झापडबंद ‘विज्ञान’

डॉ. जॉन स्नो हा लंडनमध्ये काम करणारा वैद्य आणि पॅथॉलजिस्ट (विकारवैज्ञानिक) होता. कॉलरा (पटकी, हैजा) हा रोग पिण्याच्या पाण्यातील जंतुदोषातून पसरतो, हे त्याने दाखवून दिले. मध्य लंडनच्या नकाशावर त्याने रोगाचे प्रभाग व मारकता जास्त असलेली क्षेत्रे रेखली, आणि त्यातून निष्कर्ष निघाला की ब्रॉड स्ट्रीट पंप हा भूमिगत पाणी उपसणारा पंप रोगाचे मूळ होता. आपण सुचवत असलेले पाणी व रोग यांच्या संबंधाबाबतचे तत्त्व सुस्थापित करण्यासाठी स्नोने प्रत्येक आणि प्रत्येक विसंगत उदाहरण तपासून त्याचे स्पष्टीकरण शोधले. दूरवरचे रोगी, रोगाच्या प्रसारातले चढउतार, सारे मूळ तत्त्वाच्या मदतीने स्पष्ट करत आकडेवारीच्या गोंधळातून व्यवस्थित चित्र रेखले. त्याचा अहवाल हा आजही काळजीपूर्वक केलेल्या निरीक्षणाचे अभिजात उदाहरण मानला जातो. अहवाल सरकारकडे पोचताच ब्राँड स्ट्रीट पंप चालवायचा दांडा जप्त केला गेला, आणि १८५४ सालची लंडनमधील कॉलऱ्याची साथ आटोपली. स्नोचा अभ्युपगम (hypothesis) जगाने ताबडतोब तपासला, वापरला आणि तो सिद्ध झाला.
असाच एक अभ्युपगम डॉ. एडवर्ड जेनरने देवीच्या रोगाबाबत सुचवला. गाई दोहणाऱ्या स्त्रियांना जर काऊपॉक्स (Cowpox) हा गाईपासून होणारा रोग होऊन गेला असेल, तर त्यांना देवीचा रोग (smallpox) होत नाही; हा जेनरला सुचलेल्या तत्त्वाचा पाया. एखाद्या रोगाचे सौम्य रूप भोगणे खुद्द रोगापासून संरक्षण देते. लसीकरणाचे अनेक प्रकार, मानवी शरीरे रोगांशी कशी लढतात याबाबतच्या प्रतिरक्षाशास्त्राचा (Immunology Mm) अभ्यास, सारे जेनरच्या तत्त्वावरच उभे आहे. जेनरने मनातच काऊपॉक्स भोगलेल्या व्यक्तींची तो रोग न भोगलेल्या व्यक्तींशी तुलना केली. आजच्या औषधांच्या तपासणीच्या तंत्रांमध्ये काही रोग्यांना प्रत्यक्ष औषध दिले जाते, तर उरलेल्यांना निरुपयोगी पण औषधासारख्या प्लासीबो (placebo) गोळ्या किंवा द्रवे दिली जातात. या व्यक्तींच्या निवडीतून फरकांचे नियंत्रण करत फक्त औषध असणे-नसणे हाच फरक राहतो. इतर बाबतींत दर औषध घेणाऱ्या व्यक्तीसारखीच दुसरी व्यक्ती प्लासीबो घेते. हे सर्व तंत्र जेनरच्या अभ्यासातून घडले आहे. जीवनसत्त्वांच्या कमतरतेचे परिणाम अशा अभ्यासांमधूनच कळले. आज नव्या औषधांचा तपास करणे, अगदी प्राथमिक अवस्थेत कर्करोगांचे निदान करणे, वगैरे या तंत्रांनीच केले जाते.
स्नोने परिसर तपासले तर जेनरने व्यक्ती तपासल्या. या दोन्ही पद्धती संशोधनात उपयुक्त आहेत, परंतु कोणत्या परिस्थितीत कोणती पद्धत वापरावी हे मात्र ठरवावे लागते. खऱ्या वैज्ञानिक तपासात दोन्ही पद्धती वापरत जी पद्धत उपयुक्त निष्कर्षांपर्यंत नेते तिचा पाठपुरावा करावा लागतो, तर दुसरी सोडून द्यावी लागते.
पुढील उदाहरण वैज्ञानिक मनोवृत्ती त्यागण्याचे गंभीर दुष्परिणाम दाखवते.
१९९५ सालच्या उन्हाळ्यात शिकागो शहरात एक तीव्र उष्मालहर (heat wave) आली. उच्च तापमानासोबत हवेत आर्द्रताही फार जास्त होती, आणि ओझोन वायूही. १४ जुलै-२० जुलै या आठवड्यात त्या आठवड्याच्या सरासरीपेक्षा एक हजार जास्त माणसे उष्माघातावरील उपचारांसाठी इस्पितळांमध्ये दाखल केली गेली. अनेकांच्या शारीरिक व्यवस्था कायमच्या जायबंदी झाल्या, तर काहींना इस्पितळे वाचवू शकली. शेकडो माणसे इस्पितळांमध्ये पोचण्याआधीच गतप्राण झाली. त्या आठवड्यातील मृत्यूंची संख्या उन्हाळी सरासरीपेक्षा ७३९ ने जास्त होती. शवविच्छेदने खूप मागे पडली. मांसाच्या वाहतुकीसाठीच्या शीतगाड्या (refrigerated trucks) शवागार म्हणून वापराव्या लागत होत्या. मरणारे बहुतेककरून वयस्क व गरीब होते.
उष्णतेने वीजपुरवठा खंडित झाला. वातानुकूलन यंत्रे, लिफ्ट्स वगैरे बंद पडल्याने उंच इमारतीमधील रहिवाशांना खाली आणावे लागले. यात श्रीमंतही होते. मुलांनी रस्त्यांवरील अग्निशमन नळ सोडून ठेवल्याने पाण्याचा तुटवडा पडला. वापरही थेट दुप्पट होत होता.
हवामानखात्याने या घटनेआधी शिकागोच्या नागरिकांना भरपूर पाणी प्या, थंड जागा शोधून त्यांचा वापर करा, वातानुकूलन यंत्रे वापरा, दगदग टाळा, इत्यादी सूचना दिल्या होत्या. परंतु उष्माघाताने मरणाऱ्यांपैकी अनेक लोक वयस्क होते, व दारेखिडक्या बंद करून तापलेल्या घरांमध्ये राहात होते. शेजायांनी थंड घरे, वातानुकूलित दुकाने, अशा जागी येऊन राहण्याच्या सूचना करूनही हे लोक भट्ट्यांसारख्या स्वतःच्याच खोल्यांमध्ये राहात होते.
या घटनेनंतर सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) या संस्थेचे अनेक शास्त्रज्ञ पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी काय करता येईल ते तपासायला शिकागोत आले. त्यांनी प्रत्येक मृत व्यक्तीच्या वयाची, लिंगाची, आर्थिक स्तराची वाचलेली व्यक्ती शोधून जोड्या ठरवल्या. प्रत्येक मृत व्यक्तीला एक स्वैरपणे निवडलेली समान पार्श्वभूमीची व्यक्ती जोडून फरक तपासले. एका वेळी ऐंशी संशोधक हे काम करत होते. त्यांचे हे परिश्रम मात्र वाया गेले, कारण त्यात तसे काही आढळले नाही.
मरणाऱ्या व्यक्तींकडचे पाणी संपले, वातानुकूलन यंत्रे बंद पडली, त्याना इतर थंड जागा सापडल्या नाहीत, त्यांची चौकशी करून मदत करणारे कोणी नव्हते, अशा उघड बाबीच नव्याने पुढे आल्या. वाचणाऱ्यांना पाणी, थंडी, मदत मिळाली होती, हेच पुन्हा समजले. हे निरर्थक ज्ञान होते. हवामानखात्याने आधी दिलेल्या सूचनांची ती पुनरुक्ती होती. खरे तर या ‘अभ्यासा’ने सारा दोष मृतांवर टाकला, की सूचना न पाळणारे मेले! आणि हा अभ्यास कोणत्याही टीकेशिवाय प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकांनी प्रकाशितही केला.
मूळचा शिकागोचा, पण या घटनेच्या काळात न्यूयॉर्कमध्ये राहणारा एरिक क्लायनेनबर्ग हा समाजशास्त्रज्ञ मात्र वेगळ्या वाटेने गेला. तो नुकताच पदवी घेत असलेला तरुण होता. त्याला जाणवले की काही क्षेत्रांमध्ये इतर क्षेत्रांपेक्षा उष्माघाताने मरणाऱ्यांचे प्रमाण बरेच जास्त होते. तो जॉन स्नोच्या अंगाने विचार करू लागला. त्याने व्यक्तींच्या जोड्यांमधले फरक न तपासता पेठांचे, मोहल्ल्यांचे फरक तपासायला घेतले. त्याने उत्तर लॉनडेल आणि दक्षिण लॉनडेल (North and South Lawndale) या पेठांची तुलना केली. दोन्हींचे हवामान सारखे होते. एकट्याने राहणाऱ्या वयस्क व्यक्तींचे प्रमाणही सारखे होते. पण उत्तर भागात लाखामागे चाळीस लोक मेले, तर दक्षिण भागात लाखामागे चारही माणसे मेली नाहीत. हा फरक कशामुळे पडला हे क्लायनेनबर्गने तपासले. लोकसंख्या, इतिहास, मुलाखती अशा अभ्यासाचे निष्कर्ष त्याने हीट वेव्ह : अ सोशल ऑटोप्सी ऑफ डिझास्टर इन शिकागो या पुस्तकात मांडले, उत्तर लॉनडेलमधले वयस्क लोक फारसे घराबाहेर पडतच नसत, कारण जिथे जावे अशा जागाच नव्हत्या, दुकाने, सामाजिक संस्था यांच्या बाबतीत ते एक वाळवंटच होते. यामुळे वातानुकूलित दुकानामध्ये आश्रय घेऊ देणारे कोणी ओळखीतले दुकानदारच नव्हते. बरे, या भागात घरफोड्यांचे प्रमाण जास्त असल्याने लोक घर रिकामे सोडून बाहेर जायला उत्सुक नसत. अनोळखी माणसांबद्दल या क्षेत्रात भीतीच असे, मग ती माणसे मदत देऊ करणारी का असेनात. समाज असा नव्हताच. अडचणींच्या काळात दारेखिडक्या बंद करून बसणे, हाच एक मार्ग वापरात होता. दक्षिण भागाचे चित्र नेमके उलटे होते. वयस्कांना घराबाहेर पडण्याची सवय होती. बाहेर पडल्यानंतर जाण्यासारखी स्थळे होती. शेजारचे दुकानदार ओळखीचे होते, व या वयस्कांनी दुकानातील कृत्रिम थंडीचा लाभ घेणे त्यांना मान्य होते. या दुकानांमध्ये पाणीही होते. घरी येणारे अनेक जण चौकशीसाठी येणारे परिचित असणे सवयीचे होते. जोमदार समूह जसे वागतील, तसे आपत्तीच्या काळात दक्षिण लॉनडेलवासीयांचे वागणे होते.
क्लायनेनबर्गने या फरकाची ऐतिहासिक कारणे अभ्यासली. सारा खेळ दोन विभागांमधील लोकसंख्या दाटीतील तीव्र फरकाचा होता. उत्तर लॉनडेलचे बहसंख्य निवासी उपनगरांमध्ये गेले होते, आणि त्यांची जागा इतर ठिकाणांहून आलेल्यांनी घेतली नव्हती. त्या क्षेत्रातले उद्योग इतरत्र गेले होते, किंवा बंद पडले होते. मोहल्लाभर मोकळे प्लॉट होते. वस्ती विरळ असल्याने दुकाने व व्यापार यांना वाव नव्हता. यामुळे शहरात राहायला येणारे ही पेठ निवडून तिथे येत नसत.
याउलट दक्षिण भागात वस्ती दाट राहिली व नवे लोक तेथे येत राहिले इतके, की त्या भागात रिकाम्या निवासांचा तुटवडा होता. उत्तर लॉनडेलच्या रिकामपणा’च्या तुलनेत ही गौण समस्या होती. क्लायनेनबर्गला शिकागोच्या आपत्तिव्यवस्थापनाच्या योजनेत बऱ्याच तरल बाबी आढळल्या. सामाजिक विभागातील माणसे खर्च कमी करण्याच्या नावाने कमी केली गेली. पोलीस व अग्निशमन दल आपत्कालीन स्थितीत नगरसेवकही बनतील, असे मानले गेले. त्यांना अशी कामे करण्याचे प्रशिक्षण द्यावे, असे आपत्तिव्यवस्थापन विभागाने फर्मान काढले होते. त्यामुळे असे प्रशिक्षण केले गेलेच आहे, असे मानले गेले. हा शासनाचा ‘नव्या रूपांत’ केला गेलेला विचार होता, नगरशासनाला नफा कमावणाऱ्या उद्योगासारखे मानणारा, पोलीस व अग्निशमन दलांची ‘मर्दानगी’ची, रलहे, प्रतिमा त्यांना सामाजिक कार्यकर्ते होऊ देत नव्हती, मग ते नवशिक्ये असोत की विभागप्रमुख असोत. रोगनियंत्रणाच्या केंद्रीय संस्थेची या प्रकरणातली भूमिका आश्वासक नाही. त्यांच्या संशोधनाची दिशा अयोग्य होती, आणि हे त्यांना जाणवलेही नाही. पणही कहाणी सांगण्यात माझा हेतू उऊ वर टीका करण्याचा नाही. खुल्या मनाचा एक संशोधक ऐंशी तज्ज्ञांपेक्षा परिणामकारक कसा ठरला, हेही दाखवण्यात मला रस नाही.
मला त्या ऐंशी संशोधकांच्या मनांत काय चालले होते याबद्दल कुतूहल आहे. मला ते कुतूहल शमवणे महत्त्वाचे वाटते. एन्रॉन ही ऊर्जाक्षेत्रातील कंपनी खोट्या हिशोबांच्या ‘उत्सवा’ नंतर कोलमडली. भिारतात ती समुद्रात बुडवणे-न बुडवणे व भारनियमन यांसाठी बदनाम आहे! सें.. या कंपनीच्या संचालकांना काँग्रेसने (अमेरिकन ‘लोकसभा’) तुम्ही हे कसे घडू दिले, असे विचारले. काही जण म्हणाले की त्यांना गैरव्यवहार होत आहे याची शंका होती, पण सहकाऱ्यांना विरोध करणे त्यांनी टाळले. आता CDC च्या ऐंशी संशोधकांकडे वळू. कोणत्याही ऐंशी अमेरिकनांमध्ये काही जण तर बुद्धिमान आणि साशंक असणारच. मग सर्व ऐंशी जणांनी घाईने वातानुकूलन व पाणी नसले तर उष्माघात होतो, हा निष्कर्ष कसा काढला? त्यांना जेनरची सांख्यिकीय पद्धत माहीत होती, तर स्नोची परिसरकेंद्री पद्धत का माहीत नव्हती? असे विचारू या का, की त्यांच्यात एकही संभाव्य क्लायनेनबर्ग का नव्हता? एकानेही अयोग्य अभ्यासपद्धतीवर आक्षेप का घेतला नाही ? जर असा आक्षेप घेतला असता तर काय झाले असते ? आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीला ‘कटकट्या’ म्हणून वाळीत टाकले गेले असते का ? त्यांच्या वेगळे मत नोंदण्यातून काय घडेल अशा अपेक्षा होत्या ? त्यांचे पर्यवेक्षक पदव्यांसाठी निवडले गेले होते, की ज्ञान, शाहाणपण या धैर्यासाठी? या साऱ्या गोष्टी वैज्ञानिक वृत्तीच्या गाभ्याशी जाऊन पोचतात. त्या नसल्या तर खरीखुरी आपत्ती ओढवते. असे आपण होऊ द्यायला नको.
[जेन जेकब्स ही अमेरिकन, पण आज कॅनडियन झालेली वास्तुविशारद व नगररचनाशास्त्रज्ञ आहे. तिच्या डार्क एज अहेड, जीज्ञ असश अहशरव (रँडम हाऊस, २००४) या पुस्तकातील सायन्स अॅबन्डन्ड या प्रकरणातील हा उतारा.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.