पत्रचर्चा

प्रदीप पाटील, चार्वाक, २६०/१-६, जुना कुपवाड रोड, सांगली, (फोन ९८९०८०४४९८)
ऑगस्ट २००७, अंकातील टी.बी.खिलारे यांची प्रतिक्रिया वाचली. जॉन हॉरगन यांच्या लेखाच्या आधारे त्यांनी असे म्हटले आहे की ईश्वरीय-धार्मिक अनुभवांविषयीचे सिद्धान्त चुकीचे व अस्थायी आहेत. मी तो मूळचा लेख “The God Experiment’ वाचला. त्या लेखात जॉन हॉरगन यांनी पाच जणांचे संशोधन दिले आहे. त्यांची चिकित्सा करता ते वैज्ञानिकदृष्ट्या चूक ठरत नाहीत. कारण जॉन हॉरगन हे बी.ए. (इंग्लिश) असून ते विज्ञान पत्रकार आहेत. त्यांनी पाचही जणांच्या संशोधनात कुठे व कशी चूक आहे हे नमूद करावयास हवे होते. तसे ते लेखात करत नाही. ते म्हणतात ते असे ह्न १. न्यूबर्ग यांच्या संशोधनात असे विचारता येईल की ते मेंदूच्या स्कॅनच्या आधारे नेमके काय मोजताहेत? ध्यानधारणेत इतरही मेंदूतील भाग उद्दीपित होतात, ध्यानधारणा ही विविध मानसिक अवस्थाही निर्माण करते.
परसिंगर यांचे संशोधन उप्पसाला युनिव्हर्सिटीने खोटे ठरविले पण त्यास परसिंगर यांनी उत्तर देऊन त्यांचे प्रयोग पुरेशा साधनांशिवाय झाल्याचे म्हटले. हॅमट यांचे संशोधन फ्रान्सिस कोलीन्स यांनी फेटाळले. स्ट्रासमन यांचे संशोधन डीएमटी हे रसायन शरीरात धार्मिक अनुभवसदृश अवस्था निर्माण करते, शिवाय इतरही अवस्था निर्माण करते.
वरील लिहिलेले मुद्दे म्हणजे ‘संशोधन खोटे ठरले’ ‘अस्थायी’ ठरले असे म्हणणे, अवैज्ञानिक होय. वरील सर्वांच्या संशोधनास आक्षेप घेताना हॉरगन यांनी वेगवेगळे आक्षेपतंत्र वापरले आहे. उदा हॅमर यांचे संशोधन कोलीन्सनी फेटाळले. कोलीन्स हे ह्यूमन जेनोम प्रोजेक्टचे प्रमुख असले तरी ते भक्तिपरायण ख्रिश्चनही आहेत. मग रामचंद्रन यांच्यावर त्यांनी घेतलेल्या आक्षेपाप्रमाणे कोलीन्सही संशयास्पद ठरतात. डीएमटी कसे परिणाम करीत नाही याविषयी हॉरगन यांनी लिहावयास हवे. पण तसे काहीही नाही.
त्याच लेखात ‘विज्ञान देवाविषयी काहीही सांगू शकणार नाही’ असे ठाम विधान हॉरगन यांनी केले आहे. ते त्यांच्या विज्ञानाविषयी असलेल्या पूर्वग्रहाशी मिळतेजुळते आहे. कारण त्यांनी “विज्ञानाचा अंत’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्याविषयी त्यांची मते अशी आहेत. विज्ञानात नवीन शोध लागले की ते विस्तारते, हे चूक होय. उलट ते संपत चालले आहे. त्यामुळे विज्ञानाने धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान किंवा साहित्यासारखी भूमिका घ्यावी आणि संशोधकांनी शोधत राहावे. सुपरस्ट्रींग सिद्धान्त सांगणारे वैज्ञानिक ‘मध्ययुगीन धर्मशास्त्री’ आहेत. मनोविज्ञान, सामाजिक शास्त्रे, मार्क्सवाद, समाजजीवशास्त्र हे वैज्ञानिक अविचार आणि रोग आहेत. काही शतके पूर्वीच विज्ञानाचा उदय झाला असून मागच्या शतकातच प्रमुख यश मिळाले आहे. हे यश नसून बुद्धिभ्रम होय, नशीब होय. अनेक कोडी अनुत्तरित आहेत, विज्ञान त्यांना काय उत्तर देणार ? उदा. कॅन्सर. पदार्थविज्ञानापेक्षा जीवशास्त्र जास्त अर्थपूर्ण आहे.
डार्विनची मते ही मानवी वर्तनाविषयी काहीही खोलवर दृष्टिकोण देत नाहीत असे मत हॉरगन यांनी ‘द न्यू सोशल डार्विनिस्ट’ या पुस्तकात मांडले आहे! न्यूजवीकने हॉरगन यांची संभावना ‘कल्पनाशक्तीचा अभाव’ अशी केली आहे. मात्र शेवटी हॉरगन घोषणा करतात की माझे म्हणणे खोटे ठरण्याचा अजिबात संभव नाही.
ह्या त्यांच्या लेखाद्वारे टी.बी.खिलारे वरील पाचही संशोधने चुकीची अन् अस्थायी म्हणत असतील तर ते कितपत वैज्ञानिक ठरेल ते वाचकांनी ठरवावे.
व धार्मिक व अतीन्द्रिय अनुभव हे मेंदूतून निर्माण होण्याविषयी शंका असेल तर ते कुठून व कसे निर्माण होतात याविषयी त्यांनी आपले मत मांडावे असे मी सुचवीत आहे. जर ते शक्य नसेल तर ते हॉरगनचेच मत पुढे रेटतात काय ? म्हणजे हॉरगनना वाटते की, असे अनुभव देण्याचा उपाय म्हणजे माकडाच्या हाती कोलीत!
देव अथवा कोणतेही धार्मिक वा अतीन्दिय अनुभव हे भौतिक पातळीतून अथवा शारीरिक क्रियांतून निर्माण होतात काय हे शोधल्याने, ते अस्तित्व विश्वातीत असते असे जे धार्मिकांचे म्हणणे असते त्याच्यावर आघात करणारे ठरेल. ते गूढ अस्तित्व आहे हे जे त्यांचे म्हणणे आहे त्यास अल्पसा प्रयत्न म्हणता येईल. त्यास टी.बी. खिलारे खोडून काढतात म्हणजे ते नेमके काय करतात?
ए.एस.डी./एल.एस.डी. सारख्या अंमली पदार्थांनीही मानसशास्त्रीय व आध्यात्मिक परिणाम साधतो असे खिलारेंनी लिहिले आहे. तो कसा साधतो हे सांगितले तर बरे होईल.

केशवराव जोशी, तत्त्वबोध , कल्याण-कर्जत हायवे, नेरळ (रायगड) ४१०१०१, फोन ९५२१४८-२३८६५२
(१) आसु जून २००७मध्ये गीतेबद्दल एक लेख आला आहे. ज्या काळात दा.ध. कोसंबी यांनी गीतेबद्दल लेख लिहिला त्या काळात, गीतेबद्दल संशोधन झाले नव्हते. तरीही प्राचीन भारतीय समाज ह्या पुस्तकात पान क्र.९४ वर कोसंबी लिहितात. “महाभारतात सर्वांत हुशारीने केलेली वाढ गीतेची आहे. गीता इ.स.३ऱ्या शतकानंतरची आहे.’ ।
‘महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ डॉ.ग.श्री.खैर यांचा गीतेचा शोध हा ग्रंथ २ ऑगस्ट १९६७ रोजी प्रकाशित झाला. त्यात ते म्हणतात की, ‘मूळ गीता पहिल्या सहा अध्यायांचीच आहे व त्यात कर्मयोगावर भर दिला आहे. कालांतराने दुसऱ्या लेखकाने अध्याय क्र. ८,१३-१५, १७ व १८ हे लिहिले. त्यात व्यवहारवादावर भर दिला. तिसऱ्या लेखकाने पुष्कळ वर्षांनंतर अध्याय क्र.७,९,१०,११,१२ व १६ हे भक्तिमार्गावर आधारित लिहिले”. महाराष्ट्रातील तज्ज्ञ व विद्वानांनी त्यांचे अभिनन्दन केले होते. (२) निर्जीव वस्तूला नमस्कार करून ती वस्तू आपल्यावर प्रसन्न होते असे समजणे मला पूर्णतः चूक वाटते. आज सर्वच धर्म कालबाह्य झाले आहेत. एकाही धर्ममार्तंडाने जनसामान्यांच्या सोयीसाठी उपयोगी पडेल असा एकही शोध लावलेला नाही. ‘घटनेने इहलोकाचे सर्व क्षेत्र राज्याकडे दिले आहे. धर्म हा फक्त पारलौकिक व आध्यात्मिक बाबींपुरता मर्यादित केला आहे.’ (सुप्रीम कोर्ट. ए.आय.आर.१९९४ एस.सी.१९१८.)
सर्वसाधारणपणे समाजात वीस टक्के लोक भाबडे असणार. ‘ईश्वर नाही’ हे त्यांना समजावून सांगू नये, हे मान्य आहे. परंतु आज भारतात सुबत्ता वाढली आहे. एक लाखाहून जास्त कोट्यधीश आहेत. अधिकांकडे दोनाहून जास्त घरे आहेत. हे लोक भाबडे नाहीत. हे लोक स्वतःची श्रीमंती दाखविण्यासाठी धार्मिक कार्ये करतात. सत्यसाईबाबाविरुद्ध होमोबाबतचे खटले आहेत. (India Today, 1.1.01). तसेच त्यांची भक्ती करून नरसिहराव व शंकरराव यांना काहीही लाभ झाला नाही, हे माहिती असूनसुद्धा विलासराव त्याच मार्गाने जातात.
ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, एकनाथ, कबीर यांनी अभंगातून देव नाही असे सांगितले आहे. गं.बा.सरदार लिहितात. “संतांनी भक्तीचा फोलपणा दाखवून, अश्या उपासना पद्धती करणाऱ्यांना वेश्या म्हटले आहे.’ (धर्म आणि समाजपरिवर्तन, पान १२). चार्वाक, आगरकर, सावरकर, राजवाडे इत्यादींनी ईश्वरकल्पना नाकारली आहे. जे लोक भाबडे नाहीत आणि कार्यकर्ते आहेत त्यांना तरी ह्या गोष्टी वारंवार सांगितल्याच पाहिजेत. हाच वर्ग समाजाचा कणा असतो आणि तोच जर खऱ्या ज्ञानापासून वंचित राहिला तर समाजाचे परिवर्तन कसे होणार?
मुस्लिम धर्मावर टीका करायची नाही हे योग्य नाही. त्यांच्यातील ‘सुंता’ हा प्रकार अमानुष आहे. त्याकाळी वैद्यक पुढारलेले नव्हते. दिल्लीचे जोसेफ एडामारक् लिहितात. “The prophet was schizophrenic due to insecurity and deprivation he had, when he was an orphan. Koran is most detrimental to humanity.” (सोबत, ३०-०८-१९८७). तीच गोष्ट दलितासंबंधी आहे. त्यांच्यातील फक्त एक कोटी बौद्ध झाले. उरलेले ३३ कोटी हिंदूच आहेत. हिंदूंमधील पाच कोटी ब्राह्मणांना नोकऱ्या नाकारल्या तर सर्व दलितांना नोकऱ्या हव्या असतील तर अर्थशास्त्रातील तज्ज्ञ डॉ. आंबेडकरांनी १९३९ व १९४३ साली भांडवलशाहीविरुद्ध लढा देण्यास सांगितले (श्रमिक आणि लोकशाही) त्याचेच पालन करावयास हवे. ह्या सर्व गोष्टी कार्यकर्त्यांना सांगितल्या जातात का? याचा खुलासा करावा.
मार्क्स आणि लेनिनच्या काळी इतकेच कशाला १९८० पर्यंत धर्माचे स्तोम प्रमाणात होते. धर्माविरुद्ध अनेक विद्वान लिहीत असत. त्या काळात लेनिनचे ऐकणे ठीक होते. लेनिनचे विचार आजसुद्धा पोथीनिष्ठपणे अमलात आणल्यामुळे सगळ्या जगात धर्माचा आणि कर्मकांडांचा आगडोंब उसळला आहे. अशा काळात धर्माविरुद्ध न लढणे योग्य नव्हे. पूर्वी पोलिस स्टेशनमध्ये व रेल्वेस्टेशनमध्ये देवाच्या पूजा-अर्चा होत नव्हत्या. आज सर्वत्र होतात. ७५ वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये पेरियर नायकर यांनी नास्तिकपणाची चळवळ उभारली. आज तामिळनाडूमध्ये दर ५० मीटरवर देवाच्या मूर्ती दिसतात (टाइम्स, १५-०६-०१). सत्यसाईबाबा, गजाननमहाराज यांच्यासारखे आता अमिताभ बच्चनचेदेखील देऊळ उभे राहिले आहे. पूर्वी कलकत्ता दूरदर्शनवरून प्रा. बागची यांची Science Quiz ही विज्ञानावर आधारित मालिका प्रसारित होत असे. आज भक्तिमार्गाच्या नवीन नवीन वाहिन्या निघत आहेत. अलाहाबादच्या विद्यापीठाचा डॉक्टरेट ज्योतिषी हजारो कोटी कर्जबुडव्यांचा दोष त्यांच्या ग्रहयोगांना देईल आणि दीनदुबळे त्यांना दोषमुक्त करतील. १९९४ साली डॉ. वि.भि.कोलते यांनी लीळाचरित्राचे संपादन करताना सीतेचा उल्लेख पोथ्यात असलेल्या वर्णनानुसार ‘व्यभिचारिणी’ असा केला आणि त्यानंतर त्यांना जो क्षोभ व न्यायालयीन त्रास झाला त्या वेळी त्यांना डाव्या पक्षांनी आर्थिक अथवा वैधानिक स्वरूपाची मदत केली नाही.
लेनिनचे विचार पोथीनिष्ठपणे पाळल्याने अनेक पूर्वीचे डावे कार्यकर्ते हिंदुत्ववादी पक्षात गेले आहेत. आजही धर्मावर हल्ला केला तर भांडवलशाहीविरुद्धचा लढा उशिरा का होईना; पण सुरू होईल. न पेक्षा भांडवलदार देवळे बांधतील आणि दीन-दुबळे भांडवलशहालाच देव मानतील. आज लेनिन असता तरी त्यानेसुद्दा प्रथम देवावर हल्ला करायला सांगितला
असता.

*** ताहिरभाई पूनावाला, पुणे ह्न फोन ०२०-२५६५५२८३
माझ्या शिरस्त्याप्रमाणे, नवा महिना सुरू झाला की मी ‘आजचा सुधारक’साठी बेचैन होतो. ऑगस्ट सुरू होऊन गेला अन् तरी आ.सु.चा पत्ताच नाही म्हणून ह्र मी आपल्या (नंदा) खयांना फोन करतो न करतो तोच सुधारक आला.
मी तुमचा, रामचंद्र गुहाच्या लिखाणाचा मराठी तर्जुमा वाचला. मला तर तो आणखीच भावला. अर्थात् तुमच्या लिखाणात संक्षेप होता. तुम्ही माझ्या वतीने त्यांना धन्यवाद जरूर कळवा. विसरू नका.
तुमचे संपादकीय जिवंत वाटले. भाऊ महाजनांच्याबद्दल लिहून पुढच्या लेखाला चांगली पार्श्वभूमी पुरवली तुम्ही. दुसरे लेखही कमी वाचनीय किंवा कमी सखोल नव्हते. आपली इनिंग तुम्ही खूप छान सुरू केलीत. इतकी की वर्षाअखेर आपला खेळ संपवून तुम्ही पॅव्हिलियनकडे निघालात हे दृश्य दुःखद वाटेल.
मुखपृष्ठावरील उतारा ‘ईमान’ बद्दल सांगतो. (न्या.मू.) मुनीर यांचे ‘जीना ते झिया’ हे पुस्तक खूप वाचनीय आहे. त्यात एक किस्सा दिला आहे. अहमदिया पंथाचा म्हणून सैन्यदलातील एक कॅप्टन मारला गेल्यावर पुढारी ह्नमौलवींना बोलावून विचारण्यात आले की खरा मुस्लिम कोण ? नेमकी व्याख्या करा. प्रत्येक मौलवी इतरांबद्दल म्हणाला तो दुसरा आहे ना तो खरा मुस्लिम नाही!

*** डॉ. राहुल पाटील, कामजीवन सल्लागार (कन्सलटिंग सेक्सोलॉजिस्ट)
मोबाइल : ९८२२५३४७५४, e_mail : drahul2000@yahoo.com
‘आकांक्षा’ प्लॉट नं.१, न्यू मोरे कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर.
(१) आसु च्या जुलै २००७ मधील पुष्पा हातेकर यांचे पत्र वाचून मला हसू आले. शेंदूर माखलेला दगड तुमच्या मार्गात आल्यावर तो दगड तुम्ही पायाने बाजूला कराल ? नक्कीच नाही अशी, जी खात्री त्यांना वाटते ती बिनबुडाची आहे. कोणत्याही शेंदूर फासलेल्या दगडाला, तसेच लॅमिनेशन केलेल्या “ी लरश्रश्रशव’ देवाच्या(?) फोटोला पाहिजे तेवढ्या लाथा मारायला मी कधी व कुठे येऊ ?
निरीश्वरवाद’ पूर्णपणे पटलेल्या माणसांमध्ये ‘देव’ / ‘अल्ला’ / ‘गॉड’ मनात व स्वप्नात देखील येत नाही. त्याच्या जीवनात कितीही संकट आले तरी तोंड देण्याइतपत मानसिक बळ असलेले नास्तिकत्व त्याच्यामध्ये असते. माझ्यातही ते बळ आहे. माझ्यामध्ये ‘निरीश्वरवाद’ येऊन बावीस वर्षे झाली. कोल्हापुरातील सुप्रसिद्ध (?) मंदिरातील दगडांचे आकार, चेहरेपट्टी आता मला आठवतदेखील नाहीत. असे कट्टर नास्तिक हातेकर यांना कदाचित भेटले नसावेत.
श्रीमती हातेकर यांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. त्याला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो…. ह्न चिमुकल्या कुडीत प्राण आला कुठून ? आहे कसा ? कोठे जातो?
याला ‘चार्वाकां’चा देहात्मवाद व स्वभाववाद हे नियम लागू होतील. ह्न विज्ञानाला तो प्रयोगशाळेत तयार करता येतो का?
स्त्रीबीज व पुरुषबीज गर्भाशय पिशवीबाहेर कॉम्प्युटराईज्ड, रोबोच्या मदतीने काचेमध्ये वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विज्ञानामधील हे ‘आगामी आकर्षण’ आहे यावर चर्चा २००० साली राष्ट्रीय कामजीवन-परिषदेत आम्ही केली आहे. ह्र गर्भधारणा सहज सुलभ असताना, एखादी पतिपत्नी मेडिकली पूर्ण फिट असताना अपत्यसुखास वंचित का राहतात ?
लोकांचा गैरसमज असतो की पतिपत्नी शयनगृहात एकत्र झोपतात याचा अर्थ त्यांचा ‘संभोग’ व्यवस्थित होतोच.
प्रत्यक्षात ह्न पती नपुंसक, समलिंगी असू शकतो, दोघांपैकी एकाला शारीरिक संभोगाची इच्छाच नसते. संभोग कसा करावा, योनिमार्ग कोठे आहे, कसा प्रवेश करावा, आसन कोणते असावे इ. तसेच लग्नानंतर ‘बाळ’ होण्यासाठी संभोग करावा लागतो हेदेखील काही लोकांना माहीत नसते. गुदामैथुनातूनच, नुसते एकमेकांवर झोपून आपोआप वीर्य आत जाते व बाळ होते ह्न असेही काहींना वाटते. यात ‘गंभीर विनोद’ हा आहे की कोणताही स्त्रीरोगतज्ज्ञ वरील सर्व माहिती विचारातच घेत नाही. व ‘सर्व रिपोर्टस नॉर्मल असून अपत्य होत नाही’ असा चुकीचा विचार समोर येतो. (ही अतिशयोक्ती नाही.) ईश्वर ही संकल्पना आहे, सत्य नव्हे व मानवाला बौद्धिक पातळीवर ‘हिजडा’ बनविण्याचे उत्तम औषध आहे. त्यामुळे कोणत्याही घटनेमागे वैज्ञानिक कारण न शोधता शक्ती, चमत्कार असले फालतू शब्द वापरून ‘वेळ’ मारून नेतात.
दैनंदिन जीवनात गरजूंना मदत करण्याची वेळ आली तर निश्चितच करावी. तसे मीदेखील मदत करतो. ‘निरीश्वरवाद’ हा माणसांच्या मनात रुजावा लागेलच. त्यासाठी सतत त्यावर लेखन, प्रबोधन, चर्चा होणे गरजेचे आहेच. यावर लक्ष न देता निव्वळ गरजूंना मदत केली तर समाजाला ‘सत्य’ समजणार नाही. नाहीतर बुवाभटांचे मार्केटिंग जोरात चालेल. नाही का? (२)तुम्हाला हे माहीत आहे का?
दुर्मिळ प्रकारच्या रोगांत पुरुषाला दोन लिंगे असतात. स्त्रीला ३ ते ९ स्तन असू शकतात.
इंग्रजी कामुक चित्रपटांचे चित्रीकरण हे फक्त दोन तासांत संपते. दिग्दर्शकाऐवजी कामुक चित्रपटातील स्त्री-पुरुषच संभोगाचे आसन ठरवतात. प्रत्येक १५ दिवस ते १ महिन्यातून क.ख.त. रक्ततपासणी करतात. संभोगाचे चित्रीकरण होताना त्या खोलीत ८-१० लोक उपस्थित असतात.
काही वेळा चित्रीकरण तीन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या कॅमेऱ्यातून एकाचवेळी होते. नंतर त्यातील योग्य कोनातून घेतलेले चित्रीकरण चित्रपटासाठी पक्के करतात. चित्रपटाचे चित्रीकरण करताना पुरुष स्वतःचे हस्तमैथुन करून ताठरता आणवतो व नंतर लगेच संभोगास सुरुवात करतो. मध्येच ताठरता गेली तर चित्रीकरण थांबवले जाते. भारतात तयार होणाऱ्या कामुक चित्रपटातून भारतीय स्त्री-पुरुषांच्या कामजीवनातील चुका लक्षात येतात, शिवाय पाहणाऱ्यांमध्ये गैरसमज पसरतात.
बऱ्याच भारतीय स्त्रियांना ब्ल्यू फिल्मपेक्षा कलात्मक कामुक चित्रपट जास्त आवडतात. एखाद्या स्त्री-पुरुषाला समलिंगी संभोगाची स्वप्ने पडणे हे वाईट नाही. कोणत्याही उपचाराची गरज नाही, ती विकृतीही नाही. मोठे स्तन असलेल्या स्त्रीला पाठीचे दुखणे, श्वसनाचे आजार जास्त होऊ शकतात. बाळास दूध पाजणाऱ्या स्त्रीमध्ये संभोगावेळी कामपूर्ती मिळाली तर त्यावेळी तिच्या स्तनातून दुधाचा फवारा येऊ शकतो. कानातील रिंगप्रमाणे काही स्त्रिया भगशिश्निका व पुरुष शिश्नाला रिंग लावतात. संभोग करताना बऱ्याच स्त्रिया डोळे बंद करतात/आपोआप बंद होतात.
प्रगत देशातील आंतरराष्ट्रीय कामविज्ञान परिषदेत काही वेळा वेश्या, कामुक चित्रपटात काम करणारी स्त्री कलाकार यांना अनुभवकथन करण्यास, माहिती देण्यासाठी बोलाविले जाते.
प्रगत देशांत ७ मे हा राष्ट्रीय हस्तमैथुन दिवस म्हणून पाळला जातो. काही पुरुषांना स्वतःची स्तनचुचूके स्त्रीने चूषण केलेली आवडतात. यात काही गैर नाही. गोऱ्या स्त्रीमध्ये कामपूर्ती मिळताना चेहरा, स्तन, पोट या भागावर लालसरपणा वाढताना स्पष्ट दिसू शकतो.
भारत सध्या वाढत्या H.I.V. संख्येत दोन क्रमांकावर आहे. २०१० सालापर्यंत दोन ते अडीच कोटी एवढी संख्या होईल. भारतातील ४९ जिल्ह्यांत H.I.V. ग्रस्तांची संख्या जास्त होती. त्यांतील महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांचा समावेश आहे. सातारा, कोल्हापूर, ठाणे, पुणे, मुंबई, सांगली, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, चंद्रपूर, सोलापूर, लातूर हे ते जिल्हे होत. हे माहीत असताना महाराष्ट्रात लैंगिक शिक्षणाला विरोध झाला. ह्यालाच म्हणतात महाराष्ट्राचे ‘बेगडी पुरोगामित्व’. ह्न सनातनी विचारांच्या स्त्री/पुरुषांबरोबर लग्न करून बरेच लोक फसलेले आहेत. कारण ‘सेक्स’ ही तामस क्रिया आहे असे समजून तीन वर्षे ‘स्पर्श’देखील केला जात नाही. हे कटु सत्य आहे. ह्न महाराष्ट्रातील काही सेक्सॉलॉजिस्ट देव, धर्म, भोंदू बाबांच्या नादी लागून मुखमैथुन, गुदमैथुन, समलैंगिकता, कामुक चित्रपट पाहणे याला विकृती म्हणतात. तापस म्हणतात व रोग नसताना त्या पुरुषांवर/स्त्रीवर खोटा उपचार करून बसतात.
खऱ्यापेक्षा खोट्या डॉक्टरांची ‘चलती’ आहे हे भारतातील कटु सत्य आहे याचे कारण सदोष पत्रकारिता! । पुरुष लिंगाची उद्दीपन अवस्थेतील लांबी सरासरी २ ते ६ इंचपर्यंत असू शकते. तरी ४ ते ६ इंच यांचे प्रमाण जास्त आहे. पुरुष लिंग डावीकडे/उजवीकडे कलू शकते. उद्दीपनावस्थेत लिंग सरळच असावे असे काही नाही.
लिंगाचा तसेच स्तनाचा आकार कोणतेही मलम, तेल, यांच्या स्प्रे यांनी वाढविला जाऊ शकत नाही. लिंगाचा आकार २ गुणसूत्रांवर अवलंबून असतो. (लिंगाचा व स्तनाचा आकार मालिश करून वाढवून दाखविणाऱ्यास माझ्याकडून एक लाख रुपये बक्षीस मी सप्टेंबरमध्ये नागपूरला घोषित करणार आहे.)
प्रगत देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की २५% मध्यमवर्गीय स्त्रिया त्यांच्या कामजीवनात कामपूर्ती मिळवू शकल्या नाहीत. कामवासना वाढविणारे सर्वांत चांगले औषध म्हणजे शयनगृहातील दोघेही कामुक साथीदार. १९६० च्या तुलनेत १९९० साली पुरुषांच्या शुक्रजंतूंचे प्रमाण १/३ ने कमी झालेले आढळले. अर्थात २००७ पर्यंत अजून कमी होण्याची शक्यता आहे. ७५% पुरुषांचे वीर्यपतन दोन मिनिटांत होते. शास्त्रीय लैंगिक शिक्षण व कामजीवनावरील पुस्तके चोरून-लपून वाचली जातात./ती विकत घेणे हा चेष्टेचा विषय बनतो. या कृती समाजाचा वैचारिक मागासलेपणा दर्शवितात.
ह्न ज्या देशात कामजीवन व लैंगिक शिक्षणावर चर्चा करणे अजूनही वाईट म्हटले जाते तो देश कखत/अखड्ड मुक्त करणे हे तर निव्वळ कधीही पुरे न होणारे स्वप्नच म्हणावे लागेल.
स्त्री-पुरुष कामजीवन व HIV/AIDS विषयकही काही कटु सत्ये आहेत. वात्स्यायनाच्या कामसूत्रातील काही विचार’ आज आधुनिक कामशास्त्रात मान्य आहेत, सर्व नव्हे. अशीच थोडक्यात ती माहिती आपण पुन्हा पाहू.

मधुकर कांबळे, १६८०२ Shipshaw River Dr, Leander, Texas, USA ७८६४१
गुरुपूजा आणि देवपूजा याचे स्तोम
आजचा सुधारकच्या ऑगस्ट २००७ च्या अंकात संपादकीयामध्ये फाजील गुरुमाहात्म्याच्या प्रस्थाबद्दल वाचकांचे डोळे उघडल्याबद्दल धन्यवाद. घरोघरी बाबा, बुवांचे प्रस्थ वाढले आहे. विशेषतः ज्यांनी मेहनतीशिवाय बरेच पैसे कमावले आहेत असे लोकच ते पैसे पचविण्यासाठी बुवा/गुरूंच्या मागे लागून स्वतःची फसवी समजूत करून घेतात. गुरुभक्तीचा धर्म आणि खरा धर्म म्हणजे नीती यांच्यात आपण लिहिल्याप्रमाणे काडीचाही संबंध नाही हे अगदी खरे.
त्याच अंकात टी.बी. खिलारे यांनी सत्यसाईबाबांचे चेल्यांमध्ये केंद्रीय मंत्री शिवराज पाटील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख, कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, तामिळनाडूचे राज्यपाल सुरजितसिंग बर्नाला यांच्यासह कितीतरी राजकारणी लोक असल्याचे सांगितले. ते सत्यसाईबाबास संताहूनही श्रेष्ठ आहेत असे मानतात. असे राजकारणी लोक बाबालोकांच्या मागे लागून कोणत्या नीतीने देशाचा कारभार चालवणार ? याच सत्यसाईबाबाबद्दल सांगतात की बाबाची हातचलाखी पकडण्याकरता एकदा प्रख्यात जादूगार पी.सी.सरकार(?) बाबाकडे गेले. बाबाने नेहमीप्रमाणे हात उंच करून हवेतून विभूती (Ash) काढली. जादुगार सरकारने देखील शेरास सव्वा शेर प्रमाणे ह्र हात उंच करून हवेतून गुलाबजाम काढले व ते बाबाला दिले!
गुरुपूजेप्रमाणे देवपूजेचेही प्रस्थ (स्तोम) भारतात फार वाढल्याचे दिसते. इकडे अमेरिकेत TV वर प्रसिद्ध नट अमिताभ बच्चन व त्याचा सर्व परिवार मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात पायी जाऊन तासन्तास पूजा करीत असलेला आम्ही पाहतो. मुलाचे लग्न विघ्नाशिवाय व्हावे व मुलीचा मांगलिक पणा जावा. त्यात आड येऊ नये ह्यासाठी त्याने मागे एक वर्षभर कित्येक मंदिरांत प्रार्थना केल्या हे आपण जाणतोच. संजय दत्त देखील आपणास मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपातून मुक्तता मिळावी म्हणून बऱ्याच मंदिरांत गेला. त्याने आत्ताच श्रीक्षेत्र शनिशिंगणापूरला भेट दिली. तो साईबाबाचे दर्शन घेण्याकरिता शिर्डीस गेला. सिद्धिविनायक मंदिरात तर मागे गेला होताच. पण एवढे करून बच्चनला किंवा दत्तला किंवा त्यांच्या दोस्तभाईंना काहीच फायदा झाला नाही, किंवा होणार नाही. विवेकवादी लोकांना याची खंत नाही ह्नदुःख या गोष्टीचे आहे की गरीब भोळी जनता जी या अभिनेत्याची चाहती आहे ते यांना पाहण्यास गर्दी करत तासन्तास वाट पहात राहते व कदाचित त्यांचे अनुकरणही करते. अशिक्षित जनताच तसे करते असे नाही तर परदेशातही सुशिक्षित भारतीय तेच करताना दिसतात. नुकताच लंडनच्या महाराष्ट्र मंडळाने ७५ (पंचाहत्तर) वर्षे पूर्ण झाल्याचा कार्यक्रम केला. परदेशात होणाऱ्या या महोत्सवाला आशीर्वाद मिळावेत यासाठी खास सत्यनारायणाची पूजा ठेवण्यात आली व तसेच समारंभ निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी श्री गणेशाची पूजादेखील करण्यात आली.
राममोहन रॉय यांनी धर्मविषयक सुधारणांचे प्रयत्न १९१८-१९ साली सुरू केले व मूर्तिपूजा हिंदूंना गुलाम बनवते असे विचार मांडले होते. बालहत्या (भ्रूणहत्या), सतीप्रथा वगैरे रूढीपासून मुक्तता हेच कार्य मोठे आहे असे त्यांनी म्हटले. महाराष्ट्रात सामाजिक सुधारकांचा जो वर्ग उदयास आला त्यांनी देखील तसे म्हटले होते. जोतिबा फुले, लोकहितवादी, जस्टिस रानडे, गोपाळ गणेश आगरकर, यांनी चालविलेल्या समाजसुधारणांचा जोर थंडावला तर नाही ना, अशी शंका आता यावयास लागली आहे.
आगरकरांनी सुधारक वृत्तपत्र काढून हिंदूसमाजाच्या अनिष्ट चालींवर टीकास्त्र उचलले. आजचा सुधारक चे संस्थापक दि.य.देशपांडे व त्यावेळेच्या संपादकीय मंडळींनी तोच आगरकरीय विडा उचलला होता. सुरुवातीच्या अंकातले लेख व विचार ह्याची साक्ष देत होते. पण मागील तीन/चार वर्षांपासून आजचा सुधारक “”Economic issues, Town planning, Agricultural problems” वगैरे विषयांकडे जास्त लक्ष देऊ लागला होता. ह्या विषयांवर भरमसाठ पुस्तके वाचनालयात मिळतात. किंवा अन्य Speciality magazines मध्ये तसे लेख मिळत असल्यामुळे आजचा सुधारका चे सामाजिक महत्त्व काहीसे घटल्यासारखे वाटावयास लागले होते.
तरीपण आताचे गुरुमाहात्म्यामुळे वाममार्गाने मिळविलेल्या संपत्तीचे रक्षण होणे शक्य नाही असे सडेतोड व विचारप्रवर्तक संपादकीय पाहून आजचा सुधारकला पुन्हा सामाजिक सुधारकाचा दर्जा प्राप्त होईल यात शंका वाटत नाही.

रमेश मा. उमाठे, ‘८६, रवींद्रनगर, नागपूर -१२. (फोन ०७१२-२२९०३८८)
आजचा सुधारक जुलै २००७ वाचण्याचा योग आला. वर निर्देशित लेखातील (आ)विश्वाचे वय ह्यासंदर्भात भूगर्भशास्त्रज्ञाच्या भूमिकेतून काही बाबी स्पष्ट व्हाव्यात म्हणून हे विवेचन.
लेखात म्हटले आहे की पृथ्वीचे वय २ ते ३ अब्ज वर्षे असावे. १.२ अब्ज वर्षांपूर्वीचे जीवन अवशेष प्रस्तरांत दिसत नाहीत, ह्या तर्कावर वरील अनुमान आधारित आहे. कार्बन डेटिंग पद्धतीने ‘रेडियोअॅक्टिव्ह डिके’चा उपयोग करून संशोधकांनी पृथ्वीच्या सर्वांत जुन्या अग्निजन्य (igneous) खडकसमूहाचे (प्रस्तराचे नाही). वय ४ ते ४.२ अब्ज वर्षांचे असल्याचे सिद्ध केले आहे. त्याप्रमाणे पृथ्वीचे वय ४.५ अब्ज वर्षे असल्याचे मानतात. संशयित मानवाचे वय १० लाख वर्षांचे आहे हा आपला अंदाज योग्य आहे. कारण त्या काळात आधी अखंड पृथ्वीभर हिमयुग येऊन गेले होते. शास्त्रज्ञ असे मानतात की पृथ्वीचे वय जर १ दिवस (२४ तास) मानले तर Homosepian Erectus माणसाचे वय एक सेकंदापेक्षा कमीच असेल.
नागरण काळ तीन ते चार हजार वर्षांहून अधिक नसावा असे लेखात म्हटले आहे. तो काळ आणखी तेवढाच मागे नेण्यास हरकत नाही. वैदिक काळाची सुरुवात ७ ते ८ हजार वर्षांपूर्वीची मानतात. पशुपालन अवस्था आणि शेतीला ‘नागरणा’ची सुरुवात म्हणता येईल. महाभारत-रामायणकाळात ढोबळपणे गायींच्या संख्येवर राजाचे महत्त्व अवलंबून होते. गायींसाठी युद्ध होत होते. हा काळ म्हणजे पशुपालन व शेती ह्यातील संधिकाल म्हणता येईल. हा ५००० ते ५३५० वर्षे इतका जुना आहे.
लेखातील (इ) भागात थर्मोडायनामिक्सच्या दुसऱ्या नियमाची आठवण करून दिली हे बरे झाले. जीवसृष्टीचा कधीतरी निश्चित विनाश होणार आहे. एरवी माणूस शाश्वत असल्याच्या अविर्भावात जगत असतो. त्याचे पाय जमिनीला टेकण्यास ह्या ‘सत्या’ने मदत होईल असे वाटते. अंक चांगला आहे.

यशवन्त ब्रह्म, ‘बी-४, स्पेस किरण’, १६६, महात्मा नगर, नाशिक ४२२ ००७.
आसु जुलै २००७ मधील संपादकीय वाचून विशेष आनंद झाला. आजचा सुधारक हे विवेकवादी चिंतनाला वाहिलेले असल्यामुळे त्यामध्ये विवेकवादी साहित्य अधिकाधिक असणे अपरिहार्य आहे.
जग झपाट्याने बदलत आहे. या बदलाची नोंद घेऊन आपल्या मासिकामध्ये, साहित्य, इतिहास, तत्त्वज्ञान, विज्ञान अशा जीवनाशी निगडित साहित्याचा अंतर्भाव करण्याचा जो मनोदय प्रकट केला आहे तो अतिशय स्वागतार्ह आहे. त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन !

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.