एड्सची जाणीव शालेय वयात

हल्ली कौमार्यावस्था ही पूर्वीपेक्षा कमी वयात मुलामुलींना प्राप्त होत आहे. प्रसारमाध्यमांशी जवळीक व अवती-भवतीच्या घटनांचे आकलन हे शालेय वयातील वैशिष्ट्य होय. एड्सबद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचत आहे. परंतु योग्य पद्धत व संदेशाविना त्याविषयीची माहिती मिळतेच असे नाही. एड्सच्या टी.व्ही.वरील प्रबोधनपर जाहिराती व माहितीचे कार्यक्रम हे तज्ज्ञमंडळीच्या सल्ल्याने व सहाय्याने आयोजित करण्यात येतात परंतु ते लागले की पालक मुलांना ती माहिती कळू नये, त्यांनी पाहू नये आणि ऐकू नये याची सर्वतोपरी दक्षता घेतात. परिणामी त्यांचे औत्सुक्य वाढते नव्हे तर कुतूहलापोटी समवयस्कांकडून चुकीचे ज्ञान मिळण्याची शक्यता असते.
कौमार्यावस्थेमध्ये मुलांमध्ये अनेक प्रकारचे जैविक व शारीरिक बदल होत असतात. मुले-मुली त्यामुळे गोंधळून जातात. भिन्नलिंगी व्यक्तींविषयी आकर्षण दाबून ठेवणे हे अवघड जाते. चिंता, भीती, दडपणही निर्माण होते. याच वयात विविध मानसिक शक्तींचा विकास जरी झालेला दिसला तरी सर्वांवर भावनिकतेची छाया पडलेली असते. विद्यार्थ्यांचे बौद्धिक निर्णय बऱ्याच प्रमाणात भावनाधिष्ठित असतात. म्हणूनच मानसशास्त्रज्ञ या वयोगटास ‘वादळी अशांततेचा काळ’ म्हणतात. याच वयात भिन्नलिंगी व समलिंगी आकर्षण निर्माण होते. सेक्सबद्दल विकृत कल्पना निर्माण होतात. आपण प्रौढ झालो आहोत हे दाखविण्यासाठी त्यांच्या हातून चुका होण्याची शक्यता आहे. नव्हे त्याचाच दाहक परिणाम व पुरावा म्हणजे भारतात २ लाख ३० हजार विद्यार्थी एड्सग्रस्त आहेत. ही वस्तुस्थिती नजरेसमोर ठेवून, त्या काळजीने व तळमळीने शालेय वयोगटातील मुला-मुलींना एड्सविषयी नेमकी माहिती देणे व दक्षता घेण्याची जाणीव, जागरूकता निर्माण करणे हे कर्तव्य आहे. एड्सचा भस्मासुर समाजात थैमान घालत असताना उद्याचे भारतीय समाजाचे आधारस्तंभ असणारी मुले अज्ञानामुळे, अडाणीपणामुळे व बंडखोरीमुळे एड्सला बळी पडू नयेत आणि त्यांचे मानसिक खच्चीकरण होऊ नये अशी दक्षता घेणे, ही सामाजिक बांधिलकी स्वीकारण्याची नितान्त गरज आहे. म्हणून कौमार्यावस्थेच्या सुरुवातीच्या वयात नववी-दहावीच्या शालेय गटापासून एड्सविरोधी शिक्षण द्यायला हवे. याची तशी अनेक कारणे असली तरी तीन महत्त्वाची कारणे नमूद करणे उचित वाटते. भारतीय संस्कृतीच्या कुटुंबव्यवस्थेमध्ये आजही ‘सेक्स’ या विषयावर उघडपणे चर्चा होत नाही. पालक आणि मुले यांमध्ये या विषयावरची चर्चा म्हणजे असंस्कृतपणा, अश्लिलता आणि असभ्यपणा मानला जातो. इच्छा असूनही सुशिक्षित पालकसुद्धा हा विषय सफाईदारपणे टाळतात. अशिक्षित पालकांबद्दल काय सांगावे ?
एड्सचा कौमार्यावस्थेतील आकडा पाहिला तर शाळासुद्धा एक जबाबदार घटक आहे. औपचारिक शिक्षणाचे शाळा हे केंद्र आहे. एक-दोन व्याख्याने किंवा दिखावू कार्यक्रम करून हा विषय संपवून चालणार नाही. जागतिक एड्स दिन साजरा करून भागणार नाही. असा सप्ताहसुद्धा पुरेसा नाही. तर हा विषय मूल्यशिक्षणाचा आत्मा बनायला हवा.
एड्सच्या संदर्भात खुली चर्चा होऊन विद्यार्थ्यांच्या मनात असणाऱ्या समस्या जाणून घेणे शिक्षकांकडून घडायला हवे. एड्स रोग किती भयावह आहे याची जाणीव द्यायला हवी. खरे तर पोस्टर्स, घोषवाक्ये, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, लघुनाट्ये, पथनाट्ये, पोवाडे वगैरे उपक्रम हा भाग शालेय नियोजनाचा अविभाज्य भाग बनायला हवा. शैक्षणिक अभ्यासेतर उपक्रमांचे सूत्र हा विषय बनावा.
पालक सभा, पालक-शिक्षक संघ, माता-पालक मेळावे वगैरेंच्या द्वारे पालकांचे एड्सविषयक प्रबोधन नव्हे तर पालक-पाल्य नात्यांच्या आधारे त्या विषयाची जाण पाल्यांमध्ये कशी निर्माण होईल हासुद्धा भाग शाळांमधून सशक्त व सार्थपणे आयोजित व्हायला हवा.
प्रसारमाध्यमांमधून दिली जाणारी माहिती संगृहीत करणे, त्या एड्स विषयावरील माहितीच्या कात्रणांचा प्रकल्प करणे, वगैरेमधून शिक्षक विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊ शकतील. टी.व्ही.कार्यक्रमांवरील माहिती संक्षिप्त स्वरूपात शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावी अर्थात त्या वयोगटाला समजेल नि जेवढी अपेक्षित असेल तेवढ्याच मर्यादेपर्यंत ती द्यावी. ज्या शाळा एड्स जाणीव व जागरूकतेच्या संदर्भात उत्कृष्ट कार्य करतील त्या शाळांना व त्या शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जावे. एड्स समस्या जाणीव जागृती करणारा संगणक सहाय्यित अनुदेशन कार्यक्रम तयार करण्यातही संशोधक प्रवृत्तीचे शिक्षक यांनी पुढाकार घ्यायला हवा. हीच खरी शिक्षकांची व शाळांची गुणवत्ता होय.
[पालक जबाबदारी नीटशी घेत नाहीत म्हणून शाळांनी ती जास्त प्रमाणात घ्यावी, हे पुरेसे नाही. जबाबदारी सर्वांची आहे. सं.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.