गड्या, तू बोलत का नाही ?

प्रिय वाचक,
सुधारक कोणासाठी आहे असा प्रश्न मला मधून-मधून पडतो, कधी तो वाचकही विचारतात. स्वेच्छेने, काही एका अपेक्षेने जे वर्गणीदार झाले त्यातलेही कोणी हा अवघड प्रश्न विचारतात. काही भले वाचक, आपणच वाचक म्हणून कमी पडतो अशी समजूत घालून घेतात. पण हा प्रश्न गंभीरतेने घेण्यासारखा आहे. ग्राहकाचा कधीच दोष नसतो असे म्हणतात. त्या चालीवर वाचकांचा उगीच रोष नसतो असे मानायची माझी तयारी आहे. म्हणून वाचकाचे म्हणणे ऐकायला मी उत्सुक असतो. कोणत्याही वाययीन उपक्रमाला प्रतिपोषण (षशशव लरलज्ञ) हे आवश्यकच आहे. म्हणून आम्ही तुम्हाला आवाहन करीत आहोत की, वाचकहो, बोला! आम्ही तुमचे मत ऐकायला उत्सुक आहोत.
आमच्या मर्यादेत आम्ही आ.सु.च्या अंतरंगात बदलाचे काही प्रयोग करीत आहोत. त्यावरही प्रतिक्रिया हव्या आहेत, प्रतिकूल, अनुकूल ! हेतू हा की, आ.सु. स्वतःच सुधारणेच्या पलिकडे गेला आहे असा समज न व्हावा.
या अंकात आ.सु. चे संस्थापक संपादक प्रा. दि.य.दे. यांच्यावर एक लहानसे टिपण आहे. लेखक डॉ. हराळे, दि.य.दे. आणि मनुताई नातू विशेषतः मनुताईंचे अन्तेवासी शिष्य होते. नागपंचमी हा दि.यं.चा जन्मदिन, त्यानिमित्त हराळे ह्यांची नानांच्या स्मृतीला अल्पशी आदरांजली.
ऑगस्टच्या ६ तारखेला नागपूरचे तरुण, बिनीचे नाटककार श्री पराग घोंगे ह्यांची तीन पुस्तके एकदमच प्रकाशित झाली. यानिमित्त त्यांनी एक त्रिवेणी संगम घडवून आणला होता. मराठीतले आजच्या पिढीतले बहुधा सर्वश्रेष्ठ, (पण सर्वविदित नक्कीच) असे नाटककार श्री विजय तेंडुलकर, अखिल भारतीय कीर्तीचे महेश एलकुंचवार आणि तशाच तोलामोलाच्या नाट्यसमीक्षक श्रीमती पुष्पा भावे ह्यांना एकत्र आणले. त्यांनी यानिमित्त नाटकाचे स्वरूप, तंत्र आणि साहित्यशास्त्र याविषयी जे चिंतन केले ते मननीय आहे.
उपोद्धात पुष्पाताईंनी केला. विषयाचा उपन्यास करताना त्या म्हणाल्या की नाटककाराच्या लिखित शब्दाइतकाच त्याचा अलिखित शब्द ह्र विराम ह्र महत्त्वाचा असतो. नाटककाराला नाटकातील अवकाशाचे (Space चे) मर्म समजले पाहिजे. हेच सूत्र घेऊन तेंडुलकरांनी प्रतिपादन केले की, आपण लिहितो ते नाटक आणि प्रत्यक्षात प्रेक्षकांना सादर होते ते नाटक एकच असत नाही. नाटक प्रयोगातून जिवंत होत असते. दिग्दर्शक नाटकात जे पाहतो ते त्याचे एक रूप. पुढे नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार ह्यांना त्यात जे जे दिसते ती आणखी रूपे असतात आणि अखेरीस नट, नट्या जे अभिनीत करतात ते आणि प्रेक्षागारात प्रेक्षक जे पाहतो ते, तो आणखी वेगळाच टप्पा असतो. ही रूपांतरे अटळ असतात. नाटककार एक करू शकतो. लिखित शब्दाइतकाच अलिखित शब्दाला तो वाव देऊ शकतो. म्हणून त्याने संहितेत विराम ठेवले पाहिजेत. अर्थवाहक अवकाश चांगल्या नाटकात आवश्यक असतात. हे अवकाश प्रत्येक टप्प्यावरच्या नाट्यकलावंताला त्याच्या सूचकतेला, अन् त्याच्या कल्पनाशक्तीला वाव देतात. म्हणजे मग मूळ संहिता विकल (distorted) होत नाही. आणि नट सूचक अभिनयाऐवजी बटबटीत स्पष्टीकरण करायला प्रवृत्त होत नाही.
एलकुंचवार म्हणाले, नाट्यसंहिता नाटककार लिहितो ती, तेवढी एकच असत नाही. त्या एका लिखित संहितेमागे अनेक अलिखित संहिता असतात. ह्या आश्रित, सुप्त संहिता जितक्या जास्त तितके नाट्यकलावंतांना आणि प्रेक्षक-श्रोत्यांना आह्वान अधिक म्हणून सर्वांत परिपूर्ण नाटक तेच, जे अपूर्ण असते.
नाटककाराने भावनेच्या ऊर्मीत शब्दांची उधळण करण्याचा मोह टाळावा. हे शब्द खोटे असतात. खरा शब्द अंतःकरणातून येतो. अशा शब्दांचा परिणाम मंत्रासारखा होऊ शकतो.
एलकुंचवारांनी आणखी एक गोष्ट अधोरेखित केली. संगीताची मैफिल, चित्रकलेचे प्रदर्शन, पाहिल्यावर त्यांच्या आस्वाद्यतेबद्दल रसिक बोलतो, तेव्हा त्याचा काही अभ्यास असतो, त्याला व्यासंग लागतो हे सर्वांना पटते. खुद्द समीक्षकालाही ते पटलेले असते. पण नाटक पाहणाऱ्याला अशी काही पूर्वतयारी लागते, याची लोकांना जाण नसते. कोणालाही, ज्याला डोळे आहेत त्याला नाटक कळते असे लोक समजतात आणि बेधडक भलेबुरे अभिप्राय देत सुटतात.
नाट्य हे रसनिर्मिती करणारे काव्य असते आणि त्याच्या साफल्यासाठी प्रेक्षकह्नश्रोत्यांचेही तेवढेच साहाय्य लागते ते असेल तरच रससिद्धी होऊ शकते.
आ.सु.च्या गेल्या अंकातील, संपादकीयाबद्दल एक स्नेही म्हणाले की ते लेखन गुळमुळीत आहे. टीका पुरेशी स्पष्ट नाही. विवेकवाद्याला कोणीच गुरु नसतो, तो आपणच आपला गुरु असतो इ.इ. आम्ही उत्तर एवढेच दिले की लिखित शब्दांच्या दरम्यान अलिकडे-पलिकडे विराम पुष्कळ आहेत. ‘शेषं यत्नेन पूरयेत् ।’ इत्यलम् ।
आपला, प्र. ब. कुळकर्णी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.