सुहासिनीची सत्त्वपरीक्षा 

माझी मुलगी एका सरकारी मनोरुग्णालयात समुपदेशक म्हणून नोकरीला आहे. तेथे भरती होऊन कालांतराने बऱ्या झालेल्या मध्यमवयीन स्त्रीकडून तिला कळलेली माहिती मला धक्का देणारी वाटली. 20 व्या शतकात आणि 21 व्या शतकाच्या आरंभी स्त्रियांना या कोटीचा सासुरवास सहन करावा लागत असेल तर त्याला आ. सु.ने वाचा फोडली पाहिजे आणि त्याविरुद्ध काही उपाययोजना सुचविली पाहिजे असे मला वाटते. त्या रुग्णाला आपण सोयीसाठी ‘सुहासिनी’ म्हणू. एखाद्या फुलराणीसारखी ती एका मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबात जन्माला आली. घरातील मंडळी इतकी समंजस की आजी म्हणे, 

‘कन्या झाली म्हणून करू नको हेळसांड। बापाशेजारी लेकीचं पान मांड ॥” 

अशी लाडाकोडात वाढलेली ती फुलराणी. मोठी झाली. आता स्वयंपाक शिंका, घरात कामे करा. मोठ्याने हसायचे नाही, चालताना पावलांचा आवाज करायचा नाही. हे घरातले वळण संपले ते दिवस की, 

आईच्या मांडीवर बसुनी। झोके घ्यावे गावी गाणी ॥ 

आता आई ‘जेलर’ झाली अन् वडील एकाएकी कोरडे, परक्यासारखे. इज्जतदारपणाच्या नजरकैदेतच पदवीपर्यंत वाटचाल केली अन् झाले वरसंशोधन सुरू. 

ठिकाणे जशी अनेक तशी आव्हाने अनेक. पैशाचे सर्वांत मोठे. कधीतर यशस्वी माघार! वडील महत्त्वाकांक्षी म्हणून न झेपणारी स्थळे पाहात. आश्चर्य म्हणजे एकदा चक्क मागणी आली! खरेतर आईवडिलांनी सावधपणे चौकशी करायची पण मुलीला मागणी आली याचेच त्यांना अप्रूप झाले. वरपक्षाची सुबत्ता आणि गोड गोड भाषण यांना ते भुलले. कर्ज काढून त्यांनी सुहासिनीचे थाटमाटात लग्न करून दिले. आणि मग व्याहीमंडळींनी आपले खरे रूप दाखवले. 

सर्वांत आधी माहेरच्या मंडळींची संभावना सुरू झाली. ‘गोदरेजचं कपाट आहे का तुझ्या बापाच्या घरी?’ ऊठसूठ ‘तुझ्या आईनं हेच शिकवलं का?’ असे शेरे जाऊ लागले. 

‘लग्नात जावईबुवांना टॉवेल दिला तो टर्किश नाही का द्यायचा?’ ‘दागिने व्यवस्थित ठेव. त्यांचे पॉलिश जाईल.’ ‘तुम्हाला कुठली आलीय् दागिन्यांची सवय?’ (पॉलिशचेच दागिने तरी एवढे कौतुक!) 

सुरुवातीच्याच ह्या हल्ल्याने बिचारी सुहासिनी गांगरून गेली. नवऱ्याजवळ मन मोकळे करायची जागा. पण तोच आईच्या ओंजळीने पाणी पिणारा. त्याच्या वागण्याला अगदीच वळण नाही. मनात येईल तेव्हा झोपणे, वाटेल तेव्हा उठणे आणि वरून आपण मोठे, आपलेच कुटुंब सुसंस्कृत असा बडेजाव. 

सुहासिनीला नवऱ्याच्या निष्क्रियतेचे नवल वाटे. नोकरीत धरसोड. स्वतःची पात्रता वाढवण्याची धडपड नाही. कोणत्या स्पर्धा परीक्षा द्यायचे नाव नाही. अंदरकी बात अशी की त्याला वाटे आईजवळ खूप सोने-नाणे आहे. अन् तिचे लाडके तर आपणच ते सारे मिळणार आपल्यालाच म्हणून त्याचे सारखे ‘आई’ ‘आई’ करणे. आईला सुनेची टिंगल आवडते का? मग हा त्या कामात दोन पावले पुढे. सुशिक्षितपणाचे कुटुंबात एक लक्षण नाही. कोणाला कुठला छंद नाही. वाचनाची आवड नाही. देवधर्म करणे नाही (ते तर मागासलेपण). वडिलांनी एका खाबू खात्यात खूप कमाई केलेली. त्यांनी जमवलेली मालमत्ता आपल्यालाच मिळणार म्हणून बायकोने अहोरात्र सासऱ्यांची थुंकी झेलावी हो अपेक्षा. तिला मन आहे, ती कामाने थकू शकते हे त्या नवरोबांना कधी कळलेच नाही. 

आईवडिलांचे घबाड शेवटी आपल्यालाच मिळणार या विचाराने म्हणा की अविचाराने म्हणा हा माणूस वर्षांनुवर्षे कर्तृत्वहीन दुबळा, अस्मिताशून्य राहिला. बायकोच्या रूपगुणाची, शिक्षणाची तिच्या व्यक्तिमत्त्वाची जरा सुद्धा जाण नाही तर अभिमान कुठे? तिच्याबद्दल प्रेम नाही फक्त तिच्या पदरात संतती टाकणे, त्यातून तिला पुत्रवती करणे एवढेच आपले कर्तव्य मानणारा. ते पार पाडून हा कृतकृत्य होताना टोळ होऊन बसला. 

त्याची तटस्थता मोडायचे एक निमित्त म्हणजे हिंडण्याफिरण्याबद्दल संशय घेणे, त्याबद्दल कधी अर्वाच्य बोलणे. तेही कर्तव्य नवरा पार पाडी, तिच्या वडिलांचे एक घनिष्ट मित्र वकील होते. ते म्हणत, सुहासिनीने नवऱ्याला सोडून द्यावे. पण आईवडील पडले भिडस्त. त्यामुळे ती चूप राहिली. चूक नसता बोलणी खात राहिली. मन मारून अपमान सहन केले. त्यामुळे सासूसासरे जास्त चेकाळले. तिच्या आईला वाटे हिने नवऱ्याला सोडले तर माझ्या आणखी दोन मुली उजवायच्या राहिल्या त्यात बाधा येईल. समाज दोष स्त्रियांचाच मानतो. 

शिवाय सुहासिनीने विचार केला, आता ह्या प्रौढ वयात नवरा सोडला तर आईवडील आहेत तोवर निभाव लागेल पण भावजया आल्यावर माहेरी अवहेलना होईल. आणि आपल्या पोटातल्या बाळाचे भवितव्य काय? या सगळ्या भयचक्राने मन मारून गुलामासारखे रावणे तिने पसंत केले. वरून सासुसासऱ्यांच्या शृंगाराचे मुरलेले लोणचे उतू चाललेले पाहावे लागत असे. सासूच्या जोडीला नणंदेचा उद्धटपणा आला. नवऱ्याचा नेभळटपणा आणि दिराचा आक्रमकपणा निमूटपणे ती सोसत राहिली. अधे-मधे माहेरी जायला मिळाले तर सोबत सासू न चुकता पाठराखण देई. त्यामुळे आईजवळदेखील मन मोकळे करायची चोरी. ‘अळीमिळी गुपचिळी’ असे सगळे खोटे-खोटे, गोड-गोड बोलणे, 

कोई मायके को दे दो संदेश, पिया का घर प्यारा लगे । 

हे जे नाटक आजवर चालू होते ते आता प्रत्यक्ष भेटीत वठवणे आले, माहेरचे घर सासरच्या मानाने छोटे होते. पण घरात प्रेम मुबलक होते. घरात बडेजावी फर्निचर नसेल पण जिव्हाळा उदंड होता. आई-बाबा आणि शिकणारी गोड भावंडे ह्यांच्यात मन रमून जाई. मोकळा श्वास घेता येई. आई पण मुलीचे खोट्या सोन्यातले पिवळे धमक रूप पाहून फार- फार खूश होई. बिचारीला अंदरकी बात काय माहीत? सुहासिनीला आईचा हा भ्रम कायम राखणेच आवश्यक वाटले. सासरी परतायचा दिवस जवळ आला की तिला वाटे सांगून टाकावे सगळे खरे खरे म्हणावे, मी नाही जात. पण लगेच दुसरे मन म्हणे कसे सांगू? लग्नाचे कर्ज अजून फिटले नाही. सासरच्या कष्टाला काय भ्यायचे? जातील हेही दिवस निघून! 

घरी परतायला एका दिवसाने उशीर झालेला असतो. दारात पाऊल पडताच कर्दनकाळ सासरे कडाडतात, त्यांच्या आवाजातल्या विखाराला विशेष धार येते. कारण अर्थात् सुनेच्या गैरहजेरीत घरात त्यांच्या बायकोला सगळी कामे करावी लागली, हे असते. त्यांनी सुहासिनीला नोकरी करू दिली नाही. ती चांगली ग्रॅज्युएट होती. तिला साहित्याची आवड होती. ती कविता करीत असे. तिने नाटकात कामे केली होती. चांगली सुस्वरूप होती. आपल्याला नोकरीची गरज नाही असा मोठेपणा दाखवून सासरच्यांनी नोकरी करू दिली नाही. हक्काचा घरगडी म्हणून राबवली. विरोध करायचा ज्याच्या बळावर तोच पोकळ वासा निघाला. ती ‘वधू बहू’ बनून आली पण तेथे ‘वर’ नव्हताच! 

तिला डोहाळे लागले तेव्हाची गोष्ट. घरकामात काही सूट नाहीच, मॉर्निंग सिकनेस सुरू झाला. काही खावेसे वाटले तर ते मिळत नसे. नकोसे झालेलेच खावे लागे. फोडणींचे वास सहन होत नव्हते. ओकाऱ्या काढत स्वयंपाक करायचा, वरून “भारीच घाणेरडी” म्हणून सासूचे टोमणे ऐकायचे. पण त्या ढालगज भवानीचे बूड काही हालत नसे. वरून म्हणत राही, “बाळंतपण पहिले माहेरीच असते”. “हॉस्पिटलमध्ये स्पेशल रूम घ्या म्हणावे. नंतर नातवाला सांभाळायला बाई कुरूप ठेवू नका, तो भिईल!” घुटीपासून तर आंघोळीपर्यंत सूचना, “तिसऱ्या, पाचव्या दिवशी देवीची पूजा, बळीराणा सारे यथासांग करा. बारसे थाटात झाले पाहिजे, जावयाला सोन्याची चेन द्या. नातवाला बिजली, चाळ, वाळे सगळे करा. आणि विसराल म्हणून सांगते, आत्याचे आणि आजीचे मानपान सगळे झालेच पाहिजे.” 

सुहासिनीचे वडील आपले मध्यमवर्गीय. पगार येईल तेवढेच उत्पन्न. कुटुंब मोठे! तिची आई रडकुंडीला येते. एका भावंडाला फॉर्म भरण्यासाठी पैसे हवे असतात. एका बहिणीला (कॉलेजच्या) हॉस्टेलचे पैसे द्यायचे असतात. छोट्याला कपडे घ्यायचे. सणवार सांभाळायचे असतात. 

लग्रासाठी आधीच सरकारी कर्ज घेतलेले. आता तो मार्ग बंद. कापड चोपड उधारीने घेऊन वेळ मारून नेता येते. पण सोन्याचांदीला उधारी नाही. सासूने दिलेल्या यादीतील प्रत्येक त्रुटीबद्दल तिला पदोपदी टोमणे ऐकावे लागतात. बाळंतपणाची सुटी घेतल्याबद्दल सासूला पडलेले कष्ट, त्यांची सव्याज परतफेड ती आता करून घेते. बाळाची घुटी, त्याचे बुडबुड करणे, सारे सासूबाईच्या हौसेचे काम. त्याला बाहेर फिरवण्याचे काम आजोबांचे. तिचा नवरा कधी हात लावत नाही. तसे करण्यात आईबाबांचा अनादर होतो म्हणे. त्याला घेणे त्याच्या बाललीला पाहणे हेही सुख तिच्या नशिबात नाही. 

तिची जागा तिन्ही त्रिकाळ भटारखान्यात! चमचमीत पदार्थांच्या फर्माइशी पुन्या करण्यात तरी ‘शेळी जाते जिवानिशी अशीच गत होणार. नवऱ्याला बायकोची वास्तपुस्त करणे माहीत नाही. येथे प्रीतीचे वात्सल्याचे सारे काही राहिले स्वप्नात. नाही म्हणायला “काय साडी नेसलीस? काय भाजी केलीस? तुला कसं काहीच येत नाही?” अशी मुक्ताफळे. अशा संसारात मन मारून दिवस कंठणे चालू. 

माहेरी वातावरण सुशिक्षित होते. सगळ्यांना वाचनाची आवड. आई-बाबा, बहीण, भाऊ पुस्तकांवर चर्चा सुद्धा करत. सासरी पुस्तक हाती धरायचे नाही. नवऱ्यालाच आवड नाही मग काय? पेपर बघायला देखील मिळत नाही. कधी वाचला, कधी बोलले तर हेटाळणी, “छ्याक! तुला काय कळतं? समजत नाही तर बोलू नाही.” हळूहळू खरेच तिला समजेनासे झाले. भाऊ-बहीण नवल करतात. ताई तर इतकी हुशार होती! अशी कशी झाली आता? “मध्यमाधमदशा संसर्गयोगें टिके हेच खरे. 

चेहऱ्यावरचे हसू तर कधीच मावळलेले होते. तारुण्यही हळूहळू ओसरले. 

नवऱ्याला मात्र वाटते, हिने सदैव सजूनधजून समोर यावे, हसरे दिसावे, तो म्हणे “मी हौसेने हिचे नाव सुहासिनी ठेवले पण ही पाहा सदैव रडत राऊत.” कधी बेडरूम आवरलेली नसते. तर तो ओरडतो. “मुलाला आईच सांभाळते. बाबा त्याला फिरायला नेतात. मग तुला काय काम असते? स्वयंपाक तर सगळ्याच बायका करतात. ते काय काम आहे?” मनात प्रश्न येतो पण तो तोंडात येत नाही. ‘अहो जर तो इतका सोपा आहे तर तुमच्या मातोश्री का नाही करत एकावेळचा, निदान एखाद्या वेळी तरी!’ 

घरगड्यापेक्षा वरचा दर्जा सुहासिनीला कधी मिळाला नाही. मुलगा मोठा होऊ लागला. तोसुद्धा आईची टिंगल करायला शिकला. आजी-आजोबा, बाबा आत्या या सगळ्यांच्या तोंडून तेच ऐकत होता. तीच भाषा तोही बोलू लागला. सुहासिनीला उद्वेग आला. बहिणाबाई आठवली 

‘लेकीच्या माहेरासाठी माय नांदते सासरी’ 

आपल्या पोटी काही लेक नाही. कशाला सोसायची ही गुलामगिरी? 

तिने सासुरवास जिव्हारी लावून घेतला. पुरती कच खाल्ली. अकाली वार्धक्य येऊ लागले. नवऱ्याचा सहवास नकोसा झाला. आपण लेखिका होऊ, गायिका होऊ शकतो, कवयित्री बनून नाव मिळवू. संधी मिळाली तर नाटक दूरदर्शन करू!! सगळी स्वप्ने विरून ‘गेली. तिच्या दुःखाने दुःखी होत गेले तिचे आई-बाप, सख्खी भावंडे. सुहासिनीला बी.ए.ला फर्स्टक्लास होता. लग्नाच्या वेळेला ती लॉ कॉलेजमध्ये शिकत होती. कुठून कुठे आली. 

आपल्या समाजात आजही स्त्रियांची अशी परवड आहे याचा धक्का तिला सहन झाला नाही. कुठलाही कायदा, कुठलीही संस्था त्यांची गांजणूक कमी करण्यात असमर्थ आहेत. सुटकेचा मार्ग दृष्टिपथात नाही. सुहासिनीला नकळत तिच्या मनाचा तोल गेला. लग्नाआधी केवढी देखणी हुशार, होतकरू सुहासिनी लग्नानंतर बसलेला नालायकपणाचा शिक्का आणि धक्का सहन करू शकली नाही. आणि मनोरुग्णाच्या इस्पितळात केव्हा आली ते तिला कळलेच नाही. 

[लेखिका प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आहे. संपादकामार्फत संपर्क अपेक्षित.] 

फोन : 9325423010 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.