पुस्तक परामर्श लोकमान्य ते महात्माः लेखक – सदानंद मोरे,

राजहंस प्रकाशन पुणे यांनी “लोकमान्य ते महात्मा या शीर्षकाचा डॉ. सदानंद मोरेलिखित एक ग्रंथ दोन खंडात प्रकाशित केला आहे. या ग्रंथाचे स्वरूप “स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्ताकारणाचा घेतलेला वेध’, अशा प्रकारचे असल्याची भूमिका लेखकाने प्रारंभीच ठळकपणे नमूद केली आहे. पन्नास साठ वर्षांपूर्वी भारतात झालेल्या या अभूतपूर्व, ऐतिहासिक स्वातंत्र्यलढ्यावर आतापर्यंत अनेक ग्रंथ लिहिले गेले. त्यातून लोकमान्य टिळक व महात्मा गांधी याच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेसने या लढ्यात केलेल्या महनीय कामगिरीविषयी साधारणतः गौरवात्मक विवेचन आलेले आहे. तद्वतच या दोन राष्ट्रीय नेत्याच्या व विशेषतः महात्मा गांधी यांच्या त्यातील कर्तृत्वाबद्दल महाराष्ट्रात तरी भरपूर प्रतिकूल, असद्हेतूनी भरलेली जहरी टीका मोठ्या प्रमाणात केली गेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत विषयासंबंधी एक वस्तुनिष्ठ व संतुलित असे समालोचन होणे गरजेचे होते. ही उणीव बऱ्याच अंशी या ग्रंथांने पूर्ण केली आहे. डॉ. सदानंत मोरे हे पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या पदव्युत्तर विभागात प्राध्यापक असून ते संतश्रेष्ठ तुकारम महाराजांच्या पिढीतील सतरावे वंशज आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनशैलीत रोचकता, सुबोधता व प्रवाहीपणा हे गुण प्रकर्षाने प्रत्ययास येतात. राजकारणासारख्या गंभीर विषयावरील त्यांचे विवेचन अतिशय खेळकर व सहजतेने केलेले आहे. हे ग्रंथ वाचताना कुठेही कंटाळवाणेपणा वाटत नाही. भारतीय स्वातंत्र्यसमराचा विषय सर्वांकरिता अतिशय जिव्हाळ्याचा व राष्ट्रीय अस्मितेच्या दृष्टीने सनातन मूल्याचे पोषण करणारा आहे. म्हणूनच या विषयावर इतके विपुल साहित्य निर्माण होऊनही काही प्रश्न अनुत्तरित राहतात. सर्वांत महत्त्वाची व वारंवार चर्चिली जाऊनही वादविषय राहिलेली एक गोष्ट म्हणजे या स्वराज्याच्या यशस्वी सांगतेचे श्रेय कोणाला द्यायचे ही. एवढ्या प्रदीर्घ काळ चाललेल्या व असंख्या गुंतागुंतीच्या परस्परविरोधी घडामोडींनी युक्त अशा या कालखंडाविषयी सरळसोट अशा उत्तराची अपेक्षा करणे फारसे योग्य नाही. तरीही निष्कारण यावर वादंग माजविले जाते. “रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले.” इथपासून तर केवळ सत्य व अहिंसेच्या बळावर जगाच्या आजपर्यंतच्या इतिहासांत स्वातंत्र्य प्राप्त केल्याचे भारत हे एकमेव उदाहरण आहे या दोन टोकाच्या भूमिका यासंबंधी घेतल्या गेल्या आहेत. डॉ. सदानंद मोरे यांनी या सर्वच मुद्द्यांचा विस्तृत परामर्श घेऊन शेवटी अतिशय संतुलित व विवेकी निष्कर्ष काढले आहेत. याही दृष्टीने या ग्रंथाचे प्रकाशनही एक उपयुक्त व स्वागतार्ह घटना आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत जो इतिहास घडला त्याचे प्रामुख्याने महाराष्ट्रांतील काही ज्ञात पण बरेचसे अज्ञात राहिलेले कंगोरे उजेडात आणण्याचे महत्कार्य एका व्यासंगी विचारवंताने एकट्याने अतिशय परिश्रमपूर्वक पार पाडले आहे यात काही शंकाच नाही.
ब्रिटिश काळातील भारतीय राजकारणात महाराष्ट्राने सर्वांत महत्त्वाचे प्रेरणादायी स्थान पटकावले होते. त्याने प्रदान केलेले हे नेतृत्त्व केवळ इतिहासदत्त नसून कर्तृत्वानेही सिद्ध होणार असल्याची खात्री पटवली होती. परंतु इतिहासाचे पाणी नेहमीच उतारावरून वाहात नाही असे दिसते. टिळकांच्या मृत्यूनंतर उदयाला आलेले महात्मा गांधी ह्यांचे नेतृत्व मोकळेपणाने स्वीकारून त्याची गती वाढविण्यास मदत करण्याऐवजी त्याला प्रतिबंध करण्याचे कार्य महाराष्ट्रातील टिळकांच्या अनुयायांनी व इतर सनातनी गटांनी केले. या वक्र चलनामुळे नक्कीच महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान झाले आहे ; टिळकांच्या मृत्यूपर्यंत नेतृत्वात अग्रभागी असलेल्या महाराष्ट्राने आपले प्रभुत्व टिकविणे दूरच राहून अखिल भारतीय संदर्भात बरोबरीची भागीदारी करण्याऐवजी किमान दुसऱ्या क्रमांकावरही त्याला राहता आले नाही ही दारुण स्थिती महाराष्ट्राची झाली. टिळकांकडून गांधींकडे होणारे नेतृत्वाचे संक्रमण हा महाराष्ट्रासाठी एक क्लेशकारक व वेदनादायक अनुभव ठरला. या संक्रमणाला महाराष्ट्राच्या इतिहासात व जडणघडणीत अतिशय महत्त्व असतानादेखील त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास आतापर्यंत झाला नव्हता. हे कार्य अतिशय उत्तम रीतीने हा ग्रंथ लिहन लेखकाने पार पाडले आहे.
पुढे सरकणारा काळ इतिहासाचा आधार असल्यामुळे इतिहास कालानुक्रमे लिहिला जाणे स्वाभाविक असले तरी एखादा विषय स्वरूपतःच अतिशय व्यापक व गुंतागुंतीचा असतो. त्यामुळे कालानुक्रमे मांडणी केली तर त्याची व्यापकता व व्यामिश्रता धोक्यात येऊन त्याचे सरलीकरण होऊन त्याचे गतितत्व नष्ट होते व त्याला स्थिरचित्रणाचे स्वरूप प्राप्त होते अशी लेखकाची धारणा आहे. हे टाळण्यासाठी विषयाच्या पाळांमुळांबरोबरच शाखापल्लवांचा वेध घेण्यासाठी कालानुक्रम बाजूला ठेऊन मागेपुढे करावे लागते, पण याचा अर्थ कालाचा व्यतिक्रम नव्हे. घटना घडताना कालात घडतात आणि कालानुक्रमेच घडतात हे स्पष्ट असूनही त्यांची मांडणी करताना कालभान न खोडता मागेपुढे करणे समजण्याच्या व समजावून देण्याच्या दृष्टीने आवश्यक ठरते. त्यासाठी हे ग्रंथलेखन करताना एक निराळा घाट त्यांनी वापरला आहे. या ज्ञानशास्त्रीय भूमिकेमुळे त्यांची शोधपद्धती नेहमीच आंतरविद्याशाखीय राहिली आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा व रोमांचक कालखंड समजून घेणे व देणे तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकाचे कामच आहे या भूमिकेतून त्याला सामोरे जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रा. मोरे यांनी यशस्वीपणे केला आहे. यातील पहिला खंड जवळपास सहाशे पानांचा असून पहिलेच प्रकरण, ‘महाराष्ट्राचे महाभारत’ या शीर्षकाने सुरू होते. त्यातूनच ग्रंथाविषयाची स्पष्ट कल्पना वाचकांना दिली जाते. टिळक व गांधी या आधुनिक काळांतील महान नेत्यांच्या अनुयायातील उडालेल्या संघर्षाचे हे महाभारत आहे. या संघर्षात कौरव व पांडव असे दोन प्रवृत्तीचे वा उद्दिष्ट असलेले पक्ष मात्र नाहीत तर एकच ध्येय असून त्याला प्राप्त करण्याच्या मार्गातील भिन्नता यावर हा संघर्ष आधारित आहे. तसे पाहिले असता हा पांडवापांडवातील दोन भिन्न प्रवृत्तीचा व दृष्टिकोणातील फरकाचा सामना आहे. या दोनच नेत्याची नावे घेण्याचे कारण इतर असंख्य नेत्यांच्या तुलनेत आपण सर्व देशाचे म्हणजे देशांतील सर्व लोकांचे नेते असून त्याच्या वतीने राजकारण करीत आहोत असा दावा या दोघांनीच केला होता. इतर सर्व नेत्यांचे राजकारण जाणते वा अजाणतेपणाने त्याच्या विशिष्ट समुहापुरते मर्यादित राहिले. टिळकांच्या मृत्यूनंतर देशाच्या राजकारणाची सूत्रे गांधींच्या हाती आली. टिळक व गांधी या दोघांचे विचार व राजकारण परस्परपूरक की परस्परविरोधी आहेत हा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित झाला. कारण गांधीचे नेतृत्व मान्य करणे याचा अर्थ भारताच्या राजकारणावरील आपली पकड सोडणे असा व्यावहारिकदृष्ट्या होणार होता. या तात्त्विक व व्यावहारिक समस्येमुळे या नेतृत्वांतरणाची प्रक्रिया महाराष्ट्रात एक स्वाभाविक घटना न राहता संघर्षमय गोष्ट ठरली. हा वार केवळ राजकीय इतिहासापुरता मर्यादित न राहता त्याचे प्रतिध्वनी संगीत, नाट्य, क्रीडा, तत्त्वज्ञान, इतिहासलेखन व धर्म अशा जीवनाच्या सर्वच क्षेत्रात अपरिहार्यपणे उमटले. या व्यापक विषयाची चर्चा स्वतंत्रपणे करणे, जे आजपर्यंत घडले नाही. हे या ग्रंथाचे प्रयोजन आहे असे श्री मोरे यांचे प्रतिपादन आहे. हाच प्रमुख धागा धरून प्रस्तृत संघर्षाच्या प्रदीर्घ प्रवाहात घडलेल्या असंख्या घटना व घडामोडीचे चित्रण जवळपास १०३ प्रकरणात पहिल्या खंडात केले गेले आहे. या सर्व प्रकरणांची शीर्षके त्यांत आलेल्या विवेचनावरून ठरविण्यात आली आहेत. तद्वतच विषयाच्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक अज्ञात व मनोरंजक घटनांचा तपशील यात असल्यामुळे ग्रंथाचे वाचन हा एक सुखद अनुभव ठरतो. सखोल व्यासंग व तपशीलांवरील घट्ट पकड या दोन गोष्टी या अनुभवाला एक समृद्धी प्रदान करतात. चर्चेतील विविधांगी दृष्टिकोनामुळे संगीत, नाट्य, धर्म व तत्त्वज्ञान याही क्षेत्रातील अनेक संदर्भ सहजपणे त्यात अंतर्भूत होतात. हे ग्रंथ मुळातून वाचल्याशिवाय त्याचे सौंदर्य पूर्णपणे अनुभवास येणे शक्य नाही.
टिळक व गांधी या दोघांच्याही विचारतत्त्वज्ञानाचे व कार्याचे मूळ प्रेरणास्थान युद्धभूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली श्रीमद्भगवद्गीता आहे. हा योगायोग मुळीच नाही. दोघांनीही आपापल्या प्रकृतीनुसार लावलेल्या भगवद्गीतेच्या अन्वयार्थाचा त्याच्या समर्थकांनी प्रत्यक्ष लढ्यात चांगलाच उपयोग करून घेतला. टिळकांचे, “गीतारहस्य आणि गांधींचा ‘अनासक्तियोग’, हे ते दोन अन्वयार्थ होते. हे दोनही अन्वयार्थ परस्पराला छेद देणारे तर नव्हतेच तर परस्परपूरक असेच असल्यामुळे हे पांडवापांडवांमधील युद्धच होते. नेतृत्वांतराच्या वरकरणी राजकीय दिसणाऱ्या पण प्रत्यक्षात सांस्कृतिकही असणाऱ्या या प्रक्रियेची सुरुवात १९०८ साली टिळकांवर भरलेल्या राजद्रोहाचा खटला व त्यात त्यांना झालेली सहा वर्षाची शिक्षा या घटनेपासून झाली. या दरम्यान गांधींची दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाविरुद्धची चळवळ जोमात सुरू होती. टिळक तुरुंगात असल्यामुळे त्यांचे साक्षात मार्गदर्शन त्यांच्या अनुयायांना व सामान्य जनतेला मिळत नव्हते. त्यामुळे साऱ्यांची नजर त्यांच्या सुटकेकडे लागली होती. ही संधी मानून एक पर्यायी नेतृत्व उभे करणे जवळजवळ अशक्य कोटीतील गोष्ट होती हा टिळकांच्या असामान्य व अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा गौरव होता. टिळकांची जागा घेऊ शकेल अशा तोलामोलाचा, निदान जवळपास पोचणारा पर्याय या सहा वर्षाच्या काळात महाराष्ट्रात निर्माण होऊ शकला नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्यास टिळकांच्या पश्चात महाराष्ट्राबाहेरून पुढे येणाऱ्या नेत्यामागे जावे लागणार हे स्पष्टच होते. यापूर्वीच सुरत येथील गाजलेल्या काँग्रेस अधिवेशनात टिळक आणि गांधी एकमेकांच्या खूपच जवळ आले होते. त्याहीपूर्वी १८९६ मध्ये पुण्यात व १९०१ मध्ये कलकत्ता काँग्रेसमध्ये या दोघांच्याही भेटी झाल्या होत्या कलकत्त्यात तर दोघेही रिपन कॉलेजमध्ये एकत्र मुक्कामाला होते. दोघांनीही दीर्घकाळ ब्रिटिशांचा तुरुंगवास भोगला होता. बायबल, कुराण, गीता, रामायण, उपनिषदे व मनुस्मृती यांचे वाचन गांधीनी या काळात केले होते. ह्याव्यतिरिक्त विविध पाश्चात्त्य लेखकांचे विपुल वाचनही त्यांनी केले होते. टिळकांनीदेखील तुरुंगात भरपूर वाचन केले होते. जर्मन, फ्रेंच व पाली या भाषांचाही अभ्यास त्यांनी तुरुंगवासात केला होता. टिळक आणि गांधी यांची तुलना करताना त्याच्या वर्णजातीचा संदर्भ मात्र न टाळता येणारा आहे. टिळक कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण तर गांधी वैश्य. परंतु या दोघांमध्ये क्षात्रवृत्ती मात्र पूर्णतः विकसित झाली होती. टिळक चित्पावन ब्राह्मण त्यांचा परशुराम हा लढवय्या ब्राह्मणांचा आदर्श. परशुरामाशी नाते सांगणाऱ्या कोकणस्थांनी पेशवाईच्या काळात क्षात्रवृत्तीचा अंगिकार करून अटकेपार झेंडे रोवावे हा इतिहास आहे. पण गांधींच्या बाबतीत असे म्हणता येण्याजोगे नाही. गांधी गुजरातचे आणि त्यातही परत काठेवाडचे. काठेवाड ही पश्चिम भारताची पवित्र भूमी मानली जाते. द्वारका ही साक्षात श्रीकृष्णाची राजधानी. हा सारा परिसरच कृष्णाचा आणि यादवांचा. विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे काठेवाड ही हिंसा व अहिंसा यांच्यामधील द्वंद्वाची भूमी होय. टिळक वारकरी पंथाचे नसले तरी कृष्णाच्या गीतेला मानणारे होते. जैनांचे अहिंसातत्त्व मात्र त्यांना मान्य नव्हते. त्यांचा दृष्टिकोण व्यापक व समन्वयशील होता. टिळकांची तात्त्विक भूमिका गीतेतील लोकसंग्राहकाची होती. गांधींनी मात्र अहिंसा हे आपले जीवनमूल्य मानले होते. परंतु, “आपली अहिंसा ही शूराची आहे व भ्याडाच्या अहिंसेपेक्षा शूराची हिंसा आपण पसंत करतो’ असे ते म्हणत. गांधींच्या काठेवाडचा लढवय्येपणा हा प्रादेशिक गुण तर महाराष्ट्रातील मराठे त्यांच्या शौर्याबद्दल प्रसिद्ध होते. मराठ्यांच्या शिवाजीचा शौर्याचा वारसा स्वाभाविकपणे टिळकांकडे आला होता. मूठभर इंग्रजांनी भारत जिंकला ही आत्मप्रौढीपर दंतकथा स्वतः इंग्रजानीच निर्माण केली व काही इंग्रज इतिहासकारांनीच त्यातील असत्यता अधोरेखित केली. स्वतः गांधीनीही आपल्या, “हिंदस्वराज्य’ या पुस्तिकेत याचा प्रतिवाद केला आहे. “हिंदुस्थान हे इंग्रजांनी घेतले असे नाही. आपण ते त्यांना दिले. हिंदुस्थानात ते स्वतःच्या बळावर टिकलेले नाहीत तर आपण त्यांना ठेवून घेतले आहे.” इंग्रजाच्या सैन्यामधील चारपंचमांश सैनिक भारतीय होते व केवळ एकपंचमांश इंग्रज होते ही गोष्ट, जे. आर. सील या केंब्रिज विद्यापीठातील इतिहासाच्या प्राध्यापकांनीच जगाच्या निदर्शनास आणून दिली. भारतीय सैनिक शौर्यांत व पराक्रमात कधीही कमी नव्हते. त्यांच्या फक्त शिस्त व आधुनिक युद्धतंत्र नव्हते. ते आत्मसात करण्याची क्षमता मात्र त्याच्यात होती. त्याचाच उपयोग करून इंग्रजांनी दीडशे वर्षे या देशावर राज्य केले व दोन्हीही जागतिक महायुद्धात विजय मिळविला. “फोडा आणि राज्य करा’, ही इंग्रज साम्राज्यशाहीची एकमेव नीती राहिली.
हे सत्य टिळक, गांधी या दोघांनीही पूर्णपणे ओळखले होते. म्हणून लोकांना जागृत करणे, त्यांच्यात राष्ट्रभावनेची प्रखर जाणीव निर्माण करणे हे स्वराज्याचे साधन आहे ही गोष्ट स्पष्ट होती. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो मी मिळवीनच.” हा मंत्र टिळकांनी देशाला दिला. १९४२च्या चळवळीत गांधींनी “भारत छोडो’ हा नारा देऊन स्वातंत्र्यलढा अंतिम टप्प्यात नेला. दोघांमध्ये सामंजस्य व परस्परआदर शिगोशीग होते. टिळकाच्या मृत्यूपर्यंत गांधींचे त्यांच्याशी अकृत्रिम जिव्हाळ्याचे व प्रेमादराचे संबंध होते. महाराष्ट्रात महाभारत घडले ते टिळकांच्या अहंकारी, शुद्र व दूरदृष्टीचा अभाव असलेल्या अनुयायांमुळे. हाच पहिल्या खंडातील विवेचनाचा प्रमुख मुद्दा आहे. या खंडांतील अंतिम प्रकरणाचे शीर्षक ‘गांधीवादाने घरे भंगली’ अतिशय सूचक व समर्पक आहे. हीच महाराष्ट्राची दारुण शोकान्तिका आहे.
लोकमान्य ते महात्मा (खंड दुसरा)
लोकमान्य ते महात्मा ग्रंथाच्या दुसऱ्या खंडात टिळक व गांधी यांच्या अनुयायांनी महाराष्ट्रात घडविलेल्या महाभारताचे अनेकविध पैलू अतिशय सूक्ष्मपणे चर्चिले गेले आहेत. या सांगोपांग व सविस्तर विवेचनाचा उद्देश, “टिळकसमर्थकांना गांधींचे आणि गांधीसमर्थकांना टिळकांचे मोठेपण पुन्हा एकदा दाखवून देणे’, हा आहे. या दोन्ही महान विभूतींचे धीरोदात्त व प्रचंड व्यक्तिमत्त्व लेखकाने अतिशय समर्थपणे रेखाटले आहे. या संघर्षाला विशेषतः महाराष्ट्रात तरी, वर्ण, जात व धर्म यांचे कंगोरे अपरिहार्यपणे लाभत गेले. महात्मा गांधी यांचे विचार व कार्य जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे. स्वराज्यप्राप्ती हे त्यांना साध्य नसून परिवर्तनाचे साधन वाटत होते. टिळक व गांधी यांच्यातील मूलभूत भिन्नत्व, “स्वराज्यासाठी टिळक सत्याचाही प्रसंगी त्याग करण्यास सिद्ध होतील परंतु गांधी मात्र सत्यासाठी स्वराज्यावरही पाणी सोडण्यास मागेपुढे पाहणार नाहीत” यात होते. या दोन महनीय नेत्यांमधील आणखी एका भेदाविषयी सर्वसाधारणपणे लोकांना माहिती अतिशय अल्प आहे, या ग्रंथाच्या लेखकांनी उत्तमपणे अधोरेखांकित केला आहे. टिळकांना कलाविषयांत फारशी रुची नव्हती. ते नाटकांना जात, गाण्याच्या कार्यक्रमांत हजेरी लावीत; पण तो त्यांच्या लोकसंग्रहाचा भाग होता. जेथे लोक तेथे लोकमान्य, हे समीकरण सिद्धच होते. परंतु गांधींची कलाविषयक जाण अतिशय उच्च कोटीची होती हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा प्रचंड हादराच बसेल.त्याची मानसकन्या कुमारी स्लेड् जिचे मीराबेन असे पुढे नामान्तर झाले, ही मुळात निसर्गातील स्वाभाविक आवाजांमधून संगीताची अनुभूती घेऊ शकणारी आणि संगीताला परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्यासाठी साधन समजून संगीतावर भक्ती असणारी मुलगी होती. जर्मन संगीतकार बीथोव्हन यांच्या संगीताचे तिला जणू वेड लागले होते. रोमाँरोला या फ्रेंच कादंबरीकाराची बीथोव्हनच्या जीवनावरील कादंबरी तिला वाचायला मिळाली. रोला यांच्याशी झालेल्या दुसऱ्या प्रत्यक्ष भेटीत ‘‘गांधीच्या रूपात येशू पुन्हा अवतरला आहे’ असे कळल्यानंतर तिने गांधींना भेटायचा जणू ध्यासच घेतला. गांधींशी संपर्क साधून त्यांच्या अनुमतीने दीड वर्षातच त्या साबरमती आश्रमात दाखल झाल्या. पुढे त्या गोलमेज परिषदेच्या वेळी गांधीबरोबर युरोपात गेल्या. परिषदेचे काम आटोपून परतताना गांधी पॅरीसमध्ये रोमाँ रोला ह्यांच्या घरी मुक्कामास राहिले. शेवटच्या दिवशी गांधींनी बीथोव्हनचे अद्वितीय संगीत पियानोवर ऐकण्याची इच्छा व्यक्त केली व रोमाँ रोला यांनी ती ताबडतोब पूर्ण केली. पाश्चात्त्य संगीताबरोबरच भारतीय संगीताचीही गांधीजींना तीव्र आवड व जाण होती. पुणे येथील भास्करबुवा बखलेनिर्मित “गोपाळ गायन समाजाचे संस्थापक गोविंदराव देसाई यांनी पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्याकडून शास्त्रीय संगीताची तालीम घेतली होती. राष्ट्रगीत वंदे मातरम् म्हणण्यासाठी ते प्रसिद्ध झाले होते. १९३३ मध्ये गांधी पुण्यामधील पर्णकुटीत वास्तव्यासाठी असताना तेथे त्यांनी केलेल्या २१ दिवसांच्या उपोषणकाळात गोविंदराव रोज तेथे जाऊन भजन करीत. गांधीवरील संकट गोविंदरावाच्या गायन-भजनाने टळले असा समज त्यावेळी पसरला होता. उपोषणाच्या समाप्तीनंतर गांधींनी गोविंदरावांना बोलावले व त्यांच्याकडून त्यांनी गायलेले अभंग व पदे लिहून घेतली व ती छापायचीही व्यवस्था केली. साबरमतीच्या राष्ट्रीय शाळेत त्यांनी नारायणराव खरे यांना संगीत शिकविण्यासाठी मुद्दाम ठेवून घेतले रहोते. खऱ्यांकडून बाळकोबा भावे, पुंडलीकजी कातगडे व सीताराम ऊर्फ अप्पा पटवर्धन यांनीही चीजा शिकून घेतल्या. गांधींच्या भारतीय शास्त्रीय संगीताबद्दलचा दर्द व कानाचा प्रत्यय प्रख्यात संगीततज्ज्ञ वामनराव देशपांडे यांना आला. एका सायंकाळच्या प्रार्थनेत गांधीपुढे एकदोन भजने म्हणण्याची संधी त्यांचे गायकमित्र शंकरराव देशपांडे यांच्यामुळे त्यांना मिळाली. “तुम बिन मेरी कोन खबर ले, गोवर्धन गिरीधारी,’ हे भजन त्यांच्यासमोर म्हणताना एक ‘जागा’ अतिशय भक्तिभावाने म्हटल्यामुळे चांगली गेली. वामनराव गात असलेल्या संबंध वेळात गांधीजीचे डोळे मिटलेलेच होते. पण ती जागा घेताच त्यांनी किलकिले करून वामनरावांकडे पाहिले व त्यातच त्यांना गांधीच्या रसात्मकतेची पावती मिळाली. महात्माजींच्या पुढे गाणे हा एक जपून ठेवण्याजोगा अनुभव होता हे वामनरावांनी आवर्जून नमूद करून ठेवले आहे. दक्षिण भारतात संगीतक्षेत्रात सर्वोच्चपदी असलेल्या श्रीमती एम.एस.सुब्बालक्ष्मी यांची भजने गांधीजी अतिशय तन्मय होऊन ऐकत. आपल्या हत्येपूर्वीच्या प्रदीर्घ उपवासात त्यांनी ही भजने ऐकण्याची इच्छा प्रदर्शित केली होती, तेव्हा दुर्दैवाने श्रीमती सुब्बालक्ष्मी दवाखान्यात उपचार घेत होत्या. त्यामुळे त्या प्रत्यक्ष येऊ शकत नसल्याने त्यांची भजने ध्वनिमुद्रित करून गांधीजींना ऐकविण्यात आली. प्रकृती सुधारल्यानंतर त्या त्वरित आपली भजने त्यांना ऐकविण्यासाठी दिल्लीला गेल्या परंतु गांधीची त्याअगोदरच हत्या झाली होती व त्यामुळे सुब्बालक्ष्मींना शेवटपर्यंत ह्याविषयी खंत वाटत राहिली. गंगाधरराव देशपांडे यांनी १९२४ मध्ये पुढाकार घेऊन काँग्रेसचे अधिवेशन बेळगावात भरवले. म्हैसूर सरकारने अधिवेशनासाठी खास दरबारी कलावंत पाठविले होते. रुद्रवीणावादनासाठी प्रख्यात असलेले शेषण्णाचे वीणावादन गांधींनी दीड तास ऐकले. त्या अगोदर १९२३ साली काकीनाडा येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात किराणा घराण्याचे संस्थापक अब्दुल करीमखाँसाहेब यांच्याकडून त्यांच्या तंबूत खास जमविण्यात आलेल्या मैफिलीत गांधींनी गायत्री मंत्र, “वक्रतुंड’ यांखेरीज, “वैष्णव जन तो’ हे नरसी मेहताचे पद व “जे का रंजले गांजले” हा तुकारामाचा अभंग हेही ऐकले. गांधीजींच्या संगीतप्रेमाविषयी एवढे विस्ताराने लिहिण्याचे कारण हेच की त्यांच्याविषयी जनमानसात असलेल्या समजुती व प्रत्यक्ष वस्तुस्थिती ह्यांच्या दोन ध्रुवांइतके अंतर असू शकते हे दाखविणे हा आहे. अशाच बऱ्याच गैरसमजुतीविषयी सत्यस्थिती उजेडात आणून एक नवा प्रकाश श्री मोरे यांनी आपल्या ग्रंथात टाकला आहे. त्यामुळे त्याचे लेखन अतिशय बोधप्रद, चित्तवेधक व चकित करणारे झाले आहे.
जवळपास बाराशे पृष्ठसंख्या असलेला ग्रंथ पुण्यातील राजहंस प्रकाशननाने अतिशय आकर्षक व दिमाखदार पद्धतीने दोन खंडात प्रकाशित केला आहे. सहा महिन्यात या ग्रंथाची पहिली आवृत्ती संपून दुसरी मार्गस्थ आहे. मराठीतील या ग्रंथाचे उत्तम प्रकाशन व त्याला वाचकांचा मिळालेला प्रतिसाद दृष्ट लागण्याजोगा खचितच आहे. या सुखद पार्श्वभूमीवर मात्र महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक व एक थोर व ज्येष्ठ विचारवंत लेखक श्री. गोविंदराव तळवलकर ह्यांनी त्याची परखड व हेटाळणीच्या स्वरांत चिकित्सा करणारे दोन लेख साधना साप्ताहिकात लिहिले. या ग्रंथाचा मुख्य विषय व प्रा.मोरे यांनी काढलेले निष्कर्ष ह्यांच्यासंबंधी विशेष गंभीर स्वरूपाचे मतभेद होण्याचे कारण नाही ही गोष्ट तळवलकर लेखाच्या प्रारंभीच मान्य करतात ही आनंदाची गोष्ट आहे. तरीही त्यावर जरा खालच्या पातळीवर येऊन तळवलकर यथेच्छ तोंडसुख घेतात. हे किंचित क्लेशकारकच म्हटले पाहिजे. वास्तविक तळवलकरांसारख्या मान्यवर विचारवंताने वडिलकीच्या नात्याने जरा सहानुभूतीपूर्वक व जिव्हाळ्याने या ग्रंथाची दखल घ्यावयास हवी होती. श्री मोरे याचे लिखाण तळवलकरांच्याही लिखाणक्षेत्राशी निगडीत असल्याने त्यांनी याबाबत टीका करताना थोडी समजसपणाची भूमिका घेणे अपेक्षित होते. दुर्दैवाने हे परीक्षण “अत्यंत वैयक्तिक पातळीवर उतरणारे व पूर्वग्रहदूषित असल्याचा श्री मोरे ह्यांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या त्यावरील आरोपात तथ्य आहे असा समज होतो. साधनाच्या संपादकांनी तळवलकरांचे दोन टीकात्मक लेख व त्याला श्री मोरे यांनी दिलेले उत्तर प्रसिद्ध केले आहे. हा नवा वाद त्यांनी हेतुपुरस्सर निर्माण केला आहे. त्यामागे सुधारकाग्रणी गोपाळराव आगरकर ह्यांनी मागील शतकाच्या अखेरीस आपल्या ‘सुधारक’मधून ‘महाराष्ट्रीयांस अनावृत पत्र’ या लेखाद्वारे केलेल्या आवाहनाचा समर्थ आधार त्यांनी घेतला आहे. दुष्ट आचाराचे निर्मूलन, सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धी, सत्यशोधन व भूतदयेचा विचार इत्यादी मनुष्याच्या सुखाची वृद्धी करणाऱ्या गोष्टी अशा विचारकलहाद्वारे साध्य व्हाव्यात ही आगरकरांची अपेक्षा होती. तळवलकराच्या असंतुलित व द्वेषपूर्ण आणि कुत्सित भावनेने भरलेल्या टीकालेखांनी स्वाभाविकपणे दुखावलेल्या श्री मोरे यांनी दिलेल्या संतापयुक्त प्रत्युत्तराने सुधारकांना अपेक्षित उद्दिष्टाची पूर्ती होण्यास बाधा येते यात शंका नाही. हा विचारकलह विकोपास जाऊ न देण्याविषयी घ्यावयाची खबरदारी आगरकरांनी सांगितल्यानुसार दोघानीही घेतली असती तर निकोप वातावरणात हा वादविवाद रंगून जिज्ञासू व चिकित्सक वाचकांचे निःसंशय भरपूर प्रबोधन झाले असते. असो. एका अतिशय जिव्हाळ्याच्या ऐतिहासिक कालखंडाविषयी, महाराष्ट्राच्या संदर्भात, चर्चेला पुन्हा उधाण यावे हे शुभचिह्न आहे.याबद्दल विशेषतः श्री मोरे यांचे मनापासून आभार मानायला व अभिनंदन करायला हवे.
‘अद्वैत’, दिघोरी, रामकृष्णनगर, नागपूर ४४००३४.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.