समूहाचे मानसशास्त्र

‘परिस्थितिजन्य’ मानसिकता
‘दुष्ट लोकच दुष्कृत्य करीत असतात’ या विधानाविषयी जगातील यच्चयावत सर्व सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक संघ-संस्थांचे एकमत आहे. जगरहाटीची समज नसलेली लहान वयातील मुले-मुलींचा अपवाद वगळता इतरांना कशाही प्रकारे वागण्याची मुभा असणे, त्यांच्या वर्तणुकीचे मूल्यमापन करणे आणि वरील प्रकारचे विधान करणे जगातील सर्व समाजामध्ये रूढ आहे.
परंतु या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या व साध्या नाहीत. समाजशास्त्रज्ञ व मानसतज्ज्ञ यांच्याजवळील पुरावे काही वेगळेच सांगत आहेत. या क्षेत्रातील संशोधकांच्या मते बऱ्याच वेळा दुष्कृत्याला भोवतालची परिस्थिती कारणीभूत ठरते, व्यक्ती नव्हे. दुष्कृत्य करणाऱ्यांमागे त्यांच्या अवती भोवती असलेल्यांचा फार मोठा प्रभाव असतो, हे चटकन लक्षात येत नाही.
अगदी टोकाचेच उदाहरण घेतल्यास मानवी बॉम्बस्फोट घडवून असंख्य लोकांची हत्या करणारे वा साखळीस्फोट घडवून शेकड्यांनी बळी घेणारे, सामान्य कुवतीचे लोक, मानसिकरीत्या सुदृढ, शिकलेले असतात, हे लक्षात येईल. परंतु त्यांच्या मनाचा व बुद्धीचा ताबा घेऊन काही उद्दिष्टपूर्तीसाठी त्यांचा वापर केला जातो. बळीचा बकरा बनवला जातो. अमानुष, अघोरी कृत्य करणारे इतर जनसामान्यांपेक्षा फार वेगळे नसतात. फक्त त्यांच्या दुष्कृत्याचे उत्तरदायित्व कुणीतरी दुसरे उचलत आहेत, यावर भरवसा असल्यामुळे दुष्कृत्य करण्यास ते मागेपुढे पाहात नाहीत.
हीच परिस्थितिजन्य’ मानसिकता आपल्या दैनंदिन व्यवहारातसुद्धा डोकावत असते. आपण जे विकत घेतो तो सर्वस्वी आपलाच निर्णय असतो या भ्रमात आपण वावरत असतो. वास्तवात आपले निर्णय लादलेले असतात. आपल्या खरेदीच्या सवयी घडवलेल्या असतात. कोलगेट टूथपेस्ट घेण्याच्या निर्णयामागे पेस्टच्या जाहिरातीतील आकर्षक चेहरे, दुकानातील मांडणी, वेष्टनावरील चित्र इत्यादी अनेक गोष्टी असतात. बेस्टसेलर्सच्या यादीतील पुस्तक एक जण घेतो म्हणून दुसरा घेतो, तिसरा घेतो— हजारो जण घेतात त्यातूनच पुस्तकाची मागणी वाढू लागते. अपरोक्षपणे ते पुस्तक उत्कृष्ट आहे असा समज दृढ होत जातो. आपणही इतरांना पुस्तक खरेदी करण्यास प्रवर्तित करतो. समाजप्रवाहापासून वेगळे पडू, एकाकी राहू या अव्यक्त भीतीने आपण ग्रासलेले असतो. त्यामुळेच आपण प्रवाहपतित होतो. आपले निर्भीड मत मांडणे आपल्याला शक्य असते. वेगळा निर्णय घेणे अवघड नसते. परंतु समूहाबरोबर राहण्याच्या अट्टाहासामुळे समूहाचे विचार हेच आपले विचार असे आपण (उगाचच!) मनाची समजूत करून घेतो.
या प्रकारच्या समूहविचारामुळे (ग्रूपथिंकिंगमुळे) भरपूर नुकसान झाले आहे व होतही आहे. हीच विचारशैली सरकारी ध्येय-धोरणे, व्यापार-उदिमांची, राजकीय व सामाजिक अंदाज, इत्यादींमधील निकृष्ट प्रकारच्या निर्णयास सर्वस्वी जबाबदार आहे. आधुनिक व्यवहार सांभाळणारे व्यवस्थापक वा कुठल्याही क्षुल्लक कारणांसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष यांना या समूहविचाराच्या प्रभावाची पुसटशी कल्पना नसते. म्हणूनच आम्ही योग्य निर्णय घेऊ शकतो असा समज करून घेत सदैव मूर्खाच्या नंदनवनात ते वावरत असतात.
आपली निवड आपण बुद्ध्या घेतलेल्या निर्णयाचे फलित असते, असे ठामपणे सांगता येत नसल्यास यासंबंधात अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. खरेदी-विक्री करणाऱ्या कंपन्या, ग्राहकांची ‘अभिरुची’ कशी काय ओळखतात ? सामाजिक व धार्मिक संघ-संस्था आपल्या अनुयायांचे निर्णय कसे बदलतात ? निर्णयांना कशा प्रकारे कलाटणी देऊ शकतात ? निवडणुकीच्या काळातील जनमतचाचणीचा परिणाम मतदारांवर होत असेल का? खऱ्या लोकशाहीसाठी जनमत चाचणीवर सरसकट बंदी घालावी का? पर्यावरण, प्रदूषणनियंत्रण, विकासप्रकल्प, विस्थापितांचे पुनर्वसन इत्यादी कळीच्या प्रश्नावर केवळ ८-१० टक्के लोकच पुढाकार घेतात व इतर ८०-९० टक्के लोकांवर दबाव टाकतात, हे विधान खरे आहे का ? अशा स्थितीत नेमके काय करायला हवे ? व्यक्तीने केलेल्या दुष्कृत्यासाठी समूहाला जबाबदार धरता येईल का? याविषयी न्यायालयाची प्रतिक्रिया काय असू शकेल ? न्यायनिर्णय करताना समूहाच्या मानसिकतेच्या विचारांची दखल घ्यावी का?
अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आणि आत्मघातकी बॉम्बस्फोट व नरसंहार थांबवण्यासाठी गर्दी-गट-समूह यांच्या मनसशास्त्राचा अभ्यास करावा लागेल. गट वा समूह आणि त्यातील सदस्यांचे परस्परसंबंध यांची तपासणी करावी लागेल. असे केल्यास या ज्ञानाचा सकारात्मक व रचनात्मक कार्यासाठी उपयोग करून घेता येईल. निदान कार्याची दिशा ठरवता येईल. अचूक अंदाज घेता येईल.
समूहविचाराचा प्रभाव
काही महिन्यांपूर्वी जगभरच्या टीव्हीवर मानवी हक्कांची सातत्याने पायमल्ली करणाऱ्या अमेरिकन सैनिकांपैकी एका सैनिकाने इराकमधील अबुधारिब येथील इराकी युद्धकैद्यांच्यावर केलेल्या अमानुष छळांचे प्रकार बघितल्याचे आठवत असेल. डोक्यावरून गुडघ्यापर्यंत अंगभर बुरखा पांघरलेल्या इराकी कैद्यांना स्टूलवर उभे करून इलेक्ट्रिक शॉक देण्याचा तो एक अघोरी प्रकार होता. स्टूल थोडासा हलला तरी वीजप्रवाहामुळे कैद्याला जीवघेण्या वेदना होत होत्या. अशा प्रकारे कैद्यांना छळून, काहीही वदवून घेता येते याची आखणी अमेरिकन सैन्यातील एका राखीव गटाने केली व प्रत्यक्ष कारवाईसाठी स्टाफ सार्जंट इव्हान फ्रेड्रिक याची नेमणूक केली गेली. या दुष्कृत्याला जबाबदार म्हणून फ्रेड्रिकला आठ वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा झाली. त्याची नोकरी गेली. टीव्ही प्रेक्षकांच्या मते फ्रेड्रिक हा दुष्ट, माणुसकी नसलेला, नीतीची चाड नसलेला, नराधम होता. फ्रेड्रिकने केलेल्या दुष्कृत्याच्या तुलनेने त्याला झालेली शिक्षा फार सौम्य आहे, असेच अनेकांना वाटले. शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाच्या मते फ्रेड्रिकने कैद्यांचे छळ करण्यासाठी मुक्त स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला आहे. परंतु खरोखरच फ्रेड्रिकला असे करण्याचे मुक्त स्वातंत्र्य होते का ?
एका मानसशास्त्रज्ञाच्या मते फ्रेड्रिकच्या खटल्यातील न्यायाधीशाचे चुकीचे आकलन असून अपराध एकाचा व शिक्षा दुसऱ्याला असे झाल्याचा संभव आहे. या न्यायनिवाड्यात काहींच्या वर्तनाला अवाजवी महत्त्व दिले असल्याची व हे दुष्कृत्य करण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या भोवतालच्या परिस्थितीचे अपुरे आकलन झाले असण्याची दाट शक्यता आहे, असे त्याचे स्पष्ट मत आहे. फ्रेड्रिकच्या मनःस्थितीची चाचणी व त्याच्याबरोबर झालेला प्रदीर्घ संवाद यावरून तो निश्चितच मनोरुग्ण व उलट्या काळजाचा होता हे सिद्ध होत नाही.
फ्रेड्रिक
हा इतर कुठल्याही सर्वसामान्य अमेरिकन नागरिकासारखा धार्मिक, कुटुंबवत्सल, स्वतःच्या कामात चोख, संथ जीवन जगणारा, मित्रपरिवार असलेला सैनिक होता. फक्त तो अबु घारिबला गेला व राक्षसी वर्तन करणारा उलट्या काळजाचा माणूस झाला.
कदाचित अबु घारिबचे उदाहरण अत्यंत टोकाचे असे वाटेल. परंतु अशा प्रकारे माणसांच्या मानसिकतेत संपूर्ण बदल बहुतेक ठिकाणी,बहुतेक प्रसंगात झालेले आढळतात. समूहाच्या विचारधारेत पूर्णपणे झोकून घेतलेली माणसे सर्रासपणे अनेक ठिकाणी सापडतील. दंगे-धोपे करणाऱ्या गर्दीत, क्रिकेट-फुटबॉलच्या मैदानावर, सामाजिक कार्य करणाऱ्या नेटवर्किंगमध्ये, विविध प्रकारच्या समितीच्या बैठकीत व न्यायाधीशांच्या खंडपीठातसुद्धा! अशा वातावरणात समूहाच्या मानसिकतेचा प्रभाव वाढत जातो व व्यक्ती आपल्या नेहमीच्या वर्तणुकीच्या विरुद्ध प्रसंगी धोका पत्करूनसुद्धा गर्दीबरोबर वाहत जातो. ‘तुझ्या प्रेमाखातर प्रसंगी जीवसुद्धा देईन’ अश्या आणा-भाका करणारी प्रेमात पडलेली तरुणी आई-वडील-नातलग यांच्या दबावाला बळी पडून भलत्याच माणसाशी लग्न करून मोकळी होते व सुखाचा संसार करते. यात दोष कुणाचा? तरुणीचा की तिच्या भोवती जमलेल्या नातलगांचा ?
अबु घारिबच्या अत्याचाराच्या बातमीनंतर अनेक देशात याविषयी अभ्यास करण्यात आला. सुमारे २५,००० प्रकरणांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या मनात, कुठलाही माणूस गर्दीच्या मानसिकतेचा बळी होऊन कुठलीही हीन कृती करण्यास तयार होऊ शकतो, याबद्दल तिळमात्र शंका नव्हती.
वर्तणुकीत बदल
शांतताप्रिय माणसेसुद्धा कशा प्रकारे क्रूर बनू शकतात याची अनेक उदाहरणे सापडतील. गोध्रानंतर भडकलेल्या गुजरातच्या दंगलीतील अमानुष हिंसाचार निष्पाप धर्मभीरू, गुजराती हिंदू समाजानेच उघड्या डोळ्यांनी नियोजनपूर्वक केला हे आपण विसरू शकत नाही. खैरलांजीतील सतत दोन तास चाललेला दलित कुटुंबावरील अत्याचार त्याच खेड्यातील सामान्य लोकांच्या समोरच घडत होता. मुले पळवतो म्हणून एखाद्या भिकाऱ्याला जमलेला जनसमूह दगडाने ठेचून मारतो. बंदूकधारी पोलिस बघ्यांच्या गर्दीवर बेछूट गोळीबार करू शकतात. वर्दीचा माज चढल्यानंतर सारासार विचार करणारी बुद्धी बिथरते.
गर्दीला दया-माया-नीती नसते. गर्दीच्या तावडीत सापडलेल्यांना माणूस असे न मानता तो एखादा हिंस्र पशू आहे असेच समजून त्याची शिकार केली जाते. उद्दिष्ट ‘पूर्ण’ झाल्यानंतरच गर्दीला जाग येते. अडवाणींची रथयात्रा अयोध्येतील बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्यानंतरच थांबते.
व्यक्तीवरील अंतिम जबाबदारीचे ओझे उतरून टाकण्याचे काम त्याच्या भोवताली असलेला समूह करत असतो. अप्रत्यक्ष वा प्रत्यक्षपणे दबावाचे तंत्र वापरून समूह व्यक्तीला नामोहरम करते. आपला विचार त्याच्या गळी उतरवते. गर्दीत कृती करणारी व्यक्ती अनुकरणप्रिय असते व करून सवरून नामानिराळी राहू शकते. परंतु समूहात, समूहाचा नेता वरिष्ठ व इतर सहकारी यांच्याबद्दल ‘बंधुत्वा’चे अजोड नाते असते. ही बंधुत्वाची भावनाच समूहासाठी त्याग करण्यास भाग पाडते. आत्मसमर्पण करण्यास प्रवर्तित करते. स्वतःचा जीव गमवण्याची शंभर टक्के खात्री असतानासुद्धा मानवीबॉम्बसाठी ‘स्वयंसेवकां’ची फौज तयार असते.
या आत्मसमर्पणाच्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडत नसल्यामुळे कदाचित खोट्या वाटतील. परंतु आपल्या नित्य व्यवहारातील छोट्या-मोठ्या निर्णयांना इतरांच्या दबावाचीच झालर असते. इतरांचे अनुकरण करण्याकडे आरसा आपला कल असतो. लताच्या गाण्याची मोहिनी साठ-सत्तर वर्षानंतरसुद्धा ओसरली नाही असेच तिच्या भक्तांना वाटत असते. कारण तिचे (आताचे) गाणे रद्दड आहे असे म्हणण्याचे धार्य कुणीच करू शकत नाही. तिच्या गाण्याच्या माधुर्यात वयोमानाप्रमाणे नक्कीच फरक पडला असेल. तिच्या मूड्सप्रमाणे गाण्याचा गुणवत्तेत चढ-उतार झालेले असतील. परंतु तिचे भक्तगण तिच्याबद्दल एक अवाक्षरही उच्चारणार नाहीत. समूहाच्या विचारधारेपासून फटकून वागल्यास आपण एकाकी पडू हीच भीती त्यांना तसे करण्यास भाग पाडते.
या प्रकारच्या वर्तणुकीची दोन कारणे असू शकतात. बालपणापासून मिळत असलेले सामाजिक शिक्षण हे एक कारण असू शकेल. जग हे अत्यंत जटिल व गुंतागुंतीचे असल्यामुळे व्यक्तीला प्रत्येक समस्येचे समाधानकारक उत्तर शोधणे जवळ जवळ अशक्य आहे. म्हणूनच प्रत्येक जण सामाजिक व्यवस्थेत सुप्तपणे उपलब्ध असलेल्या माहितीवर विसंबून राहू इच्छितो ‘मला त्यातले काय कळते? इतरांना माझ्यापेक्षा जास्त अक्कल आहे.’ ही मानसिकता त्यामागे दडलेली असते. दुसरे कारण सामाजिक समन्वय साधण्याचा प्रयत्न हे आहे. इतर जे करत आहेत ते कदाचित उत्कृष्ट नसलेही. परंतु इतरांबरोबर असणे याला जास्त महत्त्व दिले जाते. लताचे गाणे, जगजितसिंगचे गझल, ‘हम आपके हैं कौन’ सारखा चित्रपट, शिवाजीराव भोसले-बाबासाहेब पुरंदरे. यांची (रटाळ) भाषणे, व.पु. काळे-शरद उपाध्ये यांचे एकपात्री प्रयोग, बाल गंधर्वह्नबाळ कोल्हटकर यांची (एकाच पठडीतील) नाटके, विश्वनाथ किराड ह्र विजय भाटकर यांची अध्यात्मावरील (अंध) श्रद्धा, रामदेवबाबा-रविशंकर यांच्या शारीरिक कवायतींचे प्रदर्शन, ‘गर्भसंस्कार’सारख्या बाजारू पुस्तकाचा प्रचंड खप, इत्यादी, सामाजिक समन्वयापायी समाजाने अदा केलेली किंमत असते. या गोष्टी आवडणे हे त्यांच्यातील गुणवत्ता किंवा सर्जनशीलता यांसाठी नसून सामाजिक संवाद साधण्याचे निमित्त म्हणून या गोष्टींचा वापर होत असतो. या प्रकारात सहभागी असण्यामुळे समाजाचा आपण भाग आहोत ही एक सुखद संवेदना जाणवू लागते. आपल्यापेक्षा ‘महान’ असलेल्याशी आपण जोडले जात आहोत यात समाधान असते. ‘लाखो लोक मानतात. मग आपणच का मागे?’ ही मानसिकता त्यात दडलेली असते.
मनोवृत्तीचा (गैर) फायदा
याच मनोवृत्तीचा फायदा जाहिरातदार घेत असतात. आर्थिक व्यवहार याच मुद्द्याभोवती फिरतात. शेअरबाजारातील उलाढाल याचीच फलश्रुती आहे. ‘कल्पवृक्ष’सारख्या (अस्तित्वात नसलेल्या) सागांच्या झाडांची विक्री करणाऱ्या बोगस कंपन्या लोकांना गंडा घालून याच मानसिकतेचा फायदा घेत करोडोंनी पैसा कमावतात. राजकारण्यांना ही गुरुकिल्ली सापडलेली असल्यामुळे ‘चक्का जाम’ संप, मुंबई-पुणे बंद, सारखी हत्यार वेळी अवेळी वापरून लोकांना वेठीस धरतात. जनमत चाचणीचे खोटे आकडे फेकून मतप्रवाह आपल्याकडे वळवतात. आश्वासनांची खिरापत वाटतात. एका रात्रीत गल्लीतला ‘गुंड’ नेता होतो.
माणसे, अशा प्रकारे, सामाजिक परिस्थितीच्या गतिमानतेला बळी पडणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. मुळात माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. इतरांशी सहकार व समूहाशी संलग्नता ही त्याच्या अस्तित्वाची हत्यारे आहेत. आपल्यातील विवेकाचा इतरांवर प्रभाव पडू शकतो हे जरी खरे असले तरी एका मर्यादच्या पलीकडे गेल्यास आपण गोत्यात येऊ शकतो. सूर्यकेंद्रित विश्व ही संकल्पना त्या काळातील जनमताच्या विरोधी असल्यामुळे ‘गॅलिलिओला’ म्हातारपणी एकांतवासाची शिक्षा भोगावी लागली.
एखाद्या उद्देशाने प्रेरित होऊन एकत्रित आलेले लोक, समूहरचना करतात. परंतु यांनाच टोकाची भूमिका घेण्यास समूहाची मानसिकता भाग पाडते. जॉर्ज बुशची इराक संबंधीची ध्येय-धोरणे चुकीची आहेत, असे पहिल्यांदा म्हणणाऱ्या समूहाची, जार्ज बुश एक माथेफिरू नेता आहे, असे म्हणण्यापर्यंत मजल जाते. मग याच विचाराचे ध्रुवीकरण होत होत त्याचा काटा काढायला हवे असे म्हणण्यासाठी हा समूह कचरणार नाही.
सहमती असलेल्या समूहातील प्रत्येक जण आपल्या मताला पुष्टी देणाऱ्या मुद्द्यांचीच मांडणी करत असतो. प्रत्येक सदस्य इतराच्या मतांशी तुलना करत आपल्या मतात बदल करतो व समूहविचाराला जोडून घेतो. कारण समूहाशी फटकून वागण्यात शहाणपणा नाही हे त्याला कळून चुकलेले असते. विनाकारण धोका पत्करण्याची तयारी नसते. याचेच पुढचे पाऊल म्हणजे समूहासाठी आत्मसमर्पण करण्यात त्याला गर्व वाटू लागतो. ही मानसिकता तरुणांच्या समूहात प्रकर्षाने जाणवत असते. वरिष्ठाची/नेत्याची आज्ञा शिरसावंद्य मानून धोका पत्करायला तरुण सदैव पुढे असतात. अशा प्रकारचे ध्रुवीकरण समूहविचाराचाच परिणाम आहे. समूहातील प्रत्येक जण समूहाची संलग्नता अबाधित ठेवण्यास आटोकाट प्रयत्न करत असतो. समूहाचा एकोपा समूहातील प्रत्येकाला बळ प्राप्त करून देतो. त्यांच्यातील आत्माभिमान वाढवतो. परंतु समूहविचार वाईट व धोकादायक निर्णय घेण्याससुद्धा भाग पाडू शकतो. समूहविचाराला विरोध म्हणजे समूहाला विरोध असा अर्थ काढला जातो. एखाद्या समस्यांबद्दल अधिक माहिती असली तरी त्या माहितीचे आदानप्रदान करण्यास काहीजण पुढे येत नाहीत. कोलंबिया अंतरिक्ष यानाचे उड्डाण विफल होण्यास हीच मानसिकता कारणीभूत ठरली. त्या प्रकल्पावर काम करणाऱ्या एका तंत्रज्ञाला यानाचा एक भाग कमकुवत आहे, त्यामुळे प्रकल्प धोक्यात येऊ शकतो याची कल्पना असूनसुद्धा त्याने तोंड उघडले नाही.
नैसर्गिक आपत्ती, आणीबाणी वा युद्धसदृश प्रसंगात जास्त प्रभावशाली नेत्यांच्या समूहाच्या आहारी जाण्याची मानसिकता आपल्यात असते. युद्धजन्य परिस्थितीत सत्ताधारी नेत्यांना विनाअट सर्व अधिकार बहाल केल्या जातात. ९ सप्टेंबरच्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर अमेरिकेतील सर्व जनता ‘दहशतवादाविरुद्ध युद्ध’ पुकारलेल्या जॉर्ज बुशच्या ध्येय धोरणांना समर्थन देऊ लागली. कठिण परिस्थितीत लोक समूहालाच शरण जातात. परंतु ही मानसिकता काही वेळा ‘आगीतून फुफाट्यात’ अशीही होऊ शकते.
विवेकाची सरशी
परंतु प्रत्येक वेळी समूहविचाराचीच सरशी होते हेही तितके खरे नाही. समूहाची टोकाची भूमिका व त्यातून घडणारे दुष्कृत्य त्यांच्यातील एखाद्याला तरी शिसारीही आणू शकते व सारासार विचार करण्यास भाग पाडू शकते मग मात्र त्याला थांबवणे शक्य होत नाही. तो भांडाफोड करतो व शिटी वाजवून जगाला जागे करतो. फ्रेड्रिक यांनी केलेल्या अत्याचाराची कथा जगापुढे मांडण्याचे धाऱ्या त्याच्याच तुकडीतील जोसेफ डर्बी याने दाखवले. फ्रेड्रिकच्या अत्याचाराची सीडी तयार करून योग्य ठिकाणी पोचवण्याची व्यवस्था त्याने केली. यंत्रणेविरुद्ध लढण्याचे धैर्य त्याने दाखवले. म्हणूनच अमेरिकेची नाचक्की झाली. सामान्य जनतेच्या नजरेत डर्बी ‘हिरो’ ठरला. परंतु तोही एक सामान्य सैनिक होता. याअगोदर त्याने कुठल्याही प्रकारची ‘हिरोगिरी’ दाखवली नव्हती. गोध्रा हत्याकांडाची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश नानावटी कमिशनसमोर श्रीकुमार या पोलिस अधिकाऱ्याने नरेंद्र मोदी व त्यांच्या कंपूच्या दबावाला न जुमानता त्या काळात नेमके काय व कसे घडले याची साद्यंत माहिती दिली. इतर लाचार अधिकाऱ्यासारखे नोकरशाहीशी संगनमत करून नरेंद्र मोदीचा उदो-उदो करून स्वतःची करियर मजबूत करणे त्याला सहज शक्य होते. परंतु तोही याच भ्रष्ट प्रशासनाचा भाग असूनसुद्धा त्याच्या सदसद्विवेकबुद्धीने त्याला गप्प बसू दिले नाही. श्रीकुमारनेसुद्धा ‘हिरोगिरी’चा वसा उचलला नव्हता. तोही इतर अनेकाप्रमाणे हिंदू धार्मिक, स्वतःपुरतेच बघणारा अधिकारी होता. यावरून समूहाचे मानसिकशास्त्र कशा प्रकारे कलाटणी देऊ शकते याचे अनुमान करणे, वाटते तितके सोपे नाही!
८, लिली अपार्टमेंटस् वरदायिनी सोसायटी, पाषाण-सूस रोड, पाषाण, पुणे ४११ ०२१.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.