भारतात डार्विन

एकोणिसाव्या शतकाने तीन गोरी, दाढीवाली माणसे घडविली. त्यांना कोणी द्रष्टे म्हणतात, तर कोणी राक्षस म्हणतात. हे आहेत डार्विन, मार्क्स आणि फ्रॉईड. यांपैकी फ्रॉईड भारताच्या बौद्धिक जीवनात कुठेच दिसत नाही. त्याचे विचार माणसाचे मन आणि अंतर्मन यांबाबत होते; आणि यासाठी भारतात स्थानिक गुरु आहेत. त्यामुळे फ्रॉईडचा येथील परिणाम नगण्य असणे हे सहज समजण्यासारखे आहे. मार्क्स मात्र भारतात खूपच प्रभावशाली ठरला आहे. त्याच्या नावाचा पक्ष दोन राज्यांमध्ये सत्तेवर आहे. भारतीय समाज आणि राजकारणाचा विचार करताना मार्क्सबाबा नेहमीच आसपास असतो. अनेक पिढ्यांचे विचारवंत मार्क्सला भारतीय गुरुपरंपरेत बसवायला धडपडत आहेत. या प्रयत्नांचे यशापयश वाचकाने आपल्यापुरते ठरवावे. राहता राहिला डार्विन, ह्या तिघांपैकी वैज्ञानिक अंगाने सर्वांत महत्त्वाचा, आणि वैश्विक पातळीवर सर्वांत मूलभूत विचार करणारा. त्याने मार्क्ससारखा राजकीय पक्षांना जन्म दिला नाही, पण तो फ्रॉईडसारखा बेदखलही झाला नाही. भारतात डार्विन शिकवला जातो. भारतीय वैज्ञानिक त्याला भरपूर महत्त्वही देतात. पण डार्विनने भारतासाठी नेमके केले काय ?

पाश्चात्त्य देशांमध्ये डार्विनभोवती जी देवशास्त्रीय वादंगे उभी झाली, ती भारतात घडली नाहीत. इथे ना कोणी शाळांमध्ये डार्विनमत शिकवण्याला अडथळे आणले, ना त्याला चूक ठरवण्यासाठी निर्मितीवादाच्या (creationismAm) संस्था काढून छद्मवैज्ञानिक बचाव उभारले. माणसे इतर जीवसृष्टीशी एकसंधपणे निगडित आहेत, हे मानण्याला भारतात कोणतीही देवशास्त्रीय वा दार्शनिक अडचण नाही. वादापाठोपाठ प्रसिद्धी येते. बायबलप्रणीत निर्मितीवादाला आह्वान दिल्यामुळे पाश्चात्त्य देशांत डार्विन ख्यातनाम झाला. पण कोणत्याही भारतीय संकल्पनेला आह्वानित केल्यामुळे भारतातला त्याचा प्रभावही बराच कमी राहिला आहे. डार्विनचा भारतीय आचारविचारांवरील प्रभाव किती, हा प्रश्न जवळपास निरर्थक ठरतो, तो यामुळेच. आपण न्यूटनचा किंवा आइन्स्टाइनचा भारतावर प्रभाव काय हे जसे विचारत नाही, तसेच डार्विनबाबतही करतो. न्यूटन-आइन्स्टाइन यांनी आपले इहलोकाचे ज्ञान वाढवले, एवढे म्हणणे पुरेसे आहे. त्यांचा भारतीय समाज किंवा संस्कृतीवरील प्रभाव विवादास्पद नाही. डार्विनचे तरी काही वेगळेपण आहे का?

एका पातळीवर पाहता डार्विन भारतीयांना एक वैज्ञानिक म्हणून जाणवतो. त्याने काही क्रांतिकारक मर्मदृष्टी दिली. पण मानवजात, समाज, विश्व यांच्या स्वभावाबाबतच्या भारतीय चर्चामध्ये त्याला स्थान नाही. याबाबतीत त्याचे मार्क्सपेक्षा वेगळेपण जाणवण्यासारखे आहे. त्याने ना चळवळींना जन्म दिला, ना घोषणांना; हे चांगलेच झाले. विचारवंताचे मूल्यमापन त्याच्या कल्पना आणि युक्तिवादावरून व्हायला हवे; सामान्यांच्या जाणिवांमधील स्थानावरून नव्हे. आणि डार्विन प्रथम एक विचारवंत होता, कदाचित् विज्ञानाच्या विचारवंतांमध्ये सर्वांत मर्मग्राही दृष्टी असलेला. म्हणून आपला प्रश्न असा हवा, “भारतीय विचारवंतांनी (या व इतर) परकीय विचारवंतांशी कसे संबंध ठेवावे?”

याबाबतीत डार्विनचे उदाहरण उद्बोधक आहे. माझ्या मते डार्विनीय कल्पनांचे भारतावर महत्त्वाचे परिणाम झाले आहेत — पण हे परिणाम मुळात अपेक्षित मार्गांनी झालेले नाहीत. इतर कारणांसाठी घडलेले युक्तिवाद अनपेक्षित परिणाम घडवून गेले आहेत. मी आधीच माफी मागतो — हा सखोल अभ्यासातून केला जात असलेला ऐतिहासिक दावा नाही. डार्विनच्या पाश्चात्त्य संस्कृतीवरील परिणामांमधून भारतीय विचारवंतांसाठी संधी कशा उपलब्ध झाल्या, याचे हे एक काल्पनिक संगती लावणेच फक्त आहे.

डार्विन वैज्ञानिक होता व वैज्ञानिकांसाठी लिहीत होता. पण भारतीय (किंवा पाश्चात्त्यही) विचारवंतांना त्याच्या मांडणीचा वैज्ञानिक आशय फारसा कळला नाही. भारतात तो वैज्ञानिक म्हणून नव्हे, तर तत्त्वज्ञ किंवा दार्शनिक म्हणून आला. निसर्ग अचल नसून सतत बदलत जाणारा, उत्क्रांत होणारा आहे, असे सांगणारे तत्त्वज्ञान म्हणजे उत्क्रांतिवाद. तिच्याशी निगडित अनेक कल्पना अमान्य ठरल्या आहेत – वंशवाद ही त्यातली सर्वांत दृश्य कल्पना. गौरवंशाचे वर्चस्व आणि त्याचा साम्राज्यवादी परिणाम, यांचे बरेचदा डार्विनीय भाषेत समर्थन केले गेले. एका अर्थी हा डार्विनचा भारतीयांवरील आणि त्यांच्यावर साम्राज्यशाही लादणाऱ्यांवरील अप्रत्यक्ष, दुर्दैवी परिणाम आहे. पण एक वेगळाही परिणाम आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये त्यांच्या वैचारिक परंपरेचा पुनर्विचार डार्विनपासून सुरू झाला, आणि या पुनर्विचारामुळे १९ व्या व २० व्या शतकातील भारतीयांनी पाश्चात्त्यांना दिलेला प्रतिसाद सर्जनशील झाला.

पाश्चात्त्य विज्ञानतंत्रज्ञान आणि समाजरचनेच्या श्रेष्ठ पद्धतींचा एकोणिसाव्या शतकातील युरोपबाहेरच्या लोकांवरचा परिणाम समजणे आपल्याला अवघड जाते. आज आपल्याकडे अत्याधुनिक संगणक नसले तरी आपल्याला उच्चतंत्रज्ञानाचे विश्व माहीत असते, आणि त्यापर्यंत पोचायची वाटही माहीत असते. एकोणिसाव्या शतकात स्थिती वेगळी होती. रेल्वे, रणगाडे आणि दुर्बिणीमुळे जगात जादुई वाटणारा बदल झाला होता. या तंत्रवैज्ञानिक उपलब्धींच्या तुलनेत भारतीय बौद्धिक परंपरा पहा. त्या परंपरा त्यांच्या टीकाकारांना अंधश्रद्धांसारख्या वाटत. परंपरासमर्थकांनी वादाची दिशाच बदलली. ते आपल्या परंपरा अनुभवजन्यतेपासून फटकून राहणाऱ्या, शुद्ध तत्त्वमीमांसक (metaphysical) आहेत, यावर भर देऊ लागले. राममोहन रॉय व इतर अनेकांनी पाश्चात्त्य ज्ञानविकास आणि भारतीय परंपरा यांची सांगड घालायचे प्रयत्न केले. यातून अनेक महत्त्वाचे प्रश्न पडू लागले.

विज्ञान केवळ पाश्चात्त्य ज्ञानपरंपरेतूनच येते, की इतर परंपराही तेथे पोचू शकतात ? पाश्चात्त्यांच्या पौर्वात्य परंपरांवरील कठोर टीकेला पुढे वेगवेगळे प्रतिसाद आले. काही भारतीय सांगू लागले, की सर्व आधुनिक विज्ञान वेदांमध्ये आहे — आजही, प्रश्न बदलत जाऊनही, हे दावे केले जातात. विवेकानंद, राधाकृष्णन वगैरे पाश्चात्त्य विज्ञानाचे ऐहिक ज्ञानक्षेत्रातले श्रेष्ठत्व मान्य करत सांगू लागले, की आध्यात्मिक (spiritual) विश्वाबाबत भारतीयांचे आकलन पाश्चात्त्यांच्या आकलनापेक्षा उजवे आहे. एकोणिसाव्या शतकाचा शेवट आणि विसाव्या शतकाची सुरुवात, या सर्व काळात प्रत्येक भारतीय विचारवंताला विज्ञान भारतीय ज्ञानपंरपरेशी सुसंगत आहे की नाही, या प्रश्नाला सामोरे जावेच लागे. आणि या काळातला मोठा पाश्चात्त्य वैज्ञानिक होता डार्विन. आपला पाश्चात्त्य विज्ञानाला प्रतिसाद यामुळेच आपल्या डार्विनच्या आकलनानुसार ठरत गेला. यापुढची माझी मांडणी सत्येतिहास नसून काल्पनिक घडण आहे, हे लक्षात ठेवून आपण स्वतःला विचारू या — डार्विनचा एकोणिसाव्या शतकातील भारतीयांच्या कार्यावर काय परिणाम झाला असेल ?

पाश्चात्त्य संस्कृतीवरील डार्विनचा परिणाम प्रामुख्याने धर्म आणि देवशास्त्रावर झाला. काही जीवशास्त्री सोडता डार्विनच्या मांडणीच्या तपशिलाशी इतरांना कर्तव्य नव्हते, पण त्याची मानवी व प्राणिसृष्टीच्या उत्क्रांतीची मांडणी ख्रिस्ती देवशास्त्राशी विसंगत आहे, हे उघड होते. भारतीय दार्शनिक व धार्मिक परंपरा बायबली मांडणीहून खूप वेगळी असल्यामुळे भारतीय विचारवंतांना डार्विनमुळे एक अवकाश निर्माण झाला. यामुळे भारतीय धर्म हे विज्ञानाशी सुसंगत आहेत. एखादेवेळी आध्यात्मिक क्षेत्राच्या अभ्यासात ते विज्ञानाच्याही पुढे जातात, असे अनेक भारतीयांना वाटू लागले. मला वाटते की १८९४ साली जागतिक धर्मसंसदेपुढे विवेकानंदांनी वेदान्ताचा जो जोरदार पुरस्कार केला, त्यात ख्रिस्ती धर्माचे मानवाच्या उद्भवाचे मत डार्विनमुळे दुबळे ठरण्याचाही भाग असणार. ख्रिस्ती धर्म पोथी आणि श्रद्धेवर भर देणारा. त्याच्या तुलनेत ध्यानधारणेवर, गूढवादी अनुभवांवर भर देणारे आशियाई धर्म एखादवेळी जास्त वैज्ञानिक वाटले असणार. त्या काळी भारतीयांना पाश्चात्त्य जगाचा अनुभव प्रामुख्याने बंगालच्या माध्यमातून होत असे. पाश्चात्त्य दबावाला भारतीयांचा प्रथम प्रतिसाद बरेचदा आध्यात्मिक पुनरुत्थानातून दिसून येत असे. सुशिक्षित भारतीय व त्यांचे काही पाश्चात्त्य सहकारी यांना भारतीय धर्म पाश्चात्त्य धर्मापेक्षा श्रेष्ठ वाटत असत.

रामकृष्ण परमहंस ही बंगाली आध्यात्मिक पुनरुत्थानातली एक कळीची व्यक्ती. त्यांचा उल्लेख बरेचदा एखाद्या आध्यात्मिक डार्विन किंवा आइन्स्टाइनसारखा केला जातो. विरोधाभास पाहा – पाश्चात्त्य धर्म पोथीबद्ध होते, तर ह्या एका हिंदू व्यक्तीला सर्व धर्मांचे सत्य स्वानुभवाने कळले होते. एकाएकी हिंदुधर्म जातपात आणि अंधश्रद्धांऐवजी सर्वोच्च आनुभविक सत्याचा धर्म झाला! आता बाजू पलटली होती. ख्रिस्ती धर्म अवैज्ञानिक ठरला होता, तर भारतीय धर्म अनुभवजन्य होते. हे डार्विनशिवाय घडले असते का? आजही पाश्चात्त्य विचारवंतांना बौद्ध धर्म मोहवतो, कारण डार्विन आणि फ्रॉईड यांच्यानंतर बायबलची शिकवण मानणे शक्य नव्हते. विशेषतः बौद्ध धर्माचे बहुविध आणि अनेक कर्मकांडे असणारे रूप बदलून त्याला अनुभव तपासणारा विवेकनिष्ठ धर्म मानले जाऊ लागले, ते यामुळेच. डार्विननंतर ख्रिस्ती धर्माला कंटाळलेल्या पाश्चात्त्यांच्या बौद्ध धर्माच्या मानसचित्रांत हे विवेकी रूप भेटते. आंबेडकर व त्यांचे अनुयायी ब्राह्मणवादाविरोधात हेच रूप वापरतात. कदाचित् ह्या वाटेने डार्विनही भारतीय राजकारणावर मार्क्सइतकाच प्रभाव टाकतो – आणि हा प्रभाव बहुधा वाढतही आहे!

इथे मी जराशा खट्याळपणे लिहीत आहे. आज भारतीय मध्यमवर्गाने भारतीय संस्कृतीबद्दलच्या काही आधुनिक भूमिका आत्मसात केल्या आहेत – अध्यात्मावरील भर, भारतीय विचारांमधील मनोव्यापारांचे ज्ञान, त्यातील प्राचीन शहाणपण, इत्यादी, आणि ह्या सर्वांची सुरुवात होते ती डार्विनने ख्रिस्ती धर्माचे स्थान डळमळीत करण्यापासून. डार्विननंतर ख्रिस्ती धर्म हा पाश्चात्त्य आधुनिकतेचा कणा आहे असे मांडणे अवघड झाले. त्या धर्मावर अवैज्ञानिकतेचा आरोप यशस्वीपणे करता येऊ लागला. पाश्चात्त्य विचारविश्वातील डार्विनची अंतर्गत समीक्षा अशा त-हेने भारतीयांना त्यांच्या हेतूंसाठी विज्ञानाचा उसना वापर करू देऊ लागली.

पण भारत ही आध्यात्मिक संस्कृती आहे, त्या संस्कृतीचे मनाबाबतचे ज्ञान इतर तुल्य ज्ञानपरंपरांपेक्षा श्रेष्ठ आहे असे मानणे, हे सारे आता कालबाह्य आणि विक्षिप्तही वाटते. गेल्या शतकात विज्ञानाचे रूप इतके बदलले आहे, की आज वेदान्त आणि विज्ञान यांवरील शतकाभरापूर्वी क्रांतिकारक वाटणाऱ्या चर्चा प्रतिगामी वाटतात. आज भारतीय अध्यात्म व आधुनिक भौतिकींमध्ये साम्य दिसत नाही. पण आपण डार्विनचे हे अप्रत्यक्ष, मूलहेतूंबाहेरचे परिणाम सोडायला हवेत. आता उघड्या डोळ्यांनी पाश्चात्त्य विचारवंतांशी थेट नाते जोडायला हवे.

असे प्रयत्न करताना सुरुवात होते ती उघड आणि उथळ विधानांपासून — “विज्ञान आंतरराष्ट्रीय असते”, “भारतीय मनांना पाश्चात्त्य विचारधारा परक्या वाटतात”, इत्यादी. आपण यापुढे जाऊन भारतेतर जगातल्या न्यूटन, डार्विन, आइनस्टाइन यांच्या विचारांकडे भारतीय नजरेने पाहून प्रतिसाद द्यायला हवा ; आणि तो तात्त्विक, दार्शनिक पातळीवर हवा. वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये असे प्रतिसाद शोधणे निरर्थक ठरेल. अखेर न्यूटनने रेखलेले निसर्गनियम कोलकात्यातही तितकेच खरे आहेत, जितके केंब्रिजमध्ये खरे होते. आपण केवळ आपली पाठ्यपुस्तके आणि शिक्षक यांच्या साह्याने न्यूटनीय यामिकी (शिलहरपळली) आणि डार्विनीय उत्क्रांती शिकू शकतो. प्रतिसादांचा दुसरा प्रकार म्हणजे पाश्चात्त्य विज्ञानाला पितृसत्ताक, निसर्गाला पिळून काढणारे, गैरयुरोपीयांवर साम्राज्य घडवणारे, असे मानणे. पण विज्ञान ना निर्भेळ सत्य असते, ना सत्तेचा पर्यायी मार्ग असते. तशा भूमिकांमधून डार्विनवर सजग चर्चा करता येत नाही. काही वेगळे पर्याय भेटतात, पाश्चात्त्य विज्ञानाचे काटेकोर वाचन करून दिलेल्या प्रतिसादांचे – उदा. आशिष नंदी.

म. गांधींप्रमाणेच नंदीही आधुनिक विज्ञानाच्या दाव्यांबद्दल साशंक आहेत. पण विज्ञानातल्या त्रुटी तपासायला नंदी फ्रॉईडचा सर्जक वापर करतात. कोणाला वाटेल की फ्रॉईड व इतर कोणत्याही वैज्ञानिक विचारवंताच्याच मदतीने विज्ञान तपासणे हा चुकीचा किंवा भंपक मार्ग आहे. पण माझ्या मते एखाद्या विचारपरंपरेच्या वापरानेच तिच्यातील ताणतणाव स्पष्ट करणे हे विवेकी टीकेचे लक्षण मानायला हवे. फ्रॉईडने आयुष्यभर मानसशास्त्राला प्रत्यक्षार्थी शास्त्राचा (positive scienceMm) दर्जा देण्याचा प्रयत्न केला. त्याच्याच मदतीने प्रत्यक्षार्थवादाचे (positivismMo) धोके दाखवून देणे, यात मर्मदृष्टी दिसते. वर तसे करण्याने पाश्चात्त्य ज्ञानपरंपरेवर एक घरभेदी (गीलींशीीळींश) टीकाही करता येते. त्यातून फ्रॉईड मोठा विचारवंत होता हे उघड होते. सामान्य विचारवंताचा वापर करून त्याच्या परंपरेतल्या त्रुटी दाखवता येत नाहीत.

फ्रॉईडचे क्षेत्र होते व्यक्तिनिष्ठ घटितांचे, मानसशास्त्राचे. आज तसली घटिते जास्त नेमकेपणाने तपासायच्या अनेक पद्धती उपलब्ध होत आहेत. वस्तुनिष्ठ विज्ञानाच्या क्षेत्रातले प्रश्न भारतीय विचारवंत वेगळ्या त-हेने हाताळतात. ते बहुधा थेट नकारस्वीकारात गुंतून पडतात. आपण यापुढे जाऊ शकतो का? ख्रिस्ती धर्माला शंकास्पद ठरवून डार्विनने भारतीयांना व इतरांना आपापल्या धर्मांचा पुरस्कार करायचे बळ दिले. हा अवांछित, अनपेक्षित परिणाम होता. आपण अशा आडमार्गी परिणामांवरच संतुष्ट राहणार का?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.