पत्रचर्चा 

सौ. सुमित्रा र. सराफ, डी/21, सुरस, पी.एम.जी. कॉलनीमागे, नरेंद्रनगर, नागपूर 440015, दूरध्वनी 0712-2747413. 

ऑक्टोबर ’07 च्या मुखपृष्ठावरील प्रेरक उताऱ्यावर – प्रतिक्रिया (1) 

उतरणीवरील आयुष्य 

मायेचा झरा कधी आटला 

हे कळलेच नाही । 

पक्षी उडाले ही जाणीव 

झालीच नाही. 

वाटतं नावांत, नातीत 

आपल्या परिवारात, 

प्रेमाच्या भोवऱ्यात 

गुंफून राहावे । 

वृद्धावस्थेत प्रेमाचे बोल 

त्यांच्यासाठी संजीवनीच असतात । 

नातांनी जवळ यावे, हट्टाने काही 

मागावे, त्यांच्याजवळ बसावे, पण 

छे: कोठले ते? 

त्यांना ताकीद असते ! 

त्यामुळे, आजी आजोबांचे 

नातेच नष्ट झाले असे वाटते । 

म्हणून वृद्धाश्रम बरा किंवा 

पैसा गाठीला असेल तर वेगळे खुराडे बरे । 

पुन्हा वरून सल्ला “आपले आपणच 

करावयास शिका. ” वेळ नसतो ना? 

खरंच ते! डोळे सतत वाटेकडे असतात. 

येईल, दार लावू नका ! 

डोळे मिटतात पण दार मिटत नाही ! 

प्रतिक्रिया ( 2

मंजिरी घाटपांडे, डी-202, कपिल अभिजात डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे 411038. फोन : 9422302287 

ऑक्टोबर 07 च्या मुखपृष्ठावर ज्या शहाणपणाचा आदिवासी आणि रानटी टोळ्यांच्या संदर्भात उल्लेख आलेला आहे, ते शहाणपण आजकालची सामान्य माणसे तर सोडाच, पण मोठ-मोठ्या डॉक्टर्सकडेही आहे की नाही, याची शंका घ्यावी, अशी परिस्थिती सभोवार दिसते. नाहीतर पंच्याहत्तराव्या वर्षी बायपास ऑपरेशन्स आणि ऐंशीव्या वर्षी ऑक्सिजनवर कोम्यात जगणारे दम्याचे पेशंट्स दिसलेच नसते. 

त्याच लेखात आपल्याकडच्या ‘देह ठेवण्याच्या’ परंपरेचा उल्लेख आहे. ही परंपरा का व कधी खंडित झाली असावी यावर आता जाणकारांनी प्रकाश टाकण्याची व चर्चा करण्याची वेळ आली आहे. ‘इच्छामरण’ कायद्यासाठी एक व्यापक वैचारिक अभिसरण सुरू होण्याची वेळ खरे तर टळून चालली आहे. त्याऐवजी वृद्धत्वशास्त्र आणि वृद्धांच्या मानसिक समस्या यांवरच चर्चासत्रे झडताना दिसतात. 

प्रश्न घरातले वडील माणूस निरुपयोगी झाले की त्याच्या उशाशी दिवा लावून ठेवण्याचा नाही हे आजच्या निदान मध्यमवयीन पिढीने तरी लक्षात घेतले पाहिजे. प्रश्न ‘आपण’ निरुपयोगी झाल्यावर काय करायचे, याचा आहे. आणि हे निरुपयोगी होणे, हे स्वतःच्याच दृष्टिकोणातून असणार आहे, हे आणखी महत्त्वाचे! 

‘निरुपयोगी’ आणि ‘निरुद्देश’ या पुन्हा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ‘निरुद्देश’ होणे हे आणखीच भयानक आहे. लहानपणी माणसाला मोठे व्हायचे असते. जगातले अनेक अनुभव घ्यायचे असतात, अनेक सुखे भोगायची असतात, तरुणपणी काहीतरी नवनिर्माण करायची जिद्द असते, त्यानंतर थोडा काळ शांतपणे आयुष्य घालवायची, समाधान उपभोगायची इच्छा असते, तसे म्हातारपणी काय? तेव्हा प्रत्येकाला शांतपणे, वेदना न होता मरायची इच्छा असते. मात्र या इच्छेच्या पूर्तीसाठी प्रयत्न करण्याची वैधानिक मुभा नसते. हीच खरी शोकांतिका आहे! त्यामुळेच आध्यात्मिक व्यक्ती, जेवढे भोग असतील ते भोगल्याशिवाय सुटका नाही या वाटेकडे वळतात आणि काही थोड्या नास्तिक व्यक्ती जगण्याबद्दलची नसलेली/न उरलेली असोशी दाखवण्याच्या निष्फळ प्रयत्नांना लागतात. वास्तविक माणसाच्या इतर सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी जशी आधुनिक विज्ञानाने कंबर कसली आहे, तशी इच्छामरणाच्या बाबतही निकराने प्रयत्न करण्याची जरूरी आहे. 

पूर्वी यासाठी ‘जन्म’ ही काही आपल्या हातातली गोष्ट नाही असा युक्तिवाद असायचा. पण आता कुटुंबनियोजनाच्या काळात जन्म हो, निदान आपल्या माता-पित्यांच्या हातातलीच म्हणजे मानवी इच्छेनुरूपच घडणारी गोष्ट आहे हे तरी सर्वमान्य होण्यास हरकत नसावी. अशा आधुनिक काळात, खरे तर कुटुंबनियोजनाचीच व्याख्या अधिक व्यापक करून, त्यात ‘इच्छामरणाचा’ अंतर्भाव केला पाहिजे. प्रचलित आहे ते ‘जन्माचे नियोजन’ आणि मी मांडते ते ‘मृत्यूचे नियोजन’! पण शेवटी नियोजनच. आणि कोणत्याही प्रगत शहाण्या माणसाने नियोजनास विरोध करण्याचे कारण नाही. नियोजनाविना प्रगती असाध्य आहे. 

हॉस्पिटलात जन्मलेली आमची आजची पिढी मरण्यासाठी हॉस्पिटलातच जाईल याला खरे तर कोणाचाच विरोध असता कामा नये. उलट जन्मताना, जन्म सुकर करण्यासाठी ज्या तऱ्हेने डॉक्टर्स मदतीला तत्पर असतात, त्याच पद्धतीने शेवटही शांत होण्यासाठी मदत करण्याची तत्परता दाखवण्याची कायदेशीर मुभा त्यांना असलीच पाहिजे. 

शेवटी आजचा सुधारक कारांना एकच विनंती आहे, प्रगत महाराष्ट्राच्या वैचारिक वर्तुळात तरी त्यांनी हा विषय नेटाने लावून धरावा. 

के. ब्रह्मकुमारी, बंगलोर- 15. 

आसु (6.7) मधील सु(कु)मार काट्यांचा विवेकपूर्ण (शून्य) 75 कंसांचा आत्मप्रौढीचा लेख, विवेकवादी चिंतनाचे ब्रीद (कुंकू) असलेल्या मासिकात कशाला? शिवाय यशवन्त ब्रह्म यांचे ‘पाश्चर’ पाल्हाळ; आणि काय काय वाचायला देणार? 

केशवराव जोशी, तत्त्वबोध, कल्याण-कर्जत हायवे, नेरळ (रायगड) 410101, फ़ोन 952148-238652 

नम्रतापूर्वक सांगतो की तुम्ही एडिटिंग फारच छान करता. काही कात्रणे पाठवीत आहे. आवडली तर छापा. बऱ्याच वाचकांना माहिती नसते.. 

थोडे हसू या

एकजण :तुमच्या ट्रीटमेंटमुळे मला फार फायदा झाला, म्हणून आभार मानायला आलो होतो! 

डॉक्टर :पण तुम्ही तर माझे कधीच पेशंट नव्हता! 

तो : नव्हतो, पण माझे काका होते ना! त्यांचाच मी एकटा वारस ! 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.