पत्रचर्चा

डॉ. भा.वि.देशकर, ४१, समर्थनगर, पश्चिम, वर्धारोड, नागपूर-५.
श्री. टी.बी. खिलारे यांचे आगस्ट ९६ च्या अंकातील पत्र वाचले. ईश्वराच्या जवळिकीचा दावा त्याच्या मुळापेक्षा फळावरून शोधावा हे विल्यम जेम्स ह्या मानसशास्त्रज्ञाचे म्हणणे अगदी योग्यच आहे.
मी सीतारामचंद्रनच्या विधानाकडे एका न्युरोसायंटिस्टच्या दृष्टिकोणातून पाहत आलो आहे. ते हिंदू आहेत, परंपरावादी आहेत व त्यात ते ब्राह्मण आहेत हे मला खिलारे यांच्या लेखातूनच कळले.
सायंटिस्ट म्हणून जात, धर्म कुण्याही विज्ञानवाद्याला मान्य नसावे हे मी आजपर्यंत मानत आलो आहे. विज्ञानातही पौर्वात्य व पाश्चात्त्य विज्ञान असा फरक मानत नाहीत. त्यामुळे रामचंद्रन हिंदू, त्यातून ब्राह्मण असल्यामुळे त्यांची टीका मला रुचली नाही हे म्हणणे चूक आहे. माझ्यावर अन्याय करणारे आहे.

केशवराव जोशी, तत्त्वबोध, कल्याण-कर्जत हायवे, नेरळ (रायगड) ४१० १०१. फोन : ९५२१४८ – २३८६५२
श्रीमती प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाल्यावर त्यांनी राष्ट्राला उद्देशून जे भाषण केले त्या भाषणात त्यांनी स्वातंत्र्यासाठी देहदंड सोसणाऱ्या अनेक मान्यवरांची म. गांधी, पं.नेहरू, झाशीची राणी इ. नावे घेतली, हे ठीकच झाले.
परंतु “स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, ही घोषणा प्रथम १ जून १९१६ रोजी अहमदनगर येथे करणाऱ्या लो. टिळकांचा उल्लेख मात्र श्रीमती पाटील ह्यांनी त्यांच्या भाषणात केला नाही ह्याबद्दल अत्यंत खेद होतो.
त्या मराठी असल्यामुळे त्यांना मराठी लोकांनी मते द्यावीत असा डंका पिटणाऱ्या श्री. ठाकरे ह्यांच्या बाबतीतील खरी गोष्ट अशी आहे की, पाटील ह्यांचे चुलते दिवाण रावबहादूर, श्री. प्रबोधनकार ठाकरे ह्यांचे जवळचे मित्र होते.

प्रभाकर नानावटी, ८, लिली अपा. व. सो., पाषाण-सूस रोड, पुणे ४११ ०२१. जातिनिर्मूलनाचा (विचित्र!) उपाय
हिंदू लोकांचे कांहीं वर्णन लिहावयाचे असले, तर मुख्यत्वेकरून ब्राह्मण लोकांचे लिहावें. म्हणजे त्यांत सर्व लोकांचें स्थितीचे वर्णन आले; कारण हिंदू लोकांत विद्येचे महत्त्वाचे मुख्य मालक ब्राह्मण आहेत; व त्यांची मते लोकांमध्ये प्रबळ आहेत. यास्तव आम्ही बहुधा हिंदू लोकांचे वर्णन लिहावयाचे असले, म्हणजे ब्राह्मणाचेच लिहूं व तेणेकरून सर्वांचें वर्णन आले, असे समजावें.” (पत्र नंबर २२, लोकहितवादींची शतपत्रे)
श्री. स.ह.देशपांडे यांचे कार्यक्षमता (?) व समता याविषयी प्रसिद्ध झालेले (आ.सु.मे ०७) पत्र वाचत असताना वर उल्लेख केलेल्या उताऱ्याची आठवण झाली. लोकहितवादींच्या पत्रातील हा उतारा १६० वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील समाजाच्या संदर्भात कदाचित योग्यही असेल. परंतु पत्रलेखकांना आजसुद्धा याच जातीचा कित्ता गिरवावा असे वाटत असल्यास सखेदाश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.
स.ह.देशपांडे यांच्या घराण्यातील ‘जातिनिर्मूलना’च्या प्रयत्नाचेच उदाहरण घेतल्यास त्यांनी उल्लेख केलेले सर्व नातेसंबंध श्रीमंत अशा उच्चवर्गीयांशीच झाले आहेत, हे लक्षात येईल. यातील एकही नातेसंबंध तळागाळातील निम्न जातींशी झालेला नाही. वर्गीय संबंध घट्ट करणे हाच तर भांडवलशाहीचा मूळ धागा आहे. म्हणूनच या नंतरच्या पिढ्यांना कदाचित पारंपरिक जाती-उपजातीच्याऐवजी डॉक्टर (अॅलोपथी, होमिओपथी, आयुर्वेद…) न्यायाधीश, वकील (दिवाणी, फौजदारी) अभियंते, लघु-उद्योजक, कार्पोरेट सीईओ, व्यवस्थापक अशा प्रकारच्या जाती-उपजाती बघाव्या लागतील आणि ‘कार्यक्षमते’वर आधारलेली ही जातवारी केवळ साडेतीन-चार टक्क्यांमध्ये वाटलेली असेल. व इतर ९६-९७ टक्के ‘अकार्यक्षम’, ‘अकुशल’ म्हणून दारिद्र्यातच खितपत पडलेले, कीडामुंगीचे जीवन जगणारे असतील व या ‘जाती’ मुख्यत्वेकरून जन्माधिष्ठित असतील.
भांडवलशाही व्यवस्थेला सामाजिक प्रगतिशीलतेचे शिफारसपत्र देणाऱ्यांनी भांडवलशाहीने रुजवलेल्या जीवघेण्या स्पर्धेचा व त्यातून उत्पन्न होत असलेल्या सामाजिक-आर्थिक विषमतेचा विचार केलेला दिसत नाही. ‘कार्यक्षमते’चे उदात्तीकरण करत असताना ‘कार्यक्षमता’ म्हणजे नेमके काय हे सांगण्यास लेखक विसरलेले दिसतात. आपण जे करतो किंवा ज्याला ‘आर्थिक यश’ येते तिलाच कार्यक्षमता म्हणत असल्यास आर्थिक गैरव्यवहार, ऐतखाऊपणा, भ्रष्टाचार, वाममार्ग यांनासुद्धा कार्यक्षमतेचाच शिक्का मारावा लागेल. ‘गुणवत्ता’, ‘कौशल्य’, ‘कर्तृत्व’ या शब्दांची पेरणी करून भांडवलशाहीचे कौतुक न करता आपल्याकडे उपलब्ध असलेल्या स्रोतांचा योग्य वापर करणारी, तळागाळातील अकुशल लोकांपासून तज्ज्ञ, विशेषतः बुद्धिवंत लोकापर्यंत सर्व जणांना सहभागी करून घेणारी समाजरचना, खरे तर, अपेक्षित आहे. मात्र त्यासाठी प्रथम उच्चवर्णीयांनी “विनाश्रम’ आरामदायी जीवन जगण्याच्या ‘कर्तृत्वशक्ती’ला तिलांजली देण्याच्या तयारीत राहावे लागेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.