हे ज्ञानिचि पवित्रता अखंड राहो

‘मराठवाडा’ या नावाने ३५ वर्षे आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ या नावाने १४ वर्षे पूर्ण करणाऱ्या औरंगाबादेतील विद्यापीठाचा सुवर्णमहोत्सव महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील एक मोठी घटना आहे. उच्चशिक्षण आधुनिक वळणाचे व काळानुरूप देण्याचा पाया मुंबईहून थेट मराठवाड्यात येऊन घालणारे डॉ. आंबेडकर आणि त्यांची दूरदृष्टी यांचे सुंदर फळ म्हणजे हा सुवर्ण महोत्सव ! बाबासाहेबांनी उच्च शिक्षणाला मराठी तोंडवळा बहाल केला हीही एक मोठी कामगिरी मानली पाहिजे. मराठी संस्कृती व ब्रिटिश राजवट यांच्या संयुक्त विद्यमाने उर्वरित महाराष्ट्र प्रगतीकडे वाटचाल करीत असताना मराठवाडा मात्र उर्दू आणि निजाम यांच्या कचाट्यात सापडून मागासलेलाच राहिला होता. विज्ञान, तंत्रज्ञान व ज्ञानाच्या भारतीय पंरपरा यांचा डॉ. आंबेडकर यांनी दाखविलेला मार्ग पं. जवाहरलाल नेहरू यांनी आणखी विस्तारला तो विद्यापीठाच्या पायाभरणीवेळी. त्यामुळे नागपूर व हैदराबाद आणि पुणे व मुंबई येथील उच्च शिक्षणासाठी मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांची धावपळ थांबली आणि त्यांना सर्वार्थाने एक आपले विद्यापीठ मिळाले.
मागे राहिलेल्यांची काळजी पुढे गेलेले करीत नसतात याचा अनुभव प्रादेशिक होता तसा या विद्यापीठाचा शैक्षणिक होता. मराठवाडा म्हटले की ‘बॅकवर्ड’ हे समीकरण असे, ते या विद्यापीठाने उलटविण्याचा खूप प्रयत्न केला. आज मराठवाड्याच्या विकासात या विद्यापीठाचाच मोठा वाटा आहे. तरीही पन्नास वर्षांत पुणे, मुंबई विद्यापीठांनी जशी प्रगती केली तशी या विद्यापीठास जमली नाही. ते शक्यही नव्हते. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि पश्चिम महाराष्ट्राचे ऐतिहासिक व भौगोलिक स्थान यामुळे मराठवाड्याच्या उच्च शिक्षणाकडे कायम दुराव्याने बघितले गेले. भोवतालचे दारिद्र्य, मागासलेपण आणि दूरदृष्टीचा अभाव यांचा विद्यापीठाच्या कारभारावरही परिणाम होत असतो. तसा तो झाला. तरीही हे विद्यापीठ पुढे जात राहिले. जागतिकीकरणात या विद्यापीठाची विलक्षण ओढाताण होताना दिसते. एखाद्या देशाचे उच्च शिक्षण जितके सशक्त असते तितकी त्या देशाची पत आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढते. भारताने गेल्या एक दीड दशकात जागतिक दबदबा निर्माण केला तो उच्च शिक्षणाच्या बळावर. नव्या माहिती-अधिष्ठित तंत्रज्ञानाला ज्या प्रकारचा ‘ज्ञानवंत’ माणूस हवा होता तो भारताने पुरवायला सुरुवात केली. म्हणून भारत आज परदेशात आणि अनेक देश भारतात व्यापारउदीम करायला तयार होतात. नवी अर्थव्यवस्था एका विचित्र अर्थाने ‘नॉलेज इकॉनॉमी’ झाली आहे. ज्ञान या शब्दाचा अर्थही पालटला आहे. उत्पादनाची चक्रे अत्यंत कमी आणि मानवी भांडवलाचा घसारा वाढवून ठेवणारी तंत्रज्ञानात्मक प्रगती आत्मसात करील असा श्रमिकवर्ग उभा करण्याची जबाबदारी उच्च शिक्षणावर आलेली आहे. या वर्गाला जे जे द्यावे लागेल ते म्हणजे ज्ञान.
जागतिक बाजारपेठेत देशाची पत तोलून धरेल अशी कौशल्ये अंगी बाणवणे म्हणजे ज्ञान मिळविणे. या पार्श्वभूमीवर ‘हे ज्ञानिची पवित्रता ज्ञानिची आथि’ हे बिरुद मिरविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ त्याच्या पन्नासाव्या वर्षात पदार्पण करते झाले. ज्ञानाबरोबर पावित्र्याची आपसूकच मोळी बांधणारा हा विचार आज पटणे अशक्य.
पावित्र्याचा अन् ज्ञानाचा काय संबंध? ज्ञान म्हणजे साक्षात्कार अथवा शहाणपण नव्हे. आता ज्ञान म्हणजे माहिती मिळवून तीवर प्रक्रिया करून तिला विक्रीयोग्य बनविण्याचा मार्ग. ‘त्या’ ज्ञानाला लाभलेली उदात्तता, महानता आता लोपली. आता ज्ञान एक उत्पादन होय. एक उद्योगधंदा होय. सरकारी पातळीवर तसा पुकारा झाला नसला तरी वर्ल्ड बँक, अर्थतज्ज्ञ आणि उद्योगजक ज्ञानाचा वरील अर्थच स्वीकारू लागल्याचे दिसते. त्यामुळे भारतभर दोन तुकडे पडल्याचे जाणवते. ज्ञानाचे जुने-पुराणे रूप मानणारा एक तर दुसरा ज्ञानाला आर्थिक व्यवहारांच्याच चौकटीत बसविणारा. जिथे जशी भौतिक परिस्थिती असेल तिथे तशी व्याख्या स्वीकारली जाते. त्यामुळे डॉ. बा.आं.म. विद्यापीठातदेखील ज्ञानाच्या नव्याजुन्या व्याख्यांची दुहेरी रूपे आढळतात. बहसंख्या अर्थातच जुन्यांची.
एकंदर उदारीकरण व जागतिक व्यापार संघटना यांमुळे उच्च शिक्षणावरचा खर्च सरकार कमी करीत आहे. ते स्वायत्तता, स्वनिर्मित संपत्ती, स्वावलंबन यांचे धडे विद्यापीठांना देऊ लागले आहे. पण ते देताना गरीब प्रदेश व त्यातील विद्यापीठे आणि प्रगत प्रदेश व तेथील विद्यापीठे असा भेद करायला हवा. औरंगाबादच्या विद्यापीठाचे लालन-पालन सरकारी अनुदानावर झाले तसेच ते पुढे व्हायला हवे. कारण स्वार्जित संपत्तीसाठी अवतीभवती जो उपयुक्त परिसर हवा असतो त्याची येथे कमतरता आहे. मुंबई व पुणे तसेच नागपूरस्थित विद्यापीठ त्या परिसरातून पैसा मिळवू शकते. तशी परिस्थिती औरंगाबाद व मराठवाडा यांची नाही. त्यातून नांदेडस्थित दुसरे भावंड या विद्यापीठाला आहे. ‘पैसा उभा करा’ ही दरडावणी मग आधीच पीडलेल्याला आणखी नाडल्यासारखे करते. या धोरणाचा परिणाम अभ्यासक्रम, अध्यापन व संशोधन यावर होतो. किरकोळ कमाईची कौशल्ये विकसित करून देणारे अभ्यासक्रम मग विद्यापीठासारख्या संस्थेला सुरू करावे लागतात. त्याच्या गुणवत्तेवर आघात होतो. विद्यार्थीवर्गसुद्धा फक्त (उपयुक्त) ‘ज्ञान’ घ्यायला येत राहतो. जीवनविषयक तत्त्वे, विकासोन्मुखी दृष्टी आणि सामाजिक जाणीव यांत तो रस घेत नाही. विद्यापीठाची पदवी, पदविका यांचा कारखाना बनून जाते. ही अवस्था मागासलेल्या प्रदेशाची आणखी हानी करणारी असते. म्हणून अशा प्रादेशिक विद्यापीठांचा संपूर्ण चरितार्थ सरकारांनीच चालवायला हवा.
याचा अर्थ हे विद्यापीठ फक्त कालबाह्य विचारसरणी आणि अनुपयुक्त साहित्य व गैरलागू वैज्ञानिक संशोधन यातच गुंतून पडावे असा नव्हे. सर्व प्रकारचे ताजे शिक्षण महाविद्यालयात प्राप्त व्हावे असाच त्याचा प्रयत्न हवा. वाणिज्य शाखा पुण्या-मुंबईत ओसंडून वाहते अन् मराठवाड्यात रिकामी राहते, याचा अर्थ नव्या आर्थिक प्रवाहांत उतरण्याची तयारी त्याने केलेली नाही असा होतो. भाषा, संगणक आणि कार्यकुशलता प्रत्येक विद्यार्थ्याला आत्मसात झालीच पाहिजे. या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाहीत. विज्ञान, तंत्रज्ञान व व्यवस्थापन यांचा सर्वत्र बोलबाला असतानाच मराठवाड्याचा तरुण त्यांत मागे राहतो याचा इलाज याच वातावरणात शोधला पाहिजे, जिद्द, कष्ट, सचोटी व हरहुन्नर यात मराठवाड्याचा विद्यार्थी मागे नाही. त्याला चांगले मार्गदर्शनच मिळत नाही म्हणून तो रोजगाराची कसलीच शक्यता नसलेल्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतो व फसतो. सारेच राजकीय पुढारी डी.एड., बी.एड.ची दुकाने उघडून बसले असल्याने त्यांच्या आमिषाला तो बळी पडतो. पत्रकारिता शिकलेले विद्यार्थीही बी.एड., डी.एड.व सेटनेटच्या आहारी जातात तेव्हा व्यावसायिक व
औद्योगिक दृष्टीचाच हा अभाव आहे हे लख्खकन समजते.
आता प्रश्न असा आहे की बेकारी वाढू नये आणि शिक्षणाचाही उपयोग व्हावा याची जबाबदारी एकट्या विद्यापीठाची आहे का याचा. विद्यार्थी शक्यतो स्थानिक, परिचित वातावरणात रोजगार बघतात. मराठवाडा अशा परिस्थितीत कमी पडतो. मात्र हा विद्यार्थी मराठवाड्याबाहेर जातो. यामुळे नुकसान मराठवाड्याचेच होते. विद्यापीठाचे साह्य घेऊन उद्योग, व्यापार, व्यवसाय आदींनी रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. नवे उद्योगधंदे मराठवाड्यात यावेत यासाठीही लोक हलले पाहिजेत. उद्योगधंदे, तंत्रज्ञान, विज्ञान, शेती आदींसाठी कोणत्या प्रकारचे शिक्षण हवे त्याच्या सूचनाही सतत विद्यापीठाला मिळायला पाहिजे. एवढा सुवर्णमहोत्सव होत असताना गावात काही उत्साह नाही की हवा नाही. इतका गावाचा व विद्यापीठाचा दुरावा दोघांसाठीही चांगला नाही. उपेक्षा करणाऱ्या सरकारांवर व सरकारी संस्थांवर दबाव आणून अनेक चांगल्या गोष्टी पदरात पाडून घेण्यासाठी समाजाचे व विद्यापीठाचे नाते दृढ हवे. तरच सामूहिक दबाव निर्माण होऊ शकतो. सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने येथील सुजाण नागरिक, राज्यकर्ते व माध्यमे यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
[डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवाचा प्रारंभ नुकताच झाला त्यानिमित्ताने लोकसत्ता मधून साभार प्रकाशित. ] मोबाइल : ९४२२३१६९८८

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.