दि.य.दे. आदरांजली

गेली नागपंचमी प्रा. दि.य.देशपांडे (ती. नाना) यांचा आज तसा नव्वदावा जन्मदिन ! काही माणसे जन्माला येतात ती केवळ इतरांना काहीतरी देण्यासाठी ! देता देता ती कुठे नि कधी हरवतात हे कळतही नाही. नानांचे देहदान अन् चक्षुदान हे दैहिक पातळीवर असले तरी ‘देहाचे पारणे फिटणे’ ही विज्ञाननिष्ठ भूमिका त्यामागे आहे. आयुष्यभर देहाची जराही चिंता न बाळगणाऱ्या नानांनी जाताना देहालाही दानाचे भाग्य मिळवून दिले! ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या उक्तीचे महत्त्व आम्हाला, पटो न पटो, आम्ही मात्र साक्षात् ‘साधुत्व’ अंगी बाणलेल्या प्रा. दि.य. देशपांड्यांच्या रूपात ते अनुभवले. घरात पांढरा स्वच्छ झब्बा-लेहंगा आणि कॉलेजात साधी पँट, बुशशर्ट व अभ्यासिकेत मात्र प्रचंड तत्त्वज्ञानाची पुस्तक-पखरण हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन ! तत्त्वज्ञान हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता. नव्हे, त्याचा त्यांच्या इतक्या जवळ राहूनही, आम्हाला कधी प्रत्यय आला नाही. पण त्यांच्या तत्त्वज्ञानाची महती मात्र अवघ्या मनाला व्यापून टाकत होती! ‘तत्त्व’ जगणे आणि ‘तत्त्वाचा’ प्रसार करणे हे तसे जीवनाचे दोन वेगवेगळे भाग आहेत! मात्र प्रा. दि.य.देशपांडे हयातभर केवळ ‘तत्त्वज्ञान’च जगले! जगण्यातले स्वारस्य संपले तरी तत्त्वज्ञानाची कास न सोडणारे प्रा. दि.य.देशपांडे हे, बहुधा असामान्य ‘तत्त्वज्ञ’ होते. तत्त्वज्ञान हेच त्यांचे जीवनध्येय होते. कुणीही असो-भाऊ, स्नुषा, मित्र-मंडळी यांच्या वागण्या-बोलण्याचा ते केवळ तात्त्विक अर्थ घेत. इतकेच नाही तर मराठी वाययातल्या तात्त्विक अंगांचाही ते सतत पाठपुरावा करीत. वा.म.जोशी, श्री.व्यं.केतकर इत्यादींच्या साहित्यकृतींचा मागोवा घेत-घेत त्यांच्यातील ‘तत्त्वज्ञा’चा ते शोध घेत. प्रा. म.गं.नातू (मावशी) यांच्यासारख्या वाययाभ्यासकांच्या चिंतन-मननातून निष्पन्न झालेल्या ‘विवेकवादा’ला तत्त्वज्ञानाच्या कसोटीवर घासून-पुसून, परिष्कृत केले. नातूबाईंची ‘विवेकाची गोठी’ अभ्यासकांना पर्वणी वाटते, याचे कारण त्यामागची प्रा. म.गं.नातू व प्रा.दि.य.देशपांडे यांची वर्षानुवर्षांची वाययीन तपश्चर्या ! कोणत्याही गोष्टीचे मूळ शोधीत जाणे हे व्रत नानांनी स्वीकारले. ‘अभ्यासेविण’ त्यांनी कुणाला कधी साधा सल्लाही दिल्याचे, मला आठवत नाही. जाईपर्यंत ही ज्ञानगंगा कधी आटली नाही! वैयक्तिक जीवनाचा आलेख नानांनी कधी रेखाटला नाही, की कुणापुढे त्याचा साधा उल्लेखही केला नाही. स्वाध्याय ही एकच वृत्ती. तसे संत-महात्म्यांचेच जिणे ते जगले! हेवेदावे, कुरकूर त्यांना कधी स्पर्शही करू शकली नाही. त्यांच्यापेक्षा कितीतरी पटींनी ‘गौण’, त्यांची समकालीन मंडळी, प्रसिद्धीस पावल्याचे, पाहिले, अनुभवले. पण नानांचे ब्रीद एकच! अभ्यास, मनन, चिंतन आणि त्याचे प्रगटीकरण! तत्त्वज्ञानाला भाषेची सुलभता असावी असे आम्हाला कितीही वाटले, तरी एका विशिष्ट मर्यादेपलीकडे ते सुलभ होऊ शकत नाही, हे नानाचे म्हणणे! तत्त्वज्ञानाच्या साध्या चार वाक्यांनी आमच्या देहाला मुंग्या येतात, आमचे अंग बधिर होते! पण नाना ? अखेरपर्यंत तत्त्वज्ञानाला आंजारत, गोंजारत राहिले. थकवा, मरगळ, औदासीन्य यांचा वाराही त्यांना लागू शकला नाही. आज जी ‘तत्त्वज्ञान’ या विषयाची गत आहे, त्याचे खरे कारण म्हणजे नानांसारखी ‘तत्त्वज्ञाना’ला जीवन देणारी ‘तत्त्वज्ञ’ मंडळीच नाहीत! ते गेल्याने ‘तत्त्वज्ञान’ पोरके झाले, हे निश्चित !
अ-३, सुधीर कॉलनी, अकोला ४४४ ००५. मोबा.९४२२१६३९९७

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.