प्राणदाता लुई पाश्चर

काही माणसे मानवजातीच्या कल्याणासाठीच जन्मतात आणि आयुष्यभर त्याच एकमेव ध्येयासाठी कष्ट करीत असतात. लुई पाश्चर त्यांच्यापैकीच एक.
ज्यावेळेला रेल्वे गाड्या प्रवाशांना वेगाने एका स्थानकापासून दुसऱ्या स्थानकापर्यंत पोहोचवत होत्या, तारायंत्रे जलद गतीने संदेश पोहचवत होती, वैज्ञानिक किरणोत्सर्गाने अणूपेक्षाही लहान कणांचा शोध घेत होते, त्यावेळेला त्यांच्या तुलनेत वैद्यकशास्त्रात अजूनही अंधारयुगच होते. बालमृत्यूचे प्रमाणही फार मोठे होते. सुखवस्तू घरात जन्म मिळूनही बालकांना पूर्ण आयुष्य जगण्याची खात्री नव्हती. व्हिक्टोरियन काळातसुद्धा, जन्मलेल्या बालकांपैकी एकतरी दगावेलच अशी धास्ती सदैव मनात असे. गर्भवती स्त्रियांना अपत्याला जन्म देण्यास गेलो तर आपला मृत्यू निश्चित ओढवेल अशी भीती मनात सदैव घर करून असे. शल्यक्रियेने नाही तरी शल्यक्रियेनंतरच्या रोगांनीच मृत्यू होईल ही कल्पना मनात सतत घिरट्या घालीत असे. कॉलरा आणि क्षयरोगांमुळे मृत्यूचे प्रमाण, विशेषतः गरीब समाजात, फार मोठे होते.
डॉक्टर मंडळी अनेक रोगांच्या बाबतीत हतबल होती. क्षयरोग किंवा सिफिलीस यांसारख्या रोगांचा संसर्ग होणे हा मृत्युदंडच समजला जात असे. आधुनिक काळात जी औषधे त्या रोगावरचा हमखास उपाय समजली जातात अशी फारच थोडी औषधे ह्या काळात डॉक्टरांजवळ उपलब्ध होती. त्यांच्याजवळ वेदनाशामक म्हणून अफू हे एकच औषध असे. संसर्गजन्य रोग कशामुळे होतात हेसुद्धा त्यांना ज्ञात नव्हते.
लिवेन हॉक (Leeuwen Hock) या शास्त्रज्ञाने सूक्ष्म जंतूंचा रोगांशी संबंध असण्याची शक्यता असावी अशी कल्पना मांडली पण ती कल्पना कोणीही उचलून धरली नव्हती. कित्येक डॉक्टरांची समजूत अशी होती की साचलेले पाणी, झोपडपट्टी, विष्ठा इत्यादींमधून निघणाऱ्या विषारी द्रव्याच्या वायुमुळे रोग उद्भवत असावेत.
त्यांच्या निरीक्षणात जखमेत सूक्ष्म जंतू आणि रोगट स्नायू आढळले तरी ते सहज उद्भवणारे आणि नाश पावणाऱ्या स्नायूंचा भाग असावेत असा त्यांचा तर्क होता.
पाश्चरचे सूक्ष्मजंतूबद्दलचे कुतूहल त्याच्या मद्यनिर्मितीच्या संशोधनातून जागृत झाले. मद्यनिर्मितीत यीस्ट (yeast) नावाने ओळखल्या जाणाऱ्या अतिसूक्ष्म जीवांमुळे मद्य फसफसते आणि अंतिमतः परिपक्व होते. परंतु काही चुकीच्या सूक्ष्म जंतूंमुळे मद्य नासते. मात्र उष्णतेच्या प्रक्रियेमुळे त्यांचा नाश होऊ शकतो. सूक्ष्म जंतू हे सहज एकदम उद्भवतात हा उक्तिवाद त्याने फोल ठरवला. सूक्ष्मजंतू हे रोगांचे कारण असतात हा विश्वास अधिकच दृढ झाला. ही कल्पना जर्मनीचा तरुण वैज्ञानिक रॉबर्ट कोच (Robert Koch) याने पण सुचविली होती. पुढे पाश्चरने सौम्य शक्तीच्या जंतूंची लस मानवी शरीरात टोचली तर शरीराची प्रतिकारशक्ती वाढून अनेक रोगांना प्रतिबंध होऊ शकतो हे सिद्ध केले. पुढील काही दशकांत कुठल्या सूक्ष्म जंतूपासून क्षयरोग, कॉलरा, घटसर्प, महारोग, टिटॅनस, हिवताप आणि पिवळा ताप (Yellow Fever) हे रोग होतात हे शोधून काढण्यात वैज्ञानिक यशस्वी झाले.
पाश्चरचा जन्म फ्रान्समधील बुर्जोन (Bourgone) मधल्या डोल (Dole) येथे २७ डिसेंबर १८२२ ला झाला. त्याच्या वडिलांचा कातडी कमावण्याचा (Tanning) धंदा होता. कुटुंब साधारणपणे सुखवस्तू होते. लुईला लहानपणी विज्ञानापेक्षा कलाविषयात विशेष रुची होती. मोठेपणी तो प्रसिद्ध चित्रकार होईल असे म्हटले जात असे. पण तो वयाने वाढला तशी त्याला विज्ञानातच अधिक रुची वाटू लागली. ११ व्या वर्षी त्याने विज्ञानाचा शिक्षक होण्यासाठी ‘इकोल नॉर्मल सुपेरियर (Ecole Normale superior) या प्रतिष्ठित शिक्षणसंस्थेत प्रवेश घेतला.
स्नातक झाल्यानंतर वर्षभराने त्याने अॅकेडेमी ऑफ सायन्सेसमध्ये आपला पहिला प्रबंध वाचला. हा एक उत्तम आरंभ होता. त्यात त्याने म्हटले होते, द्राक्षांच्या आंबण्याच्या प्रक्रियेत टार्टारिक आम्लाचे (Acid) जे स्फटिक तयार होतात ते आणि रेसेमिक आम्लाचे स्फटिक रासायनिकदृष्ट्या सारखे दिसतात. पण ते वेगळ्या रीतीने प्रकाशाचे पृथक्करण करतात. त्यांचे गुणधर्म पण वेगळे असतात. या दोन्ही आम्लांचे स्फटिक सारखे दिसत असले तरी ते सारखे नसून एकमेकांची आरशातील उत्कृष्ट प्रतिबिंबे आहेत.
पाश्चरच्या प्रबंधामुळे त्याला “Legion honour’ (फ्रेंच ऑर्डर ऑफ मेरिट) हा फ्रान्स सरकारचा बहुमानाचा किताब देण्यात आला. सुवर्णपदक बहाल केले गेले. पुढील काळात पाश्चर, आज ज्याला Stereo Chemistry म्हटले जाते त्या शास्त्राचा जनक म्हणून ओळखला जाऊ लागला.
त्याला मिळालेल्या या बहुमानांमुळे त्याची स्ट्रॉसबर्ग विश्वविद्यालयात रसायनशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नियुक्ति करण्यात आली. याच वेळेला त्याने मार्टा लॉरेंट हिच्याशी विवाह केला. त्यानंतर तो त्याच्या नेहमीच्या जीवनक्रमाप्रमाणे आपल्या संशोधनकार्यात अगदी गढून गेला. मार्टाने आपल्या पुढील आयुष्यात आपल्या कन्येला लिहिले, ‘तुझे वडील आपल्या कामात सदैव गर्क असत. माझ्याशी अगदी कमी बोलत. पहाटेच उठत. आजही ते तेच जीवन जगतात जे त्यांनी माझ्याबरोबर ३५ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सुरू केले होते. १८५४ मध्ये पाश्चरला लील (Lille) विश्वविद्यालयात विज्ञानशाखेचा प्रमुख म्हणून नेमण्यात आले.
शास्त्रज्ञ आणि उद्योगपती यांनी वेगळ्या विश्वात वावरू नये ही त्याची विचारसरणी होती. त्यासाठी त्याने कामगारांसाठी प्रशिक्षण वर्ग काढून कारखान्यातील विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना भेटी देण्यास सुरवात केली. या उपक्रमाने प्रोत्साहित होऊन कारखान्यांच्या व्यवस्थापकांनी आपले प्रश्न त्याच्यासमोर घेऊन जाण्यास सुरुवात केली. स्थानिक शिाच्या (Vinegar) कारखान्याच्या व्यवस्थापकांनी त्याच्यासमोर आपला प्रश्न मांडला. हा कारखाना बीटच्या रसापासून शिऱ्यांचे उत्पादन करीत असे, परंतु आंबवण्याच्या प्रक्रियेत काही तरी चूक होऊन शिर्का खराब होत असे. हेच प्रश्न मद्य आणि बीअरच्या उत्पादनच्या बाबतीतसुद्धा उभे राहात होते.
वैज्ञानिकांचा पूर्वी असा समज होता की आंबविणे ही रासायनिक प्रक्रिया आहे. पण त्याने सूक्ष्मदर्शक यंत्राखाली निरीक्षण केले असता त्याला आढळले की, मद्य आणि बीअर जेव्हा परिपक्व होऊ लागले तेव्हा त्यांत yeast चे सूक्ष्म जंतू दिसतात. हे सूक्ष्म जंतू मद्य आणि बीअरमध्ये आंबविण्याच्या प्रक्रियेने मद्यार्क तयार करतात. त्याला आणखी असेही आढळून आले की त्याने जेव्हा ही प्रक्रिया निवडली तेव्हा त्यात शरीी च्या लांब रुंद पेशी असतात. या पेशी दोन प्रकारच्या असतात. एकीपासून मद्यार्क तयार होतो आणि दुसऱ्या पेशी नको असलेल्या (Lactic Acid) लॅक्टिक आम्लाच्या असतात.
नुसता प्रश्न लक्षात येऊन पाश्चरचे समाधान होण्यासारखे नव्हते. समस्येचे निवारण कसे होईल हे पाहणे महत्त्वाचे होते. लवकरच मार्ग निघाला. १४० अंश फॅरनहीट (६० अंश सेल्सियस) तापमानावर तापवून अपायकारक यीस्ट पासून चांगले यीस्ट वेगळे करण्यात तो यशस्वी झाला. मद्याच्या कारखानदारांना पहिल्यांदा या प्रक्रियेबद्दल शंका होती. उष्णतेने मद्याचा स्वाद बिघडून जाईल असे त्यांना वाटत होते. परंतु लवकरच या प्रक्रियेकरिता त्यांचे मन वळविण्यात तो यशस्वी झाला. आणि ही प्रक्रिया ‘पाश्चरायझेशन’ (Pasteurization) म्हणून ओळखली जाऊ लागली. पाश्चरायझेशनच्या प्रक्रियेमुळे आज मद्य, बीयर, दूध आणि विविध फळांचे रस टिकविण्यास व पिण्यास सुरक्षित झाले आहेत.
प्रास त्याल या यीस्टवरच्या प्रयोगापासून सूक्ष्म जंतू कसे निर्माण होतात यावर तो विचार करू लागला. ते एकदम निर्माण होतात हा जो लोकांचा समज होता तसे होत नाही, याबद्दल त्याची खात्री पटली. अन्न जेव्हा साध्या हवेच्या संसर्गात येते तेव्हा ते नासते. परंतु तापविल्यानंतर नुसत्या हवेच्या संसर्गात आले तर नासत नाही. आल्पस् पर्वतात जेथे हवा विरळ असते तेथे अन्न लवकर नासत नाही. यावरून हे सिद्ध झाले की नासलेल्या अन्नावरची जी बुरशी ती अन्न एकदम बिघडवत नाही. हवेतील कणांनी (spores) ती निर्माण होते. हवेत कण कमी असतील तर अन्न बऱ्याच विलंबाने नासते.
एव्हाना त्याची पाश्चर दुरुस्तीवाला अशी प्रसिद्धी होत चालली होती. १८६५ मध्ये दक्षिण फ्रान्समधील रेशमाच्या व्यापाऱ्यांनी रेशमावर येणाऱ्या रोगावर उपाय सुचविण्याची किंवा रेशमाच्या किड्यांबद्दल त्याला कुठलेही ज्ञान नव्हते. ते काम हातात घेण्यास त्याच्या मनाची तयारी नव्हती. पण, शेवटी ते काम करण्यास तो तयार झाला; आणि नेहमीच्या उत्साहाने त्याने त्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली. त्याच्या लगेच लक्षात आले की एका लहान बांडगुळामुळे (Parasite) रोग उद्भवतो. त्याने एक जालीम उपाय सुचविला. सगळ्या रेशीम किड्यांचा नाश करून मलबेरीची जुनी झाडे उपटून पुन्हा दुसरी झाडे लावा. रेशीम उत्पादकांनी त्याचा सल्ला मानला. त्यामुळेच फ्रान्समधील रेशीम उद्योग तगला.
आता त्याची कीर्ती इतकी पसरली होती की सम्राट नेपोलियन तृतीयने (ज्या माळावरल्या त्याच्या प्रयोगशाळेत त्याला गुडघे टेकून प्रवेश करावा लागत असे त्या ठिकाणी) नवीन प्रयोगशाळा स्थापून दिली. पण, त्याचा आनंद त्याला काही दिवसच घेता आला. पक्षाघाताने त्याचा बाहू आणि डावा पाय कायमचा लुळा झाला. त्यानंतर मात्र त्याला साध्या नित्याच्या कामाशिवाय इतर कामासाठी प्रयोगशाळेतील साहाय्यकांवर अवलंबून रहावे लागत असे.
सूक्ष्म जंतू आणि रोग
रोगांच्या बाबतीत सूक्ष्म जंतूंच्या संसर्गाबद्दल पाश्चरची खात्री पटली होती. इंग्लिश शल्यविशारद लेस्टर जोसेफ याने पाश्चरच्या संशोधनाबद्दल वाचले. त्याच्या लक्षात आले की रुग्णांच्या जखमा जर व्यवस्थित स्वच्छ केल्या आणि ड्रेसिंग निर्जंतुक केले तर शस्त्रक्रिया सुरक्षित होऊ शकतात. ही जंतुनाशक शस्त्रक्रियेची पद्धत सुरू केल्याबरोबर शस्त्रक्रियेनंतरची मृत्युसंख्या भराभर घटू लागली. लेस्टरला पाश्चरच्या या महत्त्वपूर्ण संशोधनाची जाणीव झाली. पाश्चरच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त तो म्हणाला,
‘जगामधील अशी एकही व्यक्ती नाही की जिच्याबद्दल वैद्यकशास्त्र तुमच्या इतके ऋणी असेल.’ १८६७ मध्ये रॉबर्ट कोच या शास्त्रज्ञाने मेंढ्यामध्ये होणाऱ्या अँड्रैक्सला कारणीभूत होणाऱ्या जंतूंचा शोध लावला. पाश्चरने स्वतःच्या परीक्षणातून कोचच्या संशोधनाला पुष्टी दिली. परंतु हेही निदर्शनास आणले की अँथेंक्स झालेली मेंढी ज्या जमिनीवर बसली होती त्याच जमिनीवर निरोगी मेंढी बसली तर तिला अँधैंक्स होऊ शकतो, अँथेंक्सचे जंतू बराच काळ जमिनीत जिवंत राहू शकतात.
इनॉक्युलेशनची शक्ती
प्रथम अँथेंक्सची समस्या ही त्याने रेशमाच्या किड्याच्या समस्येप्रमाणे हाताळण्याचे ठरविले. रोगी मेंढी मारून, जाळून जागा जंतुरहित करून. परंतु त्याच्या असे लक्षात आले की अँथेंक्स झालेली जी मेंढी वाचली ती पुन्हा अँक्स होण्यापासून मुक्त झालेली आहे. एका शतकापूर्वी एडवर्ड जेन्नर याने दाखवून दिले होते की काऊपॉक्सची लस शरीरात टोचली तर देवी (Small Pox)पासून संरक्षण होते. पाश्चरने एका प्रयोगाद्वारे दाखवून दिले की अँथेंक्सचे उष्णतेने सौम्य केलेले जंतू शरीरात टोचले तर पूर्ण शक्तीच्या जंतूंचे शरीरात इनॉक्युलेशन दिल्यानंतरही त्या मेंढ्या वाचतात. पण ज्यांना असे इनॉक्युलेशन केले नाही त्या दगावतात.
अशा प्रकारे हजारो मेंढ्या अँथेंक्सपासून सुरक्षित झाल्या. त्याने हे दाखवून दिले की ‘चिकन कॉलऱ्या’ करितासुद्धा इनॉक्युलेशन परिणामकारक ठरू शकते.
त्यानंतर पाश्चरने आपले लक्ष रेबीज’ या श्वानदंशामुळे होणाऱ्या भयंकर रोगावर केंद्रित केले. रेबीजवरची लस शोधून काढल्यामुळे त्याचे नाव युरोपात सर्वतोमुखी झाले. सामान्य लोकांचे लक्षही आता त्याच्या संशोधनाकडे वळले. ते सतत चालू राहावे म्हणून लोकांनी आर्थिक मदतीची चळवळ उभारली. गरीब, श्रीमंत, सरकार, राजे-रजवाडे या सर्वांनी आर्थिक चळवळीत आपला सहभाग दिला. इतकेच काय पण रशियाच्या झारनेसुद्धा आर्थिक मदत दिली. दोन मिलियन फ्रंक्सचा निधी उभारला गेला. त्यातूनच २ नोव्हेंबर १८८८ रोजी पॅरिसमध्ये ‘पाश्चर इस्टिट्यूटची (Pasteur Institute) स्थापना झाली.
२८ सप्टेंबर १८९५ ला पाश्चरचे निधन झाले. मरताना त्याने उद्गार काढले, “”One must work, one must work. I have done what I could.” पाश्चर इन्स्टिट्यूटमधील एका भव्य थडग्यात शाही इतमामाने त्याचा दफनविधी करण्यात आला. या स्मारकवजा थडग्याच्या भिंती मेंढ्या, कुत्री आणि त्याने जीवनदान दिलेल्या त्या बालकांच्या चित्रांनी सजविण्यात आल्या आहेत.
रेबीजला प्रतिबंध (Preventing Rabies)
१८८० मध्ये रेबीज हा अत्यंत भयंकर रोग समजला जात असे. पाश्चरने हा रोग हटविण्यासाठी निर्धारच केला. अतिशय मोठा धोका पत्करून त्याने पिसाळलेल्या कुत्र्यांच्या जबड्यातील लाळ एका काचेच्या नळीत शोषून घेऊन ती सशांच्या शरीरात टोचली. ससे मरण पावल्यानंतर त्यांच्या सुकवलेल्या पाठीच्या कण्यातून रोगजंतू काढून ते निरोगी सशांमध्ये इंजेक्शनद्वारा टोचले. या टोचलेल्या जंतूंमुळे ससे रेबीजपासून सुरक्षित राहिले.
या रोगजंतूंच्या इंजेक्शनचा माणसावर काय परिणाम होतो ह्याबद्दल पाश्चर साशंक होता. अतिशय सावध होता. जुलै १८८५ मध्ये १४ वेळा पिसाळलेले कुत्रे चावलेल्या जोसेफ मिल्टर नावाच्या धनगराच्या मुलाला पाश्चरकडे आणण्यात आले. पाश्चरने काहीच केले नसते तर यातनांनी तडफडून मुलाचे मरण निश्चित होते. त्याने धाडस करण्याचे ठरविले. आणि मुलाला रेबीजची लस टोचली. सुदैवाने तो मुलगा नुसताच वाचला नाही तर खडखडीत बरा झाला.
पाश्चरच्या यशाची कीर्ती सगळीकडे पसरली. उपचारासाठी त्याच्याकडे गर्दी होऊ लागली. काही दिवसांतच त्याच्याकडे पिसाळलेले कुत्रे चावलेल्या १९ लोकांचा जत्था येऊन धडकला. त्यांना श्वानदंश होऊन दोन आठवडे उलटून गेले होते. रोग शरीरात पसरला असावा अशी पाश्चरला भीती वाटली. पण त्याने टोचलेल्या लशीमुळे १६ जणांचे प्राण वाचू शकले. पुढील दहा वर्षांत पाश्चरच्या पद्धतीप्रमाणे २०,००० रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी फक्त २०० लोक दगावले.
ही पाश्चरची चरित्रगाथा. पाश्चरने जगावर महान उपकार करून ठेवले आहेत. माणसांचे आयुर्मान वाढविण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. पाश्चात्त्य देशांत क्षयरोग आणि देवी, कॉलरा इत्यादी साथीच्या रोगांचे समूळ उच्चाटन झाले आहे.
आपल्या देशातही देवी (Small Pox) रोगाचे समूळ उच्चाटन झाले आहे. दारिद्र्य, अज्ञान, अस्वच्छता यांच्यामुळे आपल्याकडे साथीचे रोग मधूनमधून उद्भवत असले तरी लागण झालेले रोगी पाश्चरच्या इनॉक्युलेशन पद्धतीमुळे क्वचितच दगावतात. आपल्या देशाचे सरासरी आयुर्मान एके काळी २७ होते ते आता ५० च्या वर झालेले आहे.
आपल्या येथे कुत्री ‘पेट’ (Pet) म्हणून पाळण्याचा रिवाज समाजाच्या काही स्तरातच आहे. बाकी सर्वदूर कुत्री मोकाट ‘भटकी’ म्हणून वावरत असतात. त्यामुळे श्वानदंशाच्या घटनाही बऱ्याच होतात. २० व्या शतकाच्या पूर्वार्धात श्वानदंशाच्या उपचाराकरिता हिमाचलप्रदेशातील कसौली या गावी जावे लागत असे. परंतु आता शीतपेट्यांचा (Refrigerators)चा प्रसार सर्वदूर झाल्यामुळे श्वानदंशावरील उपचार बऱ्याच ठिकाणी सरकारी, खाजगी इस्पितळात सहजसाध्य झाला आहे.
आता ‘पाश्चरीकरण’ (Pasteurization) हा शब्द रूढ झाला आहे. विशेषतः दुधाच्या डेअरीउद्योगात तर त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासकीय किंवा खाजगी डेअरीतून जे दूध वितरित होते ते पाश्चराईज्ड असते. त्याकरिता, महाराष्ट्र राज्यापुरते बोलायचे झाले तर शासनाने बहुतेक जिल्ह्यांमध्ये ‘शीतीकरण केंद्रे’ (Chilling Plants) स्थापन केली आहेत. दूध-उत्पादकाकडून दूध गोळा करून ते शीतीकरण केंद्रात संकलित केले जाते. तेथे ते विशिष्ट तापमानापर्यंत तापवून एकदम थंड केले जाते आणि हवाबंद बाटल्यामधून किंवा प्लॅस्टिकच्या सीलबंद थैल्यांतून निरनिराळ्या ठिकाणी वितरित केले जाते. या प्रक्रियेमुळे दूध बराच काळ चांगले राहते. दूरच्या शहरांमध्ये पाठवावयाचे असेल तर Insulated Railway Wagons मध्ये वाहून नेण्यात येते आणि वितरणकेंद्रावर बाटलीबंद किंवा पिशवीबंद करून वितरित केले जाते.
पाश्चरच्या संशोधनाचा विश्वव्यापी आवाका पाहून कुणीही म्हणेल, ‘पाश्चरा थोर तुझे उपकार!’
[लेखक भारत सरकारच्या दक्षिणमध्य क्षेत्र-सांस्कृतिक केंद्र नागपूरचे पूर्व संचालक आहेत.]
बी-४, ‘स्पेसकिरण’, १६६, महात्मानगर, नाशिक ४२२ ००७. फोन : (०२५३) ६५१६८०६

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.