गरज मायेच्या ओलाव्याची
“बायको मागेच गेली. मुलं अमेरिकेत आहेत, मला बरं नाही असं कळलं, की लगेच पैसे पाठवतात नि लिहितात, की प्रकृतीची काळजी घ्या.’ … “मुलं लहान आहेत. त्यांना कसं कळणार, की मायेच्या ओलाव्याची गरज आहे, तिथे पैशांच्या उबेचा काय उपयोग?”
“खरं! म्हणजे तुमच्या उपेक्षेला सुरुवात होते, तेव्हाच तुम्ही ओळखायला हवं, की आता जगाच्या दृष्टीने तुमचा उपयोग संपला. मग तुम्ही त्या खेळातूनच नव्हे, तर मैदानातूनही बाहेर पडायला हवं. हे शहाणपण आदिवासी आणि रानटी टोळ्यांनासुद्धा असतं. उत्तर ध्रुवाजवळच्या एस्किमो लोकांत काय करतात माहीत आहे ? घरातलं वडील माणूस, की ते झोपल्यावर त्याच्या बिछान्यापाशी दिवा लावून ठेवतात. असा दिवा उशाशी दिसला, की त्या माणसाने लगेच त्या इग्लुसच्या झोपडीतून बाहेर पडायचं असतं, ते थेट बाहेरचा तुफान हिमवर्षाव आणि बर्फाची वादळं यांच्या तावडीत. … आपल्या-कडेसुद्धा गृहस्थाने शेवटी संन्यास घेण्याची, समाधिस्थ होण्याची आणि कर्मयोग्यांनी मनोबलाच्या जोरावर देह ठेवण्याची परंपरा आहेच. नाही का?…’ ।
[खरे मास्तरः ले. विभावरी शिरूरकर, पृ.१२८-२९]