मराठी साहित्यविश्व : एक विश्लेषण 

मराठी साहित्यविश्व एका अरिष्टात सापडले आहे. बहुतांश लेखनामध्ये कसदारपणा नाही आणि मोजक्याच चांगल्या साहित्याला वाचक नाहीत. या पार्श्वभूमीवर राजा पिंपरखेडकर यांनी मराठी साहित्याचे परखड मूल्यमापन केले आहे (संदर्भ: ‘उदंड आनंदाचा सोहळा’, सत्याग्रही विचारधारा, दिवाळी अंक, 2006) त्याच दरम्यान वसंत आबाजी डहाके यांचा (संदर्भ: ‘स्वातंत्र्यानंतरचे मराठी साहित्य एक लेखाजोखा’, लोकमत दिवाळी अंक, 2006) लेख आला. त्यानंतर साधना साप्ताहिकातून राजन खान (संदर्भ: यथा प्रकाशक तथा लेखक’ व ‘हा गाडा ओढणं थांबवलं पाहिजे!’ हे दोन लेख 3.2.2007 चा अंक) व पंकज कुरुलकर (संदर्भ: ‘म्हणून स्वतःबद्दल लाज वाटते’, हा लेख 14.4.2007 चा अंक) यांनी मराठी साहित्या विश्वाची चिरफाड केली आहे. 

खरे पाहता प्रकाशकांवर जे गंभीर आरोप केलेले आहेत, त्यांच्यापैकी कोणीतरी त्यांचा प्रतिवाद करायला हवा होता. परंतु मराठी साहित्यविश्वामध्ये उपेक्षा करण्याची थोर परंपरा असल्यामुळे त्यांनी उत्तर देणे सोईस्करपणे टाळले असावे, असो. 

प्रकाशकांवर त्यांनी केलेले आरोप बहुतांश खरे आहेत. ज्या लेखकांच्या भरवशावर त्यांचा धंदा चालतो त्यांना मानधन न देता त्यांची पुस्तके त्यांच्याकडूनच पैसे घेऊन छापणे, प्रथितयश लेखकास मानधन द्यावे लागल्यास, ते अतिशय तुटपुंज्या स्वरूपात नाइलाजाने देणे, परंतु पुस्तकविक्रेत्यास भरमसाठ सवलत देऊन स्वतः ही भरमसाठ नफा कमाविणे हे त्यांचे धंद्याचे ब्रीद आहे. स्वतःच्या घरावर मजले चढविले जातात तरीही लेखकाने पुस्तकाचे मानधन मागितल्यास धंद्यामध्ये किती मंदी आहे, याचे निरंतर रडगाणे प्रकाशक गात असतात. लेखकांसाठी लेखनव्यवसाय हा आतबट्ट्याचा व्यवहार झाला. आहे. आजच्या बहुतांश लेखकांचा लेखन हा उदरनिर्वाहाचा मुख्य व्यवसाय नाही म्हणूनच बरे, अन्यथा शेतकऱ्यांसारख्या लेखकांच्याही आत्महत्या झाल्या असत्या ! आणि साहित्य, शेती उत्पादनासारखे जीवनासाठी अत्यावश्यक नसल्यामुळे हाकबोंबही झाली नसती. 

कोणत्याही साहित्यव्यवहाराचे लेखक, प्रकाशक व वाचक हे तीन प्रमुख घटक असतात. मराठी भाषक साहित्यविश्वाचे विश्लेषण करताना अर्थातच फक्त प्रकाशकांना दोष देऊन चालणार नाही. संबंधित सर्व घटकांचा सम्यक अभ्यास करावा लागेल. तेव्हाच सध्या जी परवड झाली आहे तिचे यथार्थ आकलन होईल. (प्रकाशकांचा मुद्दा निघाला म्हणून मी प्रथम स्पष्ट करतो की, माझ्या व माझ्या पत्नीच्या 5-6 पुस्तके / पुस्तिका प्रकाशित करण्याच्या निमित्ताने माझा काही प्रकाशकांशी संबंध आलेला आहे. प्रकाशनामधील चाल- ढकल सोडल्यास मला स्वतःला काही फारसा वाईट अनुभव आला नाही. कोणत्याही पुस्तकासाठी प्रकाशकाला पैसा द्यावा लागला नाही. अर्थातच प्रकाशकांकडून मानधनाची अपेक्षाही केली नसल्यामुळे ते मिळण्याचा प्रश्नच नव्हता.) 

मराठी भाषा ही जगातील पहिल्या प्रमुख 20 भाषांमध्ये गणली जाते (संदर्भ: मराठी विश्वकोश वार्षिकी 2005, विकीपीडिआ, एथ्नोलॉग) मराठी भाषकांची संख्या 7 कोटी आहे व तिचा 19 वा क्रमांक आहे. एक भाषा म्हणून फ्रेंच व जर्मन भाषकांएवढी जवळपास तिची संख्या आहे. पंरतु इंग्रजीएवढा तर सोडाच फ्रेंच व जर्मन भाषेच्या तुलनेमध्येही नगण्य असाच तिचा प्रभाव आहे, ही वस्तुस्थिती आहे. 

प्रकाशनविश्व- 2007 च्या आकडेवारीनुसार 2006 साली एकूण 676 पुस्तके छापली गेली. सर्वच पुस्तकांची नोंद तेथे होत नसल्यामुळे अनधिकृत आकडेवारीनुसार (संदर्भ: राजन खान) दरवर्षी 1200 पुस्तके प्रकाशित होतात, असे आपण मानू या. मराठीतील पुस्तकांच्या खपाची कोणतीच आर्थिक आकडेवारी उपलब्ध नाही. हा खप 15 कोटी ते 100 कोटी रुपये इतका असल्यास (संदर्भ: पंकज कुरुलकर) यापैकी नवीन पुस्तकांचा वाटा किती असू शकेल याचा आपण काहीतरी अंदाज करू शकतो. मराठीतील 1000 प्रतींची एक आवृत्ती खपायला साधारणतः 4.5 वर्षे लागत असल्यामुळे दरवर्षीच्या उलाढालीपैकी या नवीन पुस्तकांच्या खपाचा वाटा (1200 पुस्तके 250 प्रती रु. 100/- सरासरी किंमत) 3 कोटी रुपये इतकाच येतो. मराठीतील संभाव्य वाचकसंख्या 5 कोटी आहे (न वाचता येणारी बालके सोडून) असे मानल्यास पुस्तक खपाचा संपूर्ण टर्नओव्हर दरडोई दरवर्षी रु. 3 ते 20 व नवीन पुस्तकांचा यात वाटा फक्त 60 पैसे इतकाच आहे. सिनेमा या माध्यमावर दरडोई दरवर्षी रु. 100 चा खर्च होत असेल या अनुमानाने मराठी लोकांची बाजारपेठ 500 कोटी रुपये आहे. तितकाच किमान खर्च पुस्तकांवर झाला तर ही बाजारपेठ रु. 500 कोटी इतकी विस्तारू शकेल. 

मराठी पुस्तकांना पुरेसा वाचकच नाही ही वस्तुस्थिती आहे व याला जबाबदार मराठी प्रकाशक व लेखक आहेत हे नाकारून चालणार नाही. त्यांपैकी लेखक आपली जबाबदारी पार पाडत नाही, हे येथे खेदाने नमूद करावे लागते. प्रकाशकांपेक्षा लेखकांची पुस्तकाच्या खपासंबंधी जास्त जबाबदारी आहे, हे प्रथमदर्शनी वास्तववादी वाटत नसले तरी त्यात तथ्य आहे. प्रकाशक हे नफ्यासाठीच व्यवसाय करतात. पुस्तके छापली गेली नाहीत तर ते धंदा बदलतील किंवा फक्त शैक्षणिक पुस्तके, गाईडस् छापतील. परंतु धंदा कधीही तोट्यात चालविणार नाहीत. त्यामुळे प्रकाशकांसाठी प्रकाशनव्यवसाय हा कधीच आतबट्ट्याचा व्यवहार होऊ शकत नाही. परंतु लेखकांसाठी ही परिस्थिती वेगळी आहे. लेखन हा त्यांच्यासाठी अभिव्यक्तीचा प्रश्न असतो. ते त्यांचे सत्त्व असते म्हणूनच ते लेखन तळमळीने करतात यात शंका नाही. लेखक जे काय लिहितो ते वाचण्यासाठी वाचकच नसेल तर त्याच्या अभिव्यक्तीला काही अर्थच उरत नाही. त्यामुळे पुस्तकप्रकाशन हा त्याच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न असतो. (लेखकाची ही तीव्र निकड समजूनच प्रकाशक त्याला नाडू शकतात) म्हणून पुस्तकप्रकाशनासाठी प्रसंगी आर्थिक झीज सोसायला तो तयार होतो. लेखक आर्थिक झीज सोसून पुस्तके प्रकाशित करतात, हे त्यांच्या आत्मप्रौढीचा आटापिटा आहे असे आपण मानले तर (थोड्या प्रमाणात हे खरेपण आहे. काही व्यक्ती दुसऱ्याला मोबदला देऊन स्वतःच्या नावावर लेखन करून घेतात व त्याला कधीकधी शब्दांकन असे गोंडस नाव देतात, तर कधी कधी तेवढेही श्रेय मूळ लेखकाला देत नाहीत.) समाजामध्ये लेखक हे लोकसंख्येच्या प्रमाणात नगण्य असले तरी त्यांची निव्वळ संख्या भरीव आहे. प्रकाशनविश्व-2007 मध्ये 1500 लेखकांची नावे नोंदविलेली आहेत. राजन खान यांच्या लेखामध्ये ही संख्या एक लाख असल्याची नोंद आहे. त्यांपैकी ज्यांचे किमान एकतरी पुस्तक / पुस्तिका प्रकाशित झाले आहे अशा लेखकांची संख्या तीस ते चाळीस हजार असू शकते. 

मला हा मुद्दा मांडायचा आहे की, लेखक म्हणून आमची आजची संख्या 30 हजार ते 1 लाख आहे. आम्ही पदरमोड करून आमचे एकतरी पुस्तक प्रकाशित केले आहे. त्याच्या 500-1000 प्रती आमच्या घरी किंवा प्रकाशकाच्या गोदामामध्ये कुजत ठेवण्यापेक्षा त्याला वाचक लाभावेत अशी आमची इच्छा असेल तर ते कोणीतरी विकत घेणे हे त्याचे भागधेय असायला हवे. लेखक हा स्वतः वाचक असतो किंवा अटळपणे तो तसा असायला हवा (तसे जगामध्ये काहीच अटळ नसते. ऐतिहासिक अटळतेचे काकण बांधलेला साम्यवादही कोसळला हे आपण आपल्या डोळ्यांनी बघितले. तांत्रिकदृष्ट्या असाही लेखक राहू शकतो की ज्याने जीवनामध्ये दुसऱ्या लेखकाचे काहीच वाचलेले नाही) येथेच पुस्तक खरेदीसंबंधी त्याची महत्त्वाची भूमिका आहे. स्वतः पुस्तके विकत न घेता लेखक फक्त ग्रंथालयातील पुस्तकाच्या भरवशावर वाचनाची निकड भागवत असेल तर त्याला पुस्तकांचा खप होत नाही अशी ओरड करण्याचा काहीच नैतिक अधिकार नाही. अशामुळे पुस्तकांचा खप एका मर्यादेपलीकडे वाढत नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

तर लेखकांनी पुस्तके विकत घेऊन वाचण्याची आपली जबाबदारी योग्यपणे पार पाडल्यास सध्याच्या 15 कोटी ते 100 कोटीच्या उलाढालीत किती लक्षणीय बदल होऊ शकतो याची जाणीव आपणास होते. लेखकाने अभ्यासासाठी, व्यासंगासाठी पुस्तके विकत घेणे ही स्वतःची नैतिक जबाबदारी समजून वर्षाला किमान 4 ते 5 हजार रुपयांची मराठी पुस्तके विकत घ्यावीत ही माझी आपल्या बांधवाकडूनची अपेक्षा अवास्तव नाही. आज कित्येक लेखक यापेक्षा कितीतरी जास्त खर्च पुस्तकखरेदीवर करतात. मोबाईल फोनचे उदाहरण घ्या. सध्या मोबाईल कंपन्यांचे 15 कोटी ग्राहक असून त्यांचे प्रत्येक ग्राहकापोटी सरासरी वार्षिक उत्पन्न 4000 रुपये आहे. मराठी लेखकांचा मोबाईलवर सरासरी जितका खर्च होतो तितका त्यांनी वाचनावर करून दाखविला तर त्यांचे साहित्याप्रतीचे प्रेम व तळमळ सिद्ध होईल. 

तर मुद्दा असा की, रु.4000 या हिशेबाने निव्वळ लेखकांची वाचक म्हणून बाजारपेठ 12 कोटी ते 40 कोटी रुपये राहू शकते आणि कोणीही सुज्ञ व्यक्ती जे लेखक- तेच वाचक यांचीच फक्त बाजारपेठ आहे असे समजून चालत नाही. त्यामुळे बाजारपेठेच्या कक्षा रुंदावतील हे सांगण्यासाठी काही ज्योतिष्यांची आवश्यकता नाही. 

दुसरा मुद्दा असा की, ज्या वाचकांच्या आपुलकीवर व प्रेमावर लेखकांचा लेखन- व्यवहार चालतो त्यांच्याबद्दलची लेखकांची खरी निष्ठा दिसून येत नाही आणि तरीही लेखक सर्वसामान्य वाचकांकडून खूपच अपेक्षा बाळगतो. हा मुद्दा मी याच्यासाठी मांडतो की किती लेखक वाचकांच्या पत्रव्यवहाराला प्रतिसाद देतात? आणि तसे होत नसेल तर वाचकांनी तरी साहित्यावर मनापासून प्रेम का करावे? हे मी समजू शकतो की, लेखकांना जगण्याचे, व्यवसायाचे इतर व्याप असल्यामुळे वाचकांच्या पत्रांना त्यांना सविस्तर उत्तर देणे जमू शकणार नाही. परंतु आज कॉम्प्युटर, इंटरनेट व फोटोकॉपीचा जमाना असल्यामुळे लेखकाला आलेल्या प्रत्येक पत्राची दोन ओळींची पोच देऊन त्याची किमान दखल घेणे अशक्य नक्कीच नाही. वयोवृद्ध असलेले प्रा. ग. प्र. प्रधान, प्रा. देवदत्त दाभोलकर जर वाचकांच्या पत्राला उत्तर पाठवू शकतात तर तुलनेने तरुण असलेल्या इतर लेखकांना दोन ओळीचे पत्रोत्तर देणे जमत नसेल तर तो त्यांच्या मनाचा कोतेपणा नसेल, तर दुसरे काय असेल? 

येथे मी माझा स्वतःचा अनुभव मांडतो. मी गेल्या कित्येक वर्षांपासून निरनिराळ्या लेखकांना त्यांच्या साहित्याच्या संदर्भात पत्रे पाठवीत असतो. विचारांचे आदान-प्रदान व्हावे म्हणून माझ्या खर्चाने माझ्या लेखांच्या पुस्तिकेच्या प्रती पाठवीत असतो. आजतागायत त्यातील फारच कमी लेखकांचा मला प्रतिसाद लाभला आहे. (परंतु ज्या थोड्यांचा प्रतिसाद लाभला आहे त्यांच्या बरोबरच्या वैचारिक संवादाने मी समृद्ध झालो आहे.) एका प्रथितयश पुरोगामी विचारवंताचा अनुभव तर उल्लेखनीय आहे. त्यांचा एक वैचारिक ग्रंथ मराठीतील अग्रगण्य प्रकाशनाने छापला आहे. पण त्यावर प्रकाशनाचे साल छापलेले नाही. मी वैचारिक लेखन करताना साधारणपणे संदर्भ देण्याचे कटाक्षाने पाळतो. त्यांच्या ग्रंथाचा संदर्भ म्हणून मला उपयोग होणार असल्यामुळे त्यांना माझी एक पुस्तिका पाठवून त्यांच्या ग्रंथाविषयी अभिप्राय कळविला व त्यांना ग्रंथप्रकाशनाचे वर्ष कळविण्याबद्दल विनंती केली. आजतागायत त्यांच्याकडून पत्राचे उत्तर आले नाही. असाच एक अनुभव माझ्या एका प्रथितयश लेखकमित्राला आला. त्यांनीसुद्धा दुसऱ्या एका प्रथितयश सामाजिक कार्यकर्त्याला त्यांच्या खूपच गाजलेल्या अहवालाच्या प्रकाशनवर्षाविषयी विचारणा केली. त्यांनासुद्धा त्याचे उत्तर मिळाले नाही, असे त्यांनी मला सांगितले. नुकताच साधना साप्ताहिकातील गोविंद तळवलकर व डॉ. सदानंद मोरे यांचा ‘लोकमान्य ते महात्मा’ या द्विखंडात्मक ग्रंथासंबंधीचा वाद काय दर्शवितो? (माझे स्वतःचे या ग्रंथासंबंधीचे मत चांगले आहे). तळवलकर यांनी निश्चित संदर्भ न देणे, पानांचे क्रमांक देऊन अवतरणे न देणे याबद्दल मोरे यांच्यावर ठपका ठेवला आहे. या वादामध्ये या विशिष्ट मुद्द्यांसंबंधी माझे मत तळवलकर यांच्या बाजूने आहे. 1100 पृष्ठांच्या वैचारिक ग्रंथामध्ये तो निव्वळ डॉक्टरेटचा प्रबंध नाही म्हणून पृष्ठक्रमांकाचा संदर्भ दिला नाही हे मोरे यांचे समर्थन (संदर्भ ‘तळवलकरांचे द्वेषोपनिषद’ साधना: 21.4.2007) निव्वळ वकिली थाटाचे आहे. आपले कोठे चुकले आहे यासंबंधी त्यात कोठेही आत्मपरीक्षण नाही. 

आता सर्वांत शेवटी मला एका गंभीर मुद्द्याकडे वळायचे आहे आणि हा मुद्दा मराठी साहित्याच्या गुणवत्तेसंबंधी आहे. येथे मी मराठी साहित्याचे दोन सर्वसामान्य भाग पाडतो- (1) ललित साहित्य (2) वैचारिक साहित्य. मी स्वतः ललितलेखन करत नाही, परंतु वाचक म्हणून मी त्या साहित्याचा आस्वाद घेत असतो. ललित साहित्याचे मूल्यमापन करण्याइतका माझा साक्षेपी अभ्यास पण नाही म्हणून मी फक्त वैचारिक साहित्याचे सविस्तर मूल्यमापन करेन. 

तरीही एक मुद्दा म्हणून ललितसाहित्याबद्दलचा एक अभिप्राय मी येथे नमूद करेन. कोणत्याही चांगल्या ललितलेखकामध्ये तरल संवेदनशीलता तर असतेच. तो दोन प्रकारे सरजनशील अनुभव घेत असतो. एक तर प्रत्यक्ष हिंडून, निरीक्षण करून, समानाभूती बाळगून व दुसरे घटनांचा सम्यक अभ्यास करून. पण कोणत्याही प्रकारातून सर्जनशील अनुभव घेतला तरी त्याचा जो अन्वयार्थ तयार होतो तो होण्यामागे त्याचा एक सैद्धान्तिक दृष्टिकोण असतो. एक जीवनदृष्टी असते. त्या दृष्टिकोणातून तो घटनांकडे, साहित्यकृतीच्या विषयाकडे बघत असतो. घटना व सैद्धान्तिक दृष्टिकोण यांमध्ये एक गतिशील संबंध असतो. दोन्ही एकमेकांना घडवत असतात. मथितार्थ हा की कोणताही सर्जनशील अनुभव घेण्याची चांगल्या ललित लेखकाची कुवत असली तरी त्याची सैद्धान्तिक बैठकसुद्धा भक्कम असावी लागते. आजचे जे ललित लेखक उत्तम साहित्यिक आहेत त्यांची सैद्धान्तिक समजसुद्धा चांगली आहे, हा काही निव्वळ योगायोग नाही. आजच्या हयात ललित लेखकांपैकी, विंदा करंदीकर, विजय तेंडूलकर, भालचंद्र नेमाडे यांच्यापासून रंगनाथ पठारे, मिलिंद बोकील, नंदा खरे, राजन खान, मकरंद साठे, अरुणा ढेरे, नामदेव ढसाळ व इतर पुष्कळ, या सर्वांची सैद्धान्तिक बैठक भरभक्कम आहे, हे काही उगाचच नाही. यांतील काही जणांचे साहित्य निव्वळ त्याचे भाषांतर न झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले जात नाही हे मराठी भाषेचे दुर्दैवच! 

मराठीतील वैचारिक वाङ्मयामध्ये कसदारपणाचा अभाव का असतो, हा कळीचा प्रश्न आहे. बहुतांश वैचारिक लेखन हे अजूनही इतिहासात रमणारे आहे. संतवाङ्मय, पौराणिक व मध्ययुगीन व्यक्तिमत्त्वे यांमध्ये आम्हाला नको तितका (म्हणजे कधी कधी उबग यावा इतकासुद्धा) रस आहे. म्हणजे हे सर्व टाकाऊ आहे असे माझे मत नाही. पण आजच्या युगामध्ये त्यांची प्रासंगिकता तपासून व त्यातील वैश्विक घटकांचा स्वीकार करूनच त्यांचा पुरस्कार केला पाहिजे असे मला वाटते. 

काही काही वैचारिक लेखन आधुनिक काळाशी (गेल्या 200 वर्षांचा कालखंड) संबंधित असते, परंतु त्यातही आमचे लेखक, कार्ल मार्क्स, सिग्मंड फ्राइड, चार्ल्स डार्विन, फ्रीड्रिख नीत्शे, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बड रसेल, अल्बर्ट आइन्स्टाइन, मानवेन्द्रनाथ राय इ. यांच्या पलिकडे इतर विचारवंतांचा विचार करायला तयार नाहीत. हे सर्व विचारवंत थोर होते यात काही शंकाच नाही. त्यांच्याच खांद्यावर उभे राहून आपण भविष्याचा वेध घेऊ शकलो आहोत परंतु वास्तव हे आहे की यातील काही विचारवंतांची कारकीर्द संपून 100 वर्षे लोटली आहेत तर काहींची कारकीर्द 1950 च्या आसपास संपली आहे. म्हणजे त्यालाही आता 50-60 वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर काळ खूप झपाट्याने बदलला आहे. त्यामुळे या सर्व थोर विचारवंतांची प्रासंगिकता एकविसाव्या शतकाच्या आह्वानांच्या संदर्भात तपासून पाहावी लागणार आहे. 

येथे एकच उदाहरण देतो. महात्मा गांधीचे हिंद स्वराज्य या पुस्तकाची जन्मशताब्दी आता लवकरच (2009) साजरी होणार आहे. त्यांचे हे छोटेखानी पुस्तक इतक्या सोप्या भाषेत लिहिलेले आहे की काही समीक्षकांना ते चक्क बाळबोध वाटू शकेल, त्यात काही मूलगामी विचार नाही असाही समज होऊ शकेल. वसंत पळशीकरांनी त्या पुस्तकाला अप्रतिम प्रस्तावना लिहून त्यातील मूलगामी विचारांची प्रासंगिकता समजावून सांगितली आहे. (संदर्भ: ‘हिंद स्वराज्य’चे पुनः प्रकाशन: काळाची गरज’, हिंद स्वराज्य, परंधाम प्रकाशन, 1990) वैचारिक साहित्याचा हा उत्कृष्ट नमुना आहे. आजचे पुष्कळसे वैचारिक लेखन क्लिष्ट स्वरूपाचे असते. उगाचच विद्वत्तेचा आव आणणारे असते. जनसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिलेले साहित्यसुद्धा मूलगामी, प्रासंगिकता असलेले असू शकते हे ‘हिन्द स्वराज्य’च्या निमित्ताने अधोरेखित झालेले आहे. 

आजचे मराठी वैचारिक लेखन अप्रासंगिक आहे असेही नव्हे. जागतिकीकरण, सांप्रदायिकता, जातवास्तव, सध्याचा आर्थिक-राजकीय पेचप्रसंग इत्यादी प्रासंगिकतेचे मुद्दे मराठी लेखकांनी चांगल्याप्रकारे हाताळले आहेत. परंतु हे काही पैलू सोडले तर इतर अनेक पैलूंवर आपली भूमिका घासून पुसून तपासून मांडावी लागते याची गंधवार्ताही वैचारिक लेखनात असू नये ही खेदजनक परिस्थिती आहे. 

मी जागतिकीकरणाचा पुरस्कर्ता नसूनही विचारांच्या क्षेत्रामध्ये जागतिक परिप्रेक्ष्याचा समर्थक आहे. (संदर्भ: माझा लेख, ‘समाजपरिवर्तनाची पुढील दिशा’ नवभारत मासिक, डिसें.2006 जाने.2007) जागतिक पातळीवर विशेषतः इंग्रजी वैचारिक वाङ्मयामध्ये आज काय दिसते? जीवनाच्या विविध पैलूंवर आज खूप मूलभूत वैचारिक घुसळण सुरू आहे. ज्यामध्ये अनेक मूलभूत वाद आहेत. सैद्धान्तिक भूमिका आहेत. अनेक नवीन आंतरशाखीय शास्त्रांची, विषयांची मांडणी आहे. या सर्वांचा आवाका किती मोठा आहे हे समजावून घेण्यासाठी त्यातील काहींचा खाली उल्लेख करतो. 

1) हे विश्व एक आहे की अनेक विश्वांचा हा समूह आहे. (बहुविश्वाची संकल्पना), विश्वाची निर्मिती कशी झाली, विश्वाचे नियम काय आहेत, विश्वाचे नियम अब्जावधी वर्षांपासून कायम आहेत की त्यांना उत्क्रांतीचा सिद्धान्त लागू असून ते काळानुसार बदलत आले आहेत, विश्वाची रचना हेतुमूलक सुबुद्ध (बुद्धिपूर्वक) आहे काय, मन हे विश्वाच्या रचनेतच अनुस्यूत आहे काय, रचना किती अनिवार्य असतात, त्यांमध्ये यदृच्छा/ आकस्मिकतेची काय भूमिका असते, विश्वाच्या रचनेमध्ये सापेक्षतावाद व पुंजयामिकीची काय भूमिका आहे, पुंजयामिकीचा तत्त्वज्ञानात्मक अर्थ काय आहे, विश्वाचा कोणी निर्माता आहे काय? विश्वनिर्मितीमध्ये ईश्वराची भूमिका. 

2) सजीवसृष्टी कशी निर्माण झाली, सजीव कोणाला म्हणावे, उत्क्रान्ती खरोखरच घडली आहे काय, उत्क्रान्तीचे नियम काय आहेत. ती हेतूमूलक आहे काय, सजीवांच्या उत्क्रान्तीमध्ये संघर्षाची आणि सहकाराची भूमिका, सजीव व भोवतालची परिस्थिती यांमधील परस्परसंबंध, परस्परक्रिया यांचे गतिशास्त्र, परग्रहावर जीवसृष्टी उत्क्रान्त झाली काय? त्याच्या उत्क्रान्तीचे संभाव्य नियम काय असू शकतात? 

3) कोलाहलशास्त्र, जटिलताशास्त्र, स्वयंसंघटनेचे सूत्र, कृत्रिम बुद्धिमत्ता, भविष्यातील सजीवांच्या रचनेचे व निर्मितीचे (बुद्धिमान सजीव व यंत्र यांची सरमिसळ होऊन नवीन रचना व तिची उत्क्रांती) गतिशास्त्र. 

४)मानवी स्वभाव कसा घडतो. प्राण्यांच्या व माणसाच्या स्वभावरचनेमध्ये काही समान सूत्रे आहेत काय, स्वभाव महत्त्वाचा की संगोपन महत्त्वाचे, स्वभावरचनेमध्ये जनुकांची व पर्यावरणीय घटकांची भूमिका, उत्क्रान्ती मानसशास्त्राच्या सिद्धान्ताची प्रासंगिकता, हिंसा, आक्रमकता, युद्ध यांची समस्या, स्त्री-पुरुष समानतेचा प्रश्न. 

5) जाणीव, स्वजाणीव, आत्मभान, जाणीव कशी निर्माण होते, ईहा (फ्री विल) की नियतिवाद, मन कसे कार्य करते. मन व शरीर यांची परस्परक्रिया, ज्ञानमीमांसात्मक समस्या, तत्त्वमीमांसात्मक संकल्पना. 

6) ईश्वर व धर्माचा उगम, धार्मिक मूलतत्त्ववाद, देवाच्या प्रभावासाठी काही विशिष्ट जनुके किंवा मेंदूस्थिती (गॉड जीन, गॉड मॉड्यूल) कारणीभूत आहेत काय, धर्माच्या प्रभावाची काही केन्द्रे मेंदूमध्ये आहेत काय, चेताधर्मशास्त्र, आस्तिकता, नास्तिकता, अज्ञेयवाद (मी स्वतः नास्तिक व इहवादी आहे, परंतु कार्ल पॉपरच्या थिअरी ऑफ फॉल्सिफियाबिलिटी (theory of falsifiability) एका मर्यादेमध्ये मला मान्य असल्यामुळे जोपर्यंत सिद्धान्त खोटा ठरविण्याचा पुरावा मिळत नाही तोपर्यंत ती सत्य असते यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे अंतिम सत्य नावाची गोष्ट नाही. सर्व सत्ये ही एका अर्थाने अंतरिम असतात, म्हणून देव-धर्मासंबंधीचे नवे संशोधन मी खुल्या मनाने तपासत असतो, अभ्यासासाठी मी कोणताही अस्सल विषय वर्ज्य मानत नाही. 

7) नैसर्गिक विज्ञान व सामाजिक विज्ञान यामधील परस्परसंबंध, आंतरशास्त्रीय अभ्यासविषयांची मांडणी व घडण वास्तव समजून घेण्यामध्ये यांची भूमिका, मूलभूतवाद (Reductionism) व साकल्यवाद (Holism) यांची वास्तव समजून घेण्यामध्ये भूमिका व त्यांचे परस्परसंबंध. 

8) पर्यावरणवाद, जैवविविधता, जागतिक तापमान वाढ, ऊर्जा व प्रदूषणाची समस्या, शाश्वत विकास व रोजगार निर्मिती, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, आधुनिक शेतीसमस्या, उत्पादनक्षेत्र व सेवाक्षेत्र यामधील विषय हितसंबंध, आधुनिक भांडवलशाहीच्या समस्या, त्यांचे गतिशास्त्र. 

9) आधुनिक समाजजीवन, आजची राजकीय-सामाजिक-आर्थिक रचना, दहशतवादाची समस्या, देशीवाद, स्वदेशी चळवळ, लोकशाहीचे सूत्र, सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया व तिचे गतिशास्त्र, जातभेद, वंशभेद, धर्मभेद यांचा प्रतिकूल परिणाम कसा कमी करता येईल. सांस्कृतिक बहुविधता, नवीन जागतिक संस्कृतीचा उदय. 

या व इतर सर्व विचारांना आह्वानांना स्पर्श करणारे आजच्या आघाडीच्या (विद्यमान) विचारवंत व वैज्ञानिकांपैकी काहींची नावे मी येथे नमूद करतो.. 

स्टिव्हन वीनबर्ग, मार्टीन रिज, फ्रीमन डायसन डेव्हीड डस्य, पॉल डेव्हिज, फ्रिझोफ्फ कॅप्रा, रिचर्ड डॉकीन्स, मरे गेलमन, व्ही. रामचंद्रन, स्टिव्हन पिंकर, ड नियल डेनेट, केनान मलिक, नोम चॉम्स्की, मेरी मिडम्ले, सॅम हॅरिस, मायकेल शर्मर, होवार्ड ब्लूम, होवार्ड गार्डनर, कॉलीन मॅकजिन, इल्या प्रिगोगाईन, एरिक स्नाईडर, अमर्त्य सेन, रे कुर्झवेल, रॉबर्ट सॅपोलस्की, सुसान ब्लॅकमोर, डेव्हीड बस, जरैड डायमंड, स्टुअर्ट कुफमन, लिओनार्ड सुसकाइंड, निकोलस हम्प्रे, ब्रायन गुडविन, केव्हीन केली, ली स्मोलिन, रॉबर्ट राईट, जॅक कोहन, इयॅन स्टीवर्ट, स्टीव्हन रोज, पास्कल बॉयर, हेझेल हेन्डरसन, स्टुअर्ट सीम, स्टीव्ह ग्रॅन्ड, जॉर्ज मान्वियाट, रायने एस्लर, मार्विन मिन्स्की, स्कॉट अॅटून, ब्रायन ग्रीन, वुल्फेंग सॅक्स, थॉमस नगेल, इ.ओ. विल्सन, जोएल गॅराऊ, एडवर्ड गोल्डस्मिथ, मासानोबू फुफुओका, जर्मेन ग्रीअर, मीरा नंदा, बार्ट कास्को, थिओडोर रोझॅक, जेम्स लवलॉक, लिन मालिस, जॉर्ज सुदर्शन इत्यादी.. 

ही यादी अजून खूप वाढविता येईल. या यादीमध्ये काही नोबेल पारितोषिक विजेते पण आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की मी आधी उल्लेख केलेल्या थोर विचारवंतापेक्षाही यांचे जास्त मूलभूत कार्य आहे. हे सध्याचे विचारवंत लेखक त्या थोर व्यक्तींच्या खांद्यावर उभे राहून आजच्या कळीच्या प्रश्नांना सामोरे जाऊन एकविसाव्या शतकाची आह्नाने पेलतात. या अर्थाने त्यांच्या विचारांची आज प्रस्तुतता आहे. 

आता प्रश्न असा की मराठी समाजाचीसुद्धा जागतिक परिप्रेक्ष्यामध्ये वाटचाल होणार असेल तर या सर्व मुद्दयांचे ऊहापोह होणारे, जागतिक पातळीवरील आघाडीच्या विचारवंतांचा संदर्भ लक्षात घेऊन, त्या त्या विषयाचे खोलवर अभ्यासपूर्ण वेध घेणारे कसदार लिखाण येथे होणार आहे काय? मराठी वैचारिक लेखक म्हणून आम्ही जागतिक आह्वानांना किती व कसे सामोरे जातो, किती कसदार वैचारिक वाङ्मयाची दरवर्षी निर्मिती होते हा आपल्या सर्व लेखकांसाठी आत्मपरीक्षणाचा मुद्दा आहे. 

या संदर्भात वैचारिक घुसळणीसंबंधी येथे सध्या काय चित्र दिसते? बहुतांश मराठी लेखक उदासीन आहेत. आपापल्या वैचारिक राहुट्या सांभाळून आहेत. आम्ही संवाद करायलाच तयार नाही आहोत. साधारणतः एखाद्या प्रश्नाचे महत्त्व नाकारायचे असेल तर, त्याची प्रासंगिकता काय हा प्रतिप्रश्न उभा करून आम्ही संवादाची, प्रबोधनाची संधी घालवतो. (पौराणिक व संतवाङ्याची प्रासंगिकता काय आहे हा प्रश्न विचारण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही. कारण हा फार संवेदनशील विषय आहे. आमची अस्मिता दुखावते. त्यातल्या त्यात एखाद्या विशिष्ट संताचा किंवा ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करून टीका केली तर महाराष्ट्रात काय इतर कोठेही या गुन्ह्याला सहसा क्षमा केली जात नाही. तरीही मराठी माणसाला पुरोगामी, उदारमतवादी, परमतसहिष्णु म्हटले जाते!) 

वैचारिक संवाद जागतिक स्तरावर कसे हिरिरीने चालतात याचे एक उदाहरण म्हणून मी येथे नमूद करतो. एज् (Edge) नावाचे एक नियतकालिक अमेरिकेमध्ये जॉन ब्रोकमन चालवितात. दरवर्षी ते एका प्रश्नाला धरून 100-150 विचारवंतांना, वैज्ञानिकांना लिहायला प्रवृत्त करतात. त्यांचा हा उपक्रम 8-10 वर्षांपासून सुरू आहे. त्या त्या विषयाला धरून दरवर्षी एक पुस्तकपण प्रकाशित होत असते. आपल्या देशामध्ये त्या पुस्तकाची साधारणपणे किंमत 400-500 रुपये असते. परंतु इंटरनेटवर हा प्रत्येक वर्षांचा लेखसंग्रह विनामूल्य उपलब्ध असतो. 

या पार्श्वभूमीवर मराठी वैचारिक विश्वाकडे बघितले तर काय दिसते? सगळीकडे सामसूम आहे. 100-150 मराठी लेखकांना, विचारवंतांना एखाद्या प्रश्नावर लिहिते करणारे असे कोणते माध्यम मराठीमध्ये उपलब्ध आहे? 

या लेखाचा शेवट करताना एक प्र शिल्लक राहतोच की कसदार मराठी साहित्याला वाचकांचा भरघोस प्रतिसाद कसा लाभेल? आजही ललित साहित्यप्रकारामध्ये शिवाजी सावंत यांची दुय्यम दर्जाची ‘मृत्युंजय’ ही कादंबरी मराठीतील सर्वांत लोकप्रिय कादंबरी आहे. ही वस्तुस्थिती असताना लेखकाने कसदार लिहावे म्हणजे आपोआपच वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभेल असे या प्रश्नाचे सोपे उत्तर देण्याच्या मोहात मी पडणार नाही. वाचकांची अभिरुची वाढण्यासाठी वाचक अभियान चालवावे लागेल. ग्रंथालयामध्ये सुमार दर्जाची पुस्तके आणण्याऐवजी तेथे दर्जेदार पुस्तकेच यावीत यासाठी खास प्रयत्न करावे लागतील. 

परंतु हे एक सत्य आहे की वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभो अथवा न लाभो, लेखकाच्या हाती इतकेच आहे की, आपण कसदार साहित्याची निर्मिती करत राहावी. काम्प्युटर व इंटरनेटच्या या जमान्यामध्ये एका किमान प्रिंटऑर्डरची मर्यादा राहिली नाही आणि असे करताना एका प्रतीमागे पुस्तकाची किंमत वाढली तरी (आज नाहीतरी प्रकाशक निर्मितिमूल्याच्या चौपट किंमत आकारतातच.) ज्या बहुतांश लेखकांसाठी लेखन-व्यवसाय हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे, त्यांनी त्याची काळजी करण्याची काही आवश्यकता नाही. लेखकांनी कसदार साहित्य निर्मिती करणे, प्रकाशकांची अनावश्यक मक्तेदारी मोडणे व वाचकांची अभिरुची घडवणे या महत्त्वाच्या तीन बाबींमध्ये मराठी साहित्याच्या उज्ज्वल भवितव्याची नांदी राहणार आहे. 

[सत्याग्रही विचारधारा मासिक, पुणे (ऑगस्ट 2007) यांच्या सौजन्याने] 

[वर्ध्याच्या ‘ग्रामोपयोगी विज्ञानकेन्द्रातील माजी आणि तेथल्याच घरामित्रमधील आजी वैज्ञानिक] 

मैत्र, विवेकानंदनगर, आलोडी रस्ता, नालवाडी, वर्धा 442001. फोन 07152-241653, इ-मेल: shrikantkar@rediffmail.com 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.