतपूर्व प्राचार्य, विदर्भ महाविद्यालय, अमरावती. मराठीच्या नामवंत प्राध्यापक. महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराच्या मानकरी.]
पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील काही न्यायसंकल्पना [ अरिस्टॉटलचे नीतिशास्त्र (हस्तलिखितावरून इंग्लिश अनुवाद : सर डेव्हिड रॉस : Aristotle : Nicomachean Ethics, yohleach : World Classics. Oxford University Press 1980)]
र. ग. दांडेकर