खरी पूजा

सिद्धिविनायकाच्या दर्शनाला झंडीच्या झुंडी अंगारिकेला जातात याबद्दल अंनिसने केलेली टीका मी वाचली. त्याबद्दल मला कीव वाटली तरी दुःख होत नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश वाय.व्ही.चंद्रचूड हे त्या झुंडीत दर्शनासाठी उभे होते, (म.टा.ता.३०-०३-०५). हे वाचल्यावर अत्यंत दुःख वाटले. मी स्वतः पुण्याचा आहे. मला डॉ.पु.ग.सहस्रबुद्धे शिकवायला होते. आम्हाला आगरकरांचे चरित्र ‘देव न मानणारा देवमाणूस’ हे पुस्तक अभ्यासाला होते. मी ८० वर्षांचा स्वातंत्र्यसैनिक आहे. माझ्यावर डॉ. सहस्रबुद्ध्यांचे बुद्धिप्रामाण्यवादाचे संस्कार दृढ झालेले आहेत. न्या. चंद्रचूड यांनी रुईया कॉलेजचे माजी प्राचार्य द. के. केळकर यांचे ‘बुद्धिवादाचा ध्रुवतारा’ हे पुस्तक आणि प्रा. न.र.फाटक आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे लेख वाचलेच असतील.
पृथ्वी हजारो वर्षे स्वतःभोवती फिरते. एका फेरीचा एक दिवस होतो. या दिवसांना सात नावे मानवाने सोयींसाठी दिली. या वारांमध्ये मंगळवार इतर वारांपेक्षा शुभ समजण्याचे कारण नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना समजायला हवे होते. सामान्य लोकांच्या बुद्धीच्या तुलनेत अंगारिकेला जाणे ही जरी सामान्य प्रकारची अंधश्रद्धा असेल परंतु असामान्य माणसाने ही अंधश्रद्धा बाळगणे हीन दर्जाचे आहे.
ब्राह्मण्यावर हल्ला करणारा पहिला ऋषी चार्वाक होय. वेदान्तकाळी यज्ञयागांची वाढ झाली होती. त्याच्या विरोधात चार्वाक उभा राहिला. शालेय इतिहासाच्या पुस्तकांत “वैदिक काळात कोठेही मूर्तिपूजा नव्हती. आपल्याला हवे ते प्राप्त करून घेण्यासाठी यज्ञ करीत.” असे लिहिलेले आहे. कविश्रेष्ठ कालिदासाच्या वाययात ‘गणेशपूजन’ नाही. इतिहासाचार्य राजवाडे लिहितात, “गणपती, रावण, दत्त इ. भ्रांत कल्पनेचे खेळ आहेत. ते खोटे आहेत.’ इ.स.८०० ते १८०० ह्या काळास तमोयुग म्हणतात. ह्या काळात निरूपणकार झाले परंतु शास्त्रज्ञ झाले नाहीत. ह्या काळात ज्या ज्या धार्मिक कल्पना प्रसृत झाल्या त्याच बहुतांशी आज हिंदू धर्मात पाळल्या जातात. म्हणूनच संत ज्ञानेश्वर म्हणतात,
“एथ वडील जें जें करिती, तयां नामें धर्म ठेविती ।
मी अविवेकाची काजळी, फेडुनी विवेकदीपू उजळीं ।।
देहीं देऊळी असतां, जाशी नाना तीर्थां । चुकलाशी आतां म्हणे ज्ञानदेवा ।।”
ज्ञानेश्वरांचे हे तत्त्वज्ञान कोणताही बुवा समाजापुढे ठेवीत नाही. ज्ञानेश्वरांचा छळ करणारे प्रस्थापित ब्राह्मण होते. चार्वाकालासुद्धा त्या काळातील प्रस्थापितांनीच त्रास दिला. त्यांचे वायय नष्ट केले.
आगरकर लिहितात, “कोणत्याही निर्जीव वस्तूला नमस्कार करायचा, त्याला फुले वाहायची आणि ती वस्तू स्वतःवर प्रसन्न झाली अशी श्रद्धा ठेवायची हा मूर्खपणा आहे.” १८९१ साली संमतिवयाच्या विधेयकावरून टिळक आणि आगरकरांचे भांडण झाले. आगरकरांना शह देण्यासाठी टिळकांनी १८९४ साली सामान्यांच्या मदतीने गणेशोत्सव सुरू केला. त्यावेळी त्यांचे वय ३८ वर्षे होते. टिळकांनी त्यांच्या वयाच्या ५५ व्या वर्षी गीतारहस्य हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहून “भक्तिमार्ग सोडा’ असे शिकविले. परंतु ह्या कर्ममार्गाचा उल्लेख एकही टिळकभक्त करत नाही.
जगप्रसिद्ध प्रकाण्डपंडित दा.ध.कोसंबी लिहितात, “समाजाला आवश्यक असे उत्पादन करण्याचा कोणताही व्यवसाय न करणाऱ्या आळश्यांनी श्रद्धा आणि धर्म यांच्या मदतीने इ.स.६०० ते १२०० या काळामध्ये पुराणे लिहिली आणि स्वतः पुरोहित झाले.” आजही पुराणे आणि पुरोहित समाजाच्या मानगुटीवर स्वार आहेत.
स्वा. सावरकरांनी ‘विश्वाचा देव आणि मनुष्याचा देव’ आणि ‘यंत्रबळ आणि मंत्रबळ’ ह्या दोन लेखांमधून पूजाप्रार्थनेचा विरोध केला आहे. समाजाला विज्ञान शिकण्यास प्रवृत्त केले आहे. भाकड गाई कापण्यास परवानगी दिली आहे. डॉ. वि.म.दांडेकरांनी ‘कॅटल इकॉनॉमी ऑफ इंडिया’ ह्या पुस्तकात “ऋषी गोमांस खात आणि अर्थशास्त्रीय दृष्ट्या ते योग्य आहे’ असे म्हटले आहे.
जगातील १८५ राष्ट्रांपैकी एकाच्याही घटनेत ‘ईश्वराचे अस्तित्व’ गृहीत धरलेले नाही. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने ‘ईश्वर’ हा शब्द तेथील मुलांच्या प्रतिज्ञेतून वगळण्याचा आदेश ता. २७-०६-२००२ रोजी दिला आहे. विद्यापीठांच्या कोणत्याही अभ्यासक्रमात ‘ईश्वर’ किंवा ‘आत्मा’ आहे असे दिलेले नाही. “तशी लोकांची श्रद्धा आहे’ असे लिहिलेले असते. “न तपासलेल्या जाणिवेवरील विश्वास” म्हणजे ‘श्रद्धा’ होय. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे.
मान्यताप्राप्त विद्वान ना.सी.फडके, पु.ल.देशपांडे, द.के.केळकर, श्री.म.माटे, दि.धों.कर्वे, प्रबोधनकार ठाकरे, गं.बा.सरदार इ. सर्वांनी ईश्वरकल्पना नाकारलेली आहे.
रामनारायण रुईया कॉलेजचे प्रिं. केळकर लिहितात, “मुस्लिमांच्या सत्यपिरावरून सत्यनारायणाची पूजा आपल्याकडे १८८५ च्या सुमारास आली. शिवाजीने आणि पेशव्यांनी ती केल्याचे उल्लेख नाहीत.” १४ व्या शतकापूर्वी दत्ताचा उल्लेख येत नाही. गुरुचरित्र, सत्यनारायण, साईबाबा आणि गजाननमहाराज, अतिसामान्य, गतानुगतिक आणि अंधश्रद्धाळू लेखकांनी लिहिले आहेत. त्यांना विद्यापीठांची मान्यता नाही. प्रबोधनकार ठाकरे लिहितात, “माणूस गुरुचरित्राच्या मागे लागला की, वेडा झाला असे समजावे.” (माझी स्मरणगाथा)
विद्यापीठात ‘तत्त्वज्ञान’ हा विषय शिकवतात. त्याचा एक भाग अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे आत्म्याचे ज्ञान होय. वैद्यकशास्त्राप्रमाणे आत्मा असा अवयव नाही. गेल्या हजारो वर्षांमध्ये पुनर्जन्म किंवा आत्म्याचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही. अध्यात्म सांगणारे सर्व बुवा चैनीत आणि विलासात राहताना आढळतात. फक्त गाडगेबाबा साधे रहात असत.
आज अनेक धार्मिक स्थळांमध्ये करोडो रुपयांचे सोने आणि पैसा निरुपयोगी (डेड मनी) पडलेला आहे. पं. नेहरू धार्मिक स्थळांना जात नसत. ते म्हणत “कारखाने आणि धरणे आजची तीर्थक्षेत्रे आहेत. त्यांना भेटी द्या.” धार्मिक स्थळांमधल्या मालमत्तेचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करून बेकारांना कामधंदा देण्यासाठी करणेच योग्य आहे. डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे धर्म ही वैयक्तिक बाब आहे. तिला सार्वजनिक रूप देऊ नये.
हिंदू आणि मुसलमान धर्मीयांपेक्षा ख्रिश्चन धर्मात पूजाअर्चेचे वेड कमी आहे. ते लोक रोज तासनतास बायबलचे वाचन करीत नाहीत. आज जगात जे शोध लागलेले आहेत, ज्या सुविधा आहेत, ते सारे पाश्चात्त्यांच्या ज्ञानाचे आणि चिकाटीचे फळ आहे. खरे तर रामशास्त्री प्रभुण्यांनी थोरल्या माधवरावाला सांगितले होते की, “राज्यकारभार करावयाचा असेल तर देवपूजा सोडा.’ परंतु आजचे राज्यकर्तेसुद्धा तिरुपती, सत्यसाईबाबा इ.ना भेटी देताना दिसतात.
पाश्चात्त्यांचे कॅलेंडरसुद्धा अनुभवावर आधारलेले आहे. त्यात ३६५ दिवस आहेत, अधिकमास इ. नाही. ३५५ दिवसांचे पंचांग चूक आहे. ग्रहताऱ्याची जागासुद्धा बदलते. पंचांगकर्त्यांकडे दुर्बीणच नव्हती. वैज्ञानिक सत्ये धर्मांधांना मान्य होणार नाहीत. ज्या काळात धर्म उदयाला आले त्या काळातील विद्वानांना साधने उपलब्ध नव्हती. सर्व जगसुद्धा त्यांना माहीत नव्हते. त्यांनी लिहिलेले त्या काळी ठीक होते. आज ते सर्व कालबाह्य झाले आहे. आपापल्या देशाची घटना हा त्या त्या देशाचा धर्म होय. जे देशासाठी हुतात्मे झाले त्यांच्या
जयंत्या केल्या तर सर्व समाज एकत्र येईल. म्हणून पारंपारिक देवकल्पना आणि जातिधर्म न मानता राष्ट्र हा देव आणि मानवता हा धर्म मानून सामाजिक ऋण फेडणे म्हणजे पूजा होय.
तत्त्वबोध , कल्याण-कर्जत हायवे, नेरळ (रायगड) ४१०१०१, फोन : ९५२१४८-२३८६५२
**************
एक घोडा, गाय नि गाढव युद्धात सर्वाधिक मोलाची कामगिरी कुणाची म्हणून वाद घालत होते. घोडा म्हणाला, “माझीच! कारण मी जर का सैनिकांची नि तोफगोळ्यांची वाहतूक केली नसती, तर आपला पराभवच झाला असता!” यावर गाय फणकारली, “मी दूध दिलं नसतं, तर सारेच नागरिक उपाशी मेले असते आणि युद्धच संपुष्टात आलं असतं!”
अखेर गाढव शांतपणे म्हणालं, “मंडळी, मी राजकारण खेळलो नसतो, तर हे युद्ध सुरू तरी झालं असतं का?”
*************

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.