राज्यघटनेत सुधारणा – प्रतिक्रिया 

डॉ. सुभाष आठले यांचा राज्यघटनेत सुधारणा हा लेख वाचला. ह्या सुधारणा अमलात येणे शक्य नाही हे स्पष्टच दिसते व त्याच्या कारणांची चर्चा करण्यात काही अर्थ नाही. अगदी या सुधारणा अंमलात आल्या तरी मिळणारा राजधर्म सध्यापेक्षा नक्की चांगला असेल असे सांगणे अवघड आहे. (उदा. समजा कॉंग्रेस निवडून आली तर सगळ्या गोष्टी ठरवणार कोण? सोनियाजीच ना!) असल्या किरकोळ गोष्टी आपण सोडून देऊ. 

साधारणपणे या लेखातून व्यक्त झालेला मुद्दा हा बुद्धिमत्तेचा आहे. म्हणजे तुम्ही एक पक्ष निवडून द्या आणि तो पक्ष बुद्धिमान लोकांचे (मग ते खासदार नसेनात का) एक मंत्रिमंडळ तुम्हाला देईल. जे सध्याच्या पेक्षा खूपच जास्त कार्यक्षम वगैरे असेल, किंवा मग आंबेडकर, मोरारजींसारखी व हुषार मंडळी निवडणुकीत पडणार नाहीत वगैरे वगैरे. 

आजचे सामाजिक वास्तव पाहता बुद्धिमान लोक (राजकारणातील व राजकारणाबाहेरील सगळेच डॉक्टर्स, वकील, मोठ्या हुद्द्यावरील अधिकारी आणि एम.बी.ए. झालेली मुले) हे इतरांपेक्षा जास्त नैतिक, सज्जन आणि देशप्रेमी असतात असे म्हणणे फारच धाडसाचे आहे. पण हासुद्धा मुद्दा माझ्या दृष्टीने गौण आहे आणि मला तो या लिखाणात सांगायचा नाही. बुद्धिमान माणसे ही इतर बुद्धिमान नसलेल्या माणसांपेक्षा फारच जास्त नैतिक, प्रामाणिक, सेल्फलेस असतात असे अॅफेडेव्हिट करून मी पुढे लिहितो. 

[असे इतरही अनेक मुद्दे आहेत. उदा. (1) याच देशातील कोट्यवधी निर्बुद्ध निरक्षरांनी अत्यंत शहाणपणाने विद्वानांच्या शायनिंग इंडियाला केराची टोपली दाखवून रक्ताचा एक थेंबही न सांडता क्रांती केली. (2) महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचा ठेवा मौखिक परंपरेतून जतन करून आपल्यापर्यंत पोचवला. याच काळात बुद्धिमान लोक पेशवाईत दक्षिणा गोळा करत होते नाहीतर इंग्रजांची कारकुनी करण्यात आत्मोद्धार करत होते. (3) मैसूरच्या 21 वर्षांच्या मुलीला कोठलीतरी बँक किंवा म्युच्युअल फंड 3 कोटी रु. वार्षिक पगार देऊन नोकरी देते तेव्हा तिने 2 कोटी रुपयांच्या बजाज अलियांझच्या माणसावर आपल्या बुद्धिमत्तेने कुरघोडी करणे अपेक्षित नसते का? (4) बुद्धिमत्तेला सर्वोच्च स्थान देणाऱ्या अमेरिकेची आज काय परिस्थिती आहे ते आपण पाहतोच. या देशातील माणसांचे शारीरिक मानसिक आरोग्य वगैरे तर सोडाच पण त्यांचे वाणसामानाचे हिशेब ठेवायलासुद्धा त्यांना आपल्या देशातून कारकुंडे आयात करावे लागतात. असले सगळे मुद्दे आपण सोडून देऊ.] 

जवळजवळ सर्वच जातींतून आता बऱ्यापैकी प्रमाणावर शिकले सवरलेले लोक तयार होऊन सर्वच विखुरलेले आहेत. आणि सर्वच जातींतले बुद्धिमान लोक साधारणपणे त्याच एकाच प्रकारचे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो. (विविधता में एकता!) 

हा देश ज्या आणि जशा लोकांचा आहे त्या आणि तशा (बऱ्यावाईट) आणि तशाच प्रकारे तो रिप्रेझेंट व्हायला नको का? प्रादेशिक पक्षांची गुंडगिरी, खासदारांचा घोडेबाजार वगैरे सगळे हे लहानात लहान माणसाला मत देण्याचा जो अधिकार घटनेने दिलेला आहे त्याचे अल्टिमेट फलित आहे आणि ते कितीही घाणेरडे वाटले तरी (ते तसेच आहे म्हणून, त्या माणसांना तितक्या माणसांनी जे सुद्धा भारतीयच आहेत, मते दिली आहेत म्हणून) अनिवार्य आहे. चांगल्या वाईटाचा येथे प्रश्नच कोठे येतो. 6% पेक्षा कमी मिळणाऱ्या लोकांना पुसून टाकायचे! मेघालय आणि मणिपूरचा विकास कसा होणार? (भीक देणार की काय तुम्ही त्यांना. ते भारतीय नाहीत?). तिथल्या राजकीय पक्षांनी स्वतःला काँग्रेस नाहीतर भाजपाच्या दावणीला बांधून घ्यायचे? मुस्लिम लीगची एखादीच सीट लोकसभेत असते, तिलाही हाकलून द्यायचे? अर्धा टक्के भारतीयांचे मत मिळवणाऱ्या पक्षाची वर्थ काहीच नाही? वी नो बेस्ट (We know best ) हा बुद्धिमंतांचा ॲरोगन्स अजब आहे पण हा सुद्धा मुद्दा आपण सोडून देऊ. 

समजा एक नोकरीतली जागा भरायची आहे. दोन उमेदवार आहेत. एकाचे शस्त्र आहे बुद्धिमत्ता. (त्याला चांगले मार्क मिळाले आहेत) आणि दुसऱ्याचे शस्त्र आहे समजा जात. (म्हणजे याच्या जातीचे लोक डिसाइडिंग पोझिशन्स्वर आहेत) मग हा मुकाबला आपण इतका गैर का समजतो? दोघांनी आपली शस्त्रे जमतील तशी वापरायची. बुद्धिमत्तेमुळे नोकरी मिळाली तर ते नैतिक आणि जातीमुळे मिळाली तर ते निंद्य (जातीयवादी) असे आपण का म्हणायचे. बुद्धिमत्तेला नैतिकपणाची पुरवणी आपोआपच कशी जोडली जाते? 

एका गुंडाने (अबुद्धिमान) एका माणसाच्या पोटावर चाकू ठेवून 5000 रु. मागितले तर ती गुन्हेगारी आणि दुसऱ्या सर्जनने गरज नसताना एकाच्या पोटावर सुरी चालवून 5000 रु. मिळवले तर ते कायदेशीर कारण तो बुद्धिमान आहे ना. खरेतर कालपरवाच केलेली मराठ्यांची याच (प्रथम) प्रकारची मुलुखगिरी हा आपल्या मराठी समाजाचा जाज्वल्य अभिमानाचा ठेवा आहे (इकडे इस्तंबूल थरारे तिकडे बंगाल!) 

वरीलसारखी अनेक उदाहरणे सांगता येतील आणि व्यावहारिक पातळीवर त्यांचा प्रतिवाद अगदी सहजपणे करता येईल हे मला कळत नाही असे नाही. पण मला जो मुद्दा सांगायचा आहे तो कोणाला तरी समजेल अशी मला आशा आहे. बुद्धिमत्तेचे भयानक प्रमाणावर केले गेलेले उदात्तीकरण हे आजच्या भारतीय समाजाचा विचार करता अनडेमोक्रॅटिक आहे असे मला वाटते. 

बुद्धिमत्तेचे भयानक प्रमाणावर केले गेलेले उदात्तीकरण अनडेमोक्रॅटिक आहे आणि याच अनुषंगाने बुद्धिमत्तेच्या स्वैर आणि स्वार्थी वापराला आपोआप मिळणारे नैतिक अधिष्ठान निंद्य आहे, देशविघातक आहे. सामान्यांवर आपोआप अन्याय करणारे तर आहेच आहे. 

नवा पूल, नाईक आणि कंपनीसमोर, कोल्हापूर. 

[लेखक – कोल्हापुर येथील एक वैद्यक व्यवसायी, सामाजिक भाष्यकार आहेत. ] 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.