डार्विनचा उत्क्रांतिवाद व मार्क्सवाद’

चार्ल्स डार्विन याचा ऑरिजिन ऑफ स्पीशीज हा ग्रंथ १८५९ साली प्रसिद्ध झाला. जीवनावर सखोल भाष्य करणारी अनेक पुस्तके त्याकाळीही प्रसिद्ध होऊ लागली होती. अजून माध्यमक्रांती झाली नव्हती. शिक्षण सार्वत्रिक वा सामुदायिक झाले नव्हते. युरोपमध्येही साक्षरतेचा प्रसार होऊ लागला असला तरी तो बहुशः अक्षरओळखीपुरताच मर्यादित होता. वाचनसंस्कृती अभिजनवर्गापुरतीच मर्यादित होती. गहन विचारांचा प्रसार व प्रभाव अर्थातच सीमित होता. (सार्वत्रिक शिक्षणाचा प्रसार १८७० नंतर सुरू झाला. १८५० मध्ये निदान ३०% वर व ४५% वधू इंग्लंडमध्ये लग्नाच्या नोंदणीवहीत सह्या करू शकत नव्हत्या. १८५० पूर्वी ही परिस्थिती अधिकच वाईट होती. शिवाय स्वतःचे नाव लिहू शकणारे खऱ्या अर्थाने साक्षर होते की नाही हा प्रश्नच आहे.) तरीही या ग्रंथाने युरोपीय विचारविश्वात अभूतपूर्व खळबळ माजवली. त्याच्या काहीच वर्षे आधी, म्हणजे १८४८ साली प्रसिद्ध झालेल्या मार्क्स-एंगल्स लिखित कम्युनिस्ट जाहीरनाम्याने अशीच खळबळ माजवली होती. पण हा जाहीरनामा स्पष्टपणे राजकीय होता. शिवाय या विचारांचा प्रसार व प्रचार मौखिक माध्यमांतून, सभा, बैठका यांद्वारे होत होता. कामगार संघटना व क्रांतिकारी संघटनांनी हा स्वतःचा जाहीरनामा मानून त्याचा प्रचार व पाठपुरावा केला होता. त्यामुळे खळबळ माजणे अपेक्षित व स्वाभाविक होते. ऑरिजिन ऑफ स्पीशीज हा ग्रंथ त्या प्रकारचा नव्हता. एका दृष्टीने तो वैज्ञानिक व तांत्रिक होता. तरीही प्रकाशनानंतर लगेचच या ग्रंथाने संपूर्ण युरोपचे विचारविश्व घुसळून काढले.

असे घडण्याचे कारण तसे सरळ व स्पष्ट होते. या ग्रंथावर अनुकूल वा प्रतिकूल मते व्यक्त करणाऱ्या सर्व समीक्षकांना/टिप्पणीकारांना यातील औपचारिक वैज्ञानिक/तांत्रिक भाग कळत होता, त्याबद्दल भाष्य करण्याचा अधिकार होता व त्याच्यात रसदेखील होता अशातली गोष्ट नाही. खरेतर डार्विन यांच्या मांडणीवरील वैज्ञानिक टिप्पणी – सैद्धान्तिक, वा अनुभवजन्य पुराव्यावर आधारित – त्यामानाने बऱ्याच काळानंतर झाली. ती चर्चा काही प्रमाणात तरी अजूनही चालू आहे. त्यावेळी उठलेले वादळ वेगळ्या प्रकारचे होतेत; वैज्ञानिक नसून श्रद्धांवर आधारित होते. उत्क्रांती या कल्पनेनेच प्रस्थापित धर्मकल्पनेच्या एका पायाभूत विश्वासाला तडा जात होता. परमेश्वराने सहा दिवसांत संपूर्ण चल व अचल, सजीव व निर्जीव सृष्टी निर्माण केली; सर्व जीव तेव्हाच उत्पन्न झाले व तेव्हापासून आपले अस्तित्व टिकवून आहेत, ही ती कल्पना होय. कुठलाही जीव अस्तित्वात येऊ शकतो व विलय पावू शकतो, बदलू शकतो, ही कल्पना परमेश्वराच्या अस्तित्वाला, सृष्टीविषयीच्या त्याच्या महान योजनेच्या संकल्पनेला मूलभूत आह्वान देणारी होती. (निदान ख्रिस्ती) धर्मकल्पना, धर्मपीठांचा अधिकार व सत्ता, सर्वोच्च धर्मगुरूची कालनिरपेक्ष अचूकता यांच्या प्रत्यक्ष रूपाला हे पाखंडी आह्वानच होते. त्यामुळेच डार्विन याच्या मतांवरचा हल्ला हा धर्मसंस्था, धार्मिक विचारवंत यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर झाला; तर त्या मतांचे स्वागत वैचारिक वा भौतिक कारणांसाठी धर्मपीठांना विरोध करणाऱ्या लोकांकडून झाले. यातील काही जण उघड विरोधी भूमिका घेत नसले तरी त्यांना धर्मपीठांची अधिकारशाही जाचक वाटत होती. त्यात पुन्हा धर्मातील अंतर्गत मतभेदांची बैठक या वादंगांना होतीच. (कॅथॉलिक वि. प्रोटेस्टंट वाद आजच्या इतका तेव्हा परिघावरचा वा गैरलागू नव्हता.)

२ डार्विनने जीवसृष्टीची परमेश्वरी निर्मिती नाकारली, इतकेच नाही तर त्याहीपुढे जाऊन अनेक चिद्वादी कल्पनांना धक्का दिला. जरी तत्त्वज्ञानात्मक वादात ते प्रत्यक्षपणे पडले नसले किंवा त्याबद्दल उघड मतप्रदर्शनही केले नसले तरी त्यांची भूमिका इहवादी होती हे उघड आहे. विश्लेषण-पद्धतीतही डार्विन एक वेगळी (आणि विशेषतः त्या काळात वादग्रस्त) भूमिका घेत होते. विचारपद्धती म्हणून त्यांनी बह्वशी द्वंद्वात्मक वा विरोधविकासवादी प्रणाली अवलंबिली होती. त्या दृष्टीने पाहता त्यांच्या मांडणीतील (विश्लेषणपद्धतीच्या संदर्भातील) पुढील मुद्दे महत्त्वाचे ठरतात.३) (१) जीवांची उत्पत्ती ही कुठल्याही निर्मात्याची वा शक्तीची भव्य सहेतुक योजना नसून एक नैसर्गिक घटना आहे. ही घटना अपघातात्मकच समजायला हवी. (२) जीवसृष्टीतील सर्व प्रजाती एकाच पूर्वजापासून उत्पन्न झाल्या आहेत – हा आदिम पूर्वज जीव अतिसरल व अविकसित होता. (३) परिस्थितीला सामोरे जाताना, जीवनसंघर्षाच्या ओघात यशस्वीपणे टिकून राहण्यासाठी जीव स्वतःत बदल घडवून आणतात. (४) सुरुवातीला नगण्य वाटणारे बदल व वैशिष्ट्येदेखील पुढील पिढ्यांत संक्रमित होतात. (५) काही काळानंतर बदललेल्या वैशिष्ट्यांनुरूप प्रजातीचा नवा स्वभाव घडतो. (६) पुढील बदल या स्वभावानुरूप घडत जातात. (७) एका विशिष्ट वेळी या बदलांच्या एकत्रित वस्तुमानातून व परिणामातून एक नवीन प्रजाती उदयाला येते. (८) ही अथक व अंतहीन प्रक्रिया आहे.

४)या मांडणीचे इहवादी/भौतिकवादी तसेच विरोधविकासवादी/द्वंद्वात्मक विश्लेषणपद्धतीशी असलेले साम्य (वा समांतरता) खरे तर स्पष्ट आहे परंतु केवळ अधोरेखित करण्यासाठी पुढील वैशिष्ट्ये सांगता येतील. (अ) जीवसृष्टीच्या उत्पत्तीची व विकासाची कारणे ऐहिक/वास्तविक/भौतिक असतात. (आ) बदलाची प्रक्रिया अनंत असते, तिला कुठलेही पूर्वनिश्चित ध्येय नसते. (इ) जीवनात व जीवसृष्टीत अखंडता व बदल दोन्ही दिसून येतात. (ई) संख्यात्मक बदल एकत्र होताहोता काही काळानंतर गुणात्मक बनतात. (उ) अशा त-हेने वैशिष्ट्यपूर्ण ओळख देखील परिवर्तित होते.

५) डार्विनची मांडणी साधारणपणे पुढील प्रकारची होती. (ही मांडणी जीवशास्त्रज्ञ अटै मायर यांच्या लिखाणावरून घेतलेली आहे.) (१) प्रजातींची प्रजननक्षमता प्रचंड असते; जन्माला आलेल्या जीवांतील अगदी थोडेच पूर्ण वाढू शकतात. (२) प्रजातींची संख्या सर्वसाधारणपणे कायम राहते, होणारे फरक फार महत्त्वाचे नसतात. (३) जीवनोपयोगी संसाधने (मुख्यतः अन्न) मर्यादित असते, परंतु साधारणपणे स्थायी असते (४) लैंगिक मार्गाने पुनरुत्पादन करणाऱ्या प्रजातीत कुठलेही दोन जीव समसमान नसतात; फरक नित्याने आढळून येतात (५) हे फरक वारशाने पिढी दर पिढी संक्रमित होतात. यावरून असे म्हणता येते की प्रत्येक जीव सतत जिवंत राहण्यासाठी संघर्ष करीत असतो; या संघर्षात सर्वोत्तम गुण असलेले जीव टिकून राहतात; हे गुण पुढल्या पिढीला वारशाच्या रूपात मिळतात. असे गुण असणारे प्राणी प्रजातीत प्रभावी ठरतात. हीच नैसर्गिक निवड होय. याचाच अर्थ डार्विन यांची मांडणी पुढील प्रमेयांवर आधारित आहे : (अ) फरक, (आ) मर्यादित संसाधनासाठीची स्पर्धा, (इ) जगू-तगू शकण्यापेक्षा जास्त संख्येने प्रजनन, (ई) ‘सर्वोत्तम’ गुणांचा वारसा हक्क, (उ) नैसर्गिक निवड.

६) साहजिकच त्या काळात निर्मितिक्षमतेच्या, प्रभावाच्या, क्रांतिकारी चळवळींच्या शिखरावर असणाऱ्या कार्ल मार्क्स व फ्रेडरिक एंगल्स यांचे लक्ष या लिखाणाकडे गेले. एंगल्सने प्रकाशनानंतर लगेचच ऑरिजिन ऑफ स्पीशीज वाचून मार्क्सला त्याबद्दल कळवले. मार्क्सला डार्विनची मांडणी ब्रिटिश स्वभावानुरूप अनघड (विश) वाटली परंतु त्यांना त्यात त्याच्या स्वतःच्या मांडणीची (इहवादी/भौतिकवादी व द्वंद्वात्मक/विरोध-विकासवादी) निसर्गविज्ञानातील समर्थने आढळली. तेच त्यांनी एंगल्स यांना लिहिले. पुढे कॅपिटल (भांडवल) या ग्रंथाचा पहिला भाग प्रसिद्ध झाला तेव्हा मार्क्सने एक प्रत डार्विनला भेट म्हणून पाठविली. डार्विनने पत्राद्वारे मार्क्सचे आभार मानले (ऑक्टोबर १८७३). परंतु त्याने तो ग्रंथ बहुधा वाचला नसावा. त्यांच्या संग्रहातील पुस्तकाची पानेदेखील एकमेकांना चिकटलेली होती असे नंतर आढळून आले.

नंतर एक गंमतीदार घटना घडली. १९३१ साली एका सोविएत वृत्तपत्राने डार्विनचे एक पत्र प्रसिद्ध केले. त्यात डार्विनने ग्रंथाचे नाव न घेता त्यांना कुठलाही खंड अर्पण करू नये कारण त्यांचा विषय विज्ञान आहे, धर्मचिकित्सा नव्हे असे म्हटले होते. हे १३ ऑक्टोबर १८८० ला लिहिलेले पत्र मार्क्स यांच्या कागदपत्रांत सापडले असे म्हटले गेले. यामुळे मार्क्सला कॅपिटल चा पुढील एखादा खंड डार्विनना अर्पण करायचा होता अशी समजूत काही काळ प्रसृत झाली. परंतु पुढे या पत्राचा उलगडा झाला – मुळात कॅपिटल चा विषय धर्मचिकित्सा नसून राजकीय अर्थशास्त्र हा होता. मार्क्सची कन्या एलिनॉर हिचे निकटवर्ती एडवर्ड ॲवेलिंग यांना आलेले हे पत्र असावे, असे आता मानले जाते. अवेलिंग यांनी दि स्टुडन्ट्स डार्विन (विद्यार्थ्यांसाठी डार्विन) या नावाचे पुस्तक लिहिले होते, त्याची काही प्रकरणे त्यांनी डार्विनला पाठविली होती व पुस्तक डार्विनना अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. डार्विनचे ते पत्र बहुधा त्या पुस्तकाच्या संबंधात होते. ही घटना तशी मामुली आहे, परंतु मुद्दामच तिचा उल्लेख केला कारण डार्विनवाद व मार्क्सवाद यांच्यातील संबंधाबद्दलच्या काही प्रचलित (गैर)समजुतींवर यातून प्रकाश पडतो. त्या अशा : (१) मार्क्सला डार्विनची सर्व मते पूर्णपणे मान्य असून त्या दोघांच्यात जवळ-जवळ एकवाक्यता होती; (२) डार्विनवादाचा प्रभाव मार्क्सच्या लिखाणावर व विचारांवर पडला होता, किंबहुना डार्विनवाद हा मार्क्सवादाचे प्रेरणास्थान होता; (३) डार्विनवाद हा साम्यवादी विचारांचाच एक भाग आहे. यातील काही समजुती चुकीच्या माहितीवर इ. आधारित असाव्यात तर काही राजकीय डावपेचात्मक गरजांतून उत्पन्न झाल्या असाव्यात. या समजुतींची दखल घेतली तर डार्विनचा उत्क्रांतिवाद व मार्क्सवाद यांच्यातील संबंधांचा उलगडा होऊ शकतो.

डार्विन यांची मांडणी व मुख्यतः विचारपद्धती प्रागतिक व पुरोगामी होती. वैज्ञानिकतेला नाकारणाऱ्या काही प्रस्थापित अंधश्रद्धांना या मांडणीने निश्चितच आह्वान दिले होते. मार्क्सने म्हटल्याप्रमाणे त्यांच्या तात्त्विक सिद्धान्तनाला या मांडणीमधून नैसर्गिक वास्तवावर आधारित समर्थन मिळत होते. परंतु डार्विनचा उत्क्रांतिवाद व मार्क्सवाद यांच्यात काही मूलभूत व महत्त्वाचे फरक होते व म्हणून मतभेदांची शक्यता होती. मार्क्स व एंगल्स दोघांनाही ही स्पष्ट जाणीव होती. पहिला फरक दृष्टिकोणातील आहे. डार्विन जीवशास्त्र व जीवशास्त्रीय प्रेरणा या जीवांच्या व प्रजातीच्या बदलासाठी (आणि यात मनुष्यप्राणीही आलाच) पायाभूत मानत होते. काही प्रमाणात हा जीवशास्त्रीय नियतिवाद होता. मार्क्स मनुष्यप्राण्याला जीवशास्त्रीय नव्हे तर सामाजिक अस्तित्व मानत होते. त्यांच्या थीसिस ऑन फायरबाख या लिखाणात ही मांडणी स्पष्टपणे येते. मार्क्सवादी पद्धतीत निसर्ग व मानव यांचे नाते द्वंद्वात्मक मानण्यात येते – त्यामध्ये केवळ निसर्गाच्या, वा आनुवंशिकतेच्या, वा जीवशास्त्रीय घटकांच्या नियत करणाऱ्या प्रभावाची मांडणी बसत नाही. मानवाचे विशिष्ट (ऐतिहासिकदृष्ट्या विवक्षित) परिस्थितीबरोबरचे नाते द्वंद्वात्मक असते; सामूहिकपणे मानव या परिस्थितीला सामोरा जातो व ती बदलण्याचा प्रयत्न करतो असे मार्क्सवादात मानलेले आहे. यातूनच इतिहासाच्या भौतिकवादी/इहवादी विश्लेषणाचा (सामान्यपणे ऐतिहासिक भौतिकवाद) पाया तयार होतो. मनुष्यप्राणी स्वतः शारीरिकदृष्ट्या न बदलता भोवतालचे वास्तव बदलण्याचा प्रयत्न करतो – हेच उत्पादनाचे रहस्य होय. म्हणूनच मनुष्य एक उत्पादक प्राणी असून हे उत्पादन नेहमीच सामाजिक असते. ही सामाजिकता निवड नसून अस्तित्वाचीच अट आहे. त्यामुळेच स्पर्धा वा संघर्ष असले तरी मनुष्याला समाजापासून वेगळे पडता येत नाही -व्यक्ती म्हणूनही नाही किंवा वर्ग म्हणूनही नाही. उत्पादनाच्या मुळाशी असतात सहेतुक, जाणीवपूर्वक केलेले श्रम. या मांडणीचा डार्विनच्या उत्क्रांतिवादाबरोबर स्वाभाविक व संपूर्ण संबंध लागणे शक्य नाही, हे कुणालाही स्पष्ट असावे. मार्क्स-एंगल्स यांना ही स्पष्ट जाणीव होती. म्हणूनच त्यांना डार्विनच्या मांडणीत स्पर्धेला दिलेले स्थान अवास्तव वाटते. दोघेही म्हणतात की डार्विनची ही धारणा निरंकुश भांडवली स्पर्धेच्या कल्पनेतून उद्भवलेली आहे; त्याच मुशीतून बनलेली आहे. श्रम या कल्पनेला डार्विनच्या मांडणीत स्थान नाही व हा मतभेदाचा मुद्दा आहे, या जाणिवेतून बहुधा एंगल्स यांनी दि रोल ऑफ लेबर इन दि ट्रान्जिशन फ्रॉम एप टू मॅन हे लिखाण केले. साहजिकच डार्विनच्या मांडणीत ‘नैसर्गिक निवड’ या घटकाला दिलेले कळीचे स्थान तसेच त्याची “सर्वाधिक सक्षम तोच जगेल/टिकेल” ही कल्पनाही मार्क्सवादाला मान्य होण्यासारखी नव्हती. त्यांना या कल्पना थॉमस माल्थस यांच्या मांडणीला पुष्टी देतात असे वाटत होते. (आणि मार्क्सला माल्थसच्या कल्पना चुकीच्या-कदाचित घातकदेखील-वाटत असत.’) दुसऱ्या बाजूने पहायचे तर डार्विनला मार्क्सचे सामाजिक व राजकीय विचार मान्य होते असे म्हणायला काहीही आधार नाही. कदाचित डार्विनला मार्क्सची मांडणी फारशी माहीत नसावी व तो मार्क्सबद्दल प्रस्थापित वर्तुळात व्यक्त होणाऱ्या मतांवरूनच स्वतःची धारणा ठरवीत असावा.

डार्विनच्या मांडणीतून काही इतर समस्या निर्माण होत होत्या. सामाजिक परिस्थितीला डार्विनवाद लागू केल्यास सरळसरळ एक अनघड व सवंग अभिजनवादी भूमिका तयार होत होती. “सर्वाधिक सक्षम तोच जगेल/टिकेल” या मांडणीतून अन्याय, अत्याचार, शोषण, गुलामी यांचे समर्थन होण्याची शक्यता निर्माण होत होती. पराभूत झाला, गुलाम झाला, शोषित-दलित झाला तो क्षमता नसल्यामुळे, व जगायला/टिकायला किंवा नेहमीच अपुऱ्या असणाऱ्या संसाधनांवर हक्क सांगायला लायक नसल्यामुळे, अशी मांडणी “बळी तो कान पिळी’ या दुष्ट (तार्किक व नैतिकदृष्ट्या) प्रमेयातून होऊ शकत होती. स्वतः डार्विनने असे मत कधीही व्यक्त केले नसले तरी सामाजिक डार्विनवाद या मताचा पुरस्कार करणाऱ्यांनी तसे जरूर केले. आजारी, दुबळ्या, मानसिकदृष्ट्या विकल अशा लोकांवर संसाधने खर्च करून उत्क्रांतीचा क्रम खंडित करायलाही या लेखकांनी विरोध केला. हे प्रत्यक्ष अंमलात आणून समाजाच्या अशा दुबळ्या, दुय्यम, नालायक विभागांचे निर्दालन करण्याचा प्रयत्न हिटलरच्या नाझी राजवटीने केला. थोड्या(शाच) सौम्य स्वरूपात वंशवाद व वांशिक श्रेष्ठत्व या भूमिकेनेही अशा मतांचा आधार घेतला. साम्यवाद्यांना हा धोकाही दिसला होता, आणि म्हणून त्यांनी नैसर्गिक निवड व सक्षमतेचा विजय या कल्पनांना आक्षेप घेतला. विश्लेषणपद्धतीच्या दृष्टिकोणातूनही त्यांनी या मांडणीला नकार दिला. प्राणिसृष्टीतील तत्त्व मानवी समाजावर लादता येत नाही व मानवी समाजाचे व जीवनाचे गुण प्राणिसृष्टीवर थोपता येत नाहीत, ही मांडणी त्यांनी केली. पुन्हा एकवार सांगायचे तर डार्विन स्वतः उत्क्रांतिवादाच्या या प्रकारच्या सामाजिक निष्कर्षावर कुठेही स्पष्ट भाष्य करीत नाही. परंतु त्याला हर्बर्ट स्पेन्सर व गॉल्टन यांच्या मतांविषयी निदान काही प्रमाणात तरी आस्था होती, असे म्हणण्यास जागा आहे. एका बाबतीत मात्र डार्विन याची भूमिका अधिक स्पष्ट होती. स्त्री ही निसर्गतःच दुबळी व दुय्यम असते असे त्याने मानले होते. त्यामुळे स्त्रियांचे सामाजिक दुय्यम स्थान व शृंखलाबद्धता हे त्यांना नैसर्गिक व अपरिहार्य वाटत होते. स्त्रीवादी व स्त्रीमुक्तिवादी भूमिका त्या काळात मुख्यतः मार्क्सवादाच्या चौकटीत मांडल्या जात असल्याने (उदा. रोझा लक्झेम्बर्ग, अलेक्झांड्रा कोलोंताई, क्लारा झेट्किन) याही मुद्द्यावर या दोन विचारसरणींमध्ये मूलभूत मतभेद होते.

सहज कालक्रमावर नजर टाकली तरी कळते की मार्क्सचे पायाभूत लिखाण डार्विनचा ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वीच झाले होते. १८५९ च्या आधी मार्क्स-एंगल्स यांनी केवळ कम्युनिस्ट मॅनिफेस्टो नव्हे तर जर्मन आयडियॉलॉजी, होली फॅमिली, इतर अनेक महत्त्वाचे ग्रंथ लिहून प्रकाशितही केले होते. (गुडरिज प्रकाशित झाले नव्हते – बहुधा ते पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याची मार्क्सची कल्पना नसावी). थीसिस ऑन फायरबाख देखील लिहून प्रसिद्ध झाला होता. जवळजवळ सर्व राजकीय महत्त्वाचे लिखाणही होऊन गेले होते. १८५९च्या सुमाराला मार्क्स कॅपिटलच्या लिखाणात व्यग्र होते. त्यांच्यावर डार्विनच्या मांडणीचा त्या अर्थाने प्रभाव पडलेला दिसत नाही.

वर म्हटल्याप्रमाणे मार्क्सवादी संकल्पना व डार्विनची मांडणी यांत मूलभूत फरक होतेच. स्वतः डार्विन मार्क्सच्या अभ्यासाच्या विषयांबद्दल तटस्थ असावा. त्यामुळे राजकीय वा वैचारिकदृष्ट्या त्याला साम्यवादी विचारधारेत बसविण्याचे प्रयत्न गैरलागूच म्हणायला हवे. सामाजिक विचारांच्या दृष्टीने पहायचे तर डार्विनच्या विचारांचे प्रभाव वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. नैसर्गिक निवड; सर्वाधिक सक्षम तोच टिकेल/जगेल (अतिसुलभीकरण म्हणजे “बळी तो कान पिळी”) या संकल्पनांनी सामाजिक डार्विनवाद ही मूलतः प्रतिगामी विचारसरणी प्रभावित झाली होती. सुप्रजननशास्त्राबद्दलच्या गॉल्टनच्या कल्पना डार्विनवादातून जन्म घेत होत्या. (स्वतः डार्विनला गाल्टनचे विचार व्यवहारी वाटले नाहीत.) नीत्शेने डार्विनच्या मतांना विरोध केला असला तरी त्याच्या महामानवाच्या संकल्पनेमागे वर उल्लेखिलेल्या तत्त्वांचाच पाया दिसतो. सामाजिक डार्विनवाद व सुप्रजननशास्त्राचे व्यवहारातील बीभत्स रूप अर्थातच नाझी राजवटीत दिसून आले. तरीही अनेक मार्क्सवादी लेखकांना डार्विनचे आकर्षण होते हे खरेच आहे. त्यांनी डार्विनच्या विचारांशी अतूट नाते जोडण्याचा प्रयत्न केला. डार्विनवाद व मार्क्सवाद यांवरील काही लिखाणे बऱ्यापैकी प्रसिद्ध आहेत. यात अँटन पॅनेकोक यांचे १९०९ सालचे पुस्तक, स्टीफन गूल्ड यांचे २००२ मध्ये पुनःप्रकाशित झालेले पुस्तक, (द मिस्मेझर ऑफ मॅन) व १९२२ सालचा लिऑन ट्रॉट्स्की यांचा लेख यांचा उल्लेख आवश्यक आहे. ताबडतोबीने हेही म्हणायला हवे की या तिन्ही लेखकांना डार्विनच्या मर्यादांचे भान आहे. सोविएत युनियनने आधी डार्विनला क्रांतिकारी विचारवंत मानले, परंतु १९३० च्या दशकात लायसेन्कोच्या आनुवंशिकता शास्त्राच्या वेगळ्या मांडणीच्या प्रभावाखाली डार्विनच्या मांडणीला विरोध केला. २००९ मध्ये बोलायचे तर मार्क्सवादी दृष्टिकोणातून डार्विनचे महत्त्व इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा असे आहे. त्याच्या मांडणीने विशेषतः एका विशिष्ट कालखंडात एक क्रांतिकारी विचार पुढे आणला. त्याच्या मर्यादा लक्षात घेऊनही ते ऐतिहासिक महत्त्व मान्य करायला हवे.

संदर्भः (१) डार्विन व उत्क्रांतिवाद यांच्या संदर्भात मार्क्सवादी विचारवंतांनी खूप काही लिहून ठेवले आहे. महाजालावर सहज तपासणी केली असता http://www.marxists.org या मार्क्सवादी विचाराच्या ज्ञानकोषात या विषयावरच्या ३००च्या आसपास नोंदी आढळतात.

(२) स्वतः डार्विन नास्तिक वा निरीश्वरवादी असल्याचा प्रत्यक्ष पुरावा नाही. अनेक लेखक ते नास्तिक नव्हते असे किंबहुना ख्रिस्ती धर्मही मानत होते असे म्हणतात. परंतु एका ठिकाणी डार्विन असेही म्हणाले आहेत की सर्वशक्तिमान दयाळू परमेश्वर जिवंत अळ्यांच्या शरीरात राहून ती शरीरेच खात राहणाऱ्या भुंग्यांची उत्पत्ती करू शकेल असे वाटत नाही. म्हणजे निदान परमेश्वराच्या समजल्या जाणाऱ्या शक्तीविषयी त्यांना बऱ्यापैकी शंका होत्या असे म्हणता येते. आणखी एका ठिकाणी ते असेही म्हणतात की आपण ग्रह, तारे, आकाशगंगा यांच्याबद्दलचे नियामक नियम मान्य करतो. मात्र सूक्ष्मातिसूक्ष्म कीटकदेखील कुठल्या तरी विशेष घटितातून उत्पन्न होतो असे मानू इच्छितो. पुन्हा अत्यंत स्पष्टपणाने ते म्हणतात की ते विज्ञानाविषयी लिहितात व धर्माविषयी बोलणे टाळतात — याबाबत ते प्रामाणिकपणे मान्य करतात की धर्मावर टीका केल्यास त्यांच्या परिवाराला होईल ते दुःख ते टाळू इच्छितात. (पहा http://www.spaceandmotion.com/Charles-Darwin-Theory-Evolution.htm#Evolution.Quotes qH$dm http://www.darwin-literature.com/_quotes.html)

(३) उदाहरणार्थ अमेरिकेतल्या अनेक घटक राज्यांना अधिकृतपणे उत्क्रांतिवाद मान्य नव्हता. आजही बधा राज्ये त्यांच्या संविधानात डार्विन यांचा उत्क्रांतिवाद अमान्य करतात. १९२५ साली तर एका शिक्षकाला डार्विन यांची मांडणी शिकविल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. महाजालावर सापडणारा डार्विन यांच्या सिद्धान्तावरचा हल्ला (आजही) मुख्यतः चर्चसंबंधित संस्थांकडूनच होताना आढळून येतो. यात केवळ ख्रिश्चन धर्माबद्दल बोलण्याचे कारण नाही. ज्यू धर्म व इस्लाम यांनाही सृष्टीची अकस्मात ईश्वरी निर्मितीच मान्य आहे. इतर धर्म याबद्दल बोलत नाहीत इतकेच, परंतु विशेषतः मानव हे ईश्वराचे रूप असणे, निर्मिती असणे, यावर बहुतेक धर्ममतांची श्रद्धा असतेच. मौजेची गोष्ट म्हणजे महाजालावरच सापडलेल्या एका संदर्भात हिंदूंना उत्क्रांतिवाद हजारो वर्षांपूर्वीच माहिती होता असे म्हटले आहे. पुरावा म्हणून दशावतार कल्पनेचा दाखला दिलेला आहे.)

(४) मी केवळ डार्विन यांच्या मांडणीचा विचार केला आहे. उत्क्रांतिवाद डार्विन यांच्या आधी निदान प्राथमिक स्वरूपात तरी अस्तित्वात होता — त्याबद्दल मी बोलत नाही. तसेच आजचा उत्क्रांतिवाद हा डार्विनच्या मांडणीपेक्षा खूप वेगळा आहे हेही मी जाणतो पण त्याचा विचार मी हेतुपुरस्सर टाळला आहे कारण माझा विषय काही प्रमाणात डार्विनवाद (उत्क्रांतिवाद नव्हे) व मार्क्सवाद हा आहे.

(५) एका परीने डार्विन ब्रिटिश परंपरेतील सच्चे ‘वास्तववादी’ शास्त्रज्ञ होते. प्रत्यक्ष निरीक्षणे व त्यांचे तर्कसंगत विश्लेषण या पलिकडे जाऊन सिद्धान्तनाची बांधणी करण्याकडे त्यांचा कल नव्हता. स्वतःच्या मांडणीतूनच शक्य होणाऱ्या सर्वव्यापी महासिद्धान्तात त्यांना फारसा रस नसावा. त्यांच्या तीन ग्रंथांपैकी केवळ शेवटच्या लिखाणात (डिसेंट ऑफ मॅन, सन १८७१) ते काही सर्वसाधारण विधाने करतात. इतर लिखाणात ते असे संदर्भ टाळतातच, असे मानण्यास जागा आहे.

(६) स्वतः डार्विन यांना ही मांडणी इहवादाशी नाते जोडते हे निश्चित ठाऊक असावे, पण त्या वादात ते पडतच नाहीत. स्वतःच्या पद्धतीचे विरोधविकासवादाशी नाते आहे हे ते मान्य करीत होते की नाही हे कळण्याचा मार्ग नाही. साधारणपणे ब्रिटिश लेखक/शास्त्रज्ञ/विचारवंत विरोधविकासवादाला उपरे तत्त्वज्ञान मानून नाकारत असावेत असे वाटते.

(७) पहा : http://en.wikipedia.org/wiki/Charles_Darwin)

(८) बहुधा आपला नैसर्गिक विज्ञानाचा विशेष अभ्यास नाही या जाणिवेतून मार्क्स नैसर्गिक/भौतिक विज्ञानाशी संबंधित बाबींवर कधी फारसे लिहीत नाहीत. एंगल्स मात्र या विषयात आपल्याला गती आहे या भूमिकेतून अनेकदा त्याबद्दल लिहितात. १९६, राजा राममोहन रॉय मार्ग, गिरगाव, मुंबई ४०० ००४.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.