साला माझ्या जीवनाचे तात्त्विक अधिष्ठान

मला पाच मिनिटांत माझ्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगावयाचे आहे. तत्त्वज्ञान शब्दाचा अर्थ या संदर्भात मी सामाजिक तत्त्वज्ञान असाच समजतो. प्रत्येक मनुष्याला काहीतरी जीवनविषयक तत्त्वज्ञान असणे इष्ट आहे. आपल्या वर्तणुकीचे मोजमाप करण्यासाठी मनुष्याला काहीतरी निकष ठरविणे आवश्यक आहे आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान असणे आवश्यक आहे असे मी म्हणतो याचे कारण या तत्त्वांच्या निकषानेच आपण वाईट केले आहे याचे त्याला आकलन होते. आणि जेव्हा आपण चुकलो आहोत असे त्याला समजेल तेव्हाच त्याला आपल्या तत्त्वानुरोधाने आपली उन्नती साधण्याची जबाबदारी पटेल. माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान मी निश्चित केलेले आहे. त्याच्या नास्तिपक्षी व अस्तिपक्षी अश्या दोन बाजू मी आता स्पष्ट करणार आहे.
नास्तिपक्षी, सांख्य तत्त्वज्ञानातील त्रिगुणांवर आधारित असलेले व भगवद्गीतेत विशद केलेले हिंदूंचे सामाजिक तत्त्वज्ञान मला नापसंत आहे. कारण माझ्या मताप्रमाणे कपिलांच्या तत्त्वज्ञानाचे ते एक निघृण विकृत स्वरूप आहे. आणि त्याचमुळे जातिव्यवस्था आणि क्रमवार विषमता पद्धती हा हिंदूंच्या सामाजिक जीवनाचा एक मूलभूत नियम ठरला आहे. अस्तिपक्षी, माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान तीन शब्दांतच समूर्त झालेले आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव. फ्रेंच राज्यक्रांतीवरून माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान मी उसने घेतले आहे असे मात्र कोणी समजू नये. तसे मी केलेले नाही असे मी निक्षून सांगतो. माझ्या तत्त्वज्ञानाचे मूळ राजकारणात नसून धर्मात आहे. माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या शिकवणीतूनच हे तत्त्वज्ञान मी स्वीकृत केलेले आहे.
माझ्या जीवनविषयक तत्त्वज्ञानात स्वातंत्र्याला स्थान आहे हे मला आग्रहपूर्वक सांगावयाचे आहे. पण त्याचबरोबर अनिर्बंध स्वातंत्र्य समतेला मारक ठरते. माझ्या तत्त्वज्ञानात समतेचे स्थान स्वातंत्र्यापेक्षा वरचे आहे. तरीसुद्धा त्यात संपूर्ण समतेला मात्र मुळीच थारा नाही. कारण अमर्याद समता ही स्वातंत्र्याच्या अस्तित्वाआड येते आणि स्वातंत्र्याला वाव असणे तर आवश्यक आहे.
माझ्या तत्त्वज्ञानात स्वातंत्र्य व समतेच्या अतिक्रमणापासून संरक्षण मिळावे म्हणूनच फक्त कायदेकानूंचे स्थान गृहीत धरलेले आहे. पण कायद्याचे स्थान मी फारच गौण मानतो. कारण स्वातंत्र्य व समतेचा भंग(होण्या)बाबतीत कायदा खात्रीने समर्थ ठरेल असा मला विश्वास वाटत नाही. मी बंधुभावाला सर्वोच्च स्थान देऊ इच्छितो; कारण स्वातंत्र्य व समता नाकारली जाण्याप्रसंगी बंधुभाव हाच खराखुरा रक्षक ठरतो. सहभाव हे बंधुभावाचे दुसरे नाव आहे आणि बंधुभाव अथवा मानवता हे धर्माचे दुसरे नाव आहे. कायदा वा सहभावाचे मूल्यमापन करताना हा फरक जाणवतो याचे कारण कायदा हा धर्मातीत असल्यामुळे तो कोणीही मोडू शकतो; या उलट सहभाव अथवा धर्म हा पवित्र असल्यामुळे त्याला मान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य गणले जाते.
माझे तत्त्वज्ञान हे कोणा सुखवस्तू माणसाचा ध्येयवाद आहे असे मानू नये. सामाजिक जीवनातल्या त्रिगुण तत्त्वांचा नाश करून हिंदू समाजात क्रांती घडवून आणू शकेल असेच माझे क्रांतिकारक तत्त्वज्ञान आहे. म्हणून मी इतका चढावखोर आहे. आणि मला पुष्कळ शत्रू आहेत. पण मला हे शत्रू आवडतात. कारण मला माहीत आहे की माझे बोलणे ते कान देऊन ऐकत असतात.
माझे तत्त्वज्ञान हे फक्त माझ्यासाठी नाही तर ते इतरांसाठीही आहे. निराळ्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे माझ्या तत्त्वज्ञानाच्या मागे विशिष्ट उद्दिष्ट आहे. मला मतपरिवर्तन करावयाचे आहे. त्रिगुण तत्त्वाच्या अनुचरांना त्याचा त्याग करावयास लावून माझ्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार करावयास लावायचा आहे. हे एक भव्य कार्य आहे आणि त्याला पुष्कळ अवधी लागण्याचा संभव आहे.
आज भारतीय व्यक्ती दोन निरनिराळ्या ध्येयवादांनी नियंत्रित आहेत. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत सूचित केलेला ध्येयवाद आणि धर्मात अंतर्भूत केलेला सामजिक ध्येयवाद. ज्याला समज आहे त्याला कळू शकेल की हे दोन परस्परविसंगत ध्येयवाद आहेत. राजकीय ध्येयवादामुळे स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या जीवनमूल्यांना मान्यता मिळाली आहे. तथापि प्रचलित सनातनी वृत्तीच्या सामाजिक ध्येयवादामुळे ही तत्त्वे व्यवहारात नाकारली गेली आहेत. असे हे विसंगत जीवन किती काळ चालणार आहे? कधीतरी एक दुसऱ्याला शरण गेल्याशिवाय उपायच नाही. माझ्या जीवनतत्त्वज्ञानावर माझा पुरेसा विश्वास आहे आणि म्हणूनच जो आज बहुसंख्य भारतीयांचा राजकीय ध्येयवाद आहे तो सर्वांचा सामजिक ध्येयवाद होईल अशी मला उमेद आहे.
[डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८, भाग ३, १९४६ ते १९५६ लेखांक क्र. ३५२]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.