जीव आणि जाणीवः उत्क्रांतिवादी दृष्टिकोन

स्वीकारलेल्या मर्यादा वैज्ञानिक दृष्टीने जीव (life) आणि जाणीव (consciousness) या संकल्पनांकडे पाहणाऱ्यांपैकी अनेकांना, विशेषतः जीवशास्त्रज्ञांना पटणारा दृष्टिकोन इथे मांडलेला आहे. काहीजणांना तो मर्यादित, सीमित वाटू शकतो. त्यामुळे त्या दृष्टिकोनाने स्वीकारलेली काही गृहीतके (assumptions) सुरुवातीला स्पष्ट करू.

१) ज्या भावना, विचार, श्रद्धा एखाद्याच व्यक्तीपुरत्या, किंवा मूठभरच व्यक्तींपुरत्या आहेत आणि ज्या ते इतरांना सांगू शकत नाहीत, त्या या चर्चेपुरत्या बाद केल्या आहेत. कधीकधी एखादी सुटी बाब उद्बोधक ठरू शकते, हे इथे नाकारले जात नाही आहे. पूर्णतः व्यक्तिनिष्ठ माहिती इतरांना शंकास्पद वाटू शकते, म्हणून ती वगळण्याचा सावधपणा दाखवला आहे, इतकेच.

२) आज सजीव रचनांच्या प्रकारांमध्ये प्रचंड विविधता दिसते. ती कैक पिढ्यांच्या पूर्वज-वंशज संबंधांमधून (ancestor-descendant relationships), उत्क्रांतीतून, विशेषतः नैसर्गिक निवडीतून घडली आहे.

हे स्वीकारायचे कारण डोब्झान्स्की हा जनुकशास्त्री पुरवतो. तो सांगतो की उत्क्रांतीच्या तत्त्वाच्या आधाराशिवाय जीवशास्त्राला काही अर्थच उरत नाही. हे ठसवायला नैसर्गिक निवडीतून उत्क्रांती म्हणजे नेमके काय, याची रूपरेषा पाहू –

अपत्ये त्यांच्या जनकांसारखी असतात. या सारखेपणात जनकांकडून अपत्यांना मिळणाऱ्या जनुकांचा (सशपशी) वाटा असतो. जनुके ही प्रथिने घडवण्याच्या सूचनांचे संच असतात. त्यांमुळे कोणती प्रथिने घडतील ते ठरत असते. प्रथिनांच्यातूनच सजीवांची शरीरे बनतात. प्रथिनांमधील फरकांमुळे व्यक्तींच्या गुणांमध्ये (traits) फरक घडतात. या गुणांमध्ये वागणुकीशी निगडित गुणही येतात. या गुणधर्मांमुळेच व्यक्तींच्या जगण्याच्या, अन्न कमावण्याच्या, अन्न पचवून ऊर्जा घेण्याच्या, स्वतःचे संरक्षण करण्याच्या आणि प्रजोत्पादनाच्या क्षमता ठरतात. व्यक्तीव्यक्तींमध्ये गुणांचे, क्षगतांचे फरक असतात. जर काही आनुवंशिक गुण एखाद्या व्यक्तीला सरासरीपेक्षा जास्त प्रजा उत्पन्न करू देत असतील, तर असे गुण त्या व्यक्तीच्या जीवजातीत पिढी दर पिढी पसरत जातील. या गुणांचा पाया असलेली प्रथिने आणि ती प्रथिने घडवायची सूचना देणारी जनुकेही एकूण जीवजातीत पसरतील – असे ‘फायदेशीर’ गुण जीवजातीत पसरणे, म्हणजे ती जीवजात उत्क्रांत होणे. एक टप्पा अलिकडचा विचार करता ‘फायदेशीर’ प्रथिनांचा प्रसार, आणि दोन टप्पे अलिकडे पाहता ‘फायदेशीर’ जनुकांचा प्रसार म्हणजेही उत्क्रांतीच होय.

या ‘फायदेशीर’ गुण पसरण्याचा एक परिणाम म्हणजे मुळात नैसर्गिक निवडीतून घडलेले गुण कोणत्यातरी बुद्धिमान योजनेतून घडले आहेत, असे भासू लागते. जीवामागे काही अभियांत्रिक योजना (engineering design) आहे, असे भासू लागते. अशा जगण्यास उपयुक्त गुणांना परिस्थितीशी अनुरूप झालेले गुण, किंवा नुसतेच अनुरूप गुण (adaptations) म्हटले जाते.

जीवसृष्टीत असे अनुरूप गुण मोठ्या संख्येने दिसतात. ते कसे घडले असतील याबाबत नैसर्गिक निवडीपेक्षा वेगळी कारणपरंपरा आजवर तरी कोणी सुचवू शकलेले नाही.

३) सजीवांचे गुण अंतिमतः भूतमात्राचे (matter) गुण असतात. सजीवांमध्ये भूतमात्राच्या विशेष रचना भेटतात हे खरे, पण ते असते भूतमात्रच. एखाद्या वनस्पतीची किंवा प्राण्याची वागणूक भूतमात्राबाबतच्या नियमांपासून, भौतिकीच्या नियमांपासून (physical laws) समजून घेता येते, असा अर्थ यातून निघत नाही. ती वर्तणूक भौतिक-रासायनिक नियमांशी विसंगत असत नाही, येवढेच. ती वर्तणूक अशा भौतिक नियमांमधून निष्पादित करता येत नाही. या गृहीताचा एक उपार्थ (उप-अर्थ, corollary) असा की सजीवांच्या अभ्यासात अ-भौतिक (भौतिकेतर, non-physical) स्पष्टीकरणे शोधायची गरज नाही. सजीव रचना उत्क्रांतीतून घडलेल्या आहेत. त्यांच्यात चकित करणारी व्यामिश्रता (complexity) आढळते. ही व्यामिश्रता पूर्वनियोजित नसते. काही मूळ रचनांवर स्वतंत्र, काही अर्थी अवसरवादी (opportunist) घटकांची कलमे होणे (grafting), ही प्रक्रिया प्रदीर्घ काळ, वारंवार होणे; यातून व्यामिश्रता घडते. अशा व्यामिश्र रचनांचे आकलन थेटपणे भौतिकीच्या किंवा रसायनशास्त्राच्या पद्धती वापरून करून घेता येत नाही.

४) मानसिक गुणधर्म समजून घेण्याची शाहणी (sensible) पद्धत म्हणजे आजची विज्ञानाची पद्धत. विश्वाचे आकलन करून देण्यात ही पद्धत सर्वांत यशस्वी ठरली आहे. अर्थात, या पद्धतीने विश्वाबाबतची, जीवाबाबतची सर्वच कोडी उकललेली नाहीत. पण अशा न उकललेल्या कोड्यांची संख्या मात्र सातत्याने घटते आहे. बरे, या पद्धतीची सर्व औपचारिक अंगे खास मानवी आहेत. खरे तर एका अर्थी सर्व सजीव रचना विज्ञानाची पद्धत वापरतात असेही म्हणता येते. नैसर्गिक निवडीची प्रक्रिया ही एका अर्थी उत्क्रांतीतून शिकण्याची (evolutionary learning) प्रक्रिया असते. विश्वाची अनेक अंगे आपल्याला अनेक पिढ्यांच्या प्रायोगिक कमाईतून समजलेली असतात.

विज्ञानाच्या पद्धतीत एक विरोधाभासासारखे (paradoxical) अंग आहे. मी त्याला तात्पुरत्या खात्रीलायकतांवरचा भरवसा (reliance on provisional certainities) म्हणतो. विश्व समजून घेताना संपूर्णपणे खुली, अनिर्बंध खुली वृत्ती असणे आवश्यक नसते. आपण काही पूर्वग्रहांच्या आधाराने विश्वाचे निरीक्षण करू लागतो. इथे आपली वृत्ती असते ती अशी – “माझा काही गोष्टी खऱ्या आहेत असा विश्वास आहे. अशा गोष्टींच्या सत्यतेवर मी पैज घ्यायला तयार आहे. मी पैज जिंकेन अशी माझी अपेक्षा आहे. पण पैज हरल्यास मी माझ्या विश्वासांमध्ये बदल करायला तयार आहे.’ हा दृष्टिकोन अनुभवातून येतो, आणि कधीकधी तो कॉमन सेन्सशी विसंगतही असतो.

क्रोमर म्हणतो की विज्ञान ‘अन्कॉमन सेन्स’ पुरवते. विज्ञानातील मूलभूत धारणा ही की एक खरे विश्व अस्तित्वात आहे -माझ्या बाहेरही ते आहे, आणि माझ्या आतही. आणि हे विश्व समजून घेण्यासाठी वरपांगी आकर्षक असा व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन त्यागावा लागतो. माणसाला विश्व कसेकसे आकळत गेले याचा इतिहास सांगतो की केवळ चिंतन-मननातून, केवळ कल्पनाशक्ती वापरून विश्वाचे आकलन होणे अशक्य आहे. आज विश्वाबाबतचे सर्वांत मूलभूत पातळीवरचे आकलन पुंज-यामिकीतून (quantum mechanics) होते – आणि त्या क्षेत्रात चिंतन-मननच नव्हे, तर कॉमन सेन्सनेही फसगत होण्याची अनेक उदाहरणे आहेत.

असो – मी स्वीकारलेल्या मान्यता नोंदून झाल्या. त्यानंतरचा युक्तिवाद दार्शनिकदृष्ट्या बाळबोध (Philosophically naive), कधीकधी तर धाडसीही असेल. तो युक्तिवाद मला सुचलेला नाही. पण मी तो स्पष्टपणे मांडू पाहणार आहे.

प्रास्ताविक मी सेल्युलर स्लाइम मोल्ड (Cellular Slime Mould, यापुढे उडच) नावाच्या एका सूक्ष्मजीवावर संशोधन करतो. हा मातीत जगणारा एकपेशीय, केंद्र असलेला, आपल्या ओळखीतल्या अमीबासारखा जीव आहे. या उडच जीवाबाबतची रंजक बाब ही की तो बाह्य आपत्तींना बुद्धिमान भासणाऱ्या त-हेने प्रतिसाद देतो, आणि हा अनेक उडच जीवांच्या समूहाचा प्रतिसाद असतो.

जर उपलब्ध अन्नसाठा संपत आला तर सुटे उडच काही विशिष्ट रसायने बाहेर टाकतात. ही रसायने इतर उडच जीवांपर्यंत पोचतात. ही रसायने म्हणजे “मी त्रासात आहे’ अशी हाक असते! इतर उडच ना ही हाक ऐकू आली, हा संदेश मिळाला, तर ते सारे सुटे जीव एकत्र येतात. असे लक्षावधी उडच एकत्र आले की ते एखाद्या लहानशा अळीसारखे दिसतात. सुटे उडच प्रकाशाला किंवा उष्णतेला प्रतिसाद देत नाहीत, पण ही उडच-अळी मात्र असे प्रतिसाद देते. आता हा समूह एखाद्या समाजासारखा वागू लागतो. काही सुटे उडच मरतात आणि अशा प्रेतांचा एक स्तंभ बनतो. इतर उडच या स्तंभावर चढतात आणि प्रत्येक जीव स्वतःभोवती एक संरक्षक तटबंदी उभारतो. यामागे एखादा हेतू असावा, अशी ही वागणूक असते. उंच स्तंभावरचे जीव दूरवर पसरून अन्नापर्यंत पोचण्याची शक्यता वाढते. एकूणच हा संदेश देण्याचा, एक बहुपेशीय रचना घडवण्याचा प्रकार उडच जीवांना अन्नापर्यंत पोचून जिवंत राहायला मदत करतो. उपासमारीच्या काळातले हे एकत्रीकरण अनेक सुट्या उड्च च्या योजनाबद्ध वागणुकीसारखे असते. हे पूर्णपणे उत्स्फूर्त (spontaneous) असते. त्यात बाहेरच्या कोणत्याही घटकाचा हस्तक्षेप नसतो. एकूणच ही वागणूक अनाकलनीय अश्या बुद्धिमत्तेची निदर्शक असावी, असे वाटते.

हा भ्रम आहे. उडच, कीटकांचे सामाजिक वर्तन, इत्यादींच्या अभ्यासातून दोन निष्कर्ष निघतात. एक म्हणजे अशी वर्तणूक हे एक उद्धृत घटित (an emergent phenomenon) असतेच; कोणत्याच सुट्या घटकाबाबत शक्य नसलेले, पण समूहात मात्र स्पष्टपणे दिसणारे. दुसरे म्हणजे हे हेतुपुरस्सर वाटणारे, बुद्धीच्या स्तराची लक्षणे दाखवणारे वर्तन उत्क्रांतीतून घडते स्विीकृत मान्यता २ आठवावी – सं. त्या प्रक्रियेतून घडलेले वर्तन साध्या जीवांनाही असामान्य क्षमता बहाल करते.

एखादी रचना जिवंत असणे, एखाद्या सजीव रचनेला जाणीव असणे, यांचे अर्थ आपल्याला कळतात. जीव आणि जाणीव यांच्या नेमक्या, काटेकोर व्याख्या करणे मात्र अवघड जाते. एखादी रचना श्वासोच्छ्वास करते, हालचाल करते, अन्न खाते, परिस्थितीतील बदलांना प्रतिसाद देते, तिच्या रचनेत भूतमात्र काही विशिष्ट अवयवांमध्ये रचलेले असते, वगैरे, वगैरे; म्हणजे ती रचना जिवंत असते. जाणीव असणाऱ्या रचनांमध्येही हे सर्व घटक दिसतात. पण आपण स्वतःला जाणीव आहे असे म्हणतो तेव्हा इतर बरेच काही सांगत असतो.

जाणीव असण्याचे एक अंग म्हणजे स्वतःबाहेरील जगाचे ज्ञान करून घेता येणे. दृश्ये पाहणे, आवाज ऐकणे, स्पर्श करणे, या साऱ्यांमधून पुढ्यात काय आहे हे ओळखणे — हे सारे करता येणारे तसे न करता येणाऱ्यांपासून वेगळे असतात, ते ‘जाणीव’ या बाबीमध्ये. दुसरे अंग म्हणजे स्वतःची जाणीव. विचार करता येणे, विश्लेषण करता येणे, चिंतन करता येणे, आपण असे करतो आहोत हे माहीत असणे; हे सारे जाणिवेतले आत्मभानाचे अंग. तिसरे अंग आहे. भावनांचे- आनंद होणे, दुःख होणे, स्मृतिकातरता (nostalgia), इत्यादी.

आता यांपैकी काही अंगे अनेक मानवेतर प्राण्यांमध्येही दिसतात. अगदी मेंदू नसलेल्या प्राण्यांमध्येही यांपैकी काही अंगाच्या क्षीण आवृत्त्या दिसतात–विशेषतः पहिले, बाह्य जगाच्या ज्ञानाचे अंग असते. फार कशाला, वनस्पतींमध्येही ह्या अंगाची रूपे दिसतात. प्राण्यांपैकी बऱ्याच जीवांमध्ये आत्मभानही दिसते. बरेच लोक असे मानतात की दुसरे अंग मात्र खास मानवी आहे. मी तसे ते बहुधा नाही, असे म्हणून पूरक युक्तिवाद देणार आहे.

आता माझ्या जीव आणि जाणीव यांना समजून घेण्याच्या क्रियेचा दृष्टिकोन स्पष्ट करतो. एकाच बाबीकडे अनेक दृष्टिकोनांतून बघता येते. पाण्याचे वर्णन हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे संयुज, असे करता येते. शुष्क पडलेल्या शेताला जीवन देणारे, असे करता येते. मी व माझ्या मित्राने अठ्ठावीस वर्षांपूर्वी एका रात्री एका नळाचे पाणी प्यायले, तेही एक वेगळे वर्णन आहे. आता कालिदासाच्या मेघदूतातले एक वर्णन पाहा –

धूर, तेज, पाणी आणि वायु यांच्या एकजीव-समुच्चयाने घडणारा (अचेतन) मेघ कोणीकडे, आणि इंद्रिये कार्यक्षम असलेल्या (चेतन) जीवांनी पोहोचत्या करावयाच्या निरोपासारख्या गोष्टी कोणीकडे! (पण) अधीर झाल्यामुळे यक्षाच्या मनाला हा विचारदेखील न शिवता तो त्या मेघाला विनवणी करू लागला. एकंदरीत प्रणयविव्हल झालेली माणसे, ही चेतनाच्या किंवा अचेतनाच्या बाबतीत स्वभावतःच हळवी दुबळी बनतात. अिरविंद मंगरूळकर, वसंत बापट व दिगंबर मो. हातवळणे यांच्या मेघदूता च्या मराठी भाषांतरातून. हे भाषांतर बालमोहन लिमयांनी उपलब्ध करून दिले.- सं.

एखादा कवी मेघाचे ‘धूर, तेज आदींचा समुच्चय’ हे वर्णन अत्यंत असुंदर आहे, असा आक्षेप घेईल. आणि मेघाला दूत बनवणे अयोग्य आहे, हे सर्वांनाच मान्य होईल. पण विशिष्ट संदर्भात दोन्ही वर्णने आपापल्या जागी योग्यच आहेत, प्रत्येक संदर्भात दुसरे वर्णन मुद्दा सोडणारे व मूर्खपणाचे वाटते. यावरून असे मानायचा मोह होईल, की दोन्ही वर्णनांचे आपल्या मनात सारखेच स्थान हवे.

पण ‘धूर, तेजादींचा समुच्चय’ हे वर्णन कंटाळवाणे असेल, अपूर्ण असेल, पण ते खरे आहे. मुख्य म्हणजे त्याचा वर्णन कोण करते आहे याच्याशी संबंध नाही. ते बहुशः मूल्यनिरपेक्ष आहे. ‘मेघदूत’ हे वर्णन मुळातच चूक आहे. ते पूर्णतः वर्णन करणाऱ्याशी निगडित आहे, आणि त्यात भरपूर मूल्यविचार आहे. त्याच्या विशिष्ट संदर्भात मात्र ते सार्थ आणि सुंदर आहे. वर्णन आणि त्याचा ऐकणाऱ्यावर परिणाम, ही दोन्ही संबंधित व्यक्तींपुरतीच वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

‘जीव म्हणजे काय ?’ हा प्रश्न तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत गहन असल्याचे सांगितले जाते–इतका गहन, की सोप्या संज्ञा वापरून त्याची चर्चा करता येत नाही. जाणीव ही तर अधिकच तरल आणि शब्दांच्या टप्प्यात आणण्यास कठिण बाब मानली जाते. भाषा वापरून त्या बाबीची चर्चा अशक्य असेल, असेही सुचवले जाते. ही वृत्ती आवश्यक नाही.

वास्तवात जीव-जाणीव हे दोन्ही भूतमात्राचे गुणधर्म आहेत. दोन्ही बाबी (mundane), काहीशा उघड आणि उथळ (trivial) आहेत. त्या दोन्ही बाबी आपल्या सर्वांत गहन अशा विचारांवर, भावनांवर आदळतात, आणि आपल्या व्यक्तित्वभावनेशी निगडित आहेत, म्हणूनच त्या गहन आणि शब्दांच्या पलिकडल्या वाटतात. आपण बाह्य जगाकडे जाणीव वापरतच पाहतो. आत्मभान, ‘स्व’ची जाणीव तर आपल्या स्वतःबद्दलच्या संकल्पनांच्या गाभ्याशी असते. आपण ‘जाणीव म्हणजे काय ?’ असा विचार करतो तेव्हा आपण जिचे निरीक्षण करतो अशी वस्तूही असतो आणि निरीक्षकही असतो. ह्या स्वतःच्याच संदर्भाच्या (self-referential) अंगामुळे जाणिवेचे आकलन अवघड वाटते. पण ही अडचण फारशी खरी, वास्तविक नाही. तो एक भास आहे.

माझ्या मते ह्या बाबी विवेक, विश्लेषण, तर्क, यांच्या मदतीने समजून घेता येतात. त्या ऐहिक बाबी नाहीत असे मानण्याला काही सबळ कारण दिसत नाही; त्यामुळे त्यांचे आकलन इहवादी (जडवादी) भूमिकेतून देणेच सोपे ठरते. दोन्ही बाबी उत्क्रांतीतून घडलेल्या आहेत, त्यामुळे उत्क्रांतीवर आधारित स्पष्टीकरणे शोधणेच इष्ट आहे पुिन्हा स्वीकारलेल्या मर्यादा आठवाव्या. सं..

जीव, जिवंत रचना ह्या असंभाव्य (unlikely), तात्कालिक (temporary), विरचित (organised), उष्मागतिकीच्या दृष्टीने खुल्या (thermodynamically open), माहिती साठवणाऱ्या आणि अवसरवादी (opportunistic) अशा भूतमात्राच्या रचना असतात. त्या माहिती साठवू शकतात, ती माहिती इतर जीवांना देऊ शकतात, आणि नैसर्गिक निवडीतून उत्क्रांत होऊ शकतात. आता ही लक्षणांची यादी एकेक करून तपासू. असंभाव्यः जिवंत रचनांमधली मूलद्रव्ये पाहा. एकूण विश्वाचा विचार करता ९९.९% भाग हायड्रोजन व हीलियम असतो, तर इतर सर्व मूलद्रव्ये मिळून जेमतेम ०.१% असतात. पण जिवंत रचनांच्या शरीरांचा जेमतेम १०% भाग हायड्रोजन असतो, व हीलियम जवळपास नसतोच. त्यांच्यातील ६५% भाग असणारा ऑक्सिजन, १८% कार्बन, ३% नायट्रोजन, वगैरे सारे विश्वात तुलनेने दुर्मिळ अशा मूलद्रव्यांचे संकलन असते. प्रत्यक्षात सजीवांमधील मूल्यद्रव्यांची प्रमाणे वरील चित्राइतकी विषम नाहीत. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीव भेटतात, आणि जीवांची शरीरे या पृष्ठभागावरील भूतमात्रापासूनच बनतात. पण इथेही काही वैचित्र्य आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागात २६% सिलिकॉन व ०.३% कार्बन असतो; पण जीवांच्या शरीरांमध्ये सिलिकॉनचे प्रमाण नगण्य असते.

सजीव आणि कृत्रिम निर्जीव रचनांमध्ये इतरही मोठाले फरक असतात. सजीवांमध्ये सुटी मूलद्रव्ये न भेटता संयुजे व मिश्रणे भेटतात; तर कृत्रिम निर्जीवांमध्ये शुद्ध धातू व तत्सम सुटी मूलद्रव्ये भेटतात. कृत्रिम निर्जीव रचना बख़ुशी कडक असतात; तर सजीव लवचीक (pliant) असतात. कृत्रिम निर्जीवांना ऊर्जा पुरवावी लागते आणि बरेचदा उच्च तापमाने गाठली जातात; तर सजीवांमध्ये कमी तापमानाला स्वतःचे पुनर्नूतनीकरण करता येणारे ऊर्जास्रोत असतात.

घटकद्रव्याची प्रमाणे, विरचितता, यांची सांख्यिकीय असंभाव्यता दाखवते की सजीव रचना ‘आपोआप’ उद्भवलेल्या नसणार. देवशास्त्र्यांनाही हे जाणवते, आणि इतरांनाही. देवशास्त्रीय विचारवंतांपैकी विल्यम पेलीचा युक्तिवाद प्रसिद्ध आहे. फिरायला जाताना एखाद्याला वाटेत पडलेले घड्याळ दिसले, तर त्याच्या अस्तित्वाचे स्पष्टीकरण कसे द्यायचे? पेलीच्या मते घड्याळाच्या रचनेतील किचकटपणा, व्यामिश्रता–आणि विशेष म्हणजे घड्याळाला ‘वेळ दाखवणे’ हा हेतू असणे; यांमधून आपण घड्याळ का आहे, हे सांगू शकतो. एका बुद्धिमान योजनाकाराने, घड्याळजीने, ते मुद्दाम वेळ सांगण्यासाठी घडवले असणार. ते त्याच्या शेजारी पडलेल्या एखाद्या दगडाधोंड्याप्रमाणे स्वैरतेतून निर्माण झाले असणे शक्य नाही. बरे, घड्याळ आहे म्हणजे घड्याळजी असणारच. तेव्हा सजीव रचना, ज्या घड्याळांपेक्षा कैक पटीने व्यामिश्र असतात, त्या बुद्धिमान योजनाकाराचे अस्तित्व दाखवतात. [ पेलीचे ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलचे हे युक्तिवाद विसाव्या शतकात आयझंक बशेविस सिंगर या साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्याने नव्याने वापरले. – सं.]

आधुनिक विज्ञानातून सजीव नावाच्या अत्यंत विरचित रचनांच्या अस्तित्वाचे पेलीच्या मांडणीपेक्षा वेगळे स्पष्टीकरण मिळते. यानुसार सजीवांमागे योजना नाही. केवळ अनेक स्वैर घटनांमधून सजीव घडतात. त्यांच्या घडणीमागे हेतू नाही. वस्तुनिष्ठपणे पाहता दगडधोंडे आणि सजीव रचना सारखेच निर्हेतुक आहेत. सजीव रचना घडणे किंवा असणे हे तर्काच्या दृष्टीने आवश्यक नाही. पण तशा रचना आहेत, कारण त्यांच्यात तगून राहण्याच्या काही युक्त्या समाविष्ट झाल्या आहेत. आणि त्या रचना साध्या, नेहेमीच्या भौतिक नियमांशी सुसंगत आहेत.

तात्कालिकः एका व्यक्तीचे जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोन घटनांमधली अवस्था; एक जन्मठेपच म्हणा. पण एवढ्याने कथा संपत नाही. प्रत्येक जीव स्वतःच्या शरीरातील भूतमात्र सतत बदलून घेत असतो. आपले भौतिक शरीर तुकड्यातुकड्याने त्यागले जात असते, आणि नवे भूतमात्र त्यात सामील केले जात असते. एका अर्थी आपण सारेच नेहेमी काही आठवडे वयाचे असतो (यामुळे आपण आपले आत्मभान कसे टिकवून ठेवतो हा प्रश्न जास्तच गूढ होतो). दुसरे म्हणजे, जरी आजची जीवसृष्टीतली विविधता प्रचंड वाटत असली, तरी इतिहासातील विविधतेची बेरीज याच्या शंभरेक पट आहे. पृथ्वीवर एकूण ज्या जीवजाती जगून गेल्या, त्यांपैकी सुमारे ९९% लुप्त झाल्या आहेत. व्यक्ती, जीवजाती, कोणालाही न बदलता टिकून राहता आलेले नाही.

उष्मागतिकीच्या दृष्टीने खुल्याः अन्न खाणे, त्यातून उपयुक्त कामे करवून घेणे, निरुपयोगी भाग बाहेर टाकणे, या कृतिक्रमाला चयापचय (metabolism) म्हणतात. सारे सजीव चयापचय करतात. जर एखाद्या सजीवाला अन्न दिले नाही, विष्ठा बाहेर टाकू दिली नाही, बंदिस्त केले; तर तो जीव लवकरच मरतो. भूतमात्र, ऊर्जा, यांबाबत सजीव खुल्या परिस्थितीतच जगतात.

विरचितः सजीवांमधले रेणू, डीएनए, आरएनए, प्रथिने, लायपिड्स (स्निग्ध रेणू) साखरा, हे आकाराने प्रचंड असतात. निर्जीवांमधले रेणू इतके मोठे नसतात. सजीवांमधले रेणू कधीकधी लक्षावधी सुट्या टप्प्यांनी घडतात. रेणूंच्या पेशी घडतात. पेशींचे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या कृती करतात. प्रत्येक पेशीचा चयापचय मोठाल्या कृतिजंजाळांचा भाग असतो. यातून शरीरे घडतात त्यांचे अवयव घडतात. आणि यातील प्रत्येक पातळीवर (रेणू, पेशी, अवयव, शरीर) माहिती साठवण्याच्या, वापरण्याच्या क्षमता असतात.

माहिती एककेः स्वतःत स्वतःच्या जडणघडणीची माहिती साठवणारी एकके (informational entities) असणे, हा सजीवांचाच गुण आहे. जीन्स ही अशी एकके असतात. त्यांच्यात प्रथिने घडवण्याच्या सूचना असतात. पण जीन्स केवळ प्रथिने घडवत नाहीत. प्रथिनेही केवळ शरीरे घडवत नाहीत. प्रथिने संदेशवहन करतात; शरीरांतही आणि बाहेरही. जीन्सही प्रथिनांबाबतच्या सूचना साठवणे सोडून इतर कामे करतात. ही व्यामिश्रता संगणक-नियमावल्यांपेक्षा (computer software) बरीच जास्त असते. एकूण सजीवाची घडण मात्र जीन्समध्ये साठवलेल्या सूचनांनुसारच होत नाही.

अवसरवादीः परिस्थितीतील स्वतःला उपयुक्त घटकांच्या वापरासाठी स्वतःला बदलणे, म्हणजे अवसरवाद. स्वीकारलेल्या मान्यतांपैकी उत्क्रांती (क्रमांक २) ही अशा अवसरवादावरच बेतलेली आहे. अवसरवाद हा उत्क्रांतीत अनुस्यूत आहे. आपण सजीवांच्या प्रमुख लक्षणांची यादी मांडली. ती निर्जीवांपेक्षा वेगळी कशी हे पाहिले. पण जीवाचा अर्थ (meaning of life) मात्र अशा वस्तुनिष्ठ बाबींतून सापडत नाही. तो फक्त जाणीवपूर्वक व्यक्तिनिष्ठ विचारांतूनच कळू शकतो.

जाणिवेचा उपयोग काय ? आजची जीवसृष्टी साडेतीन अब्ज वर्षे घडत आहे. या काळात आजच्या जीवाणूंपेक्षाही (bacteria) सोप्या रचनांपासून आजच्या वनस्पती, प्राणी (आणि आपण) वगैरे व्यामिश्र रचना घडल्या. या उत्क्रांतीचे प्रमुख कारण हे की सजीव रचना स्वतःसारखे जीव बनवतात. ज्या जीवाला हे पुनरुत्पादन आपल्यासारख्या इतर जीवांपेक्षा जास्त कार्यक्षमतेने करता येते, त्याच्यासारखे जीव सृष्टीमध्ये वाढत जाणार.

जर अन्नसाठा, परिस्थिती वगैरेंना मर्यादा असतील, तर कमी कार्यक्षम जीव लुप्त होणार ; आणि कार्यक्षम जीवांच्या स्पर्धेने परिस्थितिसापेक्ष कार्यक्षमता वाढत जाणार. प्रत्येक कार्यक्षम ठरणारा गुण टिकणार आणि वाढणार. श्वासोच्छ्वास करता येणे, अंडी देता येणे, अंड्यांना कडक कवच असणे, उडता येणे, धोका लवकर जाणवून प्रतिसाद देता येणे; जो कोणता गुण उपयुक्त असेल, तो वाढणारच. अनेक पर्याय घडणार, आणि कार्यक्षम ते निवडले जाणार. यामागे कोणतीही योजना, कोणताही हेतू किंवा ‘मार्गदर्शन’ असत नाही.

एखादा बदल यशस्वी ठरला का, हे फक्त परिणाम जोखून ठरवता येते. यशस्वी बदलच टिकून राहतात. चेतापेशी (nerve cells) आणि मेंदू घडणे, हा तसा अलिकडच्या काळात उत्क्रांत झालेला बदल आहे. मेंदू हा प्राण्यांच्या शरीरांमधला एक विशेष काम करणाऱ्या पेशींचा संच असतो. तो उत्क्रांतीतूनच घडला आहे, काळीज (liver) किंवा मूत्रपिंडांसारखाच (kidney). पण मेंदूच्या मदतीने प्राणी इतरांशी संवाद साधू शकतात (आणि स्वतःशीही). विचार करणे म्हणजे असा स्वतःशीच संवाद. मेंदू असलेले प्राणी जगण्यातगण्याच्या झगड्यात जास्त यशस्वी ठरतात. आयुष्यभराचा अनुभव, त्यातून कमावलेले ज्ञान, हे जीवनाला उपयुक्त असतात. उत्क्रांतीतून ‘शिकण्या’पेक्षा मेंदू वापरून होणारे शिक्षण जास्त वेगवानही असते, आणि जास्त वैविध्यपूर्णही.

मेंदू घडण्याचे काही मजेदार परिणाम होतात. मेंदू वापरून आपण स्वतःबद्दल विचार करू शकतो. आपल्या भूतकाळाचा आणि भविष्याचा विचार करू शकतो. आपण विचार करण्याबद्दलही विचार करू शकतो. कल्पनांच्या इमारती उभारू शकतो. यामुळे भौतिक मेंदूऐवजी आपल्या शरीरांत इतर काहीतरी [किंवा ‘कोणीतरी’ – सं.] आहे, असे वाटू लागते. याला काहीजण ‘मन’ म्हणतात. पण अशी काही मन नावाची, मेंदूपासून वेगळी रचना आहे, असे मानायला कोणतेही कारण नाही. अर्थात, मन मानणे, त्याच्या कार्याची चर्चा करणे, हे रसविहीन नसते. असल्या मेंदूच्या कृतींच्या चर्चांमधूनच आपले आयुष्य श्रीमंत होते. कला, साहित्य, काव्य, धर्म ही अशा मेंदूच्या ‘उत्पादनां’ची उदाहरणे आहेत.

वैज्ञानिक अभ्यासही मेंदूंमुळेच शक्य होतो. एकदा मेंदू असलेले प्राणी उद्भवले, की त्यांच्यात भोवतालच्या जगाबद्दल माहिती कमावण्याची प्रेरणाही आलीच. सुरुवातीला हे टिकून राहण्यासाठीची धोरणे ठरवण्याकरता होते. नंतर मात्र तशी चौकशी करणे हे मेंदूंना समाधान देणारे काम झाले. आणखी काही काळाने हे कुतूहल खुद्द मेंदूच्या कार्यप्रणालीवरही रोखले गेले.

मेंदूंच्या व्यामिश्रता आणि उत्क्रांतीतून घडलेली कार्यकारण परंपरा शोधण्याची इच्छा, यांचा एकत्रित परिणाम असा की मनःस्थितींमागे कारणे नसतानाही तशी कारणे सुचवण्याचा प्रकार घडू लागला. आपल्या मेंदूंमध्ये सुमारे दहा घात अकरा एिक या आकड्यापुढे अकरा शून्य (शंभर अब्ज) -सं.] चेतापेशी असतात. यांपैकी प्रत्येक चेतापेशी इतर शंभर ते हजार चेतापेशींशी जोडलेली असते. या आश्चर्यकारक जुळलेपणाचा (connectivity) एक परिणाम म्हणजे बाहेरून काहीही संदेश मिळत नसतानाही मेंदूंमध्ये विरचित चेताव्यवहार (organized nervous activity) घडू शकतात; आणि हे व्यवहार बाहेरून काही संदेश आला आहे, अश्यासारखे असतात. ज्यांनी कुत्रा पाळला असेल त्यांना जाणवेल, की फक्त माणसेच स्वप्ने पाहत नाहीत तर कुत्रेही स्वप्ने पाहतात. स्वप्न पडणे ही बाहेरून संदेश नसतानाही तशा संदेशाचा प्रतिसाद असण्यासारखी क्रिया आहे.

आपला उत्क्रांतिक इतिहास आपल्याला अशा स्थितींसाठीची कारणे सुचवून त्यांपैकी कमीत कमी असंभाव्य कारणे शोधायला लावतो. जेव्हा उत्क्रांतीच्या काळात न भेटलेले अभ्यासाचे क्षेत्र आपल्यासमोर उभे ठाकते, तेव्हाही आपण यासारखेच, कमीत कमी असंभाव्य असे उत्तर शोधू लागतो.

वर्तणूक, मनःस्थिती आणि जाणीव आपण साधारण चर्चेत आपल्या मज्जासंस्थेतल्या बदलांमुळे घडणाऱ्या विरचित हालचालींना ‘वर्तणूक’ म्हणतो. ज्ञानेंद्रियांच्या संदेशांमुळे घडणारा कर्मेंद्रियांचा प्रतिसाद म्हणजे वर्तणूक, ही या व्यवहाराची सर्वांत सरळसोट व्याख्या. एका चेतापेशीतून दुसरीला विद्युत्-भार दिला जाणे, किंवा एका चेतापेशींच्या संचातील विद्युत्-व्यवहाराने दुसऱ्या एखाद्या संचात विद्युत्-व्यवहार घडणे, हीदेखील त्या चेतापेशींची वर्तणूक मानता येईल – जरी त्यातून स्नायूंची हालचाल घडली नाही, तरी.

आपण सामान्यपणे जाणिवेला वर्तणुकीचा प्रकार मानत नाही. विचार, भावना, संवेदन (perception) वगैरेंशी निगडित मनःस्थिती, यांचा संबंध जाणिवेशी लावला जातो. [मराठी विश्वकोशाच्या परिभाषासंग्रहात perception च्या प्रतिशब्दांमध्ये ‘जाणीव’ आणि ‘संवेदन’, दोन्ही आहेत! -सं.] मी ‘मन’ हा शब्द मेंदूतील क्रियांसाठी वापरतो; शरीरात जसा चयापचय (metabolism) तसे मेंदूत ‘मन’. यामुळे ‘मेंदूतील स्थिती’ आणि ‘मनःस्थिती’ या संज्ञा आपण समरूप मानू शकतो. यातून जाणिवेचा अर्थ निघतो, ‘चेतापेशींचे सामूहिक वर्तन.

आता ही व्याख्या वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीच्या मनःस्थितीची चर्चा केली जात आहे, तिच्या मनःस्थितीची माहिती इतरांना घेता यायला हवी. हे भाषेतूनच व्हायला हवे असे नाही. व्यक्तीच्या वागणुकीतून मनःस्थितीचे अंदाज बांधता यायला हवेत. यात निरीक्षकाने त्या व्यक्तीचे भौतिक-रासायनिक विश्लेषण करणेही आले. [ एखादा माणूस खरे बोलत आहे की नाही हे तपासणारे ‘पॉलीग्राफ’ उर्फ ‘लाय-डिटेक्टर’ हे यंत्र असे भौतिक-रासायनिक तपास करून मनःस्थिती जोखते. तपासाधीन व्यक्ती काय सांगते आहे यापेक्षा तिच्या नाडीचा वेग, रक्तदाब, श्वास घेणे, वगैरेंना महत्त्व दिले जाते. – सं.] या व्याख्येमुळे जाणिवेच्या संबंधात लेखी-बोली-प्रतीकात्मक भाषावापराला महत्त्व उरत नाही.

आता वर्तणुकीचा अभ्यास कसा करावा, विशेषतः जाणीवपूर्वक वर्तणुकीचा? व्यक्तिनिष्टपणे पाहता जाणिवेसोबत एक स्वायत्ततेचा (autonomy) भाव असतो. जाणीवपूर्वक वागणे हेतुपुरस्सर, एखादे लक्ष्य गाठायची इच्छा दर्शवणारे वाटते. हा गुण केवळ जड वस्तूंच्या, भूतमात्राच्या व्यवस्थित रचनेत असणे अशक्य वाटते. पण आपल्या उत्क्रांतीच्या अभ्यासानंतर तो गुण भौतिक रचनेत अशक्य आहे असे म्हणणे धाष्ट्ाचे ठरेल.

जीवशास्त्रातील इतर सर्व बाबींप्रमाणेच वर्तणुकीचा अभ्यास करतानाही नजिकची (तात्कालिक, proximate) स्पष्टीकरणे आणि दूरची (दूरस्थ, distal) स्पष्टीकरणे असा फरक करायला हवा. वास्तवात उत्क्रांतीवर आधारित दूरस्थ स्पष्टीकरणांमध्ये तात्कालिक अशी भौतिक-रासायनिक स्पष्टीकरणे अनुस्यूत असतात. पण आपल्या सवयीच्या भौतिक स्पष्टीकरणांमध्ये आधी कारण, मग कार्य, अशी रचना असते; तर उत्क्रांतीवर आधारित स्पष्टीकरणांमध्ये एक सहेतुकतावादी (teleological) भाव असतो. हे जरा तपशिलात पाहू.

आपला इतिहास उत्क्रांतीचा आहे. आपण प्रत्येक टप्प्यावर नैसर्गिक निवडीतून साठवलेल्या गुणांपासून घडलो आहोत. यामुळे एका अर्थी आपल्यात जाति-आनुवंशिक स्मृती (phylogenetic memory) असते. आपली शरीरे घडताना रुधिराभिसरण करणारे पंप (हृदय) घडतात, कारण एका अर्थी आपल्या जीन्सना ‘असे पंप आपल्या पूर्वजांना उपयुक्त ठरले होते’ याचे स्मरण असते. आपल्या वर्तणुकीचाही बराचसा भाग आपल्या पूर्वजांना उपयुक्त ठरलेला असल्यामुळेच ठरत असतो. आपण ‘असे असे वागावे’ हे अध्याहृत समजतो, कारण त्यामुळे बाहेरील जग हाताळणे शक्य होते. अवकाशाची जाणीव, वस्तूंचे अस्तित्व-सातत्य, ही एका प्रकारची उदाहरणे आहेत. सापांची भीती, हेही असेच उदाहरण िकाचेवर किंवा खरखरीत कागदावर नखे घासल्याने आपण शहारतो, व दात ‘आंबल्यासारखे’ होतात. याचे एक स्पष्टीकरण असे की बिबट्यांपासून वाचायला आपले पूर्वज झाडांवर चढून बसत. खालून बिबट्या झाडांत नखे रुतवून चढू लागतानाच्या आवाजासारखे आवाज यामुळेच आजही भीतीदायक वाटतात! – सं.] आपल्या उत्क्रांतीतून आपण बाह्य जगाला सामोरे जाण्याच्या पद्धती कमावल्या; आणि याचाच भाग म्हणून एक मेंदू नावाचा अवयवही आपल्याला मिळाला. मेंदू ज्यांच्यापासून घडला आहे त्या चेतापेशींचे गुण आपल्याला आपल्या वर्तणुकीची तात्कालिक, नजीकची स्पष्टीकरणे घडवू देतात. यामुळे वर्तणूक ही मेंदूच्या अंतर्गत स्थितींची, विचारांची हेतुपूर्वक अशी प्रतिबिंबित कृती ठरते -किंवा देकार्तच्या जवळ जात – “मी आहे, म्हणून मी विचार करतो” (I am, therefore I think), असे म्हणता येते.

आपल्या मेंदूत ज्ञानेंद्रियांकडून येणाऱ्या उत्तेजक संदेशांचे (stimuli) विश्लेषण तर होतेच, पण विचार, अगदी विचारांबाबत विचारही केला जातो. मेंदू हे जाणिवेचे इंद्रिय आहे, माणसांमध्ये. कधीकधी असा प्रश्न विचारला जातो, “मेंदूत जाणिवेचे नेमके स्थान कुठे असते?’ हा अयोग्य प्रश्न आहे, कारण त्यात संवेदन हे एकात्म घटित मानले आहे. सुटी संवेदने (percepts) एकात्म (unitary) असतात; पण संवेदनाची क्रिया एकात्म नसते. आपण एखादा चेहेरा ओळखतो, तो संपूर्ण चेहेऱ्यातून; कान, नाक, डोळे, इत्यादींचे सुटे वर्गीकरण करून नव्हे. पण तरीही संवेदनक्रियेत एकत्रितपणासोबत सुटे, तुटक अंगही असते. प्रायोगिक पुरावे आपण सुट्या अंगांचे परस्परसंबंध तपासत असतो, असे दाखवतात. आपण सुट्या रेषा, रंग वगैरेंपासून मनात एकूण चित्र जुळवतो. हे कसे घडते, याचा तपशील आज उपलब्ध नाही. असेही म्हणता येते, की मेंदू हा सुट्या लघु-मेंदूंचा संच असतो. मेंदूला इजा झालेल्या लोकांचा अभ्यास हे सत्य कठोरपणे अधोरेखित करतो. (जसे -एखादा मेंदूला इजा झालेला माणूस आपल्या पत्नीकडे पाहून म्हणतो, “चेहेरा दिसतो मला. नाक, डोळे वगैरे. पण ओळखीचा नाही तो.”) ‘ओळखणे’ एखादेवेळी एकात्म असेल.

सारांश म्हणजे, जाणिवेची दोन स्पष्टीकरणे देता येतात. दोन्ही स्पष्टीकरणे संदर्भानुसार सारखीच वैध आहेत. एक स्पष्टीकरण जीन्स आणि उपजत (innate) गुणांचा आधार घेते; आणि उपजतपणा उत्क्रांतीतून साठल्याचे सांगते. दुसऱ्या स्पष्टीकरणात जाणीव हा आपल्याला जाणवणारा मज्जासंस्थेचा गुण मानते; आणि तो प्रथमतः तरी आपल्यालाच (स्वतःलाच) जाणवतो, असे सांगते.

जाणीव माणसापुरतीच ? चेतापेशी उत्क्रांतीच्या इतिहासात तशा ‘ताज्या’ आहेत. वनस्पतींना आणि अनेक प्राण्यांना चेतापेशी ‘लाभलेल्या’ नाहीत, ह्याचीही खात्री देता येते. पण त्यांना ऐंद्रिय संवेदना मिळतात, आणि त्यांपासून उपयुक्त माहिती मिळून हेतुपुरस्सर वर्तणूकही घडते. बॅक्टीरिया अन्नाकडे जातात, आणि घातक द्रव्यांपासून दूर जातात. खरे तर हे आश्चर्यकारक वाटायला हवे. स्वैरशा संवेदनांमधून हेतू असल्यासारखी वर्तणूक करणे रंजक आहे. बॅक्टीरिया अमुक ‘दिशेने जावे’ असे ठरवून त्या दिशेने जात राहत नाहीत. ते स्वैरपणे हालचाल करतात व दिशा बदलतात. पण जर त्यांच्या हालचालीची दिशा ‘योग्य’ असली [ अन्नाकडे, किंवा घातक द्रव्यापासून दूर. – सं.] तर त्यांचे दिशा बदलणे मंदावते. आपण मागे उडच या अमीबासारख्या जीवाचे वर्तन पाहिले. अन्नाचा तुटवडा उत्पन्न झाला, की ते एकत्र होतात. काही उडच मरतात, तर काही संरक्षक कवचे घडवून बीजकरूपात (spore form) जातात. तत्त्वतः कोणताही उडच बीजक बनू शकतो व टिकू शकतो, आणि कोणताही मरू शकतो. वास्तवात काही अमीबा बीजक बनण्याकडे मुळातच सरकलेले असतात. उडच चे दोन वेगळे संच घेतले व त्यांची उपासमार करून दोन्हींतील काही जीव मरू दिले व इतरांना बीजक होऊ दिले. आता जर वाचलेली बीजके एकत्र केली, आणि पुन्हा उपासमारीचा प्रयोग केला, तर मुळात ज्या संचात बीजके जास्त होती तेच पुन्हा जास्त प्रमाणात बीजकरूपात जातात. एका अर्थी बीजक बनण्याकडील कलाचे स्मरण उडच मध्ये दिसते.

आता याचा जाणिवेशी काय संबंध? आपण जाणीव म्हणजे ‘बाहेरून निरीक्षण करून ठरवता येणारी अंतर्गत स्थिती’ [ मनःस्थिती ! – सं.] असे मानले आहे. म्हणजे जाणिवेचा एक सलग पट (continuum) मानता येतो. जास्त व्यामिश्र रचनांमधून जास्त जाणीव दिसते, असे मानता येते. आणि मग उडच नाही प्राथमिक पातळीची जाणीव आहे, असे मानता येते.

एखादेवेळी बॅक्टीरिया आणि अमीबांना जाणीव असते, असे म्हणणे आक्षेपार्ह वाटेल. माझा युक्तिवाद असा, की चेतापेशी असलेले जीव नक्कीच जाणीवधारक असतात. हा युक्तिवाद मागे वाढवत आपण पहिले पहिले जीवही जाणीवधारक आहेत, असे मानू शकतो. एकदा का नुसत्याच स्व-प्रतिमा घडवणाऱ्या रसायनांची (naked replications) पातळी ओलांडली गेली, माहिती साठवता येऊ लागली, की जाणीवही आली.

आपला व्यक्तिनिष्ठ अनुभव सांगतो की जाणीव एकात्म असते. मग आपल्या शरीरांमधल्या सुट्या पेशींना जाणीव असते असे मानायचे का? माझे उत्तर होकारार्थी आहे; पण मी सोबतच असेही म्हणेन की सुट्या पेशींच्या जाणिवा केंद्रीय मज्जासंस्थेच्या एकत्रीकरणाच्या व विश्लेषणाच्या क्षमतांमुळे दाबल्या जातात. मग जाणीव उपजते केव्हा? ती नेहेमीच असणार, शुक्राणु व बीजांडांमध्येही असणार. पण यापेक्षा कमी विवाद्य [ more conservative या अर्थी – सं.] मत असे मांडता येईल की जीवाने विद्युत्व्यवहार करू लागण्यासोबत, भ्रूणाच्या मज्जासंस्थेच्या विकासासोबत जाणीव येते; महास्फोटासारख्या झटक्याने नव्हे, तर टप्प्याटप्प्याने येते आणि श्रेणीबद्ध रूपात.

समारोप माणसे उत्क्रांतीतून घडलेली आहेत. उत्क्रांतीचे वर्णन केवळ इहवादी रूपात केले जाऊ शकते. प्रजोत्पादनातील यशाला पूरक जीनसंचांचा प्रसार त्यांच्या वाहकांना [शरीरांना – सं.] उत्क्रांत करतो. प्रजोत्पादनातले यश शारीरिक व वागणुकीतील गुणधर्मांवर अवलंबून असते. म्हणजे वर्तणूकही उत्क्रांत झालेली आहे. जाणिवेचा संबंध मनःस्थितीशी आहे, आणि या मनःस्थिती मेंदूतील चेतापेशींच्या विद्युत्-व्यवहारातून घडतात. त्यामुळे आपण जाणिवेचे इहवादी (जडवादी, materialist) स्पष्टीकरण देता येते, असा युक्तिवाद करू शकतो. तत्त्वज्ञानातील काटकसरीचे तत्त्व (principle of parsimony) ‘असेच करावे’ असे सांगते. आपली विचार-युक्तिवाद-अभ्यासाची पद्धत बंदिस्त नको. ती मेंदुविज्ञान (neurobiology), वर्तनशास्त्र (behaviour), जनुकशास्त्र (genetics), विकास-जीवशास्त्र (developmental biology), चल व्यवस्थांचे शास्त्र (dynamical systems theory) आणि मानसशास्त्र (psychology), अशी विस्तृतपणे ज्ञानसंकलन करणारी हवी. जर हा प्रयत्न निष्फळ ठरला, तरच पर्यायी तत्त्वांचा विचार करावा. आपण मानवप्राणी या विश्वात फारच कमी काळ अस्तित्वात आहोत. फार सहजपणे ‘अभ्यास जमत नाही’ अशी शरणागती पत्करून जाणिवेबाबत गूढवादाला शरण जायला नको.

[इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड सायंटिफिक रीसर्च, या बंगलोरस्थित संस्थांमध्ये विद्यानंद नंगँदय्या हे ज्येष्ठ संशोधक आहेत. त्यांनी २००२ साली कलकत्त्यात दोन भाषणे दिली. दोन्ही भाषणांची लिखित रूपे रामकृष्ण मिशन इन्स्टिट्यूट ऑफ कल्चर या संस्थेच्या प्रकाशनांमध्ये छापली गेली आहेत. पहिले भाषण हिस्टरी ऑफ इंडियन सायन्स, फिलॉसफी अँड कल्चर इन इंडियन सिव्हिलायझेशन (खंड दख, भाग २) आणि सेल्फ, सोसायटी अँड सायन्स : थिअरेटिकल अँड हिस्टॉरिकल पस्पेक्टिव्हज या ग्रंथांमध्येही समाविष्ट केले गेले आहे. दोन्ही भाषणांचा हा एकत्रित मराठी संक्षेप, नंगँदय्यांच्या परवानगीने केलेला. भाषण १: ८-९ फेब्रुवारी २००२; अॅन इव्होल्यूशनरी अप्रोच टु कॉन्शसनेस भाषण २: ३ डिसेंबर २००२; लाईफ अँड कॉन्शसनेस, विद्युत-बिकाश-रेणुका-कौस्तुभ स्मरण-भाषण]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.