संपादकीय . . . आणि पर्याय

[गेल्या अंकातील सॉलिप्सिझममधले धोके या लेखाचा हा जोडलेख सं.] शंकाच नको!
दैनंदिन जीवनातले सर्व ‘ज्ञान’ आपल्याला केवळ इंद्रियांमार्फत होते. यासोबतच आपण काही बाबी अध्याहृत आहेत, धरून चालण्याजोग्या आहेत असेही मानत असतो. एक म्हणजे आपली इंद्रिये आपल्याला पद्धतशीरपणे फसवत नसतात. कोणाला वाटेल की हे वेगळे सांगायची गरज नाही पण तशी गरज आहे. आपण कधीकधी चुकीचे ऐकतो, चुकीचे पाहतो, व इतर ज्ञानेंद्रियांकडूनही चुका होतात. पण हे सदासर्वदा एकाच प्रकारचे चुकणे नसते. आपल्या चुका ‘पद्धतशीर’, ‘व्यवस्थित’, ‘सिस्टिमॅटिक’ नसतात. त्या स्वैर असतात. अपघाताने, योगायोगाने घडतात. जर तुमचा उत्क्रांतीवर विश्वास असेल तर या मुद्द्याला एक पूरक अंगही सुचवता येईल. आपली इंद्रिये ‘न फसवण्यासाठी’ उत्क्रांत झाली आहेत. पण आपण याकडे जरा नंतर येऊ.
दुसरी बाब ही की इंद्रियांकडून मिळणारी माहिती बाहेरील परिस्थितीनुसार ठरत असते. बाहेरील वस्तू, एकूण परिस्थिती, यांच्याप्रमाणे आपली इंद्रिये काय माहिती देतात ते ठरते. याअर्थी आपल्याला मिळणारी माहिती बाहेरील वस्तूंचे, परिस्थितीचे प्रतिनिधित्व करत असते.
जर आपले डोळे आपल्याला पुढ्यातला दगड न दाखवता ‘मोकळी वाट’ दाखवत असतील, तर आपण सतत ठेचकाळत राहू. इतर ज्या कोणाचे डोळे त्याला दगड दाखवून देत असतील, ते कोणीही ठेचकाळणार नाहीत. आपण आपल्या दुखऱ्या पायांवर इलाज करण्यात वेळ घालवू. जगण्या-तगण्याला आवश्यक बाबींकडे आपण लक्ष देऊ शकणार नाही. ‘खऱ्या’ चित्राचे दर्शन देणारे, ‘सच्चे’ डोळे असणारे जगण्या तगण्याच्या शर्यतीत आपल्यापेक्षा कार्यक्षम ठरतील. आपण कमी जगू, कमी तगू म्हणजे कमी प्रजा मागे ठेवू. असे लक्षावधी पिढ्या जर घडत गेले, तर अखेर आपले डोळे अगदी चांगल्या त-हेने दगडाझाडांची माहिती देणारे असतील. म्हणजे इंद्रियांनी भोवतालच्या स्थितीची सच्ची, ‘इमानदार’ माहिती देणे, हा एक उत्क्रांत गुण आहे. अंधाऱ्या गुहांमध्ये व खोल समुद्रात जगणाऱ्या जीवांना डोळ्यासारखी प्रकाशेन्द्रिये नसणे, मानवेतर प्राण्यांचे डोळे मुख्यतः पृथ्वीवर पोचणाऱ्या सूर्यप्रकाशातील रंगांच्या ओळखीला अनुकूल असणे, या साया बाबी इंद्रिये परिस्थितीचे बऱ्यापैकी सच्चे प्रतिनिधित्व करणारी माहिती देतात, याला दुजोरा देतात.
पण तरीही इंद्रिये आपल्याला भोवतालच्या स्थितीची सच्ची माहिती देतात, यथातथ्य माहिती देतात, असे ‘सिद्ध’ करता येत नाही. अखेर आपल्या माहितीचा खरेखोटेपणा जोखायलाही आपण केवळ इंद्रियेच वापरू शकतो इतर काहीही नाही. अशी स्वतःवर देखरेख स्वतःच करण्याची स्थिती येते. आरोपी आणि न्यायमूर्तीच्यात ‘संगनमत’ आढळते. इथे व्यवहारात काय होते आहे याचा प्रश्न नाही, तर तर्काने काय बंधनकारक मानायला हवे याचा प्रश्न आहे. या भूमिकेला म्हणू या ‘मूलभूत शंकेखोरपणा’ किंवा ‘रॅडिकल स्केप्टिसिझम’. हा ‘वाद’ ही तर्काने खोडून काढता येत नाही पण म्हणून तो बरोबरही ठरत नाही. हा शंकेखोरपणा म्हणजे सॉलिप्सिझम नव्हे. ‘माझेच खरे’, हा सॉलिप्सिझम आणि ‘सारेच खोटे’ हा मूलभूत साशंकतावाद. पण हा शंकेखोरपणा केवळ इंद्रियांच्या कामावर रोखता येणार नाही. अगदी साध्यासाध्या अनुभवांबाबतही सतत ‘कशावरून?” असे विचारणारा जीव अस्तित्वच टिकवू शकणार नाही.
शेवटी फॅशनेबल नॉन्सेन्स मधली मांडणी मानावी लागते. The best way to account for the coherence of our experience is to suppose that the outside world corresponds at least approximately to the image provided by the senses. आपल्या अनुभवाच्या सुसंगतीला समजून घेण्यासाठी आपली इंद्रिये जी माहिती देतात ती ढोबळमानाने का होईना, बाहेरील जगाचे चित्र उभारत असते, हे मानणे चांगले.
यात ‘ढोबळ’ मान आहे. याविरोधी अशी मते तर्काने खोडून काढता येण्यातली नाहीत. पण तरीही ही वृत्ती इतर वृत्तींपेक्षा ग्राह्य मानायला हवी. हीच वृत्ती पुढे “वैज्ञानिक वृत्ती’ होते, विज्ञानाबद्दलचे बर्नांड रसेलचे मत पाहा Science is at no moment quite right, but it is seldom quite wrong and has, as a rule, a better chance of being right than the theories that are unscientific (My Philosophical Development 1959)
आपण प्रत्यक्षदर्शनासाठी हेच वापरू ते कधीच अगदी खरे नसते, पण बहुतेकवेळी अगदी चूकही नसते. प्रत्यक्षदर्शनाचे महत्त्व नाकारणाऱ्या भूमिकांपेक्षा ते मानणारी भूमिका सहसा बरोबर असते. कशासाठी ? सुखासाठी!
एकूण इंद्रियांकडून मिळणारी माहिती ही बाहेरील जगाची प्रतिमा आहे असे मानले, की या प्रतिमेचा पद्धतशीर आणि नेमका अभ्यास करायला सुरुवात करता येते. हा व्यवहारी विवेकाचा, व्यवहारी शहाणपणाचा ‘टोकदार’ वापर असतो. हे टोक आणणे अखेर विज्ञान या नावाने ओळखले जाते. जसे टोक आणण्याचे तंत्र हे विज्ञानाचे लक्षण आहे, तशीच टोकदार अभ्यासातून मिळणारी माहितीही विज्ञान म्हणून ओळखली जाते.
विज्ञानाची पद्धत एकूण जगण्याच्या किंवा कोणत्याही अभ्यास करण्याच्या पद्धतीपेक्षा मूलभूत पातळीवर वेगळी नाही. त्यात काही तंत्रांनी नेमकेपणा, सामान्यपणा, केवलपणा आणायचा प्रयत्न होत असतो. प्रयोग अनेकदा केले जात असतात. उत्तरांच्या विश्लेषणासाठी सांख्यिकी आणि तत्सम शास्त्रांची मदत घेतली जात असते. कधीकधी उत्तरे ‘उघड’ उत्तरांना काट मारणारी असतात. पण हे सगळेच्या सगळे गुणविशेष तपशिलाचे आहेत, मूळ वृत्तीचे किंवा दृष्टिकोणाचे किंवा धारणेचे नव्हेत. आणि हा ‘साधेपणा’, हे नेहमीच्या व्यवहारासारखेच असणे भरपूर चकवाचकवीचे कारण ठरले आहे. एकूणच ‘साध्या’ संज्ञांची व्याख्या करणे, ‘साध्या’ पद्धतींचे नियम घालून देणे, हे अवघड प्रकार असतात. ते करणाऱ्याला सरळ मांडणी करत क, म्हणून ख, नंतर ग, त्यातून घ, असे जाता येत नाही. कधी अशा संज्ञा वापराव्या लागतात, ज्यांचे नेमके अर्थच समजावून दिलेले नसतात. कोणी अडवून विचारले, “अमुक म्हणजे काय ?”, तर “समजेल रे ऐक तर!” असे म्हणत पुढे जावे लागते.
आज तरी विज्ञानामागच्या तर्काचे, विवेकाचे नियम घालून देता आलेले नाहीत. तसे प्रयत्न झाले आहेत आणि त्यांच्यातील उणिवा आणि दोष हिरिरीने दाखवले गेले आहेत. मुळात असे सुसंगत, सर्व परिस्थितींना लागू पडणारे नियम आहेत की नाहीत, हाही प्रश्न अनुत्तरित आहे. काही ढोबळ तत्त्वे सांगता येतात. विज्ञान पूर्वप्राप्त (a priori) युक्तिवादांबद्दल साशंक असते. साक्षात्कार, आप्तवाक्य, बाबावाक्य, असली प्रमाणे विज्ञानात अमान्य असतात. पण ही तत्त्वे, सूत्रे, जे काय म्हणाल ते, ही नकारात्मक आहेत, अमुक मानणार नाही, अशा प्रकारची आहेत. अमुक मानावे, असे कानून घालून देणे मात्र कमी दिसते.
एक कारण असेही असेल की साध्या वागण्यात आणि विज्ञानातही फारदा नव्या परिस्थितींना सामोरे जावे लागते. आणि अशा नव्या परिस्थितीशी जुळवून घेणे दरवेळी नवे काहीतरी करायला भाग पाडते. परिणाम असा दिसतो की विज्ञानाने शोधलेले नियम, रूढ केलेले नियम, यांना चांगल्या तर्कवादाचा, युक्तिवादाचा आधार असतो पण प्रत्येक नियमाला वेगवेगळे युक्तिवाद वापरावे लागू शकतात ! परत एकदा मूलभूत शंकेखोरपणाकडे जाऊ. आता मुद्दा आहे ‘पूर्ण सिद्धता’ मिळत नाही हे मानून आपल्या सिद्धतेच्या कल्पनांना जराशी मुरड घालण्याचा. विज्ञानाबद्दल नियम घडवायचे सुरुवातीचे प्रयत्न सांगत की निसर्गाचे निरीक्षण करावे. त्यातून काही नियमितता जाणवतील. त्यांना सूत्ररूपात मांडावे. मग काही नियंत्रित प्रयोग करून आपला सूत्ररूप नियम बरोबर आहे का, ते तपासावे. खात्री पटल्यास नियम खरा मानावा. ही मांडणी फ्रान्सिस बेकनने केली. (ज.१५६१ -मृ.१६२६)
यातल्या प्रत्येक टप्प्याबाबत पुढे शंका उपस्थित केल्या गेल्या.
मुळात निरीक्षण कशाचे करायचे, हा प्रश्न. कोणतेही नियंत्रण नसलेले निरीक्षण असू शकत नाही. जसे, भारतात तरी उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो. पण हे सुचायलाही काळ आणि हवामान यांचा संबंध आहे हे आधी सुचायला हवे. जर असा संबंध आधी सुचला, तर एखादेवेळी आपण पुढची निरीक्षणे पुरेशा तटस्थपणे न करता आपल्या मनातल्या संबंधाला आधार देणाऱ्याच बाबी पाहू. ‘अचपळ मन माझें / नावरे आवरीतां’ हा धोका नेहेमीच असतो! अशा धूसर तत्त्वांवर बेतलेल्या निरीक्षणांमधून काही नियमितता जाणवतीलही. पण त्या तरी ‘खऱ्या’ कशावरून ? एक कहाणी ऐका
एक माणूस गावाच्या चौकात उभा असतो. त्याच्या शेजारी एक हत्ती आणि त्याचा माहूत उभे असतात. माणूस माहताला विचारतो, “किती वाजले?” माहूत हत्तीची सोंड हाताने एकीकडे सरकवतो, आणि म्हणतो, “दहा वाजून पाच मिनिटं.” जरा वेळाने पुन्हा माणूस विचारतो, “किती वाजले?” । पुन्हा माहरा सोंड हाताने सरकवतो आणि म्हणतो, “दहा वाजून पंचवीस मिनिटं ?” माणूस विचारतो, “काय हो, तुम्ही सोंडेला हात लावून वेळ कशी ओळखता?”
माहूत सांगतो, “सोंडेला हात लावून कुठे वेळ ओळखतो मी? मी सोंड बाजूला केली की तिकडे मनोऱ्यावर घड्याळ आहे ते दिसतं, आणि मला वेळ कळते. तुम्हीही चार पावलं दूर गेलात तर तुम्हालाही दिसेल घड्याळ!”
आपल्याला सुचते आहे ती नियमितता खरी आहे, तिच्यामागील आपल्याला सुचणारा कार्यकारणभाव खरा आहे, याची खात्री कधीच देता येत नाही. आपल्याला सुचलेल्यापेक्षा काही वेगळ्याच नियमिततेने गोष्टी घडतात, पण काही उत्तरे मात्र आपल्या निरीक्षणांतून जुळतात, ही शक्यता नेहेमीच असते.
एकदा का दोन वेगवेगळे नियम एकाच त-हेची उत्तरे देऊ शकतात असे मानले, की “नियंत्रित’ प्रयोगांनाही अर्थ उरत नाही. आपण अनुभवांची सुसंगती समजून घ्यायला इंद्रियांकडून आलेली माहिती उपयुक्त ठरते, असे म्हटले होते. आता तिथेही शंकेला जागा दिसते आहे!
समजा निरीक्षणाआधी सूत्र सुचण्याचा शंकास्पद व्यवहार आपल्या हातून झालेला नाही. आपण नियमिततेमागची यंत्रणाही चुकीची सुचवलेली नाही. पण तरी एक अपार महत्त्वाचा मुद्दा उरतोच, की नियमितता टिकून राहील, याची खात्री काय! आपण जर आपल्या निरीक्षणे धूसर सूत्र प्रयोग पक्के सूत्र पद्धतीतून नियम ठरवत आहोत, तरी त्याच्यावर स्थळकाळाच्या मर्यादा असणे शक्य आहेच. ‘नेमेचि येतो, मग पावसाळा’ हे इंग्लंडात खरे नाही. मॉन्सूनचा पाऊस न पडणाऱ्या कोणत्याच भूप्रदेशात ते खरे नाही. सूर्य ‘रोज’ (म्हणजे २४ तासांनी) उगवतो, हे तर कधीच खरे नव्हते! पूर्वी ‘दिवस’ चोवीस तासांपेक्षा कमी असायचा. पुढे तो चोवीसांऐवजी पंचवीस किंवा जास्त तासांचाही होईल. आज असे मानले जाते की काही अब्ज वर्षांत सूर्याचे इंधन संपून तो एक थंड, काळा कोळसा होईल म्हणजे उगवणेच बंद पडेल! तरीही आपण उन्हाळ्यानंतर पावसाळा आणि रोज सूर्य उगवतो इतक्या ढोबळ ‘वैज्ञानिक’ सूत्रांना मान्यता द्यायची का? आणि जर ही सूत्रेही शंकास्पद, बेभरवशाची आहेत, तर इतर साऱ्या विज्ञानातून सिद्ध झालेल्या नियमांच्या आणि थिअऱ्यांच्या डोलाऱ्यांचे काय ?
इथे थोडा ‘दोन घड्याळांच्या कथे’सारखा प्रकार आहे. आपल्यापाशी दोन घड्याळे आहेत. एक बंद पडलेले आहे, आणि दुसरे रोज एखादे मिनिट मागेपुढे होते. तत्त्वतः ‘बंद’ घड्याळ दिवसातून दोनदा बिनचूक वेळ दाखवते. दुसरे ‘चालू’ घड्याळ मात्र कधीही बिनचूक वेळ दाखवत नाही. आपण म्हटले आहे की दुसरे घड्याळ ‘रोज एखादे मिनिट मागेपुढे होते.’ आता मागे होते की पुढे ते माहीत नाही. एक मिनिट, की कमी, की जास्त हेही माहीत नाही. आणि त्याच घड्याळावर अवलंबून राहिल्याने ‘रोज’ हा गापवाचक शब्दही निरर्थक ठरतो आहे. पण एक शक्यता आहे की काही माणसे मिळून दुसऱ्या घड्याळाला, त्यात दिसणाऱ्या वेळेला ‘दुरुस्त’ करून घेण्याचा प्रयत्न करतील. ही क्रिया बहुधा अशी असेल ताऱ्यांच्या भ्रमणातून ‘दिवस’ ही कल्पना आधी समजलेली आहेच. घड्याळ हे उपकरण तयार केले जाण्याआधी सूर्य किंवा इतर काही ताऱ्यांच्या मदतीने “अमुक घटनेपासून तमुक घटनेपर्यंतच्या काळाला ‘एक दिवस’ म्हणायचे.” असे ठरले असेलच. इथे शक्यता सुचवली जात नसून एक व्यवहारी व्याख्या, ऑपरेटिव्ह (operative) व्याख्या घडली असेलच, हे ठसवले जात आहे. जर तेही घडले नसेल, तर ‘रोज’, ‘घड्याळ’, ‘दिवस’, ‘मिनिट’, ‘मागेपुढे होणे’ हे काहीच शक्य नाही. आणि दिवसाची व्याख्याही पूर्वदत्त, पूर्वप्राप्त, र ळिीळ नाही. ती व्यवहारातून, काही कारणाने, काही सोईंसाठी घडवलेली आहे.
यातूनच घड्याळ नंबर दोन मागेपुढे होते हे कळले आजही कळते आणि पुढेही कळेल. पहिल्या काही दिवसातच दुसरे घड्याळ आणि दिवसाची व्यवहारी व्याख्या यांच्या तुलनेतून घड्याळ मागे जाते की पुढे हा प्रश्न सुटेल. आता एक साधी, प्राथमिक दुरुस्त करण्याची यंत्रणाही हाती आली आहे. समजा घड्याळ मागे पडत आहे, तर रोज एक मिनिट घड्याळ पुढे केल्याने ढोबळमानाने बरोबर वेळ सांगता येईल. हेच तंत्र वारंवार वापरून दुसऱ्या पातळीची दुरुस्ती यंत्रणाही समजेल, की घड्याळ एक मिनिट मागे पडत नसून एकूणसाठ सेकंद मागे पडते. मग एक उपनियम निघेल की घड्याळ रोज एक मिनिट पुढे न्यावे, पण दर साठाव्या दिवशी असे करू नये. ही दुरुस्ती प्रक्रिया उपनियम तीन, चार . . . शंभर करत जास्तजास्त नेमकेपणे घड्याळ नंबर दोनला उपयुक्त ठरवेल! ह्या प्रक्रियेची काही अंगे मुद्दाम ठसवायला हवी. एक म्हणजे ‘माणसांचा गट’ घड्याळेही पाहतो आणि सूर्यताऱ्यांच्या आधाराने दिवसही तपासतो. एकच माणूस असे करत नाही आहे. व्यक्तिनिष्ठेला शह दिला गेला आहे. वेगवेगळ्या माणसांची निरीक्षणे वापरून असा शह दिला जात आहे. सर्व नियम-उपनियमांना आधार मात्र फक्त प्रत्यक्षदर्शनाचाच आहे. उपनियम घडवायची प्रक्रिया न संपणारी आहे. कोणत्याही क्षणी “आता संपले, दुरुस्ती-नियम शोधायचे काम”, असे म्हणता येत नाही. पण घड्याळाची उपयुक्तता इतकी आहे की दुरुस्ती करत राहणे गरजेचे आहे. किती उपनियमांपर्यंत जायचे, हा प्रश्न गरजेनुसार ‘उत्तरला’ जाणार आहे, इतर कोणतेही बंधन त्याला लागत नाहीत. फक्त नेमकेपणाची गरज निरीक्षण-निष्कर्ष-दुरुस्ती या प्रक्रियेची मर्यादा ठरवते.
एखादा हुषार माणूस अनेक नियम-उपनियम तपासून एक जास्त समावेशक नियम सुचवेल, ही शक्यता आहे. एखादा आणखी हुषार माणूस सूर्यताऱ्यांच्या मदतीने रेखला जाणारा दिवसही बदलतो आहे, हेही दाखवून देऊ शकेल. पण हा तपास कधीच संपणार नाही! ह्यात कुठेही ‘विज्ञान’ म्हणावेसे काही आलेले नाही. व्यवहाराला उपयोगी ठरणारे काही तरी प्रमाण घडवले जात आहे. निरीक्षणांना अनुमानांची जोड देत, पुन्हापुन्हा हे करत जास्तजास्त पातळीची उपयुक्तता गाठली जात आहे. आणि खरे तर हा विवेकी प्रत्यक्षदर्शनाचा, अनुमानाने अर्थ लावण्याचा, उपयुक्ततेसाठी केला जाणारा खटाटोप म्हणजेच विज्ञान !
पण घड्याळ नंबर एक आजही रोज दोनदा नेमकी वेळ सांगते, आणि दुसरे घड्याळ मात्र अनंत दुरुस्त्या करूनही कधीच नेमकी वेळ सांगत नाही. हे विधान शंभर टक्के खरेही आहे, आणि पूर्णपणे निरुपयोगीही आहे! आपल्याला “आत्ता किती वाजले आहेत?” या प्रकारचे प्रश्न सोडवायला घड्याळ लागते. आणि या बाबतीत घड्याळ नंबर एक कुचकामी आहे. घड्याळ नंबर दोन चकीचे असेलही. त्यातली चूक नियम उपनियम वापरून कमी करूनही शिल्लक असेलच. पण तरीही ते घड्याळ “आत्ता किती वाजले आहेत ?’ या प्रश्नाला व्यवहारी उत्तर देते. ‘नंबर वन’ मात्र पाहायलाही नको त्याचे उत्तर बदलत नाही. एक तत्त्व आहे की अनेक शक्यतांपैकी एक निवडणे, यातून माहिती मिळते आणि पहिल्या घड्याळात निवडीला अर्थ नाही, कारण वेगवेगळ्या शक्यता नाहीत. दुसरे घड्याळ मात्र फॅशनेबल नॉन्सेन्स च्या मांडणीशी जुळते आहे No statement about the real world can ever literally be proven, but to use the eminently appropriate expression from Anglo-saxon law, it can sometimes be proved beyond any reasonable doubt. The nonreasonable doubt subsists. वास्तव विश्वाबद्दलचे कोणतेच विधान शब्दशः सिद्ध होत नाही. पण अँग्लोसॅक्सन कायद्यातील नेमकी लागू पडणारी शब्दरचना वापरायची झाली तर काही विधाने, काही वेळा विवेकी शंकांना सोडवण्याइतपत खात्रीने सिद्ध करता येतात. अविवेकी शंकांचा “निर्वाह’ होतोच (नंगेसे खुदा भी डरता है!). रास्ता और मंझिल
रोजच्या जीवनात आपण डोके वापरून जसे निर्णय घेतो, त्यांचीच सुधारित, संघटित आवृत्ती म्हणजे विज्ञान. माणसे त्या विषयामागे, शास्त्रामागे लागतात, कारण त्या प्रकारच्या ज्ञानकमाईने माणसांचे जगणे सोपे, सुखाचे, सुसह्य होईल अशी आशा असते. विज्ञानातली कोणतीतरी शाखा शिकणारे, वापरणारे, संशोधन करणारे, यांची तुलना घड्याळ नंबर दोनच्या ‘सुधारकां’शी करता येईल. ते घड्याळ सुधारायला धडपडतात कारण त्यांच्या समाजातल्या इतर कोणाला तरी घड्याळे वापरणे आवश्यक असते समजा, चहा करणारे. चहा किती वेळ मुरू द्यायचा, हे ठरवायला घड्याळ लागते. मग चहा करणारे घड्याळे सुधारणाऱ्यांना पगार द्यायला तयार होतील, यात आश्चर्य नाही.
विज्ञान ही माणसाच्या अनेक व्यवहारांच्या जंजाळातली एक गाठ आहे. ती सांभाळणाऱ्यांना इतर गाठी सांभाळणारे सांभाळून घेतात! विज्ञान अखेर आणि मुळात उपयोगी ज्ञान कमावण्याच्या शिस्तीचे एक नाव आहे. तो अत्यंत मूलभूतपणे सामाजिक व्यवहार आहे, वैयक्तिक नव्हे. त्यामागचा हेतू समाजाचे आयुष्य सुखी व्हावे, हा आहे. ते साधन आहे, आणि साध्य अपेक्षित आहे ते म्हणजे समाजाचे सुख. समाज जितका गुंतागुंतीचा होतो तितके हे साध्य-साधन फरक दृष्टीआड होतात. दैनंदिन जगण्यात आपण ‘माझ्या या आयुष्याचा अर्थ काय ?’ हा प्रश्न स्वतःला विचारत नाही. आपण कोणत्यातरी क्षणी स्वतःला कोणतेतरी काम नेमून देतो. पण याच्यामागे आशा सुखाची असते. मी अमुक केल्याने इतरांना सुख होईल, आणि मग ते मला सुख देणारे काहीतरी करतील ही सगळी तर्कपरंपरा, हा सगळा युक्तिवाद सुप्त असतो. रस्त्याने चालताना मंझिल दिसत नाही. यात कापूस पिंजला तर अनेक धागे दिसतात. माझ्या कामाने इतरांना सुख होते, आणि ते ‘इष्ट’ प्रकारचे सुख आहे, हे आपण धरून चालतो. हे धरणे, ही ‘धारणा’, खरी असेलच असे नाही. मी शस्त्रक्रियेच्या वेळी रोग्यांचे क्लेश कमी करायला औषधे घडवली, आणि नंतर ती मादक द्रव्ये म्हणून वापरली गेली. हुकला, माझा नेम मी माफिया शास्त्रज्ञ ठरलो! मी इतरांना दीर्घकाळ सुख देणारे संयत, मितभोगी, मिताभिलाषी जीवन प्रयत्नाने कल्पनेत उभे केले, पण कोणालाच अशा जगण्यात रस नव्हता आणि सगळेच बकासुरी भुकेने ‘उपभोक्त्यां’चेच आयुष्यक्रम चालत राहिले. मी वेडा ठरलो चालायचेच!
मी संशोधनाच्या कामात इतका गुंगलो की मला साध्य कोणते, साधन कोणते, काही कळेना. मी सांगू लागलो की ज्ञान मिळवणे हेच ‘मूल्य’ आहे त्यासाठी मी अनेक दुःखेही सहन करायला तयार आहे. मला ‘आध्यात्मिक’ परिमाण लाभले, असे लोक म्हणू लागले. मी आईन्स्टाइन ठरलो! ठीक आहे. व्यक्तीच्या पातळीवर असले समज गैरसमज होणारच. पण जरा दुरून पाहिले तर ‘रास्ता’ आणि ‘मंझिल’ यांच्यातले संबंध भुलवणार नाहीत. विज्ञान इतर मानवी व्यवहारांसारखेच सुखाच्या इच्छेतून घडते शंकाच नको! तज्ज्ञांसाठी, पण तज्ज्ञांसाठीच नव्हे
ज्ञानाच्या खात्रीबद्दल, ‘भरोसेमंद’पणाबद्दल काही शंका वर नोंदल्या आहेत. तत्त्वाधारित निरीक्षणे, Theory-laden observations; सोंड हलवून वेळ सांगणे, underdetermination of theories; या साऱ्या घनघोर विवादास्पद बाबींची जुजबी तोंडओळख इथे आहे. या मुद्द्यांवर कितीही वादंग माजले तरी खरे पाहता आपल्याला एक बाजू आवडते की दुसरी, हे ठरते एकाच निकषावर. आपण विज्ञान हे इतर मानवी व्यवहारांसारखेच स्वार्थी, सुखाची आस लागलेले मानतो की नाही, हाच कळीचा मुद्दा असतो. रसेलचे कधीच अगदी खरे नसलेले, कधीच ठार चुकीचे नसलेले विज्ञान सुखाची आस मानतेच. आणि हा माझाच दृष्टिकोण नाही. बहसंख्य शास्त्रज्ञ अशाच वृत्तीने वागतात, असे त्यांच्या वर्तणुकीतून दिसते. ‘दिसणे’च शंकास्पद मानले, तर मात्र बोलणेच खुंटते. आणि या दृष्टिकोणाचा गाभा विवेकी शंकांच्या समाधानात आहे, शब्दशः सिद्धतेत नाही.
[सॉलिप्सिझममधले धोके….. या लेखाचा हा ‘जुळा’ लेख]
वाचवा
चिंता करा मूर्धन्य ‘ष’ ची वाचवता आला तर वाचवा ‘ङ’. कोण चोरतं आहे रेघी हिशोब ? आणि नागरीतले आकडे ? कुठे गेला कोण जाणे ऋषींचा ‘ऋ’ ? चालून येतायत पोलादाच्या, फायबरच्या, मिश्रधातूंच्या अनेक अनोळखी वस्तू, अणुस्फोटाच्या ढगासारख्या आपल्या जगावर. बॅटरीचा हनुमान उचलतोय प्लास्टिकचा पहाड, आणि पोरांच्या हातातली ती भीतिदायक वस्तू म्हणतेय पिंग…. पिंग….. पिंग. माझ्या आजीचा लाकडी चाकांचा घोडा वाचवा. आपापले भोवरे-जाळ्या सांभाळा. पतंग सुरक्षित जागी लपवून ठेवा. पाहा झुलतंय पृथ्वीवर पेरूचं शेवटचं झाड उडतायत आकाशात, पृथ्वीवरचे शेवटचे पोपट विद्वानांनो, सांगा, कुठे टांगू आजोबांची बंडी? बाबांचा बसूला कोणत्या संग्रहालयात पाठवू आईचा करदोडा, ताईची वाकी, कोणत्या खात्यात पाठवू, सांभाळण्यासाठी? राष्ट्रपतींना मी विनंती करतो, खिचडी आणि तांबट, मदारी आणि लोहार पुस्तक आणि भडभुजा, कवी आणि हत्ती यांना विलुप्तप्राय राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा. तशी खडावा, मंजन आणि पितळी लोटे वाचवायाची तीव्र गरज नाही. रथ, राजकन्या, धनुष्य, ढाली आणि तांत्रिक यांना कायद्यानं वाचवायची गरज नाही. वाचवायचं असेल तर वाचवावं गावातलं शेत, जंगलातलं झाड, शहरातली हवा, झाडांवरची घरटी, दैनिकांतलं सत्य, राजकारणात नैतिकता, कारभारात माणुसकी, वरणात हळद. कुंभार, धर्मनिरपेक्षता आणि परस्परांवरचा विश्वास जपायला संविधान दुरुस्ती नाही का करता येणार ?
सरदारजी, पगडी सांभाळा आपली, आणि पंजाबचा टप्पा. मुल्लाजी, उर्दूनंतर कोरम्याचा स्वाद वाचवायची काळजी घ्या. इकडे मीही प्रयत्न करतो पुन्हा एकदा, वाचवता आली तर वाचवतो, अर्वाचीन हिंदी कविता. (रात में हार्मोनियम या उदय प्रकाश यांच्या संग्रहातून घेतलेल्या बचाओ या कवितेचे हे रूपांतर.)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.