जयदीप साहनी हे सध्या चर्चेत असलेल्या ‘चक दे’ या चित्रपटाचे पटकथाकार आणि गीतकार. ह्याआधी ‘कंपनी’ आणि ‘खोसला का घोसला’ हे लोकप्रिय आणि समीक्षकांनी वाखाणलेले चित्रपटही साहनींच्या लेखणीतून उतरले आहेत. ‘चक दे’साठी अभ्यास करायला आपण शोधनिबंध लिहीत आहोत असे सांगत साहनींनी हॉकीचा खेळ आणि त्याचे खेळाडू यांचा कानोसा घेतला. निरीक्षण इतके नेमके ठरले की लॉस एंजलिसला एक बाई येऊन साहनींना भेटली. म्हणाली, “तुम्हाला माझी कहाणी कोणी सांगितली ? आम्ही वसतिगृहात काय बोलत होतो हे तुम्हाला कसं कळलं?’ ती होती ओरिलिया मॅस्करेनस, गोव्याची अर्जुन पुरस्कार विजेती हॉकीपटू ! साहनींचा ‘चक दे व्हिच इंडिया’ या मथळ्याचा लेख १२ सप्टेंबर २००७ च्या इंडियन एक्सप्रेस मध्ये आला आहे.
ते लिहितात की त्यांना खेळाडूंमध्ये एक खोल रुजलेले देशप्रेम आढळले. ते बटबटीतपणा टाळून दाखवणे, हे मोठे आह्वान होते. अद्ययावत् कपडे न घालणारी; झारखंड, ईशान्य भारत, अशा ‘शायनिंग इंडिया’ने दुर्लक्षिलेल्या क्षेत्रांतील माणसे; त्यांचे स्वतःचे व त्यांना भोगावे लागणारे पूर्वग्रह, कधी लिंगभेदाचे, कधी धर्माबाबतचे. कधी भाषा आणि शैक्षणिक पातळीबाबतचे तर कधी प्रांतीय मुळे असलेले; या साऱ्या व्रणांसह, कुरूपतेसकट समोर येणारी ही माणसे. स्वप्नपूर्तीसाठी, जनमान्यतेसाठी, स्वाभिमानासाठी ‘धडपडणारी मुले’च ती. त्यांचे जे चित्र दिसले, त्यातून कोणताही ‘संदेश’ देण्याचा आव न आणता कथा सांगितली गेली. जवळपास उपपरिणाम म्हणून, अप्रत्यक्षपणे, नेणिवेच्या पातळीवर ह्या चित्रातून देशप्रेम दिसू लागले, समजूतदार, मुळीच हिंसक नसलेले, उदार, शहाणे, असे देशप्रेम. ते दाखवण्यासाठी ना परकीयांची टिंगलटवाळी केली गेली, ना मनोजकुमार-थाटात स्वतःला तिरंग्यात लपेटणारी माणसे दाखवली गेली.
मागे ‘लगान’ ह्या क्रीडाचित्रपटाने हा प्रयत्न केला. त्यातल्या एका गीतात “सब को दिखा देंगे । हम लोगों का दर्जा है क्या”, अशी ओळ आहे. साहनींना जाणवले की उपेक्षितांना जनमान्यता मिळवून देणाऱ्या मार्गांमध्ये खेळ हा महत्त्वाचा मार्ग आहे. अमेरिकेतील व युरोपातील काळ्यांनीही गेली अनेक वर्षे हा मार्ग चोखाळला आहे. ‘चक दे’कर्त्यांनी हा भाव सुस्पष्ट ऊनोक्ती (अल्पोक्ती) रूपात दाखवला आहे. एक ध्यानात ठेवावे, की ही चर्चा ‘दर्जा’ची, गुणात्मकतेची आहे. ती ‘किंमती’ची, संख्यात्मक नाही.
गुणात्मक चर्चा मागे पडून संख्यात्मक भाव उपजतो तो दोन अंगांमधून. अभियंते, तंत्रज्ञ, व्यवस्थापक, आज तर वैद्यसुद्धा संख्या महत्त्वाच्या मानतात. या तंत्रज्ञानाच्या अंगाला गौण ठरविणारे अंग आहे, बाजारपेठेचे आणि किंमतीचे महत्त्व देण्याचे. याच मोजपट्टीवर ‘जगातली सर्वांत प्रभावी स्त्री’ म्हणून पेप्सीच्या अध्यक्ष इंद्रा नूयीची निवड होते, आणि सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठ्या पक्षाची अध्यक्ष असलेल्या सोनिया गांधी सहाव्या क्रमांकावर लोटल्या जातात.
स्वतः संगणक-तज्ज्ञ, उच्च दर्जाचे तंत्रज्ञ असलेल्या साहनींना हे प्रकर्षाने जाणवते. ते म्हणतात, “एंजिनीयर, डॉक्टर, मॅनेजर हे विकसनशील देशांना आवश्यक असतातच. पण ते घडवण्याच्या स्पर्धेत आपण कला, क्रीडा यांची उपासमार करतो आहोत.” परिणाम काय, तर आपण “चारित्र्याचा विकास खुरटलेल्या, सांघिक कामाचा तिटकारा करणाऱ्या, हा देश आणि त्याच्या गरजा यांचे विक्षिप्त आकलन असलेल्या, त्यात आपल्या वैयक्तिक यश व मान्यतांसाठीची धडपड कशी ‘बसते’ हे न समजणाऱ्या स्वार्थी, तंत्र- ‘मी’ वादी लोकांचा देश होतो 3ITETA.” (“…we may end up as a nation of selfish techno-yuppies with very little character development, a distaste for teamwork and a weird understanding of what this nation is, what its needs are, and where we and our personal quest for success, recognition and achievement can fit into all this. ” यपीज = yuppies; young, upwardly mobile persons = ‘मी’वादी.)
साहनींनी वाजवलेली धोक्याची घंटा किती योग्यवेळी वाजली हे जाणवले १३ ऑगस्ट २००७ चा टाइम साप्ताहिकाचा अंक पाहून. भारत स्वतंत्र झाल्याला साठ वर्षे झाल्यामुळे या विख्यात साप्ताहिकाने ‘इंडिया चार्जेस अहेड’ नावाने हा विशेषांक काढला. त्यात ‘माणसांबाबत दोन लेख आहेत. एक कौतुकादराने लिहिलेला लेख ‘डीएलएफ’ या भारतीय महा-बिल्डर कंपनीचे कर्ताधर्ता कुशल पाल सिंग यांच्यावर आहे. कंपनीचे ८७४ समभाग, बाजारभावाने तीस अब्ज डॉलर्स किंमतीचे, सिंग कुटुंबाच्या मालकीचे आहेत. आजच्या किंमतीत रुपये होतात सुमारे ८१० अब्ज ह सर्व भारतीयांच्या आठ दिवसांच्या उत्पन्नाइतके (G.D.P.), सिंगांच्या या कर्तृत्वावर आज भारतीय कार्यालयांचे भाडे मुंबईत १,४९० डॉलर्स प्रतिचौरस मीटर, तर दिल्लीत १,२५१ डॉलर्स प्रति चौरस मीटर इतके वाढले आहे. घरांच्या किंमती २००५ सालच्या पातळीच्या सुमारे पावणेतीनपट झाल्या आहेत. अर्थात त्यात सिंग एकटे नाहीत, आणि अशा आकड्यांच्या तुलनाही अर्धसत्येच दाखवतात. परंतु देशाच्या गरजा आणि त्यात सिंगांच्या वैयक्तिक यशाची ‘बसवणूक’ यात विकृती आहे, हे तरी ठसतेच.
दुसरा लेख दिल्लीच्या मल्होत्रा कुटुंबाबद्दल आहे. आजी संतोष ही फाळणीनंतर भारतात आली. तिच्या, पतीच्या इतिहासातील नेहरू-युगाचे वर्णन असे ह्र “सरकारने शिक्षणात पैसा ओतला, स्त्रियांना हक्क बहाल केले आणि जातिभेदाचे गुन्हेगारीकरण केले”! खरेच शळीव पिवर्शी रपवळपस आहे, हे! संतोषचा मुलगा जेतेंदर आज एका मोठ्या दारूदुकानाचा मालक आहे. त्याची मोठी मुलगी एम्.बी.ए. झाली आहे आणि धाकटी एम्.बी.ए. होते आहे. मोठी मुलगी म्हणते, “आजही महत्त्वाची गोष्ट म्हणजे सारे जग पैशाभोवती
world is around money”). पण टाइमला हे कुटुंब ग्रामीण कुटुंबांपेक्षा, बंगलोर-चेन्नैमधील उच्च-तंत्रकेंद्रातल्या कुटुंबांपेक्षा, तुलनेने गरीब उत्तर भारतीय नागर कुटुंबांपेक्षा प्रातिनिधिक वाटले, असे लेखक सायमन रॉबिन्सन नोंदवतो. दारू दुकानदार प्रातिनिधिक, कारण त्याची मुलगी म्हणते, “आता आपापल्या परीने सर्व जण श्रीमंत आहेत.’!
एका ‘सन्माननीय’ नियतकालिकाच्या या उथळपणापासून जमिनीवर आणायला १ सप्टेंबर २००७ च्या लोकसत्ता व लोकमत यांच्या नागपूर आवृत्त्यांचे मुखपृष्ठ उपयोगी ठरते. नागभीड (चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव) येथील एक मुलगी चंद्रपूरच्या एंजिनीयरिंग कॉलेजात शिकायला गेली. लवकरच तिने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. आईवडलांना एका चिठ्ठीद्वारे कारणही सांगितले “जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ अभ्यासात हुशार असून चालत नाही, चांगले राहणीमानसुद्धा असावे लागते. त्यासाठी आवश्यक असलेली सामाजिक परिस्थिती आपल्याजवळ नाही.’
जोवर आपण आत्महत्यांच्या संख्या मोजत, त्यांच्यामधले चढउतार मोजत बसू, तोवर इंडिया ‘चक दे’ म्हणू शकणार नाही. आपण सर्वांनी प्रत्येक आत्महत्या ही आपल्या सामाजिक-आर्थिक नीतिमत्तेवर केलेली टीका आहे असे मानले, तरच काही बदल, काही सुधारणा घडू शकतील.
मश्रुवाला मार्ग, शिवाजीनगर, नागपूर ४४० ०१०.