अभ्यासेनिं प्रकटावें

पत्रसंवाद वाढत आहे. केशवराव जोशींची बोधक पत्रे आणि त्यांच्या निवासाचे ‘तत्त्वबोध’ हे नाव यातून ‘बोध’ उचलून तो या अंकी पत्रचर्चेतील पत्रांना जोडला आहे. वादे वादे जायते तत्त्वबोधः, म्हणतात तो होवो!!
आजचा सुधारकचे वाचक कोण हा एक अशांत प्रश्न! हे खरे की जे वाचतात ते वाचक. पण त्यांनी लिहिल्याशिवाय हे कोण ते कळत नाही. आजकाल पत्रलेखनाचा आणि लेखनकलेचा काळजी करण्याइतका संकोच होत आहे. आता सुकर्ण (रोलळश्रश) आले आहेत. आधी पत्र लिहा, मग उत्तराची वाट पाहा ह्या अभिक्रमांना उल्हास लागतो, चिकाटी लागते. त्याला फाटा देऊन वाचक सरळ संवाद साधतात. हा रूढ होत आहे, तो वाचकांचा स्वनित प्रतिसाद. त्याचीही दखल लिखित पत्राचाराइतकी घेतली पाहिजे. मात्र यात कानी पडलेले शब्द नेमकेपणे न उल्लेखिले जाणे संभवते. आम्ही संभाषण शब्दशः नसेना का पण भावार्थाने बरोबर घेतले नाही असे कोणास वाटले तर आमची चूक लक्षात आणून द्यावी.
मुंबईचे पंकज कुरुलकर हे प्रसिद्ध, पूर्णवेळ लेखक, त्यांची जंगल ही कादंबरी नुकतीच निघाली आहे. ते म्हणाले, ‘आ.सु.त चुटके-विनोद असावेत ही कल्पनाही मनाला पटत नाही. आम्ही विनोद वाचण्यासाठी आ.सु. घेत नाही. अमुक अमुक वेबसाइटवर ते ढीगभर मिळतात. गंभीर चर्चेसाठी तू आ.सु. वाच असे विजय तेंडुलकर म्हणाले म्हणून मी आजीव वर्गणीदार झालो.’ आम्ही म्हटले, मत व माहिती दिल्याबद्दल आधी आभार. मी स्वतः व मला माहीत असलेले आ.सु.चे बहुतेक वाचक आम्ही, काम्प्युटर-निरक्षर आहोत. आ.सु. ४८ पाने देतो. त्यांतल्या ४० पानांच्या जरी सरासरी ३० ओळी धरल्या तरी बाराशे होतात. कोणत्याही अंकात सगळे मिळून १२-१५ ओळींपेक्षा जास्त जागा विनोदी चुटक्यांना नाही. ते ही पानपूरके म्हणून आहेत. पण त्यांनी अडवलेल्या जागेपेक्षा त्यांची उपस्थितीच कुरुलकरांना खटकली हे उघड आहे. त्याबद्दल आम्हाला इतकेच वाटते की, कधी कधी विनोदाच्या वाटेने जीवनातले विसंवाद उघडे पडतात. वृत्तपत्रातले एक चित्र हजार शब्दांपेक्षा सरस आणि एक अर्कचित्र दहा साध्या चित्रांना भारी असते असे जे म्हणतात ते उगीच नाही. नाशिकहून मोहन सराफ म्हणाले, आ.सु. आता थोडा तरी समजतो. नर्मविनोदांनी मनावरचा ताण हलका होतो. डॉ. अशोक थोरात अमरावतीच्या सुप्रसिद्ध विदर्भ महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक म्हणाले, ‘आज पहिल्यांदा मी आ.सु. (ऑक्टो.’०७) सगळा वाचू शकलो. अंक अथ पासून इति पर्यंत चांगला आहे.’ नगरच्या डॉ. गांधींना लुई पाश्चरवरील लेख आवडला. तसाच सुहासिनीची सत्त्वपरीक्षा हा लेख त्यांना अस्वस्थ करून गेला. अजूनही स्त्रियांना असा सासुरवास सोसावा लागतो ह्याचे त्यांना नवल वाटते. मूळचे पुसदचे, आता नाशिककर झालेले रघुनाथराव देशमुख. ह्यांना आ.सु.चा बदलत असलेला नूर रुचला. नवा सूर वाचकांतील बहुजनांना भावणारा आहे असे त्यांनी म्हटले. बेळगावचे सु. गु. देशपांडे, अकोल्याचे पं.कृ.वि.चे निवृत्त प्राचार्य देवराव भालकर ह्यांनाही गंभीर विषयाबरोबरच लोकाभिमुख लिखाणही यावे असे वाटले. मध्यंतरी एके ठिकाणी मला भाषणासाठी बोलावले होते. मी जरा आश्चर्य व्यक्त केले. तर उत्तर आले आता आ.सु. आम्हाला समजू लागला आहे म्हणून तुमची ओळख करून घ्यावी, असे वाटले. प्रत्यक्ष भेटीगाठीत स्नेही, परिचित न विचारता आ.सु.बद्दल दोन बरे शब्द बोलतात. तो त्यांच्या सौजन्याचा आणि शिष्टाचाराचा भाग समजू या.
आता लिखित प्रतिक्रियांबद्दल. त्यातल्या उग्र आधी घेऊ. मित्रवर्य प्रभाकर आचार्य श्रद्धा अंधश्रद्धा खरी( ? ) श्रद्धा ह्या संपादकीयावर कोपले आहेत. त्यांनीही ओळींचा हिशेब मांडून मुख्य प्रश्नाला आम्ही बगल दिली, कमी जागा देऊन अन्याय केला असे म्हटले.
संपादकीयात अंकातील आगामी विषयांचे सूतोवाच असते. त्यांच्यापैकी महत्त्वाचा, अंधश्रद्धा एका श्रद्धांध महिला मांत्रिकाचे अघोरी कृत्य आणि अंधश्रद्धेची ताजी उदाहरणे घेऊन काही आलोचना केली आहे. मूळच्या आर्थिक आपत्तीस कारणीभूत होणाऱ्या सेझच्या संकटाविरुद्धचा उद्रेक त्याला धार्मिक रंग चढवून तस्लीमाचा व्हिसा रद्द करा ह्या मागणीत परिवर्तित होतो व कलकत्त्याच्या रस्त्यावर रणकंदन होते ह्या अंधश्रद्धेलाच तिचे उपासक खरी श्रद्धा म्हणतात. विवेकवादी विचारसरणीत खरी श्रद्धा हा शब्दप्रयोग ‘चौकोनी वर्तुळ’ ह्या शब्दप्रयोगाप्रमाणे आत्मविसंगत आहे. राम झालाच नाही. झाला असल्याचा पुरावा नाही ह्या करुणानिधीच्या म्हणण्यावर डॉ. दफ्तरींनी ग्रहस्थितीच्या वर्णनावरून रामाची वनवासातील रोजनिशी वर्णन केली आहे ही आमची माहिती तेथे उल्लेखिली आहे. ग्रहज्योतिष विषय आमच्या आकलनापलीकडे आहे. ‘अभ्यासेनिं प्रकटावें, ना तरि झांकोनि राहावें’ हा आमचा पक्ष आहे.
टी. बी. खिल्लारे ह्यांच्या रामचंद्रन्विषयी-अभिप्रायावर याआधीही उलट सुलट चर्चा झाली आहे. डॉ. प्रदीप पाटील, मनोविज्ञान चिकित्सक, सांगली यांच्या प्रस्तुत उत्तरानंतर ती आता थांबवू या. राहुल पाटील, कामजीवन सल्लागार, कोल्हापूर ह्यांच्या काही लिखाणावर पुण्याचे खिल्लारे व नानावटी ह्यांची कडक टीका आहे. ती व तिला राहुल पाटलांनी दिलेले तिखट प्रत्युत्तर ह्याच अंकात आहे.
कामजीवनाशी निगडित ज्ञान, तथ्य झाले म्हणून छापलेच पाहिजे का? अशा ज्ञानाचा उपयोग काय ? असे प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. त्यांचे संक्षिप्त तत्त्वज्ञानमूलक उत्तर असे की, सत्याचे मूल्य त्याच्या उपयोगावरून ठरत नाही. ज्ञान सत्य आहे, तथ्य आहे. एवढ्यावरच त्याचे मूल्य आहे. मूल्यांचे दोन प्रकार आहेत. एक साधनमूल्य आणि दुसरे साध्यमूल्य. पैशाने सुख साधता येते म्हणून पैशाला जे मूल्य आहे ते साधनमूल्य. पण सुखाला मूल्य आहे ते त्याने आणखी काही साधायचे म्हणून नाही. सुखाचे मूल्य स्वयंभू स्वायत्त आहे. हे साध्यमूल्य ! कर्मठ सुखवादी तत्त्वज्ञ फक्त सुखालाच हे मूल्य आहे असे मानतात. इतर साध्यवादी तत्त्वज्ञ सुखाप्रगाणेच ज्ञान, गैत्री, कलानिर्मिती इत्यादींनाही साध्यगूल्य आहे असे गानतात. सत्याला अंगभूत गूल्य आहे म्हणूनच शास्त्रज्ञ व ज्ञानगार्गी त्याचा शोध घेतात. सत्याच्या साधन गूल्याचा, उपयोगाचा विचार करून ज्ञानाच्या कक्षा वाढत नसतात.
आता राहिला प्रस्तुत-अप्रस्तुताचा मुद्दाः ह्यात मतभिन्नतेला पुष्कळ वाव आहे. प्रसिद्ध सुधारक रघुनाथ धोंडो कर्वे ‘समाजस्वास्थ्य’ मासिकाचे निर्माते व झंजार संपादक. सव्वीस वर्षांहन अधिक काळ आपल्या मासिकाच्या मुखपृष्ठावर नग्न स्त्रीचे चित्र छापीत. त्याचा सुधारणेशी म्हणा की समाजाच्या आरोग्याशी म्हणा, काय संबंध असा प्रश्न टीकाकार वारंवार विचारीत. त्यांचे उत्तर असे की हा विषय घाणेरडा । सभ्य लोकांच्या बैठकीत उच्चारही न करण्याजोगा समजतात. त्याचे तिरस्कृत समजले जाणे समाजस्वास्थ्याला घातक आहे. म्हणून ते मुखपृष्ठ. र. धों. केवळ स्वास्थ्यवर्धक आहाराविहाराबद्दलचे लिखाण करून थांबले नाहीत तर ‘दाढी कशी करावी’ हे लिहिणेसुद्धा त्यांना समाजस्वास्थ्यासाठी प्रस्तुत वाटले आहे. कर्त्यांचा बाणा आमचा आदर्श आहे.
कोल्हापूरचेच गोखले ह्यांच्याइतके, लिओनार्डो डा व्हिंची आणि लुई पाश्चरवरील लेख दिवाकर राजे ह्यांना निरर्थक वाटले नाहीत हे त्यांच्या पत्रावरून दिसावे.
भारतीय सेक्युलॅरिझमचे तत्त्वज्ञान राजकीय गरजेतून जरी उदयाला आले असले तरी भारतीयांच्या प्रकृतीला आणि परंपरेला कसे साजेसे आहे हे न्या. म. श्रीकृष्ण दाखवीत आहेत. श्रीकृष्ण-अहवालाने आबालवृद्धांना ओळखीचे झालेले न्या.मू. श्रीकृष्ण ह्यांचे लिखाण, त्यातील सगळे प्रतिपादन ‘बाबा वाक्यम् प्रमाणम्’ म्हणून स्वीकारावे असे नाही. पुढील लेखांकाची वाट न पाहताही त्यांच्या चर्चेसाठी आवाहन आहे.
अमेरिकेतील बाल्टिमोर येथील डॉ. धनंजय वैद्य कुठला प्रश्न विचारण्याजोगा आहे, ह्या अंगाने विचार करतात. त्यांचे आ.सु.त पहिलेच लिखाण आहे. त्याचे स्वागत करतो. डॉ. र.वि. पंडितांनी अवतारामागची उत्क्रान्तीची अभिनव उपपत्ती सांगून अवतार अनुक्रमात व कार्य क्रमात बदल सुचविले आहेत, ते चिंतनीय आहेत. केशवराव जोशी व प्रा.र.ग. दांडेकर ह्यांचे लेखन नेहमीसारखे विचारपरिप्लुत आहे.
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार. कळावे, लोभ असा हे विनंती, सुकर्णः ९३२५४२३०१०
आपला
प्र.ब.कुळकर्णी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.