मेजवानी

डेन्मार्कच्या जुट्लांड प्रांताजवळचे एक बेट. काळ सुमारे १८७० सालाचा. एक मुष्किलीने डझनभर उंबऱ्यांचे खेडे. बहुतेक सारी माणसे वयस्क. नावाजण्यासारखी माणसे तीन एक अविचल, कर्मठ धर्मगुरु ऊर्फ ‘मिनिस्टर’, आणि त्यांच्या दोन देखण्या मुली. पंचक्रोशीतले लोक मिनिस्टरांच्या रविवारच्या प्रवचनांसाठी येरा. रारणे मुलींकडे पाहारा दृष्टिसुख घेरा.
शेजारच्या जमीदारिणीकडे तिचा एक पुतण्या येतो, वाईट वागण्याची शिक्षा म्हणून तीन महिने आत्याकडे काढायला. आत्याला सोबत करत प्रवचन ऐकायला जातो. एका मुलीच्या प्रेमात पडतो. मिनिस्टरांना भेटून मुलीचा हात देण्याची विनंती करतो. मिनिस्टर म्हणतात, “माझ्या मुली म्हणजे माझे डावे-उजवे हात. कसे देऊ तुम्हाला?” पुतण्या टाचा खाडकन जुळवून निरोप घेतो. परततो. इमानेइतबारे शिपाईगिरी करत ‘सुंदरी’ची आठवण मनात ताजी ठेवतो. मोठा होत जनरल होतो!
फ्रान्समधला एक प्रसिद्ध गायक प्रसिद्धीलाच कंटाळतो. एका मैत्रिणीच्या सल्ल्याने एकटेपण भोगायला जुट्लांडमध्ये येतो, एका वाण्याकडे ‘पेईंग गेस्ट’ म्हणून राहायला. चर्चमध्ये मिनिस्टरांच्या मुलीचा आवाज ऐकून खूष होतो. मिनिस्टरांना परवानगी मागतो, मुलीला गाणे शिकवण्याची, “देवासाठी जास्त चांगले गाईल.” म्हणून. मिनिस्टर सावधपणेच होकार देतात, कारण गायक असतो रोमन कॅथलिक ‘पॅपिस्ट’, तर मिनिस्टर कर्मठ ल्यूथरन. गाताना, शिकवताना मुलगी आणि गायक जरा नाजुक नात्यात शिरायच्या बेतात असतात. दुसरी मुलगी (शिपायाची ‘सुंदरी’) आणि मिनिस्टर अस्वस्थ होतात. गाणारी मुलगीच नाते तोडायचे सुचवते. मिनिस्टर जाऊन गायकाला पत्र देतात, “सॉरी’ ! गायक एक अप्रतिम गायिका घडवता न आल्याने कष्टी होऊन पॅरिसला परततो. पण त्याच्याही मनात कुग्रामातली ‘कोकिळा’ घर करते. बरीच वर्षे जातात. मिनिस्टर ख्रिस्तवासी होतात. मुली गावात सत्कृत्ये करत साठी ओलांडतात. गावकरी जुन्याच प्रार्थना म्हणत, मिनिस्टरांची आठवण पदोपदी काढत, वर्षातून एकदा चहा-बिस्किटांसह स्मृतिदिन साजरा करत जगत असतात.
आणि एका वादळी रात्री, भिजतभिजत एक चाळीसच्या आसपासची बाई मिनिस्टरांच्या मुलींच्या घराचे दार ठोठावते. त्यांना एक पत्र देते, पॅरिसमधल्या त्या गायकाने लिहिलेले. ही असते बॅबेट. युद्धात घरदार उद्ध्वस्त झाल्याने फ्रानसमध्ये राहणे असह्य झालेली. “तुम्हाला मदत होईल. तिला स्वयंपाक करता येतो”, ही गायकाने केलेली शिफारस. मुली सांगतात की त्या गरीब आहेत. ‘हाऊसकीपर’ ठेवणे परवडणाऱ्या नाहीत. बँबेट सांगते, “पगार नको. आश्रय द्या.” एक वेगळा जिना असलेली माळ्यासारखी खोली, जेवणखाण, अशा अटींवर मुली बॅबेटला ठेवून घेतात.
रोजच्या कामाचा भाग म्हणजे आसपासच्या निराधार वयस्कांना, अपंगांना जेवण पोचवायचे. जेवण म्हणजे थोडीशी मासळी, ताजी किंवा सुकी, शिळा पाव कुस्करून शिजवून केलेले पातळ पिठल्यासारखे सूप रोज, सकाळसंध्याकाळ, हाच ‘मेनू’. शिजवणे बॅबेटचे काम, वाटप आणि सोबतच आत्मबळ पुरवणे हे बहिणींचे काम, गावात त्यांच्या निरलस सच्छीलपणाचे कौतुक फार. असाही बराच काळ जातो. फ्रान्स, युरोप, सगळीकडे युद्धे मंदावतात. आणि बॅबेटला चक्क लॉटरी लागते, तीही थेट दहा हजार फ्रंक्सची! ती मालकिणींना म्हणते की या वर्षी मिनिस्टरांच्या स्मृतिदिनाला ती सर्वांना फ्रेंच मेजवानी देणार. मुली तयार होतात, आणि बॅबेटही तयारीला लागते. भांडीकुंडी, अन्नपदार्थ, सोबत द्यायची मद्ये, साऱ्यांची यादी करून मुख्य भूमीवर जाऊन ऑर्डर देऊन मागवायचे. वाट पाहायची. गावातला एक चौदापंधरा वर्षांचा पोरगा गदतीला घ्यायचा.
आणि एके दिवशी सामान येऊन पोचते. काचसामानाचे पेटारे, बटेर पक्ष्यांचा पिंजरा, टेबलक्लॉथ आणि नॅपकिन्स, बरेच काही…. आणि एक कासव ! मालकीण-मुलींना काळजी वाटायला लागते. स्वप्ने पडू लागतात. कासव आणि नरकातला अग्नी. झिंगून हातातून पडणारे दारूचे ग्लास. काय करून बसलो आपण? या फ्रेंच मुलीला मोकळीक देण्यात चूक तर नाही झाली? इंद्रियांचे चोजले पुरवण्यामुळे आपले परलोकातले वास्तव्य गोत्यात तर नाही येणार?
मुली गावकऱ्यांची सभा बोलावतात. त्यांना कल्पना देतात की थोडीफार चैन केली जाईल, पण ‘पाप’ आपले नसेल. ते इतके दिवस काम करून मिनिस्टरांना तिच्या परीने श्रद्धांजली वाहणाऱ्या बॅबेटचे असेल. पण तिला फार दोष देऊया नको. वाईट नाही आहे, ती.
आमंत्रितांची संख्या एकाने वाढते, कारण जमीनदारीणबाईंचा जनरल पुतण्या आलेला असतो. बॅबेट बेफिकीर असते, अकरांऐवजी बारा जेवणार. पुरेल सर्वांना, नीट. मग मेजवानीचा दिवस उजाडतो. पोराच्या मदतीने बॅबेट टेबल सजवते. टेबलक्लॉथ अस्सा म्हणजे अस्साच घालायचा. मग वळ्या-सुरकुत्या घालवायला इस्त्री करायची. दर बशीभोवती वेगवेगळ्या आकाराच्या ग्लासेसची तटबंदी. मोरपिसासारख्या घड्या केलेले नॅपकिन्स. सुरीकाट्यांचे, चमच्यांचे ताफे. मध्ये मेणबत्त्या. आजूबाजूला दिवे. आणि हे झाले टेबल, फक्त. बर्फाच्या लादीने थंड होत असलेली मद्ये. तपशीलवार, नखरेल जेवण. आधी कढत टर्टल सूप. मग भरपूर क्रीम आणि तसल्या नखऱ्यातल्या पदार्थांची रेलचेल. एक जरा विशेष पदार्थ. पेस्ट्रीच्या पापुद्रयांमध्ये बटेर, तेही ट्रफल या सुवासिक अळंबीसोबत शिजवलेले. केक्स, पुडिंग्स, फळे, चीजेस, अगदी तपशीलवार फ्रेंच मेजवानी!
पाहुणे येतात. जमीनदारीणबाईंचा गाडीवान स्वयंपाकघरात येऊन बसतो. दाढीवाला, वयस्क, अबोल माणूस. मदतनीस पोरगा उत्साहाने स्वच्छ कपडे घालून तयार. पाहुणे सगळे सत्तरीपुढचे. जनरल एकटाच रंगीबेरंगी गणवेषात. इतर सारे काळ्या-करड्या कपड्यांमध्ये. बॅबेट तर पाहुण्यांना दिसणारही नसते. पोराचे केस मात्र ती नीट करून घेते!
एक फिकट सोनेरी मद्याने सुरुवात होते. पहिला घोट घेताच जनरलच्या चेहेयांवरचे भाव बदलतात. “अरे वा! अमॉन्टिलेडो! सुंदर!” एक पाहुणा म्हणतो, ‘हो. खाद्यपेये चवीसाठी खाऊपिऊ नयेत. अंगी लागून हवे असेल, तर निरिच्छ भावाने जेवावे.” “अँड व्हॉट अ टर्टल सूप!” जनरल सर्वांगाने दाद देत चमच्याने पिता येईलसे सूप संपवून वाडगे उचलून तोंडाला लावतो. सारे जण तसेच करतात. संभाषण मात्र मिनिस्टरांच्या आठवणी, त्यांच्या प्रवचनांमधले हजारदा गिरवून घट्ट झालेले उतारे, यांबाहेर पडायला तयार नसते. चेहेरे मात्र बदलू लागतात. आयुष्यभर ऐंद्रियसुखांना तुच्छ मानल्यावरही रसना आणि नाक स्वाद-सुगंधाला पोचपावती देतातच.
एकेक, एकेक कोर्स, सोबत त्या त्या अन्नाला खुलवणारे मद्य. एकदा जनरल पहिला ग्लास संपल्यावर दुसरा मागतो. बॅबेट सांगते, “ओत, व बाटली त्यांच्याजवळच ठेव.”
जनरल सांगायला लागतो. “मी पॅरिसमध्ये कॅफे ल’आंग्ले नावाच्या ठिकाणी जेवायला गेलो होतो. गंमत म्हणजे, तिथे मुख्य ‘शेफ’ एक बाई होती. प्रेमकथा लिहावी तसे जेवण करायची. शेवटी तर आध्यात्मिक पातळी गाठायचे, जेवण!” इतरांच्या प्रतिक्रिया असंबद्ध असतात. “मिनिस्टर म्हणायचे लहानग्यांनो, एकमेकांवर प्रेम करा. किंवा “याही वर्षी बर्फ उशीरा जमेल.” पण आता लोक बोलत तरी असतात. सुरुवातीचा अतिसावध घुमेपणा निवळत असतो. अडचण अशी असते, की हवापाणी, दैनंदिन व्यवहार, धर्मकर्मे, यांच्याशिवाय इतर विषयांवर बोलायची सवयच नसते! ‘आध्यात्मिक’ पातळीवर बोलणे, यालाच मान असतो, आणि त्यातही मिनिस्टरांची मर्यादित मते उगाळण्याला जास्त.
आता टेबलावर बटेर पक्ष्यांच्या ‘पेट्या’ येतात. सोबत एक दुर्मिळ लाल मद्य, ‘रक्तवारुणी’. बरे, ही जोडगोळी एकाएकी न येता रागदारी गाण्यातून उलगडत जावी तशी येते. एक वयस्क बाई सांगते, “मिनिस्टर म्हणायचे, या जगात जे टाळाल ते तुम्हाला परलोकी मिळेल.” “जनरल चवीने जेवत असतो. तो सांगतो, “कॅफे ल’ आंग्लेत माझे यजमान एक फ्रेंच जनरल होते. त्यांनी तरुणपणी एका सुंदर स्त्रीचा अपमान होऊ नये म्हणून द्वंद्वयुद्ध केले होते. ते म्हणाले, आज इथल्या ‘शेफ’साठी ते लढायला तयार आहेत!”
लोक खुलायला लागतात. परलोकी मिळणाऱ्या सुखांसाठी आज निवृत्ती भोगणाऱ्या आजीबाई बोटे चोखू लागतात. दोन भाऊ आपण पूर्वी एकमेकांना क्षुद्र मुद्द्यांवर कसे फसवले होते याची कबुली देतात. साधे, मनापासून बोलणे. तिकडे स्वयंपाकघरात याला समांतर निःशब्द संवाद सुरू असतो. प्रत्येक पदार्थ गाडीवानालाही दिला जात असतो. दर घोटानंतर, घासानंतर त्याच्या चेहेऱ्यावर कृतज्ञ भाव उमटत असतात. न राहावून एकदा तो म्हणतो, “हे छान आहे!” बँबेट पुढ्यात पुढच्या पदार्थाची बशी ठेवत म्हणते, “अंहं! ‘हे’ छान आहे!” पोरगा गाडीवानाच्या पेल्यातून एक घोट चोरतो, आणि बँबेट लटक्या रागाने त्याला थांबवते. ती स्वतः काहीही खात नसते, पण आता एक पेला भरून तीही रक्तवारुणीची चव घेते. सुखावते. जेवण संपते. आता कॉफी आणि सोबत टीचभर ग्लासांतून ‘लिक्यूर’ येणार. जनरल उभा राहातो. चमच्याने ग्लासावर किणकिण करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. भाषण देतो. दया-करुणा आणि सत्य कसे संगतीने भेटतात. सच्छील वागणूक आणि सर्वोच्च सुख कसे एकमेकांना टाळत नाहीत. संधी येत असतात. कामाच्या. उपभोगाच्या. त्या घ्याव्या. कधी हवे ते पुढ्यात येते. कधी नको तेही येते. हवे असलेले निसटून जाते नव्याने पुढे येते! कधी सुसंगत, कधी विसंगत आणि एका वेगळ्याच पातळीवर पूर्णपणे सुसंगत!
जनरल आणि त्याची जुनी ‘सुंदरी’ यांची नजरानजर वाढते. गायकाचे नाव येताच दुसरी यजमानीणही मागे भूतकाळात डोकावून येते. एक आजी प्रेमाने आजोबांची पापी घेते. दोघे भाऊ एकमेकांच्या खांद्यांभोवती हात घालतात. पार्टी संपते. दारात जनरल ‘मैत्रिणी’ला सांगतो रोज रात्री जेवताना मनाने तुझ्यासोबतच राहीन! इतर पाहुणे पुढ्यातल्या चौकातल्या चबुतऱ्याभोवती फेर धरतात. आनंदाने नाचायचे तर असते, पण अनुभवामध्ये शब्द फक्त धार्मिक प्रार्थनांचेच असतात. एक बहीण दुसरीला म्हणते, “तारे बघ कसे जवळ आले आहेत. एखादवेळी रोजच रात्री येत असतील ते इकडे.” आत जेवायला घालून तृप्त झालेली बॅबेट बसलेली असते. हातात पेला. मनात समाधान.
मालकिणी बॅबेटसोबत बसलेल्या. “आता तू फ्रान्समध्ये परत जाशील, ना? दहा हजार फ्रँक उपभोगत?” बॅबेट मंद हसते. “संपले ते!” “दहा हजार संपले?” “हो. कॅफे ल’आंग्लेत बारा जणांच्या जेवणाला लागायचेच, दहा हजार. आणि मी कशाला फ्रान्सला जाते! तिथे कोण आहे माझे! मी इथेच राहणार.”
ही कहाणी आहे बॅबेट्स फीस्ट या स्वीडिश चित्रपटाची. उत्कृष्ट अभिनय, सुंदर चित्रीकरण यांचा उपयोग करून नीतिमत्तेबद्दलचा एक मोठा वाद इथे उलगडून दाखवला आहे. पुरामानवशास्त्रातला एक पंथ मानतो की कपींपैकी काही जण एकत्र जेवूखाऊ लागले, आणि या साध्याशा क्रियेतून माणसांचे पूर्वज माकडांपासून सुटे झाले. गोरिला-चिंपांझी आणि माणसे यांच्यातला मुख्य फरक हा की माणसे एकत्र जेवतात! अगदी एका नराने एका मादीशी बरेचसे एकनिष्ठ राहणे हेही लैंगिक व्यवहारासोबत एकत्र जेवण्याने, एकाने दुसऱ्यासाठी जेवण कमावण्याने, पकवण्याने घडते.
कुसुमाग्रजांची एक कादंबरी आहे, कल्पनेच्या तीरावर नावाची. तिच्यात एक काल्पनिक समाज आहे, कामव्यवहाराची चर्चा सभ्य मानणारा आणि जेवण्याखाण्याची चर्चा मात्र असभ्य मानणारा. सगळेच जेवतात, जेवण बनवतात. चर्चा मात्र उघडपणे करायची नाही. आपल्या समाजांत जसे नीतीच्या अपक्व कल्पनांनी प्रेम-सुरताच्या क्रियांभेवती गुप्ततेचे कुंपण उभारले, तसे कल्पनेच्या तीरावर अन्न आणि सेवनाभोवती कुंपण आहे. साध्या जगातला, आपल्या जगातला नायक या समाजात जातो. एका मुलीशी मैत्रीही होते. त्या नाजुक संबंधाचा परमोच्च क्षण म्हणजे नायक मैत्रिणीला म्हणतो, “आपण एकत्र जेवू या!”
आपल्या जगातही ऐंद्रिय सुखांना हीन मानले जातेच ना? दारू आणि मांसाहाराभोवतीचे इतर प्रश्न सध्या सोडून देऊ, पण मुळात खाण्यापिण्यात रस घेणे ‘पाशवी’ आहे, ‘मानवी’ नाही, असे मानण्याकडे नीतिलंडांचा कल असतो. एकूणच सहजप्रवृत्ती वाईट आणि त्यांपासून निवृत्ती घेणे उच्च, असेच मत कर्मठ लोक मांडतात.
खाण्यापिण्यातून, खाद्यपेये तयार करण्यातून बंधुभाव वाढतो. कठोर बंधने सैलावून माणसे जास्त खुल्या मनाने वागू लागतात, विहरू लागतात, विचार करू लागतात. गेले काही दिवस लोकांना खरे बोलायला लावणारी ‘नार्कोटेस्ट’ चर्चेत आहे. काही औषधांच्या प्रभावाने माणसांना हेतुपुरस्सर खोटे बोलणे अशक्य होते; हा त्या चाचण्यांमागचा मुख्य विचार. दारूही काही प्रमाणात खोटेपणा अशक्य करते, या अर्थाचे ‘ळपळपे शीळीरी’, ‘मद्यातून सत्य’, असे एक जुने सूत्र आहेच. चांगले पोटभर जेवल्यानेही माणसांचा स्वार्थीपणा कमी होऊन ती मनाने प्रशस्त होतात, हेही आपण अनुभवतो. मग खाण्यापिण्याच्या चर्चेला हलके लेखण्याचा भाव कुठून उपजतो? तो उपजतो कशाच्याही आहारी जाण्याच्या धास्तीतून. नीतिअनीतीचा फार विचार करणारे कर्मठपणाच्या आहारी जातात!
पण जर ‘अती’ न करता चांगली खाद्यपेये बनवणे, त्यांचा आस्वाद घेणे, हे जगण्याचा एक भाग म्हणून केले तर ? त्यातही इतर बाबतींमध्ये मानवी वागणुकीत दिसतो तसा रंगपट दिसेल. काही माणसे खाण्यालायक अन्न करू शकणार नाहीत, तर काहींच्या ‘हाताची चव’ जेवणाऱ्यांना सुखी करेल. काही उदरभरण म्हणून चार घास पोटात ढकलतील, तर काही भाकर-कांदाही चवीने जेवतील. शहाणपणा आहे तो या साऱ्याचा स्वीकार करण्यात. आदर करण्यात. नाके मुरडण्यात नव्हे. कोणताच माणूस बेट नाही कोणताच माणूस स्वतःतच संपूर्ण असे बेट नाही. प्रत्येक जण या खंडाचा, या भूमीचा भाग आहे. सागराने एक ढेकूळही धुपून गेले, तरी युरोप उणावतो; तसाच, जसा एखादे भूशिर धुपताना, किंवा आपले, आपल्या गित्राचे, घरदार धुपताना. कोण्याही माणसाचा मृत्यू मला उणावतो कारण मी मनुष्यजातीत गुंतलो आहे. म्हणून घंटा कुणासाठी वाजते, हे विचारायला कोणाला पाठवू नकोस. ती तुझ्यासाठी वाजते.
[ जॉन डन् (John Donne) या धर्मगुरूने १६२३ साली दिलेले एक प्रवचन १६२४ साली सुधारित करून डिव्होशनः मेडिटेशन दतखख या नावाने प्रकाशित झाले. यातला मध्यवर्ती, काव्यात्म भाग म्हणजे
No man is an island, entire of itself Every man is a piece of the contiment, a part of the main If a clod be washed away by the sea, Europe is the less, as well as if a promontory were, as well as if a manor of thy friend’s or thine own were. Any man’s death diminishes me because I am involved in mankind and therefore, never send to know for whom the bell tolls; it tolls for thee.
वरील प्रवचन आमचे स्नेही व आजचा सुधारक चे (अधूनमधून) वर्गणीदार सुधाकर मराठे यांनी उपलब्ध करून दिले. विनोबांच्या ‘एकादशव्रता’तली स्पर्शभावनाही हीच, आणि बंधुभावाला स्वातंत्र्य व समतेच्या वरचे स्थान देणारे डॉ. आंबेडकरांचे तत्त्वज्ञानही हेच. (अंक १८.४) स.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.