विवेकवादाला एवढे नक्कीच साधेल

धर्म ही एक सामाजिक आवश्यकता आहे असे म्हणता येईल. प्राचीन काळात धर्माने पार पाडलेली सामाजिक कार्ये म्हणजे, (१) विशिष्ट कर्मकांडांच्या निर्मितीमुळे समाज एकत्रित येणे. (२) भीती, अनिश्चितता या भावनांपासून माणसाची बऱ्या प्रमाणात सुटका होणे. (३) मरणाची व अज्ञाताची भीती बरीचशी कमी होणे. (४) मानवी जीवनात देवाचे साह्य मिळण्याची आशा निर्माण होणे. त्यामुळे माणसाची वैफल्यग्रस्तता कमी झाली व त्याला संकटकाळात आधार प्राप्त झाला. पुढे धर्मात नवनवीन कल्पनांची भर पडत गेली. काही संकल्पना मागे पडल्या. धर्माचे स्वरूपही बदलत गेले. या बदलत्या धर्माचा आढावा पुढीलप्रमाणे घेता येईल.
उन्नत धर्माचा उदयः
नवी समाजाच्या विकासाबरोबर त्यात नवीन सामाजिक संस्थांची भर पडत गेली. त्यांच्या नियमनाचीही आवश्यकता निर्माण झाली. अर्थव्यवस्थेच्या विकासामुळे माणसाच्या प्राथमिक गरजा भागविण्याचे चांगले मार्ग उपलब्ध झाले. माणसाला थोडी फुरसतही मिळाली. आता तो निसर्गाचे अधिक सजगतेने निरीक्षण करू लागला. निसर्गाची भीती व त्याविषयीचे त्याचे अज्ञान बऱ्याच प्रमाणात कमी झाले. काही कटु वास्तवांचा स्वीकार करण्यास मने तयार झाली. आता माणूस निसर्ग व त्यात घडणाऱ्या घटना, मानवी जीवन व एकंदर सृष्टिजीवन यांच्याकडे डोळसपणे बघू लागला. त्याला आपल्या सभोवतालच्या जगातील नियमितता, उदात्तता, सुंदरता, विशालता, रहस्यमयता यांच्याविषयी कुतूहल व प्रेम वाटण्यास सुरुवात झाली. मानव व निसर्ग यांच्यातील परस्परसंबंध, माणसाचे निसर्गावरील अवलंबन यांमुळे मानवाला निसर्गाबद्दल आदर व आत्मीयता वाटू लागली. मानवाच्या या नवीन दृष्टिकोणानुसार त्याची ईश्वरविषयक कल्पनाही बदलत गेली. या नवकल्पनेनुसार हा ईश्वर सृष्टीचे नियमानुसार संचालन करणारा आहे. तो लहरी नाही. अखिल सृष्टीविषयी त्याला प्रेम आहे. सर्व मानवजात त्याची लेकरे आहेत. तो सर्वशक्तिमान, सर्वज्ञ व संपूर्ण आहे. त्याला आकार नाही. प्रसंगवशात् तो अनेक रूपांत अवतरतो किंवा आपले प्रेषित पाठवितो. या विश्वात ‘धर्म’ अर्थात ‘नियमितता’ प्रस्थापित करणे हे या अवतारांचे किंवा प्रेषितांचे प्रयोजन असते. या परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक मानवाने धर्म आचरला पाहिजे. धर्माचे पालन करणाऱ्यांचे तो संरक्षण करतो व धर्मभंजकांना तो नष्ट करतो, अशी धार्मिक माणसाची प्रामाणिक भावना असते. अशा ईश्वराची भक्ती किंवा उपासना करण्यामागे भीती नसते. त्यामागे असतो आदर, प्रेम व कृतज्ञता. या धर्मांत विधीबरोबरच सदाचरण, कर्तव्यपालन अशा नैतिक जीवनाला अधिक महत्त्व प्राप्त होते. अशा धार्मिक जीवनात दुःखे, संकटे, वैफल्यग्रस्तता येत असली तरी ती तात्पुरती असतात. धर्माने वागले तर ईश्वर आपल्याला त्यातून सोडवील अशी खात्री धर्म पाळणाऱ्यांना असते. ईश्वराचा हा आधार त्यांचे दुःखी व वैफल्यग्रस्त जीवन सुसह्य करतो. असा धर्म व ईश्वर माणसाची मरणाच्या भीतीतूनही सुटका करतो. मरण हे निसर्गातील नियमिततेचाच एक भाग आहे. निसर्गाची किंवा ईश्वराचीच ती एक योजना आहे. मरण म्हणजे शेवट असा काही प्रकार नसावा. एवढेच नव्हे तर मरण म्हणजे, जो संपूर्ण सर्वज्ञ व सर्वशक्तिमान आहे त्याच्या जगातला प्रवेश असावा असेही चिंतकांना वाटायला सुरुवात झाली. थोडक्यात, मरणावरही विजय मिळवून देण्याचे सामर्थ्य या धर्मात व त्याच्या ईश्वरात होते. यावरून हा धर्म प्राचीन धर्मापेक्षा वेगळा आहे, हे स्पष्ट होण्यासारखे आहे. असे असले तरी धर्माचे प्राचीन व प्रगल्भ हे प्रकार कालानुक्रमाने झालेले आढळत नाहीत. तर ते समाजात, एकाच वेळी आढळू शकतात. ते एकाच व्यक्तीतही आढळू शकतात. धर्माचे सामाजिक कार्य मात्र चालूच राहते.
विज्ञानाचा प्रभावः
सतराव्या शतकापासून वेगाने विकसित होणाऱ्या विज्ञान-तंत्रज्ञानाने विसाव्या शतकात प्रगतीचे शिखर गाठलेले आहे. त्याचा परिणाम म्हणून मूल्यव्यवस्थेसहित समाजाच्या सर्वच अंगांत मूलभूत परिवर्तन घडून आलेले आहे. कुटुंब-व्यवस्था व अर्थव्यवस्था यांतही मोठे बदल घडून आलेले आपण पाहतो. सामाजिक धारणा, सामाजिक आवश्यकता यांतही मोठे परिवर्तन झालेले आहे. विज्ञानाच्या अल्पशा प्रगतीमुळे जगातले फार मोठे अज्ञान नाहीसे झाले असून जगात घडणाऱ्या विविध घटनांमागील कार्यकारणभावाचे ज्ञान माणसाला होऊ लागलेले आहे. माणूस अधिकाधिक विचार करू लागला आहे व त्याच्या परिणामी समाजात उत्तरोत्तर बुद्धिवादाचा प्रभाव वाढत आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाला सुख प्राप्त करून देणारी अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. या सुखसाधनांच्या साहाय्याने माणसाचे दुःख कमी होऊन सुख वाढत असल्याचे दिसते. आधुनिक जगात देवभोळेपणाची जागा विवेकावर आधारित विचारसरणी घेत असल्याचे जाणवत आहे. निसर्गाचे पुस्तक आपण वाचू शकतो व त्यातील ज्ञानाचा आपल्या स्वार्थासाठी आपण वापर करू शकतो, असा आत्मविश्वास माणसाला प्राप्त झाला. निसर्गावर विजय मिळविण्याचे स्वप तो बघू लागला. असा विजय मिळविण्याच्या प्रयत्नात त्याने निसर्गाला समजावून घेण्याचे नाकारले. बदलत्या मूल्यव्यवस्थेमुळे सार्वजनिक सुखापेक्षा स्वसुखाला अतिरिक्त महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे समाजात अविश्वास, तृष्णा, असुरक्षितता या गोष्टी वाढल्या. त्यामुळे मानवाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
आधुनिक युगात जुनी दुःखे नाहीशी झाली, परंतु त्यांच्या जागी नवी दुःखे निर्माण झाली; जुन्या आजारांवर उपाय सापडले, परंतु नवीन असाध्य आजार उद्भवले; व्यक्तिस्वातंत्र्य आले, पण अविश्वास, असुरक्षितता वाढली; भौतिक विकास झाला, पण मानसिक तणाव वाढले; जीवन गतिमान बनले, पण जीवघेणे प्रदूषण व ट्रॅफिक जाम वाढले; स्वविकासाची संधी प्राप्त झाली, पण आधाराची भावना संपुष्टात आली; व्यक्तित्वविकास होत आहे; पण माणसाची सामाजिक भावना नष्ट होत आहे, स्पर्धेतून विकास झाला, पण तिच्यातून संघर्षही पेटले; मानवी जीवन महत्त्वाकांक्षी बनले, पण वैफल्यग्रस्तताही तितकीच वाढली. विज्ञान व सामाजिक आवश्यकताः
वरील विवेचनावरून आजच्या सामाजिक व्यवस्थेत मूलभूत परिवर्तन घडून आलेले आहे, हे स्पष्ट होण्यासारखे आहे. जुन्या समस्या व दुःखे यावर उत्तरे शोधण्यात माणसाला यश मिळाले परंतु त्याच्यासमोर आज नवीन सगरया निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे जीवनातील अनिश्चितता, असुरक्षितता, वैफल्यग्ररतता या बाबी आधुनिक युगातही जाणवू लागल्या आहेत. गानवी रागाजाच्या अस्तित्वासाठी व प्रगतीसाठी त्यावर उत्तर सापडणे आवश्यक आहे, यात शंका नाही. प्राचीन काळात धर्माने यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्याचे आपण पाहतो. आधुनिक युग हे विज्ञानाचे आहे. कोणत्याही प्रश्नांवर उत्तरे शोधताना आपण विज्ञान तंत्रज्ञानाकडे आशेने बघतो. परंतु विज्ञान हे एक साधन आहे. त्याच्या वापराची पद्धती त्या त्या समाजाची संस्कृती ठरवत असते. विज्ञानाच्या या स्वरूपामुळे ते माणसाच्या वैफल्यग्रस्त मनाचे सांत्वन करू शकत नाही अन् त्याच्या जीवनाला भावनिक आधारही पुरवू शकत नाही. हे सर्व कार्य सामाजिक संस्था करीत असतात. त्यांतही धर्माचा वाटा महत्त्वाचा असतो. आजच्या वैज्ञानिक युगातही धार्मिकता वाढत असल्याचे दिसते ते यामुळेच. तथापि नवीन वैज्ञानिक प्रगती व नवीन मूल्यव्यवस्था यांच्या पार्श्वभूमीवर धर्माचे स्वरूपही बदलणे स्वाभाविक आहे. बदलता समाज व त्याच्या बदलत्या आवश्यकता यानुरूप धर्माची संरचना व व्यवस्था यातही बदल होताना दिसतात.
धर्माच्या स्वरूपातील बदल:
पूर्वीचा धर्म हा ढोबळ स्वरूपाचा होता. त्याला अज्ञान, अंधश्रद्धा, मनःकल्पना, गूढता, पारलौकिकत्व यांचा प्रमुख आधार होता. आधुनिक युगात धर्माचे ढोबळ स्वरूप नाहीसे होत आहे. त्याचे अज्ञानमूलक आधार नाहीसे होऊन नवे बौद्धिक आधार शोधण्यात येत आहेत. तर्काचा आधार घेऊन धर्मकल्पना सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वैज्ञानिक ज्ञानाला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे आध्यात्मिक किंवा धार्मिक ज्ञान विज्ञानाशी कसे सुसंगत आहे किंवा हे ज्ञान धर्माला वैज्ञानिक विकासापूर्वीच कसे ज्ञात झालेले आहे, हे सिद्ध करण्याची धार्मिकांमध्ये अहमहमिका लागलेली असते. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त किंवा अल्बर्ट आईन्स्टाइनचा सापेक्षतावाद हेही धर्मप्रणीत ग्रंथांत कसे व्यक्त झालेले आहेत, हे पटवून सांगितले जाते. ऋग्वेदातील नासदीय सूक्तात इळस इरपस ढहशी ची संकल्पनाच प्रतिपादिली आहे, हे सिद्ध करण्याचे प्रयत्न झालेले आहेत, हे आपण जाणतोच. आमच्या अद्वैत तत्त्वज्ञानातून ए = चउ२ च्या मागचे सत्यच कसे ध्वनित होते, हे सांगण्याचा प्रयत्न होतो. कर्मसिद्धान्त हा कसा वैज्ञानिक आहे व तो तर्कदृष्ट्या कार्यकारण नियगाचा आविष्कार म्हणून कसा सिद्ध होतो, हे सांगण्याचा नित्य प्रयत्न होत असतो. धर्गग्रंथांचे व त्यातील संकल्पनांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण हे आधुनिक धर्गाचे एक गहत्त्वाचे वैशिष्ट्य बनलेले आहे. ईश्वराची कल्पना अमूर्ततेकडे जात आहे. त्यामुळे ती विज्ञानातीत कशी आहे, हे दाखविता येणे शक्य होत आहे. साहजिकच ईश्वराबाबतीत विज्ञान काही भाष्य करू शकत नाही हे ओघाने आलेच. ईश्वर हा तर्काने सिद्ध करता येतो असेही काही धर्मवाद्यांचे प्रतिपादन असते. हा अमूर्त ईश्वर अनेक रूपांमध्ये अवतरून सृष्टिसंचालनादि कार्ये पार पाडतो अशी धर्मवाद्यांची श्रद्धा असते. अशा ईश्वरावर अवलंबून राहून आपले दुःख, वैफल्य, असुरक्षिततेची भावना, पापकृत्यामुळे मनाला लागलेली टोचणी यांपासून आधुनिक माणूस स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतो. अशा ईश्वराचे ज्ञान व मध्यस्थी करण्यासाठी अनेक बुवा, बाबा, बापू आपली दुकाने उघडून बसतात. भाविक लोकही आर्थिक मूल्य देऊन शांति-समाधान विकत घेत असतात. एकंदर धर्माचा धंदा जोरात सुरू असतो. ठरावीक धर्मविधी पार पाडणारे लोक मार्केटमध्ये उपलब्ध होत आहेत. परंतु बऱ्याच धार्मिक विधि-विधा सोप्या होत आहेत. मूर्तिपूजा शिल्लक असली तरी विभिन्न देवतांचे वेगवेगळे अस्तित्व व वैशिष्ट्ये आजच्या धार्मिक माणसांसाठी महत्त्वाचे ठरत नाहीत. आधुनिक माणूस विशिष्ट देवतांचा किंवा संप्रदायाचा अभिमानी असण्याची शक्यता कमी होत आहे. विशिष्ट देवता म्हणजे वैश्विक देवापर्यंत पोचण्याचे एक माध्यम अशी त्याची धारणा आहे. धर्मविचारही सामान्यरूप धारण करीत आहेत. बल, माया, आत्मा ह्यांसारखे इंद्रियसंवेदनांच्या पलीकडचे विषय धर्मविचारांत मुख्यत्वे आढळत असले तरी मानवी जीवनातील ऐहिक, पंचविषयात्मक विषयही धर्मविचाराचा भाग बनत आहेत. हा धर्म पूर्वीच्या धर्माइतका अफूची गोळी असू शकत नाही. तो विज्ञानाशी भांडणही करू इच्छित नाही. धर्माचे वैयक्तिक पातळीवर पालन व सर्वधर्मसमभाव ही तत्त्वे आता धार्मिक लोकही मान्य करीत आहेत. विज्ञानाला
अज्ञात असणारे क्षेत्र व विज्ञानाचे विषय नसणारी ऐहिक जीवनातील वर्तनाची आधारतत्त्वे हीच धर्माचे कार्यक्षेत्र बनत आहेत.
सर्वच ऐहिक बाबी आज धर्माने नियंत्रित होत नाहीत. धर्माचे क्षेत्र आता अतिशय संकुचित बनत आहे. असे म्हणत असताना इस्लामी दहशतवाद, हिंद-मुस्लिम दंगली या आपल्या दृष्टिआड होण्याचे कारण नाही. तथापि या बाबी आता कालबाह्य होणे निश्चित आहे. ज्ञान व द्धिवाद यांचा प्रसार व प्रचार जसजसा होईल तसतसा धर्माचा प्रभाव व प्रभावक्षेत्र कमीकमी होईल, यात शंका बाळगण्याचे कारण वाटत नाही.
धर्माचे अनिष्ट प्रभावः
वरील विवेचनावरून ‘धर्म’ ही सामाजिक संस्था बदलत्या काळानुसार व बदलत्या सामाजिक आवश्यकतेनुसार स्वतःच्या संरचनेत व व्यवस्थेत बदल घडवून आणत असते, हे स्पष्ट होते. हा बदललेला धर्म बदलत्या सामाजिक व्यवस्थेत आपले कार्य पार पाडत असतो. तथापि धर्माची कार्ये व प्रभाव एवढ्यावरच थांबत नाही. धर्म माणसाला त्याच्या विहित कार्यात शिथिल बनवू शकतो. संकटकाळात हालचाल करण्याऐवजी ईश्वर नावाच्या सर्वशक्तिमान अस्तित्वाच्या खांद्यावर मान टाकून स्वस्थ बसण्याकडे माणसाचा कल होतो. ईश्वर व कर्मसिद्धान्त यामुळे परिस्थिती सुधारण्याची प्रेरणा मिळत नाही. ईश्वर नावाच्या इंद्रियातीत अस्तित्वामुळे इतरही गूढांचा; शक्तींचा आश्रय घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. त्याच्या परिणामी सध्याच्या ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर शकुन-अपशकुन, मुहूर्त, गूढशक्ती यासारख्या अंधश्रद्धा व गूढकल्पना आजच्या सुशिक्षित मनांवरही प्रभाव गाजवतात. फलज्योतिष, वास्तुशास्त्र यांसारख्या निराधार थोतांडांनाही आजच्या समाजात चांगलीच प्रतिष्ठा मिळताना दिसते. सिद्धिविनायकासारख्या मंदिरांत लांबलचक रांगा आपण नित्य अनुभवत असतो. आज शिक्षित म्हणविल्या जाणाऱ्या पिढीतही या निराधार बाबींचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवत असते. अमिताभ बच्चन व संजय दत्त यांची देवदर्शने आणि अभिषेक दूरदर्शनवर तमाम जनतेने पाहिली आहेत. विवेकाधारित नीतिमूल्यांपेक्षा बुवा, बाबा यांच्या आज्ञा महत्त्वाच्या ठरतात. कारण अश्या आज्ञा ईश्वरप्रेरित असतात असा धार्मिक लोकांचा विश्वास असतो. आणि ईश्वर हा विवेकबुद्धीच्याही पलीकडे असल्यामुळे या धर्माज्ञा विवेकापेक्षा वरचढ ठरणे स्वाभाविक ठरते. बुवा-बाबा यांच्या आज्ञेपुढे सत्य, प्रामाणिकपणा, सहानुभूती, समता, बंधुता, माणुसकी, न्याय अशा मूल्यांची मातब्बरीही धार्मिकांना वाटत नाही. एकदा बाबा-बुवा-बापू संतुष्ट झाले की मग अप्रामाणिपणा, भ्रष्टाचार, स्वार्थीपणा, संवेदनशून्यता, श्रेष्ठत्वाचा अहंकार, इतरांना तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती यांसारख्या बाबीही पाप ठरत नाहीत. उलट भ्रष्ट व्यवहाराद्वारे प्राप्त झालेल्या धनाचा वाटा या बाबा-बुवा यांच्या माध्यमातून ईश्वराला समर्पित करण्यातून किंवा बाबा-बुवांच्या सत्संगात राहून किंवा त्यांची सेवा करून किंवा सिद्धिविनायकासारख्या कोणत्यातरी देवतेचे दर्शन घेऊन केलेल्या पापांचे परिमार्जनही करता येते.
धर्म व विवेकवादः
या पार्श्वभूमीवर विवेकवादी चळवळीसमोरील आह्वाने किती अवघड आहेत, याची जाणीव होते. विवेकवादी चळवळ धर्मश्रद्धांना नेहमीच धक्का देत असते. जेवढा पुरावा तेवढा विश्वास हे या चळवळीचे सूत्र असते. धर्म ज्या ईश्वरसंकल्पनेवर अधिष्ठित असतो, त्या ईश्वराच्या अस्तित्वाला पुरावा नसल्यामुळे विवेकवादी चळवळ नास्तिक असते. ही चळवळ विवेकवादी दृष्टिकोणाचा प्रसार-प्रचार करण्यास कटिबद्ध असते. तर्क व युक्तिवाद या हत्यारांनी ते धर्माच्या मूळ आधारांवर प्रहार करण्याचे प्रयत्न करतात. परमेश्वराला रिटायर करण्याचे आवाहन करतात. युक्तिवाद व तार्किक मांडणी यांत विवेकवादी नेहमीच प्रभावी ठरतात. त्यामुळे ते तर्क व युक्तीने धर्माच्या मूळ आधारांना विचलित करू शकतात. धर्माचा आधारच जर नष्ट केला तर धर्म आपोआपच निष्प्रभ होईल, अशी विवेकवाद्यांची धारणा असते. तथापि प्रत्यक्षात असे होत नाही. एखादी व्यक्ती धर्माला मानते कारण तिचा धार्मिक संकल्पनांवर विश्वास किंवा श्रद्धा असते म्हणून. धर्म हा तर्कावर अधिष्ठित आहे किंवा नाही; तो प्राव्यावर टिकतो किंवा नाही, या बाबी तिच्यासाठी महत्त्वाच्या नसतात. त्यामुळे धर्मकल्पनांचे खंडन केले तरी धार्मिक माणसावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. धर्म व ईश्वर तर्काच्या पलीकडे असल्यामुळे त्यांना तर्काने खंडित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी धार्मिक माणसाची गाढ श्रद्धा असते. विवेकवाद्यांचे सर्व युक्तिवाद अशा माणसाच्या दृष्टीने निरर्थक व उपेक्षणीय असतात. त्यामुळे विवेकवाद्यांच्या प्रसार-प्रचाराने धर्म नष्ट होणे किंवा ईश्वर रिटायर होणे कठीण आहे. धर्म ही एक सामाजिक आवश्यकता असल्यामुळे तो नष्ट झाला तर या सामाजिक गरजेचे काय ? धर्माच्या अभावाने निर्माण होणाऱ्या पोकळीचे काय करायचे? हे खरे प्रश्न आहेत. विवेकाने धर्माला असिद्ध करता येते; पण पर्याय देता येत नाही. या जगात आजही अनेक रहस्ये आहेत त्याची उत्तरे आजही विज्ञानाला देता येत नाहीत. या अज्ञात विश्वाच्या पोकळीतील अंधकार माणसाला भिववीत असतो. धर्म त्याच्या पद्धतीने या रहस्यांचा भेद करीत असतो. त्याची उत्तरे वैज्ञानिक कसोट्यांवर टिकत नसतीलही, परंतु धर्म माणसाला भावनिक आधार देतात, हे निश्चित. धर्म नसेल तर माणसाच्या सामाजिक-मानसिक गरजांचे काय हा विचारवंतांपुढील महत्त्वाचा प्रश्न आहे. कटु वास्तवाला सामोरे जाण्याचे व त्याचा स्वीकार करण्याचे धाडस सामान्य माणसात नसते. सामान्य माणसाचे सोडा, अॅण्टनी फ्लू (जन्मभर नास्तिकवादाचा प्रसार करणारे), ग. प्र. प्रधान, मे. पं. रेगे यांच्यासारखे विचारवंतही त्यांच्या अखेरच्या काळात आस्तिकवादाकडे झुकल्याचे दिसतात. त्यांच्या विचारपरिवर्तनाचे कोणतेही ठोस कारण त्यांना देता आलेले नाही, हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे.
धर्मः एक सामाजिक आवश्यकता :
वरील विवेचनावरून नजिकच्या भविष्यात धर्म नष्ट होणे शक्य वाटत नाही. जोपर्यंत जीवनाची अनिश्चितता व गूढता नष्ट होत नाही तोपर्यंत धर्माद्वारे मिळणारा आधार व सांत्वन यांची जरूरी राहणारच आणि तोपर्यंत धर्मही टिकणारच. उलट आजच्या भौतिक विकासातून अजूनच नवीन समस्या व त्यातून नैराश्य, अविश्वास, मानसिक तणाव या गोष्टी उद्भवत आहेत. या गोष्टींपासून सुटका करून घेण्यासाठी माणूस उत्तरोत्तर धर्माचा आधार घेणार हे उघड आहे. विचारवंत मंडळीही याला अपवाद नसतात हे पूर्वोल्लिखित उदाहरणांवरून स्पष्ट होते. धर्माचे व माणसाचे विशिष्ट स्वरूपच धर्माचे मानवी जीवनातील विशिष्ट स्थान निश्चित करीत असते. त्यामुळे धर्माला कोणताही बुद्धिवादी पर्याय देणे अवघड आहे. आधुनिक माणूसही आपल्या चिरंतन मानवी वैशिष्ट्यांनी युक्त असल्यामुळे तो धर्माचा आश्रय घेतल्याशिवाय राहणार नाही.
विवेकवादी भूमिकाः
असे असले तरी विवेकवादी चळवळीचे महत्त्व किंचितही कमी होत नाही. विज्ञान व विवेक यांच्यापुरते धर्मात इष्ट असे बदल होतील. तो अधिकाधिक तर्कसंगत बनेल. त्याचे अज्ञानमूलक आधार कोसळतील व तो नवे बौद्धिक आधार शोधून काढील. त्यामुळे धर्माचे अनिष्ट प्रभाव कमी होण्यास सुरुवात होऊ शकते. आधुनिक धर्म हा नवीन मूल्यांशी व वैज्ञानिक सत्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करू लागतो. विवेकवादाच्या रेट्यामुळे धर्मात होणारे हे परिवर्तन समाजाच्या दृष्टीने हितकारकच असेल. त्या अर्थाने विवेकवादी चळवळ ही आजची सामाजिक गरज आहे, असे म्हणता येईल. तिच्यासमोर आज फार मोठी आह्वाने आहेत. तिला सर्वसामान्यांना विवेकवादाकडे वळवण्याचे काम करावयाचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्वसामान्यांना धर्माची सामाजिकता पटवण्याचे कामही तिला करावयाचे आहे. समाजशास्त्र व इतिहास यांच्या मदतीने धर्म ही संकल्पना ईश्वरप्रणीत नसून ती सामाजिक प्रक्रियेतून अस्तित्वात आलेली एक सामाजिक संस्था आहे, हे पटवून देण्याचे काम ही चळवळ करू शकेल. त्यामुळे समाज हा धर्मासाठी नसून धर्मच समाजाच्या आवश्यकतापूर्तीसाठी अस्तित्वात आलेला आहे, हे सामान्य माणसाच्या मनावर बिंबविता येऊ शकेल. धर्माचा उद्गम कसा झाला हे सामान्य माणसाला पटवून देता आल्यास धार्मिक माणसातील कट्टरता, देवभोळेपणा कगी होण्यास गदत होईल. विवेकवादी चळवळीला हे सर्व साध्य करावयाचे आहे. अज्ञात रहरयांचा उलगडा करण्याचे कार्य विज्ञान सातत्याने करीतच असते. त्याच्या साहाय्याने आपल्याला धर्गाचा प्रभाव कमी करता येणे शक्य आहे. सामान्य माणूस हा पूर्णपणे तार्किक कधीच होऊ शकत नाही. कठोर वास्तवाचा स्वीकार करण्याची त्याची तयारी नसते. त्यासाठी विवेकवादी चळवळीने सामान्य माणसावर मानवी जीवनाविषयीच्या कटु वास्तवाचा सातत्याने मारा केला पाहिजे. त्यामुळे काळाच्या ओघात माणूस या कटु वास्तवांचा स्वीकार करण्यास तयारही होईल. मग त्याला धार्मिक कल्पनांच्या कुबड्यांचा आधार घेण्याची आवश्यकता राहणार नाही. हा परिणाम साधणे सोपे नाही. त्यासाठी फार मोठे परिश्रम व कालावधी लागणार आहे. त्यासाठी विवेकवादी चळवळीला आपले काम सातत्याने व चिकाटीने चालू ठेवण्याची आवश्यकता आहे. या चळवळीला सक्रिय पाठिंबा देऊन तिला प्रोत्साहित करणे हे प्रत्येक सुजाण व्यक्तीचे कर्तव्य आहे. नजिकच्या भविष्यात धर्म जरी नष्ट झाला नाही तरी त्याचे अनिष्ट प्रभाव कमी करणे एवढे तरी विवेकवादाला शक्य आहे, असे मला वाटते.
प्लॉट ३२, सुभाषनगर, हॉटेल अश्वमेधच्या मागे, एम.आय.डी.सी. रोड, लातूर ४१३ ५३१.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.