एक क्रान्तीः दोन वाद (भाग २)

[एक क्रान्तीः दोन वाद च्या पहिल्या भागात औद्योगिक क्रान्तीसोबत घडत गेलेल्या भांडवली उत्पादनव्यवस्थेच्या सुरुवातीच्या रूपाची ओळख आपण करून घेतली. अँडम स्मिथ, जेरेमी बेंथम, जॉन स्टुअर्ट मिल् यांच्या विचारांनुसार इंग्लंडात भांडवलवादी अर्थव्यवस्था कशी रुजली ते आपण पाहिले. आता त्यापुढे-]

परदेशगमन!
औद्योगिक क्रांतीनंतरच्या बदलाचा मागोवा घेताना वेगवेगळ्या प्रक्रियांच्या विकासाचे टप्पे ठरवताना काही अडचणी येतात. प्रत्येक भाष्यकार सोईनुसार टप्पे पाडत आहे असे वाटते. एका बाबतीत मात्र ढोबळमानाने एकमत आहे. इस१७७६ ते इस १९१४, म्हणजे अमेरिका स्वतंत्र होण्यापासून पहिल्या महायुद्धाचा काळ, यात भांडवली व्यवस्थेचा बराचसा अनिर्बंध असा विकास झाला. या काळाला प्रदीर्घ एकोणिसावे शतक, द लाँग नाइन्टीन्थ सेंचरी, म्हटले गेले आहे. सुमारे इस १८२० पर्यंत युरोपातून इतर जगात जाणारी माणसे नगण्य होती. नंतरच्या काळात मात्र सुमारे चार कोटी माणसे युरोपाबाहेर गेली. यांपैकी सर्वांत जास्त प्रमाण इंग्लंडातून जाणाऱ्यांचे होते डू सुमारे पावणेदोन कोटी माणसे. स्कॅडिनेव्हियन देश, जर्मनी, फ्रान्स, इटली, बेल्जियम, या देशांमधून मिळून दोन-सव्वा दोन कोटी माणसे जगभरात गेली. रशियातूनही थोडीशी, सुमारे साडेपाच लाख माणसे रशियन साम्राज्याच्या पूर्व भागात जाऊन वसली.
सोबतच युरोपची जगभरातली गुंतवणूकही वाढत गेली. इस. १९१४ मध्ये युरोपची इतरत्र केलेली गुंतवणूक होती सुमारे चव्वेचाळीस अब्ज डॉलर्सइतकी. इथेही वीसेक अब्ज डॉलर्सइतकी गुंतवणूक एकट्या इंग्लंडची होती. या गुंतवणुकीचा सर्वाधिक भाग अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, कॅनडा, अशा इंग्रजांच्या गौरवर्णी वंशज देशांमध्ये गेला. उरलेल्यातला बराच भाग कॅरिबियन बेटे, आर्जेंटिना, मेक्सिको, अशा युरोपीय गौरवर्णी वंशज देशांमध्ये गेला. तुलनेने नगण्य भाग भारत, चीन, जपान वगैरे गौरेतर देशांमध्ये गेला. इंग्लंड वगळता युरोपीय राष्ट्रांना स्वतःच्या वंशाची बहुसंख्या असलेल्या वसाहती फारशा उपलब्धच नव्हत्या. स्पेनची दक्षिण अमेरिकेतील गुंतवणूकच या प्रकारची होती. इतरत्र मात्र युरोपीय देशांची गुंतवणूक गौरेतर वसाहतींमध्ये गेली. यांपैकी फारच कमी गुंतवणूक वसाहतींमधल्या औद्योगिक उत्पादनासाठी होती. बहुतांश गुंतवणूक रेल्वे कंपन्या, खनिकर्म, कच्च्या मालाचा व्यापार, युरोपीय औद्योगिक उत्पादनांचा व्यापार यांत होती.
म्हणजे गोरी माणसे पाठवलेल्या जागी युरोपने औद्योगिकताही पाठवली, आणि गुंतवणूकही केली. गौरेतर वसाहतींमध्ये फक्त गुंतवणूकच केली, पण औद्योगिकतेची निर्यात मात्र केली नाही!

कायदेः वैज्ञानिक आणि अवैज्ञानिक
इंग्लंडने सागरी वाहतुकीवर जबरदस्त पगडा बसवला, हे इतर युरोपीय राष्ट्रांना आवडणे शक्य नव्हते. सागरी वाहतुकीबद्दल तीव्र स्पर्धा सुरू झाली. सर्व जहाजे नको तितका माल लादू लागली, त्यामुळे वायवादळाने बुडणाऱ्या जहाजांचे प्रमाण वाढले. अखेर इंग्लंडमध्ये कायदा करून दर जहाजावर एक आडवी रेषा रंगवली जाऊ लागली. ह्या रेषेपर्यंत जहाज बुडेल इतकाच माल लादायची परवानगी देण्यात आली. आमच्या शाळकरी भौतिकीच्या पुस्तकांत ही प्लिमसॉल रेषा आर्किमिडीजच्या तत्त्वासोबत शिकवली जाई! असाच वैज्ञानिक कायदा करून रेखांश मोजण्याचे मूळ स्थान इंग्लंडातील ग्रीनिच येथील वेधशाळेत स्थिरावले होतेच. इंग्लंडेतर युरोपीय राष्ट्रांनी इंग्लंडचा रेखांश कायदा, लॉजिट्यूड अॅक्ट व प्लिमसॉल कायदा यांना मान्यता दिली. इंग्लंडचा इस १८३३ चा फॅक्टरी कायदाही इतरांनी स्थानिक फेरफार करत स्वीकारला. स्वीकारले नाहीत ते इंग्लंडचे सागरी वाहतुकीच्या मक्तेदारीचे कायदे. इथे भांडवलवादाला आदर्श अर्थव्यवस्था मानणे, हे देश-राष्ट्र, नेशन-स्टेट या संकल्पनेला काट मारताना दिसते. भांडवलाच्या वापराने स्वस्तात स्वस्त पद्धतीने उत्पादने घडवणे व विकणे मान्य केले की देशांच्या, राष्ट्रांच्या सीमांना अर्थ उरत नाही. तत्त्वतः एका देशातून एक घटक, दुसरीकडून दुसरा, असे गोळा करून मग चौथ्या-पाचव्या देशांत वेगवेगळ्या प्रक्रिया करून घेणेच स्वस्तात स्वस्त ठरू शकते. अशा वेळी एखाद्या देशाने सीमाशुल्क, निर्यात-प्रोत्साहन वगैरेंसाठी केलेले कायदे, आपल्या प्रजेतील कामगार व कौशल्ये यांना रोजगार उपलब्ध होत राहावा यासाठीचे कायदे वगैरे करणे अर्थशास्त्रविरोधी ठरू लागले. देशांच्या सीमा मानणे, राष्ट्रांच्या सीमा मानणे अकार्यक्षम ठरू लागते. मुळात युरोपीय (विशेषतः पश्चिम युरोपीय) देशांची प्रजा बरीच सरमिसळ असलेली होती. अनेकानेक प्रांत कधी या देशाच्या तर कधी त्या देशाच्या सीमांमध्ये धरले जाण्याचा इतिहास होता. असे असूनही देशादेशांमध्ये तेढ वाढली ती भांडवलवादाने.
जरी स्मिथचा अदृश्य हात मान्य केला, की बाजारपेठा समाजाच्या घटकांमध्ये वस्तूंचे व उत्पन्नांचे न्याय्य वाटप करतात, तरी न्याय्य स्थितीला पोचताना तीव्र अन्यायही होतात. उदाहरण म्हणून इंग्लंडमधील लोकसंख्येचा विचार करू. इस १७७६ सुमारे नव्वद लाख असलेली इंग्लंडची लोकसंख्या इस १८५१ मध्ये दोनशे दहा लाख झालेली दिसते. आज ती सहा कोटींवर आहे. याच काळात शेतीवर जगणाऱ्यांचे प्रमाण सत्तर टक्क्यांवरून तीस टक्क्यांवर आले असे मानले तर खालील चित्र दिसते.

इ.स. १७७६इ.स. १८७१
शेतीवर जगणारी माणसे ६३ लाख६३ लाख
इतर माणसे  २७ लाख१४७ लाख

हे आकडे परदेशगमने झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या प्रजेचे आहेत, हे ध्यानात घ्यावे. या काळात सर्व समाजघटकांमध्ये साधारण सारखीच लोकसंख्यावाढ झाली असे मानले तर शेतीवर जगणारे १४७ लाख झाले असते डू प्रत्यक्षात ते ६३ लाखच राहिले. म्हणजे ८४ लाख शेतकऱ्यांची मुले आईबापांच्या पद्धतीने न जगता वेगळ्या अशा औद्योगिक जीवनपद्धतीत लोटली गेली. या साऱ्यांना नवे रोजगार देणे भांडवली व्यवस्थेला अर्थातच जमले नाही. अनेक माणसे बेरोजगार झाली. दरिद्री लोकांना आश्रय देणाऱ्या वर्कहाऊस-पुअरहाऊस संस्थांची निकड वाढली. मुळात गैरसरकारी, चर्चने चालवलेल्या या संस्थांमध्ये सरकारलाही उतरावे लागले. एक वेगळा भागही होता ड्ड या सर्व काळात युरोपात सतत आणि तीव्र युद्धे झडत राहिली. तेव्हाही देशांतर्गत प्रश्नांकडून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी युद्धे हा महत्त्वाचा पर्याय वापरला जात असे!
आधी इंग्लंडमध्ये देशांतर्गत अस्वस्थता उपजली. लवकरच युरोपातील देशांमध्ये ती पसरली. मग युरोपातील देश एकमेकांशी लढू लागले. याच काळात युरोपीय देश गोऱ्यांच्या व गौरेतर वसाहतीही उभारत होते. एकच गोष्ट मात्र दिसत नव्हती- अदृश्य हात !
यामुळे काही वेगळा विचारही होऊ लागला. एका अर्थी तो उपयोगितावादाचा व्यवहारी विस्तार होता. हा विचार असा ड्डड्ड भांडवली व्यवस्था विषमतेला जन्म देते, त्यामुळे ती मान्य करू नये. तिला पर्याय आहेत व ते घडवता येतात. स्पर्धा आणि स्वार्थ हे जसे मानवी गुण आहेत तसेच सहकार्य, सामूहिक वृत्ती, हेही माणसांना जमणारे, आवडणारे गुण आहेत. स्पर्धा स्वार्थ सामाजिक परिस्थितीमुळे अभिव्यक्त होतात; तर सहकार्य-सामूहिक कृतींना उत्तेजन देणाऱ्या सामाजिक व्यवस्थाही शक्य आहेत. आपण जाणीवपूर्वक सामाजिक कृतींमधून अशा समताधिष्ठित, सहकारी समाजव्यवस्था घडवू शकतो; ही सारी विचारप्रणाली समाजवाद, सोशलिझम, डेलळरश्रळी या नावाने ओळखली जाते.
या विचारप्रणालीत अनेक पंथभेद आहेत. प्रत्येक पंथ वेगवेगळ्या घटकांवर कमीजास्त भर देतो. यामुळे समाजवाद या संकल्पनेची एकच सर्वमान्य व्याख्या नाही. मागे एका ज्येष्ठ राजकारण्याने इंदिरा गांधींना समाजवाद म्हणजे काय असे विचारले असता त्यांनी ते “ते उघड आहे.’ असे उत्तर दिले. प्रश्नकर्त्याने हे नोंदतानाच त्याने हाच प्रश्न पंडित नेहरूंना विचारल्याची कहाणीही सांगितली. नेहरू म्हणाले होते, “मोठा विषय आहे डड्ड बसू कधीतरी चर्चेला.”! आज समाजवादी असे बिरुद लावणाऱ्यांनी मोठी स्वप्ने व व्यावहारिकता, क्रांतीवर आग्रह व सुधारणावाद, केंद्रशासनाचा पुरस्कार व विकेंद्रिततेचा पुरस्कार, पक्षबांधणीवर आग्रह व पक्षनिरपेक्षता, राष्ट्रवाद व आंतरराष्ट्रीय वृत्ती, अशा अनेक परस्परविरोधी भूमिका घेतलेल्या दिसतात. रशियन, चिनी, उत्तर कोरियन, व्हिएतनामी, इस्रायली किबुत्झवादी, इराकी बाथिस्ट, इजिप्तमधील नासरवादी, घानातील लुमुंबावादी, क्यूबातील कास्त्रोवादी, अशा अनेक आवृत्यांमधून वेगवेगळ्या समूहांनी समाजवादाचा कमीजास्त पाठपुरावा केलेला दिसतो. स्त्रीवाद, पर्यावरणवाद, हेही समाजवादाच्या बऱ्याच धारणा स्वीकारून त्यांवर इतर कल्पनांची कलमे बांधताना दिसतात. हे सारे समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. सुरुवात करूया समाजवादाच्या इतिहासापासून.
अस्थितादर्शः आदिम समाजवादी विचार
समाजवादाची मुळे प्लेटोच्या विचारांत, रोमन बंडखोर गुलाम स्पार्ताकुसच्या विचारांत, वगैरे जागी शोधली गेली आहेत. आधुनिक समाजवाद मात्र औद्योगिक क्रांतीनंतर, भांडवलवादाच्या आरेखनानंतरच घडलेला आहे. १८२७ साली लंडन को-ऑपरेटिव्ह मॅगझीन मध्ये Socialist हा शब्द प्रथम वापरला गेला. या मासिकाच्या संस्थापकांपैकी एक होता रॉबर्ट ओवेन (१७७१-१७५८). ऐदीपणा, दारिद्र्य, गुन्हेगारी, हे दुर्गुण क्रमाक्रमाने हटवणारी समाजव्यवस्था असलेले नवसमाज घडवावे, अशी त्याची इच्छा होती. स्वार्थ व बेजबाबदारी टाळणारे पाचसहाशे माणसांचे हे नवसमाज घडवायचे प्रयत्नही इंग्लंड-अमेरिकेत झाले. पण ओवेनच्या भूमिकेत इतरांना घडवण्याचा भाव होता, जो सर्वांना मान्य होणे शक्य नव्हते. अशाच नवसमाजाची सूचना करताना आंरी सां-सिमाँ (Henri Saint-Simon, १७६०-१८२५) याने वर्ग, Class ही संकल्पना वापरली. उत्पादक वर्गांना प्रोत्साहन देणारा, खाजगी मालमत्ता काही अंशी मान्य करणारा, असा समाज सां-सिमाला अपेक्षित होता. सामंतशाही व धर्मसत्ता त्याला अमान्य होती, पण विवेकाधिष्ठित न्यूटनचा धर्म असा एक प्रकार त्याला हवा होता.
इंग्रज ओवेन व फ्रेंच सां-सिमाँ यांनी समाज कसा असावा याची काल्पनिक चित्रे रेखाटली. जबाबदार सामाजिकता, वर्गविचार, सामाजिक व कौटुंबिक मोकळीक, हे गुण त्यांनी या काल्पनिक चित्रांमधून ठसवले. आज अशा चित्रांना यूटोपियन, Utopian विचारांची चित्रे मानले जाते. णींळिर याचा शब्दशः अर्थ आहे अस्तित्वात नसलेली जागा. त्यासाठी मराठीत अस्थितादर्श हा शब्द सुचवला गेला आहे. काही यूटोपियन विचार आजच्या समाजवादात अनुस्यूत आहेत.
विकेंद्रित समाजरचनेवर आग्रह धरणारा, यूटोपियनांच्या पाच-सातशे माणसांच्या नवसमाजांचा विचार पुढे नेणारा आणिकही एक पंथ होता. त्याला सामाजिक अराजकवाद, सोशल अॅनार्किझम, Social Anarchism म्हणतात. पिएर-जोसेफ घूधाँ (P.-J. Proudhon, १८०९-१८८५) आणि मिखाईल बाकुनिन (M. Bakunin, १८१४-१८७६) हे या पंथातील दखलपात्र विचारवंत. दोघेही “जुनें जाउं द्या मरणालागुनि/जाळुनि किंवा पुरूनि टाका’ या वृत्तीचे होते. स्वतंत्र माणसांच्या संघटनातून समताधिष्ठित समाज घडवणे, हा एकुलता एक सच्चा, न्याय्य पर्याय आहे, असे प्रूधाँचे मत होते. “खाजगी मालमत्ता म्हणजे चोरी”, Property is Theft हे त्याचे वाक्य आजही उद्धृत केले जाते. केवळ स्वतःच्या, कुटुंबीयांच्या, निकटवर्तीयांच्या गरजांपुरतेच उत्पादन करावे. यानेच पिळवणूक टाळता येईल, हे पूधाँचे मत आजच्या उपजीविकेची शेती, Sustenance Agriculture या भारतीय धारणेत प्रतिबिंबित होते. श्रीपाद दाभोलकर, अशोक बंग इत्यादी कृषितज्ज्ञांनी अशा शेतीची कल्पना रुजवण्याचे प्रयत्न केलेले आहेत, व आजही करत आहेत.
बाकुनिनचा भर पक्ष न उभारता क्रांती करण्यावर होता. हिंसेला न घाबरणाऱ्या गुप्त संघटनांमधून क्रांती घडवावी, व क्रांतीनंतर सर्व समूहांना आपापल्या पद्धतींनी लहानलहान समाज घडवून जगू द्यावे, असे त्याचे मत होते. आजच्या भारतातील नक्षलवादाची नाळ काही अंशी बाकुनिनशी जुळलेली आहे. बाकुनिनचे अनुयायी मात्र फुटकळ हिंसाचारात अडकून बदनाम झाले. स्पॅनिश यादवी युद्धापर्यंत (इस १९३६) समाजवादी पक्षांमध्ये स्वतःला अराजकवादी म्हणवून घेणारे पक्ष भेटत. क्रांतीनंतरच्या समाजाचे अराजकवादी चित्र महात्मा गांधींच्या पंचायत राज्याच्या संकल्पनेजवळचे आहे. एकूण मात्र श्रेणीबद्ध पक्ष व राज्यसंघटनातले धोके दाखवून देणे, हे सामाजिक अराजकवाद्यांचे समाजवादी विचारांमधील मोठे योगदान उरले आहे.
आणि मार्क्स!
१८४० साली प्रूधाँ व बाकुनिन हे कार्ल मार्क्स (१८१८-१८८३) या विचारवंताला भेटले. पक्षउभारणीच्या गरजेबाबत मार्क्स व बाकुनिन यांच्यात तीव्र वादही झडले. मार्क्स आणि त्याचा आजीवन सहकारी फ्रेडरिक एंगेल्स (१८२०-१८९५) यांच्यातील सहकार्य इतके होते की इथे आपण एंगेल्सचा उल्लेखही वेगळा करणार नाही. पण जेव्हाजेव्हा मार्क्सचा उल्लेख येईल तेव्हातेव्हा एंगेल्सही आठवावा! या दोघांनी उभारलेली वैचारिक इमारत आणि तेव्हापासून आजवर त्यावर झालेली चर्चा, हा अतिप्रचंड विषय आहे. आपण इथे त्याचे एक अतिसंक्षिप्त, अतिसुलभीकृत, केवळ अर्थशास्त्रीय रूपच पाहणार आहोत. ते आवश्यक मात्र आहे, कारण समाजवादीच नव्हे तर इतरही विचारप्रणालींची आजची रूपे मार्क्सवादाने प्रभावित झालेली आहेत.
औद्योगिक क्रांतीच्या आधी वस्तूंचे उत्पादन मुख्यतः गरजा पूर्ण करण्याइतपतच असे. वस्तुविनिमय, barter हीच वितरणाची मुख्य पद्धत होती. औद्योगिक क्रांतीने भांडवली, कारखानी उत्पादन सुरू झाले. आता वस्तू मुख्यतः विक्रीसाठी घडवल्या जाऊ लागल्या. श्रमिकांचे श्रम हेही वस्तूंसाठी लागणाऱ्या कच्च्या मालासारखे झाले. श्रम विकता, विकत घेता, येऊ लागले. आता सर्व वस्तूंसाठी लागणारी संसाधने दोन प्रकारच्या मूल्यांमध्ये वाटता येऊ लागली. कारखाने, यंत्रे, यांच्यासाठीचे ते स्थिर मूल्य ; आणि श्रम हे बदलू शकणारे मूल्य. अशा पद्धतीने घडवलेल्या वस्तूंची किंमतही त्यांसाठी लागणाऱ्या श्रमांच्या मूल्यापेक्षा बरीच जास्त असे. या ज्यादा, अतिरिक्त मूल्यातून मालक यंत्रणांचे खर्च भागवत, व्यवस्थापनाचे खर्च भागवत, व शेवटी उरे तो नफा. म्हणजे मालकांचा नफा शेवटी श्रमिकांच्या शक्तीतून घडणाऱ्या अतिरिक्त मूल्याचाच भाग असतो. अशा अतिरिक्त मूल्याच्या प्रमाणाला मार्क्स दोहनाचे किंवा शोषणाचे प्रमाण मानतो. Rate of surplus value यासाठी तो Rate of exploitation अशी शब्दरचनाही वापरतो.
आता जर उत्पादनाचे अतिरिक्त मूल्य मुख्यतः श्रमशक्तीतून उभे राहते, तर मालक स्थिर मूल्ये वाढवून श्रमांचा भाग कमी करायला धडपडणारच. कारखाने, यंत्रेतंत्रे यांतील वाढीव गुंतवणूकही अखेर प्रमाणाने घटत जाणाऱ्या श्रमशक्तीतूनच होणार. बरे, अखेर उत्पादित वस्तूंचे गिहाईकही प्रामुख्याने श्रमिकांमध्येच असणार, आणि श्रमिकांच्या हातांतली क्रयशक्ती मात्र घटत जाणार. यामुळे सुधारित यंत्रातंत्राचे उत्पादन विकणे मात्र अवघड होणार, आणि धंद्यांना मंदी ग्रासणार. मंदीवर मात करण्यासाठी भांडवलदार कारखाने मोठे करणार, स्पर्धकांशी तडजोडी करून स्पर्धकांची संख्या कमी करणार. यानेही प्रश्न सुटणार नाहीत. श्रममूल्य कमी, बेरोजगारी जास्त, उत्पादन जास्त, याने मंदी अधिकच तीव्र होणार. कालांतराने मंदी कमी झाली तरी व्यवस्था तीच
राहिल्याने पुन्हापुन्हा, जास्तजास्त तीव्र रूपांत मंदी येतच राहणार. श्रमिकांची दुर्दशाही वाढत जाऊन अखेर सारी भांडवली व्यवस्थाच कोलमडणार व क्रांती होणार.
मार्क्सने भांडवली व्यवस्थेचे हे भीषण भविष्य वर्तवले खरे, पण आज काही अभ्यासक मार्क्सचा स्वतःचा या भविष्याच्या अटळ असण्यावर, अपरिहार्य असण्यावर कितपत विश्वास होता याबद्दल शंका व्यक्त करतात. ते सांगतात की श्रमिकांची वाढती दुर्दशा आटोक्यात ठेवण्याचे काम श्रमिकांच्या संघटनांमधून, ट्रेड युनियन्समधून होत राहील; हे मार्क्सला जाणवले होते. कायद्यांमधील सुधारणा स्पर्धकांच्या एकमेकांशी तडजोडी करण्यावर निर्बंध आणतील, श्रमिकांची वेतने व इतर हक्कांचे संरक्षण करतील; हेही त्याला जाणवले होते. अशा उपायांमधून तेजीमंदीच्या चक्रांचे झटके पचवून श्रमिकांना किमान जीवनमान राखता येईल, ही शक्यताही मार्क्सने नोंदलेली आहे. अशा साऱ्यांमुळे भांडवली व्यवस्था कोलमडणे खूप काळ पुढे ढकलता येईलही, पण शेवटी ती व्यवस्था जाणारच, असे त्याचे म्हणणे होते.
वरकरणी केवळ आर्थिक विचार वाटत असला, तरी मार्क्सला या प्रक्रियेतूनच इतर सारे समाजव्यवहार घडतात असे वाटत असे. यामुळे त्याचे भांडवली व्यवस्थेचे विश्लेषण हे एकूण सामाजिक प्रक्रियांच्या इतिहासाचेही विश्लेषण ठरते. उत्पादनव्यवस्था ही पायाभूत असते. आणि या पायावरच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिकही व्यवस्थांचा डोलारा उभा असतो; हा मुद्दा मार्क्सच्या विचारांत कळीचा आहे. या साऱ्या डोलाऱ्याचे, superstructure चे उत्पादनव्यवस्थेशी संबंध कसे असत, असतात व असतील याचे तपशीलवार विवेचन मार्क्स करतो. उत्पादनव्यवस्था व सामाजिक-राजकीय व्यवस्था यांच्यात विसंवाद उत्पन्न झाला तर क्रांती घडते. अशी क्रांती घडून भांडवली व्यवस्थेची जागा समाजवादी व्यवस्था घेईल असा मार्क्सचा दृढविश्वास होता.
क्रांती कशी घडेल, कशी घडावी, याबद्दल मार्क्स आपल्या अपेक्षेतले चित्र नोंदतो. राज्यव्यवस्था, the State, ही मुळात श्रमविभाजनातून उद्भवते. ती नेहेमीच समाजातील प्रबळ वर्गाचे हितसंबंध जपते. “आधुनिक राष्ट्रांच्या कार्यकारिणी म्हणजे संपूर्ण बूझर्वा वर्गाच्या समान व्यवहारांचे व्यवस्थापन करणारी समिती असते.”, हे कम्युनिस्ट मॅनिफेस्टो तील वाक्य जरासेच अतिशयोक्त आहे.
क्रांतीत हिंसा असणे मार्क्सला अपेक्षित होते, ब्रिटन, अमेरिकन संघराज्य (USA), हॉलंड, अशा काही देशांत मात्र सुधारणांमधून, अहिंसक मार्गाने व्यवस्थाबदल होऊ शकेल, असेही त्याने नोंदले आहे. मार्क्सच्या निधनानंतर एंगेल्सने जर्मन सोशलडेमोक्रॅटिक पक्षाला, SPD ला, अशा सुधारणा करण्यात मदतही केलेली दिसते. पण श्रमिकांमध्ये वर्गजाणीव उत्पन्न होऊन त्यांनी पक्ष उभारणे, हे मार्क्स क्रांतिकारक बदल परिणामकारक होण्यासाठी आवश्यक मानत असे. आपले वर्गभान असलेले श्रमिक हे क्रांतीचे कारक, आणि त्यांचा पक्ष हे क्रांतीचे हत्यार. अशा क्रांतीतून घडणारा समाज कसा असेल व कसा असावा हेही मार्क्स सांगतो. एकाच टप्प्यात क्रांती यशस्वी होऊन समता प्रस्थापित होणे अवघड जाईल. सुरुवातीला तरी विषमता हटणार नाही, असे त्याचे सावध मत होते.
तत्त्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अशा विविध विषयांची एकसंध मांडणी करणे; समाजविकासाचा एक घटना म्हणून, अचल व्यवस्था म्हणून विचार न करता गतिमान प्रक्रिया म्हणून विचार करणे; सामाजिक-आर्थिक-राज्यशास्त्रीय विचार नेहेमीच केवळ तथ्यांवर बेतला जात नसून मूल्यांवरही बेतलेला असतो हे ठसवणे ; अशी मार्क्सची अनेक योगदाने आहेत. माणसांच्या विचारांमध्ये तरी मार्क्सने क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत; भलेही त्याला अपेक्षित समाजवादी क्रांती त्याच्या आयुष्यात घडली नसो. औद्योगिक देशांमध्ये क्रांती घडणे ती कृषिप्रधान देशांमध्ये घडण्यापेक्षा मार्क्सला जास्त संभाव्य वाटत होते. प्रत्यक्षात मात्र पहिली समाजवादी क्रांती रशिया ह्या कृषिप्रधान देशात घडली, व तीही मार्क्सच्या अपेक्षेप्रमाणे नव्हे.
मार्क्सचे विचार जगापुढे यायला लागल्यानंतर अनेक युरोपीय देशांत समाजवादी पक्ष रुजू लागले. भांडवलवाद हा श्रमिकांचा समान शत्रू आहे, या भावनेतून हे पक्ष एका सैलशा आंतरराष्ट्रीय संघटनेत बांधले गेले. जर्मनीत तर चॅन्सेलर बिस्मार्क याने १८७८-१८९० अशा बारा वर्षांच्या काळात समाजवादी पक्ष डझऊ यावर बंदीही घातली. पण तरीही वृत्तीने मासिस्ट असा हा पक्ष सदस्यसंख्येने युरोपातला सर्वांत मोठा पक्ष बनला. इंग्लंडातील मजूर पक्ष कधीच स्पष्टपणे समाजवादी झाला नाही.
रशियाची वेगळी वाट
रशियात झारविरोधी अनेक पक्षांपैकी एक पक्ष समाजवादी होता. त्याचा नेता होता व्लादिमिर लेनिन (१८७०-१९२४). त्या पक्षाचे इतर कोणत्याही रशियन पक्षाशी पटत नसे. झारने अखेर त्याला रशियातून हद्दपार केले व तो जर्मनीत गेला. पहिले महायुद्ध (१९१४-१८) सुरू झाले. रशियात गोंधळाची परिस्थिती होती. काही जण जर्मनीशी लढू इच्छित होते, तर काहींना झारचे तख्त उलथवण्यात जास्त रस होता. अशातच जर्मनीने लेनिनला पुन्हा रशियात पाठवून दिले. लेनिनच्या पक्षाचे नाव जरी बोल्शेविक उर्फ बहुमतपक्ष असे होते, तरी १९१८ च्या जानेवारीत झालेल्या निवडणुकीत पक्षाला २१% जागाच मिळाल्या. पण अनेक डावपेचांमधून, गोंधळाचा लाभ घेत बोल्शेविकांनी झारनंतर सत्ता हस्तगत केली. हिंसक उठावही नाही, सुधारणाही नाहीत, अशा वेगळ्याच मार्गाने जगातील पहिले समाजवादी राष्ट्र उभे राहिले.
कृषिप्रधान रशियाने औद्योगिक पाश्चात्त्य युरोपीय समाजवादी पक्षांआधी राज्य कमावले. लवकरच जुने झारिस्ट गुप्तपोलिसांचे दलही नव्या राजवटीसाठी सक्रिय झाले. मुळात रशियात लोकशाहीची परंपरा नव्हती. रशियन साम्राज्याचेच समाजबादी राष्ट्र झाल्याने घटक देशांचेही प्रश्न होते. अशा अनेक बाबींवर मात करत होणाऱ्या रशियन बाटचालीमुळे रशियन पक्ष पश्चिम युरोपातील समाजवादी पक्षांपासून सुटा पडत गेला. लेनिन आणि पश्चिमी समाजवादी यांच्यातील मतभेदांत एक मुद्दा होता पक्षाच्या भूमिकेबद्दल. लेनिनच्या मते श्रमिकांना संघटनांची गरज आहे याचे भान लवकरच येते. क्रांतीच्या आवश्यकतेची मार्क्सवादी जाणीव मात्र पक्षाने पुरवावी लागते. वर्गसंघर्षात आघाडीवर राहणाऱ्या पक्षाच्या संघटनेतील बूझ्र्वा सदस्यांना वर्गयुद्धाचे भान श्रमिकांमधल्यापेक्षा जास्त असेल, हेही जास्त शक्य असते. या मांडणीत पाश्चात्त्य समाजवाद्यांना एक सुप्त अभिजनवाद दिसत होता. पक्षांतर्गत गुप्तता, पेशेवर क्रांतिकारकांचा वापर, आणि विशेष म्हणजे, पक्षात सत्ता केंद्रीभूत होणे, हे रशियन गुण पाश्चात्त्यांना आवडत नव्हते. रोझा लक्झेंबर्गने तर लेनिनचा पक्ष एकीकृत होण्याऐवजी विसंगत घटकांना जबरीने आवळून मोट बांधत आहे, अशीही टीका केली.
रशियाबाहेरचे, औद्योगिक युरोपातले समाजवादी पक्ष संवैधानिक मार्ग वापरत बऱ्याच सुधारणा घडवून आणत होते. ब्रिटिश मजूर पक्ष तर संवैधानिक वाटेनेच सत्ता मिळू शकते व तेच आपले उद्दिष्ट असल्याचे सांगत होता. समाजवादातला आंतरराष्ट्रीय भाव संपून आपापल्या देशांपुरते काम शिल्लक राहिले होते. रशियन समाजवाद्यांना हा समाजवादाशीच द्रोह वाटत होता. रशियन कम्युनिस्ट व पाश्चात्त्य युरोपीय लोकशाही समाजवादी यांच्यात समन्वय साधणारी भूमिका घडवण्याचेही अयशस्वी प्रयत्न केले गेले. अखेर सुमारे १९३० नंतर समाजवादाच्या या दोन प्रमुख आवृत्त्या वापरात उरल्या, त्यांच्यामधला संवाद संपला. व्यवस्थापित भांडवलवादः विचारधारा
औद्यगिक क्रांतीपासून इस १८३३ च्या फॅक्टरी अॅक्टपर्यंत भांडवलवादी अर्थव्यवस्थेवर कोणतेच नियंत्रण नव्हते. हे इंग्लंडबाबतही खरे होते, आणि युरोपातील इतर देशांबाबतही. काही अभ्यासक (जेम्स फुल्चर, अ व्हेरी शॉर्ट इंट्रोडक्शन टु कॅपिटॅलिझम, ऑक्सफर्ड, २००४) या काळाला अराजकी भांडवलवादाचा काळ मानतात. या काळात आणि पुढेही अर्थव्यवहाराच्या काही अंगांचे विनियंत्रण होतच राहिले, पण अर्थव्यवस्थेवर शासकीय नियंत्रण असावे असा विचारही व्यवहारात मान्य झाला. समाजवाद हा जसा उपयोगितावादातून जन्मला, तशीच भांडवली व्यवस्थेवर शासकीय नियंत्रणाची गरजही मुळात उपयोगितावादातूनच मान्य झाली. भांडवलवादाच्या या नियंत्रित विचारधारेला नव-उदारमतवाद, निओलिबरॅलिझम म्हणतात. नियंत्रणाचा एक भाग कामगारांच्या हितांचे रक्षण करण्याशी निगडित होता. कामाचे तास, हक्काच्या सुट्ट्या, कारखान्यांमधील आरोग्यासंबंधी वातावरण, अपघाताने इजा झाल्यास व अपंगत्व आल्यास नुकसानभरपाई, बोनसच्या रूपाने नफ्यातला वाटा, पेन्शन व भविष्यनिर्वाहाची सोय, अशा अनेक बाबी थेट नव-उदारमती भांडवलवादात आणल्या गेल्या. यामागे लोकशाही समाजवादाचा रेटा होता व आहे. शासनातर्फे, कायदे करून भांडवलवादावरही नियंत्रणे आणली गेली. यात भांडवलवादी पक्षांचे निवडणुकांचे राजकारणही असणारच. पण त्याने कामगारांना मुक्त भांडवली व्यवस्थेतही संरक्षणाची काही पातळी गाठता आली, हे खरे. बरेच कम्युनिस्ट व उजवे लोकशाही समाजवादाची टिंगल करताना त्यांच्या प्रयत्नांनी मिळालेली ही कमाई विसरतात, म्हणून ही नोंद. पण कामगारांना वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक-सामाजिक संरक्षण देणे म्हणजे समाजवादाला अपेक्षित समताधिष्ठित समाज नव्हे, हा मुद्दाही शिल्लक राहतोच.
नियंत्रणाचा दुसरा भाग भांडवलवादातील अपरिहार्य तेजीमंदीबाबतचा आहे. भांडवली व्यवस्थेत तेजीमंदी येणारच, आणि या आचक्यांची यंत्रणा कशी असेल, हे मार्क्सने दाखवून दिले होतेच. याचा अनुभवही येऊ लागला. इस १८७३ ते इस १८८९ हा काळ मंदीचा होता, असे तत्कालीन अर्थशास्त्र्यांचे मत होते व पण आज ते शंकास्पद मानले जाते ! इस १८७० ते १८९० या काळात लोखंडाचे उत्पादन १.१ कोटी टनावरून २.३ कोटी टन झाले (हे आकडे पाच प्रमुख उत्पादक देशांच्या वार्षिक उत्पादनाचे आहेत). पोलादाचे उत्पादन तर ५ लाख टनांवरून १.१ कोटी टन झाले. ही वाढ बहुतांशी नव्याने औद्योगिक झालेल्या देशांमुळे होती. इंग्रजी उत्पादनाला स्पर्धा उत्पन्न होत होती. आपली बाजारपेठ इतरांनाही खुली होत आहे, यामुळे इंग्लंडात उत्पादनवाढीचे कौतुक नव्हते. होती ती नफ्यांच्या घसरणीची धास्ती. इस १८७१ ते इस १८९४ या काळात लोखंडाची किंमत अर्धी झाली होती. इस १८६७ मध्ये मार्क्सच्या भांडवल या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. पुढचे तीन खंड त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. एकूण युरोपात, विशेषतः इंग्लंडात मंदी, नफ्यातली घसरण, पगारांमधील घसरण, असे वातावरण होते.
मार्क्सचे विश्लेषण बरोबर असेल, हे मान्य करण्याला मात्र इंग्लंडात तरी तीव्र विरोध होता. सरकारी हस्तक्षेपातून मंदी हटवायचे प्रयत्न होत होते, आणि भांडवलवादाची नेहेमीची तंत्रेही होती. जसे, घरेलू उत्पादकांना संरक्षण देणे हे सरकारने करावे असे भांडवलदारांचे मत होते. या एका बाबतीत त्यांना ना बाजारपेठेला मुक्ती देऊन हवी होती, ना अदृश्य हातावर श्रद्धा होती. कंपन्यांचे एकत्रीकरण, स्पर्धकांना विकत घेणे, हे भांडवलदारांना मान्य होते. यात सरकारी हस्तक्षेप मात्र नको होता. अमेरिकेने अँटि-ट्रस्ट कायदे केले, आजच्या भारतातील Monopolies and Restrictive Trade Practices अली सारखे. यश मात्र ना तेव्हा मिळाले, ना आज मिळते. अघोषित एकत्रीकरणे, किंमती संगनमताने ठरवणे, कामगारांची वेतने संगनमताने ठरवणे, हे उघड करायची आवश्यकता नसतेच. ते गुपचुप करता येते.
व्यवस्थापन जास्त वैज्ञानिक, शास्त्रोक्त करणे, हा पायंडा अमेरिकेने पाडला. इतर देशांनी तो लवकरच आत्मसात केला. याने मोठ्या भांडवलदारी संस्थांमध्ये आमूलाग्र बदल झाले. कॉर्पोरेट व्यवस्थापनाने बाजारपेठांचा अदृश्य हात दृश्य करवून घेतला. आता उद्योगांचे प्रत्यक्ष व्यवस्थापन ना मालकांच्या हातात होते, ना भागधारकांच्या. ते पेशेवर, पगारदार नोकरांच्या हातात होते, आणि त्यांना वेतनव्यवस्था बरीचशी न्याय्य ठेवणे आवश्यक झाले होते.
एका वेगळ्या प्रकाराने मंदीवर मात केली जाऊ लागली. सारा युरोप इतर जगात वसाहती उभारू लागला. कच्चा माल हव्या त्या किंमतींना विकत घेऊन, त्यावर प्रक्रिया करून, उत्पादने हव्या त्या किंमतींना विकायला सुरुवात झाली. बाजारपेठेची मुक्तता आता पूर्णपणे गतार्थ झाली.
मार्क्सने सुचवलेली तेजीमंदीची यंत्रणा चूक आहे असे दाखवणारे काही अर्थशास्त्रज्ञ होते. इस १८९० च्या सुमारास मंदी हटून पुन्हा तेजी आली. कोंद्रातिएव्ह (Kondratiev) या रशियन (रशियन राज्यक्रांतीच्या आधीच्या) अर्थशास्त्रज्ञाने तेजीमंदीची चक्रे किंवा लहरी येतजात असतातच, अशी मांडणी केली. जोसेफ शूपिटर (१८८३-१९५०) याने या चढउतारांचा संबंध तंत्रज्ञानातील नावीन्याशी जोडता येतो, असे दाखवायचा प्रयत्न केला. आज या लहरींबाबातचे कोणतेच स्पष्टीकरण सर्वमान्य किंवा बहुमान्यही नाही.
तेजीमंदी का येते याची चर्चा करण्याऐवजी त्यावर उपाय सुचवायचा प्रयत्न जॉन मेनार्ड केन्स (इस १८८३-१९४८) याने केला. मंदीच्या काळात सरकारांनी सार्वजनिक हिताची कामे काढून लोकांची क्रयशक्ती वाढवावी, हा केन्सीय धोरणांचा आधारस्तंभ. पहिल्या महायुद्धापासून सुमारे इस १९७० पर्यंत बहुतांश युरोपीय देश केन्सचा हा उपाय वापरत. अमेरिकेत फ्रँकलिन डिलानो रूजव्हेल्टने इस १९२९-१९३९ ची मंदी हटवायला केन्सीय उपाय वापरले. भारतातील पहिल्या दोनतीन पंचवार्षिक योजनांमागेही केन्सीय विचार होते. पण केन्स कोणत्याही अर्थाने समाजवादी नव्हता. तो नवउदारमताचा, भांडवलवादाला अपरिहार्य मानणाऱ्या विचारधारेचाच पुरस्कर्ता होता. आज मॅनेजमेंट गुरू म्हणून ख्यातनाम असलेले सी.के. प्रल्हादही केन्सीय विचारांचीच
एक आवृत्ती मांडतात. त्यांचे प्रसिद्ध पुस्तक, द फॉळून ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिड, (व्हार्टन स्कूल पब्लिशिंग, २००५) मोठ्या कॉर्पोरेट उद्योगगृहांनी गरिबांकडून कच्चा माल घेऊन त्यांची क्रयशक्ती सुधारावी, या संकल्पनेवर बेतलेले आहे. केन्सने सरकारांवर टाकलेली जबाबदारी इथे उद्योगांवर टाकली आहे, एवढाच काय तो फरक आहे.
व्यवस्थापित भांडवलवादः समाजवादी अंगे
औद्योगिक क्रांती युरोपभर पसरली. नवी जीवनशैली लोकांच्या सवयीची होऊ लागली. सोबतच नव्याने नागर झालेल्या कामगारवर्गाने शासनात सहभागाचाही हट्ट धरला. लोकांनी निवडून दिलेली संसद, ही व्यवस्था बहुतांश युरोपात मान्य झाली होतीच. आता कामगारवर्ग मतदानाचा हक्क मागू लागला. इस १८६७ आणि १८८३ मधील निवडणूक सुधार कायद्यांमुळे इंग्लंडातील वीस वर्षांवरील पुरुषांमधील मतदारांचे प्रमाण ८% वरून २९% झाले. इस १८९४ मध्ये बेल्जियममधील प्रौढ पुरुषांत मतदारांचे प्रमाण ४% वरून ३७% झाले. नॉर्वेत इस १८९८ मध्ये हे प्रमाण १७% वरून ३५% झाले. स्वीडनने १९०८ साली नॉर्वेचा कित्ता गिरवला. ऑस्ट्रिया (इस १९०७), इटली (इस १९१३) यांनी सर्व प्रौढ पुरुषांना मतदानाचा हक्क दिला. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, (इस १९१२ नंतर) आर्जेटिना येथे जवळपास सर्व प्रौढ पुरुषांना मते देता येऊ लागली.
स्त्रियांना मतदानाचा हक्क देण्याबाबत मात्र बरीच चालढकल होत होती. आपल्याकडे इस १९६०-९० या काळात जसे स्त्रीमुक्तीबाबत कुजकट विनोद केले जात (व आजही केले जातात!), तसे विनोद स्त्रियांना मतदानाचा अधिकार हवा असे मानणाऱ्या सफ्रेजेट्स , षिषीरसीींशी बद्दल युरोपात एकोणिसावे शतकभर केले जात. पण अमेरिकेचा वायोमिंग प्रांत (इस १८९०), फिनलंड व नॉर्वे (इस १९०५ व १९१३) यांनी स्त्रियांना तो अधिकार दिला.
मतदानाचा हक्क कोणत्या वयात द्यावा, शिक्षित-उच्चशिक्षितांना ज्यादा मत असावे का, मतदान गुप्त असावे की खुले, असे अनेक प्रश्न उपस्थित करून सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या कल्पनेचे खच्चीकरण करण्याचेही प्रयत्न झाले. मतदार याद्यांमध्ये गोंधळ, मतदारसंघांची सदोष आखणी, थेट बूथ कॅप्चरिंग, हे तर आपण आजही पाहतोच आहोत. त्याआधीचे कमीजास्त संवैधानिक अडथळे मात्र आपण भोगलेले नाहीत. पण मतदानाची व्याप्ती वाढवणे हे नवउदारमत-भांडवलवादावर समाजवादी संकल्पनांचे कलम होते व आहे, हे मात्र ध्यानात घ्यायलाच हवे.
मतदानाचा अधिकार विस्तृत करण्यानेच समाजवादी कायदेकानून घडत नाहीत. त्यासाठी कामगारवर्गाचे हित कशात आहे ते ओळखून त्याचे प्रतिबिंब पक्षीय राजकारणात पडावे लागते. एकोणिसावे शतकभर युरोपात कामगारवर्गी पक्ष घडत होते, व त्यांना भांडवलदार वर्गाकडून विरोध होत होता. स्वतःला समाजवादी म्हणवून घेणाऱ्या पक्षांची सदस्यसंख्या कधीच फार नसे, परंतु त्यांचा प्रभाव मात्र वाढत गेला.
तो सर्वांत स्पष्ट होता नागरी पातळीवरच्या निवडणुकांमध्ये. गॅस व पाणी, वाहतूक व्यवस्था, गृहनिर्माण, टेलेफोन सेवा, वीजपुरवठा, अशा अनेक क्षेत्रांमध्ये नगरपालिकांची थेट मालकी तरी असे, किंवा किंमती व व्याप्ती नगरपालिका ठरवून तरी देत असत. हे जीवनशैलीचे खिळेमोळे, नट्स अँड बोल्ट्स होते. त्यांना तत्त्वचर्चेचे दृश्य वजन नसले तरी व्यवहाराचे मूर्त वजन होते. याला नागरी समाजवाद, municipal socialism ही म्हणतात.
यापाठोपाठ सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक शिक्षण, निवृत्तिवेतन, अपंगत्वभत्ते, बेकारभत्ते, गर्भारपणाच्या काळातील सवलती, सिक् लीव्ह व सिक पे, वगैरे बाबीही येत गेल्या. इस. १९२९-३९ च्या मंदीनंतर युरोप, अमेरिका, जपान वगैरे औद्योगिक जीवनशैलीने व्याप्त देशांत संपूर्ण रोजगाराची स्थिती आणणे ही सरकारची एक महत्त्वाची जबाबदारी मानली जाऊ लागली. हे साधण्याचे मार्ग केन्सवादी होते, पण परिणाम काहीसे समाजवादी होते. शासनांच्या जबाबदाऱ्यांमध्ये या सर्व बाबींचा समावेश झाला तो कोणाच्या दबावाने? औद्योगिक जीवनशैली आत्मसात करणाऱ्या देशांमध्ये तरी तो समाजवादी संकल्पनांवर बेतलेल्या पक्षांच्या दबावातूनच घडला. ब्रिटिश लेबर पार्टी, अमेरिकन डेमोक्रेटिक पार्टी, युरोपभरातले सोशल डेमोक्रेटिक व ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्ष, सारेच कमीजास्त प्रमाणात समाजवादी संकल्पना मान्य करत असत. हे इस १९७० नंतर बदलत गेले आहे.
पण व्यवस्थापित भांडवलवादाच्या काळात, इस १८३३ ते इस १९७० च्या काळात, काही देश जास्त थेटपणे समाजवादाकडे जात होते. त्यांनी भांडवलवादाला वळण लावण्यावर न थांबता प्रत्यक्ष समाजवादच रुजवायचे प्रयत्न केले. या प्रयत्नांच्या यशापयशाची चर्चा करता येते. तीवर वाद घालता येतात. पण या प्रयत्नांकडे दुर्लक्ष मात्र करता येत नाही. याची दोन उदाहरणे आपण जरा तपशिलात पाहू. देश लहानखुरे आहेत, पण आहेत मात्र वैशिष्ट्यपूर्ण.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.