[लेखक भारतीय राजस्व सेवा (खठड)च्या १९९४ च्या बॅचचा अधिकारी आहे आणि सध्या धारवाड, कर्नाटक येथे Joint Commission of Incom Tax म्हणून काम करतो.]
आ.सु.च्या फेब्रुवारी २००७ च्या अंकातील “ठिकऱ्याः बदलती जातिव्यवस्था’ या नावाचा सत्यजित भटकळ आणि नॅन्सी फर्नाडिस यांच्या पुस्तकाचा सुलभीकृत संक्षेप वाचला. जातिव्यवस्थेबद्दल मुळातून आणि सविस्तर चर्चा त्यात आढळली. लेखावर प्रतिक्रिया खालीलप्रमाणे:
१.एकंदर मांडणी; जातिव्यवस्था हा least count गृहीत धरून केलेली दिसते. त्यामुळे अनेक दुखण्यांचे मूळ जातिव्यवस्थेमध्ये शोधलेले दिसते. तसेच उपायही जातिव्यवस्थेभोवती फिरताना दिसतात. लेखकाचे ‘जातिव्यवस्था ही सभ्यता आहे आणि हिंदूंची शास्त्रे आणि मिथ्यकथांबद्दलच्या श्रद्धा ह्या जातिसंस्थेचा परिणाम आहेत’ हे विधानही न पटणारे आहे. सध्या जातिव्यवस्था ही एक व्यवस्था या स्वरूपात विशेष आढळत नाही तर जातींचे गट बनून कार्यरत होताना दिसतात. समाजशास्त्रीय भाषेत ती व्यवस्था (system) म्हणून पूर्वीसारखी कार्यरत न दिसता गटागटांमध्ये संरचनात्मक स्वरूपात कार्यरत दिसते.
२.आपल्या समाजात खरीखुरी संरचना (defactp strictire) सध्या जातिगटांचीच आहे. प्रशासन व्यवस्था, न्याय व्यवस्था, भांडवली अर्थव्यवस्था, यासारख्या अनेक आधुनिक व्यवस्था आपल्या देशात नैसर्गिक गतीने उत्क्रांत झालेल्या नाहीत तर बाहेरून कलम केलेल्या आहेत. या व यासारख्या इतर सर्वच आधुनिक व्यवस्थांसाठी आवश्यक असणारी संरचनात्मक गरज स्वाभाविकपणे जातींच्याकडून भागवली गेलेली दिसते. वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहावेत तशी ही प्रक्रिया झालेली आहे. टोळीव्यवस्था असणाऱ्या आफ्रिकन देशांमध्ये बाहेरून आयात केलेली सांसदीय लोकशाहीची व्यवस्था मूळ धरू शकली नाही त्यास मुख्यतः सांसदीय लोकशाही समर्पक पद्धतीने कार्यरत राहण्यासाठी असणाऱ्या संरचनात्मक सामग्रीचा अभाव आणि पारंपरिक टोळीव्यवस्थांना हा अभाव भरून काढण्यात आलेले अपयश हे कारण होते. त्यामानाने भारतात सांसदीय लोकशाही व्यवस्था बऱ्यापैकी तग धरून असल्याचे दिसते.
३.आयात केलेल्या आधुनिक व्यवस्थांची संरचनात्मक कसर भरून काढण्याचे कार्य करताना जातीच्या संकल्पनेमध्ये तसेच जातिविषयक जाणिवांमध्ये बरेच बदल झाल्याचे; तसेच होत असल्याचे दिसते. लेखक म्हणतात त्याप्रमाणे आधुनिक रूप स्वीकारताना जातिव्यवस्थांतर्गत श्रेणींची जाणीव सौम्य झालेली आहे. पण लेखकांनी ठिकठिकाणी मांडलेले म्हणणे ; की वर्णशिडी चढण्याच्या इच्छा पूर्वीइतक्याच प्रबळ आहेत आणि त्या बऱ्याच समस्यांच्या मुळाशी आहेत हे पटणारे नाही. खरेतर श्रेणींची जाणीव सौम्य होण्याचाच एक परिणाम म्हणून वर्णशिडी चढण्याच्या इच्छा पूर्वीइतक्या प्रबळ राहिलेल्या नाहीत.
४.आधी सांगितल्याप्रमाणे अनेक आधुनिक व्यवस्थांनी संरचनात्मक कसर भरून काढण्यासाठी जातीचा आधार घेतलेला असल्यामुळे ; या व्यवस्थांमध्ये शिरकाव करून घेण्यासाठी, त्यांचा वापर करून घेण्यासाठी; तसेच त्यांच्यापासून फायदे वसूल करून घेण्यासाठी जातींचा आधार घेतला जातो. अडचणींच्या प्रसंगी झेलून घेण्यासाठी शेवटी जातींच मदतीस येणार असल्याची अनुभवसिद्ध समज बऱ्याच जणांमध्ये दिसते. आधुनिक व्यवस्थांमध्ये कमी रूळलेल्यांमध्ये ही समज जास्त दिसते. रूळलेल्या मंडळींना हळूहळू इतरही secular nets ची माहिती होऊ लागते.
५.धर्माधारित संघर्ष हे जातिसंघर्षाचेच दुष्ट रूप असल्याचे लेखकांनी मांडले आहे. पण या गृहीतकामागची कारणमीमांसा मांडलेली दिसत नाही. सेक्युलर फायदे मिळवण्यासाठी किंवा एकंदर Mass Mobilization साठी जन्माधारित identities चा वापर केला जाणे अशा प्रकारचा समान पायाच उलट या दोन्हींमध्ये दिसतो.
६.वर्णांच्या उत्थानाची संकल्पना नाहीशी झाल्यानेच भारत सेक्युलर होऊ शकेल हे लेखकांचे म्हणणे न समजणारे आहे. सेक्युलॅरिझमचा लेखकांना अपक्षित असलेला अर्थही कळत नाही. सोवळेओवळे, शुद्धाशुद्ध या कल्पनांची उपयुक्तता आणि significance मात्र वरचेवर कमीच कमी चाललेला आहे.
७.सेक्युलरस्थान प्रामुख्याने वर्गसंघर्षाने वाढवता येते तर वर्णस्थान संस्कृतीकरणातून, असे लेखकांनी मांडले आहे. सेक्युलरस्थान वर्गसंघर्षाने वाढवता येते असे म्हणणे अजिबात वस्तुस्थितीला धरून नाही. वर्गजाणीव, वर्गसंघर्ष यांचा आपल्या समाजात अभाव आहे असेच उलट म्हणता येऊ शकेल. गंमत अशी आहे की सेक्युलरस्थान वाढवण्यासाठी जातीचा उपयोग केला जाऊ शकतो. थेट पाश्चात्त्यीकरणाचा पर्याय उपलब्ध असताना आणि वर्णस्थान वाढवण्याची गरज सौम्य झालेली असताना संस्कृतीकरणाची गरजही तशी फारशी राहिलेली नाही. संस्कृतीकरणाची कल्पना एम.एन. श्रीनिवास या समाजशास्त्रज्ञांनी १९५२ साली Religion and Society Among the Coorgs of South India. या ग्रंथात मांडली. याच समाजशास्त्रज्ञांने १९९९ साली National Institute of Advanced Studies in Bangalore et aed An obituary on caste as a system निबंधातील काही वाक्ये मात्र येथे नमूद करण्याजोगी आहेत. ते म्हणतात…
“”.. I content myself with reiterating that while caste as a system is dead, individual castes are flourishing. And on the positive side the idea of hierarchy has lost legitimacy both at the all India and at the state levels. What is more viable, especially in urban areas, is the idea of difference. Differences are articulated and the articulation is bound up with questions of group identity. There is considerable differentiation, economic, social, and cultural, within each caste, though it is far more visible among the higher, and the dominant castes, than among the others. But every caste is differentiated. Furthermore, secularisation has made strides in India such that ritual is usually confined to home, temple and pilgrimage.”
याच निबंधातील श्रीनिवास यांचे आणखी एक वाक्य येथे उद्धृत करण्याचा मोह मला आवरत नाही. ते वाक्य असे आहे.
“”In fact what are called castes today are more accurately described as congeries of agnate sub-castes which have come together to compete more effectively with otehr similar formations for better access to such scarce political resources as political power, economic opportunities, government jobs and professional education.”
८.उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचा दलित जाती आणि ब्राह्मण जाती यांची एकत्र मोट बांधण्याचा प्रयोग व त्याला मिळत गेलेला सकारात्मक प्रतिसाद श्रेणीजाणीव कालबाह्य होत असल्याचा आणि जातिगट सेक्युलर फायद्यांसाठी स्पर्धा करत असल्याचा पुरावा आहे. अर्थात श्रेणीजाणिवेचे अवशेष अजूनही ठिकठिकाणी सतत दिसून येत असतातच. काही ठिकाणी श्रेणीत खालच्या स्थानांवर असलेल्यांना सत्तेत आणि सेक्युलर फायद्यात मोठा वाटा मिळत असल्याबद्दलच्या असूयेच्या भावनेची भरही त्यामध्ये पडताना दिसते.
९.जातीजातींमधील अपकर्षण मंदावल्याशिवाय जागतिकीकरणाला सामोरे जाण्यास आवश्यक असणारी एकसंधता मिळू शकणार नाही हे लेखकांचे म्हणणे खरे आहे. अशी एकसंधता मिळवण्यासाठी लोकांच्या जाणिवांचा विस्तार जातींच्या पलीकडे होणे आवश्यक आहे. अर्थात भारतातील समस्त आधुनिक व्यवस्था संरचनात्मक सामग्रीसाठी जोपर्यंत जातींसारख्या पेपीशर्लीश्ररी पी वरती अवलंबून असतील तोपर्यंत तरी अशा प्रकारची एकसंधता साधणार नाही.
१०. लेखकांचा असा निष्कर्ष आहे की ‘जातींचे सेक्युलर स्थान आणि वर्णस्थान यांच्यातला विजोड भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये दृष्ट प्रवृत्ती घडवीत आहे.’ हा विजोडच इतरही अनेक गोष्टींचे मूळ असल्याचे नमूद केले गेले आहे. खरे तर विजोड जो आहे; तो आपण आयात केलेल्या समस्त आधुनिक व्यवस्था आणि भारतीय मानसिकता यांच्यात आहे. मुळात या आयात केलेल्या सगळ्या रचना, व्यवस्था, संरचना आहेत, हे सगळे जे कुभांड आहे, याच्यासाठीचे मेण पाश्चात्त्य मोहोळातल्या मधमाशांच्या पोटातून स्रवलेले आहे. ते आपल्याला परकेच आहे. खरा विजोड येथे आहे. दैवतीकरणाचा रोग, अमूर्त नियमांबद्दल तिटकारा असणे, विचार करण्याची पद्धती मूलतः प्राथमिक स्वरूपाची भावनावलंबी असणे ही काही भारतीय मानसिकतेच्या अवरोधक अंगांची उदाहरणे सांगता येतील. सुधीर कक्कर यांनी भारतीय मानसिकतेबद्दल केलेले मौलिक विवेचन हे समजून घेण्यासाठी उपयोगाला येऊ शकते.
११. इसवीसनाच्या पहिल्या सहस्रकामध्ये ख्रिश्चेनिटी, इस्लाम यासारख्या एकदैवतवादी धर्माची संस्थापना होण्याच्या प्रक्रियेद्वारा तेव्हा अस्तित्वात असलेल्या नानाविध जमातीतील यातुधार्मिक वैचारिकांना (magicoreligious worldviews) एकच एक समान अशी वैचारिका (worldview) पुरवण्याचे कार्य पार पाडले गेले. जे काही घडले त्यास कुणी सांस्कृतिक वसाहतीकरणाची प्रक्रिया असेही म्हणू शकेल. जे घडले त्यामागची आर्थिक व राजकीय कारणेही कुणी सांगू शकेल. भारतात मात्र अशा प्रकारची एकच एक समान अशी वैचारिका (worldview) पुरवण्याची प्रक्रिया कधीच घडली नाही. लेखकांनी असे मांडलेले दिसते की ‘जमातींच्या यातधार्मिक वैचारिकांना व्यापक चौकटीत बसवणे त्यासाठी एक मोठे तपशीलवार विश्व उभारणे हे महत्त्वाचे होते”. विविध जमातींच्या आहे त्यासगळ्या यातुधार्मिक वैचारिकांना चौकटीत बसवण्याऐवजी नवीन एकजिनसी वैचारिका का निर्माण केली गेली नाही हा खरोखरीच एक अभ्यासण्याजोगा आणि चर्चा करण्याजोगा मुद्दा आहे. जुने तसेच ठेवायचे आणि जुन्यात शक्य तितके कमी बदल करून नवे जितपत आवश्यक तितपतच पांघरायचे ही अगदी प्राचीन काळापासूनची खास भारतीय सवय मात्र सलगपणे आजपावेतो दिसून येते.
Clo. V. G. Mathad, Second Cross, Jaynagar, Dharwad 580 001.