सॉलिप्सिझममधले धोके

[आधुनिकोत्तरवादी विचारांचे दुष्परिणाम कधीकधी आत्यंतिक व्यक्तिनिष्ठेच्या रूपात असतात. त्यामुळे आत्यंतिक व्यक्तिनिष्ठा धोकादायक का, हे दाखवायचा हा प्रयत्न तुला भीती ही कसली वाटते रे?: (चित्रपट: नई देहली)
“तुला जर भविष्याचं चित्र हवं असेल, तर एका मानवी चेहेऱ्याला चिरडणारा बटाचा पाय नजरेपढे आण नेहेमीसाठी.”
ओब्रायन विन्स्टन काहीतरी बोलेल अशा अपेक्षेने थांबला. विन्स्टन स्ट्रेचरमध्ये शिरायचा प्रयत्न करत असल्यासारखा आक्रसला. काही बोलू शकला नाही. हृदय थिजल्यासारखे झाले होते, त्याचे. ओब्रायन पुढे बोलायला लागला. “आणि लक्षात ठेव नेहेमीसाठी. बुटाला चिरडायला नेहेमीच चेहेरा असेल. पाखंडी, समाजाचा शत्रू नेहेमीच असेल आणि त्याला वारंवार लाचार करून हरवलं जाईल.”
कधीतरी १९५८-५९ साली (कॉम्रेड !)यशपालने केलेले नाइन्टीन एटीफोरचे भाषांतर वाचण्यात आले हिंदीतून. त्यातला हा उतारा. आजही जर कधी नई देहली सिनेमातल्या गाण्यामधला प्रश्न विचारला गेला, की “तुला भीती ही कसली वाटते, रे, तुला भीती ही कसली वाटते?” तर माझ्या मनात उत्तर येते ‘रूम १०१’. नाइन्टीन एटीफोर च्या जगातली सर्वांत भीषण जागा!
एक अल्पसंख्य गट सामूहिक हषारीने इतर साऱ्या समाजाला गुलामगिरीत ठेवतो. राजकीय विश्लेषणाच्या भाषेत ‘अल्पसंख्य समूहसत्तावाद’ ऑलिगार्किकल कलेक्टिव्हिझम. असे तीन समाज (महासत्ता म्हणा) मिळून पृथ्वी व्यापलेली आहे. या तीन महासत्ता ज्यादाचे उत्पादन नष्ट करायला एक कधीही निर्णायक न ठरणारे युद्ध खेळताहेत’. बहुसंख्य समाज निरर्थक व्यवहारात गुंतलेला राहील, कधीही सुबत्ता भोगणार नाही, अशी खात्री प्रत्येक महासत्तेतील ‘इनर पार्टी’ सदस्य करवून घेत आहेत. आणि गुलामांमधले अस्वस्थ, असंतुष्ट असे वेचून त्यांची मानहानी करण्यातून सत्तेचा ‘आनंद’ मिळवत आहेत. या मानहानीचा, यातनांचा सर्वोच्च अविष्कार होतो ‘रूम १०१’ मध्ये. प्रत्येकाच्या मनात एक काहीतरी अपार, अविवेकी भीती असते. त्याच्या मानहानीसाठी, त्याला मोडून काढण्यासाठी, तो भयप्रद अनुभव ‘रूम १०१’ मध्ये दिला जातो.
नाइन्टीन एटीफोर चा नायक विन्स्टन स्मिथ याच्यासाठी रूम १०१ मध्ये घुशी असतात. माझ्याबाबतीत काय वापरतील? तुमच्यासाठी?
नाइन्टीन एटीफोर हे नाव बहुतेकवेळा असेच अक्षरांत लिहिले जाते. १९४८ मध्ये जॉर्ज ऑर्वेलने (खरे नाव : एरिक ब्लेअर, जन्म १९०२, मृत्यू १९५०) कादंबरी लिहिली. १९४९ मध्ये ती प्रकाशित झाली आणि वाचक-टीकाकारांच्या अपार कौतुकाच्या गदारोळातच ऑर्वेल १९५० साली वारला.
काही सर्वंकष हुकूमशाहीविरोधी गटांमध्ये कादंबरी दैवत, ‘कल्ट बुक’ बनली. १९८४ पर्यंत इंग्रजीत वर्षाकाठी आवृत्त्या निघत असत. भाषांतरे तर अनेकानेक भाषांमध्ये झाली. १९८४ नंतर जोर ओसरला. ऑर्वेलचे दुःस्वप्न खरे ठरले नाही. अनेकांच्या मते नाइन्टीन एटीफोर लिहिले गेल्यामुळेच खरे १९८४ वेगळे झाले.
पण कादंबरीने इंग्रजी भाषेला अनेक नवे शब्दप्रयोग दिले. ‘आर्वेलियन’ हे विशेषण इंग्रजीत रूढ झाले. ‘डबलथिंक’, ‘न्यूस्पीक’, ‘बिग ब्रदर’ हे शब्दप्रयोग आज मूळ कादंबरी न वाचलेले लोकही सर्रास वापरतात बरेचदा मूळ अर्थाने! त्यातले दमनशाहीचे तत्त्वज्ञान आजही वेगळ्या वाटांनी येऊ शकते, असे खिन्न मनःस्थितीत काही जणांना वाटते. त्या राजकीय तत्त्वज्ञानात एक इतिहासाला, पुराव्यांना सतत कुस्करायचा प्रकार आहे. सर्व लेखी पुरावे पार्टीच्या आजच्या ध्येयधोरणांशी सतत ‘सुसंगत’ करण्याचा प्रकार आहे. लोकांच्या स्मरणात महत्त्वाचे, भरवशाचे काही उरूच नये, अशी तजवीज आहे. भाषेचे शब्दभांडार कमी करत नेऊन काही प्रकारचे विचार करताच येऊ नयेत अशी सोय ‘न्यूस्पीक’ या घडीव भाषेतून केली जाते, अशी कल्पना आहे. कोणाच्याही आयुष्यात खाजगी असे काही राहूच नये, अशी यंत्रणा आहे. मोकळ्या वेळात, संयत, स्वस्थपणे केलेला विचार हे बाद करण्याचा यशस्वी प्रयत्न आहे. लोकांना विचारधारांबद्दलच्या आवडीनिवडी ज्या तीव्रतेने जाणवतात त्यापेक्षा कैकपट तीव्रतेने व्यक्तींबद्दल आवडीनावडी जाणवतात, याचा उपयोग करून घेतलेला आहे.
या यादीतले काही घटक आज थोड्याफार बदललेल्या रूपात जगभरात दिसतात. हा प्रकार ‘रूम १०१’ मधल्यासारख्या अविचारी भीतीला जन्म देत नाही. त्यासाठी घुशी, पाली, साप, आग, पाणी असले काहीतरी वस्तुरूप भौतिक मध्यस्थ लागतात. पण तरीही नाइन्टीन एटीफोर च्या उपांगांना घाबरायलाच हवे! माझ्या बाबतीत या भयप्रद अवस्थेकडे जाणारी एक वाट विज्ञानाबद्दलच्या भीतीमधून फुटते. अगदी तातडीचा धोका नसला तरी ही भीती दोनचार वळणांपुढे भेटणार आहे असे मला वाटते. ती वळणे आणि वाट तपासायचा एक प्रयत्न मी करणार आहे. मेरी मर्जी ! “हा सॉलिप्सिझम नाहीये”
“आणखी एक गोष्ट लक्षात घे सत्ता म्हणजे माणसांवरची सत्ता. शरीरं तर आलीच त्यात, पण महत्त्वाची म्हणजे मनांवरची सत्ता. बाहेरचं जग, वस्तू, पदार्थ, भूतमात्र, मॅटर, यांना महत्त्व नाही. आजच आमची भूतमात्रावर संपूर्ण, अॅब्सल्यूट सत्ता आहे.” ओब्रायन म्हणाला.
आपण स्ट्रेचरला बांधलेले आहोत हे विसरून विन्स्टनने उठायची धडपड केली. याने शरीर इथेतिथे लचकले, येवढेच. तो म्हणाला, “कुठे आहे तुमची सत्ता भूतमात्रावर ? हवामान, गुरुत्वाकर्षण, हेही तुमच्या आटोक्यात नाही. आजार, दुःख, मृत्यू ” ओब्रायनने हाताने विन्स्टनला थांबवले. “अरे मनांवर ताबा आहे म्हणजे भूतमात्रावरही आहेच. वास्तव म्हणतात ते आपल्या डोक्यातच असतं. तुला उमजेल, हळूहळू, की आम्ही वाट्टेल ते करू शकतो. अदृश्य होऊ शकतो. हवेत तरंगू शकतो आत्ता मी साबणाच्या बुडबुड्यासारखा हवेत उडू शकेन, हवं तर. पण माझी तशी इच्छा नाहीये कारण पार्टीची तशी इच्छा नाहीये. तू तुझे जुनाट, एकोणिसाव्या शतकातले निसर्गनियमाबद्दलचे विचार सोड, आता. आज आम्ही निसर्गनियम बनवतो. आम्ही पृथ्वीचे नियंते आहोत.” “नाही आहात ! यूरेशिया, ईस्टेशियालाही जिंकलं नाहीये, तुम्ही.” “काऽऽही महत्त्व नाहीये त्याला. मनात आणलं तर चुटकीसरशी जिंकून घेऊ त्यांना. पण गरजच काय ? ओशिआनिया हेच जग आहे. इतर सारं वास्तवातून बाद करता येतं. फक्त आमचं आहे, हे जग.” “तुम्ही जग म्हणता तो अवकाशातला धुळीचा कण आहे, आणि तुम्ही क्षुद्र, दुबळे मनुष्यप्राणी आहात. अब्जावधी वर्षं तर तुम्ही नव्हताच, या जगात!” “नॉन्सेन्स ! कशी असेल ही पृथ्वी माणसांपेक्षा जुनी ? माणसांच्या जाणिवांमध्ये जे काही आहे, फक्त तेवढंच अस्तित्वात आहे.” “आणि खडकांमध्ये आधीच्या प्राण्यांची हाडं आहेत त्यांचं काय?” “पाहिलीयेस विन्स्टन ती हाडं ? नाही ना? अरे ती एकोणिसाव्या शतकातल्या जीवशास्त्र्यांनी बनवली! माणसांआधी काही नव्हतं, माणसांनंतर काही उरणार नाही, माणसांपलिकडे काही नाहीच.” “तारे आहेत लाखो प्रकाशवर्ष दूर” “काही आगीचे पुंजके, तारे म्हणजे. आम्हाला हवं तर आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ. त्यांना झाकून टाकू. पृथ्वी हे विश्वाचं केन्द्र आहे. पृथ्वीभोवतीच फिरतं, सारं विश्व.” विन्स्टन पुन्हा वळवळला, बोलला मात्र नाही.
त्याच्या मनातले विचार ओळखल्यासारखा ओब्रायन म्हणाला, “कधीकधी विश्व पृथ्वीभोवती नाही फिरत. सागरी प्रवास, ग्रहणांचा अभ्यास, यांच्यासाठी पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं मानणं सोईचं असतं. पण महत्त्व काय, त्याला? हवं तर तारे जवळ आणू आम्ही, हवं तर दूर नेऊ. आमच्या गणितींना जमेल, असं खगोलशास्त्राला दुपदरी करणे. ‘डबलथिंक’ विसरलास का?” विन्स्टन स्ट्रेचरवरच आक्रसला. प्रत्येक मुद्द्याला दाणकन उरार येऊन धडकायचे, सोट्यासारखे. पण तरी आपलेच बरोबर आहे हे चिन्स्टनला खात्रीने माहीत होते. आपल्या मनाबाहेर काही नसरोच, हे ठरवायचा काहीतरी मार्ग असणारच. सारे काही आपल्या मनात, याला तर्कदोष मानले गेले होते ना? काहीतरी शब्दही होता, त्यासाठी विसरला होता विन्स्टन. ओब्रायनचे ओठ अस्फुट स्मितात दुमडले गेले. “सांगितलं ना तुला, की तुला मेटाफिजिक्स येत नाही! तू शोधतोयस तो शब्द आहे सॉलिप्सिझम डेश्रळाळीी आत्यंतिक व्यक्तिनिष्ठ चिद्वाद. पण चुकतोयस तू. हा सगळ्या पार्टीचा भाव आहे, कोणा एकाचा नाही. हा सॉलिप्सिझम नाहीये नेमकं उलटं आहे हे, खरं तर!”
ओशिआनिया महासत्तेच्या ‘इंगसोश’ (इंग्लिश सोशलिझम ?) या पक्षाच्या ‘इनर पार्टी’ या शासकवर्गातील ओब्रायन, हा विन्स्टन स्मिथ या साध्या नागरिकाला काहीतरी ‘पटवून’ देतो आहे. यातनायंत्रे, मनःस्थिती बदलवणारी औषधे, मारहाण, अशा साऱ्या ‘थर्ड डिग्री’च्याही पुढील तंत्रांद्वारे हे ‘समजावणे’ घडत आहे.
कधीतरी विन्स्टनने रोजनिशीत लिहिलेले असते, “स्वातंत्र्य म्हणजे ‘दोन आणि दोन चार’ हे म्हणण्याचं स्वातंत्र्य’. ओब्रायन विन्स्टनला पटवून देतो आहे की पार्टी म्हणेल तेच स्वातंत्र्य आणि या संदर्भातले पार्टीचे घोषवाक्य आहे, ‘फ्रीडम इज स्लेव्हरी’, ‘स्वातंत्र्य हीच गुलामगिरी.’
इथे पार्टीच्या ‘मेरी मर्जी’ तत्त्वाबाबत विन्स्टनला सॉलिप्सिझम हा शब्द आठवत नाही! Solipsism : the theory that holds that self-existence is the only certainity, otherwise described as absolute egoism, the extreme form of subjective idealism. (The Chambers Dictionary, 1993)
यातल्या शेवटच्या अर्थाचा मराठी अवतार आहे, “आत्यंतिक व्यक्तिनिष्ठ चिद्वाद’. पण ही जोडाक्षरांची आगगाडी वापरण्याऐवजी आपण अर्थ समजून घेऊन मग ‘सॉलिप्सिझम’ला मराठी शब्द मानू. मुळात ओब्रायन जे काही सांगतो आहे, ते अनेकांना ठार चुकीचे वाटेल. माझ्या जाणिवांपलिकडे काहीतरी ‘वास्तव’ आहे. ते मला ज्ञानेंद्रियांद्वारे जाणवत असते. त्यात काही नियमितताही दिसते. अशा नियमिततेची उदाहरणे समजू शकतात. तशी ती समजलेली आहेत. त्यांना ‘निसर्गनियम’ म्हणतात. हे सगळे बहुतेक माणसांना पटत असावे, असे त्यांच्या वागणुकीवरून मला वाटते. असे सारे असताना ओब्रायन जे सांगतो ते बरोबर कसे असेल ? नाही ‘माझेच खरे’, ‘म्हणेन ती पूर्व’, ‘मीच जगन्नियन्ता’, असे जग एखादेवेळी मला आवडेलही. या विश्वाच्या, इतर सर्व माणसा-प्राण्या-पक्ष्या-झाडांच्या आयुष्यांचे सारे काही माझ्या मर्जीने होईल. मी खऱ्या अर्थाने सर्वंकष सत्ताधारक, टोटलिटेरियन हुकूमशहा होईन. हे एखादेवेळी सुखाचेही असेल, असे मला वाटते. तुम्हालाही वाटत असेल पण तुम्हाला विचारायची गरजच नाही, मला! पण स्वतःला इतके फसवता येते का? ओब्रायन स्वतःला सॉलिप्सिस्ट मानत नाही. त्याचे विश्व त्याच्या एकट्याच्याच जाणिवेतले नाही. ते आहे संपूर्ण ‘इनर पार्टी’चे. या संपूर्ण संघा’च्या प्रकारामुळे ओब्रायन ठामपणे सांगतो की तो प्रकार सॉलिप्सिझमच्या उलट, विरुद्ध असा आहे.
पण जर असा सामूहिक सॉलिप्सिझम असेल, तर त्या समूहात कोणताही मतभेद संभवत नाही. एकाला थंडी वाजताना दुसऱ्याला उकडत नाही. एकाला मेथी आवडताना दुसऱ्याला पालक आवडत नाही. जर असले मतभेद ‘चालत’ असले, तर आपोआपच बाहेरच्या विश्वाचे अस्तित्व मानल्यासारखे होते! एकाला काहीतरी गरम वाटतानाच दुसऱ्याला ते थंड वाटते. वेगवेगळ्या भाज्या असतात आणि समूहातल्या समूहातच त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात. हे जर टाळायचे असेल तर ‘समूह’हीच एक व्यक्ती मानावी लागेल ठामपणे सॉलिप्सिस्ट! सॉलिप्सिझम या शब्दाच्या व्याख्येतल्या ‘आत्यंतिक’ या शब्दाचा अर्थ हा असा आहे समूहाला नाकारणारा. व्यक्तिनिष्ठा जेव्हा अशी आत्यंतिक होते तेव्हा नेमके काय होते? व्यक्तिनिष्ठा म्हणजे तरी काय ?
आपण काही विधाने पाहू. माझा एक मित्र पंचवीसतीसच्या वयात सांगत असे, “मला आजकाल माझ्या जीवनाचा अर्थ काय, असा प्रश्न पडतो.” एकदा मी कंटाळून म्हटले, “गप् रे, सगळेच म्हणतात असं!’ तो म्हणाला, ‘हो, पण माझ्या बाबतीत ते खरं आहे.”
तो खरेच सांगत होता का ? या प्रश्नाचे उत्तर शोधायला माझ्यापाशी कोणता मार्ग आहे? प्रश्न त्याच्यापुरता, त्याच्याबाबतीतला, असा ‘व्यक्तिनिष्ठ’ आहे. मी फारतर “तो खिन्नपणे, संभ्रांत स्थितीत असे म्हणाला’ हे सांगेन. आता हे म्हणणे माझ्यापुरते व्यक्तिनिष्ठ झाले, कारण खिन्नपणा, संभ्रांत स्थिती, हे मला ओळखता येते, हे तरी मी इतरांना कसे पटवून देणार ? जर मी “तो हसत म्हणाला’ किंवा “तो रडत म्हणाला” असे काही म्हणालो, तर ते जास्त वस्तुनिष्ठ झाले. हसण्याचा आवाज, पाझरणारे अश्रू, यांच्याबाबत वास्तव स्थिती माझ्या ‘समजुती’पेक्षा जास्त महत्त्वाची आहे. अखेर “त्याने हिरवा सदरा घातला होता’ किंवा “हा चुंबकीय उत्तर ध्रुव त्या चुंबकीय उत्तर ध्रुवाला दूर लोटतो’ असे म्हणणे व्यक्तिनिष्ठ असण्याचे कारण नाही ते वस्तुनिष्ठ असणार.
ओब्रायन मात्र यातल्या कशाबद्दलही विन्स्टनचे म्हणणे मानायला तयार नाही. त्याच्या मते तो (म्हणजे ओब्रायन) म्हणेल तेच खरे मानायचे आणि तेही ओब्रायननेच नव्हे, तर विन्स्टननेही खरे मानायचे. ही झाली ‘टोटल’ व्यक्तिनिष्ठा. खरे तर ही बाळगायला तुम्हापाशी यातनायंत्रे आणि मनोवैज्ञानिक औषधे असणे आवश्यकच आहे औषधे कोणी घ्यायची, हा प्रश्न मात्र अवघड आहे! वस्तुनिष्ठ या शब्दातच वस्तूंना काहीतरी महत्त्व दिले आहे. ते देणे आवश्यक आहे का? एका विचारप्रणालीनुसार आपल्या ज्ञानेंद्रियांना दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या वस्तूंचे महत्त्व तसे दुय्यम आहे. आपल्या ज्ञानेंद्रियांकडून आपल्याला काही ‘आदर्श’, काही संकल्पनाच फक्त जाणवतात. आपल्याला दिसणाऱ्या वस्तू या त्या आदर्शाच्या कमीअधिक भ्रष्ट अशा सावल्या असतात. या छाया-पडछायांमधून आपण त्यांच्यामागच्या आदर्शाचे रूप शोधत असतो. वस्तूंना महत्त्व नाही, त्यांच्यामागच्या आदर्शाच्या रूपालाच फक्त महत्त्व आहे, या मांडणीला चिद्वाद, आयडियलिझम (Idealism), म्हणतात. मराठीत ह्या मांडणीचे एक रूप सूर्य पाहिलेला माणूस या नाटकातून अवतरले आहे.
वस्तूंना, त्या ज्यांच्यापासून बनतात त्या पदार्थांना, भूतमात्रांना, मॅटरला महत्त्व नाही. ही कल्पना विकसित केली, पुढे नेली, की उत्तर येते, ‘जग ही माया आहे.’ याची एक आवृत्ती सजीव सृष्टीला लावली जाते. ‘जीव’ किंवा ‘चैतन्य’ असे काहीतरी असते. ते समजणे म्हणजे जीवांचा ‘आदर्श’ समजणे. प्रत्यक्ष सजीवांमधल्या ‘जड’ पदार्थांना महत्त्व नाही, तर ते फक्त चैतन्याला आहे. चिद्वादाच्या या आवृत्तीला ‘चैतन्यवाद’, व्हायटॅलिझम vitalism, म्हणतात.
चिद्वाद, आदर्शवाद, ध्येयवाद, चैतन्यवाद, आयडियालिझम, व्हायटॅलिझम, ही सारी मूळ एका विचारधारेच्या छटांची, आवृत्त्यांची नावे आहेत.
आपण सॉलिप्सिझमचा अर्थ तपासत, त्याच्या एका व्याख्येतली तीन ‘पदे’ सुटी करायचा यत्न केला, आत्यंतिक, व्यक्तिनिष्ठ आणि चिद्वाद. खरे तर हे जमलेले नाही. सॉलिप्सिस्ट समूह मानता येत नाही त्या समूहालाही व्यक्ती मानायला काहीच अडचण नाही. मनःस्थितींपासून रंग, चवींपर्यंत सारे व्यक्तिनिष्ठ असणे शक्य आहे. जग ही माया आहे. त्यामागील आदर्शच खरे. ‘जड’ पदार्थाला महत्त्व नाही. चैतन्यच तेवढे खरे. ही सगळीच विधाने कमीअधिक प्रमाणात आत्यंतिकही आहेत, व्यक्तिनिष्ठाही दाखवतात आणि चिद्वादीही आहेत. पण ही तर ओब्रायन वृत्ती झाली, जी विन्स्टनला जबरीनेच पटवून देता आली होती. वेगळे काही शक्य आहे का? आहे.
प्रत्यक्ष दिसणाऱ्या, ज्ञानेन्द्रियांना जाणवणाऱ्या वस्तूंना, पदार्थांना, भूतमात्राला, मॅटरला महत्त्व देणे शक्य आहे. शंका आली तर प्रत्यक्षात काय घडते आहे ते ‘पाहून’ त्यावरच निर्णय बेतणे शक्य आहे. याला प्रत्यक्षदर्शीवाद, एम्पिरिसिझम, empiricism म्हणतात. हा वाद (किंवा हे धोरण म्हणा) कुठे वापरायचा आणि कोणत्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे त्यातून मिळू शकतील, याला अर्थातच काही मर्यादा आहेत सोबतच व्यक्तिनिष्ठ नसलेला आधारही आहे.
ज्यांची उत्तरे प्रत्यक्षदर्शनाने मिळू शकतील असेच प्रश्न प्रत्यक्षदर्शनाला झेपतात ! “या डोंगरापलिकडे तळे आहे का?’ हा प्रश्न सोडवता येतो, पण “हे ऐकून त्याला काय वाटेल?’ हा प्रश्न सुटत नाही. ही मर्यादा जाचक आहेच, पण ती सैलावण्याचे मार्गही आहेत. सोपा मार्ग म्हणजे उपकरणे वापरून ज्ञानेंद्रियाची कार्यक्षमता वाढवण्याचा. याहून महत्त्वाचा मार्ग म्हणजे तर्कशास्त्र वापरून, योग्य त-हेने अनुमाने काढायचे नियम वापरून अनुमाने काढणे.
आपण मागे “खिन्नपणा’ व्यक्तिनिष्ठ आहे, पण हसणे-रडणे वस्तुनिष्ठ असू शकते असे म्हटले. जर एखादा माणूस हसत असेल तर तो खिन्न नाही, रडत असेल तर खिन्न आहे, दोन्ही करत नसेल तर आपल्यापाशी वस्तुनिष्ठ निष्कर्ष काढण्याइतकी ऐंद्रिय माहिती नाही हा प्रत्यक्षदर्शनाला अनुमानांची जोड देण्याचा प्रकार. कधीकधी प्रत्यक्षदर्शनाला ‘शुद्ध’ (अनुमानांचा आधार न घेणारा) माहिती कमवायचा मार्ग मानून त्याची मर्यादा आक्रसलेली आहे असे सांगितले जाते. हा लढाऊ युक्तिवादाचा प्रकार मला सर्वथा गैर वाटतो. प्रत्यक्षदर्शनाला अनुमानाच्या आधाराविना महत्त्व नाही, हे कोणीच नाकारत नाही. मग तीच बाब आत्यंतिक रूपात मांडून तिचा प्रतिवाद कसा होतो, हे मला समजत नाही.
चिद्वादाची प्रत्यक्षदर्शनाशी सांगड घालता येईल का? की हे दोन दृष्टिकोण वेगवेगळ्या क्षेत्रांना लागू पडतात ? कोणती ही क्षेत्रे ? या दोन वादांमधून मिळणाऱ्या ज्ञानाच्या भरवशाचे काय ? आंशिक भरवसा, विशिष्ट स्थितीपरता भरवसा, असे काही फरक शक्य आहेत का? याची काही उदाहरणे देता येतात का?
अनेक प्रश्न अनेकांना पडलेले प्रश्न. अनेक उत्तरे. अनेकांना सुचलेली उत्तरे. कसा तपासावा या उत्तरांचा खरेखोटेपणा ? काही प्रयत्न पाहू. लढाई आणि ‘सॅनिटी’
भौतिक तथ्ये नाकारता येत नाहीत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. तत्त्वज्ञानात, धर्मात, नीतिशास्त्रात, राजकारणात दोन आणि दोन पाच असे मानताही येईल, पण विमानांशी आणि बंदुकांची डिझाइन्स करताना दोन आणि दोन चारच हवेत. ‘दोन आणि दोन पाच’ असले भ्रम कार्यक्षम होण्यात अडचणी उत्पन्न करतात आणि अकार्यक्षम राष्ट्रे नेहेमीच कार्यक्षम राष्ट्रांकडून हरतात.
बरे, कार्यक्षमतेसाठी पूर्वी काय घडले याची, म्हणजे इतिहासाची, बऱ्यापैकी नेमकी जाण असावी लागते. पूर्वीही वृत्तपत्रे आणि इतिहासाची पुस्तके कोणत्या तरी ‘पक्षाकडे’ झुकलेली असत पण आजच्यासारखा सततच्या इतिहासदुरुस्तीचा खोटारडेपणा करणे अशक्य होते. त्यावेळी लढायांमधून शहाणपणाचे, ‘सॅनिटी’चे संरक्षण होत असे. वेडेपणा आणि भ्रम टाळले जात असत.
शासनकर्त्यांना शहाणे ठेवण्याची जबाबदारी तर लढायांवरच असे. जोवर लढाया जिंकल्या व हरल्या जात, तोवर कोणताच शासकवर्ग पूर्णपणे बेजबाबदार होऊ शकत नसे.
हा पुन्हा ऑर्वेल आहे. इथे पार्टीचे घोषवाक्य ‘युद्ध हीच शांतता’, ‘वॉर इज पीस’, हे समजावून दिले जात आहे. पण हे समजावणे मागच्यावेळेसारखे अमानुष आणि यातनामय नाही. ते आहे एका पुस्तकाच्या रूपात, द पॅक्टिस ऑफ ऑलिगर्किकल कलेक्टिव्हिझम, लेखक : इमॅन्युएल गोल्डस्टाइन, पार्टीचा कट्टर विरोधक. नाइन्टीन एटीफोर मधल्या लढाया ना जिंकल्या जात ना हरल्या. ओशिआनिया, यूरेशिया, इस्टेशिया, या तीन महासत्ता ऑर्वेलच्या रूपकाप्रमाणे तीन कडब्यांच्या पेंड्यासारख्या एकमेकांना टेकू देत स्थिरावल्या आहेत. या दूरवर कुठेतरी चाललेल्या अनिर्णायक युद्धामुळेच ओब्रायनचा आत्यंतिक व्यक्तिनिष्ठ चिद्वाद टिकून आहे. जर एखादी महासत्ता जिंकण्या-हरण्याच्या कडेलोटबिंदूजवळ आली, तर सॉलिप्सिझम कापरासारखा उडून जाईल. तसे होऊ नये यासाठी तीन्ही सत्ता दक्ष आहेत. त्या नेहेमी दोन विरुद्ध एक अशा लढतात, आणि मधूनमधून जोडीदार बदलतात. सारी धडपड आहे ते निर्णायकता टाळली जावी यासाठी म्हणून ‘युद्ध हीच शांतता’! हत्ती आणि शहाणपण भौतिक तथ्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही. विशेषतः जीवनमरणाचे प्रश्न असतात तेव्हा हे जास्त जाणवते उदाहरणार्थ, लढाया. भारतात अनेकदा कौतुकाने सांगितली जाणारी एक कथा पाहा,
स्वामीजी आणि शिष्य नगराच्या एका चौकात उभे होते. ‘जग ही माया आहे’, या विषयावर निरूपण चालले होते. ज्ञानेन्द्रिये दाखवतात ते ‘खरे’ नसते, हा मुख्य मुद्दा. येवढ्यात काही नागरिक आरडाओरड करत येतात की एक माजावर आलेला हत्ती वाटेतले सारे उद्ध्वस्त करत येत आहे! पळा!
स्वामीजी शिष्यांपेक्षाही लगबगीने सुरक्षित जागा गाठतात. हत्ती येतो. चीत्कारत पुढेही जातो. हळूहळू सारे पूर्ववत होते. नंतर एक शिष्य विचारतो, “गुरुदेव, आपण तर म्हणालात की जग ही माया आहे.” “हो, बाळ! मग?” “म्हणजे हत्तीही खरा नव्हता, आणि त्याच्यापासूनचा धोकाही खरा नव्हता.” “योग्य ! मग?” “मग आपण पळालात, ते कशासाठी?” स्वामीजींनी मंद स्मित केले. “अरे वेड्या! माझे पळणे तरी कुठे खरे होते!”
इथे नाइन्टीन एटीफोर च्या ‘डबलथिंक’ ची प्रक्रिया दिसते. एकाच वेळी दोन विरुद्ध धारणा मनात बाळगून जेव्हा जे सोईस्कर असेल ते करणे. आणि ‘डबलथिंक’ बद्दल नोंदलेला आणखीही एक गुण इथे दिसतो की विरोधकांचे डबलर्थिक घृणास्पद मानले जाते तर समर्थकांचे कौतुकास्पद!
आणि ह्या (आणि असल्या!) कथा खूप उत्साहाने सांगितल्या जातात. गंमत म्हणजे, यालाही नाइन्टीन एटीफोर मध्ये शब्द आहे ‘डक्स्पीक’ बदकाच्या ‘क्वाक्क्वाक्’सारखे ‘पोथीबद्ध’ बोलणे मग आपली कथा कायकाय सुचवते याचा विचार करावा लागत नाही. मेंदू आणि जीभ, लहानात लहान स्वरयंत्र यांच्यात संपूर्ण काडीमोड असतो. आणि या शब्दाबाबतही सूत्र असते समर्थकांचे डस्पीक कौतुक करण्याजोगे, तर विरोधकांचे डस्पीक मूर्खपणाचे.
आणि हे राजकारणासारख्या ‘नीतिहीन’ क्षेत्रात घडत नाही, तर ‘शुद्धातिशुद्ध’ मानल्या गेलेल्या तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात घडते. याबद्दल लॅरी लॉडन हा विज्ञानाचा तत्त्वज्ञ म्हणतो
The displacement of the idea that facts and evidence matter by the idea that everything boils down to subjective interests and perspectives is second only to American political campaigns the most prominent and pernicious manifestation of anti intellectualism in our time. (Science & Relativism, 1990 फॅशनेबल नॉन्सेन्स(Allen Socal & Jean Bricmont, Picador, 1998) मध्ये उद्धृत)
पण तर्काने सॉलिप्सिस्ट मतांचा प्रतिवाद करता येत नाही. कितीही धडपड केली तरी सॉलिप्सिझम हा तर्कदोष आहे, फॅलसी(fallacy) आहे, असे सिद्ध करता येत नाही. पण एखादे मत ताने खोडून काढता येत नाही म्हणजे ते बरोबर ठरत नाही! आणि लढाया, हत्ती वगैरेंना तोंड देताना मात्र सॉलिप्सिझमच काय, ‘साधा’ चिद्वादही ‘इन्सेन’ ‘वेडेपणाचा ठरतो! [ हा एका जोडलेखाचा पहिला भाग आहे. ]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.